शनिवार, २२ मार्च, २०१४

मध्य युरोपिअन सहल : "मेंडेल" चे शहर ब्रनो (दिवस चौथा)

शनिवार २२ मार्च २०१४ :  ब्रनो  दर्शन !

राडेक च्या घरी लवकर जाग आली आणि त्याच्या घरामधील सदस्यांबरोबर थोडा सुसंवाद साधता आला. त्याचे आई - वडील तोडके मोडके इंग्रजी बोलून माझ्याशी तर मी माहीत असलेले काही झेक शब्द वापरून त्यांच्याशी बोलत होतो. भरपेट नाश्ता करून आणि तिफ़ो नावाच्या त्यांच्या कुत्र्यासकट सगळ्यांबरोबर, त्यांच्या घराच्या परसात , एक आठवण फोटो काढून आम्ही निघालो. 

राडेक चे कुटुंब !

निघे-निघेपर्यंत दहा वाजून गेले होते. प्रागहून आमची बस अकरा वाजता निघणार असल्याने राडेकच्या बाबांनी कार चा ताबा घेतला. एकशेवीसच्या स्पीड ने (खरोखर) त्यांनी गाडी दामटली. त्यांनी आमची बस चुकणार नाही याची काळजी घेतली खरी , पण हाय-वे वरून गाडी जात असताना आमचा काळजाचा ठोका चुकला होता हे निश्चित !प्राग ते ब्रनो प्रवास हसत खिदळत गप्पा मारत पार पडला . 

Eurolines bus - Prague -Brno

 रोमन साम्राज्यातून आता आम्ही परत "रोमान"(च्या)  साम्राज्यात आलो होतो. आजचा दिवस ब्रनो-दर्शन चा होता. ब्रनो हे झेक प्रजासत्ताक मधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून मोराविया प्रांतातील सर्वांत मोठे शहर आहे. विएन्ना (ऑस्ट्रिया ची राजधानी)आणि ब्राटिस्लवा (स्लोवाकिया ची राजधानी) या महत्वाच्या शहरांच्या जवळ असल्याने भौगोलिक दृष्ट्या ब्रनो ला महत्व आहे. या भौगोलिक स्थानामुळे तसेच मोक्याच्या जागी किल्ले असल्यामुळे  सोळाव्या शतकापासून सर्व युद्धांत आपोआप ओढले गेलेले  शहर म्हणूनही ब्रनो प्रसिद्ध आहे.  

 बस मधून उतरल्यानंतर घरी जाण्या अगोदर वाटेत रोमान ने एक कॅथेड्रल दाखवले: Cathedral of Saints Peter and Paul ! शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे चर्च तीन शतकांहून अधिक काळ उभे असल्याने राष्ट्रीय वारसा मानले जाते. Gothic शैलीने उभारलेले त्याचे मनोरे विशेष लक्षवेधी आहेत :

Cathedral of Saints Peter and Paul

या चर्चची दुपारची घंटा सर्वसाधारण कॅथोलिक चर्चप्रमाणे बारा वाजता न "वाजता" ११ वाजता वाजवली जाते! याविषयीची आख्यायिका मनोरंजक आहे : १६१८-१६४८ अशी तीस वर्षे सलग चाललेल्या युरोपातील सर्वांत मोठ्या युद्धात जेव्हा कधीतरी स्वीडिश सैन्य ब्रनो ला वेढा देऊन बसले होते तेव्हा ब्रनो ने निकराचा लढा दिल्याने स्वीडिश सेनापतीने "जर मला उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत ब्रनो शहर मिळवता आले नाही तर मी वेढा सोडून माघार घेईन" असे वचन ब्रनो-वासीयांना दिले होते. त्या दिवशी एका धूर्त नागरिकाने या चर्च ची बेल १ तास अगोदर वाजवली आणि स्वीडिश आक्रमणापासून ब्रनो बचावले. तेव्हापासून या कॅथोलिक चर्च ची बेल नेहमी १२ ऐवजी ११ ला वाजवतात.

