Saturday, December 4, 2010

संतोषगड    : एक निवांत ट्रेक

६ नोव्हेंबर २०१०

यंदाच्या दिवाळीच्या तोकड्या सुट्टीतसुद्धा   दैवाने दुर्गवेड्यांची निकड जाणून एक दिवस भाकड दिला होता. नाहीतेक शाळकरी मित्र जे पुण्याबाहेर नोकरी करतात, ते पुण्यात असणार होते, त्यामुळे दिवाळीच्या बरेच दिवस आधी या ट्रेक ची आखणी झाली होती, एकाच दिवसाचा ट्रेक असल्याने तयारीही फारशी नव्हती. पण ट्रेकच्या आदल्या दिवशी नेहमी घडणारी गोष्ट घडली पण अधिक प्रकर्षाने!! एरवी ट्रेक साठी आतुर असणारे बरेच भरवशाचे मावळे यावेळी फितुर झाले.

आणि अखेर सागर व मी अशी जोडगोळी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ च्या गाडीने फलटण ला रवाना झालो. स्वारगेटहून  निघताना आम्ही "बरोबर" शब्द-कोड्यांचा एक विशेषांक  बरोबर घेतला होता. त्यामुळे स्वारगेट ते फलटण हा ३ तासांचा प्रवास शाब्दिक खेळ आणि काही (स्वाभाविक) शाब्दिक कोट्या यामध्ये मजेत गेला. फलटणहून  "ताथवडे" गावाला जाण्यासाठी "वडुज" ची एस.टी. पकडायची होती. ती ९.१५ ला असल्याने फलटण स्थानकावर आम्ही तिखटजाळ मिसळीचा नाश्ता केला.
साधारण १०-१०.१५ च्या सुमारास आम्ही  किल्ल्याचे पायथ्याचे गाव "ताथवडे" येथे पोचलो. बस थांब्यापासून अंदाजे १ कि.मी. अंतरावर वस्ती सुरु होते. आधी माहिती मिळाल्याप्रमाणे या गावात बरीच मंदिरे आहेत. गावातून तो किल्ला बराच दृष्टीक्षेपात येत होता.
संतोषगड (ताथवडे गावातून दिसणारा) 

किल्ल्याची उंची पुण्यातील पर्वतीपेक्षा थोडीशीच जास्त आहे, असे बघतच कळून आले.  लहानसा किल्ला असल्याने चढायला वेळ लागणार नाही हे कळल्याने आमच्या फोटोग्राफी ला ऊत आला. पावसाळा नुकताच संपला असल्याने सह्याद्रीचे रूप चांगलेच खुलले होते.
हिरव्या रंगांच्या असंख्य छटा डोंगरांना चैतन्य प्राप्त करून देऊन त्यांच्यावर जणू मानवी चेहऱ्यांचे संस्कार करीत होत्या. "गावाबाहेरील एक विस्तीर्ण तळे व त्यामध्ये मधोमध उगवलेले एक झाड" हे दृश्य तर एखाद्या निसर्ग-चित्रांच्या प्रदर्शानामधील एक वाटत होते.

संतोष गडावरून टिपलेले एक विहंगम दृश्य 

किल्ल्यावर जाताना एक आश्रम-वजा झोपडे वाटेत लागले. त्या आश्रमावर एक भगवा झेंडा डौलाने फडकत होता. त्याचा फोटो घेण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. तिथल्याच एका माणसाने आम्हाला बालेकिल्ल्याची  वाट दाखवली. पण ही वाट थोडे पुढे जाताच अस्पष्ट झाली व नंतर गायब!! त्यामुळे तटबंदी दिसेल त्या दिशेने खडकांना आणि झाडा-झुडपांना धरत धरत वर गेलो.
एक अवघड (केलेली) वाट 

हनुमान मूर्ती , संतोषगड 
संपूर्ण किल्ल्यावर अनेक भग्नावशेष होते. एकही  आडोसा असा नव्हता.  किल्ल्यावरील महादेवाचे (तातोबाचे) मंदीर शोधण्यासाठी आम्ही किल्ल्यावर बरीच पायपीट केली. किल्ला संपूर्ण पिंजून काढला. या भटकंतीत आम्ही किल्ल्यावरील हनुमान - गणेशाच्यादुर्मिळ मूर्ती,  एक खोल धोकादायक विहीर पहिली. तसेच झाडा-झुडपांच्या आड लपलेले किल्ल्यावरील ऐकीव भुयाराचे दारही पाहिले.
गणेश-मूर्ती , संतोषगड 
.

