Monday, June 27, 2011

"नाणे"घाट : एक " पैसा" वसूल वर्षा सहल


         पावसाळा आणि शाळा यांचे नाते  संपून आता बरीच वर्षे झाली.  पावसाळा आणि कॉलेज यांच्यातील चिरतरुण नाते मनाचा एक कोपरा गेली दीड वर्ष व्यापून आहे. खरोखरच विश्वास ठेवणे कठीण जात आहे की कॉलेज संपून दीड वर्ष झाले आहे आणि एका(च)  कंपनीमध्ये एवढा काळ मी काढला आहे. ट्रेक करण्याचे प्रमाण लक्षणीय कमी  होण्याचा हाच तो काळ!
        यंदाच्या पावसाळ्यात २-३ तरी ट्रेक करायचेच असे माझ्या मनाने घेतले होते. त्यातील पहिला योग जुळून आला तो माझ्या एका शाळेतल्या जुन्या मित्रामुळे. भूषण करमरकर याने आपले कंपनी व शाखेतले मित्र मिळून या बेताची आखणी केली होती. जीवधन- नाणेघाट च्या ट्रेक चा निरोप (SMS ) त्याने मला पाठवताच मी त्वरित त्याला होकारार्थी प्रतिक्रिया (POSITIVE REPLY ) कळवली होती.
        आम्ही  ७ बायका (BIKES ) घेऊन जाणार होतो. अशा प्रकारे लाल डब्याशिवाय  ट्रेक करायची ही माझी पहिलीच वेळ! २६ जून च्या रविवारी पहाटे (किंवा रात्रीच म्हणा) ३.४५ वाजता शिवाजीनगर ला भेटायचे ठरले होते. आणि आता इथे सांगायला हरकत नाही: मी रविवारी ३.४५ वाजता उठलो(!) श्रेयस नावाच्या मित्रावर मला सिंहगड रोड वरून घेण्याची जबाबदारी टाकली होती. त्या बिचाऱ्याने ४ वाजल्या पासून मला फोन केले. मी ५ मिनिटे - ५ मिनिटे करत ४.३० वाजवले. आम्ही पूर्वनियोजित HOTEL CENTURIAN ला पोचेपर्यंत तेथे जमलेल्या ११ जणांचा चहा-नाश्ता उरकला होता. आणि बहुतेक सर्वांनी आम्हाला (बहुतेक सर्व) शिव्यांची लाखोली वाहून झालेली होती. ते सर्व जण म्हणे वेळेवर आलेले होते. ते धडधडीत खोटे होते हे मला अनुभवावरून माहीत होते. ११ जण ट्रेक च्या दिवशी वेळेवर येणे हे स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही ही माझी खात्री होती. पण विश्वास ठेवण्यावाचून आमच्याकडे पर्याय नव्हता. तेथे गेल्यावर माझ्याकडे नसल्याने मी एका अनामिक ट्रेकर कडून शिरस्त्राण (हेल्मेट) घेतले.
RTO च्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून सगळ्या BIKES मुंबई पुणे द्रुत गती मार्गावर उधळल्या. सुसाट जाण्याच्या नादात काही जणांनी नाशिक फाट्याला "फाटा दिला". मग त्यांना फोन ओरडा-ओरडी करून एकत्र राहण्यास सांगितले. नंतर सगळे वाटेला लागले. कायद्याने नसली तरी फायद्याने आम्ही हेल्मेट सक्ती केली होती. त्यामुळे BIKE वर बसलेले सर्व जण यंत्र मानवाप्रमाणे भासत होते.  विशेषतः वळणांवरून जाताना, जेव्हा पुढील गाड्या दिसत होत्या, ते दृश्य पाहून लहानपणीची ROAD RASH ही गेम आठवली. ह्या बालिश मनाला आवरणे पहाटेच्या त्या गारव्यामध्ये तरी शक्य नव्हते. कितीही मोठे झालो तरी लहानपणा असा अवचित उफाळून येतो!
        ट्रेकची सुरवात निर्विघ्नपणे होणे ही तशी दुर्मिळच गोष्ट! आजचा दिवसाही त्याला अपवाद नव्हता. राजगुरुनगर च्या घाटातील खोळंबलेली वाहतूक आम्हाला आडवी आली. कडेकडेने जात तो वेळखाऊ टप्पा पार केला. मंचरला शेंगा आणि मक्याचे कणीस यांचा माफक नाश्ता झाला. मग मात्र थेट नारायणगावला थांबायचे ठरले. तेथून जवळच जुन्नर ला जाण्यासाठी फाटा आहे. तेथे पुन्हा एकदा चुकामूक झाली. आता अधिक गोंधळ टाळण्यासाठी जुन्नरला भेटावे असे ठरवून निघालो.

