रविवार, ९ ऑक्टोबर, २०११

सुरुवात



जन्माची सुरूवात होते नाळेपासून 

बघण्याची सुरूवात डोळ्यापासून 


बोलण्याची सुरूवात होते बोबडेपणाने 

खाऊ मागण्याची भाबडेपणाने 


खाण्याची सुरूवात होते हावरेपणाने 

शाळेची सुरूवात कावरे-बावरेपणाने 


पळण्याची सुरूवात होते अंगणापासून 

खेळण्याची सुरूवात पटांगणापासून 


शिकण्याची सुरूवात होते छडीपासून 

संस्कारांची सुरूवात रुमालाच्या घडीपासून 


मैत्रीची सुरूवात होते पहिल्या मित्राने 

मैत्रानंदाची सुरूवात विश्वासाच्या छत्राने 


विजिगीषु वृत्तीची सुरूवात होते तरुणाईत 

प्रार्थनेची सुरूवात देवाच्या ऋणाईत 


गळाभेटींची सुरूवात  होते गाठीभेटीनी 

नयनांत अश्रूंची सुरूवात ताटातुटींनी 


लाजण्याची सुरूवात होते सजण्यापासून 

रुजण्याची सुरूवात भिजण्यापासून 


प्रेमगाठींची सुरूवात होते भाव शर्करेने 

प्रणयाची सुरूवात मुखशर्करेने 


जबाबदारीची सुरूवात होते पहिल्या बाळापासून  

समाधानाची सुरूवात त्याच्या खेळापासून 


वानप्रस्थाची सुरूवात होते "भरून पावण्याने" 

आतिथ्याची सुरूवात आगंतुक पाहुण्याने 


मृत्युची सुरूवात ऊर्ध्व लागल्याने होते 

पुनर्जन्माची सुरूवात या मृत्युपासूनच होते !

 

- उन्मेष 

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०११

हस्ताचा पाऊस



हस्ताचा पाऊस बरसला असा
मनाला सुद्धा भिजवलं त्याने
हृदयाच्या आत जाऊन
अश्रू गाळले मनाने सांगून  लोचनांना
पाऊस धारांमध्ये ते समरसून गेले
आतून चिंब मी अन बाहेर कोरडा
माझेच मन आता मला फसवून गेले
मोकळे कितीही केले तरी भरून मन का येते
कुठून येतात हे न आटणारे भावनांचे झरे
कुठून येतात ही आठवणींची रहाट गाडगी
आणि कितीही खोदत गेलो तरी "का"
का या मनाच्या विहिरीचे पाणी खारट लागते ?
उभा आडवा चिरत गेलाय
हा हस्ताचा पाऊस काहीतरी
"आड" मनाला भिडून गेलाय
काहीतरी देऊन गेलाय
न कळणारं न उमजणारं
पण तरीहि भरून पावलंय  मन
पुन्हा मोकळं होणारं
                                     - उन्मेष

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०११

कोणास ठाऊक ?



किती सहज मी तिच्याकडे पाहिले
किती सहज मी हसलो
ती मला लाजली का माझ्या डोळ्यांना
कोणास ठाऊक ?

किती सहज मी कॉफी विचारली
किती अलगद ती गाडीवर बसली
तिला काय वाटत असेल
कोणास ठाऊक ?

किती सहज मी म्हणालो
तू आवडतेस खूप
केसांत अलगद हात फिरवून
उत्तर दिले होतेस गपचूप
ओठ हलले होते तिचे
पण शब्द कुठे गेले
कोणास ठाऊक ?

किती सहज "चालले" म्हणाली
आता कधी भेट होईल
माहीत नाही म्हणाली
किती वेगळी होती ती
वाऱ्याची झुळूक ती
चाफ्याची दरवळ ती
स्वातीचा पाऊस ती
कॉफीची आठवण ती
कुठे गेली ?
कोणास ठाऊक ?

सोमवार, १२ सप्टेंबर, २०११

पुन्हा एकदा !


नाते लपलेले
जरासे जपलेले
शांत झोपलेले
बाळासारखे !

सगळे काही न बोललेले
सल असे जाणवलेले
हवेहवेसे भोगलेले
विरहासारखे !

उद्याची मी वाट पाहतो
सूर्याआधी तुला पाहतो
कसे ते मी न सांगतो
कस्तुरीसारखे !

का ही हुरहूर अजून दाटते
कसेकसेसे मला वाटते
तशीच तू  आता आठवते
स्वप्नपरीसारखी !
                               - उन्मेष

गुरुवार, १ सप्टेंबर, २०११

मी काही उगाच येत नाही (पावसाचे स्वगत)


मी काही उगाच येत नाही
मी काही तुम्हाला त्रासही  देत नाही
आषाढात फक्त माझे स्वागत करता
आणि धरणे तुमची भरली
की मला दूषणे का देता
अवघी धरती मला फुलवायची असते
कितीतरी फुलांना जन्म द्यायचा असतो
फक्त तुमच्यासाठी मी येत नाही
मी काही उगाच येत नाही

मी चिखल करतो ना, मान्य
मी चिकचिक करतो ना, कबूल
पण मला फक्त तुमचा विचार करून नाही रे चालत
तुमच्या हाकेला जसा मी येतो
वैशाख वणवा जसा मी संपवतो
तशा हाका मला खूप ऐकायच्या असतात
सर्वांच्याच विहिरी मला भरायच्या असतात
मी काही उगाच येत नाही
मुसळधार उगाच कोसळत नाही

वेळ आली की माणूस जातो ना
माझी सुद्धा वेळ येते
ती तुम्हाला माहीत सुद्धा आहे
माझे तर वय सुद्धा ठरलेले आहे
नऊ नक्षत्रे ! बास !
त्यानंतर मला पुनर्जन्म घेण्यासाठी
अठरा नक्षत्रे थांबावं लागतं,
माझं वय नक्षत्रांत मोजा,
महिन्यांत नको, मग बघा
मी नियम मोडून वागत नाही
मी काही उगाच येत नाही

ठरवून दिलेले जीवन निसर्गाने
ते "जीवन" तुम्हाला देत जगतो
तुमचे आशीर्वाद , तुमचे शाप
सगळे घेऊन परत जातो
पुढच्या जन्मात मात्र मला
मागच्या जन्माचा आठवतं बरं का
पण सूड मी तुमचा कधीच घेत नाही
बरसायचे काम मी सोडत नाही
आणि हो , मी काही उगाच येत नाही.
                                                            - उन्मेष

रविवार, २८ ऑगस्ट, २०११

पन्हाळगड ते विशाळगड : एक वर्णनीय ट्रेक : दिवस तिसरा


दिवस तिसरा: १५ ऑगस्ट : शाळेतील भावपूर्ण  झेंडावंदन , पावनखिंड धबधबा, विशाळगडाला भोज्या करून परत पुण्यात...
         असे खूप कमी दिवस असतात जेव्हा आपण ठरवून वेळेवर उठतो आणि उठतोच ! स्वातंत्र्यदिन हा असाच एक दिवस ! शाळेत  झेंडावंदन करूनच पुढे जायचे ठरवले होते. भल्या पहाटे उठून  आन्हिके उरकून साडेसात वाजताच आम्ही तयार होतो. शाळेचा एकूण पट होता "चार" ! तिसरीत एक जोडी (१ मुलगा आणि १ मुलगी) आणि चौथीत एक जोडी !  तरीहि शाळा मात्र उत्तम चालत असल्याचे दिसत होते.
पांढरेपाणी गावातील शाळेतील वर्ग स्वातंत्र्य दिनाची तयारी करताना 

एकंदरीतच तक्ते, फळे माहितीने भरभरून वाहत होते. गावातील माननीय पाहुणे (महेश साचे) यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार होते. कुण्या एका तलाठ्याच्या "सौ". सुरेखा चाचे  आणि शिक्षण समितीच्या लाजाळू अध्यक्षा कोणीतरी चाचे या सुद्धा ओचे-पदर सावरत आल्या होत्या.  २-३ गणवेश न घातलेली (बहुधा पाहुणी) मुलेसुद्धा हजार होती.  आमच्या दृष्टीने त्या दिवशी झेंडावंदन होण्याला महत्व होते. आणि ते शाळेबाहेरच्या मोकळ्या मैदानावर झाले. 
६५वा स्वातंत्र्य दिन चिरायु होवो !

पाऊस जणू तेवढ्या वेळाकरता स्वतःहून  ढगाआड लपला होता. ध्वजवंदनानंतर वर्गात भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम झाला. यासाठी आमच्यातला हर्षद प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केला गेला.  "भरारी" सारखे ग्रुप दरवर्षी शाळेला वस्तुरूप देणगी देतात आणि त्या वस्तू १५ ऑगस्ट ला वाटल्या जातात अशी तिथली पद्धत होती. वस्तू-वाटपानंतर त्या मुलांची पाठ केलेली ४ ओळींची भाषणे होती. ती मन लावून ऐकायचा प्रयत्न केला. 
उत्तम पाठांतर केलेले भाषण देताना पांढरे पाणी शाळेतील एक विद्यार्थी !