Lunch at Cathedral of Saints Peter and Paul

चर्च च्या आवारात एक बाक पकडून आम्ही जेवण उरकले. राडेकच्या आईने सर्वांना पुरून उरेल एवढा डबा भरून खाण्याचे पदार्थ दिले होते. ते संपवून चर्च बघून आम्ही रोमान च्या घरी गेलो. 

रोमान च्या  खोलीत

अर्धा तास  विश्रांती घेऊन आणि रोमान च्या घराचे फोटो काढून आम्ही शहर बघावयास निघालो:

रोमान चे घर (त्याच्या बागेतून घेतलेला फोटो)

टेकडीच्या वाटेने जाताना रंगीबेरंगी फुलांद्वारे वसंत ऋतू आपले अस्तित्व दाखवून देत होता. शहराची सैर करण्यासाठी रोमान ने निवडलेला पहिला थांबा म्हणजे Basilica of The Assumption of Our Lady हा होता. हे स्मारक म्हणजे दुतर्फा खांबांची रांग व अर्धवर्तुळाकार घुमट असलेला एक  लांबट आकाराचा दिवाणखाना आहे. या Basilica च्या शेजारीच मध्ययुगीन मठ असून अनेक ख्रिश्चन साध्वी येथे अठराव्या शतकापासून उपासना करत आलेल्या आहेत. 

Basilica of The Assumption of Our Lady

 यानंतर आम्ही पोचलो ते मेंडेल संग्रहालयाच्या आवारात ! मेंडेल संग्रहालय हे मेसेरिक (Meseryk) विद्यापीठाचा एक भाग असून २००२ साली बांधले गेले. थोर जनुक-शास्त्रज्ञ ग्रेगर मेंडेल यांची कर्मभूमी ही संग्रहालयाच्या समोरच असलेल्या Saint  Thomas's  Abbey या चर्चमध्ये आहे. या चर्चच्या आवारातील  बागेत वाटाण्याच्या रोपांवर प्रयोग करून मेंडेल यांनी, जनुकशास्त्र आणि आनुवंशिकशीलता या क्षेत्रांत मैलाचा दगड ठरलेले  सिद्धांत मांडले होते.

मेंडेल संग्रहालय

StaroBrno या ब्रनो च्या स्थानिक बिअर Brewery कडे जाताना मेंडेल यांचे नाव दिलेला चौक "मेंडेल स्क्वेअर" दिसतो. आम्ही Brewery च्या बाहेरील भागात असलेल्या हॉटेल मध्ये गेलो. तेथील खासियत म्हणजे ऑर्डर केलेली सर्व पेय आगगाडी च्या डब्यावरून सर्व्ह केली जातात :

StaroBrno !
तिथे बिअर घेऊन आम्ही ब्रनो च्या प्रसिद्ध  Špilberk (श्पील्बेर्क) किल्ल्याकडे कूच केले. हा किल्ला तेराव्या  शतकापासून बराक आणि तुरुंग यांसाठी ओळखला जातो.  या किल्ल्याची मजबूत तटबंदी तीस वर्षे चाललेल्या युद्धात स्वीडिश सैन्याविरुद्ध लढा देण्यासाठी विशेष उपयोगी ठरली होती. 
Špilberk किल्ला
 
किल्ल्यावरील एक बुरुज



 हे किल्लाच फक्त दिलखेचक  नसून किल्ल्यावरून दिसणारे शहराचे दृश्यही प्रेक्षणीय आहे.
 
किल्ल्यावरून दिसणारे ब्रनो !
किल्ल्या"मध्ये "असलेले  तुरुंग !

किल्ला फिरून झाल्यावर आम्ही मागच्या बाजूने उतरलो जेणेकरून आम्हाला शहराच्या दुसऱ्या भागात जाता येणार होते:

 
किल्ल्याबाहेर पडल्यावर नजरेस पडणारा सुंदर परिसर !