किल्ल्याच्या सर्वोच्च जागी जाऊन टेहेळणी केली (गुरांची, (कारण किल्ल्यावर बरीच गुरे मनसोक्त चरत होती. )) तेथून बरेच फोटो काढले. आणि गड उतरावयास प्रारंभ केला. पुहा वाट! कारण चढताना असेतरी-कसेतरी आलो होतो व किल्ल्याचे महाद्वार वगैरे आता अस्तित्वात नसल्याने खाली जाण्याची कोणतीच नैसर्गिक वाट तेथे आढळली नाही. त्यावरून या गडावर फारच अभावाने लोक येत असावेत, असा निष्कर्ष आम्ही काढला. आश्रमाचा झेंडा ही खूण ठरवून त्या दिशेने आन्ही (नव्याने) वाट तयार केली.
किल्ल्यावरून दिसणारे ताथवडे गाव 

आता आश्रमात गेलो असता आश्रम स्वामिनी असलेल्या एका साध्वी योगिनीने  आमचे स्वागत केले. आश्रमात स्थापित असलेल्या विष्णुरूपी तातोबाचे दर्शन घडवले व प्रसाद देऊन आम्हाला गावाच्या वाटेला लावले.

एव्हाना एक वाजत आलं होता. आश्रमातील योगिनीकडून  आम्हाला महादेवाच्या मंदिराबाबत शोध लागला होता. जी धोकादायक विहीर आम्ही पहिली होती, तिच्या मध्यभागी बांधावर एक छोटेसे मंदीर होते. विहिरीवरील दाट पर्ण-संभारामुळे ते आम्हाला दिसू शकले नव्हते. आश्रमातून निघतच जवळ एक झाडाखाली आम्ही जेवायला बसतो. श्रीखंड-पोळी, चिवडा-शंकरपाळे  यांवर आम्ही मनसोक्त तव मारला. बाष्कळ विनोदही चालू होते. तिसरा माणूस टाळी द्यायला नसल्याने एकमेकांची थट्टा-मस्करी चालू नव्हती इतकेच ! जेवण करून दोनच्या सुमारास आम्हे बस थांब्यावर आलो. फार वाट पहावी  न लागताच आम्हाला एक ओमनी मिळाली. ताथवडे ते फलटण या प्रवासात सागरने मस्त झोप काढली.
आम्ही फलटण ला पोचलो तेव्हा ३ वाजले होते. तेथे स्थानकावर मस्तपैकी चहा घेतलाव जणू आमचीच वाट बघत तेथे लागलेल्या "फलटण-पुणे" गाडीत बसलो. सकाळ पासून आम्ही सर्व चालक-वाहकांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्याचा घाट घातला होता. याचा उपयोग आम्हाला या गाडीतील वाहका-कडून पेन मिळण्यासाठी झाला. त्यामुळे परतीचा प्रवासही शब्दकोड्यात गुंतला.
साडेसहा वाजता आम्ही पुण्यात परतलोसुद्धा !  एक मस्त, निवांत, ONE DAY ट्रेक आम्ही ENJOY केला होता. दिवाळीच्या सुट्टीत किल्ल्यावर जाण्याची तहान संतोष-गडाने निखळ सृष्टी सौंदर्याचे पाणी पाजून तोषवली  होती.

Wednesday, November 3, 2010

मी इतुका वेडा 

तंद्रीत अपुल्या असायचो मी जेव्हा

मज सुचतच नव्हते दुसरे काही तेव्हा

प्राध्यापक होते शिकवीत कविता छान

रूप तुझे न्याहाळत होतो करून जिवाचा कान

मी इतुका वेडा असे कसे मग घडले

मज नव्हते ठाऊक आणिक नाही कळले.

सहलीत लावलेल्या गाण्याच्या त्या भेंड्या

नजर-भेटीने उडवल्यास तू माझ्या दांड्या

आणि नंतर त्या संध्याकाळी रम्य

आपल्या चालीत सुद्धा होते किती साम्य

का मुद्दामच तू सूर माझ्याशी जुळवलास

जसा करात माझ्या कर तुझा मिळवलास

मी इतुका वेडा असे कसे मग घडले

मज नव्हते ठाऊक आणिक नाही कळले.

त्या दिवशी होते संमेलन आठवते....

तव भेटीसाठी मन आतुर झाले होते .

रातराणी, परी तू सालंकृत अवतरलीस

आणि कृष्णमय  मनात माझ्या राधेपरी भरलीस

तुझ्या आगमनाने घडले भलतेच आक्रीत

इंग्रजी स्तुतीकाव्यही म्हटले  मी अस्खलित

 मी इतुका वेडा असे कसे मग घडले

मज नव्हते ठाऊक आणिक नाही कळले.

कातरवेळी एकदा  सागर किनारी

मन-सागरामध्ये नुसती

भावनांना आली होती भरती

चालता चालता गेलो होतो पार टोकाला

पाणिग्रहण खरंच  केले होते,

आवरणार कसे त्या मिठीला

ओल्या बाहुपाशात मी तुझ्या विरघळलो होऊन  मीठ

अधरा वरी जुळले अधर, पापणी तुझी ही मीट...