        जसजसे जुन्नर कडे जाऊ लागलो, तसतसा शहरातील निसर्ग आणि गावातील निसर्ग यांतील फरक स्पष्ट होऊ लागला. नजर जाईल तिथपर्यंत हिरवे, हिरवे आणि फक्त हिरवे दिसत होते. काही जिद्दी खडक डोके वर काढत गवताला झिडकारण्याची "काळी" कामे करत होते. निसर्गाने अशा खडकांची "जिरवण्यासाठी" फेसाळत्या धबधब्यांची योजना केली होती. जुन्नरला गाडीवरून उतरल्यानंतर माझी ही निसर्ग समाधी भंग पावली. एका छोट्याश्या हॉटेल मध्ये नाश्त्यासाठी आम्ही थांबलो होतो. तेथेच औपचारिक आणि आवश्यक अशी "ओळख परेड" झाली.  सर्व मावळ्यांची नावे डायरीत लिहिलेल्या क्रमाप्रमाणे : महेश (भूषणचा कंपनीतील सहकारी) , अक्षय (माझा आडनाव बंधू), सागर (माझ्या बरोबर प्रत्येक ट्रेक मध्ये कमीत कमी एक तरी 'सागर' असतोच), निरंजन (याला सगळे GRE वरून 'घेत' होते), sameer (बहुधा याच्यामुळे आम्हाला दिवस भर बराच वारा "लागला"), श्रेयस (माझा UNIX क्लास मधला मित्र), स्वप्नील (माजी रमणबागीय), दुपिंदर (या नावाचा अर्थ माहीत नसल्याने खेद व्यक्त करतो), दिघेश (याचे आडनाव पटेल असेल हा अंदाज केवळ नाव ऐकून केला होता यावर सूज्ञ वाचकांचा विश्वास बसेल), भूषण (ट्रेक आयोजक), केदार (कंसात लिहिण्यासारखे काही नाही) :) , प्रशांत (नावाप्रमाणे मुळीच शांत नसलेला) आणि मी. माझी ओळख कशी करून दिली हे खरेच आठवत नाही. नाही तरी ट्रेक मध्ये ओळखीपेक्षा एकीला आणि एकत्र करायच्या गोष्टींना जास्त महत्व असते.
        वडा-पाव खाऊन आणि चहा पिऊन आम्ही पुढे जाण्यासाठी तयार झालो.प्रथम नाणेघाट करावा व परत येताना जीवधन असे सर्वानुमते ठरले. मी अगोदर एकदा या भागात येऊन गेलो असल्याने गावकऱ्यांना विचारणे आणि रस्ता समजला आहे असे दाखवण्यात(सुद्धा) मी पुढे होतो. अर्थात माझ्याकडे असलेला एक कच्चा नकाशा पुष्कळ बरोबर असल्याने थोडे हायसे वाटले. आम्हाला वाटेत चावंड किल्ला लागला.  चावंडवाडीत जाणाऱ्या वाटेकडे दुपिंदर गेला असल्याचे सांगून निरंजनने आमची दिशाभूल केली. आम्ही चावंड वाडीच्या फाट्यावर थांबलो, भूषण चुकलेल्या रस्त्यावरून  त्याला परत आणायला गेला. आणि तेवढ्यात पुढे  बरोबर रस्त्याने गेलेला दुपिंदर परत आला. निरंजनला त्या वाटेने जाताना कोण दिसले हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. ह्या मजेदार किस्स्यामुळे हसत खेळत आम्ही पुढचा रस्ता पकडला. हा रस्ता मात्र मध्येमध्ये खूप खराब नव्हे तर फक्त मध्ये मधेच चांगला होता. चिखल आणि मातीमुळे निसरड्या रस्त्यावरून गाडी चालवताना RIDERS  चे कसब पणाला लागत होते. काही "रस्तासदृश चिखल" तर पाण्यावरून होडी जावी असा अनुभव गाडीवरून जाताना देत होता.  हा अघोरी रस्ता संपल्यावर एके ठिकाणी फोटो-सेशन साठी आम्ही थांबलो. स्वप्नील व दुपिंदार दोघांनी तर तिपाई (TRIPOD ) पण आणले होते. गाड्या कलात्मकतेने  लावून १० मिनिटे तरी   क्लिक-क्लीकाट चालू होता.  TRIPOD हाताने उचलून कॅमेऱ्याची उंची वाढवण्याचा स्वप्नीलचा प्रयत्न मोठा हशा पिकवून गेला.