 शहरात पुनर्प्रवेश केल्यावर सर्व प्रथम दिसले ते म्हणजे Red Church : हे चर्च protestant पंथाच्या अनुयायांचे चर्च असून रोमन कॅथोलिक चर्च च्या विचारसरणी ला आव्हान देणाऱ्या Protestantism या सुधारित ख्रिस्ती पंथाचे ते प्रार्थनास्थळ आहे. 
Red Church
 यानंतर ब्रनो मधील ऐतिहासिक Saint James चर्च (हे मात्र कॅथोलिक आहे ) दृष्टीस पडते.
 
Saint James Church (Image from Wikipedia)
 
या चर्च चा इतिहास (सुद्धा) तेराव्या शतकापर्यंत मागे जातो, मात्र याची महती आणखी एका अभूतपूर्व घटनेने अधोरेखित होते : २००१ साली केलेल्या पुरातत्वीय उत्खननात या चर्च च्या (जमिनीच्या) 
खाली प्राचीन दफनभूमी असल्याचे आढळून आले.  तीमध्ये तब्बल पन्नास हजार मृतांचे सांगाडे (अवशेष )सापडले. 
अर्थातच याचा व्यवसाय म्हणून झेक सरकारने त्याचे पर्यावसान संग्रहालयामध्ये केले :
दफनभूमी ! (Brno Ossuary )
 दफन झालेल्या या मृतांच्या anthropological (मानवशास्त्रीय) अभ्यासावरून असे सांगण्यात येते की - मध्युगात जेव्हा प्लेग आणि कॉलरा यांच्या "साथी"मुळे दगावलेली लोकं आणि तीस वर्षे चाललेल्या युद्धातील झेक सैनिकांचे "साथी"दार यांना "पुरून" ही हाडे उरली आहेत !!
 या संग्रहालयात फिरताना अधिक फील यावा (किंवा भीतीदायक वातावरण निर्मिती करण्यासाठी ) म्हणून जुन्या भयपटांचे पार्श्वसंगीत ऐकवले जाते. 
दफनभूमीच्या संग्रहालयातील एक हाड-स्तंभ !
 या भयानक आणि मजेशीर अनुभवानंतर आम्ही शहरातील मुख्य चौकात आलो : 


तेथे The Plague Column हा एक स्तंभ उभारण्यात आलेला आहे : प्लेग ची साथ आटोक्यात आल्यानंतर कृतज्ञता म्हणून हे स्मारक उभारण्यात आले होते.
The Plague Column

 यानंतरचे आकर्षण होते :  Old Town हॉल. हा  हॉल म्हणजे ब्रनो मधील प्रमुख आख्यायिकांचा जनक आणि संकलक आहे. या town हॉल च्या इमारतीच्या दर्शनीय कमानीपासूनच आम्हाला प्रश्न पडत गेले आणि रोमान , राडेक यांनी सर्व आख्यायिका खुलवून सांगितल्या :
entrance of the town hall with a deformed phial

 Master Antonin Pilgrim याला Town हॉल बांधण्याचे कंत्राट दिले होते. त्याला कामाचा पूर्ण मोबदला वेळेवर न दिल्याने त्याने प्रवेश द्वाराचा महत्वाचा मधला शोभेचा खांब वाकडा बांधला. एक वदंता अशीही आहे की खूप दारू पिऊन झिंगल्यामुळे त्याने तो खांब वाकडा बांधला. 
town हॉल च्या प्रवेश द्वारामधून आत गेल्यावर छताला  एक मगर टांगलेली दिसते :
Brno Dragon
 त्याविषयीची गोष्ट ही पुढीलप्रमाणे :
फार वर्षांपूर्वी एका मगरीने ब्रनो मध्ये दहशत निर्माण केली होती जी दररोज माणसे मारून खात असे. याआधी झेक लोकांनी हा प्राणी पाहिलेला नसल्याने ते त्याला ब्रनो चा dragon म्हणत असत. एका शूर माणसाने मेलेल्या जनावराच्या शरीरात विष घालून ते जनावर त्या मगरीला खायला दिले आणि त्या मगरीपासून ब्रनो ची सुटका केली. 

