सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१२

आई, मला भूक लागली!

आई,  मला भूक लागली!
उत्तर द्यायला कोणीच नव्हतं खोलीत
खूप जास्त जाणवलं की दूर आहोत आपण आपल्या घरापासून
नवीन घर आवडलं तर होतं, नव्याचे नऊ दिवस मात्र आता सरले होते
नवीन अभ्यास, नवीन मित्र-मैत्रिणी ,  नवीन कॉलेज, आणि 'स्वयं'पाक सगळ्याची सवय होतेय
पण नवीन आई कुठून आणू ?
ती हाक कुणाला मारू ?
आई, मला भूक लागली!
फक्त गोड खायला आवडायचे मला
तू बनवलेले घरचे तिखटच आता गोड लागते इथे.....
खरच..
स्वयपाक करताना कधीतरी टचकन पाणी येतं
कुणी बघितलंच जर तेवढ्यात
तर मी कांदा चिरत असतो...
सगळ्या भावना लपवायला केव्हाच शिकलो होतो मी
मोकळं व्हायला इथे मित्र जोडतोय
आई, खरच मला मैत्रीची सुद्धा भूक लागलीय..
इतक्या चांगल्या मित्रांमुळे मी इथवर पोचलो
आणि बहुतेक कोणीतरी मित्रच माझी हाक  ऐकेल:
"मित्रा, मला भूक लागली"
स्वतःला समजावणं खूप अवघड आहे की
इतक्यात या हाकेला ओ देणारं कोणी नसणार आहे
मजेत टप्पल मारायला भाऊ माझा नसणार आहे
तसं काळजी करण्यासारखं काही नाही
पोटभर जेवतो मी रोज, पण
भूक काही भागत नाही!
                                       - उन्मेष

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१२

सोडून जाताना

सोडून जाताना देश माझा काहीच मला वाटलं नाही
भावना सगळ्या जणू कोरड्या झाल्या होत्या
रडायची परवानगी तर मीच मला नाकारली होती
खूप गोष्टी पहिल्यांदा होत होत्या बहुतेक

सोडून जाताना वेश माझा काहीच मला वाटलं नाही
"कसं दिसेल" हा प्रश्न स्वतःला विचरला  नाही 
नखशिखांत नवीन कपडे , बूट, ब्लेझर सूट
इतकं  सगळं  घालून दिवाळीत सुद्धा नटलो नव्हतो
आयुष्यातला पहिला विमान प्रवास , तोही एकटा
भीती खरच वाटली नाही, पण खरंच ..
उत्सुकता, आकांक्षा , संवेदना, उद्दिष्टे असे अनेक जड शब्द
मनात घर करून होते

राहतं  घर सोडून जाताना काहीच मला वाटलं  नाही
त्या भिंती, ती  गॅलरी, तिथे उभं  राहून पाहिलेला तो पाऊस..
आईच्या हातची आयती कॉफी, हे आणि असं सगळं
आठवणींमध्ये आहे पण तरीहि
डोळे अश्रूंना वाट  करून देण्यास तयार नाहीत
खूप स्वार्थी आहेत हे डोळे आणि डोळेच काय...
सगळीच इंद्रिये आणि त्यांना नाचवणारं माझं  मन सुद्धा
कशाच्या शोधात साता -समुद्रापलीकडे निघालंय ?
कुणास ठाऊक!
तथाकथित उच्च शिक्षण घ्यायला ,
नवीन माणसं , भाषा , संस्कृती यांचा अनुभव घ्यायला,
खरं  म्हणजे स्वतःचे चोचले पुरवायला
एकदा तरी मनसोक्त फिरायला
एकदा तरी  व्यक्त व्हायला 
एकदा तरी  उन्मुक्त व्हायला
एकदा तरी स्वतःसाठी जगायला...
थोडक्यात "सुख" नावाची गोष्ट शोधायला

बंधने आणि जबाबदाऱ्या सोडून जाताना काहीच मला वाटलं  नाही
कित्ती सहज गृहीत धरल्या गोष्टी सगळ्या
दगड केला मनाचा, झापडं  लावली डोळ्यांना,
कुठेतरी मनात घालमेल होती
पण यशाची चाहूल ती घालमेल सहज पचवून टाकते
दीड वर्षाचा हा प्रवास, विमानात आठवतोय
अस्वस्थ, बेचैन, अनिश्चित वातावरणात केलेला झगडा
आणि पटलं
याच साठी केला होता उभा अट्टाहास !
निभावून न्यायचे आहे आता इथे सारे काही
पुन्हा मिळणार काय आहे ..
अस्वस्थ, बेचैन, आणि अनिश्चित वातावरण
आणि यात वाढीव असेल ते एक थेंबभर समाधान !

 (ही मुक्तछंद कविता माझ्या सर्व शिक्षकांना अर्पण )
                                                   - उन्मेष
 

शुक्रवार, २७ जुलै, २०१२

विसा ( VISA ) पूर : शेवटचा (?) ट्रेक !



रविवार, २२ जुलै २०१२

जुलै सुरु झाला की एक प्रसन्न आणि हिरवा सुगंध वातावरणात भरून राहतो ; सर्दी डोक्यात रुतून बसावी तसा हा वास मनात घट्ट "वास" करून राहतो. अवघ्या सृष्टीला बाळंत करून नव-चैतन्य देणारा जुलै सह्याद्रीच्या पर्वतराजीवर विशेष प्रसन्न असतो. अशा या प्रिय जुलैमध्ये पाऊस सुरु झाला की ट्रेकचा विषय निघतोच, आणि पावसाळी ट्रेक म्हटले की लोहगड हे नाव हमखास पहिले तोंडावर येते;  यंदाचा पावसाळा पूर्णपणे ENJOY करण्यासाठी मी इथे नसणार हे माहीत असल्यामुळे ज्युनिअर कॉलेज पासून जमलेल्या ग्रुप-बरोबर एक ट्रेक तरी टाकायचाच होता ! हरिश्चंद्रगड च्या ट्रेक ची आखणी तब्बल १४ दिवस आधी सुरु झाली होती. माशी कुठे शिंकली ठाऊक नाही पण बहुधा नुकताच माझा नेदरलँडचा VISA मिळाला असल्याने आमचा VISA (विसा) पूर चा ट्रेक नक्की झाला: विसापूर म्हणजे लोहगडचा जुळा भाऊ !
रविवार सकाळी साडेसहाची लोकल असल्याने पाचच्या सुमारास उठलो. ट्रेक च्या दिवशी गजर नसतानासुद्धा जाग कशी येते हे कोडे मला आजपर्यंत सुटलेले नाही. प्राजक्ताची मैत्रीण श्रद्धा मला पावणे सहा वाजता घ्यायला संतोष हॉल चौकात येणार होती; मला फक्त भाजी आणि पाणी एवढेच आणावयाचे होते; आम्ही वेळेत निघालो (उल्लेखनीय बाब ). परत येताना उशीर होणार असे संकेत आम्हाला जातानाच मिळाले . सूर्य-हॉस्पिटल जवळच्या पुलावर श्रद्धाची गाडी पंक्चर झाली. सुदैवाने लगेच रिक्षा मिळाली आणि आम्ही वेळे-अगोदर पुणे स्टेशन वर पोचलो. प्राजक्ता तिची मैत्रीण प्रतिभासोबत आमच्या आधीच आली होती. श्वेता-सागर सुद्धा मागोमाग आले. लोकल सुटायला ५ मिनिटे अवकाश असताना धनश्री आली. ठरलेले ७ जण आले. लोकल मध्ये शिरून जागा पटकावली. धनश्री DELFT  येथे जाऊन  आलेली असल्याने आणि प्रतिभा ऑस्ट्रेलियाला Ph D  साठी जाणार असल्याने लोकल मध्ये आमच्या ग्लोबल गप्पा सुरु झाल्या. कॉलेज  मधील किस्से आणि प्रोफेसर्स च्या गमती जमती सांगताना "प्रतिभा" ही सुद्धा स.प. महाविद्यालयातच होती असे कळले; तीसुद्धा आमच्याच BATCH  ची ! हा आम्हाला धक्का होता (निदान सागरला व मला तरी मोठा धक्का होता; कारण तशा BATCH च्या सर्व मुली चेहऱ्याने माहीत असतात"च" ). असो. 2-3 स्थानके झाली नसतील तोच लोकलला सिग्नल लागला ; पुढे मेगा ब्लॉक  असल्याचे कळले. एक्स्प्रेस ट्रेन्सना धावण्यास प्राधान्य असल्याने लोकल मागेच पडत होती. उशीर होणार हे निश्चित झाल्यावर ट्रेकची पुढील आखणी करण्यासाठी विचारचक्रे एक्स्प्रेसच्या वेगापेक्षा पेक्षा जोरात फिरू लागली. कामशेत ला उतरून बेडसे CAVES  ला जावे की पटकन लोहगड करून परतावे की फक्त भाजे लेणीपर्यंत जावे असे सगळे विचार करून झाले. चिंचवड पर्यंतच लोकल जाणार अशी एक आवई  सुद्धा उठली. पण त्यात काही दम नव्हता. ट्रेन मध्ये असलेल्या गन्या-बाप्या पब्लिकने आमच्या मनोरंजनाची जबाबदारी समर्थपणे पेलली होती. सिंहगड, प्रगती अशा एक्स्प्रेस गाड्या पुढे गेल्यानंतर आमच्या लोकल ला गती मिळाली. बॉरबॉन सारख्या बिस्किटांचा फडशा पाडायला एव्हाना सुरवात झाली होती. फोटो काढणे हाही एक विरंगुळा होताच. मळवली ला 8 वाजता अपेक्षित असलेली लोकल साडेनऊ ला पोचली. दीड तास लेट  असूनही आम्ही बेत बदलला नाही. झपझप पावले उचलत आम्ही गावाच्या दिशेने कूच केले. ढगाळ वातावरण होते, पण पाऊस नव्हता. दूरवर धुक्याआड (न) दिसणारी किल्ल्यांची जोडगोळी आम्हाला खुणावू लागली होती.

