Sunday, January 12, 2014

मेंगजाई चा डोंगर : वाट-जाई आणि तोल-जाई चा ट्रेक

११ जानेवारी २०१४

वाट हरवणे  आणि घसरणे या दोन्ही गोष्टी एका दिवसाच्या ट्रेक मध्ये किती वेळा व्हाव्यात याची गणना सोडून दिली , तो ट्रेक म्हणजे नुकताच केलेला मेंगजाई -डोंगराचा ट्रेक. मेंगजाई ते सिंहगड हा मूळ आखलेला ट्रेक चा बेत होता, मात्र प्राप्त परिस्थितीत आम्ही त्याच दिवशी घरी परतू शकलो हीच माझ्या दृष्टीने मोठी गोष्ट ठरली. त्याचे असे झाले:
श्रद्धा नुकतीच मेंगजाई ला जाऊन आलेली असल्याने आणि आम्हा दोघांनाही सिंहगडला "कल्याण" दरवाज्याने जायचे असल्याने मेंगजाई ते सिंहगड हा एक दिवसाचा ट्रेक आखण्यात आला. मेंगजाईचा डोंगर हा राजगड -तोरणा -सिंहगड या त्रिकोणी किल्ले-त्रयीच्या मधोमध आहे.
शनिवार, ११ जानेवारी रोजी सकाळी सव्वा सहाच्या एस. टी. ने कल्याण ला जायचे ठरले होते. श्रद्धा, निखिल  व मी असे तिघे जण,  नटराज हॉटेल ला सहा वाजता भेटू असे ठरले होते, मात्र निखिल ने उशीरा येऊन कल्याण ची एस. टी. चुकवली आणि पुढे येऊ घातलेल्या अ-कल्याणाची सुरवात केली. कोंढणपूरची  पावणेसातची एस. टी. सुद्धा आम्हाला पळत जाऊन पकडावी लागली. सातारा-रोड आणि जुना कात्रज बोगदा अशा रस्त्याने गाडीने प्रवास केला.
सकाळची कोवळी किरणे अंगावर घेत जागे होणारे डोंगर , सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेली झाडे आणि आसमंतात भरून राहिलेली आणि दव-रूपाने आपले अस्तित्व दाखवणारी थंडी या गोष्टी बघत,अनुभवत कोंढणपूरला पोचलो.
स्वारगेटला एस. टी. पकडायची घाई झाल्यामुळे चहा झाला नव्हता. त्याची कसर इथे चहा-मिसळ असा नाश्ता करून भरून काढली.

कल्याणपर्यंत जाण्यासाठी काही वाहन न मिळाल्याने आणि चालण्याचा उत्साह असल्याने चालतच कल्याण कडे निघालो.  घरी कुत्रा असल्याने श्रद्धाला वाटेतील सर्व भटक्या कुत्र्यांविषयी उमाळे येत होते. मात्र चावले बिवले तर नसता भुर्दंड नको म्हणून मी हातातील दंडाचा उपयोग करून जवळ येणाऱ्या कुत्र्यांना फटक्याचा दंड केला. उजव्या हाताला सिंहगड ठेवून आम्ही चालत होतो. कात्रज -ते- सिंहगड या ट्रेक मधील शेवटचे टप्पे  म्हणजे वन ट्री हिल, बटाटा पॉइन्ट येथून स्पष्ट दिसतात. तीन-चार किलोमीटर चा हा पल्ला रमत-गमत आणि फोटो काढत पार केला.

