गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११

पन्हाळगड ते विशाळगड : एक वर्णनीय ट्रेक



१३-१४-१५ ऑगस्ट २०११

प्रत्येक ट्रेकच्या वृतांताला प्रस्तावना हवीच का? या ट्रेकला तर हवीच! खरं सांगायचं झालं तर गो.नी.दांडेकर, प्र.के.घाणेकर सारख्या इतिहास तज्ञ मंडळींची पुस्तके वाचल्यानंतर मला खास करून या ट्रेक विषयी काहीही  लिहिणे म्हणजे मोठेच धाडस वाटत आहे, मात्र प्रत्येक ट्रेकरची जशी चाल वेगळी तशी प्रत्येकाची लेखनशैली सुद्धा वेगळी ! आणि याशिवाय "मी ट्रेकला जावून आलो आणि वर्णन लिहिले नाही", तर, फोटो बघून सुद्धा माझे मित्र मी ट्रेकला गेलो होतो यावर विश्वास ठेवणार नाहीत, यामुळे हा वृत्तांत लिहिणे मला क्रमप्राप्तच आहे. पन्हाळगडावरून  शिवाजी महाराजांची पालखी धरून सलग २० तास धावणाऱ्या त्या अज्ञात भोईंना  श्रद्धांजली अर्पण करून या वर्णनाला सुरुवात करणे योग्य होईल.
भयानक धाडसी आणि जिवावर बेतू शकतील असे आखलेले बेत नंतर कसे कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय बनतात , याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे "पन्हाळगड ते विशाळगड" हा ट्रेक ! शिवरायांचे असामान्य धैर्य, बाजीप्रभूंचे अतुलनीय शौर्य, मर्द मराठ्या मावळ्यांची असीम स्वामीनिष्ठा, या सर्वांची साक्ष देऊ शकणारे जंगल, नद्या , ओढे म्हणजे "पन्हाळगड ते विशाळगड" हा ट्रेक! मसाईचे हिरवेकंच पठार, पुन्हा पुन्हा मन ओढ घेईल असे पांढरे शुभ्र ओढे आणि रौद्रसुंदर पावनखिंड म्हणजे "पन्हाळगड ते विशाळगड" हा ट्रेक! (वर्णन संपलेले नाहीये)
आत्ता कुठे वर्णन सुरु होतंय..
वरील सर्व गोष्टी ऐकून आणि १३-१४-१५ ची सलग सुट्टी हेरूनच या ट्रेकची आखणी करण्यात आली होती. यंदाचा १३ ऑगस्ट म्हणजे "राखी पौर्णिमा" !  एवढे कारण नेहमीच्या येणाऱ्या भटक्यांना नन्नाचा पाढा वाचण्यास पुरेसे होते. त्यामुळे फारसा मोठा ग्रुप जमला नाही. केवळ ५ मावळे : कनक (शाळेपासूनचा आणि अनेक ट्रेक मधला सेनापती), अनय दादा (कनकचा आणि पर्यायाने आमचा दादा) , हर्षद (दादाचा मित्र), अक्षय (माझा विद्यार्थी (!) आणि कात्रज-ते-सिंहगड ट्रेकचा नियमित आयोजक) आणि मी !
               १२ तारखेला रात्री १२ वाजता स्वारगेट - कोल्हापूर गाडीने निघायचे ठरले होते. १२ ला रात्री भारत-इंग्लंड कसोटी सामना चालू होता. इंग्लंड ने ७१० धावा करून डाव घोषित केला आणि द्रविडची बॅटींग बघता येणार नाही म्हणून मी हळहळलो. सेहवागने आजिबात उशीर न करता द्रविडला आमंत्रित केले आणि  कनकने अनपेक्षित उशीर करून मला काही वेळ तरी  तंत्रशुद्ध क्रिकेट बघण्याचा आनंद दिला. आनंदनगरहून निघायलाच आम्हाला पावणे बारा झाले. तोपर्यंत हर्षद आणि अक्षयचे अनेक फोन झाले होते. (स्वारगेटला ११ वाजता भेटायचे ठरले होते. ) सर्व जण "वेळेवर" जमून जाण्याचा ट्रेक करणे हे माझे एक स्वप्न आहे. बहुधा ते कधीच प्रत्यक्षात येणार नाही आहे.  असो. स्वारगेटला रात्री १२ वाजता पोचलो तर दुपारचे बारा वाजता असते त्याहून जास्त गर्दी होती.जोडून आलेली सलग ३ दिवसांची सुट्टी आणि रक्षाबंधन यामुळे गाड्या भरभरून चालल्या होत्या. कोल्हापूरला जायला गाडी मिळणार का या विवंचनेत असतानाच कुठून तरी एक ज्यादा गाडी (ती सुद्धा थेट कोल्हापूरला जाणारी एशियाड) आम्हाला मिळाली आणि त्यात सर्वांना जागासुद्धा ! एस.टी. मध्ये शेवटची सीट आमची वाट बघत होती, मात्र सागर ,रोहन हे नेहमीचे बॅक बेंचर्स नसल्याने तिथे जाण्यात काही अर्थ नव्हता. थोडे लांब लांब बसल्याने बिशेष असा time pass  करता आला नाही. एस.टी. मधला नेहमीचा दंगा आणि हास्याचे सातमजली फवारे न अनुभवताच आमचा कोल्हापूरपर्यंतचा प्रवास पार पडला. मी पूर्ण प्रवासात खिडकीजवळ बसून मस्त झोप काढली.

