गुरुवार, ५ ऑगस्ट, २०१०

लोहगड पदभ्रमण : एक चिंब अनुभव



या वर्णनाची प्रस्तावना कशी करावी याचा विचार करण्यात सुमारे १५ मिनिटे गेली आहेत. कारण यापूर्वी तीन वेळा लोहगड सर करून झाला आहे.  पण पावसाळी ट्रेक म्हटले की सोप्पा आणि सुरक्षित भिजण्याचा आनंद देणारा किल्ला म्हणून लोहगड प्रसिद्ध आहे.
            गेल्या अनेक वर्षांत इतके ट्रेक्स करूनसुद्धा ज्युनियर कॉलेज ग्रुपबरोबर ट्रेक करण्याचा योग येत नव्हता. यंदा मैत्रीदिनाचे औचित्य साधून प्राजक्ताने या बेताची आखणी केली होती. मी ट्रेकसाठी नेहमीच एका पायावर तयार असतो. श्वेता आणि सागर (आंबेडे)  हेसुद्धा उत्साहाने सज्ज झाले. एकाच दिवसाचा ट्रेक असल्याने तयारी फारशी नव्हतीच.  किडूक-मिडूक खाण्याचे डबे घेऊन आम्ही १ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास पुणे स्टेशन वर जमलो. सागरने आधी येऊन तिकिटे काढून ठेवल्याने लगेच लोकल मध्ये घुसता आले. बसल्या बसल्या श्वेताने  स्वतःचे फोटो काढून घेण्यासाठी प्राजक्ता आणि सागर ला छळण्यास सुरुवात केली. त्या अगोदरपासून  आम्ही तिला "सकाळी घरून आंघोळ करून आली नाही" म्हणून डिवचत होतो. "लोकल" मध्ये बहुतेक "लोकां"चा "कल"  दारात उभे राहण्याकडे होता. आम्ही मात्र "देहूरोड" येईपर्यंत खिडकीतूनच पळणारी झाडे आणि पावसामुळे खुलून दिसणारे निसर्ग-सौंदर्य पाहण्यात दंग होतो. प्राजक्ताने आणलेल्या श्रीखंडाच्या गोळ्या आणि सागरने लोकल च्या वेळापत्रकाचा काढलेला फोटो यांचे कौतुक झाले मग मी आणि प्राजक्ता दारात जाऊन  उभे राहिलो, तेथे फोटो-सेशन सुरु करताच श्वेता तेथे आली, हे सांगणे न लागे !!!
             पावणे आठच्या सुमारास "मळवली" स्टेशन आले. रेल्वेमधून उतरताच पावसाने आम्हाला त्याच्या दीर्घ सान्निध्याची आश्वासक झलक दाखवली. एक अ"सर"दार "सर" आम्हाला भिजवून गेली. "मळवली" स्टेशनाच्या बोर्ड च्या पार्श्वभूमीवर आमचा  फोटो काढून त्याला
                              "     "मळवली" ला येऊन आम्ही पँट "मळवली"  "
अशा उच्च कोटीच्या कोटीने नाव देऊन आम्ही त्या गार वातावरणात "ट्रेकोटी" पेटवली. त्यापुढील ट्रेक-कोट्यांना मग पाचकळ पालापाचोळा, बालिशपणाची वाळलेली लाकडे असे बरेच सरपण मिळत राहिले. स्टेशन पासून पायथ्याचे गाव काही किलोमीटर अंतरावर आहे. वाटेत पाऊस होताच. लोकल मध्ये दूरवर दिसणारे आणि स्वप्नवत वाटणारे पांढरे शुभ्र धबधबे आमच्या वाटेवरचे सोबती झाले होते. त्यांची मोजदाद करण्याचा आमचा उत्साह पावसापेक्षा खूपच लवकर ओसरला.