लोहगड-विसापूर ची जोडगोळी 


 वाटेत एका टपरी वर नाश्ता  केला. ब्रेड -बटर , पोहे आणि चहा ! भरपेट खाऊन आम्ही भाजे लेणीच्या वाटेने निघालो.
शनिवारीच किल्ल्यावर आलेली मंडळी परत चालली होती. रविवार असल्याने "पब्लिक" भरपूर होतं. चहुकडे  हिरवळच "हिरवळ" होती. लेणीकडे जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत, त्या संपेपर्यंत न चढता मधेच एक वाट  विसापूर ला जाते अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पायवाट धुंडाळण्याचा प्रयत्न चालू होता. लेणीच्या तिकीट खिडकीपर्यंत गेलो तरीहि आडवाट काही सापडली नाही. परत काही पायऱ्या खाली उतरून एक निसरडी वाट पकडली. ही वाट विसापूर ला लवकर घेऊन  जाते असे सांगण्यात आले होते. आमच्या मागोमाग अजून एक-दोन ग्रुप येऊ लागल्याने बरोबर चाललो आहोत असा (फाजील) विश्वास वाटू लागला. चढताना कुणाचाही पाय घसरला की "या वयात पाय घसरायचेच" असा "क्लेशदायक श्लेष " ऐकू येत होता. श्रीखंडाच्या गोळ्या श्वेता आणि प्रतिभा यांना वेग घेण्यासाठी चांगल्याच उपयोगी पडल्या. (बाकीच्यांनी सुद्धा तितक्याच चवीने त्या खाल्ल्या ) सुदैवाने पाऊस  नव्हता. त्यामुळे फोटो काढता येत होते ; तशी प्राजक्ताने नीट फोटो काढता यावे म्हणून छत्री आणली होती.
पण ती पिवळी धमक छत्री कॅमेरा वर धरण्या-ऐवजी, फोटो काढून घेण्यासाठीच जास्त वापरली गेली.
तास भर चढण झाल्यावर छोटेसे मैदान लागले . इथून आजूबाजूचे दृश्य पावसाळ्यातील नेहमीचेच असले तरी नवीन होते. हिरव्या रंगाला बहुधा अमर्याद छटा  असाव्यात. हिरवा सह्याद्री डोळ्यांत साठवून आम्ही  विसापूरच्या डाव्या सोंडेच्या दिशेने  जाऊ लागलो.

विसापूर किल्ल्याकडे जातानाचे एक दृश्य 

थोड्याच वेळात धबधब्याची वाट सुरु झाली. चित्रवत वाटणाऱ्या त्या धबधब्यातून वर जाताना बूट-मोजे पूर्ण भिजले. त्याहूनही जास्त आम्ही आनंदात भिजलो. आमच्या मागून येणारा ग्रुप हा अत्यंत थिल्लर मुलांचा होता. त्यांनी बहुतेक आयुष्यात प्रथमच इतका हिरवा रंग आणि धबधबा बघितला होता ; त्यामुळे ती मुले
माकडांहून विचित्र किंचाळत होती. फोटो काढायला थांबून आम्ही त्यांना वर जाऊ दिले. शेवटच्या टप्प्यात पाण्याला थोडा जोर होता मात्र येथून धबधब्याची वाट सोडायची होती. या वाटेने बराच वेळ लागला होता. थोड्या खडकाळ वाटेने वर गेलो.

खडकाळ वाट 


  येथे मारुतीचे मंदीर लागले. बाहेर अश्वाचा पुतळा होता. या पुतळ्यापासून साधारण पन्नास  मोठ्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण गड-माथ्यावर पोचतो. गडावर अनेक तलाव तुडुंब भरलेले दिसत होते. जणू वरूणाची कृपा प्राप्त होऊन ते "भरून" पावले होते. किल्ल्यावर काही पडके वाडे , जुन्या वास्तूंचे अवशेष दिसत होते.  अजूनही पाऊस  पडत नसल्याने फोटोग्राफी ला ऊत  आला होता.

हिरवे कंच पठार, विसापूर 


माथ्यावरील पठारावर फिरताना श्वेताचा  पाय लचकला; श्रद्धाकडे कुठला तरी EASY  स्प्रे असल्याने काम EASY झाले. रेंज आल्याने मुलींनी घरी फोन करून घेतले. मी फोन स्वीच ऑफ करून सृष्टीच्या सोहळ्यात संमीलित झालो. काही वेळाने आमची पावले आपोआप फोटोजेनिक वाड्याकडे वळली.

यथाशक्ती, यथामती फोटो काढून झाल्यावर पोटात काहीतरी ढकलावे म्हणून वाड्या बाहेरच सांडलो. बटाट्याची भाजी, पोळ्या , छोले, दही-भात, तळलेल्या मिरच्या असा मेनू होता. हास्य-विनोद करत जेवण झाले तेव्हा  4 वाजत आले होते. आता खाली जाताना गाय-खिंडीतून जायचे असे आम्ही ठरवले होते. विसापूर ला लांबच लांब आणि प्रेक्षणीय तटबंदी लाभली आहे.

