शुक्रवार, २७ जुलै, २०१२

विसा ( VISA ) पूर : शेवटचा (?) ट्रेक !



रविवार, २२ जुलै २०१२

जुलै सुरु झाला की एक प्रसन्न आणि हिरवा सुगंध वातावरणात भरून राहतो ; सर्दी डोक्यात रुतून बसावी तसा हा वास मनात घट्ट "वास" करून राहतो. अवघ्या सृष्टीला बाळंत करून नव-चैतन्य देणारा जुलै सह्याद्रीच्या पर्वतराजीवर विशेष प्रसन्न असतो. अशा या प्रिय जुलैमध्ये पाऊस सुरु झाला की ट्रेकचा विषय निघतोच, आणि पावसाळी ट्रेक म्हटले की लोहगड हे नाव हमखास पहिले तोंडावर येते;  यंदाचा पावसाळा पूर्णपणे ENJOY करण्यासाठी मी इथे नसणार हे माहीत असल्यामुळे ज्युनिअर कॉलेज पासून जमलेल्या ग्रुप-बरोबर एक ट्रेक तरी टाकायचाच होता ! हरिश्चंद्रगड च्या ट्रेक ची आखणी तब्बल १४ दिवस आधी सुरु झाली होती. माशी कुठे शिंकली ठाऊक नाही पण बहुधा नुकताच माझा नेदरलँडचा VISA मिळाला असल्याने आमचा VISA (विसा) पूर चा ट्रेक नक्की झाला: विसापूर म्हणजे लोहगडचा जुळा भाऊ !
रविवार सकाळी साडेसहाची लोकल असल्याने पाचच्या सुमारास उठलो. ट्रेक च्या दिवशी गजर नसतानासुद्धा जाग कशी येते हे कोडे मला आजपर्यंत सुटलेले नाही. प्राजक्ताची मैत्रीण श्रद्धा मला पावणे सहा वाजता घ्यायला संतोष हॉल चौकात येणार होती; मला फक्त भाजी आणि पाणी एवढेच आणावयाचे होते; आम्ही वेळेत निघालो (उल्लेखनीय बाब ). परत येताना उशीर होणार असे संकेत आम्हाला जातानाच मिळाले . सूर्य-हॉस्पिटल जवळच्या पुलावर श्रद्धाची गाडी पंक्चर झाली. सुदैवाने लगेच रिक्षा मिळाली आणि आम्ही वेळे-अगोदर पुणे स्टेशन वर पोचलो. प्राजक्ता तिची मैत्रीण प्रतिभासोबत आमच्या आधीच आली होती. श्वेता-सागर सुद्धा मागोमाग आले. लोकल सुटायला ५ मिनिटे अवकाश असताना धनश्री आली. ठरलेले ७ जण आले. लोकल मध्ये शिरून जागा पटकावली. धनश्री DELFT  येथे जाऊन  आलेली असल्याने आणि प्रतिभा ऑस्ट्रेलियाला Ph D  साठी जाणार असल्याने लोकल मध्ये आमच्या ग्लोबल गप्पा सुरु झाल्या. कॉलेज  मधील किस्से आणि प्रोफेसर्स च्या गमती जमती सांगताना "प्रतिभा" ही सुद्धा स.प. महाविद्यालयातच होती असे कळले; तीसुद्धा आमच्याच BATCH  ची ! हा आम्हाला धक्का होता (निदान सागरला व मला तरी मोठा धक्का होता; कारण तशा BATCH च्या सर्व मुली चेहऱ्याने माहीत असतात"च" ). असो. 2-3 स्थानके झाली नसतील तोच लोकलला सिग्नल लागला ; पुढे मेगा ब्लॉक  असल्याचे कळले. एक्स्प्रेस ट्रेन्सना धावण्यास प्राधान्य असल्याने लोकल मागेच पडत होती. उशीर होणार हे निश्चित झाल्यावर ट्रेकची पुढील आखणी करण्यासाठी विचारचक्रे एक्स्प्रेसच्या वेगापेक्षा पेक्षा जोरात फिरू लागली. कामशेत ला उतरून बेडसे CAVES  ला जावे की पटकन लोहगड करून परतावे की फक्त भाजे लेणीपर्यंत जावे असे सगळे विचार करून झाले. चिंचवड पर्यंतच लोकल जाणार अशी एक आवई  सुद्धा उठली. पण त्यात काही दम नव्हता. ट्रेन मध्ये असलेल्या गन्या-बाप्या पब्लिकने आमच्या मनोरंजनाची जबाबदारी समर्थपणे पेलली होती. सिंहगड, प्रगती अशा एक्स्प्रेस गाड्या पुढे गेल्यानंतर आमच्या लोकल ला गती मिळाली. बॉरबॉन सारख्या बिस्किटांचा फडशा पाडायला एव्हाना सुरवात झाली होती. फोटो काढणे हाही एक विरंगुळा होताच. मळवली ला 8 वाजता अपेक्षित असलेली लोकल साडेनऊ ला पोचली. दीड तास लेट  असूनही आम्ही बेत बदलला नाही. झपझप पावले उचलत आम्ही गावाच्या दिशेने कूच केले. ढगाळ वातावरण होते, पण पाऊस नव्हता. दूरवर धुक्याआड (न) दिसणारी किल्ल्यांची जोडगोळी आम्हाला खुणावू लागली होती.