कल्याणला पोचताच बस स्थानकाच्या कट्ट्यावर बसून पाणी प्यायले. आता स्वेटर आत गेले आणि टोप्या बाहेर आल्या.  श्रद्धा मागच्या रविवारीच येथे जाऊन आलेली असल्याने गावकऱ्यांना न विचारता आम्ही मेंगजाई च्या डोंगराकडे निघालो. वाटेत "सदुपाय" अशा विशेष नावाचा बंगला दिसला. पुढील घरांना सुद्धा सुसंगत अशी "सदुहात", "सदुडोळे " अशी नावे असण्याची अपेक्षा होती. मात्र तसे नव्हते. सरपंचाचे नाव "सदू" असल्याचे नंतर एका फलकावरून समजले. त्यानेच घराच्या नावामध्ये आपले नाव गुंफण्याचा " सद-उपाय"  योजला होता.
गावातील वाडीतून डोंगराकडे जाण्यासाठी नेमकी वाट कोणती हे पहिले काही अंतर कापताच श्रद्धा विसरली. स्थानिकांना विचारून आम्ही वाटेचा अंदाज घेतला ,मात्र ही वाट सुद्धा मध्ये मध्ये शेतांत आणि झाडा-झुडपांत विरून जात होती. ओळखीची खूण म्हणून सांगितलेली विहीर लागली तेव्हा थोडे हायसे वाटले. पुन्हा थोड्या वेळाने पहिले पाढे पंचावन्न ! मळलेली पायवाट कुठेच दिसेना.ज्या एका डोंगरावर उंच झाड दिसत आहे त्या डोंगरावर जायचे आहे , हे श्रद्धाला निश्चित माहीत असल्याने त्या अनुरोधाने पुढे निघालो. वाट सापडत होती , हरवत होती , काहीशी उंची गाठल्यावर मात्र समजले की वाट लागली होती! थोडे वर गेल्यावर पायवाट सापडेल या आशेने जंगल तुडवत, वाट बनवत वर जात राहिलो. काटे आणि काटेरी
 झुडपे यांना दूर करण्यासाठी सुरवातीला दंड चांगलाच कामी आला , मात्र  वाळलेल्या गवताची आणि  घसरडी  वाट  आल्यानंतर दंड सांभाळत जाणे जिकीरीचे वाटू लागले.


दगडाप्रमाणे दिसणारी परंतु प्रत्यक्षात मातीची असणारी ढेकळे आमचा तोल (आणि वेळ ) घालवण्यात मोलाचा वाट उचलत होती आणि शब्दशः आमचे वर जाण्याचे प्रयत्न मातीमोल ठरवत होती. आमच्याकडे फक्त एकाच दंड असल्याने आणि तो आलटून पालटून वापरत असल्याने काट्यांनी आम्हाला ऊन असूनही अंगावर काटे येतील (आणि रुततील ) याची काळजी घेतली होती.

सुरवातीला जमिनीला ४५ अंश इतकीच असलेली हे चढण नंतर ७० अंश इतकी  सरळ होत गेली आणि मग हाताने आधार घेणे जरुरी वाटू लागले.  कारवीची झाडे भरपूर असल्याने "बुडत्याला काडीचा आधार" या धर्तीवर "घसरणाऱ्याला कारवीचा आधार" अशी म्हण आम्हाला लागू पडत होती. झाडांचे नवे महत्व कळाले  होते.