विसापूरची प्रेक्षणीय तटबंदी 


या तटबंदीच्या कडेकडेने चालत गेल्यास गाय-खिंडीकडे जाणारी पायवाट लागते असे प्राजक्ता  आणि  सागरने पूर्वानुभवावरून सांगितले. तटबंदी च्या कडेने चालण्यास सुरवात केली ; पाऊस  पडू लागला होता. सोबत वारा सुद्धा जोरात वाहत होता. काही ठिकाणी तर तटबंदीच्या खालून धबधब्याचे पाणी उलट्या दिशेने, म्हणजे वर उडत होते. तटबंदी पूर्ण फिरून सुद्धा रस्ता सापडला नाही. किल्ल्यावर आलेल्या इतर मंडळींना विचारत विचारत  अखेर आम्हाला एक टेकडी चढून बरोब्बर विरुद्ध दिशेला वाट दिसली. दिसायला ही वाट भयावह होती. धबधब्यातून आता खाली उतरायचे होते. जीव मुठीत धरून आणि हात हातात धरून आम्ही खाली उतरू लागलो. एकमेकांना मदत करत निवांतपणे  धबधबा उतरलो.  सपाट पायवाट आली तेव्हा, फलाहार केला. सफरचंद आणि पेअर फळे खाऊन अधिक ताजेतवाने झालो (आधीच धबधब्यातून खाली आल्यामुळे तरतरीत होतोच) या
पायवाटेने भरभर गेल्यास 20 मिनिटे लागतील आणि आपण साडे-पाचची लोकल पकडू शकू असे प्राजक्ताला वाटले; सागर व मी मात्र साडे-सहा ची लोकल सुद्धा मिळेल की नाही याबाबत साशंक होतो, अंतर खूप आहे याची आम्हाला पुरेपूर कल्पना होती. अजून गाय-खिंड, नंतर भाजे लेणी येईपर्यंत 2 डोंगर, नंतर गावात जायची वाट, आणि मग गावातून मळवली स्टेशन ! बराच मोठा पल्ला गाठायचा होता. चिखल तुडवत , गाणी म्हणत- ऐकत, वाटेतील धबधबे आणि ओघाने येणारी ओंगळ गर्दी चुकवत आम्ही हा टप्पा पूर्ण केला. साडे सहाची लोकल थोडक्यात चुकली. 7:09 ची लोकल येण्यास अवकाश असल्याने स्टेशन जवळच चहा-केक, खाकरे ,फळे असा नाश्ता केला. पाय आता बोलायला लागले होते. लोकल वेळेवर आली. पाचही मुली लेडीज डब्यात गेल्या. मी व सागर ने उभे राहण्यास जागा मिळवली. या लोकल ला फारसे सिग्नल मिळाले नाहीत आणि गाडीने वेग सुद्धा चांगला घेतला होता. श्रद्धा, प्राजक्ता व मी शिवाजीनगर ला उतरलो. श्वेताची सॅक सकाळपासून मी घेतली असल्याने ती देण्यासाठी श्वेताला शोधू लागलो. ती डब्यातून उतरली नाही . प्राजक्ताने व मी पळत पळत तिला सॅक पोचवण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत मी गुडघ्यावर आपटलो. पूर्ण दिवसभर ट्रेकमध्ये पडलो नव्हतो ती उणीव खरचटून (भरून नव्हे) निघाली.

दोन वेगळ्या वाटांनी गड काबीज केला होता. त्याचे समाधान होते.  एक पावसाळी हिरवा दिवस मित्रांसमवेत मस्त गेला होता. "सह्याद्रीची हिरवाई डोळ्यांना निववते ; आंतरिक शांती देते" याचा पुनः प्रत्यय आला.
पुन्हा या सह्याद्रीच्या कुशीत कधी शिरता येईल माहीत नाही. पुन्हा कॉलेजच्या मित्रांबरोबर कधी जाता येईल कुणास ठाउक ..  उगाच काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते.  विसापूर हा किल्ला तसा चुकण्यासाठीच प्रसिद्ध आहे. हे मनोमन पटले होते.
ग्रुप :  उन्मेष, प्रतिभा, सागर, श्वेता, श्रद्धा, धनश्री


आयोजक : प्रतिभा, प्राजक्ता, धनश्री, श्रद्धा 

बुधवार, ४ जुलै, २०१२

चावंड: प्र स न्न ( करणारा ) गड


शनिवार २३ जून २०१२

जुन्नर भागातील अनेक प्रेक्षणीय किल्ल्यांपैकी एक म्हणजे "चावंड". "असले कसले विचित्र नाव" किंवा "तू नवीन किल्ले शोधून काढतोस" ,  "तू मनाची नावे देतोस" अशा खोचक टिप्पणी करणाऱ्यांसाठी हा श्लोक :  
चामुंडा अपभ्रंशे चावंड | जयावरी सप्तकुंड || गिरी ते खोदुनी अश्मखंड | प्रसन्नगडा  मार्ग निर्मिला ||

स्पष्टीकरण:                                                                                                                  हे नाव "चामुंडा" या देवीच्या नावाचा अपभ्रंश असून , प्रसन्नगड हे त्याचे दुसरे नाव आहे.  सप्तकुंडचे स्पष्टीकरण पुढे ओघाने येईलच.  तर, अशा या किल्ल्यावर जाण्याची गेली अनेक वर्षे इच्छा होती. २००६ ला हडसर-जीवधन-नाणेघाट-  ट्रेक केला तेव्हा 'चावंड'ला प्रदक्षिणा घातली होती. तसेच २००८ साली दुर्ग-ढाकोबा च्या ट्रेक च्यावेळी तोंडात घातलेला घास कोणीतरी  घशातून काढून घ्यावा त्याप्रमाणे किल्ल्यापासून २  किलोमीटर वर असताना पावसाने आमचा बेत हाणून पाडला होता. त्यानंतर जुन्नर भागातला हा एकटाच किल्ला बघायचा राहिल्याने आवर्जून १ दिवसाचा ट्रेक करणे आवश्यक होते...२०१२ च्या जून मध्ये तशी संधी साधली. 

       पाऊस नुकताच सुरु होत होता. आर्द्रा नक्षत्र लागले होते, तरीहि म्हणावा तसा पावसाचा जोर वाटत नव्हता. त्यामुळे १ दिवसाच्या ट्रेकच्या योजनेला उदंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. पण रास्त अपेक्षा ठेवूनसुद्धा न पडलेल्या पावसाप्रमाणे नेहमीचे मावळे किल्ल्यावर न येताच "पडले". मी व  सिद्धार्थ बिनीवाले असे दोघेच उरलो. सिद्धार्थने त्याची बाईक काढली  व २३ तारखेला पहाटे ६ वाजता आम्ही निघालो.