दिवस पहिला : १३  ऑगस्ट :  पन्हाळा दर्शन आणि मसाईची हिरवी राखी 
पहाटे पावणे पाच वाजता आम्ही ५ जण कोल्हापुरात पोचलो. तेथेही वेळेला न शोभणारी तुडुंब गर्दी! आम्हाला हवी असलेली रत्नागिरी गाडी ( जी पन्हाळा फाट्यावरून जाते ) साडेपाचला होती. ट्रेकचा पहिला चहा-पोह्याचा नाश्ता हा स्थानकाबाहेरच व्हायला पाहिजे असा एक अलिखित नियम आहे. एका टपरीवर हा नियम आम्ही कसोशीने पाळला. सकाळची इतर आन्हिकेही  "सुलभ"पणे झाली. सकाळचे पावणे सहा: "वाघबीळ" (पन्हाळा फाटा) येथून आमच्या ट्रेकला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. नुकतेच उजाडत होते. आजूबाजूला कोंबड्यांच्या आवाजांऐवजी मोरांचे आवाज होते. कुठल्यातरी २५ जुलैला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फ्लेक्स लावून देण्यात आल्या होत्या. त्यावरील सर्व फोटो समान आकाराचे आणि तितकेच उजळ असल्याने नक्की वाढदिवस कोणाचा आणि शुभेच्छुक कोण याचा पत्ता लागत नव्हता. अर्थात तो फ्लेक्स न्याहाळत बसायला आम्हाला वेळही नव्हता. तेथून सहा एक किलोमीटर अंतरावर पन्हाळा किल्ला आहे. किल्ल्यावर गाडीने जायची सोय आहे, मात्र पावणे आठच्या पहिल्या गाडीची वाट बघण्यापेक्षा आम्ही चालणे पसंत केले. पावसाळा आणि निसर्ग याविषयी वाचलेली सर्व वर्णने आठवावीत अशी दृश्ये आम्हाला साद घालत होती आणि म्हणत होती : "३ दिवस मला डोळ्यांत भरून घ्या, मनात साठवून घ्या, माझ्याबरोबर जरा निकोप बना." साधारण अर्धे अंतर गेल्यानंतर किल्ल्यावर जाणाऱ्या एका जीपवाल्या चाचांनी आम्हाला त्यांच्या गाडीत घेतले आणि आमचा बराच वेळ वाचवला. त्यामुळे आम्हाला पन्हाळा किल्ला थोडा तरी पाहता आला. गाडीतून उतरल्यावर माझ्या सॅकचा रेनकोट आणि माझे कॅरी मॅट बांधायला मी बराच वेळ घेतला. त्यावरून बरीच शेरेबाजी झाली. कारण माझी सामान बांधायची दिरंगाई कालपासून चालू होती.
       पन्हाळा किल्ल्याला महाभारतापासून इतिहास आहे. पराशर मुनींचे येथे वास्तव्य होते. तसेच पूर्वी नाग लोक येथे राहत असत. यावरून या जागेला "पन्नगालय" (नागांचे घर) असे नाव पडले. पुढे इ.स. १११२ साली शिलाहार राजा भोजने या ठिकाणी किल्ला बांधला व त्याला  "पन्हाळा" हे नाव दिले. त्यापुढे यादव राजा सिंधन , आदिलशाह यांनी या किल्ल्यावर राज्य केले आणि १६५९ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. किल्ला संपूर्ण पाहावयाचा म्हटले तर अख्खा दिवस सुद्धा कमी पडेल, इतकी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. दादाकडे पन्हाळ गडाविषयी माहितीपुस्तिका होती, जिच्यामध्ये  एक पान भरून फक्त ठिकाणांची नावे आहेत.  आणि तसाही आमचा ट्रेक पन्हाळगड "आणि" विशाळगड असा नसून पन्हाळगड "ते" विशाळगड असा होता. त्यामुळे आम्ही मोजकीच ठिकाणे पाहण्याचे ठरवले. तीन दरवाजा, चार दरवाजा (वाघ दरवाजा ), ( एक आणि दोन या नावाचे दरवाजे का नाहीत हे माहीत नाही), शंकराचे मंदीर, किल्ल्यावरील शाळा, विहीर,  कोल्हापूरच्या संभाजी महाराजांची समाधी, अशी ठिकाणे बघत बघत तबक उद्यानापाशी आलो. हे विस्तीर्ण वन-उद्यान रमणीय आहे.  येथून किल्ल्याच्या खालचे दृश्य केवळ "विहंगम" दिसते.. 
तबक उद्यानातून दिसणारे हिरवे दृश्य, पन्हाळगड 