नंतर आमची व इतर उपस्थितांची आटोपशीर मनोगते झाली. एकदमच वेगळा अनुभव होता तो! आम्ही देऊ केलेली रोख देणगी कोळी सरांनी नम्रपणे नाकारली व पुढील वेळी "वस्तू"रूप देणगी घेऊन या असे निमंत्रण दिले. त्यांच्या अगत्याने भारावून जड पावलांनीच शाळा सोडली. हेगिष्टे यांच्याकडे पोह्याचा नाश्ता केला. कनक-दादा यांची सौ.हेगिष्टे यांच्या माहेरची काहीतरी ओळख निघाली. मात्र त्यामुळे पोहे काही स्वस्त मिळाले नाहीत :) असो. पावनखिंडीला जाण्यासाठी आम्हाला जुनी जंगलातील वाट शोधायची होती. मात्र ती वाट सांगू शकतील असे बुजुर्ग गावकरी फार कमी राहिले होते. पांढरेपाणी येथून पावन खिंडीपर्यंत  ६ किलोमीटर अंतर आहे. चांगला डांबरी रस्ता असूनदेखील आम्ही दोनदा जंगलातील वाट धुंडाळण्याचा   प्रयत्न केला. मात्र दोन्ही वेळा तो असफल झाला, एका सुंदर तलावाचे दर्शन घडल्यामुळे अगदीच निराशा वाट्याला आली नाही. 
पावन खिंडीला जाताना लागलेले एक तळे 

पावनखिंडीत उतरताना 
हर्षद चालायला फारच कंटाळला असल्याने तो वाटेत मिळालेल्या जीपने पुढे गेला. आम्ही मजल-दरमजल करत पावनखिंडीला पोचलो. सध्या जी पावनखिंड म्हणून दाखवतात, तो आहे एक ओढा. या ओढ्याचे पुढे एका फेसाळत्या धबधब्यात रुपांतर होते. राजगिरा लाडूंचा येथे नाश्ता करून आम्ही धबधब्याच्या शेजारील शिडीने खिंडीत उतरलो. आम्हाला समांतर कोसळत असलेले पाणी मधेच खट्याळपणे आमच्या अंगावर शिंतोडे उडवत होते.  खिंडीतून वाहत जाणाऱ्या पाण्याचे दृश्य अवर्णनीय होते.
पावनखिंडी-जवळचा धबधबा 

याच धबधब्याच्या वाटेने पुढे गेल्यास खरी पावनखिंड  पाहायला मिळते असे तेथील एका जाणत्या माणसाकडून कळले.  तूर्तास तरी वेळेअभावी तो बेत रद्द केला   आणि विशाळगडाकडे मार्ग आक्रमू लागलो.
पावन खिंडीतून पुढे जाणारी वाट ही अतिशय निसरडी होती. याच वाटेवर हर्षद व कनक यांनी "सिक्सर मारली" (म्हणजे सटकून खाली आपटले) (ट्रेकने मराठी भाषेला बहाल केलेला हा एक वाक्प्रचार रूढ  होत आहे  :) )  गजापूर हे विशाळ गडाच्या जवळचे गाव अजून बरेच लांब होते, त्यामुळे आता एस.टी. ने जावे असे आम्ही सर्वानुमते ठरवले. मात्र "भातताई" नावाच्या गावातून जाणारी एस.टी. चुकल्यामुळे आम्हाला खूपच चुकल्या-चुकल्या सारखे वाटले. गावातील मंदिरात आमचा बाड-बिस्तरा ठेवून आम्ही कोरडा खाऊ फस्त करण्यास सुरुवात केली. कनकला  उद्या लवकर ऑफिस असल्याने तो विशाळगड न करता परत कोल्हापुरात जाऊ असे म्हणत होता, मी सोडून सर्वांची त्याला संमती होती. मात्र एस.टी. काय किंवा जीप काय विशाळगडाकडे जाणारे  किंवा कोल्हापूरकडे जाणारे एकाही वाहन आम्हाला मिळत नव्हते. अखेर ज्या दिशेला जाण्यासाठी पहिले वाहन मिळेल तेथे जायचे असे ठरले.  मंदिरात सुमारे दीड तास वेळ घालवावा लागला. या वेळेत बायकर्स चा एक ग्रुप येऊन जेवून गेला,  आम्ही भोपळ्याचे घारगे खाल्ले, एक जळूने आम्हाला सरपटत नाचून दाखवले. अक्षयला कुठल्याच वाड्यांची नावे नीटशी आठवत नव्हती, तरीही तो अनामिक बिनधास्तपणे चुकीची नावे घेत होता, याबद्दल त्याचे कौतुक करावे की चेष्टा  हे कळत नव्हते!! त्याने हशा मात्र बराच मिळवला हे नक्की...   देवाने माझी मनात सुरु असलेली प्रार्थना ऐकली आणि आम्हाला विशाळ-गडाकडे जाणारी वडाप (एक प्रकारची जीप) मिळाली.  पायांना जरा आराम मिळाला, ३ दिवसांत प्रथमच आम्ही गाडीने प्रवास  करत होतो.  पाच-सहा किलोमीटर चा तो पल्ला लवकरच संपला. आणि पावणे चार वाजता एस.टी. विशाळगडाच्या पायथ्याशी उभी होती...कोकण कड्याचे प्रेमळ रांगडेपण दाखवणारे अनेक रौद्र-सुंदर कडे आणि श्रावणाच्या उत्सवात सामील होण्यासाठी अवघ्या सृष्टीसाठी घातलेले ते हिरवे सडे !!!
विशाळगड 

  कोल्हापूर ला जाणारी एस. टी. साडेचार ला असल्याने पळत पळत गडावर निघालो. पर्वती (पुण्यातील एक प्रसिद्ध टेकडी) इतक्या पायऱ्या दिसत होत्या. हर्षद-अक्षय या जोडगोळीला खालीच ठेवून कनक, दादा, व मी भराभरा पायऱ्या चढून वर जाऊ लागलो. विशाळ गडा बाबतीत मात्र "दुरून डोंगर साजरे" असा अनुभव आला. गडावर एक दर्गा असल्याने गडाचे शिवकालीन वैभव संपुष्टात आले आहे. शिवाय वरील वस्त्या इतक्या बकाल आहेत की त्यापेक्षा झोपडपट्टी बरी!  किल्ल्यावर विठ्ठल रखुमाई चे मंदीर आहे ज्याची अवस्था यथातथाच आहे, फुलाजी यांचे समाधी शोधून देखील सापडली नाही. यवनांना ती विचारून उपयोग नव्हता.  किल्ल्यावर झेंडावंदन केले होते हेच विशेष! साडेचारची एस.टी. पकडायची असल्याने तिच्यावर एक 'डोळा' ठेवून खाली उतरू लागलो.
विशाळ गडावरून टिपलेले धुक्यात हरवू पाहणारे स्थानक 

  सगळे काही वेळेत आटोपले होते. विशाळगड ते कोल्हापूर या प्रवासात आम्हाला  "पांढरेपाणी" गावापासून केलेले सगळे पद-भ्रमण आठवत होते, कारण त्याच रस्त्याने गाडी (पांढरेपाणी - मलकापूर मार्गे) कोल्हापूरला जात होती. शनिवार पासून फक्त आवाज देत अस्तित्वाची जाणीव करून देणारा  मोर या प्रवासात अखेर दिसला. त्याचे विशेष कौतुक आता राहिले नव्हते.  कोल्हापुरात पोचायलाच आम्हाला ८ वाजले. कर्नाटक परिवहनाची तथाकथित (SO CALLED ) थेट पुण्याला जाणारी गाडी मिळाल्यामुळे आम्ही खूष झालो. ही गाडी जेवणासाठी कधीतरी थांबली तेव्हा पाव-भाजी व थंड पेयाने पोटाला शांत केले. आणि शांतपणे गाडीत झोपून गेलो, पुण्यात गाडी पोचली तेव्हा दोन  (रात्रीचे) वाजले होते...पाय अक्षरशः गळ्यात अडकवून चालावे (?) असे वाटत होते,  सहनशक्तीची कसोटी पाहणारा ट्रेक अखेर पूर्ण केला होता,याची आगळेच समाधान मनात होते. मसाई पठाराची हिरवाई  डोळ्यांना कायम निववत राहो आणि पावनखिंडीचे ते साहसी पाणी मनाला कायम पवित्र ठेवो अशीच काहीशी भावना (कदाचित यापेक्षा सोप्या शब्दांत मांडलेली) सगळ्यांच्या मनात होती... तीन दिवस आम्ही निसर्गासोबत जगलो होतो..खूप काही शिकलो  होतो. (समाप्त)
मसाई चे नेत्रसुखद पठार !

शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

पन्हाळगड ते विशाळगड : एक वर्णनीय ट्रेक : दिवस दुसरा


दिवस दुसरा: १४ ऑगस्ट : पद-क्षरण आणि म्हसवडयाचे निबीड अरण्य 
अनेक गजर लावून सुद्धा , पहाटे जाग येऊनसुद्धा कोणीही एकमेकांना उठवले नाही. सर्वांनाच झोप हवी होती. नाईलाजानेच साडेसातला उठलो. चहा व "ओघाने"  येणारे कार्यक्रम उरकले. नंतर उपीट करायला घेतले. हा नाश्ता मात्र फक्कड जमला होता. पाणी जरा जास्त झाले असले तरी उपमा चविष्ट झाला होता. कालचा तो बिलंदर पोरगा सकाळीसुद्ध तेथे अवतरला होता, त्याचे नाव आशिष आहे असे कळले. तो व त्याची बहीण यांच्याबरोबर फोटो काढले आणि निघालो. एव्हाना गिरीदर्शनचे ट्रेकिंग क्लबचे  लोक त्यांच्या कालच्या मुक्कामाहून निघून आमच्या मुक्कामी पोचले होते. आता घाई करायलाच हवी होती. त्यातल्या त्यात हळू चालणाऱ्या हर्षद ला पुढे पाठवले. तो बिचारा वाट चुकला. गिरी-दर्शन वाल्या एकाही सुजाण ट्रेकरने  त्याला चुकीच्या वाटेने जात असताना अडवले नाही याचे आश्चर्य वाटले.. लवकरच आम्ही बरोबर वाटेला लागलो. गिरी-दर्शन च्या ग्रुपमध्ये काही ओळखीचे माजी रमणबागीय भेटले. ते २८ जण असल्याने अचानक गर्दी झाल्यासारखे वाटले. मग त्या गर्दीतूनच वाट काढत आता भातशेतांसोबत "हिरवळ" सुद्धा बघत पुढे जाऊ लागलो.

