Tuesday, February 26, 2013

हिमा !

हिमा, तुला पावसाची सर नाही रे
पांढरा शुभ्र असलास तरी बरं नाही रे

हलके हलके सहज तू रंग सगळे चोरलेस
चांदणे रातीचे दिवसा इथे पेरलेस
पण तरीसुद्धा खिडकी माझी धूसर नाही रे
हिमा, तुला पावसाची सर नाही रे...

गोठवतोस तू अंग आणि आटवतोस  तू पाणी
आठवतोस तू मोसमातील नाताळाची गाणी
पण, थरथर, चिंब, ओली माती असं काहीच नाही रे
हिमा, तुला पावसाची सर नाही रे...

इंद्रधनुष्य नाही , अशी  अभ्रांची ही दाटी
पांढरपेशा जगात तुझ्या हिरवाईशी कट्टी
क्षणभंगुर रूप  तुझे , होणार तुझे पाणी
तुझ्याकडे फारसा अवसर नाही रे
हिमा, तुला पावसाची सर नाही रे...

                                         -उन्मेष