लोहगड-विसापूर ची जोडगोळी 


 वाटेत एका टपरी वर नाश्ता  केला. ब्रेड -बटर , पोहे आणि चहा ! भरपेट खाऊन आम्ही भाजे लेणीच्या वाटेने निघालो.
शनिवारीच किल्ल्यावर आलेली मंडळी परत चालली होती. रविवार असल्याने "पब्लिक" भरपूर होतं. चहुकडे  हिरवळच "हिरवळ" होती. लेणीकडे जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत, त्या संपेपर्यंत न चढता मधेच एक वाट  विसापूर ला जाते अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पायवाट धुंडाळण्याचा प्रयत्न चालू होता. लेणीच्या तिकीट खिडकीपर्यंत गेलो तरीहि आडवाट काही सापडली नाही. परत काही पायऱ्या खाली उतरून एक निसरडी वाट पकडली. ही वाट विसापूर ला लवकर घेऊन  जाते असे सांगण्यात आले होते. आमच्या मागोमाग अजून एक-दोन ग्रुप येऊ लागल्याने बरोबर चाललो आहोत असा (फाजील) विश्वास वाटू लागला. चढताना कुणाचाही पाय घसरला की "या वयात पाय घसरायचेच" असा "क्लेशदायक श्लेष " ऐकू येत होता. श्रीखंडाच्या गोळ्या श्वेता आणि प्रतिभा यांना वेग घेण्यासाठी चांगल्याच उपयोगी पडल्या. (बाकीच्यांनी सुद्धा तितक्याच चवीने त्या खाल्ल्या ) सुदैवाने पाऊस  नव्हता. त्यामुळे फोटो काढता येत होते ; तशी प्राजक्ताने नीट फोटो काढता यावे म्हणून छत्री आणली होती.
पण ती पिवळी धमक छत्री कॅमेरा वर धरण्या-ऐवजी, फोटो काढून घेण्यासाठीच जास्त वापरली गेली.
तास भर चढण झाल्यावर छोटेसे मैदान लागले . इथून आजूबाजूचे दृश्य पावसाळ्यातील नेहमीचेच असले तरी नवीन होते. हिरव्या रंगाला बहुधा अमर्याद छटा  असाव्यात. हिरवा सह्याद्री डोळ्यांत साठवून आम्ही  विसापूरच्या डाव्या सोंडेच्या दिशेने  जाऊ लागलो.

विसापूर किल्ल्याकडे जातानाचे एक दृश्य 

थोड्याच वेळात धबधब्याची वाट सुरु झाली. चित्रवत वाटणाऱ्या त्या धबधब्यातून वर जाताना बूट-मोजे पूर्ण भिजले. त्याहूनही जास्त आम्ही आनंदात भिजलो. आमच्या मागून येणारा ग्रुप हा अत्यंत थिल्लर मुलांचा होता. त्यांनी बहुतेक आयुष्यात प्रथमच इतका हिरवा रंग आणि धबधबा बघितला होता ; त्यामुळे ती मुले
माकडांहून विचित्र किंचाळत होती. फोटो काढायला थांबून आम्ही त्यांना वर जाऊ दिले. शेवटच्या टप्प्यात पाण्याला थोडा जोर होता मात्र येथून धबधब्याची वाट सोडायची होती. या वाटेने बराच वेळ लागला होता. थोड्या खडकाळ वाटेने वर गेलो.