        जुन्नर पासून साधारण २२ किलोमीटर अंतर कापल्यावर आम्ही घाटघर गावाच्या फाट्यापाशी  आलो. येथून एक रस्ता जीवधन कडे तर दुसरा रस्ता नानाच्या अंगठ्याकडे (म्हणजे नाणेघाटात) जातो. या वळणावर पुन्हा एकदा नाणेघाटाला आधी जायचे या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. आणि आम्ही निघणार इतक्यात पाऊस सुरु झाला. एका झाडाखाली आम्ही आश्रय घेतला. ते झाड जांभळाचे असल्याचे लक्षात येताच आम्ही त्यावर तुटून पडलो. जिभा जांभळ्या होईपर्यंत जांभळे खाल्ली आणि घाटाकडे निघालो. पाऊस सुरुच  होता.  पावसाचे बाण आता अंगाला चांगलेच लागत होते. इंजेक्शनच्या क्षणिक टोचण्याची आठवण करून देत होते. पण हे पाण्याचे टोचणे जास्त सुख दायक होते. सोसाट्याच्या वाऱ्याबरोबरच आम्ही घाटाजवळ  पोचलो. (बहुतेक फक्त मी) चिंब भिजलो होतो. कारण पावसापासून बचावाचे कुठलेच साधन मी आणले नव्हते. पावसाळी ट्रेक ला जाताना मी कधीच जर्किन नेत नाही हे कौतुक सांगून बहुतेक सगळ्यांचे कान किटवले होते. पण याला कारणही तसेच आहे. रेनकोट घालून पावसात भिजण्याचा आनंद थोडाच घेता येतो ? आणि सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर खेळणारा (नव्हे कोसळणारा) पाऊस जिथे मन सुद्धा भिजवतो तिथे अंग WATER PROOF  ठेवून काय उपयोग? नानाच्या अंगठ्यावरून शुभ्र पाण्याच्या धारा वाहत होत्या. जणू सह्याद्रीची संध्या चालू होती आणि समाधानाने तो अवघ्या सृष्टीवर "उदक" सोडत  होता. घाट थोडा उतरून गेल्यावर गुहा आहेत हे मला माहीत होते.  नानाच्या अंगठ्यावरून वाहत येणारे पाणी उड्या मारत घाटातून खाली चालले होते. त्याच्या जोरामुळे आम्हाला पावले जपून टाकावी लागत होती. अवखळ पाणी आम्हाला चिडवत मोठ्या ऐटीने झोकदार वळणे घेत घाट उतरत होते.  गुहेत पोहोचल्यानंतर पुनश्च फोटोग्राफी ला ऊत आला. समोरच्या गुहेपाशी, पाण्याच्या कुंडापाशी वगैरे जमतील तिथे फोटो काढून झाले. नंतर डोके कोरडे करून, शर्ट बदलून आम्ही उभ्या उभ्याच खाऊन घेतले. खारी पासून पोळी आणि साखरांबा , गिचका झालेले ब्रेड , बिस्किटे , शेव, चिवडे असे वैविध्यपूर्ण जेवण ट्रेक मधेच होऊ शकते.
       १ च्या सुमारास गुहेतून निघालो. तेथून  नानाच्या अंगठ्यावर जाण्यासाठी आम्हाला १५ मिनिटे लागली.  टोकावर वाऱ्याचा प्रभाव जास्त जाणवत होता. धुक्याच्या ढगांपेक्षा देखील अधिक उंचीवर आम्ही बसलो होतो. निस्तब्ध अशी काही मिनिटे गेली. फक्त वाऱ्याचा रौद्रसुंदर राग आणि पावसाच्या लयबद्ध ताना !!! नाईलाजाने तेथून निघालो. नानाच्या अंगठ्यावरून उतरल्यावर तुरळक फोटो सेशन झाले. आजूबाजूच्या पठारावर पावसाने साचलेले पाणी आणि वारा यांनी लाटांचा एक मनोहारी खेळ चालवला होता.  तो डोळ्यांनी पिऊन घेतला. आणि नाणेघाटाला अलविदा केला. दुपिंदरची गाडी (APACHE )काही केल्या सुरु होईना, सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न चालू केले. मला त्यातले काही कळत नसल्याने मी एक बाजूला गप उभा होतो. भोवताली वातावरण सुंदर होतेच. आणि शिवाय नाणे घाटावर आता सुंदर सुंदर फुलेही येऊ लागली होती. नाणे घाटावर फिरायला आलेल्या अनुभवी पोलिसांनी आम्हाला गाडी सुरु करायला नेमक्या वेळी मदत केली आणि त्यांचे आभार मानून आम्ही तेथून जुन्नर कडे कूच केले. जीवधनचा बेतावर एकंदरीत उत्साहाच्या अभावी पाणी पडले.  जुन्नरला परतताना  आम्ही हडसरचा रस्ता घेतला. जो थोडा लांबचा असला तरी कमी चिखल असणारा होता. रस्ता पुष्कळच बरा होता त्यामुळे गाडी जोरात जाऊ शकत होती आणि थांबत थांबत फोटो काढत जाता येत होते. भाताची हिरवीगार खाचरे आणि त्यावर साचलेला धुक्याचा पांढरा शुभ्र भात ! गावकऱ्यांचा क्षणभर हेवाच वाटला. या वाटेने  माळशेज घाटात जाता येते असेही काहींना माहीत होते. पण वेळे अभावी तो बेत रद्द केला. वाटेत लागलेले माणिकडोह धरण हे बरेच क्लिक्स आणि कौतुक मिळवून गेले.