 बागेला प्रदक्षिणा घालून आम्ही दुतोंडी बुरुजापाशी आलो. बिस्किटांचा माफक नाश्ता झाला, तेथे कच्चे दूध २ पिशव्या विकत घेऊन प्यायले, एकदम ताजेतवाने वाटले. त्यापुढेच राजदिंडीचा  रस्ता होता, जेथून आम्हाला गड उतरावयाचा होता. या रस्त्यावरून जाताना अचानकपणे एक गरुड पक्षी दिसला.एका उंच झाडावर तो शांतपणे बसला होता. फोटो काढताना मात्र तो उडाला. संयमाने थोडा वेळ थांबलो आणि त्याची छबी कॅमेरा मध्ये कैद केली.  दुतोंडी बुरुजावरून टेलिफोन टाॅवर कडे जाताना उजवीकडे वाटेत एक भग्न नंदी दिसतो. येथूनच एक वाट गडाखाली उतरते. हीच ती राजदिंडी, जेथून राजे सिद्धी जौहरच्या वेढ्यातून निसटले होते.  आता आम्हाला अनेक वाड्या पार करायच्या होत्या. त्यातील पहिली होती: "तुरुकवाडी". जेमतेम अर्ध्या तासात या वाडीवर पोचलो.येथून एक डांबरी रस्ता म्हाळुंगे या गावी जातो, मात्र आम्हाला मसाई पठारावर जायचे असल्याने गावातील मामा-मावश्यांना डोंगरातील वाट विचारून त्या वाटेने पुढे कूच केले.  हा रस्ता बराच चढणीचा होता. डोंगराच्या उंचीबरोबरच आमचे पाचकळ जोक्स सुद्धा नवी उंची गाठत होते.  वाटेत एका ओढ्याजवळ थांबून "भडंग" खाल्ले.  दादाने पन्हाळ्याचे प्र.के.घाणेकरांच्या पुस्तकातील याच ट्रेकचे वर्णन वाचले. ओढ्याचे गार पाणी चेहऱ्यावर मारून पुढे निघालो. म्हाळुंगे गावाचे धनगर वाटेत दिसत होते. चढणीची वाट आता एकदाची संपली आणि कोकणातल्या एखाद्या "नांदगाव" सारख्या आडगावी फिरत असताना जसा अचानक समुद्र समोर दिसून वेडे व्हावे, तसे आमचे झाले.
मसाई पठार 