 मी इतुका वेडा असे कसे मग घडले

मज नव्हते ठाऊक आणिक नाही कळले.
     ((मंगेश पाडगावकर यांची माफी मागून )

     ("जिप्सी" मधील  कवितेचे मुलाच्या मनातील काल्पनिक  भाव - उन्मेष )

Saturday, October 9, 2010

रतनगड : सह्याद्रीतील एक दुर्गरत्न

रतनगड
निसर्ग सौंदर्याने नटलेले आणि कळसूबाईच्या डोंगररांगांचे मुकुट मणी शोभावे असे सह्याद्रीतील एक दुर्ग रत्न म्हणजे रतनगड होय.
पाऊस पडून गेला, की SEPTEMBER महिना हा भटक्यांसाठी जणू पर्वणीच असतो.  यंदाच्या पावसानंतर खूप दिवसांनी आम्हा मित्र मंडळींचा रतनगड चा बेत ठरला.
कनक , अनयदादा, सिद्धेश व मी अशी आमची चौकडी २४ सप्टेंबर च्या रात्री शिवाजी-नगर स्थानकावर जमली. रात्री १२.३० च्या गाडीने संगमनेर ला प्रयाण केले. लाल डब्यातला हा प्रवास नेहमीप्रमाणे रंगला. एस. टी. तील वल्ली व्यक्तींचे निरीक्षण करण्यात आणि हसण्या-हसवण्यात हा वेळ मजेत गेला. साडेचार च्या सुमारास इच्छित स्थळी पोचलो. "संगमनेर - कसारा"  ही एस.टी. आता आम्हाला हवी होती. त्यासाठी सकाळी ६ वाजेपर्यंत थांबणे भाग होते. एस. टी. स्थानक चांगले प्रशस्त असले तरीहि तेथे झोपणे आम्हाला प्रशस्त वाटले नाही. चहा मारणे, पेपर वाचणे, कोडी सोडवणे वगैरे गोष्टी करण्यात वेळ मस्त गेला.

सहा वाजता मिळालेल्या गाडीने आम्ही संगमनेर सोडले. "कसारा" च्या या गाडीत आम्ही झोपेची "कसर" भरून काढली. पावणे दहाच्या सुमारास "शेंडी" या गावी पोचलो,जेथून आम्हाला रतनवाडी ला जाण्याची तजवीज करावयाची होती. "शेंडी" ला उतरल्यानंतर तेथील हॉटेल CAFE DAM कॉर्नर या खानावळीत नाश्ता करून होड्यांची चौकशी केली. होडीचे एका फेरीचे रु.१००० सांगितल्याने   - "वाट पाहीन पण एस. टी. नेच जाईन" असे आम्ही ठरवले. नाहीतरी ११ वाजता एस. टी. होतीच. शेंडी येथून भंडारदरा जलाशयाचे विस्तीर्ण पात्र कळसूबाईच्या पार्श्वभूमीवर अधिकच आकर्षक दिसत होते. त्यामुळे "वेळ कसा घालवायचा ?" असे न वाटता  "एवढ्याश्याच वेळात किती फोटो काढू आणि किती नको" असे आम्हाला झाले.


११ वाजता चक्क वेळेवर आलेली एस. टी. १२ च्या सुमारास "रतनवाडी" या पायथ्याच्या गावी पोचली.  तेव्हा पाऊसही नाही आणि कडक ऊनही नाही असे आल्हाददायक वातावरण होते. त्यामुळे झकास मूड बनला.
रतनवाडी हे गाव अमृतेश्वर च्या मंदिरासाठी सुद्धा सुप्रसिद्ध आहे. हेमाडपंथी वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना म्हणून तसेच प्रवरा नदीचा उगम म्हणून सुद्धा या मंदिराची ओळख सांगता येईल. मंदिराचा गाभारा त्यामुळे कायम पाण्याने भरलेला असतो.  
अमृतेश्वर मंदिराचा गाभारा, रतनवाडी 
आम्ही त्या मंदिरात शिव-स्तुती म्हणून आवारातच डबे उघडले.
अशा प्रकारे आधी विठोबा मग "पोटो"बा आणि मग बराच "फोटो"बा केल्यावर आम्ही किल्ल्याकडे निघालो.
एका स्थानिक मुलाने आम्हाला नदीकडील (जवळच्या) वाटेला लावले.  आम्ही प्रथमच अधून मधून नदीतून जाणाऱ्या आणि अधून मधून जंगलातून जाणाऱ्या वाटेचा आनंद लुटला . नदी पार करताना सुरवातीला घसरा-घसरी होत असली, तरी नंतर आम्ही चांगलेच सरावलो.  नदी पात्रातून जाणारी वाट संपल्यावर अचानक चढण असणारे डोंगर सुरु होतात.

चढण पार केल्यानंतरचे  निवांत क्षण 


हे पार केल्यावर एक छोटे पठार लागले.  तेथून गडावर जाणारी वाट अजून स्पष्ट झाली. सुदैवाने पावसाचा अनपेक्षित "तीर्थ"प्रसाद आम्हाला मिळाला नाही. त्यामुळे नुसती वाटच सुसह्य झाली नाही तर, कॅमेरा सुद्धा अनेकदा "क्लिक-क्लीकाट" करून गेला. किल्ल्याच्या माथ्यापर्यंत पोचण्यासाठी अजून एक दिव्य पार करायचे होते. ते म्हणजे २ लोखंडी शिड्या ! आणि त्यानंतर एक छोटी पण निसरडी खिंड!  हा पॅच हळू हळू (म्हणजे भीतीमुळे  नव्हे तर फोटो काढत काढत ) पार केला.

अंतिम टप्प्यातील लोखंडी शिड्या, रतनगड  


आणि आम्ही चोर दरवाजापाशी पोचलो. जोरदार घोषणा झाल्या - "जय भवानी जय शिवाजी" !!! या दरवाजाचे प्रचलित नाव "हनुमान" दरवाजा आहे कारण याच्या डावीकडील बाजूस मारुतीची  मूर्ती कोरली आहे.  गडावरील पहिली गुहा ही रत्नादेवीचे मंदीर असून ही १५ फूट लांब आहे. दुसरी गुहा तुलनेने मोठी (साधारण ३० फूट)  आहे. या गुहेला लोखंडी ग्रीलचा दरवाजा बसवला आहे. राहण्यासाठी अतिशय सुरक्षित अशी ही जागा होती. तेथे आमच्या सॅक्स ठेवून आम्ही गड फिरावयास निघालो.  गुहांतून दिसणारा भंडारदरा जलाशयाचा परिसर आणि सभोवतालीची  पर्वतराजी पाहून वासोट्याची आठवण झाल्याशिवाय राहिले नाही.  किल्ल्याच्या दक्षिण बुरुजापाशी आम्हाला पुण्याहूनच आलेला एक ग्रुप भेटला. त्यांच्यापैकी अनिकेत नावाच्या मुलाला सह्याद्रीचा भूगोल चांगलाच माहीत होता. या बुरुजावरून सह्याद्रीच्या बेलाग कड्यांचे दृश्य खूपच विलोभनीय दिसत होते. पाबरगड, आजोबागड , कात्राबाईचा कडा आमच्या नेत्रासुखाची पुरेपूर काळजी घेत होते.  सूर्य पश्चिम क्षितिजावर कलत  होता, त्याने आपल्या किरण-शलाकांचा एक झोत त्या कड्यांवर मारला आणि एखाद्या कसलेल्या चित्रकाराने रंगवावे तसे ते कडे खोटे वाटून लागले. "प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट" असे काहीसे ऐकले होते ,येथे मात्र  प्रत्यक्षच "प्रतिमे" हून सुंदर बनून आमच्या पुढ्यात आले होते .

रतनगडावरुन दिसणारा सह्याद्री  


तेथील दृश्य  भरभरून नजरेच्या आणि कॅमेऱ्याच्या चौकटीत भरून घेतले आणि पाणी भरण्यासाठी गडाच्या उत्तरेकडे निघालो. किल्ल्यावर असलेल्या अनेक टाक्यांपैकी मधोमध असलेले एक तलाव-वजा टाके पाण्याने तुडुंब भरलेले होते.

रतनगडावरील तळे  


. पाण्याचा भाग सोडला तर किल्ल्यावर जमीनसुद्धा दिसणे अवघड इतक्या पावसाळी वनस्पती , झाडे-झुडुपे वाटेत होत्या.  प्रमुख आकर्षण असलेले नेढे बघण्याचा कार्यक्रम आम्ही उद्यावर टाकला. आणि मघाच्याच बुरुजावर भेळ खाऊन आम्ही गुहेत परतलो. एव्हाना पाऊस भुरभुरू लागला होता. रात्री त्याचा जोर चांगलाच वाढला. आम्ही गुहेत पराठ्यांचे जेवण करून घेतले. "स्वीट डिश" म्हणून कनकने आणलेले  "आम्रखंड" होतेच. अशा मस्त जेवणानंतर गुहेबाहेर आमचा गप्पांचा फड चांगलाच रंगला. पाऊस जरा उघडल्यानंतर सृष्टीसौंदर्याचा एक आगळाच नजराणा आम्हाला पेश झाला. काळ्या ढगांच्या आडून होणारा लालसर पांढऱ्या चंद्राचा उदय पाहणे हा एक मणीकांचन योग ठरला.  दहाच्या सुमारास आम्ही दमलेल्या शरीराला विश्रांती दिली.
लाल चंद्रोदय !

