शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

सीअॅटल विवस्त्र सायकल फेरी (अचित्र)

२० जून २०१५

वसंत संपून उन्हाळ्याची चाहूल लागली होती. सीअॅटल मध्ये सूर्य नेमाने तळपू लागला होता. वर्षाचे ८ महिने सूर्य दर्शन दुर्मिळ असलेल्या शहराला याचे अप्रूप नसले तरच नवल.२१ जून हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस : उन्हाळा अयन दिवस. या दिवशी फ्रेमोंट या भागातील कला मंडळ शोभा यात्रा आयोजित करते. सालाबाद प्रमाणे यंदाही या यात्रेची  प्रमुख आकर्षण असणार होती: आदल्या दिवशी होणारी Naked Bike ride , म्हणजेच विवस्त्र सायकल फेरी ! वरकरणी अश्लील वाटणाऱ्या या सायकल फेरीमागे नेमके काय दडले आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता मला होती. आणि मी राहतो त्याच्या आजूबाजूला अशी आगळी वेगळी गोष्ट घडणार असताना त्याचा आंबटशौकीन साक्षीदार होण्यापेक्षा त्या फेरीत सहभागी का होऊ नये असा विचार मनात येऊन गेला. मित्र पॉल हा सुद्धा बरोबर येण्यास तयार झाला. 

२१ जून च्या आदल्या दिवशी म्हणजेच २० तारखेला सकाळी ९:३० पासून CSR marine या होड्या दुरुस्त करणाऱ्या कंपनीच्या मोठ्ठ्या आवारात फ्रेमोंट कला दालनाचे उत्साही रंगारी रंग आणि ब्रश घेऊन हजर होते. दहा वाजल्यापासून सायकल स्वारांना १०$ शुल्क आकारून प्रवेश दिला जात होता. बहुतेक सायकलस्वार गाडीने प्रवेशद्वारा पर्यंत येऊन , फक्त सायकल घेऊन विवस्त्र प्रवेश करत होते. काही जण आपापला ग्रुप करून एकमेकांना रंगवत होते तर काही जण व्यावसायिक पेण्टर्स कडून रंगवून घेत होते. 
मी पूर्ण कपड्यानिशी आत गेलो, पण मला संकोचल्या सारखे होऊ लागले. तेथे फक्त परवाना घेऊन आलेले छायाचित्रकार कपडे घालून वावरत होते, इतर सर्व जण कोणतीही लाज न बाळगता विवस्त्र फिरत होते. मी लवकरच त्यांच्यातील एक झालो आणि अंगावर काळे पांढरे पट्टे रंगवून घेण्यास सुरवात केली. झेब्रा प्रमाणे स्वतःला रंगवून होईपर्यंत पॉल तेथे आला, त्याला रंगवण्यास मदत केली. अनपेक्षित पणे ऑफिस मधला जुना मित्र साशा आणि त्याची होणारी बायको हे सुद्धा तेथे भेटले. सर्वांचे एक छोटेशे फोटो सेशन झाले. त्यांनी हेल्मेट ऐवजी घालण्यासाठी लाल कुरळ्या केसांचा विगसुद्धा आणला होता.
प्रत्येकालाच आपले शरीर वेगळे आणि आकर्षक दिसावे असे वाटत होते. पण त्यासाठी आता महागड्या कापडाचा आधार नव्हता. रंग हेच कापड , त्याला कल्पनाशक्तीचे अस्तर आणि कलात्मकतेने चालणारी रंगारी बोटे !
फळे, फुले , झाडे आणि प्राणी सर्व जण मनुष्याच्या कॅनव्हास वर थाटाने विराजमान झाले होते. वाघ आणि सिंह तर कित्येकांनी रंगवून घेतले होते. काही जणांनी चमचमणारे रंग वापरून आपण जणू एखादा भारी ड्रेस घातला आहे असे भासवले होते.  मुलींमध्ये परी आणि राणी यांची नक्कल बऱ्याच जणींनी केली होती. माणसाच्या सुप्त इच्छा रंगाच्या माध्यमातून गुप्त पणे व्यक्त होत असतात असे दिसत होते. इजिप्त च्या राणीची रंगभूषा केलेल्या स्त्रीने सर्वांच्या नजरा जिंकल्या. 
अनेक जण तेथे सह कुटुंब आले होते आणि त्यांची सर्जनशीलता आणि रंगकामाची  प्रतिभा थक्क करणारी होती.  
ते  फक्त शरीरच रंगवत नव्हते तर त्याबरोबर काही फलक सुद्धा रंगवत होते , त्यातून पर्यावरण वाचवा , सायकल चालवा अशा आशयाची घोषवाक्ये लिहून संदेश देण्याचा हेतू होता. लहान मुलांना त्या वयातच न बोलता लैंगिक शिक्षण मिळत होते. किमान त्यांची नग्नपणाविषयी एक निरोगी दृष्टी नक्कीच तयार होत होती. तेथे कुणीही एकमेकांकडे टक लावून बघत नव्हते की अश्लील टिप्पण्या करून हसत विचकत नव्हते. उन्हाचे स्वागत कपडे काढून करणे हा इतकाच साधा स्वच्छ हेतू होता.
 