town हॉल च्या एका भिंतीवर एक मोठ्ठे जुने चाक टांगलेले दिसते :

The Brno Waggon Wheel


असे सांगितले जाते की Georg Birk नावाच्या सुताराने आपल्या मित्राशी पैज लावली होती की एका रात्रीत तो शहरापासून ५० मैल लांब असलेल्या झाडाच्या लाकडापासून बनवून ते चाक फिरवत फिरवत शहरात आणेल. ही अमानवी गोष्ट त्याने करून दाखवली आणि त्यासाठी त्याने कुण्या सैतानाची मदत घेतली होती असे म्हणतात. ब्रनोच्या इतिहीसाची अनेक पाने अशा रंजक गोष्टी आणि लोककथांनी भरली आहेत. 

town हॉल च्या (सुद्धा) मागील दाराने बाहेर पडलो आणि एका तऱ्हेवाईक कारंज्या पाशी येऊन पोचलो. Parnas fountain या नावाने प्रसिद्ध असलेले हे कारंजे इग्नाझ बेंडल (Ignaz Bendl) या कारागिराने घडवले असून त्यावरील रूपकात्मक नक्षीदार कोरीवकाम विएन्ना मधील Plague Column च्या स्तंभाशी तंतोतंत जुळणारे आहे. 
विएनीज वास्तुविशारद Johann Bernhard Fischer von Erlach याने design केलेली कलाकृती तत्कालीन ऑस्ट्रिया च्या राजवटीचा भाग होती. ब्रनो (दक्षिण मोराविया) झेकोस्लोवाकिया मध्ये विलीन झाल्यानंतरही  झेक नागरिकांनी ऑस्ट्रियन कलेचा आदर राखत सर्व स्मृतीशिल्पे जपली आहेत.
Parnas Fountain


आता आमच्या प्रदक्षिणेचा अंतिम टप्पा म्हणून आम्ही पुन्हा
Cathedral of Saints Peter and Paul मध्ये आलो. सकाळी याच ठिकाणाहून आम्ही ब्रनो दर्शन सुरु केले होते. रोमान ने परिपूर्ण शहर दर्शन घडेल असा मार्ग निवडल्याने त्याला मनापासून धन्यवाद दिले. चर्च च्या आवारातील बागा , काही ठिकाणी मुद्दाम न केलेली डागडुजी , रंग उडालेल्या भिंती आणि पडक्या सज्जा या सर्व गोष्टी त्या कातरवेळेला कुणालाच्याही मनाला एक दोन शतके सहज मागे नेऊ शकत होत्या. 
 
Cathedral of Saints Peter and Paul(back side )

अशा प्रकारे शहर दर्शन झाल्यानंतर breweries बघणे आणि तिथे मनसोक्त मद्यपान हा प्रोग्राम होता.  पिण्या अगोदर पोटात काहीतरी असावे म्हणून डिनर साठी एका हॉटेल मध्ये गेलो:

नमुनेदार झेक जेवण !

तेथून सुरु झाला आमचा pub-crawl ! बुधवारी रोमान बरोबर फिरलेले सर्व बार आम्ही पालथे (होऊन) घातले. प्रत्येक ठिकाणी तिथली खास बिअर आणि खास शॉट हे ओघाने आलेच. अशातच एका पब मध्ये आम्हाला बुद्धीबळ खेळायची हुक्की आली. डाव बराच वेळ रंगला आणि त्याच्या सम प्रमाणात आमचे बिल सुद्धा !

 

 pub-crawl चा खरा अर्थ त्या दिवशी कळला. पाच ते सहा बार फिरून झाल्यावर घरी जाताना चालता येणे मला मुश्किल झाले होते. अशा प्रमाणात दारू पिण्याची सवय नसल्याने मी पुरता झिंगलो होतो. रोमान आणि राडेक यांनीच मला घरी आणले असावे कारण माझ्या कॅमेरा मधील शेवटचा फोटो हा या बार चा आहे आणि तेथून मी घरी कसे आलो हे मला आठवतच नाहीये ! (क्रमशः)

शेवटचा बार !





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा