Sunday, August 4, 2013

योसेमिटी नॅशनल पार्क: एक संस्मरणीय अनुभव


सीअॅटल ला (Seattle) समर इंटर्नशिपच्या निमित्ताने आल्यानंतर कॅलिफोर्नियाला भेट देणे क्रमप्राप्त होते. सॅन फ्रान्सिस्को बे एरिया मध्ये राहणाऱ्या मित्रांना भेटणे आणि शनिवार-रविवार योसेमिटीची ट्रीप असा छोटेखानी बेत आखला होता. १८ जुलैच्या गुरुवारी सीअॅटल ताकोमा ते सॅन होजे अशा फ्लाईट ने रात्री ८ च्या सुमारास  सॅन होजे मध्ये पोचलो. हर्षल मला घ्यायला आला होता. त्याने रात्री सॅन फ्रान्सिस्को ची ट्रीप आयोजित केली होती. पिझ्झा खाऊन (म्हणजे जेवून नव्हे) आम्ही एक ZipCar रेंट करून साडे अकरा च्या सुमारास निघालो:  हर्षल, त्याचे मित्र हर्षद-नंदू आणि ऋषिकेश व मी असे पाच जण होतो. Twin Peaks, Golden Gate Bridge , Bay Bridge, Crooked Street, Pier ३९ ही सर्व प्रेक्षणीय स्थळे रात्रीच्या अंधारात पाहिली (?) सॅन फ्रान्सिस्को मध्ये वारा जरी अपेक्षित असला तरीहि बोचरी थंडी अनपेक्षित होती. भरीस भर म्हणून रस्त्यावर धुके सुद्धा वाहतुकीचा एक भाग झाले होते.  काढत असेलेले सर्व फोटो फिके करण्याचे काम धुक्याने चोख बजावले.  सॅन फ्रान्सिस्को मध्ये भटकी कुत्री नसून भटके रकून आहेत असे एकंदरीत जाणवले. (रकून म्हणजे उत्तर अमेरिकेत आढळणारा लांब शेपटीचा व अंगावर दाट केस असलेला मांसभक्षक प्राणी) टेकड्यांच्या भागात त्यांचा (विशेषतः रात्री च्या वेळी ) मुक्त संचार असतो. Golden Gate Bridge बघत असताना एक रकून  आमच्याकडे वाकून बघत असल्याचे हर्षदच्या लक्षात आले . रकून चावल्यास रेबीज चा धोका असतो असे हर्षलने सांगितल्याने रकून ला जवळून पाहण्याचा मोह मी आवरला.रात्रीचे सॅन फ्रान्सिस्को-डाउन-टाउन बघून सॅन होजे डाउन-टाउनमध्ये आम्ही परतलो तेव्हा सकाळचे सहा वाजले होते !

१९ जुलै चा शुक्रवार (रमणबागीय) मित्रांना भेटण्याचा (आणि खाण्याचा) होता : दुपारी अभिनव बरोबर "Yahoo" मध्ये भारतीय लग्नाचे जेवण (रसमलाई , गुलाबजाम "वगैरे" ),  संध्याकाळी रणजित मांगडे याच्या बरोबर वडा-पाव आणि रात्री अमित साबणे , चिन्मय आपटे , गौरव रायरीकर , विक्रम भिडे यांच्या बरोबर दक्षिण भारतीय जेवण ! पोटाची "सत्व"-परीक्षा बघण्यात मी कोणतीही कसूर केली नाही. विक्रम, त्याचे आई बाबा आणि मी गौरव कडे रात्रीचा मुक्काम करणार होतो  कारण दुसऱ्या दिवशी योसेमिटी साठी लवकर निघायचे होते.


 (यशोमती/योसेमिटी )
शनिवार २० जुलै २०१३: 

साडे आठ वाजता निघायचे असे ठरले होते , प्रत्यक्षात नाश्ता करून निघेपर्यंत आम्हाला साडे दहा वाजले. विक्रम -गौरव हे आमचे चालक होते. दोघांचेही पालक आणि मी असे पाच जण गाडीमध्ये मागे सामावलो. गाडी सुरु झाली तशी गाणी सुद्धा सुरु झाली . अगोदर MP३ प्लेयर आणि नंतर सर्वांचे माउथ "ऑर्गन"… विशेषतः मि. रायरीकर आपल्या सुरेल गाण्यांनी आम्हाला मैफिलीचा फील देत होते. ते एकटेच गाणी गात होते , बाकी आम्ही सर्व गाणी म्हणत होतो .
वाटेत एका Subway (म्हणजे बोगदा नव्हे तर अमेरिकन फास्ट फूड Restaurant ची चेन) ला Sandwich खाण्यासाठी थांबलो , तेथे सत्यजीत भिडे आणि त्याचे पालक आमची वाटच पाहत होते. फास्ट फूड झटपट फस्त करून आम्ही येसोमिटीच्या दिशेने पावले (गियर ) टाकू लागलो.
भिडे आणि रायरीकर कुटुंबीय रसिक होते आणि त्यांची साहित्याची रुची गप्पांमधून प्रकट होत होती. भिडे यांनी
सांगितलेल्या अनेक रंजक गोष्टी आणि काही मनाला "भिड"णाऱ्या सत्य कथा प्रवासाला वेगळेच वळण देत होत्या.
तीन - साडे तीन च्या सुमारास आम्ही योसेमिटी पार्क मध्ये पश्चिम द्वारातून प्रवेश केला.  प्रवेश द्वाराजवळ एक नकाशा मिळाला . काय काय बघायचे त्याचे planning (आधी जाऊन आलेल्या ) गौरव-विक्रम-सत्यजीत यांनी केले.  मि. भिडे यांनी आणलेल्या योसेमिटी च्या पुस्तकातून योसेमिटी चा थोडक्यात इतिहास चाळला :

योसेमिटी दरीमध्ये ३००० वर्षांपासून मनुष्य वस्ती आहे. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावण्यापूर्वी आणि योसेमिटी  मध्ये पहिले गोरे पाऊल पडण्यापूर्वी सुद्धा तेथे काही भटक्या जमाती राहत होत्या. आहवाहनीची (Ahwahneechee) ही त्यातील प्रमुख जमात, Native Americans  किंवा अमेरिकेच्या  स्थानिक लोकांपैकी हे एक ! "मिवोक" (Miwok ) ही अशीच दुसरी एक जमात.  त्यांच्यामध्ये होणाऱ्या  टोळी-युद्धांत आहवाहनीची लोकांची हिंसकता मिवोक लोकांना घाबरवून सोडत असे. मिवोक शब्द " योह्हे मिटी " म्हणजे : "ते मारेकरी आहेत" (they are killers) ! हा शब्द गोऱ्या लोकांना कळाला कसा आणि त्याचा अपभ्रंश झाला कसा , याचीपण एक छोटीशी गोष्ट आहे:

१८४८ साली कॅलिफोर्निया Gold Rush मध्ये अनेक गोऱ्या लोकांनी योसेमिटी  मध्ये अतिक्रमण केले. सोन्याच्या शोधार्थ Sierra Nevada ची डोंगर रांग  भटक्या आणि लालची लोकांनी प्रदूषित झाली. याच डोंगर रांगेत योसेमिटी दरी "मोडते" !  पोटात सोने दडवलेल्या इथल्या जमिनीवर वर्षानुवर्षे ही लोकं राहत होती , त्यांच्या मायभूमीवर हे परके लोक आल्यानंतर त्यांच्यात युध्दाची आग पेटवण्यासाठी खाणीची ठिणगी पुरेशी होती. काही गरीब आहवाहनीची लोकांना तर खाण कामगार म्हणून राबवण्यास गोऱ्या लोकांनी मागे -पुढे पाहिले नाही.  सोने खणण्यासाठी आलेल्या लोकांबरोबर झालेल्या चकमकीत आहवाहनीची लोकांनी काही गोरे लोक मारले.
अमेरिकेने मग "मारीपोसा" नावाची बटालियन Jim  Savage च्या नेतृत्वाखाली (Savage  म्हणजे खरं  तर रानटी! ) योसेमिटी- कामगिरी वर पाठवली. त्यांच्यात लाफेयात बुनेल हा अमेरिकी सर्जन (Surgeon )होता. तो खरोखरीच "सर्जन"शील होता . योसेमिटीमध्ये असताना तो अनेक वेळा आहवाहनीची लोकांच्या गट प्रमुखाला , तेनया (Tenaya)ला भेटला. त्याच्याशी झालेल्या मुलाखती "योसेमिटी" या नावाला आणि स्थानाला जन्म देऊन गेल्या. लाफेयात बुनेल याला योसेमिटी  दरी शोधणे  आणि योसेमिटी ला तिचे नाव देणे यांचे श्रेय दिले जाते. 
पार्क म्हणून जी काही संकल्पना माझ्या मनात होती त्याला न्याय देणारी फक्त झाडेच दिसत होती , ती सुद्धा साधारणच दिसत होती. गौरवच्या म्हणण्या प्रमाणे डोंगर माथ्यावर गेल्या नंतरच योसेमिटी तिच्या दर्शकांना आश्चर्याचा सुखद धक्का देते; आम्ही प्रचंड अपेक्षांसह तिओगा पास (नावाच्या रस्त्याने ) ने योसेमिटी मध्ये फिरावयास प्रारंभ केला. घाट रस्त्याने   आम्हाला ९९०० फुटांवर आणले आणि एक अभूतपूर्व असा देखावा आमच्या समोर सादर झाला.  
ग्रानाईट पासून बनलेले पांढुरके राखाडी डोंगर - आपल्या घाटदार सौंदर्याने कुणालाही मोहात पाडू शकतील असे होते. त्या मोहक निसर्गात मनसोक्त फोटो काढण्यासाठी आम्ही दरीत उतरलो . पालकांचा उत्साह आम्हा मुलांपेक्षा ओसंडून वाहत होता. शक्य ते खडक आणि शक्य तितकी झाडे पादाक्रांत करता येतील , या दृष्टीने त्यांची चढाई सुरु होती. गौरव, विक्रम आणि सत्यजीत कंटाळा न करता आई-बाबांचे फोटो घेत होते.  पालकांच्या डोळ्यांतील मुलांबद्दल चे कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते .
भिडे -रायरीकर -भिडे कुटुंबीय योसेमिटी हे एक नॅशनल पार्क म्हणून खूपच मोठे आहे , तसाच त्याचा महिमा सुद्धा ! ३०८० स्वेअर कि.मी. इतका प्रचंड विस्तार असलेल्या ह्या पार्कला माझ्या मते स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करता येऊ शकेल.  संपूर्ण पार्क बघायला बहुधा एक महिना लागेल. एकदा इथे यावे ते फक्त काय पहायचे त्याचे planning करण्यासाठी !


सर्व प्रथम आम्ही थांबलो तो होता  "ओल्म्स्तेड" (Olmsted) पॉईन्ट! Frederick Law Olmsted  या Landscape architect चे नाव याला दिले आहे. ओल्म्स्तेड हा अमेरिकन  भूभाग रचनांचा (landscape) जनक मानला जातो. त्याने योसेमिटी मधील प्राणीजीवन आणि नैसर्गिक देखावे यावर लिहिलेले अभ्यासपूर्ण लेख हे 
या नॅशनल पार्क चे उत्कृष्ठ प्रबंध मानले जातात.
ओल्म्स्तेड पॉईन्ट हून जुलै महिन्यात दिसणारे एक दृश्य

या पॉईन्ट नंतर वाटेत जागोजागी अनेक पॉईन्टस दिसत होते , मात्र आम्ही त्यांना गाडीतूनच रामराम केला, आणि थेट थांबलो ते  तेनाया (तनया ?) लेक (lake) पाशी ! आहवाहनीची लोकांचा नेता "तेनाया" याचे नाव या तलावाला दिले गेले आहे. हिमनद्यांच्या भूगर्भीय हालचालींतून तलावाचा तळ तयार झाला आहे त्यामुळे सभोवती पांढरे डोंगर जणू या तलावाला आपल्या उदरात घेऊन बसले आहेत असे वाटते. एक Alpine (अल्पाईन :म्हणजे समुद्रसपाटी पासून ५००० फुटापेक्षा अधिक उंचीवर असणारे तलाव ) लेक असल्याने अतिशय स्वच्छ पाणी आणि त्यात प्रतिबिंबित झालेली योसेमिटी ची वनराई, पाहत राहावे असा तलाव होता :
तेनाया लेक (योसेमिटी)