अर्धा अधिक डोंगर वर गेल्यानंतर आम्ही पूर्णपणे  वाट चुकलेलो आहोत हे आम्हाला कळून "चुकले" होते. मात्र परत फिरण्यात अर्थ नव्हता. डोंगर माथा गाठूनच थांबायचे असे ठरवले.  चढणीवर खडक कमी आणि "मुरूम" जास्त असल्याने पाय स्थिरपणे ठेवण्यासाठी "रूम" मिळत नव्हती. झाडाचे बुंधे आणि झाडाच्या आजूबाजूची माती यांवर हात पाय रोवत वर जात राहिलो. एका अवघड पॅच वरून जाताना आलेला अनुभव हा अभूतपूर्व होता: वाळलेले गवत असलेल्या चढणीवरून जात असताना निखिल अचानक घसरला. आधारासाठी हाती घेतलेले गवत मुळासकट हातात आले आणि तो दहा-पंधरा फूट खाली घसरत गेला. आधारासाठी दंड देऊनसुद्धा तो त्याच्या पर्यंत पोचला नाही.  दोन कारवीची झाडे हातात धरून त्याने कसेबसे स्वतःला सावरले आणि  मदतीसाठी ओरडा केला. श्रद्धा आधीच वर गेलेली असल्याने आणि त्याहून कहर म्हणजे ती फोन वर बोलत असल्याने आम्हाला राग आला. मी जेथे होतो तेथे स्थिरावून निखिलला आधारासाठी झाडे कुठे आहेत याचे मार्गदर्शन केले आणि अखेर त्याच्या पायाला बुंध्याचा आधार सापडला. या गडबडीत आमचा दंड घसरत खाली गेला. निखिल वर येईपर्यंत श्रद्धा व मी तसेच थांबलो व दोघेही माझ्या पुढे गेल्यानंतर मी दंड आणण्यासाठी खाली गेलो. या निसरड्या वाटेवर थांबत थांबत येण्यापेक्षा पावलांवर अधिक जोर न देता भरभर वर गेलो. आता डोंगर माथा जवळ आल्याने खडकाळ वाट दिसत होती, त्यामुळे पाय स्थिर ठेवण्यासाठी कडक खडक होते. निगरगट्ट अशी काटे असलेली झुडपे मात्र सर्वत्र होती, त्यांना माती काय आणि खडक काय दोन्ही सारखेच होते . काटे आता शब्दशः आणि अर्थशः डोक्यात जाऊ लागले होते. दंडाचा प्रयोग करून ती झाडे तोडण्यात आम्हाला वेळ आणि शक्ती वाया घालवायची नव्हती. परिणामी "काटा रुते कुणाला" आणि "काटा रुते कशाला" हा विचार सोडून देऊन आम्ही सर्वांगावर काट्यांचे ओरखडे घेतले. डोंगर माथा गाठणे हेच एकमेव उद्दिष्ट घेऊन एकमेकांना आधार देत वर जात राहिलो. निखिल आता सर्वांत पुढे होता. त्याच्या तोंडून "हुर्रे" ऐकले आणि श्रद्धा व माझा जीव दंडात पडला. माथ्यावर पोचल्याचा त्याला झालेला आनंद गगनात मावत नव्हता. आम्ही वर पोचलो असलो तरी आमच्याकडील पाणी "वर" आले नव्हते, त्यामुळे जपूनच घोट घोट पाणी पिऊन तहान शमवली. पाच मिनिटे टेकलो. श्रद्धा ने GPS चालू करून मेंगजाई च्या मंदिरापासून दूर आहोत हे माहीत करून घेतले होतेच. तरीही बरोबर (आणि उतरावयास सोपी ) वाट शोधण्यासाठी मंदीर शोधायलाच हवे होते. गुगल ला मेंगजाई माहीत आहे ही मला विशेष गोष्ट वाटली. श्रद्धाने मंदिराच्या दिशेने जाण्यास सुरवात केली. आम्ही जो डोंगर चढून आलो होतो , त्या डोंगराच्या सर्वोच्च ठिकाणी एक मोठ्ठे झाड दिसत होते, त्याच्या पलीकडील बाजूस मंदीर असावे असा तिचा कयास होता. तो साफ चुकला. आम्ही तिघेही तिथे पोचलो तेव्हा समजले की आम्ही मंदिरापासून ३-४ डोंगर लांब आहोत आणि मेंगजाई ते सिंहगड या वाटेच्या मध्यावरूनच आपण परत मेंगजाईकडे चाललेलो आहोत.

परत उतरायला कुठे तरी वाट शोधू आणि मंदिरापर्यंत जायलाच नको असे विचार मनात डोकावू लागले. पण जेवलेलो नसल्याने सर्व प्रथम सावली शोधली आणि शिदोरी उघडली : श्रीखंड पोळी , ब्रेड-सॉस , संत्री , केळी यातल्या सर्व गोष्टी थोड्या थोड्या खाऊन क्षुधा शांती केली.  जेवणाची वेळ टळून गेल्याने (दुपारचे तीन ) आणि उन्हात बराच वेळ चढल्यामुळे भूक मेली होती. जेवण अर्धवट आटपून आम्ही मंदिरापर्यंत जायचे ठरवले. तेथून बरोबर वाट सापडेल याची खात्री होती. मंदिरापर्यंत जाण्यासाठी आता एक मळलेली वाट सापडली होती, तरीही डोंगरांमधून चढ-उतार असा रस्ता होता. मंदीर दिसले या आनंदात तासाभरातच आम्ही ते डोंगर पार केले आणि अखेर मंदिरापर्यंत पोचलो.  पश्चिमेला राजगड - तोरणा किल्ले खूपच स्वच्छ वातावरणामुळे लोभस दिसत होते. राजगडावरचे नेढे सुद्धा स्पष्ट दिसत होते. पूर्वेला सिंहगड. पानशेत धरण ! ईशान्येला दूरवर तुंग ! सह्याद्रीची अनेक पाषाणपुष्पे दिमाखात उभी होती. मंदिरासमोरील पारावर बसून संत्री खाल्ली. गप्पा आणि हास्य विनोद झाले. कुठल्या दिव्यातून बाहेर पडलो याची जाणीव झाल्यवर देवासमोर नकळत हात जोडले गेले.
साडेचार च्या सुमारास सोप्या पायवाटेने उतरायला सुरवात केली. ही वाट राजमार्ग वाटावा इतकी सोपी होती. उतरताना एक बसलेल्या कासवाच्या आकाराचा डोंगर दिसला.सूर्य पश्चिम क्षितीजीवर कलू लागला तसा आम्हाला (उन्हे) उतरण्याचा वेग कळू लागला.  वाटेवर आता कुठेही वाळलेले "गवत" नसल्याने अंधार होण्या अगोदर "गावात" पोचू असे वाटत होते.  डोंगर उतरून खाली आल्यावर आम्ही दुसऱ्याच एका वाडीच्या रस्त्याला लागलो होतो. गाई हाकणाऱ्या एका धनगर बाईने कल्याण गावचा रस्ता दाखवला आणि आम्ही तिचे आभार मानून दौडत निघालो. सुबाभळीची अनेक झाडे तसेच खाली पडलेली त्याची फळे दिसत होती , त्यातील एक बॉल म्हणून खेळायला आम्ही घेतले. कल्याणला पोचल्यावर स्वारगेटची गाडी पाच वाजताच गेल्याचे कळले. नाईलाजाने कोंढणपूर पर्यंत चालत निघालो. बॉबी , वेफर्स असे किडूक -मिडूक काहीतरी खात आणि थकलेले पाय ओढत चालत असतानाच एका जीपचा आवाज ऐकला. धनंजय चव्हाण या जीपवाल्याने कोंढणपूर पर्यंत सोडले आणि बरेच "पुण्याचे" काम केले.  तेथून स्वारगेट साठी ७ वाजता एस. टी. होती. ती येईपर्यंत श्रद्धा ने भूक वडा -पाव खाऊन  तर निखिल ने तहान ताक पिऊन भागवली. एस. टी.मध्ये बसून स्वारगेट येई पर्यंत माझे मूक-चिंतन चालू होते. कल्याणहून कोंढणपूर पर्यंत जीप मिळेपर्यंत चालताना केलेल्या गप्पा आठवत होत्या. एक थरारक चढणीचा अनुभव देऊन निसर्गाने आमच्या मनात आगळेच समाधान भरले होते. साध्याच असू शकणाऱ्या या  ट्रेक ला अशा प्रकारे "चुकून" कलाटणी मिळाल्यामुळे साहसी चढाई करायला मिळाली होती. हाताला हात आणि खांद्याला खांदा लावून ट्रेक पूर्ण केल्याने मैत्रीचे नाते सह्याद्रीच्या डोंगरांप्रमाणे दृढ झाले होते.

Wednesday, January 8, 2014

पांडवगड ट्रेक

४ जानेवारी २०१३

 यंदाचा हिवाळा पुण्याच्या घरी साजरा करण्याचे निश्चित केल्यानंतर सर्व प्रथम केलेली गोष्ट म्हणजे ट्रेक्स चे बेत ! ४-५ जानेवारी ला हरिश्चंद्रगड ला  जाण्याची आखणी महिनाभर आधी झाली होती. पण माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक ? दोन दिवस सर्वांना वेळ झाला नाही, नेहमीप्रमाणे ऐन वेळी काढता पाय घेणारे मावळेही होतेच. अखेर एक दिवसाचा पांडवगडाचा ट्रेक करण्याचे ठरवून आम्ही दुधाची तहान ताकावर भागवावी असा विचार केला.

सकाळी पावणे सहाची वाईची  एस. टी. स्वारगेट हून पकडायची होती. फक्त जेवणाचा डबा , पाणी आणि खास युरोपिअन चॉकलेट्स घेऊन मी सव्वा पाच वाजता घर सोडले. निघताना एक दंड (बांबूची लांब काठी) बरोबर न्यावयास विसरलो नाही. बरोबर फोन नेला नव्हता. पण ठरल्याप्रमाणे प्राजक्ता आणि सागर वेळेवर आणि ठरलेल्या ठिकाणी आले व पावणे सहाची महाबळेश्वर एस. टी. आम्हाला मिळाली आणि ती वेळेवर निघाली सुद्धा !