वाडीतील चित्रवत भासणारे घर 


करपेवाडीत गोळ्यांचा "कर" भरून त्वरित पुढे मार्गस्थ झालो. आता वाटेवर बाण दिसू लागल्यामुळे किल्ल्यावर आल्यासारखे वाटत होते.  झाडे , खडक , जमेल त्या ठिकाणी ट्रेकरच्याच  नजरेत भरतील असे काढलेले ते बाण आमचा उत्साह वाढवत होते. आंबेवाडी ही पुढची वाडी होती.  पावसाळी वातावरणामुळे दम चांगला राहत होता आणि डोळ्यांचे पारणे जागोजागी फिटत होते. आंबेवाडी नंतर दोन नकाशात नसलेल्या वाड्या लागल्या:  कळकेवाडी  आणि रिंगेवाडी! कुठल्यातरी एक वाडीबाहेर मोठ्ठी विहीर लागली. तेथे जरा वेळ विश्रांती घेतली. जंगलातल्या वाटा कापताना डिस्कवरी वरच्या MAN VS WILD या मालिकेची आठवण होत होती.

जंगलातील एक वाट 


जमिनीवर अभावानेच माती दिसत होती. गळलेल्या पानांमुळे सगळी वाट झाकली गेली होती. अशा विरळ मनुष्य वस्तीच्या वाडीत कोणाला काही  झाले तर काय करत असतील, त्याला डॉक्टर कडे कसे नेत असतील हा विचार करवत नव्हता. अशातच  आम्हाला एक आज्जी दुरून हात दाबत येताना दिसल्या. त्यांच्या हाताला बरेच  खरचटले होते ,  तसेच सूजसुद्धा आली होती. त्यांना मलमपट्टी करून व आयोडेक्स देऊन पुढे निघालो. शेतातील एका मचाणापाशी थांबून बिस्किटांचा व बाकरवडीचा नाश्ता केला. तेथे तुरळक फोटो सेशनसुद्धा झाले.
पाटेवाडीला जेवायचे नक्की केले होते, मात्र २ वाजत आले तरीहि वाडीची चिन्हे दिसेना. अशातच अजून एक अनपेक्षित वाडी लागली: माळेवाडी. त्या वाडीतच एका मंदिराबाहेर जेवायला  बसलो.  पराठे, गुळाच्या पोळ्या , आम्रखंड , श्रीखंड असे गोडधोडाचे जेवण झाले. एव्हाना गिरीदर्शनवाली मंडळी पाटेवाडीला जाऊन जेवण करत असतील असा एक अंदाज बांधला. त्यांच्या बरोबर गेलो तर पांढरेपाणी गाठता येईल हा विश्वास होता, कारण त्यांनी तेथे खोल्या व जेवण सांगून ठेवले होते. माळेवाडीहून पाटेवाडी २ किलोमीटर लांब आहे. चक्क डांबरी रस्तापण आहे. त्यावरून जाताना मात्र आता कंटाळा येत होता. शिवाय माती-चिखलाला सरावलेले बूट  डांबरावरून  जाताना स्वतःची नाराजी तळपायाकडे व्यक्त करत होते. त्यामुळे पायाची बोटे दुखू लागली. मला पायांना फोड आल्यासारखे  वाटत होते पण बूट काढून त्याची शहानिशा करण्याएवढा वेळ नव्हता. पाटेवाडीत पोचलो तेव्हा सुदैवाने गिरी-दर्शनची शेवटची तुकडी निघायच्या बेतात होती. त्यांना गाठून आम्ही तरातरा पुढे निघालो. वाटेत एका भाताच्या खाचरात घसरून मी कोपरापर्यंत हात चिखलाने बरबटवला ही फजिती एकदा तरी व्हायचीच होती. ती झाली. सुकामाचा धनगरवाडा येईपर्यन्त फारसे कोणीच कोणाशी बोलले नाही. वाटेत विशाळगडावरून येणारा एक ग्रुप भेटला. त्यांचे खरच कौतुक वाटले. कारण सर्व दिशादर्शक बाण विरुद्ध दिशेला आहेत.
धनगरवाडीपासून गिरी-दर्शन टीमने वाटाड्या बरोबर घेतला होता. कारण यापुढे आमची वाट पाहत होते : म्हसवड्याचे घनदाट जंगल.  हे पार केल्यानंतर म्हसवडे गाव लागते अशी माहिती होती. आम्हाला सुदैवाने त्याच गावाकडे जाणारे तीन गावकरी भेटले आणि जंगलाची वाट थोडी सुकर झाली. "निबीड" हा शब्द ज्याकडे पाहून लिहावा असे हे जंगल आहे. या जंगलात बिबटे, गवे, भेकर, हरणे असे प्राणी आहेत असे आम्हाला वाट दाखवणाऱ्या त्रिकूटाकडून समजले. रात्री या जंगलातून जाण्याची वेळ आली नाही हे नशीबच! सूर्यप्रकाशात झकास दिसत असणारे ते जंगल रात्री नक्कीच भयाण वाटत असणार. जंगलाने आम्हाला अनेक सुंदर दृश्ये दाखवली. अनेक ओढ्यांनी आमचे दुखरे पाय भिजवले.


कनक आणि मी म्हसवडे जंगलातील एक ओढा ओलांडताना 


म्हसवडे आले तेव्हा एक विलक्षण घटना घडली. गावाच्या वेशीवरच एका "आज्जींनी" आमच्याकडे गोळी मागितली; आम्ही थक्क! डोके दुखत असल्याने त्या औषधाची गोळी मागत आहेत हे कळल्यावर मात्र आमची हसून पुरेवाट झाली.  खरी गम्मत तर पुढेच आहे. पुढील घरातील बाईने "त्या आज्जींना दिलेली गोळी मला पण द्या" असा बालिश हट्ट धरला. तिच्यापुढे आम्ही हात टेकले. म्हसवडे गाव ओलांडताना मलकापूर-अणुस्कुरा महामार्ग लागतो. त्या फाट्याला पोचेपर्यंतसुद्धा  लहान लहान मुलांपासून तरण्याताठ्या मुलींपर्यंत सर्वांनी गोळ्या-बिस्किटांची खंडणी मागून झाली होती. प्रत्येक वाडीत गोळ्या-बिस्किटे देण्याचा आता वैताग आला होता. आणि लहान मुले अक्षरशः अंगावर धावून येत होती.  "दादा, गोळ्या द्या" हे जणू त्या मुलांचे घोषवाक्य झाले होते. त्यातील काही धाडसी मुले तर गोळ्या नाही तर पैसे द्या अशीही मागणी करत होते. "मागण्याची" त्यांना लागलेली किंवा लावलेली सवय निश्चितच घातक होती. परिस्थिती माणसाला काहीही करायला लावू शकते हेच खरे!

महामार्गाच्या कडेलाच आम्ही सांडलो. 

मलकापूर - अणुस्कुरा महामार्ग आणि आमचा गट 


बिस्किटे , वेफर्स खाऊन थोडी विश्रांती घेऊन पुढे निघालो. आता येथून पुढचा रस्ता हा राज्य महामार्ग होता. पांढरेपाणी अंदाजे ६ किलोमीटरवर असावे. अंधार पडत असल्याने रातकिडे आणि बेडूक यांचे "सारेगमप" सुरु झाले होते.  "डराव डराव" असा पुस्तकात वाचलेला आवाज मात्र ऐकायला आला नाही. पांढरेपाणी गावाला पोचेपर्यंत बहुतांश स्तोत्रे म्हणून झाली होती. खूप छान वाटले. गिरीदर्शन क्लब ची म्हसवडे-ते-पांढरेपाणी गाडी असल्याने त्या मुलांचा ट्रेक आता संपला होता. पांढरेपाणी येईपर्यन्त डोळ्यांत पाणी येणेच फक्त बाकी होते. आजची चाल किमान २३ किलोमीटर झाली असेल. गावात पोचल्यावर तेथील शाळेतील कोळी सरांच्या कृपेने ४थी च्या वर्गात झोपायला जागा मिळाली.  आम्ही जंगलात बरेच रक्त-दान केल्याचे बूट-मोजे काढल्यावर लक्षात आले. आमच्यापैकी बहुतेकांना जळवा डसल्या होत्या.  सरांनी त्यांची (म्हणजे जळवांची नव्हे, जखमांची )  आपुलकीने चौकशी  केली आणि दिव्याची व पाण्याची सोयसुद्धा ! आजचे रात्रीचे जेवण होते : पुलाव व मॅगी ! या वर्गात दोऱ्या बांधायची सोयपण छान झाल्याने ओल्या कपड्यांना वाळायला संधी मिळाली.
गिट्स चे पुलाव रेडी मिक्स खूप "हिट" झाले.

रात्रीचा स्वयंपाक करताना अनय दादा, हर्षद आणि मी 


आणि पुढील प्रत्येक ट्रेकला न्यावे असे एकमताने ठरले. मॅगी कुठेही करा, नेहमीच चांगली होते , इथेही झाली आणि त्या गरम गरम जेवणाने शरीराला अत्यावश्यक ऊबदेखील मिळाली. खोलीतील बल्बचा प्रकाश जास्तच डोळ्यावर येत होता , कनकच्या सुपीक डोक्यातून एक युक्ती निघाली. नाडीची दोरी आणि रद्दी पेपर्स यांनी त्याने व दादाने एक लहानसा आकाश-कंदील बनवला आणि आमची वाहवा मिळवली.  
कनक ने बनवलेला कंदील 
दादाने मग कालचे राहिलेले वर्णन वाचायला घेतले. मी एकटाच बहुतेक मन लावून ऐकत होतो. बाकी सगळे डुलक्या खात ऐकत होते. अखेर साडेबारा वाजता कनक अर्धवट झोपेत आम्हाला "झोप आता" असे काहीसे बरळला आणि तेव्हा कुठे शिवाजीमय झालेली मने पावनखिंडीची स्वप्ने बघत झोपून गेली.