तिओगा पास रस्त्याने या लेक ला वळसा घातला की  टुओलुम्ने (Tuolumne) Meadow नावाचे विस्तृत कुरण नजरेस पडते (किंवा नजरेत भरते असे म्हणणे जास्त बरोबर होईल ) टुओलुम्ने (Tuolumne) हा ताल्मालाम्ने  (Talmalamne) या मिवोक शब्दाचा अपभ्रंश असून त्याचा अर्थ दगडांची राई / दगडी घरात राहणारे असा होतो.

टुओलुम्ने Meadow (कुरण)
या कुरणात हरणे दिसावीत अशी अपेक्षा होती , मात्र आम्हाला प्राणी म्हणून एका करड्या खारीने बिळातून बाहेर येऊन दर्शन दिले. 
कुरण बघून पुढे निघालो तशी शनिवारची संध्याकाळ सरू लागली होती. कातरवेळ आणि जुनी हिंदी गाणी एका वेगळ्याच वातावरणात घेऊन  गेल्या. आकाशातील नारिंगी-गुलाबी  रंगसंगती गाडीची गती कमी करत होत्या, हळूहळू गाडीत गप्पांनाही  रंग भरत होते. डोंगर उतरून आता आम्ही Wawona (वावोना) रस्त्याने योसेमिटीच्या दक्षिण-प्रवेशद्वाराकडे  कूच केले.  हा नवा रस्ता असला तरी गाडीत कोट्यांची वानवा नव्हती. सूचक टिप्पणी करून गाडी हसती ठेवण्याचे काम सर्व जण आपापल्या परीने करत होते.

   America 's Best Value Inn हॉटेल मध्ये उतरण्यापूर्वी वाटेत एका उपहारगृहात भुकेचा अपहार केला. तेथील वेट्रेस खूप हसून गोड बोलत असल्याने सर्वांना (मुलांपेक्षा पालकांना जास्त) आवडल्या ! अर्थात त्यांना हवी तशी टीप मिळाली हे सांगायला नकोच ! रूम वर पोचेपर्यंत आम्हाला बारा वाजून गेले होते. सातचा गजर लावून झोपलो. 

रविवार २१ जुलै २०१३:
उठायला अपेक्षित उशीर झाला. सर्वांचा नाश्ता होईपर्यंत नऊ  वाजून गेले. मिळमिळीत ब्रेड आणि बटर खाण्यापेक्षा  (ज्यूस आणि कॉफी ) पिण्यावर सर्वांनी भर दिला.  गाडीत गॅस भरून पुन्हा योसेमिटीमधील उर्वरित प्रमुख आकर्षणे पाहण्यास निघालो.

Glacier पॉईन्ट  हे आमचे पहिले लक्ष्य होते. या ठिकाणी एक छोटे हॉटेल आणि छोटीशी टेकडी आहे. पोटपूजा करून आम्ही त्या टेकडीवर गेलो आणि स्तिमित झालो: 
अनेक युगे हिमनद्या अंगावर खेळवलेले ते करडे डोंगर एखाद्या ध्यानस्थ मुनी प्रमाणे भासत होते. हिमनद्यांमुळे झालेले वैशिट्यपूर्ण क्षरण सुरकुत्यांचा आभास निर्माण करत होते. 
हाफ डोम (Glacier Point हून )