शिरवळ जवळ चहा-नाश्त्यासाठी गाडी थांबली, तेव्हा बाहेर धुक्याने हवेशी हात मिळवणी केलेली होती.  हवेत बेमालूमपणे  मिसळलेले ते धुके पेपर विक्रेत्यांच्या टपरीला प्रभात-सुलभ शोभा आणत होते. आम्ही एक 'सकाळ' घेतला. आमचे  वेळ घालवण्याचे  चोचले (कोडी वगैरे) पुरवण्यासाठी त्यातील पुरवण्यांचा आम्ही पुरवून पुरवून वापर केला.
८ च्या सुमारास गाडी वाई ला पोचली. आम्हाला पुढे मेणवली ला जाणारी गाडी हवी होती. मेणवली म्हणजे नानासाहेब फडणवीस यांचे एकेकाळी वास्तव्य असेलेले आणि आता जेथे त्यांचा वाडा अजूनही शाबूत असेलेले गाव! चौकशी खिडकी च्या पलीकडे बसलेला माणूस अनेक वेळा विचारून सुद्धा तोंडातल्या तोंडात बोलत असल्याने नेमकी एस. टी. कोणत्या  गावची  किंवा फलाट कुठला अशी कुठलीच माहिती मिळाली नाही. सागर ने अखेर त्याला एस.टी. चा नंबर विचारला.  ९८७६ नंबरच्या त्या एस. टी. ला कुठलीच पाटी लावलेली नव्हती आणि गाडी  निघाल्यावर सुद्धा चालक किंवा वाहकाने तशी कुठलीच तसदी घेतली नाही.

 विचारल्यावर, ती गाडी "पांडेवाडी" ची असून तेच पांडव गडाचे पायथ्याचे गाव आहे अशी मौलिक माहिती मिळाली. मी आणलेला दंड हा केवळ फोटोसाठी पोज देण्यासाठी आणला आहे असा गैरसमज प्राजक्ताचा झाला होता. "उगाच हाताला ओझे" अशी सागरने टिका सुद्धा केली. मी या टिप्पण्या दुर्लक्षून एस. टी. मध्ये शिरलो.   मेणवली पेक्षा पांडेवाडीहून  किल्यावर जाणे सोईचे ठरेल असा विचार करून आम्ही पांडेवाडी चे तिकीट काढले. पंधरा- वीस मिनिटांत आम्ही इच्छित स्थळी पोचलो. आजूबाजूची शेते, शेणाने सारवल्याचा वास, तुरुतुरु चालणाऱ्या कोंबड्या यांमुळे शहरापासून दूर आल्याचे जाणवले. स्थानिक लोकांना विचारून गडाच्या वाटेला लागलो. प्राजक्ता ने तिचा SLR (सिंगल लेन्स रिफ्लेक्स) तंत्रज्ञान असलेला कॅमेरा काढला आणि तिने तिचा एकटीचा एक ग्रुप केला. शेतांतील पिकांवरील किडे तिचे प्रथम लक्ष्य ठरले. नंतर तिने पक्ष्यांकडे मोर्चा वळवला.
झाडावर बसलेला पक्षी 


गुरे- ढोरे , कुत्री-मांजरे , माणूस सोडून एकही सजीव तिने टिपला नाही असे झाले नाही. योग्य वाट सापडली असे वाटल्यानंतर आम्ही मिरचीच्या एका मळ्यालगत नाश्त्यासाठी बसलो. सॅंडविचेस आणि गाजर हलवा असा दमदमीत नाश्ता करता करता आम्ही ट्रेक साठी आलो आहोत हेच जणू विसरून गेलो.

