गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

रोहिडा : फक्त ब्लॉगसाठी !

३० जुलै २०१६

रोहिडा : असाही एक "विचित्र"गड !

यंदाचा पावसाळा पुण्यात काढायचा असल्याने ट्रेक ठरणे अनिवार्य होते. बरीच चर्चा होऊन ३० तारीख ठरली. आयत्या वेळी नेहमीच्या किल्लेस्वारांनी नेहमीप्रमाणे नन्नाचे पाढे वाचले. गुढघे दुखी , पाठदुखी अशी कारणे डॉक्टरांच्या चिठठीसोबत दाखवून  काहींनी शिव्या न खाता यशस्वी माघार घेतली. अखेर कनक, रोहन, मयुरेश उर्फ पंचा आणि मी अशी चांडाळ चौकडी उरलो. एस.टी. ऐवजी कार ने जाण्याचा निर्णय झाला, तेव्हाच समजले की आता पूर्वी सारखं  राहिलं  नाहीये. दुचाकी, चारचाकी  असे अनेक पर्याय मित्रांमध्येच उपलब्ध आहेत. "वाट पाहीन पण एस. टी. नेच जाईन" हे ब्रीदवाक्य एके काळी जगलेले आम्ही, "कसेही जाऊ पण ट्रेक ला जाऊ" असे म्हणत ३० जुलै ला सकाळी ७ वाजता आनंदनगरहून निघालो.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे रोहन वेळेवर आला होता. पंचाने चारचाकी आणली होती. तोच आमचा चालकही होता.
त्याने भरधाव गाडी सोडली आणि त्याबरोबर तोंडाचा पट्टाही. विशिष्ट हेल काढून बोलत आणि  विनोदी (ता)शेरे ओढत त्याने सर्वांची फिरकी घ्यायला सुरवात केली. रोहन आणि कनक यांनी हास्याचे सातमजली फवारे उडवण्यास सुरवात केली. महामार्गावर गाडी येताच कडेला घेऊन सेल्फी काढण्यात आले. सर्वानी ठरवलेले खाद्य पदार्थ आणले आहेत ना याची शहानिशा करण्यात आली. रोहन ने तिखट पुऱ्या आणि कनक ने आम्रखंड आणले नाही असे सांगितल्यामुळे जरा हिरमोड झाला. मी फक्त १० पोळ्या(च) आणलेल्या असल्याने त्याबरोबर काय खायचे हा प्रश्न होता. पंचाने मटकी भेळ करण्यासाठी मटकी ची उसळ आणली होती व कनक ने टोमॅटो सॉस आणला होता. त्यामुळे तो प्रश्न सुटला. महामार्गावर जाताना आमच्या शेजारी शाळेच्या सहलीची बस जात होती व त्यातील मुले बालसुलभ दंगा घालत होती. पंचाने खिडकीतून डोकवून बघणाऱ्या एकाला असे काही दरडावले की पूर्ण बसच थोड्या वेळासाठी चिडीचुप झाली.

कनक ने सांगितलेला मॅकडोनाल्ड शेजारचाचा पेट्रोल पंप आल्यानंतरच पेट्रोल भरण्यात आले. कनक ने सांगितल्याप्रमाणे तेथील प्रसाधनगृह घरच्यासारखे स्वच्छ होते. पंचाने त्यावर कनक ला " तू रोज इथेच येतोस का " असा टोला लगावला.  टोल चे आणि पेट्रोल चे पैसे भरल्यानंतर माझ्या जवळ फक्त ३ रुपये उरले होते आणि त्याची विनोदी घोषणा करून मी माझ्या पायावर धोंडा मारुन  घेतला. मला गाडीतून खाली उतरवण्याची भाषा सुरु झाली.
भाटघर धरण आल्यावर फोटो काढायला ऊत आला.

भाटघर धरण 


हिरवाईतून वाट काढणारे रस्ते आणि आपणहूनच रस्त्याची शोभा वाढेल या अनुषंगाने नेटकी वाढलेली झाडे यांमुळे छायाचित्रणास बराच वावदेखील होता.

एक सुंदर रस्ता 


भोर फाटा येईपर्यंत हिंदी-इंग्रजी गाणी वाजवून कोणाला बोर होऊ दिले नाही. त्यातून कनक ने लग्न ठरल्याची बातमी देऊन बोलायला अजून एक विषय दिला. बोलण्याच्या नादात पंचाने भोर फाटा थोडक्यात चुकवला पण मग शिताफीने रॉंग साईड ने जाऊन त्याने मोठेच धारिष्ट्य दाखवले. भोर येथे साईराज या कनक ने सुचवलेल्या उपहारगृहात नाष्टा करण्यासाठी थांबलो. एकंदरीत कनकला  पेट्रोल पंप पासून हॉटेल पर्यंत आणि हाय वे पासून भोर मधील गल्ली बोळांपर्यंत  काय खावे,  कुठे वळावे सगळीच माहिती असल्याने त्याला सर संबोधण्यात आले. त्यात भर म्हणून त्याने धरण, महामार्ग, कुंपण आदि बांधकामे आणि त्यात घ्यावयाची काळजी या विषयावर एक छोटेखानी व्याख्यानही दिले.
साईराज हॉटेल मधील पोहे मात्र चविष्ट होते. चहा मागवताना मी कोरा चहा मागवल्याने काही कपाळांवर आठ्या पडल्या. आश्चर्य म्हणजे दूध आणि साखर घातलेल्या चहाचे १० रुपये आणि कोऱ्या चहाचे मात्र १५ रुपये आकारण्यात आले.