दिवस दुसरा: (२५ सप्टेंबर) : गडावर निसर्गाचा सहवास आणि एस. टी. चा कंटाळवाणा (परतीचा) प्रवास!!
सहाच्या सुमारास उठलो. आन्हिके उरकून आम्ही  गड फिरावयास निघालो. गडाच्या उत्तर टोकाकडे जाण्याची वाट ही पुन्हा झाडा झुडूपांतून जाणारी होती. गडावर सर्वत्र फुललेली "सोनकीची" पिवळी धमक फुले  सकाळच्या उन्हाची चमक आणखीनच वाढवत होती.

सोनकीची फुले आणि रतनगड  


बरोबर खाण्याच्या गोष्टी आणि पाणी घेऊन आम्ही निघालो होतो. अदमासे अर्धा तास चालल्यावर आम्ही "त्र्यंबक" दरवाजापाशी पोचलो. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाची रचना थेट "जीवधन" च्या दरवाजाची  आठवण करून देणारी आहे. या दरवाजातून खिंडीत जाणाऱ्या खोल खोदीव पायऱ्या सुंदर दिसत होत्या. नेढ्याकडे जाणारी वाट येथून जवळच होती.

खिंडीत जाणाऱ्या पायऱ्या आणि त्यांना वेढून असलेली हिरवाई 


हे नेढे राजगड च्या नेढ्याएवढे मोठे नसले, तरीहि आकर्षक होते. अवघे कोकण दर्शन घडवणारे ते नेढे आम्हाला अर्धा तास तरी तेथे जखडून ठेवण्या-इतके दर्शनीय होते. नेढ्याच्या वर जाणारी वाट कनक ने शोधली आणि आम्ही गडाच्या (बहुतेक) सर्वोच्च स्थानी पोचलो. तेथून अनेक भंडारदरा, घाटघर अशी धरणे, अनेक जलप्रपात (धबधबे) यांचे विहंगम दृश्य दिसत होते.

नेढे (अर्थात वातखिडकी ), रतनगड 


येथून दिसणारा प्रत्येकच VIEW आम्हाला "क्लिक" होत असल्याने कॅमेरा सुद्धा अनेक वेळा "क्लिक"   झाला. वातावण स्वच्छ असल्याने सह्याद्रीचा खजिना डोळे भरून पाहता आला. निसर्गाला त्याबद्दल मनोमन धन्यवाद दिले.  नेढ्यामध्ये  बिस्किटांचा माफक नाश्ता करून आम्ही गुहेकडे निघालो.  गडावरील माकडांनी गुहेची तपासणी केल्याचे उघड झाले, कारण कपडे ठेवलेल्या काही प्लास्टिकच्या बॅगा उचकण्यात आल्या होत्या., इतकेच नव्हे तर काही बॅगा फाडल्या सुद्धा  होत्या. सुदैवाने आमच्या सॅक्स सुरक्षित होत्या. पटकन भेळ-चिवड्याचा नाश्ता करून उतरण्यास प्रारंभ केला. आता मात्र शिड्यांपाशी फार वेळ घेतला नाही. कारण फोटो काढण्याची भानगड नव्हती. बारा वाजताची एस. टी. मिळवण्यासाठी भरभर उतरणे भाग होते. वाटेत धबधब्यांमध्ये जाण्याचा प्रचंड मोह मला होत होता, मात्र सर्वानुमते नदी मध्ये जाऊनच डुंबावे असे ठरले. अखेर गाव जवळ आल्यावर जेथे पात्र जास्त खोल नव्हते तेथे आम्ही १०-१५ मिनिटे मस्त डुंबलो.  बाराच्या सुमारास गावात आलोसुद्धा , पण हाय रे दुर्दैव!!  आम्हाला अपेक्षित एस. टी. साडे अकरालाच येऊन गेली होती.
नाईलाजाने आम्ही होडीची वाट पाहत बसलो. 
भंडारदरा जलाशयाचे पाणी आणि रतनगड 

काल शेंडीला होड्यांची चौकशी करताना घेतलेला "भरत झडे" या नावाड्याचा भ्रमणध्वनी क्रमांक आमच्या कामी  आला. दोन च्या सुमारास आम्ही होडीतून रतनवाडीला राम-राम केला. या  दोन तासांमध्ये तेथे चहा-भजी यांचा नाश्ता झाला होता , एक पावसाची सुखद सर आम्हाला सुखावून गेली होती. पाऊण तासांच्या या बोटिंग मध्ये कळसूबाई ची सर्व डोंगररांग दृष्टीस पडते. सह्याद्रीच्या श्रीमंतीची खरीखुरी जाणीव होते.  शेंडीला पोचलो तेव्हा ट्रेक लौकिकार्थाने संपला होता.  तेथून पुढील प्रवास म्हणजे एस. टी. महामंडळाने आमची घेतलेली सत्वपरीक्षा च म्हणावे लागेल शेंडी - अकोले, अकोले- संगमनेर, संगमनेर-पुणे अशा तीन गाड्या बदलून पुण्यात येईपर्यन्त रात्रीचे बारा वाजून गेले , यावरूनच आमचा संयम आणि सहनशीलता किती असेल याचा अंदाज आला असेल. (शेवटी तरी स्वतःचे कौतुक पाहिजेच!!!!)
अशा प्रकारे सव्वा दोन दिवसांचा हा ट्रेक संपन्न झाला. ट्रेक-शिदोरीमध्ये आणखी एका "रत्नाची" भर पडली.