       वाहतूक अगदीच तुरळक असल्याने वाऱ्याप्रमाणे भर्राट निघालो.  मुंबई-पुणे महामार्गावर पोचल्यावर तर  "VEGA (वेगा)" चे  हेल्मेट घातल्याप्रमाणे आम्ही वेग घेतला. राजगुरुनगर सोडल्यानंतर एका झकास टपरीवर फक्कड चहा घेतला. ढगाळ वातावरण असले तरी पाऊस नसल्याने बाईकवरून जाण्यात मजा होती. ८ च्या सुमारास जुन्नर गाठले. दाऱ्या घाटाकडे जाणारा रस्ता पकडला.हाच रस्ता पुढे जीवधन, नाणेघाटाकडे  घेऊन  जातो.  जसजसे चावंडच्या जवळ जात होतो तसतसा रस्ता खराब होत चालला होता आणि निसर्ग अधिकाधिक मनमोहक ! आपटाळे गाव सोडले आणि ढग अचानक दाटून आले; अवघे वातावरण आल्हाददायक झाले.  विचारत विचारत आम्ही पावणे नऊ वाजता चावंड-वाडीत पोचलो. पायथ्यापासून पाहिल्यास बुटका वाटणारा  हा किल्ला समुद्र सपाटीपासून ३४०० फूट उंच आहे. गावातील शाळेसमोर गाडी लावून आम्ही एका पारावर थोडा वेळ बसलो. आजूबाजूचे फोटो काढले.
        वर जाण्यास पंधरा मिनिटे पुरतील असे वाटून झपझप पायवाटेने जाण्यास सुरवात केली. सिद्धार्थ भूगर्भ-शास्त्रज्ञ (GEOLOGIST ) , पर्यावरण-वादी,  वनस्पती-शास्त्रज्ञ  वगैरे असल्याने वाटेतील प्रत्येक झाडांनाच नव्हे तर दगडांना सुद्धा नाव मिळत होते; ज्ञानात भर पडती आहे असे तेव्हा वाटून गेले पण त्यातील एकसुद्धा नाव आत्ता आठवत नाहीये. असो. एके ठिकाणी जेथे वाटेला दोन फाटे फुटत होते, तेथून चुकीचे वळण घेतले. (वाट चुकली नाही तर तो ट्रेक कसला ! )  खालून आमची गम्मत बघत असणाऱ्या  गावकऱ्याने आम्हाला "मार्ग"दर्शन केले.  योग्य वाटेवर आल्यानंतरसुद्धा  त्याचे "पुढे चला, पुढे चला " चालूच होते. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढे गेलो.  
            माथ्यावर जाण्यासाठी एक अवघड टप्पा पार करावा लागतो: खडकातील पायऱ्या ! त्याला कडेने रेलिंग व दुसऱ्या बाजूने बोल्ट्स लावून तार ठोकलेल्या असल्याने भीतीचे कारण नव्हते. या स्पॉट वर फोटो-सेशन करून आणि  तरीहि सावधपणे वर चढलो. या रॉक पॅच नंतर ४०-५०  उंच पायऱ्यांनी  आम्हाला दमवले. आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वारात पोचलो होतो. दरवाजावर गणपतीची कोरीव मूर्ती आहे. बेसाल्ट  खडकाच्या उंच भिंतीमुळे दरवाजासामोरचा  भाग आकर्षक झाला आहे. दारातून दहा पायऱ्या चढून वर गेल्यावर दोन वाटा लागतात. उजवीकडे जाणारी वाट  उध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते तर डावीकडची वाट तटबंदीला समांतर जाते. गडावर अभ्यासासाठी भरपूर गोष्टी आहेत. अनेक प्राचीन अवशेष,  वनस्पती-कीटक वैविध्य, रंगी-बेरंगी पक्षी -  इतिहास, भूगोल, निसर्ग-शास्त्र आवडणाऱ्यांनी सहज रमून जावे असा किल्ल्याचा माथा आहे. मी यापैकी एकही नव्हतो , तरीहि डोंगरवेडा म्हणून तेथे रमून गेलो. वाटेत एक जुना चौथरा, शेजारी उखळ दिसले. त्या मोठ्ठ्या दगडी उखळीला "भीमाची वाटी" वगैरे उपमा देऊन झाल्या.  तटबंदीच्या बाजूने चालत असताना गडाचा घेरा बराच विस्तीर्ण असल्याचे लक्षात आले. पाण्याची टाकी अधून-मधून न चुकता दिसत होती. ससाणा हा पक्षी जणू प्रत्येक किल्ल्या"वर" गस्त घालण्यासाठीच जन्माला आला आहे असे वाटून गेले. त्याचे दर्शन कोणत्याही किल्ल्यांवर अगदी सहज होते.. यावेळी मात्र त्याची जात सुद्धा समजली (क्रेडिट्स: सिद्धार्थ , नाव अर्थातच मला आठवत नाहीये; पण कसलासा  "हेडेड फाल्कन" होता म्हणे )  किल्ल्यावर एक मंदिराप्रमाणे भासणारी एक उद्ध्वस्त वास्तू आहे. त्याच्या कोनाड्यांमध्ये गणपतीची मूर्ती दिसते. समोरच एक एके काळी सुंदर असावा असे वाटायला लावणारा तलाव आहे.  त्या उध्वस्त अवशेषांमध्ये लिलीसारख्या फुलांचा एक छानसा ताटवा डोळ्यांना मोहवून गेला.  येथून आम्ही मोर्चा वळवला तो किल्ल्यावरील टेकडीकडे जेथे चामुंडा देवीचे मंदीर नव्याने बांधले आहे. तेथपर्यंत जाण्यासाठी आम्ही नवीन वाट तयार केली.  या आडवाटेत एक सुंदर गोम दिसली. तिचे फोटो काढण्यात वेळ घालवला. मंदिरापासून किल्ल्याचे विस्तृत दृश्य (PANORAMIC VIEW )  मोठे रमणीय दिसत होते. मंदिरासमोर नंदी आहे; ही गोष्ट थोडी कोड्यात टाकणारी वाटते.; कारण शंकराची पिंड कुठेच दिसली नाही. टेकडीवरील या मंदिरातून खाली उतरताना बरोबर पाय-वाटेने खाली आलो. गडाच्या वायव्य भागात एकमेकांना लागून अशी ७ टाकी आहेत; ही ७ मातृकांशी निगडीत आहेत: ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा ! सुरवातीला आलेल्या श्लोकातील सप्तकुंड म्हणजे हीच सात मातृके. यापैकी चामुंडा सर्व-श्रेष्ठ समजली जाते. देवीचे हे रूप जसे क्रूर मानले जाते; तसाच या किल्ल्याचा एके काळचा लौकिक असावा. किल्ल्याचे ईशान्येकडील बेलाग कडे व तेथी नसलेली तटबंदी पाहून याची खात्री पटते; म्हणूनच बहादूरशहा निजामाला येथे कैदेत ठेवण्यात आले होते.
               किल्ला बघण्यास फार वेळ लागला नाही; आजूबाजूला असलेल्या सह्य- रांगांपैकी  फक्त जीवधन ओळखता आला. एव्हाना १२ वाजत आले होते. जेवण करण्यासाठी आम्ही पुन्हा मुख्य दरवाजापाशी आलो.  जेवणाबरोबरच गप्पांची शिदोरीसुद्धा सुटली. तासभर मजेत गेला.  किल्ल्यावर करण्यासारखे आता काहीच नसल्याने लगेच खाली उतरलो.  गावातील मुलांचा VOLLEYBALL  चा खेळ बघितला आणि ५ मिनिटे पारावरील गावकऱ्यांच्या शिळोप्याच्या गप्पा ऐकून बाईक काढली. जाताना कैरीचे झाड दिसले आणि कैऱ्या पाडण्याचा मोह झाला. तेथे थांबून यशस्वीपणे २ कैऱ्या पदरात "पाडून घेतल्या".
परत जाताना वेळ काढण्यासाठी अवसरी घाटाच्या "वन-उद्यानाला" भेट दिली. तेथे कसले तरी पुलाचे काम चालू असल्याने उद्यान बंद होतेअसे कळले.  सिद्धार्थ येथे पूर्वी शाळेबरोबर येऊन गेला असल्याने त्याने तेथील प्राणी-संवर्धन केंद्राची  जुजबी माहिती दिली. पण त्या वेळी  तेथे फक्त मनुष्य-प्राणीच असल्याने आम्हाला घराचा रस्ता धरावा लागला. ४ वाजता आम्ही पुण्यात परत आलो होतो.  अक्षरशः हाफ-डे ट्रेक करून आम्ही पुन्हा संध्याकाळचे बेत आखण्यास "गुडलक" मध्ये हजर होतो.
                 काय मिळाले या अर्ध्या दिवसात ? सिद्धार्थच्या मते आपण खऱ्या अर्थाने जगतो ते यासाठी : आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी ! सोमवार-शुक्रवार चे रुटीन  पोटासाठी काय काय करावे लागते ते शिकवते पण निसर्गात रमवणाऱ्या  ट्रेक सारखी एखादी गोष्ट आपल्याला का जगायचे ते सांगून जाते.