 समोर साक्षात हिरवा समुद्र पसरला होता. अथांग हिरवा.. नजर जाईल तिथपर्यंत हिरवा... क्षितिजापर्यंत हिरवाच !!! मसाईचे जादुई पठार याचि देही याचि डोळा पहिले. डोळे भरून पहिले. "धरतीने हिरवा शालू पांघरणे" हा वाक्प्रचार इथे आल्यावरच बनला असेल अशी खात्री झाली. भारताला जर कधी ऑलिम्पिक स्पर्धा भरवायला मिळाल्या, तर सर्व खेळांची मैदाने सामावून सुद्धा उरेल, इतके विस्तीर्ण हे पठार आहे. येथे फोटो-सेशन झाले हे सांगणे न लगे.  सर्व जण गवतावर झोपलो असताना तेथील एका धनगर आजोबांनी आम्हाला जरासे घाबरवलेच..  आमच्याजवळ हातातल्या काठीनिशी  तरातरा येणारे ते आजोबा पाहून आम्ही ताडकन उभेच राहिलो. मात्र त्यांचे गाऱ्हाणे ऐकून आम्हाला वाईट वाटल्याशिवाय राहिले नाही. पठारावर चारचाकी, दुचाकी गाड्या घेऊन येणाऱ्या लोकांना त्यांचा विरोध होता; त्यामुळे चराऊ गवत कमी होते आणि येणारी माणसे कचरासुद्धा करतात ही त्यांची तक्रार अगदी रास्त होती. त्यांना बोलताना इंग्रजी शब्द सुद्धा बऱ्यापैकी वापरले. आम्ही अवाक! धनगरांसोबत बिस्किटांचा नाश्ता करून पठारावरून मार्ग कापायला सुरुवात केली. मसाई देवीने जणू आम्हाला हिरवी राखी बांधली होती आणि आम्हीसुद्धा तिला निसर्गाचे नैसर्गिकपण जपण्याचे वचन मनोमन देऊन टाकले होते. हीच सर्वांत मोठी ओवाळणी नव्हती काय?
वाटेत एक अर्धवट बांधलेले मंदीर लागले, मात्र ते मसाईचे नव्हते. "देखल्या देवा दंडवत (तो मात्र मनापासून)" करून पुढे निघालो. मसाईचे मंदीर अपेक्षेपेक्षा लांब होते. तेथे पोचेपर्यंत अनेकदा पाऊस आला आणि गेला. श्रावण अगदी क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस ही त्याची ओळख जपत होता. मंदिरात देवीचे दर्शन घेऊन पुजाऱ्यांकडून प्रसाद घेतला. पुढील रस्ता समजावून घेऊन  तसे निघालो. वाट चुकवण्यापुरते धुके आम्हाला आडवे आले. दादा व मी अंदाजाने पुढे जात राहिलो आणि चुकलो. कोणीतरी देवासारख्या आलेल्या गावकऱ्याने पांडवदऱ्याची बरोबर वाट दाखवली. इ.स.पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने पांडवदरा येथे बौद्ध शिक्षण प्रसारासाठी गुहा बांधल्या.