         जुन्नर ला पोचलो तेव्हा ४ वाजले होते. माझा फोन पाण्यात माझ्याप्रमाणेच नखशिखांत भिजला होता आणि बंद पडला होता (मी मात्र चालू होतो). घरी फोन केला. दादांचा वाढदिवस असल्याने त्यांना आवर्जून मोबाईलवर फोन केला. जवळच एका हॉटेल मध्ये जेवायला गेलो. सगळ्यांना सडकून भुका लागल्या होत्या. भरपेट पंजाबी डिशेस आणि कुठलातरी भात असे  जेवण जेवून जुन्नर सोडले. नारायणगावला चहासाठी थांबलो. तेथे हिशोब केले आणि थेट नाशिक फाट्याला भेटायचे ठरवून निघालो. गाडी चालवण्याचा कंटाळा आणि झोप येऊ नये म्हणून मी श्रेयसशी गप्पा मारत होतो. इतका वेळ बसून आणि पाणी झेलून अंग (विशेषतः: पाय) दुखू लागले होते. वाटेत एकदा पेट्रोल भरायला थांबलो आणि आमची गाडी सर्वांत मागे राहिली. नाशिक फाट्याला पोचलो तेव्हा ७.३० झाले होते. सगळे जण आमच्या दोघांसाठी थांबले होते, अगदी सकाळी थांबले होते तसेच .. फक्त आता हाक मारताना काहींच्या ओठावर आमची नावे  होते तर काहींच्या डोळ्यांत यशस्वी ट्रीप चे समाधान ! पुन्हा सर्वांच्या BIKES हाय वे वरच उधळल्या आता सह्याद्रीच्या वाऱ्याच्या वेगाने आणि घरी परत जाण्याच्या आवेगाने!

6 comments:

 1. अरे........पोट्ट्या लैच भारी लिहिलयस............लई आवडलं........!

  ReplyDelete
 2. नानाच्या अंगठ्यावरून शुभ्र पाण्याच्या धारा वाहत होत्या. जणू सह्याद्रीची संध्या चालू होती आणि समाधानाने तो अवघ्या सृष्टीवर "उदक" सोडत होता

  ReplyDelete
 3. मजा आली वाचून. भारी लिहिलयस

  ReplyDelete
 4. -सुरुवात एकदम सही झालीये..
  -वर्णनातून अगदी चिरतरुण हिरवागार निसर्ग डोळ्यापुढे उभा राहिलंय..मस्तच..
  -नाणेघाट अन नानाचा अंगठा वाचून जुन्या आठवणी एकदम ताज्या झाल्या :) [ "हड""सर" पण... :D ]
  -तुम्ही नक्की किती वेळा "नाश्ता" केला? :P
  -typical चुन्नाड-गिरी अधून मधून डोकावतेच (उदा. फाट्याला "फाटा दिला")
  -माझ्या बरोबर प्रत्येक ट्रेक मध्ये कमीत कमी एक तरी 'सागर' असतोच - याबद्दल तुला शिव्या
  -मला पण यायचंय.. :-|

  ReplyDelete
 5. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 6. छान लिहिला आहेस. संपूर्ण चित्र डोळ्या समोर उभं राहिलं. ह्या वेळेस शब्दं सुद्धा बऱ्यापेकी सोपे आणि माहितीतले वापरले आहेस त्यामुळे वाचनाचा आनंद घेता आला.

  ReplyDelete