खडकाळ वाट 


  येथे मारुतीचे मंदीर लागले. बाहेर अश्वाचा पुतळा होता. या पुतळ्यापासून साधारण पन्नास  मोठ्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण गड-माथ्यावर पोचतो. गडावर अनेक तलाव तुडुंब भरलेले दिसत होते. जणू वरूणाची कृपा प्राप्त होऊन ते "भरून" पावले होते. किल्ल्यावर काही पडके वाडे , जुन्या वास्तूंचे अवशेष दिसत होते.  अजूनही पाऊस  पडत नसल्याने फोटोग्राफी ला ऊत  आला होता.

हिरवे कंच पठार, विसापूर 


माथ्यावरील पठारावर फिरताना श्वेताचा  पाय लचकला; श्रद्धाकडे कुठला तरी EASY  स्प्रे असल्याने काम EASY झाले. रेंज आल्याने मुलींनी घरी फोन करून घेतले. मी फोन स्वीच ऑफ करून सृष्टीच्या सोहळ्यात संमीलित झालो. काही वेळाने आमची पावले आपोआप फोटोजेनिक वाड्याकडे वळली.

यथाशक्ती, यथामती फोटो काढून झाल्यावर पोटात काहीतरी ढकलावे म्हणून वाड्या बाहेरच सांडलो. बटाट्याची भाजी, पोळ्या , छोले, दही-भात, तळलेल्या मिरच्या असा मेनू होता. हास्य-विनोद करत जेवण झाले तेव्हा  4 वाजत आले होते. आता खाली जाताना गाय-खिंडीतून जायचे असे आम्ही ठरवले होते. विसापूर ला लांबच लांब आणि प्रेक्षणीय तटबंदी लाभली आहे.

विसापूरची प्रेक्षणीय तटबंदी 


या तटबंदीच्या कडेकडेने चालत गेल्यास गाय-खिंडीकडे जाणारी पायवाट लागते असे प्राजक्ता  आणि  सागरने पूर्वानुभवावरून सांगितले. तटबंदी च्या कडेने चालण्यास सुरवात केली ; पाऊस  पडू लागला होता. सोबत वारा सुद्धा जोरात वाहत होता. काही ठिकाणी तर तटबंदीच्या खालून धबधब्याचे पाणी उलट्या दिशेने, म्हणजे वर उडत होते. तटबंदी पूर्ण फिरून सुद्धा रस्ता सापडला नाही. किल्ल्यावर आलेल्या इतर मंडळींना विचारत विचारत  अखेर आम्हाला एक टेकडी चढून बरोब्बर विरुद्ध दिशेला वाट दिसली. दिसायला ही वाट भयावह होती. धबधब्यातून आता खाली उतरायचे होते. जीव मुठीत धरून आणि हात हातात धरून आम्ही खाली उतरू लागलो. एकमेकांना मदत करत निवांतपणे  धबधबा उतरलो.  सपाट पायवाट आली तेव्हा, फलाहार केला. सफरचंद आणि पेअर फळे खाऊन अधिक ताजेतवाने झालो (आधीच धबधब्यातून खाली आल्यामुळे तरतरीत होतोच) या
पायवाटेने भरभर गेल्यास 20 मिनिटे लागतील आणि आपण साडे-पाचची लोकल पकडू शकू असे प्राजक्ताला वाटले; सागर व मी मात्र साडे-सहा ची लोकल सुद्धा मिळेल की नाही याबाबत साशंक होतो, अंतर खूप आहे याची आम्हाला पुरेपूर कल्पना होती. अजून गाय-खिंड, नंतर भाजे लेणी येईपर्यंत 2 डोंगर, नंतर गावात जायची वाट, आणि मग गावातून मळवली स्टेशन ! बराच मोठा पल्ला गाठायचा होता. चिखल तुडवत , गाणी म्हणत- ऐकत, वाटेतील धबधबे आणि ओघाने येणारी ओंगळ गर्दी चुकवत आम्ही हा टप्पा पूर्ण केला. साडे सहाची लोकल थोडक्यात चुकली. 7:09 ची लोकल येण्यास अवकाश असल्याने स्टेशन जवळच चहा-केक, खाकरे ,फळे असा नाश्ता केला. पाय आता बोलायला लागले होते. लोकल वेळेवर आली. पाचही मुली लेडीज डब्यात गेल्या. मी व सागर ने उभे राहण्यास जागा मिळवली. या लोकल ला फारसे सिग्नल मिळाले नाहीत आणि गाडीने वेग सुद्धा चांगला घेतला होता. श्रद्धा, प्राजक्ता व मी शिवाजीनगर ला उतरलो. श्वेताची सॅक सकाळपासून मी घेतली असल्याने ती देण्यासाठी श्वेताला शोधू लागलो. ती डब्यातून उतरली नाही . प्राजक्ताने व मी पळत पळत तिला सॅक पोचवण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत मी गुडघ्यावर आपटलो. पूर्ण दिवसभर ट्रेकमध्ये पडलो नव्हतो ती उणीव खरचटून (भरून नव्हे) निघाली.