बरोब्बर २ वाजता सायकल फेरी सुरु झाली. त्या अगोदर आम्ही बरोबर आणलेला खाऊ खाऊन घेतला. सायकली काढून सज्ज झालो . सायकल च्या सीट वर आठवणीने प्लास्टिकची पिशवी बांधली (रंग लागू नये म्हणून!) फेरीचा रस्ता ठरलेला होता. 
शहरातून जाताना कुणी ओळखेल अशी सुतराम शक्यता नव्हती (इतके रंगकाम चेहऱ्यावर सुद्धा केले होते ) बरेच जण तर तऱ्हेतऱ्हेचे चित्र-विचित्र मुखवटे घालून सायकल चालवत होते. शिंग असलेले हेल्मेट आणि काळवीट रंगवलेले शरीर सायकल चालवताना मजेशीर दिसत होते. अनेक सायकली सुद्धा स्वारांइतक्याच नटल्या होत्या. सायकल चालवताना मला इतर काही झेब्रांचा कळप (सायकल वर) दिसला, त्यांनी आनंदाने मला त्यांच्यात सामावून घेतले.
रथ यात्रा सुरु होणाऱ्या रस्त्यावर बघ्यांची ही गर्दी उसळली होती. रस्त्याच्या दुतर्फा सायकल चालवणाऱ्या आम्हा नग्न स्वारांना  बघण्यासाठी झालेली गर्दी , त्यांनी वाजवलेल्या टाळ्या आणि दिलेल्या घोषणा , या सर्व गोष्टींमुळे सगळीच भीड चेपली गेली. कोणालाच आपली ओळख कळणार नाही याबाबत खात्री असल्याने उन्हात विवस्त्र सायकल चालवणे या गोष्टीचा आनंद लुटता आला. 

तासभर सायकल चालवल्यानंतर या सायकल फेरीची सांगता होण्यास सुरवात झाली. एक एक करून सायकल स्वार Gasworks Lake Park या पार्क कडे सायकल वळवू लागले. येथील तलावामध्ये आंघोळ करून रंग धुवून काढावेत आणि (कपडे घालून) घरी जावे अशी योजना होती. मी backpack मधेच बदलण्यासाठी कपडे आणले होते. तलावामध्ये मनसोक्त डुंबून पार्क मधील हिरवळीवर थोडा वेळ पहुडलो. संध्याकाळची उन्हे उतरू लागली तसे कपडे घालून घरी जाण्यासाठी सायकल वर टांग मारली.  एक अभूतपूर्व अनुभव घेऊन तो आठवणींच्या गाठीशी बांधला होता. 

 (समाप्त)

सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

"सीअॅटल ते टाकोमा": एक रोमांचकारक सायकल सफर

 ४ जुलै २०१५ : सीअॅटल ते टाकोमा
 
सीअॅटल मधला उन्हाळा ऐन भरात होता. पाऊस आणि ढग यांनी महिनाभर तरी दर्शन दिले नव्हते. एव्हन या माझ्या मित्राने अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १०० मैल (१६० किमी)  सायकल सहलीचे आयोजन केले.
सीअॅटल डाउनटाउन मधील साउथ लेक युनिअन (SLU) मध्ये असलेल्या MOHAI (Museum Of History And Industry) येथे ४ तारखेला सकाळी ९:३० वाजता आपापल्या सायकली आणि शिदोऱ्या घेऊन सर्व जमले: एव्हन , त्याची प्रेयसी टेरा, इव्हान चे मित्र केविन आणि चेल्सी , माझा मित्र आणि ऑफिस मधील सहकारी पॉल आणि मी असे सहा जण. एकमेकांशी हस्तांदोलन करून आणि सुरवातीचा सेल्फी घेऊन आम्ही सायकल वर टांग मारली.

MOHAI , सायकल सहलीची सुरुवात


सीअॅटलच्या पश्चिमेस एलिअट बे ट्रेल नावाचा सायकलचा रस्ता आहे. तो पकडून आम्ही Alki Beach च्या दिशेने निघालो.  सीअॅटलच्या नैऋत्येस वसलेल्या टाकोमा शहराकडे जाण्यासाठी आम्ही अगोदर पूर्णपणे पश्चिमेला (पाणी दिसेपर्यंत) जाऊन मग किनाऱ्या लगतच्या दक्षिणमुखी रस्त्याने  सायकल सहलीचा आनंद लुटणार होतो.  Alki beach वरून दिसणारे सीअॅटल डाउनटाउनचे दृश्य अतिशय मोहक होते.

Alki Beach वरून दिसणारे Seattle शहराचे दृश्य


 सूर्य आग ओकत असल्याने बीच वर सूर्यस्नानासाठी झुंबड उडाली होती. बीच व्हॉलीबॉलचा खेळ ऐन रंगात आला होता.  तेथे ५ मिनिटे फोटो-ब्रेक घेण्यात आला. सफरचंद खाऊन आम्ही पुढील पल्ल्यासाठी ताजेतवाने झालो.
वाटेत Colman Pool हा खाऱ्या पाण्याचा पोहण्याचा तलाव लागतो. या तलावातील पाणी वेळोवेळी सागरी पाणी उपसून ताजे ठेवले जाते. अर्थात पोहण्यासाठी वेळ दवडणे आम्हाला परवडणारे नव्हते.
Lincoln Park नंतर सपाट रस्ता संपला आणि खरी कसोटी सुरु झाली. एकंदरीतच चढ-उतार जास्त असणारे आणि वळणा वळणाचे रस्ते आमची आणि सायकलच्या गिअर्स ची परीक्षा पाहू लागले. बुरिअन (Burien) शहरी पोचेपर्यंत १२ वाजून गेले. एव्हाना आम्हाला सर्वांना सायकल रपेटीसाठी चांगलीच लय सापडली होती. पॉल आणि एव्हन हे सर्वांत पुढे होते. मधील फळी केविन आणि मी , तर शेपूट फार लांबू नये याची काळजी टेरा आणि चेल्सी यांनी घेतली होती.
बुरिअन च्या दक्षिणेला किनारपट्टी च्या लगत जाणारा रस्ता विशेष आकर्षक झाला होता. बहुतांश घरांवर स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडे, पताका फडकत होत्या. येता जाता लोक "Happy forth" असे एकमेकांना शुभेच्छा देत होते.