               "पैनगंगा" नामक छोट्या हॉटेल मध्ये आम्ही चार चहाची ऑर्डर देऊन तेथेच डविचेस बनवली. प्राजक्ताने पुदिना-चटणीपासून सुरीपर्यंत सर्व जबाबदारी एकहाती स्वीकारली होती. शिवाय मैद्याच्या ब्रेड ऐवजी गव्हाचा ब्रेड आणल्यामुळे पावसाच्या पाण्याप्रमाणेच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. गरम-गरम चहा पिऊनसुद्धा त्या गारव्याम्ध्ये फारशी "तरतरी" आली नाही. "तरी"  आम्ही उशीर होऊ नये, म्हणून किल्ल्याकडे प्रयाण केले. मी एकट्यानेच रेनकोट वा तत्सम पावसापासून बचावाचे कोणतेच साधन बरोबर नेले नव्हते. कारण क्र. १ : "त्याचा काहीही उपयोग होत नाही" हे अनुभवाने माहीत होते.
कारण क्र. २ : भिजण्यासाठीच इथे मी आलो होतो.
              पाऊसही आता "मी" म्हणत होता. पावसाचा जोर वाढला की एखाद्या झाडाखाली थांबून थोड्या वेळाने आम्ही पुढे जात होतो. अनेक छोट्या - मोठ्या गृप्सने आम्हाला गाठले; परंतु आम्हाला रमत-गमत निसर्गात रमत जाणेच पसंत होते. प्राजक्ता मधील जीव-शास्त्रज्ञ जागी झाली होती; आणि तेची दृष्टी आजूबाजूच्या "सृष्टीत" "गोष्टीत समरस व्हावे" तशी समरस झाली होती. त्यामुळेच SIGNATURE SPIDER चा एक "सही" फोटो आम्हाला (प्राजक्ताला) मिळाला.  NEPHROLEPIS ची पाने वापरून पांढरे छाप (TATOO) सुद्धा प्राजक्ताने काढून दाखवले.  अधून -मधून श्वेताची थोडी दमणूक होत होती. परंतु फोटो वगैरे काढले, थोडा वेळ थांबलो की पुन्हा उत्साहाने ती किल्ला चढत होती. त्या रोमांचित वातावरणात गाणी म्हणण्याचा मोह आम्ही आवरला असता तरच नवल होते. पुष्कळ वेळ गाणी म्हणत (गात नव्हे) आम्ही चालत राहिलो. "गायखिंड" आली तेव्हा साडे दहा वाजून गेले होते. या खिंडीतून डावीकडे "विसापूर" तर उजवीकडे "लोहगड" किल्ला आहे. येथून दिसणारे विसापूर चे दृश्य केवळ डोळ्याचे पारणे फेडणारे होते. त्याची ती रौद्र-सुंदर तटबंदी, त्यावर उभे ठाकलेले सावळे मेघ-मावळे , त्यांच्या परजणाऱ्या सौदामिनी तलवारी, आणि त्यांच्या इंद्र-धनुष्यातून निघणारे ते पर्जन्य-बाण ..... सारेच अलौकिक!!
           खिंडीत इतका सोसाट्याचा वारा वाहत होता की उडून जाण्याची भेटी मला (आणि श्वेता ला) वाटत होती, मात्र तसे काही घडले नाही. काही वेळाने आम्ही लोहगड-वाडीत पोचलो.तेथे एका हॉटेलच्या "ओसरी" वर काही जोरदार "सरी" "ओसरे"पर्यंत टेकलो. कॅमेराच्या लेन्स मधील पाण्याचे शोषण करण्यात आले. आता फक्त पायऱ्या चढून वर जायचे बाकी होते. शेंगा खात खात आम्ही वर जाऊ लागलो. काही वेळाने पाणी अंगावर येऊ लागले. एखाद्या अल्लड , खोडकर मुलाप्रमाणे पायऱ्यांवरून उड्या मारत पाणी आमच्या लाडात येत होते. गडाच्या सुबक बांधणीमुळे त्या मुसळधार पावसातही फोटो काढणे चालूच होते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो, तेव्हा आम्ही सगळेच नखशिखांत भिजलो होतो. पावसाचा भर थोडा ओसरला होता, पण त्याची क"सर" धुक्याने भरून काढली होती. किल्ल्यावर इतके धुके होते, की त्या धू"सर " वातावरणात आम्ही जणू स्वतःलाच हरवून बसलो.