दोन वेगळ्या वाटांनी गड काबीज केला होता. त्याचे समाधान होते.  एक पावसाळी हिरवा दिवस मित्रांसमवेत मस्त गेला होता. "सह्याद्रीची हिरवाई डोळ्यांना निववते ; आंतरिक शांती देते" याचा पुनः प्रत्यय आला.
पुन्हा या सह्याद्रीच्या कुशीत कधी शिरता येईल माहीत नाही. पुन्हा कॉलेजच्या मित्रांबरोबर कधी जाता येईल कुणास ठाउक ..  उगाच काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते.  विसापूर हा किल्ला तसा चुकण्यासाठीच प्रसिद्ध आहे. हे मनोमन पटले होते.
ग्रुप :  उन्मेष, प्रतिभा, सागर, श्वेता, श्रद्धा, धनश्री


आयोजक : प्रतिभा, प्राजक्ता, धनश्री, श्रद्धा 

बुधवार, ४ जुलै, २०१२

चावंड: प्र स न्न ( करणारा ) गड


शनिवार २३ जून २०१२

जुन्नर भागातील अनेक प्रेक्षणीय किल्ल्यांपैकी एक म्हणजे "चावंड". "असले कसले विचित्र नाव" किंवा "तू नवीन किल्ले शोधून काढतोस" ,  "तू मनाची नावे देतोस" अशा खोचक टिप्पणी करणाऱ्यांसाठी हा श्लोक :  
चामुंडा अपभ्रंशे चावंड | जयावरी सप्तकुंड || गिरी ते खोदुनी अश्मखंड | प्रसन्नगडा  मार्ग निर्मिला ||

स्पष्टीकरण:                                                                                                                  हे नाव "चामुंडा" या देवीच्या नावाचा अपभ्रंश असून , प्रसन्नगड हे त्याचे दुसरे नाव आहे.  सप्तकुंडचे स्पष्टीकरण पुढे ओघाने येईलच.  तर, अशा या किल्ल्यावर जाण्याची गेली अनेक वर्षे इच्छा होती. २००६ ला हडसर-जीवधन-नाणेघाट-  ट्रेक केला तेव्हा 'चावंड'ला प्रदक्षिणा घातली होती. तसेच २००८ साली दुर्ग-ढाकोबा च्या ट्रेक च्यावेळी तोंडात घातलेला घास कोणीतरी  घशातून काढून घ्यावा त्याप्रमाणे किल्ल्यापासून २  किलोमीटर वर असताना पावसाने आमचा बेत हाणून पाडला होता. त्यानंतर जुन्नर भागातला हा एकटाच किल्ला बघायचा राहिल्याने आवर्जून १ दिवसाचा ट्रेक करणे आवश्यक होते...२०१२ च्या जून मध्ये तशी संधी साधली. 

       पाऊस नुकताच सुरु होत होता. आर्द्रा नक्षत्र लागले होते, तरीहि म्हणावा तसा पावसाचा जोर वाटत नव्हता. त्यामुळे १ दिवसाच्या ट्रेकच्या योजनेला उदंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. पण रास्त अपेक्षा ठेवूनसुद्धा न पडलेल्या पावसाप्रमाणे नेहमीचे मावळे किल्ल्यावर न येताच "पडले". मी व  सिद्धार्थ बिनीवाले असे दोघेच उरलो. सिद्धार्थने त्याची बाईक काढली  व २३ तारखेला पहाटे ६ वाजता आम्ही निघालो.