आमचा गट : (डावीकडून) अक्षय, कनक, हर्षद, उन्मेष, अनय दादा 

( क्रमशः )

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११

पन्हाळगड ते विशाळगड : एक वर्णनीय ट्रेक



१३-१४-१५ ऑगस्ट २०११

प्रत्येक ट्रेकच्या वृतांताला प्रस्तावना हवीच का? या ट्रेकला तर हवीच! खरं सांगायचं झालं तर गो.नी.दांडेकर, प्र.के.घाणेकर सारख्या इतिहास तज्ञ मंडळींची पुस्तके वाचल्यानंतर मला खास करून या ट्रेक विषयी काहीही  लिहिणे म्हणजे मोठेच धाडस वाटत आहे, मात्र प्रत्येक ट्रेकरची जशी चाल वेगळी तशी प्रत्येकाची लेखनशैली सुद्धा वेगळी ! आणि याशिवाय "मी ट्रेकला जावून आलो आणि वर्णन लिहिले नाही", तर, फोटो बघून सुद्धा माझे मित्र मी ट्रेकला गेलो होतो यावर विश्वास ठेवणार नाहीत, यामुळे हा वृत्तांत लिहिणे मला क्रमप्राप्तच आहे. पन्हाळगडावरून  शिवाजी महाराजांची पालखी धरून सलग २० तास धावणाऱ्या त्या अज्ञात भोईंना  श्रद्धांजली अर्पण करून या वर्णनाला सुरुवात करणे योग्य होईल.
भयानक धाडसी आणि जिवावर बेतू शकतील असे आखलेले बेत नंतर कसे कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय बनतात , याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे "पन्हाळगड ते विशाळगड" हा ट्रेक ! शिवरायांचे असामान्य धैर्य, बाजीप्रभूंचे अतुलनीय शौर्य, मर्द मराठ्या मावळ्यांची असीम स्वामीनिष्ठा, या सर्वांची साक्ष देऊ शकणारे जंगल, नद्या , ओढे म्हणजे "पन्हाळगड ते विशाळगड" हा ट्रेक! मसाईचे हिरवेकंच पठार, पुन्हा पुन्हा मन ओढ घेईल असे पांढरे शुभ्र ओढे आणि रौद्रसुंदर पावनखिंड म्हणजे "पन्हाळगड ते विशाळगड" हा ट्रेक! (वर्णन संपलेले नाहीये)
आत्ता कुठे वर्णन सुरु होतंय..
वरील सर्व गोष्टी ऐकून आणि १३-१४-१५ ची सलग सुट्टी हेरूनच या ट्रेकची आखणी करण्यात आली होती. यंदाचा १३ ऑगस्ट म्हणजे "राखी पौर्णिमा" !  एवढे कारण नेहमीच्या येणाऱ्या भटक्यांना नन्नाचा पाढा वाचण्यास पुरेसे होते. त्यामुळे फारसा मोठा ग्रुप जमला नाही. केवळ ५ मावळे : कनक (शाळेपासूनचा आणि अनेक ट्रेक मधला सेनापती), अनय दादा (कनकचा आणि पर्यायाने आमचा दादा) , हर्षद (दादाचा मित्र), अक्षय (माझा विद्यार्थी (!) आणि कात्रज-ते-सिंहगड ट्रेकचा नियमित आयोजक) आणि मी !
               १२ तारखेला रात्री १२ वाजता स्वारगेट - कोल्हापूर गाडीने निघायचे ठरले होते. १२ ला रात्री भारत-इंग्लंड कसोटी सामना चालू होता. इंग्लंड ने ७१० धावा करून डाव घोषित केला आणि द्रविडची बॅटींग बघता येणार नाही म्हणून मी हळहळलो. सेहवागने आजिबात उशीर न करता द्रविडला आमंत्रित केले आणि  कनकने अनपेक्षित उशीर करून मला काही वेळ तरी  तंत्रशुद्ध क्रिकेट बघण्याचा आनंद दिला. आनंदनगरहून निघायलाच आम्हाला पावणे बारा झाले. तोपर्यंत हर्षद आणि अक्षयचे अनेक फोन झाले होते. (स्वारगेटला ११ वाजता भेटायचे ठरले होते. ) सर्व जण "वेळेवर" जमून जाण्याचा ट्रेक करणे हे माझे एक स्वप्न आहे. बहुधा ते कधीच प्रत्यक्षात येणार नाही आहे.  असो. स्वारगेटला रात्री १२ वाजता पोचलो तर दुपारचे बारा वाजता असते त्याहून जास्त गर्दी होती.जोडून आलेली सलग ३ दिवसांची सुट्टी आणि रक्षाबंधन यामुळे गाड्या भरभरून चालल्या होत्या. कोल्हापूरला जायला गाडी मिळणार का या विवंचनेत असतानाच कुठून तरी एक ज्यादा गाडी (ती सुद्धा थेट कोल्हापूरला जाणारी एशियाड) आम्हाला मिळाली आणि त्यात सर्वांना जागासुद्धा ! एस.टी. मध्ये शेवटची सीट आमची वाट बघत होती, मात्र सागर ,रोहन हे नेहमीचे बॅक बेंचर्स नसल्याने तिथे जाण्यात काही अर्थ नव्हता. थोडे लांब लांब बसल्याने बिशेष असा time pass  करता आला नाही. एस.टी. मधला नेहमीचा दंगा आणि हास्याचे सातमजली फवारे न अनुभवताच आमचा कोल्हापूरपर्यंतचा प्रवास पार पडला. मी पूर्ण प्रवासात खिडकीजवळ बसून मस्त झोप काढली.

दिवस पहिला : १३  ऑगस्ट :  पन्हाळा दर्शन आणि मसाईची हिरवी राखी 
पहाटे पावणे पाच वाजता आम्ही ५ जण कोल्हापुरात पोचलो. तेथेही वेळेला न शोभणारी तुडुंब गर्दी! आम्हाला हवी असलेली रत्नागिरी गाडी ( जी पन्हाळा फाट्यावरून जाते ) साडेपाचला होती. ट्रेकचा पहिला चहा-पोह्याचा नाश्ता हा स्थानकाबाहेरच व्हायला पाहिजे असा एक अलिखित नियम आहे. एका टपरीवर हा नियम आम्ही कसोशीने पाळला. सकाळची इतर आन्हिकेही  "सुलभ"पणे झाली. सकाळचे पावणे सहा: "वाघबीळ" (पन्हाळा फाटा) येथून आमच्या ट्रेकला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. नुकतेच उजाडत होते. आजूबाजूला कोंबड्यांच्या आवाजांऐवजी मोरांचे आवाज होते. कुठल्यातरी २५ जुलैला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फ्लेक्स लावून देण्यात आल्या होत्या. त्यावरील सर्व फोटो समान आकाराचे आणि तितकेच उजळ असल्याने नक्की वाढदिवस कोणाचा आणि शुभेच्छुक कोण याचा पत्ता लागत नव्हता. अर्थात तो फ्लेक्स न्याहाळत बसायला आम्हाला वेळही नव्हता. तेथून सहा एक किलोमीटर अंतरावर पन्हाळा किल्ला आहे. किल्ल्यावर गाडीने जायची सोय आहे, मात्र पावणे आठच्या पहिल्या गाडीची वाट बघण्यापेक्षा आम्ही चालणे पसंत केले. पावसाळा आणि निसर्ग याविषयी वाचलेली सर्व वर्णने आठवावीत अशी दृश्ये आम्हाला साद घालत होती आणि म्हणत होती : "३ दिवस मला डोळ्यांत भरून घ्या, मनात साठवून घ्या, माझ्याबरोबर जरा निकोप बना." साधारण अर्धे अंतर गेल्यानंतर किल्ल्यावर जाणाऱ्या एका जीपवाल्या चाचांनी आम्हाला त्यांच्या गाडीत घेतले आणि आमचा बराच वेळ वाचवला. त्यामुळे आम्हाला पन्हाळा किल्ला थोडा तरी पाहता आला. गाडीतून उतरल्यावर माझ्या सॅकचा रेनकोट आणि माझे कॅरी मॅट बांधायला मी बराच वेळ घेतला. त्यावरून बरीच शेरेबाजी झाली. कारण माझी सामान बांधायची दिरंगाई कालपासून चालू होती.
       पन्हाळा किल्ल्याला महाभारतापासून इतिहास आहे. पराशर मुनींचे येथे वास्तव्य होते. तसेच पूर्वी नाग लोक येथे राहत असत. यावरून या जागेला "पन्नगालय" (नागांचे घर) असे नाव पडले. पुढे इ.स. १११२ साली शिलाहार राजा भोजने या ठिकाणी किल्ला बांधला व त्याला  "पन्हाळा" हे नाव दिले. त्यापुढे यादव राजा सिंधन , आदिलशाह यांनी या किल्ल्यावर राज्य केले आणि १६५९ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. किल्ला संपूर्ण पाहावयाचा म्हटले तर अख्खा दिवस सुद्धा कमी पडेल, इतकी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. दादाकडे पन्हाळ गडाविषयी माहितीपुस्तिका होती, जिच्यामध्ये  एक पान भरून फक्त ठिकाणांची नावे आहेत.  आणि तसाही आमचा ट्रेक पन्हाळगड "आणि" विशाळगड असा नसून पन्हाळगड "ते" विशाळगड असा होता. त्यामुळे आम्ही मोजकीच ठिकाणे पाहण्याचे ठरवले. तीन दरवाजा, चार दरवाजा (वाघ दरवाजा ), ( एक आणि दोन या नावाचे दरवाजे का नाहीत हे माहीत नाही), शंकराचे मंदीर, किल्ल्यावरील शाळा, विहीर,  कोल्हापूरच्या संभाजी महाराजांची समाधी, अशी ठिकाणे बघत बघत तबक उद्यानापाशी आलो. हे विस्तीर्ण वन-उद्यान रमणीय आहे.  येथून किल्ल्याच्या खालचे दृश्य केवळ "विहंगम" दिसते.. 
तबक उद्यानातून दिसणारे हिरवे दृश्य, पन्हाळगड 