रविवार, ६ मे, २०१२


प्रबळगड (मुरंजन) - कलावंतीण दुर्ग : REUNION ट्रेक२७,२८,२९ एप्रिल २०१२


क"रुणनिर्देश"

प्रस्तुत लेखामधील सर्व पात्रे वास्तविक असून घटना रंजक पद्धतीने सांगण्यासाठी  त्यांचा काल्पनिक विस्तार केला आहे. याबद्दल खेद व्यक्त करू नये; या विषयीच्या टिप्पणी (COMMENTS ) विचारात घेतल्या जाणार नाहीत. आता येऊ घातलेल्या वर्णनात असलेले संवाद , सु (किंवा कु) विचार , विनोद या विषयी कोणीही मालकी हक्क सांगू नये. लेखक हा टेप- रेकोर्डर नाही याची कृपया नोन्द घ्यावी. कोणत्याही ओळींत  बदल सुचवू नये किंवा वाढीव वाक्य जोडू नये ही नम्र विनंती!

आता खरा  ऋणनिर्देश (ACKNOWLEDGEMENTs )  :

हा ट्रेक ठरवण्यासाठी जमलेल्या कनक, रोहन आणि सागरचे सर्वप्रथम आभार ! ट्रेक ठरलाच नसता तर आम्ही गेलोच नसतो :D  ट्रेक साठी जमलेले सर्व मावळे ज्यांनी आपापल्या परीने ट्रेक मध्ये "जान" आणली,  ज्यांच्यामुळे ट्रेक साठी वर्णन लिहिले जात आहे त्यांची मनस्वी आभार ! सह्याद्री - जो गड-किल्ल्यांच्या दुनियेतला ब्रह्मदेव आहे , ज्याने घडवलेल्या पाषाणपुष्पांचा गंध  दुर्गवेड्यांना  नियमितपणे आकर्षित करत असतो , त्या सह्य-पर्वताला नमन! ठाकूरवाडीतील ठाकर -भूतांबरा ज्यांनी आम्हाला जीवनच (पाणी) दिले नाही तर जीवनासाठी एक आठवणीची शिदोरी सुद्धा दिली. ठाकरांशिवाय हा ट्रेक यशस्वी होऊच शकला नसता, त्यांना मनापासून धन्यवाद !
आम्हा सर्वांचे पालक ज्यांनी आम्हाला ट्रेकला जाऊ दिले, काळजीचे शब्द ऐकवून , रागावून , ओरडून पण तरीही प्रेमाने पोळीभाजीचा डबा दिला , खाऊचे डबे दिले , आणि "नीट जा" हा निरोप दिला,  त्यांचे आशीर्वाद स्मरून ऋण निर्देश संपवतो.


दिवस पहिला : शुक्रवार २७ एप्रिल २०१२ :  पन'वेल' पर्यंतचा रम'वेल' असा प्रवास!

यंदाचा हिवाळा ट्रेक न करता गेला या पापाचे प्रायश्चित्त भर उन्हाळ्यात ट्रेक करून घ्यायचे असे ठरवले होते. जवळ-जवळ 2 वर्षांनी शाळेतल्या ग्रुप मधील सर्व मंडळी एकत्र पुण्यात होती (आणि ट्रेकला येण्यास उत्सुक होती ). विशेषतः रोहन-सागर-सिद्धेश हे धमाल त्रिकूट ट्रेक ला येणार होते .
शुक्रवारी ऑफिस मधून येतानाच अनेक अपशकून झाले. परोठे बनवून देणाऱ्या मेस च्या बाईने दीड तास घालवला. बिस्किटे -वेफर्सचे नेहमीचे दुकान बंद होते.  भरीस-भर म्हणून घरी पोचलो तेव्हा वीज गेली होती. सर्व तयारी अंधारात विजेरीच्या प्रकाशात करावी लागली. १०.३० वाजता
निघताना दिवे आले आणि चिडचिड करत मी घरातून बाहेर पडलो. आनंदनगर च्या बस-थांब्यावर ११.०० वाजता भेटायचे ठरले होते. ११.५५ ची पुणे-बोरीवली गाडी पकडायची होती. तीत पनवेल पर्यंतचे आरक्षण केले होते. ११.२० झाले तरी कोणाचाही पत्ता नव्हता; फोन केल्यावर "निघालोच आहे, आलोच, इथेच आहे" , अशी मोघम, ठरलेली उत्तरे मिळाली. अखेर ११.३० ला सर्व जण येताना दिसले आणि त्याच सुमारास आलेली स्वारगेट ला जाणारी बस थांबवण्यात आली.  रोहन-सागर च्या गगनभेदी हास्याने ट्रेक चा श्रीगणेशा झाला. बस दांडेकर पुलापर्यंत आली तोच मला "भेळ्या"चा  फोन आला. भेळ्या म्हणजे "श्रेयस बेलसरे" (जे नाव कधी उच्चारले नाही ते लिहिताना खूप त्रास झाला आहे; हे रमणबागीय वाचकांना सांगणे न लगे ). राजगडच्या ट्रेकला पातेलं वाजवून उपस्थित ट्रेकर्सची वाहवा मिळवलेला; ही त्याची ट्रेकर म्हणून ओळख ! तो त्याच वेळी (११.४५ ला ) पनवेल ला पोचला होता; त्याला "आलोच" म्हणून कळवले.
आम्ही अगदीच वेळेवर स्वारगेटला पोचलो; प्रसाद पैठणकर हा जुना शिलेदार आमचीच वाट पाहत होता. आता आम्ही सात झालो होतो. (कनकानय (ही दोन नावे आहेत), सिद्धेश, सागर, रोहन, पैठ्या (प्रसाद) आणि मी )    एस.टी. महामंडळाने आम्हाला स्थिरावण्यास पुरेसा वेळ दिला. ११.५५ ची गाडी सुमारे १२.३० वाजता निघाली. कनकने सर्वांत मागील जागा आरक्षित करून स्तुत्य कामगिरी केली होती. हसण्यासाठी आता कारण नको होते, जोक्स सुद्धा नको होते, प्रसंग सुद्धा नको होते; हवे होते फक्त मैत्र, निखळ चेष्टा आणि एकमेकांची मर्मस्थाने !
सेनादत्त पोलीस चौकीपाशी गाडी थांबली; कारण: एका मोठ्या कुटुंबाची गाडी चुकली होती; आणि त्यांनी आरक्षण केले होते. ते गाडीत शिरताना त्यांचा चालक-वाहका बरोबरचा वाद चांगलाच रंगला. आम्ही त्यावरही टीका-टिप्पणी करत हसून 'घेतले'. गाडी एक्स्प्रेस हायवेने  सुसाट निघाली. कनक वेळोवेळी कुठे आलो आहोत याची माहिती देत होता ; त्याला GPS  हे सार्थ नाव मिळाले. लोणावळ्याला गाडी थांबली तेव्हा रोहन व मी सोडून सर्वांनी चहा घेतला आणि हळहळले. चहा इतका पाणचट होता की पूर्ण ग्लास संपवणे त्यांना अशक्य झाले.
पनवेल च्या जवळ एक्स्प्रेस हायवे जेथे सोडणार होतो तेथे वाहतुकीचा खोळंबा झाला होता (TRAFFIC  JAM). आडव्या-तिडव्या घुसवलेल्या गाड्या आणि कोणाचेही ऐकत नसलेले ड्रायव्हर यांमुळे पनवेलला वेळेत पोचू की नाही याबद्दल शंका निर्माण झाली. तोच आमच्या कंडक्टरने खाली उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रवाशांना आवाहन केले. आम्ही जणू याची वाटच पाहत होतो. आम्ही ७ जण त्या हायवे वर ट्राफिक पोलिसाचे काम करू लागलो. इतर वाहनांमधूनही काही उत्साही मंडळी मदतीला होती. आमचा मार्ग मोकळा व्हायला अर्धा-पाऊण तास लागला. एक नवीन अनुभव मिळाला. ४ च्या सुमारास पनवेल आगारात गाडी पोचली.