अमृतेश्वर मंदिराच्या आवारातील मावळे (डावीकडून : उन्मेष, सिद्धेश, अनयदादा, कनक ) 

Thursday, August 5, 2010

लोहगड पदभ्रमण : एक चिंब अनुभवया वर्णनाची प्रस्तावना कशी करावी याचा विचार करण्यात सुमारे १५ मिनिटे गेली आहेत. कारण यापूर्वी तीन वेळा लोहगड सर करून झाला आहे.  पण पावसाळी ट्रेक म्हटले की सोप्पा आणि सुरक्षित भिजण्याचा आनंद देणारा किल्ला म्हणून लोहगड प्रसिद्ध आहे.
            गेल्या अनेक वर्षांत इतके ट्रेक्स करूनसुद्धा ज्युनियर कॉलेज ग्रुपबरोबर ट्रेक करण्याचा योग येत नव्हता. यंदा मैत्रीदिनाचे औचित्य साधून प्राजक्ताने या बेताची आखणी केली होती. मी ट्रेकसाठी नेहमीच एका पायावर तयार असतो. श्वेता आणि सागर (आंबेडे)  हेसुद्धा उत्साहाने सज्ज झाले. एकाच दिवसाचा ट्रेक असल्याने तयारी फारशी नव्हतीच.  किडूक-मिडूक खाण्याचे डबे घेऊन आम्ही १ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास पुणे स्टेशन वर जमलो. सागरने आधी येऊन तिकिटे काढून ठेवल्याने लगेच लोकल मध्ये घुसता आले. बसल्या बसल्या श्वेताने  स्वतःचे फोटो काढून घेण्यासाठी प्राजक्ता आणि सागर ला छळण्यास सुरुवात केली. त्या अगोदरपासून  आम्ही तिला "सकाळी घरून आंघोळ करून आली नाही" म्हणून डिवचत होतो. "लोकल" मध्ये बहुतेक "लोकां"चा "कल"  दारात उभे राहण्याकडे होता. आम्ही मात्र "देहूरोड" येईपर्यंत खिडकीतूनच पळणारी झाडे आणि पावसामुळे खुलून दिसणारे निसर्ग-सौंदर्य पाहण्यात दंग होतो. प्राजक्ताने आणलेल्या श्रीखंडाच्या गोळ्या आणि सागरने लोकल च्या वेळापत्रकाचा काढलेला फोटो यांचे कौतुक झाले मग मी आणि प्राजक्ता दारात जाऊन  उभे राहिलो, तेथे फोटो-सेशन सुरु करताच श्वेता तेथे आली, हे सांगणे न लागे !!!
             पावणे आठच्या सुमारास "मळवली" स्टेशन आले. रेल्वेमधून उतरताच पावसाने आम्हाला त्याच्या दीर्घ सान्निध्याची आश्वासक झलक दाखवली. एक अ"सर"दार "सर" आम्हाला भिजवून गेली. "मळवली" स्टेशनाच्या बोर्ड च्या पार्श्वभूमीवर आमचा  फोटो काढून त्याला
                              "     "मळवली" ला येऊन आम्ही पँट "मळवली"  "
अशा उच्च कोटीच्या कोटीने नाव देऊन आम्ही त्या गार वातावरणात "ट्रेकोटी" पेटवली. त्यापुढील ट्रेक-कोट्यांना मग पाचकळ पालापाचोळा, बालिशपणाची वाळलेली लाकडे असे बरेच सरपण मिळत राहिले. स्टेशन पासून पायथ्याचे गाव काही किलोमीटर अंतरावर आहे. वाटेत पाऊस होताच. लोकल मध्ये दूरवर दिसणारे आणि स्वप्नवत वाटणारे पांढरे शुभ्र धबधबे आमच्या वाटेवरचे सोबती झाले होते. त्यांची मोजदाद करण्याचा आमचा उत्साह पावसापेक्षा खूपच लवकर ओसरला.
               "पैनगंगा" नामक छोट्या हॉटेल मध्ये आम्ही चार चहाची ऑर्डर देऊन तेथेच डविचेस बनवली. प्राजक्ताने पुदिना-चटणीपासून सुरीपर्यंत सर्व जबाबदारी एकहाती स्वीकारली होती. शिवाय मैद्याच्या ब्रेड ऐवजी गव्हाचा ब्रेड आणल्यामुळे पावसाच्या पाण्याप्रमाणेच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. गरम-गरम चहा पिऊनसुद्धा त्या गारव्याम्ध्ये फारशी "तरतरी" आली नाही. "तरी"  आम्ही उशीर होऊ नये, म्हणून किल्ल्याकडे प्रयाण केले. मी एकट्यानेच रेनकोट वा तत्सम पावसापासून बचावाचे कोणतेच साधन बरोबर नेले नव्हते. कारण क्र. १ : "त्याचा काहीही उपयोग होत नाही" हे अनुभवाने माहीत होते.
कारण क्र. २ : भिजण्यासाठीच इथे मी आलो होतो.
              पाऊसही आता "मी" म्हणत होता. पावसाचा जोर वाढला की एखाद्या झाडाखाली थांबून थोड्या वेळाने आम्ही पुढे जात होतो. अनेक छोट्या - मोठ्या गृप्सने आम्हाला गाठले; परंतु आम्हाला रमत-गमत निसर्गात रमत जाणेच पसंत होते. प्राजक्ता मधील जीव-शास्त्रज्ञ जागी झाली होती; आणि तेची दृष्टी आजूबाजूच्या "सृष्टीत" "गोष्टीत समरस व्हावे" तशी समरस झाली होती. त्यामुळेच SIGNATURE SPIDER चा एक "सही" फोटो आम्हाला (प्राजक्ताला) मिळाला.  NEPHROLEPIS ची पाने वापरून पांढरे छाप (TATOO) सुद्धा प्राजक्ताने काढून दाखवले.  