योसेमिटी मधील सर्वोत्तम विहंगम दृश्ये दाखवणारा पॉईन्ट म्हणून Glacier पॉईन्ट प्रसिद्ध आहे. येथून हाफ डोम आणि योसेमिटी दरीचा सुंदर देखावा दिसतो.  हाफ डोम म्हणजे अनेक हजार वर्षांपूर्वी हिमनद्यांमुळे कापले गेलेले अर्ध गोलाकार शिखर आहे ! काहीतरी अद्भुत आणि भव्य दिव्य पहिल्याचा आनंद Glacier पॉईन्ट देऊन जातो.
वाटेत अजून एक दोन ठिकाणी Viewpoints होते म्हणून थांबलो, पण इतर पर्यटकांशी सुसंवाद साधणे यापलीकडे त्या ठिकाणी थांबण्यात फारसा काही "पॉईन्ट" नव्हता. आम्हाला एक गुजराथी , एक डच आणि एक जपानी अशी कुटुंबे भेटली. बहुधा अमेरिकन कमी इतर देशांचीच मंडळी त्या दिवशी जास्त होती !

Glacier पॉईन्ट नंतर चे आकर्षण होते U -shaped valley  ! नावाप्रमाणे U आकाराची ही दरी हिमनद्यांमुळे या आकारास आली आहे. फोटो काढण्यासाठी येथे पर्यटकांची झुंबड उडाली होती. गौरवने आणलेल्या Tripod चा अखेर या ठिकाणी फोटो काढण्यासाठी उपयोग केला.
U-shaped valley


नंतर आम्ही योसेमिटी दरीमध्ये उतरलो (गाडीने) ! आणि  Visitor center ला भेट दिली. त्या वाटेत एक हरीण दिसले. त्याचे कुणालाच फारसे कौतुक नसावे किंवा गवतात शांतपणे चरणाऱ्या त्याला फारसे कुणी पहिले नसावे.  दरीमध्ये बरीच गर्दी जाणवत होती. पार्किंग साठी आम्हाला विशेष वेळ द्यावा लागला.   बहुतेकांना स्मरणिका (Souvenirs ) खरेदी करावयाच्या होत्या. येथील जंगलात दिसणाऱ्या अस्वलाचा त्या Visitor center च्या माॅल मध्ये चांगलाच प्रभाव दिसत होता. टोप्या, बाटल्या , कप , मग , टी शर्ट  जिथे तिथे नुसते अस्वलच  ! (नाईलाजाने) मी एक अस्वल असणारा (म्हणेज अस्वलाचे चित्र असणारा) टी शर्ट घेतला. तेथे जवळच आम्ही जेवण घेतले. माॅलच्या मागील बाजूच्या आवारात आम्ही बसलो होतो, मांजरी फिराव्यात त्याप्रमाणे पायांमधून खारी धावत होत्या. चांगले-चुंगले खाऊन माजलेल्या त्या खारी चांगल्याच जाडजूड होत्या. पर्यटकसुद्धा सूचना फलकांना न जुमानता त्यांना खायला  देत होते. वन्य प्राण्यांना आपल्या अन्नाची सवय लावत होते.

जेवून झाल्यावर आम्ही El Capitan या प्रसिद्ध डोंगराच्या पायथ्या कडे चालत निघालो. स्पॅनिश मध्ये El Capitan म्हणजे "The Chief " (मुख्य ) . मिवोक लोकांमध्ये पर्वत-राजा किंवा गटाचा प्रमुख यासाठी "To-to-kon oo-lah" ही संज्ञा वापरात  होती , तिचेच स्पॅनिश भाषांतर म्हणजे El Capitan . ३००० फुट उंचीचा हा सरळसोट कडा प्रस्तरारोहण करणाऱ्यांसाठी "मोठेच" आकर्षण आहे. आम्ही या कड्याला लांबूनच दंडवत घातला:
EL Capitan च्या समोर


EL Capitan

हा पर्वत -राज आमच्या ट्रीप चा अंतिम टप्पा ठरला. साडे सहाच्या सुमारास आम्ही "योसेमिटी"चा निरोप घेतला. पार्क च्या बाहेर येईपर्यंत पुन्हा पुन्हा ते करडे डोंगर करड्या नजरेने आमच्याकडे पाहत होते. बहुतेक ते आम्हाला "पुनरागमनायच!" असं म्हणत होते…