एव्हन आणि टेरा पताकांनी सजलेल्या रस्त्यावर


Des  Moines (दे मॉय) हे शहर गाठेपर्यंत आम्ही ३० मैल अंतर कापले होते. मी "दे माय धरणी ठाय" हे बोलायचा फक्त राहिलो होतो.  दे मॉय हा सीअॅटल आणि टाकोमा यांमधील मध्यबिंदू आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्या ४ जुलै च्या शनिवारी दे मॉय येथे जत्रा असणार होती, त्यामुळे जत्रेतच दुपारचे जेवण घेऊ असा इव्हान आणि टेराचा बेत होता. पुष्कळ वैविध्य उपलब्ध असल्याने सर्वांनी आनंदाने त्याला संमती दिली. मी उकडलेली अंडी आणली होती, ती व  पिझ्झा चा एक तुकडा आणि सफरचंद असा दुपारचा खाना होता. जेवणासाठी सावली शोधण्याचा निष्फळ प्रयत्न करून झाला. अखेर उन्हातच आम्ही अंगत-पंगत केली. पॉल आणि चेल्सी ने जत्रेतील स्थानिक शेतकऱ्यांकडून चेऱ्या आणि द्राक्षे घेतली आणि ती आम्ही सर्वांनी फस्त केली.
एव्हन ने ठरवलेला रस्ता आणि चेल्सी ने त्याचा काढलेला कच्चा नकाशा याचा थोडक्यात आढावा घेतला. अंमळशी विश्रांती घेऊन आम्ही सायकल ला टांग मारली. पुन्हा चढण-उतरण असलेला घाटा घाटांचा रस्ता आमच्या स्वागताला हजार होता. प्रत्येक टेकडी चढून जाताना माझा दम निघत होता. पण माथ्यावर पोचताच विस्तीर्ण खाडीतील चमचमणारे पाणी डोळ्यांत चमक आणत होते, डोळ्यांना निववत होते.
साडेचार च्या सुमारास टेराला आईस्क्रीम खाण्याची लहर आली म्हणून आम्ही वाटेतील एका आईस्क्रीम पार्लर पाशी थांबलो. एव्हन , पॉल आणि टेरा आत गेले आणि केविन, चेल्सी आणि मी कडेलाच सायकलच्या रस्त्यावर पहुडलो. त्या सायकल रस्त्याच्या कडेला blackberries  ची अनेक झुडुपे होती.  रानटी Blackberries चा सुगंध वाऱ्याबरोबर आमच्यापर्यंत पोचला. आम्ही मनसोक्त खुडून blackberries खाल्ल्या. करवंदांच्या जाळ्यांची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. पार्लर मधून परत येताना एव्हन , टेरा , पॉल यांनी सर्वांसाठी थंड पेये आणली. आलुबुखार, मनुका, कलिंगड अशा फळांची ती पेये पिऊन आम्ही तरतरीत झालो.  पुढील पल्ल्यासाठी हुशारी  आली. टाकोमा जसजसे जवळ येऊ लागले तसतसा Mount Rainier हा डोंगर मोठा दिसू लागला. सीअॅटलच्या दक्षिणेस, १४००० फूट उंच असणारा हा डोंगर सदोदित हिमाच्छादित असतो. निरभ्र आकाश असलेल्या त्या दिवशी रेनिअर डोंगर फारच लोभस दिसत होता. टाकोमा डाउनटाउन येईपर्यंत ६ वाजत आले होते.
आम्ही जे घर भाड्याने घेतले होते ते नेमके टेकडीवर होते. तिथे पोचेपर्यंत सर्वांनाच  सायकली हातात धरून चालवत नेण्याची वेळ आली.  घर मात्र सुंदर होते. घराला दोन मजले होते. ३ शयनकक्ष,३ स्नानगृहे होती. मोठ्ठा दिवाणखाना होता. सुसज्ज स्वयंपाकघर होते. ६० मैल तरी सायकलिंग झाले होते. सर्वांनी आंघोळी उरकल्या.
संध्याकाळच्या खाण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. ४ जुलै मुळे  बहुतांश उपहारगृहे बंद होती. एक दोन तुरळक उपहारगृहे जेथे दारू सुद्धा मागवता येते , अशा ठिकाणी पॉल ला (तो २१ वर्षांचा नसल्या मुळे ) प्रवेश नाकारण्यात आला. नाईलाजास्तव आम्ही एका सुपर मार्केट मध्ये शिरलो आणि फळे, सुकामेवा, ऊर्जादायक पेये वगैरे घेऊन Waterfront कडे निघालो.  शहराच्या ज्या सीमेला लागून जलाशयाचा (खाडी, तलाव वगैरे) किनारा असेल त्याला Waterfront असे म्हणता येईल.
फटाक्यांची आतषबाजी बघता येईल अशी मोक्याची जागा मिळणे कठीण गेले. Waterfront  चा परिसर गर्दीने फुलून गेला होता. अवघे शहर तेथे रोषणाई बघण्यासाठी लोटले होते. एव्हन , टेरा , चेल्सी व केविन Waterfront वरील एका मोठ्ठ्या उपहारगृहात गेले. मी त्यांना सांगून पार्सल मागवले. पॉल व मी आजूबाजूला हिंडून चांगली जागा हेरली. जेवण करून आम्ही सर्व ६ जण तेथे जमलो. रात्री ठीक १० वाजता आकाश रंगीबेरंगी होऊ लागले. १५ मिनिटे फटाके वाजत होते आणि आकाशातील तारे सुद्धा असूयेने त्याचा आनंद घेत होते. ११-११:३० पर्यंत आम्ही तेथेच हिरवळीवर गप्पा मारत बसलो. परत घरी जाण्यासाठी चालत निघालो. वाटेत अनेक घरांमधून जल्लोषाचे आणि दंग्याचे वातावरण दिसत होते. त्यातीलच एका दिलदार घरातील मौजी तरुणांनी आम्हाला फुकट दारू देऊ केली. चालता चालता मदिरा प्राशन झाल्यावर आम्ही Taxi करणे पसंत केले. अर्धी टेकडी चढून तसाही दम लागला होताच. आणि घर बरेच दूर होते.
घरी पोचेपर्यंत १२ वाजून गेले होते. दुसऱ्या दिवशी लवकर निघणे क्रमप्राप्त होते.  थकलेल्या पायांना विश्रांतीची नितांत गरज होती. पाठ टेकताच झोप लागली.



५ जुलै २०१५ : टाकोमा ते ब्रेमेरटन आणि सीअॅटल पर्यंत "फेरी"

पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली.  सीअॅटलच्या बाहेर असल्याची  लगेच जाणीव झाली.  काल आणलेले खरबूज आणि इतर फळे नाश्त्यासाठी उपयोगी पडली.  चेल्सी, टेरा व मी योगासने केली. सकाळची थंडगार हवा आम्हाला सायकल चालवण्यासाठी जणू बोलावत होती. साडेआठ वाजताच आम्ही घर सोडले. टेराने तिच्या सायकलच्या दोन panniers (पेट्या) पैकी एक मला दिले जेणेकरून मला खांद्यांवर ओझे वहावे लागणार नाही.
गिग हार्बर या ठिकाणी पहिला थांबा होता. एव्हन पूर्वी तेथे जाऊन आलेला असल्याने (भरपेट ) नाश्ता करण्यासाठी उत्तम उपहारगृहे त्याला माहीत होती. जाताना एक प्रेक्षणीय ऐतिहासिक झुलता पूल (Tacoma Narrows Bridge नावाचा ) ओलांडण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. 

Tacoma Narrows पूल


१९४० साली कोसळलेल्या आणि पुन्हा बांधल्या गेलेल्या या पुलाला सहा दशकांचा तरी इतिहास आहे. टाकोमा शहर आणि Kitsnap द्वीपकल्प यांना जोडणाऱ्या या पुलाद्वारे आम्ही गिग हार्बर या शहराच्या ३ मैल परीघात आलो.
दहाच्या सुमारास आम्ही गिग हार्बर ला पोचलो. गर्दीने उसळलेल्या (पर्यायाने खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था असलेल्या) त्या ठराविक उपहारगृहात जाण्यासाठी मोठ्ठी रांग होती. भरपेट नाश्ता (जेवणच म्हणा ना ) करून आम्ही पुढे निघालो.  
गिग हार्बर पासून पुढे ३० मैल तरी प्रवास होता.  मजल दरमजल करत आम्ही Maplewood ला पोचलो. पायांतील सर्व स्नायू जणू सायकलचा एक भाग झाले होते. टेकड्या चढताना मांड्या भरून येत होत्या. अर्थात मागे फिरणे शक्यच नव्हते. आम्हा सहा जणांमध्ये मी सर्वांत मागे राहिलो होतो. सर्व जण दृष्टीआड गेले की आपसूकच जोर लावून सायकल हाणत होतो. जेथे चौक किंवा तिठा असेल तेथे पाचही जण थांबलेले असत. मी येताच पाणी देऊन किंवा टाळी देऊन माझे धैर्य वाढवत.
Port Orchard ला पोचेपर्यंत आम्ही योग्य रस्त्यावर होतो, मात्र तेथून सायकलचा रस्ता चुकल्यामुळे आम्ही चक्क महामार्गावर सायकल उतरवल्या. महामार्गाला ६ फूट तरी समास (shoulders) असतो , त्यातून जीव मुठीत धरून कडेकडेने (ते सुद्धा विरुद्ध दिशेने , म्हणजे रस्याच्या डावीकडून) जात राहिलो. सायकल चालवताना चाकोचाकी (पावलो पावली प्रमाणे ) पर्यायी रस्त्याचा शोध चालू होता. अखेर ३ मैल गेल्यानंतर ब्रेमेर्टन कडे जाणारा पूल आमच्या डोक्यावर होता.  हातात सायकली घेऊन जिन्याने पुलावर चढलो आणि मार्गी लागलो.
ब्रेमेर्टन पासून सीअॅटल ला फेरी बोट असते. ५५ मिनिटे घेणारी ही फेरी Puget Sound (Sound म्हणजे खाडी सदृश पाण्याचा मोठा साठा ) च्या पाण्याचे सुंदर दर्शन घडवते. आम्ही साडेचार च्या फेरीसाठी अगदी वेळेत पोचलो.
आजच्या दिवसाचे सायकलिंग : ४० मैल !  शंभराचा आकडा पार केल्याचे समाधान मिळाले.
सीअॅटल ला फेरी पोचली तेव्हा अजूनही थोडे सायकलिंग बाकी असल्याची जाणीव झाली.  फेरी च्या थांब्यापासून घरी जाताना गेल्या ३६ तासांमधील दमून जाऊनही जगलेले आणि आराम न करताही टवटवी देऊन गेलेले क्षण डोळ्यांसमोरून तरळून गेले. एक निरोगी छंद म्हणून सायकल चालवणाऱ्या मित्रांकडून बरेच काही शिकायला मिळाले. पुन्हा काहीतरी साहसी करण्याची खुमखुमी मिळाली.

(सर्व छायाचित्रे : टेरा , एव्हन)

(समाप्त)