 बागेला प्रदक्षिणा घालून आम्ही दुतोंडी बुरुजापाशी आलो. बिस्किटांचा माफक नाश्ता झाला, तेथे कच्चे दूध २ पिशव्या विकत घेऊन प्यायले, एकदम ताजेतवाने वाटले. त्यापुढेच राजदिंडीचा  रस्ता होता, जेथून आम्हाला गड उतरावयाचा होता. या रस्त्यावरून जाताना अचानकपणे एक गरुड पक्षी दिसला.एका उंच झाडावर तो शांतपणे बसला होता. फोटो काढताना मात्र तो उडाला. संयमाने थोडा वेळ थांबलो आणि त्याची छबी कॅमेरा मध्ये कैद केली.  दुतोंडी बुरुजावरून टेलिफोन टाॅवर कडे जाताना उजवीकडे वाटेत एक भग्न नंदी दिसतो. येथूनच एक वाट गडाखाली उतरते. हीच ती राजदिंडी, जेथून राजे सिद्धी जौहरच्या वेढ्यातून निसटले होते.  आता आम्हाला अनेक वाड्या पार करायच्या होत्या. त्यातील पहिली होती: "तुरुकवाडी". जेमतेम अर्ध्या तासात या वाडीवर पोचलो.येथून एक डांबरी रस्ता म्हाळुंगे या गावी जातो, मात्र आम्हाला मसाई पठारावर जायचे असल्याने गावातील मामा-मावश्यांना डोंगरातील वाट विचारून त्या वाटेने पुढे कूच केले.  हा रस्ता बराच चढणीचा होता. डोंगराच्या उंचीबरोबरच आमचे पाचकळ जोक्स सुद्धा नवी उंची गाठत होते.  वाटेत एका ओढ्याजवळ थांबून "भडंग" खाल्ले.  दादाने पन्हाळ्याचे प्र.के.घाणेकरांच्या पुस्तकातील याच ट्रेकचे वर्णन वाचले. ओढ्याचे गार पाणी चेहऱ्यावर मारून पुढे निघालो. म्हाळुंगे गावाचे धनगर वाटेत दिसत होते. चढणीची वाट आता एकदाची संपली आणि कोकणातल्या एखाद्या "नांदगाव" सारख्या आडगावी फिरत असताना जसा अचानक समुद्र समोर दिसून वेडे व्हावे, तसे आमचे झाले.
मसाई पठार 

 समोर साक्षात हिरवा समुद्र पसरला होता. अथांग हिरवा.. नजर जाईल तिथपर्यंत हिरवा... क्षितिजापर्यंत हिरवाच !!! मसाईचे जादुई पठार याचि देही याचि डोळा पहिले. डोळे भरून पहिले. "धरतीने हिरवा शालू पांघरणे" हा वाक्प्रचार इथे आल्यावरच बनला असेल अशी खात्री झाली. भारताला जर कधी ऑलिम्पिक स्पर्धा भरवायला मिळाल्या, तर सर्व खेळांची मैदाने सामावून सुद्धा उरेल, इतके विस्तीर्ण हे पठार आहे. येथे फोटो-सेशन झाले हे सांगणे न लगे.  सर्व जण गवतावर झोपलो असताना तेथील एका धनगर आजोबांनी आम्हाला जरासे घाबरवलेच..  आमच्याजवळ हातातल्या काठीनिशी  तरातरा येणारे ते आजोबा पाहून आम्ही ताडकन उभेच राहिलो. मात्र त्यांचे गाऱ्हाणे ऐकून आम्हाला वाईट वाटल्याशिवाय राहिले नाही. पठारावर चारचाकी, दुचाकी गाड्या घेऊन येणाऱ्या लोकांना त्यांचा विरोध होता; त्यामुळे चराऊ गवत कमी होते आणि येणारी माणसे कचरासुद्धा करतात ही त्यांची तक्रार अगदी रास्त होती. त्यांना बोलताना इंग्रजी शब्द सुद्धा बऱ्यापैकी वापरले. आम्ही अवाक! धनगरांसोबत बिस्किटांचा नाश्ता करून पठारावरून मार्ग कापायला सुरुवात केली. मसाई देवीने जणू आम्हाला हिरवी राखी बांधली होती आणि आम्हीसुद्धा तिला निसर्गाचे नैसर्गिकपण जपण्याचे वचन मनोमन देऊन टाकले होते. हीच सर्वांत मोठी ओवाळणी नव्हती काय?
वाटेत एक अर्धवट बांधलेले मंदीर लागले, मात्र ते मसाईचे नव्हते. "देखल्या देवा दंडवत (तो मात्र मनापासून)" करून पुढे निघालो. मसाईचे मंदीर अपेक्षेपेक्षा लांब होते. तेथे पोचेपर्यंत अनेकदा पाऊस आला आणि गेला. श्रावण अगदी क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस ही त्याची ओळख जपत होता. मंदिरात देवीचे दर्शन घेऊन पुजाऱ्यांकडून प्रसाद घेतला. पुढील रस्ता समजावून घेऊन  तसे निघालो. वाट चुकवण्यापुरते धुके आम्हाला आडवे आले. दादा व मी अंदाजाने पुढे जात राहिलो आणि चुकलो. कोणीतरी देवासारख्या आलेल्या गावकऱ्याने पांडवदऱ्याची बरोबर वाट दाखवली. इ.स.पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने पांडवदरा येथे बौद्ध शिक्षण प्रसारासाठी गुहा बांधल्या.


पांडवदरा 


त्या गुहाच आता पांडव-दरा म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र तेथे विंचू वगैरे खूप असतात  असे सांगितल्याने तेथे जेवण्याचा बेत रद्द केला. कुंभारवाडीची वाट विचारून मार्गस्थ झालो. एव्हाना २ वाजून गेले होते. मसाईचे  शेवटचे दर्शन घेत डोंगर टोकालाच आम्ही डबे उघडले. आम्रखंड, श्रीखंड, साखरांबा आणि पोळ्या असे गोड मिट्ट जेवण झाले. जरा तोंडाला चव येण्यासाठी नंतर वेफर्स सुद्धा खाल्ले. त्यानंतर विनाथांबा एका वाडीत उतरलो. तिचे नाव "वरेवाडी". तेथून कुंभारवाडी २ किलोमीटर दूर  होती. आजचा मुक्काम किमान १/३ (एक तृतीयांश) अंतर कापल्यानंतर करायचा होता. वरेवाडीत लहान लहान मुलांनी आम्हाला "दादा , गोळ्या द्या" असे विनवून हेलावून सोडले. गोळ्यांचा मुबलक साठा असल्याने त्यांच्या हातावर गोळ्या ठेवून आम्ही कुंभारवाडीकडे प्रस्थान केले. आता बराच कच्चा  रस्ता सुरु झाला होता. चिखल आणि पाणी यांनीच जणू रस्ता बांधला होता. या रस्त्याने जाताना डावीकडे कुंवार खिंड दिसते. 
कुंवारखिंड (खडकमाळ आळी :-)) 

एकावर एक असे पांढऱ्या खडकांचे थर रचलेले असे ते उंच खांब मोठे सुंदर दिसत होते. त्यावर हर्षदने  "खडकमाळ आळी" असा शेरा मारला आणि सर्वांना हसवले. कुंभारवाडीत पाच एक मिनिटे विश्रांती घेऊन विहिरीवरचे पाणी पिऊन पुढे निघालो. खोतवाडी येण्यास बराच वेळ गेला. तेथेसुद्धा लहान मुलांना गोळ्यांची वाटणी झाली. चिखलाचा रस्ता तुडवत बरेच चालत असल्याने पाय आणि वीस एक किलोचे ओझे खांद्यावर वागवत जात असल्याने खांदे, आता बोलू लागले होते पण करपेवाडी हा पहिल्या दिवसाचा मुक्काम ठरला होता. वाटेत अनेक गावकऱ्यांना आम्ही वाट आणि लागणारा वेळ याबद्दल विचारले. प्रत्येकाचा अंदाज निराळा! त्यांनी १० मिनिटांवर सांगितलेली वाडी प्रत्यक्षात यायला १ तास लागायचा. धनगर वाडी येईपर्यन्त ५ वाजत आले होते. रस्ता आता खूपच खराब झाला होता, चिखलातून जाताना बूट खूप "खालच्या थराला" जात होते , त्यांना बरोबर घेऊन जाणे म्हणजे एक दिव्यच होते. करपेवाडीपर्यंत जायचे का नाही यावर आमच्यात बऱ्याच चर्चा झाल्या, उजेडाचा वेळ वाया घालवून उपयोग नव्हता. त्यामुळे पुढील वाडीत जाऊन मग ठरवू असे म्हणून झपझप पावले उचलू लागलो.  प्रत्येक वाडीमध्ये पाणी मुबलक, भातशेते तर असंख्य ! दिवसभरात जेवढे श्वास घेतले असतील तेवढीच भाताची रोपे आम्ही पहिली असतील. 
भात -शेते , पन्हाळगड ते विशाळगड 