अधून -मधून श्वेताची थोडी दमणूक होत होती. परंतु फोटो वगैरे काढले, थोडा वेळ थांबलो की पुन्हा उत्साहाने ती किल्ला चढत होती. त्या रोमांचित वातावरणात गाणी म्हणण्याचा मोह आम्ही आवरला असता तरच नवल होते. पुष्कळ वेळ गाणी म्हणत (गात नव्हे) आम्ही चालत राहिलो. "गायखिंड" आली तेव्हा साडे दहा वाजून गेले होते. या खिंडीतून डावीकडे "विसापूर" तर उजवीकडे "लोहगड" किल्ला आहे. येथून दिसणारे विसापूर चे दृश्य केवळ डोळ्याचे पारणे फेडणारे होते. त्याची ती रौद्र-सुंदर तटबंदी, त्यावर उभे ठाकलेले सावळे मेघ-मावळे , त्यांच्या परजणाऱ्या सौदामिनी तलवारी, आणि त्यांच्या इंद्र-धनुष्यातून निघणारे ते पर्जन्य-बाण ..... सारेच अलौकिक!!
           खिंडीत इतका सोसाट्याचा वारा वाहत होता की उडून जाण्याची भेटी मला (आणि श्वेता ला) वाटत होती, मात्र तसे काही घडले नाही. काही वेळाने आम्ही लोहगड-वाडीत पोचलो.तेथे एका हॉटेलच्या "ओसरी" वर काही जोरदार "सरी" "ओसरे"पर्यंत टेकलो. कॅमेराच्या लेन्स मधील पाण्याचे शोषण करण्यात आले. आता फक्त पायऱ्या चढून वर जायचे बाकी होते. शेंगा खात खात आम्ही वर जाऊ लागलो. काही वेळाने पाणी अंगावर येऊ लागले. एखाद्या अल्लड , खोडकर मुलाप्रमाणे पायऱ्यांवरून उड्या मारत पाणी आमच्या लाडात येत होते. गडाच्या सुबक बांधणीमुळे त्या मुसळधार पावसातही फोटो काढणे चालूच होते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो, तेव्हा आम्ही सगळेच नखशिखांत भिजलो होतो. पावसाचा भर थोडा ओसरला होता, पण त्याची क"सर" धुक्याने भरून काढली होती. किल्ल्यावर इतके धुके होते, की त्या धू"सर " वातावरणात आम्ही जणू स्वतःलाच हरवून बसलो.
               "धुंद झाले शब्द सारे, कुंद झाल्या भावना" अशीच काहीशी ती अवस्था होती. शंकराच्या मंदिरापर्यंत चालतोय न चालतोय तोच पुन्हा पाऊस सुरु झाला. हा पाऊस तर चक्क कानाखाली मारल्यासारखा चेहऱ्यावर आपटत होता. सुई टोचल्यासारखा टोचत होता, त्याची तमा न बाळगता आम्ही चालतच राहिलो. पाऊस थोडा उघडल्यावर आम्ही आमचे डबे उघडले. पाणीदार पावभाजी , ओली पोळी असे जेवण आम्ही अर्धवट पावसातच केले. हे वर्ष-भोजन आयुष्यातील एक सुंदर आठवण बनून राहील.
                विंचूकाट्याला लांबूनच टाटा करून आम्ही परत फिरलो. आम्ही किल्ला उतरताना चढणारयांची  संख्या चांगलीच वाढली होती. सकाळच्या पहिल्या लोकलने आल्याबद्दल मी स्वतः चीच पाठ थोपटून घेतली. उतरताना दमण्याचा काहीच प्रश्न नसल्याने थेट पायथ्यापाशी किंवा धबधब्यापाशी थांबायचे ठरले. वाटेत माझ्या OFFICE मधील सहकारी शीतल भेटली. ती मैत्रिणींबरोबर गडावर चालली होती.अजून थोडे अंतर जाताच प्राजक्ताची OFFICE -सखी प्राजक्ता परब भेटली. ती COEP ची माजी विद्यार्थिनी असल्याने श्वेताची आणि तिची लगेच गट्टी जमली. प्राजक्ता -श्वेता-प्राजक्ता या तिघींनी विनोदाची वेगळीच भट्टी जमवली. मी व सागर त्यांच्यावर शेरेबाजी करत उतरू लागलो. सागरही बऱ्याच "बऱ्या" कोट्या करू लागला होता. ट्रेक ला येऊन हे शिकणे , हेही नसे थोडके !!
                  पायथ्याच्या जवळ असलेल्या मोठ्या धबधब्यापाशी पोचलो, तेव्हा तेथे प्रचंड आणि ओंगळ गर्दी ओसंडून वाहत होती. पावसानेच धुंद झालेल्या त्या वातावरणात मद्यधुंद अवस्थेत कित्त्येक जण नाचत - ओरडत होते. एक क्षणही तेथे न दवडता आम्ही "तडक" स्टेशन ला जाणारी "सडक" पकडली. जवळच्याच एका हॉटेलात चहा मागवला.  BOURBON बिस्किटांचे दोन पुडे फस्त केले. नशीब इतके बलवत्तर की २.५५ ची लोकल लेट होऊन आम्हाला मिळाली आणि त्यात जागासुद्धा !!!
                 आता दारात उभे राहण्यासाठी आम्ही कोणीच उत्सुक नव्हतो.  बडीशेपच्या गोळ्या खात  आणि गप्पा मारत पुणे स्टेशन पर्यंतचा  अत्यंत सुखाचा झाला.  अजूनही मन लोहगडावरच्या  पावसातच भिजत होते. "जड" पावलांनी आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. काही तासांपूर्वी उभयचर झालेलो आम्ही पुन्हा भूचर होण्यासाठी चाललो होतो. पावसाळी ट्रेक सार्थकी लागला होता. सात वर्षांच्या मैत्रीला मैत्री-दिनीच सहवासाची बर"सात" लाभली होती. मन भरून पावले होते.