पांडवदरा 


त्या गुहाच आता पांडव-दरा म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र तेथे विंचू वगैरे खूप असतात  असे सांगितल्याने तेथे जेवण्याचा बेत रद्द केला. कुंभारवाडीची वाट विचारून मार्गस्थ झालो. एव्हाना २ वाजून गेले होते. मसाईचे  शेवटचे दर्शन घेत डोंगर टोकालाच आम्ही डबे उघडले. आम्रखंड, श्रीखंड, साखरांबा आणि पोळ्या असे गोड मिट्ट जेवण झाले. जरा तोंडाला चव येण्यासाठी नंतर वेफर्स सुद्धा खाल्ले. त्यानंतर विनाथांबा एका वाडीत उतरलो. तिचे नाव "वरेवाडी". तेथून कुंभारवाडी २ किलोमीटर दूर  होती. आजचा मुक्काम किमान १/३ (एक तृतीयांश) अंतर कापल्यानंतर करायचा होता. वरेवाडीत लहान लहान मुलांनी आम्हाला "दादा , गोळ्या द्या" असे विनवून हेलावून सोडले. गोळ्यांचा मुबलक साठा असल्याने त्यांच्या हातावर गोळ्या ठेवून आम्ही कुंभारवाडीकडे प्रस्थान केले. आता बराच कच्चा  रस्ता सुरु झाला होता. चिखल आणि पाणी यांनीच जणू रस्ता बांधला होता. या रस्त्याने जाताना डावीकडे कुंवार खिंड दिसते. 
कुंवारखिंड (खडकमाळ आळी :-)) 

एकावर एक असे पांढऱ्या खडकांचे थर रचलेले असे ते उंच खांब मोठे सुंदर दिसत होते. त्यावर हर्षदने  "खडकमाळ आळी" असा शेरा मारला आणि सर्वांना हसवले. कुंभारवाडीत पाच एक मिनिटे विश्रांती घेऊन विहिरीवरचे पाणी पिऊन पुढे निघालो. खोतवाडी येण्यास बराच वेळ गेला. तेथेसुद्धा लहान मुलांना गोळ्यांची वाटणी झाली. चिखलाचा रस्ता तुडवत बरेच चालत असल्याने पाय आणि वीस एक किलोचे ओझे खांद्यावर वागवत जात असल्याने खांदे, आता बोलू लागले होते पण करपेवाडी हा पहिल्या दिवसाचा मुक्काम ठरला होता. वाटेत अनेक गावकऱ्यांना आम्ही वाट आणि लागणारा वेळ याबद्दल विचारले. प्रत्येकाचा अंदाज निराळा! त्यांनी १० मिनिटांवर सांगितलेली वाडी प्रत्यक्षात यायला १ तास लागायचा. धनगर वाडी येईपर्यन्त ५ वाजत आले होते. रस्ता आता खूपच खराब झाला होता, चिखलातून जाताना बूट खूप "खालच्या थराला" जात होते , त्यांना बरोबर घेऊन जाणे म्हणजे एक दिव्यच होते. करपेवाडीपर्यंत जायचे का नाही यावर आमच्यात बऱ्याच चर्चा झाल्या, उजेडाचा वेळ वाया घालवून उपयोग नव्हता. त्यामुळे पुढील वाडीत जाऊन मग ठरवू असे म्हणून झपझप पावले उचलू लागलो.  प्रत्येक वाडीमध्ये पाणी मुबलक, भातशेते तर असंख्य ! दिवसभरात जेवढे श्वास घेतले असतील तेवढीच भाताची रोपे आम्ही पहिली असतील. 
भात -शेते , पन्हाळगड ते विशाळगड 