               "धुंद झाले शब्द सारे, कुंद झाल्या भावना" अशीच काहीशी ती अवस्था होती. शंकराच्या मंदिरापर्यंत चालतोय न चालतोय तोच पुन्हा पाऊस सुरु झाला. हा पाऊस तर चक्क कानाखाली मारल्यासारखा चेहऱ्यावर आपटत होता. सुई टोचल्यासारखा टोचत होता, त्याची तमा न बाळगता आम्ही चालतच राहिलो. पाऊस थोडा उघडल्यावर आम्ही आमचे डबे उघडले. पाणीदार पावभाजी , ओली पोळी असे जेवण आम्ही अर्धवट पावसातच केले. हे वर्ष-भोजन आयुष्यातील एक सुंदर आठवण बनून राहील.
                विंचूकाट्याला लांबूनच टाटा करून आम्ही परत फिरलो. आम्ही किल्ला उतरताना चढणारयांची  संख्या चांगलीच वाढली होती. सकाळच्या पहिल्या लोकलने आल्याबद्दल मी स्वतः चीच पाठ थोपटून घेतली. उतरताना दमण्याचा काहीच प्रश्न नसल्याने थेट पायथ्यापाशी किंवा धबधब्यापाशी थांबायचे ठरले. वाटेत माझ्या OFFICE मधील सहकारी शीतल भेटली. ती मैत्रिणींबरोबर गडावर चालली होती.अजून थोडे अंतर जाताच प्राजक्ताची OFFICE -सखी प्राजक्ता परब भेटली. ती COEP ची माजी विद्यार्थिनी असल्याने श्वेताची आणि तिची लगेच गट्टी जमली. प्राजक्ता -श्वेता-प्राजक्ता या तिघींनी विनोदाची वेगळीच भट्टी जमवली. मी व सागर त्यांच्यावर शेरेबाजी करत उतरू लागलो. सागरही बऱ्याच "बऱ्या" कोट्या करू लागला होता. ट्रेक ला येऊन हे शिकणे , हेही नसे थोडके !!
                  पायथ्याच्या जवळ असलेल्या मोठ्या धबधब्यापाशी पोचलो, तेव्हा तेथे प्रचंड आणि ओंगळ गर्दी ओसंडून वाहत होती. पावसानेच धुंद झालेल्या त्या वातावरणात मद्यधुंद अवस्थेत कित्त्येक जण नाचत - ओरडत होते. एक क्षणही तेथे न दवडता आम्ही "तडक" स्टेशन ला जाणारी "सडक" पकडली. जवळच्याच एका हॉटेलात चहा मागवला.  BOURBON बिस्किटांचे दोन पुडे फस्त केले. नशीब इतके बलवत्तर की २.५५ ची लोकल लेट होऊन आम्हाला मिळाली आणि त्यात जागासुद्धा !!!
                 आता दारात उभे राहण्यासाठी आम्ही कोणीच उत्सुक नव्हतो.  बडीशेपच्या गोळ्या खात  आणि गप्पा मारत पुणे स्टेशन पर्यंतचा  अत्यंत सुखाचा झाला.  अजूनही मन लोहगडावरच्या  पावसातच भिजत होते. "जड" पावलांनी आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. काही तासांपूर्वी उभयचर झालेलो आम्ही पुन्हा भूचर होण्यासाठी चाललो होतो. पावसाळी ट्रेक सार्थकी लागला होता. सात वर्षांच्या मैत्रीला मैत्री-दिनीच सहवासाची बर"सात" लाभली होती. मन भरून पावले होते.

- उन्मेष जोशी