       वाहतूक अगदीच तुरळक असल्याने वाऱ्याप्रमाणे भर्राट निघालो.  मुंबई-पुणे महामार्गावर पोचल्यावर तर  "VEGA (वेगा)" चे  हेल्मेट घातल्याप्रमाणे आम्ही वेग घेतला. राजगुरुनगर सोडल्यानंतर एका झकास टपरीवर फक्कड चहा घेतला. ढगाळ वातावरण असले तरी पाऊस नसल्याने बाईकवरून जाण्यात मजा होती. ८ च्या सुमारास जुन्नर गाठले. दाऱ्या घाटाकडे जाणारा रस्ता पकडला.हाच रस्ता पुढे जीवधन, नाणेघाटाकडे  घेऊन  जातो.  जसजसे चावंडच्या जवळ जात होतो तसतसा रस्ता खराब होत चालला होता आणि निसर्ग अधिकाधिक मनमोहक ! आपटाळे गाव सोडले आणि ढग अचानक दाटून आले; अवघे वातावरण आल्हाददायक झाले.  विचारत विचारत आम्ही पावणे नऊ वाजता चावंड-वाडीत पोचलो. पायथ्यापासून पाहिल्यास बुटका वाटणारा  हा किल्ला समुद्र सपाटीपासून ३४०० फूट उंच आहे. गावातील शाळेसमोर गाडी लावून आम्ही एका पारावर थोडा वेळ बसलो. आजूबाजूचे फोटो काढले.
        वर जाण्यास पंधरा मिनिटे पुरतील असे वाटून झपझप पायवाटेने जाण्यास सुरवात केली. सिद्धार्थ भूगर्भ-शास्त्रज्ञ (GEOLOGIST ) , पर्यावरण-वादी,  वनस्पती-शास्त्रज्ञ  वगैरे असल्याने वाटेतील प्रत्येक झाडांनाच नव्हे तर दगडांना सुद्धा नाव मिळत होते; ज्ञानात भर पडती आहे असे तेव्हा वाटून गेले पण त्यातील एकसुद्धा नाव आत्ता आठवत नाहीये. असो. एके ठिकाणी जेथे वाटेला दोन फाटे फुटत होते, तेथून चुकीचे वळण घेतले. (वाट चुकली नाही तर तो ट्रेक कसला ! )  खालून आमची गम्मत बघत असणाऱ्या  गावकऱ्याने आम्हाला "मार्ग"दर्शन केले.  योग्य वाटेवर आल्यानंतरसुद्धा  त्याचे "पुढे चला, पुढे चला " चालूच होते. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढे गेलो.  
            माथ्यावर जाण्यासाठी एक अवघड टप्पा पार करावा लागतो: खडकातील पायऱ्या ! त्याला कडेने रेलिंग व दुसऱ्या बाजूने बोल्ट्स लावून तार ठोकलेल्या असल्याने भीतीचे कारण नव्हते. या स्पॉट वर फोटो-सेशन करून आणि  तरीहि सावधपणे वर चढलो. या रॉक पॅच नंतर ४०-५०  उंच पायऱ्यांनी  आम्हाला दमवले. आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वारात पोचलो होतो. दरवाजावर गणपतीची कोरीव मूर्ती आहे. बेसाल्ट  खडकाच्या उंच भिंतीमुळे दरवाजासामोरचा  भाग आकर्षक झाला आहे. दारातून दहा पायऱ्या चढून वर गेल्यावर दोन वाटा लागतात. उजवीकडे जाणारी वाट  उध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते तर डावीकडची वाट तटबंदीला समांतर जाते. गडावर अभ्यासासाठी भरपूर गोष्टी आहेत. अनेक प्राचीन अवशेष,  वनस्पती-कीटक वैविध्य, रंगी-बेरंगी पक्षी -  इतिहास, भूगोल, निसर्ग-शास्त्र आवडणाऱ्यांनी सहज रमून जावे असा किल्ल्याचा माथा आहे. मी यापैकी एकही नव्हतो , तरीहि डोंगरवेडा म्हणून तेथे रमून गेलो. वाटेत एक जुना चौथरा, शेजारी उखळ दिसले. त्या मोठ्ठ्या दगडी उखळीला "भीमाची वाटी" वगैरे उपमा देऊन झाल्या.  