दिवस दुसरा: शनिवार, २८ एप्रिल २०१२: कलावंतीणीचा रौद्रसुंदर सुळका  आणि ठाकूरवाडीतील रम्य संध्याकाळ


पनवेलला पोचताच भेळ्याला फोन करून तो खरच आला आहे ना याची खात्री करून घेतली. प्रशस्त असलेल्या एस. टी. स्थानकावर चांगली जागा पकडून आम्ही झोपायचा प्रयत्न केला. मला खरच काही वेळ झोप लागली; त्या वेळात माझ्यावर जोक्स झाले असतील याबद्दल माझी खात्री आहे. पाच वाजताची ठाकूरवाडीची एस.टी.  आम्हाला हवी होती. झोप झाल्यावर पोह्याची गाडी कुठे दिसती आहे का याचा शोध घेतला; पनवेल सारख्या ठिकाणी पोह्यांचा नाश्ता (पहाटे ४.३० वाजता)  मिळू नये ही दुर्दैवी  गोष्ट होती (!) अखेर कॉफी पिऊन आम्ही नवीन दिवस सुरु झाला आहे अशी आमची समजूत घातली. या गाडीने सुद्धा उशीर केला. ५.३० च्या सुमारास गाडी आली आणि गाडीत फक्त आम्ही  ८ जण होतो; इतर "पब्लिक" नसताना आता दंगा करण्यात काही अर्थ नव्हता. पहाटेची वेळ असल्याने बाहेरचे वातावरण विशेष  आल्हाददायक होते. गाडी शेडुंग फाट्यावरून  आत गेली आणि प्रबळगड दृष्टीपथात आला.
सव्वा सहा वाजता गाडी ठाकूरवाडीला पोचली. येथील हनुमानाचे दर्शन घेऊन लगेच चढाईला सुरवात केली. या गावातील घरांची उंची तेथे राहणाऱ्या लोकांचे "उंची राहणीमान" दर्शवत होती.  धारप इस्टेट नावाचा भाग बंगलेवाल्या मंडळींनी  चांगलाच  विकसित केला आहे. विशेषतः "खन्ना हाउस" या आकर्षक घराने आमच्या मनात घर केले.
          किल्ल्याची  उंची बरीच (२३०० फूट) असल्याचे  रोहन सुरवातीपासूनच सर्वांना "परत चला, विचार बदला" असे म्हणत होता.आम्ही  पश्चिमेने चढाई करत असल्याने ऊन लागेल ही भीती नव्हती. वाटेत उन्हाळा असूनसुद्धा झाडे पुष्कळ दिसत होती. एकमेकांना "घेणे" आणि मुद्दाम जोरात हसणे चालूच होते. आम्हाला चढणीमुळे कमी आणि हसण्यामुळे जास्त दम लागत होता. त्यातच मनीषा नामक अज्ञात प्रेमिकेने प्रियकराचे वाभाडे काढणारा मजकूर वाटेतील एका सिमेंटच्या पाईपवर लिहिलेला आम्हाला दिसला: "प्रेम कर'ने' चूक  नाही ..." अशी गावठी सुरवात असणाऱ्या त्या मजकुरात सुरवातीलाच मोठी चूक होती. पुढे  वाटेत वेळोवेळी ही मनीषा आमची हसण्याची मनीषा पूर्ण  करत राहिली.
         साधा रस्ता असून सुद्धा SHORT CUT  म्हणून आणि बरोबर असलेली ठाकर मुले गेली म्हणून एकदा आम्ही वेगळा रस्ता घेतला. या वाटेने  आमचा चांगलाच दम काढला. विशिष्ट उंची गाठल्यानंतर आम्हाला एक फोटोजेनिक खडक (SPOT )मिळाला.  तेथे येथेच्छ फोटोसेशन झाले.
काकड्या खाल्ल्याने ताजेतवाने वाटले .येथून जवळच एक म्हातारी स्त्री पाण्यासाठी आक्रोश करत होती. ती वेडी असावी असे प्रथम-दर्शनी वाटले पण गडावरून खाली येणाऱ्या लहान मुलीमुळे ती वेडी नसल्याचे कळाले. तिने आम्हाला हास्य-विनोदाच्या मूड मधून अचानक चिंतन करण्यास भाग पाडले. जेथे आम्ही दोन दिवस मौज-मस्ती करायला येतो, तथाकथित ट्रेक करतो अशा डोंगर-कड्यांवर घर करून राहणारे ठाकर कशा परिस्थितीशी झुंज देत असतात  हे समजले.  रोज ट्रेक करूनही त्याबद्दल चकार शब्द न काढणारे ठाकर खरच ग्रेट आहेत. आम्ही दरवाजापाशी पोचेपर्यंत एक ठाकर मुलगा ३ वेळा पोती घेऊन खाली जाऊन वर आला होता. दरवाजाजवळच  हनुमान-गणेशाच्या कोरीव मूर्ती आहेत.  
दरवाजापाशी तटबंदीचे अवशेष सुद्धा दिसतात. येथी एक छान बांधलेला पार आहे. येथे भेळेचा - बिस्किटांचा नाश्ता झाला. कंटाळा येईपर्यन्त फोटो काढून झाले. अख्खा दिवस नाहीतरी वेळ काढावा लागणार होता, म्हणून  निवांतपणेच वर जाणे आम्ही पसंत केले. येथून ५ मिनिटांच्या अंतरावर WELCOME घर आहे. निलेश होम सर्व्हिस चा बोर्ड आपले लक्ष वेधून घेतो.
येथील ठाकर- भूतांबरा यांच्याकडे आम्ही पाणी भरून घेतले. त्यांचे घर जणू नंतर आमचेच झाले होते; इतकी आपुलकी त्यांनी आम्हाला दाखवली. यांना विचारून आम्ही प्रथम कलावंतीण दुर्ग सर करण्याचे ठरवले.
       कलावंतीणच्या वाटेने जात असतानाच सागरला गुडघ्याचा त्रास सुरु झाला; आणि त्याने वर न येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आमच्या सॅक्स सागर कडे ठेवून आम्ही वर निघालो. हा रस्ता सुद्धा बराच चढणीचा होता. वाटेत लागलेल्या करवंदांच्या जाळ्यांमुळे ही वाट  गोड आणि सुसह्य झाली.प्रबळगड आणि कलावंतीण यांमध्ये एक खिंड आहे तेथून कलावंतीणसाठी  डावीकडून जावे लागते. खिंडीतून उजवीकडे गेल्यास एक लपलेली गुहा नजरेस  पडते, एखादे भुयार असावे  अशी तिची रचना आहे.
खिंडीत पोचतानाच तो सुळका धडकी भरवत होता. फोटोमध्ये दिसत असणाऱ्या नागमोडी सुंदर पायऱ्या या मांडी इतक्या उंचीच्या होत्या. आधाराला रेलिंग किंवा शिडी नव्हती. पण परीक्षेसाठी वर्गात आल्यावर  पेपर लिहिणे भाग असते. पास होवो वा नापास ! मनाचा हिय्या करून सुळक्यावर निघालो.
प्रत्येक पाऊल जपून टाकत जात होतो. सर्वोच्च ठिकाणी जाण्यासाठी एक रॉक-पॅच  पार करावा लागणार होता. येथून वर जायची काही गरज नाही असे वाटत होते; पण झेंडा फडकविल्याशिवाय परत यायचे नाही असे जणू पैठ्याने ठरवले होते.  रॉक-पॅच मधून ROUTE ओपन करण्याचे काम त्याने केले. त्याच्या पावलावर शब्दशः पाऊल ठेवून आम्ही वर पोचलो:
काहीतरी मिळवल्याचे समाधान चेहऱ्यांवर होते. काठीत अडकलेला झेंडा सोडवून झेंडा खरोखरीच फडकवला.  जय-भवानी - जय शिवाजी च्या घोषणा दिल्या. आजूबाजूचा परिसर डोळे भरून पहिला. दक्षिणेला माणिकगड, नैऋत्येला कर्नाळा, शेजारी प्रबळगड, इरशाळगड , माथेरानचे पठार .... त्या रखरखीत उन्हात सुद्धा शांत भासत होते. सह्याद्री आहेच मुळी अविचल.. त्याची निर्मिती असलेल्या या सर्व किल्ल्यांना सुद्धा स्थितप्रज्ञ ऋषींची धीरगंभीर मुद्रा लाभली आहे. कधीही  बघा, ते डोंगर , ते  कडे न बोलताच तुमचे हृदय व्यापून जातील.
             अलंकारिक चिंतन संपताच जाणीव झाली की उतरायचे कसे हा विचारच केलेला नाहीये... या वेळी कनक ने पहिला नंबर लावला आणि मग मार्गदर्शन घेऊन इतर खाली उतरू लागले. खाली येताना पाय अक्षरशः थरथरत होते कारण पाय ठेवायचा कुठे हेच दिसत नव्हते. खाली पोचलेल्या मंडळींनी उत्तम गाईड केल्याने खाली उतरता आले. पायऱ्यांचे आव्हान आता इतके राहिले नव्हते. खिंडीत परत पोचलो तेव्हा घसे सुकले होते. कनक-रोहन यांनी त्यांच्या सॅक्स आणल्या होत्या; त्यात जपून ठेवलेले पुण्याचे पाणी काढायची वेळ आता आली होती. तासाभरातच आम्ही सागर जेथे थांबला होता , तेथे पोचलो.
मी सॅक मधून मोसंबी काढली आणि मला पुष्कळ लोकांनी (विशेषतः रोहनने)  त्यांचे पुण्य दिले.  सुदैवाने मोसंबी गोड निघाली , अन्यथा पुण्य मागे घ्यायला कोणीही मागे-पुढे पहिले नसते.  भूतांबरा यांच्या घरी जाऊन लिंबू सरबताचा आनंद घेतला.
          कनकने  इतक्यात जेवणासाठी सावलीची जागा शोधली होती. उत्साहाने तिकडे गेलो तर   ती एक उतरण होती. बसायला किंवा डबे ठेवायला सुद्धा सपाट जागा नव्हती, परत फिरण्याचे त्राण सुद्धा नव्हते. या जागेला "नीलायमचा उतार" (पुण्यातील सहकारनगरकडे जाणारा एक उड्डाणपूल ) असे "वाढीव" नाव देण्यात आले. तेथे आम्ही जेवण आटोपले.
कनक चे पेटंट श्रीखंड-आम्रखंड , रोहन च्या तिखट पुऱ्या हेच ITEM हिट झाले. जेवणानंतर त्या तोकड्या सावलीत झोपण्यासाठी भांडणे झाली. दादा, सिद्धेश व मी पारावर झोपायला गेलो. तेथेही थोड्या वेळाने सूर्य आग ओकू लागला. नाईलाजाने भूताम्बरा यांच्या घरी गेलो व बाहेर झाडाच्या सावलीत पडी टाकली. रोहन, पैठ्या व सिद्धेश सुद्धा तेथेच पहुडले.  कोंबडा दुपारी ४ वाजता आरवल्याने व घरातील लहान मुलगा रिषभ याने पातेलं वाजवल्याने झोपमोड झाली आणि मनोरंजन सुद्धा ! "कोंबड्याचा दिवस १२ तासांचा असतो" सारखे  पाचकळ विनोद सुद्धा झाले.
५ च्या सुमारास सागर- भेळ्या यशस्वीपणे झोपून परत आले तेव्हा "लगेच घरी जाऊ" या मागणीने जोर धरला. रोहन ला सागर च्या तब्येतीचे उमाळे येत होते. सागर ला त्रास होऊ नये म्हणून घरी जाऊ , त्याला सोबत म्हणून  प्रबळगडावर येणार नाही असे सगळे म्हणत होते.  दादा व कनक आल्यावर मात्र  कोणी खाली जायचे नाव काढेना अन लगेच प्रबळगडावर जायला तयार सुद्धा होईनात. अखेर मुक्काम करून रविवारी सकाळी पुढचा बेत ठरवावा असे ठरले.
पुन्हा एकदा लिंबू सरबत प्राशन झाले. घरातील पाळीव कुत्री, कोंबड्या यांचे फोटो काढले गेले. संध्याकाळ होऊ लागली तसे आम्ही प्रबळमाची वरील मैदानात उतरलो. किल्ल्यावरून सूर्यास्त पाहणे हा नेहमीच सुंदर अनुभव असतो. ट्रिक फोटोग्राफी करण्याचा प्रयत्न झाला.