पांडेवाडी सोडेपर्यंत आम्हाला कुत्र्यांनी नको करून सोडले  होते. माझ्या हातात असलेल्या दंडाचा काहीतरी उपयोग होतो आहे हे आता सागर-प्राजक्ताला समजले. गावकऱ्यांकडून वाटेचा अंदाज घेतला होता, तरीही सागाची सर्वत्र विखुरलेली पाने पाऊल वाटा लपवत होती आणि  आम्ही वाटे पासून दूरच राहिलो. किल्ल्याची दिशा बरोबर माहीत असल्याने आणि उजव्या सोंडेने वर जायचे आहे हे माहीत असल्याने त्या हिशोबाने मार्ग आक्रमत राहिलो. म्हणावी तशी उंची न गाठताच आम्ही खूपसा आडवा पट्टा पार केला. वाटेत कोरडा पडलेला ओढा एक दोन वेळा ओलांडला तेव्हा - "आमचा ओढा बरोबर वाटेकडे आहे " अशी कोटी करून प्राजक्ता ने तापू लागलेल्या वातावरणात विनोदाचा शिडकावा केला. कॅमेराचा सढळहस्ते वापर करत चालत असल्याने आमचा वेग अतिशय मंदावला होता. शिवाय आता चढणीची वाट , (तीसुद्धा सावली नसलेली ) सुरु झाल्याने आम्ही वेळ घेत आणि एकमेकांचे फोटो घेत पुढे जाऊ लागलो. धोम धरणाचा परिसर उंचावरून  अतिशय रमणीय दिसत होता.


छोट्याश्या पण  शिस्तीत वसवलेल्या आणि शेतांच्या कडेकडेने बसवलेल्या अशा वाड्या साजऱ्या दिसत होत्या. गड माथा आता नजरेच्या टप्प्यात आला होता.  आवळे , श्रीखंडाच्या गोळ्या असा नमुनेदार ट्रेक चा खाना एकीकडे चालू होताच. तासभर झाल्यानंतर आम्ही गावकऱ्यांनी सांगितलेल्या खुणेपाशी म्हणजे कौलारू मंदीर असलेल्या माचीवर पोचलो.
भैरवनाथ मंदीर, पांडवगड 


भैरवनाथाचे हे मंदीर राहण्यायोग्य असले तरीही नावे लिहून भिंती इतक्या भरवून ठेवल्या आहेत की बाळांसाठी नावे शोधण्यासाठी पांडवगड ला येणे वाया जाऊ नये. या माचीवरून गडाचे विंचू काट्या सारखे पुढे आलेले टोक दिसते. इथून किल्ल्यावर जाण्यास एक मोठ्ठी चढण पार करावी लागते. प्रवेश द्वार गाठण्यासाठी गडाला मोठाच वळसा घालावा लागतो. या वळणावर पाण्याची टाकी दिसतात. वाऱ्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण क्षरण होऊन बनलेले खांबही दृष्टीस पडतात.   बाराच्या सुमारास आम्ही फुटक्या दरवाजापाशी पोचलो. जोरदार घोषणा झाल्या. सावलीत जरा  वेळ विसावलो. संत्री -मोसंबी खाऊन तरतरीत झालो.

पांडजाई देवीचे मंदीर, पांडवगड 

गड फिरण्यास प्रारंभ केला. प्रवेशद्वारापासून थोडे पुढे जाताच शिवकालीन किल्ल्यांची ओळख असलेले गडावरील मारुतीचे मंदीर दिसले. तसेच या मंदिरासमोर कोल्हू चालवण्यासाठी लागणाऱ्या चक्राचे तसेच जात्याचे अवशेष आढळले. थोडे पुढे गेल्यावर पांडजाई देवीचे मंदीर दिसले. अगदीच भग्न अवस्थेत असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे तेथील लाल विटांवरून लक्षात येत होते. मंदिराच्या बाहेर शंकराची पिंड आणि समोर मारुतीची शिळेत कोरलेली मूर्ती दिसली. मंदिराच्या लगतच एका इमारतीचे अवशेषही दृष्टीस पडले. गडाचा एकंदरीत घेर लहान असल्याने उत्तर टोकाला जायला आम्हाला फारसा वेळ लागला नाही. विंचू काट्या सारख्या भासणाऱ्या या टोकावरून दरीचे रौद्रसुंदर दर्शन घडते. अर्थातच या ठिकाणी फोटो-सेशन चांगले तासभर लांबले.
रौद्रसुंदर दरी, पांडवगड 