तटबंदीच्या बाजूने चालत असताना गडाचा घेरा बराच विस्तीर्ण असल्याचे लक्षात आले. पाण्याची टाकी अधून-मधून न चुकता दिसत होती. ससाणा हा पक्षी जणू प्रत्येक किल्ल्या"वर" गस्त घालण्यासाठीच जन्माला आला आहे असे वाटून गेले. त्याचे दर्शन कोणत्याही किल्ल्यांवर अगदी सहज होते.. यावेळी मात्र त्याची जात सुद्धा समजली (क्रेडिट्स: सिद्धार्थ , नाव अर्थातच मला आठवत नाहीये; पण कसलासा  "हेडेड फाल्कन" होता म्हणे )  किल्ल्यावर एक मंदिराप्रमाणे भासणारी एक उद्ध्वस्त वास्तू आहे. त्याच्या कोनाड्यांमध्ये गणपतीची मूर्ती दिसते. समोरच एक एके काळी सुंदर असावा असे वाटायला लावणारा तलाव आहे.  त्या उध्वस्त अवशेषांमध्ये लिलीसारख्या फुलांचा एक छानसा ताटवा डोळ्यांना मोहवून गेला.  येथून आम्ही मोर्चा वळवला तो किल्ल्यावरील टेकडीकडे जेथे चामुंडा देवीचे मंदीर नव्याने बांधले आहे. तेथपर्यंत जाण्यासाठी आम्ही नवीन वाट तयार केली.  या आडवाटेत एक सुंदर गोम दिसली. तिचे फोटो काढण्यात वेळ घालवला. मंदिरापासून किल्ल्याचे विस्तृत दृश्य (PANORAMIC VIEW )  मोठे रमणीय दिसत होते. मंदिरासमोर नंदी आहे; ही गोष्ट थोडी कोड्यात टाकणारी वाटते.; कारण शंकराची पिंड कुठेच दिसली नाही. टेकडीवरील या मंदिरातून खाली उतरताना बरोबर पाय-वाटेने खाली आलो. गडाच्या वायव्य भागात एकमेकांना लागून अशी ७ टाकी आहेत; ही ७ मातृकांशी निगडीत आहेत: ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा ! सुरवातीला आलेल्या श्लोकातील सप्तकुंड म्हणजे हीच सात मातृके. यापैकी चामुंडा सर्व-श्रेष्ठ समजली जाते. देवीचे हे रूप जसे क्रूर मानले जाते; तसाच या किल्ल्याचा एके काळचा लौकिक असावा. किल्ल्याचे ईशान्येकडील बेलाग कडे व तेथी नसलेली तटबंदी पाहून याची खात्री पटते; म्हणूनच बहादूरशहा निजामाला येथे कैदेत ठेवण्यात आले होते.
               किल्ला बघण्यास फार वेळ लागला नाही; आजूबाजूला असलेल्या सह्य- रांगांपैकी  फक्त जीवधन ओळखता आला. एव्हाना १२ वाजत आले होते. जेवण करण्यासाठी आम्ही पुन्हा मुख्य दरवाजापाशी आलो.  जेवणाबरोबरच गप्पांची शिदोरीसुद्धा सुटली. तासभर मजेत गेला.  किल्ल्यावर करण्यासारखे आता काहीच नसल्याने लगेच खाली उतरलो.  गावातील मुलांचा VOLLEYBALL  चा खेळ बघितला आणि ५ मिनिटे पारावरील गावकऱ्यांच्या शिळोप्याच्या गप्पा ऐकून बाईक काढली. जाताना कैरीचे झाड दिसले आणि कैऱ्या पाडण्याचा मोह झाला. तेथे थांबून यशस्वीपणे २ कैऱ्या पदरात "पाडून घेतल्या".
परत जाताना वेळ काढण्यासाठी अवसरी घाटाच्या "वन-उद्यानाला" भेट दिली. तेथे कसले तरी पुलाचे काम चालू असल्याने उद्यान बंद होतेअसे कळले.  सिद्धार्थ येथे पूर्वी शाळेबरोबर येऊन गेला असल्याने त्याने तेथील प्राणी-संवर्धन केंद्राची  जुजबी माहिती दिली. पण त्या वेळी  तेथे फक्त मनुष्य-प्राणीच असल्याने आम्हाला घराचा रस्ता धरावा लागला. ४ वाजता आम्ही पुण्यात परत आलो होतो.  अक्षरशः हाफ-डे ट्रेक करून आम्ही पुन्हा संध्याकाळचे बेत आखण्यास "गुडलक" मध्ये हजर होतो.
                 काय मिळाले या अर्ध्या दिवसात ? सिद्धार्थच्या मते आपण खऱ्या अर्थाने जगतो ते यासाठी : आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी ! सोमवार-शुक्रवार चे रुटीन  पोटासाठी काय काय करावे लागते ते शिकवते पण निसर्गात रमवणाऱ्या  ट्रेक सारखी एखादी गोष्ट आपल्याला का जगायचे ते सांगून जाते.