आपसांत बोलणे आता जरा कमी झाले होते. वाडी काही केल्या येत नव्हती. मांडलाईवाडी येईपर्यन्त अविरत चालणे याशिवाय पर्याय नव्हता. साडेसहाच्या सुमारास अक्षयला दूरवर एक घर दिसले. आमच्या पायातले गोळे जरा सुखावले, पण हाय रे दुर्दैव ! ती मांडलाईवाडी नव्हतीच मुळी ! ती होती तळेवाडी नावाची छोटीशी वाडी जिकडे आमची राहायची सोय झाली नसती. वाटेतल्या अनेक धबधब्यांपाशी , ओढ्यांपाशी आम्ही दुसऱ्या दिवशी आंघोळीला यायचे असे बोलून गेलो होतो. मात्र वाडीपासून इतक्या लांब कोणीही येणार नाही हे आम्हालाही माहीत होते. तळेवाडीपासून पंधरा मिनिटे चालल्यावर अखेर मांडलाईवाडी आली. अक्षय व मी शाळेची पाहणी करून आलो, मात्र दाराला कुलूप व वऱ्हांडा बंदिस्त नसल्याने आम्ही एका अर्धवट बांधलेल्या मंदिराचा आसरा घेतला.  आत जाण्यापूर्वी कसल्याश्या आशेने गोळा झालेल्या चिमुरड्यांना गोळ्या दिल्या. तरी त्यातील एक बिलंदर पोरगा आत आला आणि आमच्या स्वयंपाकात लुडबूड करू लागला. त्याला आवरण्याचा उत्साह आमच्यात नव्हता. पाणी आणणे, स्टोव्ह  पेटवणे, कांदा चिरणे अशी कामे आम्ही वाटून घेतली.  पुण्याहूनच आलेला चौघांचा एक ग्रुप आमच्या नंतर अर्ध्या तासात तिकडे पोचला. त्यांच्याबरोबर खाऊची देवाणघेवाण करून थोडा वेळ गप्पा मारल्या. नंतर ते गावात त्यांची जेवणाची व झोपण्याची सोय करण्यास गेले. ट्रेक मधील खिचडी कधीच पूर्ण शिजत नाही आणि (त्यामुळे) पूर्ण संपत सुद्धा नाही हा अनुभव आला. सणकून भूक लागली असूनसुद्धा फारशी खिचडी (माझा अपवाद वगळता) कुणी खाल्ली नाही. दमलेल्या शरीराला अन्नापेक्षा विश्रांतीची जास्त  गरज होती. कनकने आणलेली वेदना शामक मलमे आणि थकवा कमी करणाऱ्या महाभृंगराज का महायोगीराज का कसल्यातरी गोळ्या यांचे सेवन आणि लेपन करून आणि कनकचे त्याबद्दल मनोमन कौतुक करून साडेनऊ वाजता आम्ही झोपलो. रात्री त्या दार नसलेल्या मंदिरात कोणीही प्राणी आला असता तरी आम्ही त्याचे भोजन झालो असतो कारण उठून पळण्याचे त्राण कुणाच्याच अंगात नव्हते. आजच्या दिवसाची चाल: अंदाजे २२  किलोमीटर !  (क्रमशः)
आमचा गट  मांडलाईवाडी च्या पडक्या मंदिरात ! 

३ टिप्पण्या:

  1. एक नंबर जमलेला आहे चुन्नू...आणि एवढा प्रोफेशनल झालाय यावेळेस..
    (एक खरोखर प्रामाणिक :P) सल्ला ...सकाळ ला पाठवून तर बघ ..नक्कीच छापतील
    "भारताला जर कधी ऑलिम्पिक स्पर्धा भरवायला मिळाल्या, तर सर्व खेळांची मैदाने सामावून सुद्धा उरेल, इतके विस्तीर्ण हे पठार आहे"..आयला भारीच..
    खडकमाळ अळी विशेष :D
    "एस.टी. मध्ये शेवटची सीट आमची वाट बघत होती, मात्र सागर ,रोहन हे नेहमीचे बॅक बेंचर्स नसल्याने तिथे जाण्यात काही अर्थ नव्हता"...अरेरे ..नेक्स्ट टाईम !!
    "दिवसभरात जेवढे श्वास घेतले असतील तेवढीच भाताची रोपे आम्ही पहिली असतील"...विशेष !!
    मध्ये इतिहासाचे संदर्भ दिल्याने सॉलिड फील आला आहे ;-)
    पटकन पुढचा भाग आण :)

    उत्तर द्याहटवा