आम्ही तिघे वगळता " गडावर काळे कुत्रेसुद्धा येणार नाही" , हा आमचा समज आमच्या फोटो-सेशन मध्ये व्यत्यय आणणाऱ्या तिघा मुलांनी खोटा ठरवला. परत फिरताना किल्ल्यावरील सुकलेले तळे बघितले आणि प्रवेशद्वार पाशी पायऱ्या होत्या , त्या ठिकाणी डायनिंग टेबल केले.  आम्रखंड , मटार-उसळ , पोळ्या आणि मला पालकाचे वाटलेले , प्राजक्ताला मुळ्याचे वाटलेले आणि सागरला मेथीचे वाटलेले (प्रत्यक्षात माहीत नाही) असे पराठे  आणि लिंबाचे लोणचे असे आमचे दुपारचे जेवण होते. निवांत जेवण आणि गप्पा झाल्यावर अडीच च्या सुमारास गड उतरण्यास प्रारंभ केला. उतरताना आणखी तिघांचे एक टोळके आम्हाला भेटले. ते बहुधा धावडी गावातून येणाऱ्या वाटेने आले होते. 
 ही वाट  पांडव गडाच्या पूर्वेकडे असून या गावात पांडव लेणी आहेत.  पांडव-लेणीचा पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासात आश्रय घेतला होता अशी वदंता आहे.  यावरूनच या किल्ल्याला पांडव-गड असे नाव पडले.
उतरताना आम्ही चांगलाच वेग घेतला आणि माचीपाशी दहा मिनिटांतच पोचलो. तेथून खाली जाण्यासाठी आता योग्य आणि मळलेली वाट निवडली. उतरताना नेहमीच बरोबर वाट सापडते असा माझा नेहमीचा अनुभव आहे. ही बरोबर वाट बरीच लांबून जाणारी आणि मधेमधे चिंचोळी होती. विशेषतः मुरुमे असलेल्या वाटेने उतरताना पाय घसरू नये यासाठी विशेष काळजी आम्ही घेत होतो. दंडाचा उपयोग वाटेतील काटे असलेली झुडुपे तोडण्यास आणि जरूर पडल्यास आधारासाठी सुद्धा झाला.

बैल हाकण्याचा प्रयत्न !

आता हा बहुपयोगी दंड प्राजक्ता आणि सागर दोघांनीही वापरला होता आणि तो आणल्याबद्दल आभारप्रदर्शन सुद्धा करून झाले होते. वाटेत एका पठारावर एकुलते-एक झाड हेरून आणि त्याच्या इवल्याश्या सावलीत मावून आम्ही जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि गप्पांची मैफल रंगवली. उन्हासोबतच   आम्ही डोंगरावरून उतरलो.  मजल -दरमजल करीत आम्ही पांडे वाडीत पोचलो तेव्हा समजले की सव्वा पाच ची एस टी नुकतीच गेली आहे. एकमेकांवर वेळ घालवल्याबद्दल दोषारोपण झाले आणि वादविवादाला फाटा देऊन आम्ही  भोगाव फाट्याकडे निघालो. एका मावशींच्या ओळखीमुळे आम्हाला वाई ला जाणारा टेम्पो मिळाला. त्यात मागे बसून वाई कडे कूच केले. टेम्पोत ठेवलेल्या फरशांवर बसून आम्ही Cadbury Munch चा फडशा पाडला. वाई बस स्थानकाजवळ नारळ पाणी प्यायले. पुण्याची एस.टी. आमच्या बरोबरच आगारात शिरली. खिडकी पटकावून मी हिशोब आणि नंतर झोपेची आराधना सुरु केली.
आठ च्या आत आम्ही स्वारगेट गाठले. एक दिवसाचा ऑफ बीट आणि निवांत ट्रेक झाला होता. मित्रांच्या  पंगतीने आणि सह्याद्रीच्या संगतीने  हिवाळ्याला खरी सुरवात झाली होती. 
पांडवगड सर केलेले त्रिकूट 


संदर्भ :

http://en.wikipedia.org/wiki/Pandavgad_Falls
http://trekshitiz.com/Ei/Pandavgad-Trek-Medium-Grade.html
http://www.marathimati.net/pandavgad-fort/

छायाचित्रे : प्राजक्ता खुंटे , सागर आंबेडे