आपसांत बोलणे आता जरा कमी झाले होते. वाडी काही केल्या येत नव्हती. मांडलाईवाडी येईपर्यन्त अविरत चालणे याशिवाय पर्याय नव्हता. साडेसहाच्या सुमारास अक्षयला दूरवर एक घर दिसले. आमच्या पायातले गोळे जरा सुखावले, पण हाय रे दुर्दैव ! ती मांडलाईवाडी नव्हतीच मुळी ! ती होती तळेवाडी नावाची छोटीशी वाडी जिकडे आमची राहायची सोय झाली नसती. वाटेतल्या अनेक धबधब्यांपाशी , ओढ्यांपाशी आम्ही दुसऱ्या दिवशी आंघोळीला यायचे असे बोलून गेलो होतो. मात्र वाडीपासून इतक्या लांब कोणीही येणार नाही हे आम्हालाही माहीत होते. तळेवाडीपासून पंधरा मिनिटे चालल्यावर अखेर मांडलाईवाडी आली. अक्षय व मी शाळेची पाहणी करून आलो, मात्र दाराला कुलूप व वऱ्हांडा बंदिस्त नसल्याने आम्ही एका अर्धवट बांधलेल्या मंदिराचा आसरा घेतला.  आत जाण्यापूर्वी कसल्याश्या आशेने गोळा झालेल्या चिमुरड्यांना गोळ्या दिल्या. तरी त्यातील एक बिलंदर पोरगा आत आला आणि आमच्या स्वयंपाकात लुडबूड करू लागला. त्याला आवरण्याचा उत्साह आमच्यात नव्हता. पाणी आणणे, स्टोव्ह  पेटवणे, कांदा चिरणे अशी कामे आम्ही वाटून घेतली.  पुण्याहूनच आलेला चौघांचा एक ग्रुप आमच्या नंतर अर्ध्या तासात तिकडे पोचला. त्यांच्याबरोबर खाऊची देवाणघेवाण करून थोडा वेळ गप्पा मारल्या. नंतर ते गावात त्यांची जेवणाची व झोपण्याची सोय करण्यास गेले. ट्रेक मधील खिचडी कधीच पूर्ण शिजत नाही आणि (त्यामुळे) पूर्ण संपत सुद्धा नाही हा अनुभव आला. सणकून भूक लागली असूनसुद्धा फारशी खिचडी (माझा अपवाद वगळता) कुणी खाल्ली नाही. दमलेल्या शरीराला अन्नापेक्षा विश्रांतीची जास्त  गरज होती. कनकने आणलेली वेदना शामक मलमे आणि थकवा कमी करणाऱ्या महाभृंगराज का महायोगीराज का कसल्यातरी गोळ्या यांचे सेवन आणि लेपन करून आणि कनकचे त्याबद्दल मनोमन कौतुक करून साडेनऊ वाजता आम्ही झोपलो. रात्री त्या दार नसलेल्या मंदिरात कोणीही प्राणी आला असता तरी आम्ही त्याचे भोजन झालो असतो कारण उठून पळण्याचे त्राण कुणाच्याच अंगात नव्हते. आजच्या दिवसाची चाल: अंदाजे २२  किलोमीटर !  (क्रमशः)
आमचा गट  मांडलाईवाडी च्या पडक्या मंदिरात ! 

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

भिगी भिगी रातो मे .. [आनंदजी बक्षी, "अजनबी" १९७४ ] ( मराठी "स्वैर" अनुवाद )


तो:
भिजताना चिंब रजनी
कवेत माझ्या लाजुनी
मनात तुझ्या काय ते
कळले नाही अजुनी
ती:
माझ्यासाठी मदन तू
शृंगाराचे सदन तू
पाऊस तू अन अब्द तू
खट्याळ सारे शब्द तू

ती:
अभ्रदूत सारे जमले वरती
जलसायक ते आम्हा भिजवती
पातळ माझे मलाच बिलगती
अंग माझे मलाच लाजवती

तो:
पाऊस जरी मी मेघ मी
विद्युल्लता तू  तेज तू
मी लहरी वारे मोसमी
मम रोषहारी झुळूक तू

ती:
तुफानासमोर झंझावाती या
जवळ तुझ्या मला घे तू   
लपवून ठेव मला आणि
अस्तित्वच  माझे हो तू

तो:
काया प्रिये, तुझी ही झेलून या पावसा
शिरशिरी शिरते अशी प्रसरती नसा नसा
मी हरवतो मग स्वतः अन  एकांत हा असा  
माझ्यातल्या तुला या विसरेन मी आता कसा !

                                      - उन्मेष

सोमवार, २७ जून, २०११

"नाणे"घाट : एक " पैसा" वसूल वर्षा सहल


         पावसाळा आणि शाळा यांचे नाते  संपून आता बरीच वर्षे झाली.  पावसाळा आणि कॉलेज यांच्यातील चिरतरुण नाते मनाचा एक कोपरा गेली दीड वर्ष व्यापून आहे. खरोखरच विश्वास ठेवणे कठीण जात आहे की कॉलेज संपून दीड वर्ष झाले आहे आणि एका(च)  कंपनीमध्ये एवढा काळ मी काढला आहे. ट्रेक करण्याचे प्रमाण लक्षणीय कमी  होण्याचा हाच तो काळ!
        यंदाच्या पावसाळ्यात २-३ तरी ट्रेक करायचेच असे माझ्या मनाने घेतले होते. त्यातील पहिला योग जुळून आला तो माझ्या एका शाळेतल्या जुन्या मित्रामुळे. भूषण करमरकर याने आपले कंपनी व शाखेतले मित्र मिळून या बेताची आखणी केली होती. जीवधन- नाणेघाट च्या ट्रेक चा निरोप (SMS ) त्याने मला पाठवताच मी त्वरित त्याला होकारार्थी प्रतिक्रिया (POSITIVE REPLY ) कळवली होती.
        आम्ही  ७ बायका (BIKES ) घेऊन जाणार होतो. अशा प्रकारे लाल डब्याशिवाय  ट्रेक करायची ही माझी पहिलीच वेळ! २६ जून च्या रविवारी पहाटे (किंवा रात्रीच म्हणा) ३.४५ वाजता शिवाजीनगर ला भेटायचे ठरले होते. आणि आता इथे सांगायला हरकत नाही: मी रविवारी ३.४५ वाजता उठलो(!) श्रेयस नावाच्या मित्रावर मला सिंहगड रोड वरून घेण्याची जबाबदारी टाकली होती. त्या बिचाऱ्याने ४ वाजल्या पासून मला फोन केले. मी ५ मिनिटे - ५ मिनिटे करत ४.३० वाजवले. आम्ही पूर्वनियोजित HOTEL CENTURIAN ला पोचेपर्यंत तेथे जमलेल्या ११ जणांचा चहा-नाश्ता उरकला होता. आणि बहुतेक सर्वांनी आम्हाला (बहुतेक सर्व) शिव्यांची लाखोली वाहून झालेली होती. ते सर्व जण म्हणे वेळेवर आलेले होते. ते धडधडीत खोटे होते हे मला अनुभवावरून माहीत होते. ११ जण ट्रेक च्या दिवशी वेळेवर येणे हे स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही ही माझी खात्री होती. पण विश्वास ठेवण्यावाचून आमच्याकडे पर्याय नव्हता. तेथे गेल्यावर माझ्याकडे नसल्याने मी एका अनामिक ट्रेकर कडून शिरस्त्राण (हेल्मेट) घेतले.
RTO च्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून सगळ्या BIKES मुंबई पुणे द्रुत गती मार्गावर उधळल्या. सुसाट जाण्याच्या नादात काही जणांनी नाशिक फाट्याला "फाटा दिला". मग त्यांना फोन ओरडा-ओरडी करून एकत्र राहण्यास सांगितले. नंतर सगळे वाटेला लागले. कायद्याने नसली तरी फायद्याने आम्ही हेल्मेट सक्ती केली होती. त्यामुळे BIKE वर बसलेले सर्व जण यंत्र मानवाप्रमाणे भासत होते.  विशेषतः वळणांवरून जाताना, जेव्हा पुढील गाड्या दिसत होत्या, ते दृश्य पाहून लहानपणीची ROAD RASH ही गेम आठवली. ह्या बालिश मनाला आवरणे पहाटेच्या त्या गारव्यामध्ये तरी शक्य नव्हते. कितीही मोठे झालो तरी लहानपणा असा अवचित उफाळून येतो!
        ट्रेकची सुरवात निर्विघ्नपणे होणे ही तशी दुर्मिळच गोष्ट! आजचा दिवसाही त्याला अपवाद नव्हता. राजगुरुनगर च्या घाटातील खोळंबलेली वाहतूक आम्हाला आडवी आली. कडेकडेने जात तो वेळखाऊ टप्पा पार केला. मंचरला शेंगा आणि मक्याचे कणीस यांचा माफक नाश्ता झाला. मग मात्र थेट नारायणगावला थांबायचे ठरले. तेथून जवळच जुन्नर ला जाण्यासाठी फाटा आहे. तेथे पुन्हा एकदा चुकामूक झाली. आता अधिक गोंधळ टाळण्यासाठी जुन्नरला भेटावे असे ठरवून निघालो.