- उन्मेष जोशी

Saturday, April 10, 2010

दिवेआगरच्या समुद्रावर रात्री गेल्यानंतर सुचलेली कविता !!!

सागरकिनारी जावे आपण एका चांदण्या राती
स्वागत अपुले व्हावे देऊन शुभ्र फुलांचे गुच्छ हाती

धवल सुमनांनी न्हाउन चिंब तू मग भिजावीस
बघतच राहावे तुजला कधी होऊ नये दीस

शशीप्रकाश जणू वितळे भासे मजला क्षितिजावरती
अशी झकास तू मिठी द्यावीस मजला तीरावरती

नांगर चांदीचा असलेले सापडावे एखादे गलबत
समुद्राची सैर तुला घडवीन मी ...अलबत

नाव तू घ्यावेस माझे डोलताना नावेत
हलकेच मग माझ्या यावेस तू कवेत

दोघांचेच असेल आपल्या भवतालीचे जग मग सारे
नटखटपणे पाहतील मीलन आकाशीचे झगमग तारे

Friday, March 26, 2010

अष्टमीची कोर नभीची

अष्टमीची कोर नभीची पाहून मी बावरलो
चालता चालता चालत गेलो आणि तुझ्या विचारांमध्ये वावरलो

विचारत राहिलो मनाला आपले असे नाते तरी काय आणि ओळख तरी किती
मन म्हणाले अरे, तुमचे नाते म्हणजे दवबिंदू  आणि पाते ,
आणि ओळख साताजन्मांची सांगू तरी किती
स्वतःशीच हसून लाजलो मी आणि थोडा मोहरलो
अष्टमीची कोर नभीची पाहून मी बावरलो

बोलण्यातला स्वर माझा कधीच तुला छळत नाही ?
कधीच तुला काही काळात काही नाही
खरच तुला काही लक्षात तरी येत का?
होळीच्या शुभेच्छा कोणी फोन करून देत का?
कशीही वागलीस तरी, माझ्या स्वप्नांची तू परी
माझ्या भावना झुळूक होऊन येतील तुझ्या घरी
तुझ्या गालावरच्या खळीत मी हास्य होऊन विरलो
अष्टमीची कोर नभीची पाहून मी बावरलो
चालता चालता चालत गेलो आणि तुझ्या विचारांमध्ये वावरलो

 - उन्मेष