            रात्रीचे जेवण म्हणजे बिर्याणी-रेडी मिक्स होते!  कनक ने पाणी छान उकळवले (!)  ज्यामुळे बिर्याणी छान शिजली. पिठले-भाकरी, पापड , लोणचे असा खाना आम्ही  भूताम्बरा यांजकडून   मागवला होता; त्यामुळे फक्कड बेत जमला.



दिवस तिसरा: रविवार २९ एप्रिल २०१२: प्रबळगड सर : ट्रेक सफल ! इथे विषय संपतो

   कोंबडा आरवून आरवून दमला, गजर वाजून वाजून बंद पडले. 5 वाजता उठायचे ठरले असताना आम्ही 6.30 पर्यंत लोळत होतो. आन्हिके उरकून चहापान झाले. मी एकट्यानेच मग आणला होता त्यामुळे "मग" त्यात बिस्किटे बुडवण्यासाठी अभूतपूर्व अहमहमिका सुरु झाली.  पाळीव कुत्री  "लोचट" हे विशेषण आपल्यासाठीच आहे हे सिद्ध करत होती. कोंबड्यांना दिलेली बिस्किटेसुद्धा कुत्रीच फस्त करत होती. अन्नासाठी मग कोंबड्यांनी युद्ध पुकारले. आणि विशेष म्हणजे त्यांनी 2 कुत्र्यांना पळवून लावले. ही लढाई प्रेक्षणीय होती. प्रबळगड प्रीमिअर लीग मधील फायनल जणू ! हो-नाही म्हणता म्हणता सर्व जण प्रबळगडावर यायला तयार झाले.  रोहन -सिद्धेश  किंवा कुणाकडेच "प्रबळ" गडावर न येण्यासाठी (सागर प्रमाणे ) "सबळ" कारण नव्हते. सागरने गुढघेदुखीमुळे खाली थांबणेच पसंत केले. आम्ही एका सॅक मध्ये पाणी व फराळाचे पदार्थ घेऊन प्रबळ गडाकडे कूच केले.
प्रबळगड : उत्तर कोकणामधील हा किल्ला कल्याण, पनवेल या बंदरांवर नजर ठेवण्यासाठी बांधला असावा.   किल्ल्यावरील गुहांवरून याचा कालखंड बौध्द काळाशीही जोडता येऊ शकतो.  बहामनीच्या काळात  आकारास आलेल्या या किल्ल्याला शिलाहार, यादव राज्यकर्त्यांनी लष्करी चौकी बनवून नाव दिले : "मुरंजन" ! निजामशाही , आदिलशाहीची जुलमी राजवट पाहिल्यानंतर 1656 साली हा किल्ला स्वराज्यात आला तेव्हा त्याचे नाव बदलून "प्रबळगड" ठेवण्यात आले. पुरंदरच्या तहात देण्यात आलेल्या 23 किल्ल्यांपैकी हा एक होय.
    प्रबळगडावर  जायची वाट  तशी सोपीच आहे. एका ठाकर बाई कडून दिशा समजावून घेतली. सदाहरित वनाचा परिसर , ताशीव कडे आणि वाटेतील विलोभनीय दृश्ये यांमुळे पुनश्च फोटोग्राफीला उधाण आले.
किल्ल्यावर जायला आम्ही १०.३० वाजवले.  माथ्यावर पोचल्यावर प्रबळ गडाचा प्रचंड विस्तार लक्षात येतो. गडावर भर उन्हाळ्यात सुद्धा घनदाट जंगल होते. किल्ला संपूर्ण पाहून होणे शक्य नव्हते. त्यामुळे कलावंतीण दुर्ग ज्या दिशेला होता, तिकडे आम्ही मार्गक्रमण केले. किल्ल्याच्या ईशान्येकडे असणाऱ्या एका बुरुजाची प्रेक्षणीय माची आम्हाला पाहायला मिळाली. आगगाडी प्रमाणे भासणारी ती माची लोहगडच्या विंचू-काट्याची  किंवा राजगडच्या  सुवेळा माचीची आठवण करून देत होती.