        जसजसे जुन्नर कडे जाऊ लागलो, तसतसा शहरातील निसर्ग आणि गावातील निसर्ग यांतील फरक स्पष्ट होऊ लागला. नजर जाईल तिथपर्यंत हिरवे, हिरवे आणि फक्त हिरवे दिसत होते. काही जिद्दी खडक डोके वर काढत गवताला झिडकारण्याची "काळी" कामे करत होते. निसर्गाने अशा खडकांची "जिरवण्यासाठी" फेसाळत्या धबधब्यांची योजना केली होती. जुन्नरला गाडीवरून उतरल्यानंतर माझी ही निसर्ग समाधी भंग पावली. एका छोट्याश्या हॉटेल मध्ये नाश्त्यासाठी आम्ही थांबलो होतो. तेथेच औपचारिक आणि आवश्यक अशी "ओळख परेड" झाली.  सर्व मावळ्यांची नावे डायरीत लिहिलेल्या क्रमाप्रमाणे : महेश (भूषणचा कंपनीतील सहकारी) , अक्षय (माझा आडनाव बंधू), सागर (माझ्या बरोबर प्रत्येक ट्रेक मध्ये कमीत कमी एक तरी 'सागर' असतोच), निरंजन (याला सगळे GRE वरून 'घेत' होते), sameer (बहुधा याच्यामुळे आम्हाला दिवस भर बराच वारा "लागला"), श्रेयस (माझा UNIX क्लास मधला मित्र), स्वप्नील (माजी रमणबागीय), दुपिंदर (या नावाचा अर्थ माहीत नसल्याने खेद व्यक्त करतो), दिघेश (याचे आडनाव पटेल असेल हा अंदाज केवळ नाव ऐकून केला होता यावर सूज्ञ वाचकांचा विश्वास बसेल), भूषण (ट्रेक आयोजक), केदार (कंसात लिहिण्यासारखे काही नाही) :) , प्रशांत (नावाप्रमाणे मुळीच शांत नसलेला) आणि मी. माझी ओळख कशी करून दिली हे खरेच आठवत नाही. नाही तरी ट्रेक मध्ये ओळखीपेक्षा एकीला आणि एकत्र करायच्या गोष्टींना जास्त महत्व असते.
        वडा-पाव खाऊन आणि चहा पिऊन आम्ही पुढे जाण्यासाठी तयार झालो.प्रथम नाणेघाट करावा व परत येताना जीवधन असे सर्वानुमते ठरले. मी अगोदर एकदा या भागात येऊन गेलो असल्याने गावकऱ्यांना विचारणे आणि रस्ता समजला आहे असे दाखवण्यात(सुद्धा) मी पुढे होतो. अर्थात माझ्याकडे असलेला एक कच्चा नकाशा पुष्कळ बरोबर असल्याने थोडे हायसे वाटले. आम्हाला वाटेत चावंड किल्ला लागला.  चावंडवाडीत जाणाऱ्या वाटेकडे दुपिंदर गेला असल्याचे सांगून निरंजनने आमची दिशाभूल केली. आम्ही चावंड वाडीच्या फाट्यावर थांबलो, भूषण चुकलेल्या रस्त्यावरून  त्याला परत आणायला गेला. आणि तेवढ्यात पुढे  बरोबर रस्त्याने गेलेला दुपिंदर परत आला. निरंजनला त्या वाटेने जाताना कोण दिसले हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. ह्या मजेदार किस्स्यामुळे हसत खेळत आम्ही पुढचा रस्ता पकडला. हा रस्ता मात्र मध्येमध्ये खूप खराब नव्हे तर फक्त मध्ये मधेच चांगला होता. चिखल आणि मातीमुळे निसरड्या रस्त्यावरून गाडी चालवताना RIDERS  चे कसब पणाला लागत होते. काही "रस्तासदृश चिखल" तर पाण्यावरून होडी जावी असा अनुभव गाडीवरून जाताना देत होता.  हा अघोरी रस्ता संपल्यावर एके ठिकाणी फोटो-सेशन साठी आम्ही थांबलो. स्वप्नील व दुपिंदार दोघांनी तर तिपाई (TRIPOD ) पण आणले होते. गाड्या कलात्मकतेने  लावून १० मिनिटे तरी   क्लिक-क्लीकाट चालू होता.  TRIPOD हाताने उचलून कॅमेऱ्याची उंची वाढवण्याचा स्वप्नीलचा प्रयत्न मोठा हशा पिकवून गेला.

        जुन्नर पासून साधारण २२ किलोमीटर अंतर कापल्यावर आम्ही घाटघर गावाच्या फाट्यापाशी  आलो. येथून एक रस्ता जीवधन कडे तर दुसरा रस्ता नानाच्या अंगठ्याकडे (म्हणजे नाणेघाटात) जातो. या वळणावर पुन्हा एकदा नाणेघाटाला आधी जायचे या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. आणि आम्ही निघणार इतक्यात पाऊस सुरु झाला. एका झाडाखाली आम्ही आश्रय घेतला. ते झाड जांभळाचे असल्याचे लक्षात येताच आम्ही त्यावर तुटून पडलो. जिभा जांभळ्या होईपर्यंत जांभळे खाल्ली आणि घाटाकडे निघालो. पाऊस सुरुच  होता.  पावसाचे बाण आता अंगाला चांगलेच लागत होते. इंजेक्शनच्या क्षणिक टोचण्याची आठवण करून देत होते. पण हे पाण्याचे टोचणे जास्त सुख दायक होते. सोसाट्याच्या वाऱ्याबरोबरच आम्ही घाटाजवळ  पोचलो. (बहुतेक फक्त मी) चिंब भिजलो होतो. कारण पावसापासून बचावाचे कुठलेच साधन मी आणले नव्हते. पावसाळी ट्रेक ला जाताना मी कधीच जर्किन नेत नाही हे कौतुक सांगून बहुतेक सगळ्यांचे कान किटवले होते. पण याला कारणही तसेच आहे. रेनकोट घालून पावसात भिजण्याचा आनंद थोडाच घेता येतो ? आणि सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर खेळणारा (नव्हे कोसळणारा) पाऊस जिथे मन सुद्धा भिजवतो तिथे अंग WATER PROOF  ठेवून काय उपयोग? नानाच्या अंगठ्यावरून शुभ्र पाण्याच्या धारा वाहत होत्या. जणू सह्याद्रीची संध्या चालू होती आणि समाधानाने तो अवघ्या सृष्टीवर "उदक" सोडत  होता. घाट थोडा उतरून गेल्यावर गुहा आहेत हे मला माहीत होते.  नानाच्या अंगठ्यावरून वाहत येणारे पाणी उड्या मारत घाटातून खाली चालले होते. त्याच्या जोरामुळे आम्हाला पावले जपून टाकावी लागत होती. अवखळ पाणी आम्हाला चिडवत मोठ्या ऐटीने झोकदार वळणे घेत घाट उतरत होते.  गुहेत पोहोचल्यानंतर पुनश्च फोटोग्राफी ला ऊत आला. समोरच्या गुहेपाशी, पाण्याच्या कुंडापाशी वगैरे जमतील तिथे फोटो काढून झाले. नंतर डोके कोरडे करून, शर्ट बदलून आम्ही उभ्या उभ्याच खाऊन घेतले. खारी पासून पोळी आणि साखरांबा , गिचका झालेले ब्रेड , बिस्किटे , शेव, चिवडे असे वैविध्यपूर्ण जेवण ट्रेक मधेच होऊ शकते.
       १ च्या सुमारास गुहेतून निघालो. तेथून  नानाच्या अंगठ्यावर जाण्यासाठी आम्हाला १५ मिनिटे लागली.  टोकावर वाऱ्याचा प्रभाव जास्त जाणवत होता. धुक्याच्या ढगांपेक्षा देखील अधिक उंचीवर आम्ही बसलो होतो. निस्तब्ध अशी काही मिनिटे गेली. फक्त वाऱ्याचा रौद्रसुंदर राग आणि पावसाच्या लयबद्ध ताना !!! नाईलाजाने तेथून निघालो. नानाच्या अंगठ्यावरून उतरल्यावर तुरळक फोटो सेशन झाले. आजूबाजूच्या पठारावर पावसाने साचलेले पाणी आणि वारा यांनी लाटांचा एक मनोहारी खेळ चालवला होता.  तो डोळ्यांनी पिऊन घेतला. आणि नाणेघाटाला अलविदा केला. दुपिंदरची गाडी (APACHE )काही केल्या सुरु होईना, सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न चालू केले. मला त्यातले काही कळत नसल्याने मी एक बाजूला गप उभा होतो. भोवताली वातावरण सुंदर होतेच. आणि शिवाय नाणे घाटावर आता सुंदर सुंदर फुलेही येऊ लागली होती. नाणे घाटावर फिरायला आलेल्या अनुभवी पोलिसांनी आम्हाला गाडी सुरु करायला नेमक्या वेळी मदत केली आणि त्यांचे आभार मानून आम्ही तेथून जुन्नर कडे कूच केले. जीवधनचा बेतावर एकंदरीत उत्साहाच्या अभावी पाणी पडले.  जुन्नरला परतताना  आम्ही हडसरचा रस्ता घेतला. जो थोडा लांबचा असला तरी कमी चिखल असणारा होता. रस्ता पुष्कळच बरा होता त्यामुळे गाडी जोरात जाऊ शकत होती आणि थांबत थांबत फोटो काढत जाता येत होते. भाताची हिरवीगार खाचरे आणि त्यावर साचलेला धुक्याचा पांढरा शुभ्र भात ! गावकऱ्यांचा क्षणभर हेवाच वाटला. या वाटेने  माळशेज घाटात जाता येते असेही काहींना माहीत होते. पण वेळे अभावी तो बेत रद्द केला. वाटेत लागलेले माणिकडोह धरण हे बरेच क्लिक्स आणि कौतुक मिळवून गेले.

         जुन्नर ला पोचलो तेव्हा ४ वाजले होते. माझा फोन पाण्यात माझ्याप्रमाणेच नखशिखांत भिजला होता आणि बंद पडला होता (मी मात्र चालू होतो). घरी फोन केला. दादांचा वाढदिवस असल्याने त्यांना आवर्जून मोबाईलवर फोन केला. जवळच एका हॉटेल मध्ये जेवायला गेलो. सगळ्यांना सडकून भुका लागल्या होत्या. भरपेट पंजाबी डिशेस आणि कुठलातरी भात असे  जेवण जेवून जुन्नर सोडले. नारायणगावला चहासाठी थांबलो. तेथे हिशोब केले आणि थेट नाशिक फाट्याला भेटायचे ठरवून निघालो. गाडी चालवण्याचा कंटाळा आणि झोप येऊ नये म्हणून मी श्रेयसशी गप्पा मारत होतो. इतका वेळ बसून आणि पाणी झेलून अंग (विशेषतः: पाय) दुखू लागले होते. वाटेत एकदा पेट्रोल भरायला थांबलो आणि आमची गाडी सर्वांत मागे राहिली. नाशिक फाट्याला पोचलो तेव्हा ७.३० झाले होते. सगळे जण आमच्या दोघांसाठी थांबले होते, अगदी सकाळी थांबले होते तसेच .. फक्त आता हाक मारताना काहींच्या ओठावर आमची नावे  होते तर काहींच्या डोळ्यांत यशस्वी ट्रीप चे समाधान ! पुन्हा सर्वांच्या BIKES हाय वे वरच उधळल्या आता सह्याद्रीच्या वाऱ्याच्या वेगाने आणि घरी परत जाण्याच्या आवेगाने!

शुक्रवार, १७ जून, २०११

"थांबेचना पाऊसही"


नित्य नवी आस ही
हवाहवासा भासही 
वळेचना गं कूस ही
थांबेचना पाऊसही

मत्स्य डोळ्यांची नजर ही
नस्य कुसुमे हजरही
वळेचना गं कूस ही
थांबेचना पाऊसही

मेघसलगी अपार ही
कृष्णकुंतल संभारही
वळेचना गं कूस ही
थांबेचना पाऊसही

प्रतोदतप्त वीज ही
ही स्पृहा लुप्त आजही
वळेचना गं कूस ही
थांबेचना पाऊसही
                   - उन्मेष

रविवार, १२ जून, २०११

पाऊस चारोळी

लाजेमध्ये भिजत चिंब
पावसात नाचणारी तू
तुषार व्हावे वाटे मला
झेलायला मला ये तू
- उन्मेष

गुरुवार, २ जून, २०११

पाऊस असा आठवणींचा हिंदोळा


पाऊस पडला आज, म्हटलं आला बहुतेक जून
गेल्या जुलैच्या आठवणी ओल्या आहेत अजून

नभ उतरू आलं अन बरोबर कविता सुद्धा
रुणझुणता पाऊस आणि तुझी आठवण सुद्धा
निलगिरीच्या झाडाखाली बसली होतीस लाजून
गेल्या जुलैच्या आठवणी ओल्या आहेत अजून

आठवणींचा चिखल आता सगळीकडे जाणवतोय
एका डोळ्यात चमक तर दुसरा मात्र पाणावतोय
चालता चालता स्तब्ध मी गेलो आहे थिजून
गेल्या जुलैच्या आठवणी ओल्या आहेत अजून

अभ्रांची गर्दी सारत मागे आला वारा थंड वाहत
मृद्गंध आणला तयाने तुझीच पदसुमने प्रक्षाळत
आपल्याला चिंब केलेले पाऊस मी पाहत होतो मोजून
गेल्या जुलैच्या आठवणी ओल्या आहेत अजून

संध्याकाळचे आठ आता गेले आहेत वाजून
नवीन बिया नवीन मातीत गेल्या आहेत रुजून
भावनांचा पूर आलाय गेलो आहे मी भिजून
पण गेल्या जुलैच्या आठवणी मी जपून ठेवल्यात अजून

शुक्रवार, ८ एप्रिल, २०११

सखी माझी

सखी माझी आहे खास एक अशी
चाफ्याची फुलावी पहाटे कळी जशी

नियमित आता आम्ही भेटत सुद्धा नाही
त्याचे आम्हाला काही वाटत सुद्धा नाही
एखादी संध्याकाळ मग रविवारची
असते फक्त आमच्या दोघांची
तेव्हा सुद्धा ती घाईतच असते तशी
शेवटची गाडी सुटावी  जशी

सखी माझी आहे खास एक अशी
चाफ्याची फुलावी पहाटे कळी जशी

जबाबदार वक्तशीर आणि प्रसंगावधानी
कौतुक करते सर्वांचे दिलदार मनानी
एकांत जपते माझा ती अनंताच्या फुलासारखा
आठवणींचा सुवास आणते रातराणीच्या फुलांसारखा
कला कौशल्याताही आहे खूप हौशी
पंचविसावा तास असतो तिचा एखाद्या दिवशी

सखी माझी आहे खास एक अशी
चाफ्याची फुलावी पहाटे कळी जशी

नातं फुलावं म्हणून जीव तिचा तुटतो
कधी कधी मात्र तिचाही  धीर सुटतो
रडायचे मात्र तिला मुळीच माहिती नाही
दोन हात करायला सरसावेल ती बाही
मन मोकळे जरूर करेल नेहमी  माझ्यापाशी
मुक्त विहंग आहोत आम्ही मैत्रीच्या या "पाशी "

सखी माझी आहे खास एक अशी
चाफ्याची फुलावी पहाटे कळी जशी
                                     - उन्मेष

बुधवार, ६ एप्रिल, २०११

आतुर


एकवार भेट दे केवळ भेटीची तुझ्या मला
वलयात पुन्हा हरवून जाऊ दे तुझ्या मला

मधुरव तुझा अंगात माझ्या असा भिनत जातो
सुकुमार अधरांचा तुझ्या मला भास होत जातो
हृदयाच्या धडधडण्याचा हा परिणाम झाला
एकवार भेट दे केवळ भेटीची तुझ्या मला

जळी स्थळी काष्ठी पाषाणी तुझा आरस्पानी चेहरा
माझ्या अस्तित्वावर असतो त्याचा प्रेमळ पहारा
पण लाजेने माझाच चेहरा लालबुंद  झाला
एकवार भेट दे केवळ भेटीची तुझ्या मला

स्वप्नामध्ये हसतेस माझ्या प्रत्यक्षाहून मोहक
रमणीय स्मितासाठी त्या माझे सात जन्म नाहक
स्वप्नातून बाहेर ये पण स्वप्न माझे मोडू नको
श्वास आहेस माझी, मम हृदयास तू सोडू नको
तुझ्याविणा जन्म माझा अप्रकाश सूर्य झाला 
एकवार भेट दे केवळ भेटीची तुझ्या मला
वलयात पुन्हा हरवून जाऊ दे तुझ्या मला
                                           - उन्मेष

बुधवार, ९ मार्च, २०११

"मस्त"

आज माझा मूड जरा मस्त आहे
मनाच्या कोपऱ्यात आज तुझी गस्त आहे

सगळा काही आज झालं आहे मनासारखं
नशीब सुद्धा नव्हतं माझ्यापासून पारखं
म्हणूनच मी आज थोडा खूष जास्त आहे
मनाच्या कोपऱ्यात आज तुझी गस्त आहे

कुठलीच गोष्ट मनाला आज लागत नव्हती
मोठ्याने हसण्याची आणि लाज वाटत नव्हती
प्रत्येक हास्यानंतर तुला आठवण्याची  शिस्त आहे
मनाच्या कोपऱ्यात आज तुझी गस्त आहे

फोन आले आहेत आज हवेहवेशे वाटणारे
भर उन्हात यावे धुके जसे दाटणारे
पिवळ्या चांदण्यात मग थंडी वाजणे रास्त आहे
मनाच्या कोपऱ्यात आज तुझी गस्त आहे

रस्त्यावरून चालताना आज उगाच मी हसलो आहे.
एकटाच जाऊन  बागेमध्ये आज मी बसलो आहे
मूड छान असला तरी थोडासा मी अस्वस्थ आहे
मनाच्या कोपऱ्यात आज तुझी गस्त आहे
                                               - उन्मेष

शनिवार, ५ मार्च, २०११

मोहोर

मोहोर
आंब्याला आला आहे मोहोर ऐन खिडकीपाशी
चित्त माझे गमले आहे केवळ तुजपाशी

ऋतुमागून ऋतू पालटत आहेत खरे
तुझे मात्र मुळीच कमी होत नाहीत नखरे
वसंताला आता या वासंती आहे हवीशी
आंब्याला आला आहे मोहोर ऐन खिडकीपाशी

 तव आठवणीने येतो जणू गंध मंजिऱ्याना
तव  आगमनाने स्फुरते गीत कोकिळांना
पानांचा होतो कडकडाट तुझ्या पायांपाशी
आंब्याला आला आहे मोहोर ऐन खिडकीपाशी

थांबली आहेस तू वाट पाहत माझी आम्रतरुखाली
शेवटी थकून बसली आहेस झाडाच्याच खोडापाशी
झाड सुद्धा तुझ्या बरोबर आता पर्णाश्रू  ढाळत आहे
विरह शंकीत मन तुझे तुलाच जाळत आहे
खूप घेतली परीक्षा , खूप तोडली पाने
उतरलो मी झाडाखाली हळूच मागच्या अंगाने
अवतरलो तुझ्या समोर खोडकर  रूपाने
भरून आलेले डोळे तुझे, आसुसलेला स्पर्श
भरून आलेले पाय माझे , गळाभेटीचा हर्ष
मूक झाले शब्द सारे , मिठी होती हृदयस्पर्शी
आंब्याला आला आहे मोहोर ऐन खिडकीपाशी !!!
                                                             - उन्मेष

रविवार, १६ जानेवारी, २०११

मीलन

अभिराम तू
अनभिज्ञ मी
अनिमेष तू
अभिषिक्त मी
                        अव्यक्त मी
                        अशांत मी
                        अतृप्त मी
                        आसक्त मी
अनुराग तुझा मनात
तगमग माझ्या मनात
रवि धग माझ्या तनात
होकार तुझ्या नयनात
                        अर्चिस्मित  मी
                        अनिकेत  मी
                        अलवार मी
                        अगोचर  मी
तुझी तेजःपुंज काया
तूच माझी छत्रछाया
तुझ्या नाजूक पाया
पुढे अस्मादिक वाया
                        अस्वस्थ मी
                        हृदयस्थ तुला झालो
                        अभ्यागत मी
                        अवगत तुला झालो

                                   - उन्मेष