पाण्याचे एक छोटे तळे आम्हाला रस्त्यात दिसले आणि सर्वांचीच तहान वाढली. तळ्यातील पाणी चक्क गोड होते. चवदार पाणी पिऊन आम्ही तृप्त झालो.  एकमेकांना भिजवणे , डोक्यावरून पाणी ओतणे अशी मस्ती सुद्धा झाली. अखेर आम्ही त्या ठिकाणी पोचलो, जेथे प्रबळगड कलावंतीण च्या सुळक्यापेक्षा  उंच असल्याची जाणीव होते  आणि कलावंतीणचा दिलखेचक सुळका पाहून निसर्गासमोर आपण स्वतः क्षूद्र असल्याची  सुद्धा जाणीव होते.

जोरदार घोषणा झाल्या: " प्रौढप्रताप पुरंदर  सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतंस गोब्राह्मण-प्रतिपालक विमलसरित  मुघल-दल संहारक श्रीमंत  श्रीमंत  श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय "  तशाच भारलेल्या वातावरणात " रणी फडकती  लाखो झेंडे .."  हे पद्यही म्हटले. गडाच्या या टोकावरून माथेरानचे पठार सुद्धा दृष्टीक्षेपात येते.  येथे येथेच्छ फोटो काढले हे वेगळे सांगायला नकोच.
      परत फिरून एका झाडाच्या सावलीत खास नाश्ता झाला: चकल्या , चिवडा , बाकरवडी असे खमंग पदार्थ खाऊन आम्ही गड उतरायला सुरवात केली. खाली पोचलो तोपर्यंत सागर पुरता कंटाळला होता; त्याने मॅगीची चांगली तयारी केली होती. सर्वांनाच सडकून भूक लागली होती. घरातील छोट्या रिषभला व त्याच्या बहिणीला  आमच्यातील थोडी मॅगी  देऊन  आम्ही मॅगी वर आडवा हात मारला. लिंबू सरबत प्यायले.


        फार वेळ न दवडता दोन -सव्वा दोन च्या सुमारास भूतंबरा या ठाकर कुटुंबाचा निरोप घेतला.  दादा-कनक-
सिद्धेश तरातरा  पुढे निघाले. सागरच्या गुढघ्याची काळजी घेत आम्ही इतर पाच जण हळूहळू उतरत होतो. ऊन आता चांगलेच जाणवत होते. पण गप्पांचे विषय इतके होते की उन्हाविषयी बोलेपर्यंत आम्ही खाली आलो होतो. ४ च्या सुमारास आम्ही सर्व गावातील  हनुमान मंदिरात आलो. कनक ने कोकम सरबत आणले होते. वरून भरून आणलेले पाणी गरम झाले होते.  सरबत गरम सुद्धा छान लागते हे तेव्हा प्रथमच कळले. परत जाताना रेल्वे ने जावे की  बस ने यावर कनक चे व माझे (इतरांसाठी )मनोरंजक भांडण झाले.  साडेचारच्या सुमारास आम्हाला पनवेलची गाडी मिळाली आणि वादावर पडदा पडला. तासाभरात पनवेलला पोचलो.  भेळ्या इथून मुंबईला रवाना झाला. सागरने  पुण्याला जाण्यासाठी कर्नाटकची गाडी हेरली. त्यात सर्वांना जागासुद्धा मिळाली.  गाडीत एक दारूबाज आमच्याच सीटवर बसला होता. त्यामुळे विनोदाला भलताच वाव मिळाला. पुढील सीटवर एक धमाल काका आमच्या प्रत्येक कमेंटला दाद देत होते. कनक जोक्स पासून अलिप्त राहून हिशोब करत होता. ते काम मात्र त्याने चोख पार पाडले. तरीही त्याच्या हिशोबातील एक चूक  सागरने पकडली. हायवे ने जाताना कलावंतीण - प्रबळगड चा "व्ही" आकाराचा डोंगर , नंतर लोहगड, विसापूर, ढाक या किल्ल्यांनी दर्शन दिले.


आनंदनगरला जाताना एका टमटम वाल्याबरोबर कनक चे भांडण झाले. आमच्या कडे दंड वगैरे असल्याने आणि उन्हात रापलेले आमचे चेहरे पाहून त्याने वाद वाढवला नाही आणि चूक त्याचीच होती, (हे महत्वाचे !) दोन  टमटम करून आम्ही आनंदनगरला पोचलो. ८.३० वाजता घरात ! उन्हाळ्यात सुद्धा इतका मस्त ट्रेक होऊ शकतो याचे समाधान वाटले. शाळेतल्या  ग्रुप बरोबर केलेल्या अनेक ट्रेक्सपैकी हा लक्षात राहील तो अनेक कारणांमुळे : "स्वयंभू" हे मला मिळालेले विशेषण , धारप इस्टेट मधील सुंदर खन्ना हाउस, सर्व जिव्हाळ्याच्या माणसांनी केलेली मस्करी , मनातल्या भावनांची तस्करी , मनसोक्त काढलेले फोटो , भेळेमधील दाण्यासाठी केलेली भांडणे , एकमेकांचा विचार करून जपून प्यायलेले पाणी, कलावंतीणच्या नागमोडी पायऱ्या, आव्हान देणारा कळसावरील  झेंडा , प्रबळ-गडावर म्हटलेले पद्य आणि आम्हाला अंगा-खांद्यावर खेळवून  "पुनरागमनायचं"  म्हणून सुखरूप परत पाठवणारा प्रिय  सह्याद्री!
 

सोमवार, ५ मार्च, २०१२

"स्व"

रान-फुलाचा गंध शब्द व्हावे
सभोवताली कुणी न श्रोते व्हावे

अपवाद मी, कोरडा अब्द व्हावे
उधार पाणी घेऊन मी बरसावे

निर्व्याज मनावर एका लुब्ध व्हावे
वासानंचेही गुप्त अंग शोधावे

मोहक सुमने पाहून मुग्ध व्हावे
टाळून सौरभ त्यांचा दूर व्हावे

धावता धावता आता स्तब्ध व्हावे
शांततेचे आवाज अन ऐकावे
कुणालाच काही न दाखवावे
कर्मविपाक माझे "एकजीव" व्हावे !
                        
                                      -  उन्मेष