साईराज हॉटेल (येथे खाल्लेले बाधत नाही - कनक सर )


भोरच्या मुख्य चौकातून रोहिडेश्वर किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याला दिशादर्शक बाण दाखवला आहे.  बाजारवाडी हे पायथ्याचे गाव असून भोर पासून अंदाजे १० किमी अंतरावर आहे. गावातील शाळेजवळ गाडी लावून आम्ही पार्किंगचे ४० रुपये भरले. शाळेत शिकवणे सुरु होते. तेथे " बाई, वाड्यावर या " अशी निळू फुलेची नक्कल करुन पंचाने हशा पिकवला.

रोहिडेश्वराच्या पायथ्याशी 


चढाईचा श्रीगणेशा करतानाचा सेल्फी झाला. हवामान ढगाळ असले तरी पाऊस नव्हता, त्यामुळे वातावरण आल्हाददायक होते. हिरव्या रंगाच्या असंख्य छटा आमच्या अवतीभवती होत्या. दोन पावले चालून झाली नाही की फोटोची  फर्माईश होत होती. त्यात रोहन आघाडीवर होता. फोटो उभाच घे, आडवाच घे असे त्याचे चालू होते.

सर्व बाजूंचा देखावा (Panorama)

"हे फोटो फक्त तुझ्या  ब्लॉग साठी आहेत , त्यात personal असं  काही नाहीये" असे म्हणत त्याने स्वतःचा पोर्टफोलिओच करून घेतला.  अर्थात Nexus-६ या फोनचे मला फारच कौतुक असल्याने मी मनमुराद छायाचित्रे टिपत होतो.


किल्ल्याच्या वाटेवरून जाताना दिसणारे एक मनोहर दृश्य 

वाटेत अनेक पैसे (एका प्रकारचा सुरवंट)  दिसत होते. त्यामध्ये एक मोठा सुरवंट दिसताच "हा त्यांच्या जगातील अॅनाकोंडा आहे" अशी टिप्पणी ऐकायला मिळाली.

एक देखणा सुरवंट 


चढताना विश्रांती साठी थांबलो तेव्हा, "सर्द हवेमध्ये राजगिरा लाडू खाणे चांगले असते" हा एक जावईशोध लावण्यात आला.
तसेच गवत छाटून आणि दगड रचून सेल्फी काढण्यासाठी फोन जमिनीवर उभा (किंवा  रोहन म्हणेल तेव्हा आडवा) करण्यात आला.

सेल्फी !


पाऊण-एक तासात रमतगमत वर गेलो. पहिल्या महादरवाजा पाशी नोंद वही घेऊन पारंपारिक मावळ्याच्या वेशातील दरवान होता.त्याने आम्हाला क्षणभर सतराव्या शतकात नेले. त्या वहीत कनक ने स्वतःचे नाव लिहून आमची नोंद इतर म्हणून केली.  गडावर संवर्धनाचे काम जोरात सुरु असल्याने मुख्य दरवाजा सुस्थितीत दिसत होता.

रोहिडेश्वराचे मुख्य प्रवेशद्वार 


तेथे येथेच्छ फोटो काढण्यात आले.  तेथून १५-२० पायऱ्या चढून गेल्यावर दुसरा दरवाजा लागला. त्याजवळच पाण्याचे टाके होते.  तिसऱ्या दरवाजाचे दर्शन होताच पुन्हा एकदा काळ ४०० वर्षे मागे गेल्याचा भास झाला.

रोहिडा किल्ल्याचे तिसरे प्रवेशद्वार 


मावळ्याच्या वेशातील दरवान आणि धुक्यात अंधुकसा दिसणारा जुनाट दरवाजा ! हे स्वप्न क्षणभंगुर ठरले कारण दोनच मिनिटांत टी शर्ट आणि बर्मुडा घातलेली मुले आली आणि मला पुन्हा वास्तवाचे भान आले.
या दरवाजाच्या दोनही बाजूस हत्तीचे मस्तकशिल्प आहे.याच  दरवाजावर मराठी (मोडी) आणि पर्शियन भाषेत शिलालेख आहेत.

गजमस्तक शिल्प , रोहिडेश्वर 


तेथून आत गेल्यावर लगेचच उजवीकडे सदरेचा बुरुज लागतो. तेथे आम्ही बोर्बोन आणि ओरिओ या बिस्किटांचा फडशा पाडला. तेथील दरवान चंद्रकांत यांसही न्याहारीत सामील करुन घेतले.

किल्ला बघण्यास आम्ही द्वाराच्या उजव्या बाजूने प्रारंभ केला. गडावरील अनेक बुरुजांना ज्या कुटुंबाने त्याची डागडुजी केली होती, त्यांची (आड)नावे दिली होती. 
पाटणे बुरुज, रोहिडेश्वर 

पाटणे चा बुरुज येथे आम्हाला जेवणासाठी मोक्याची कोरडी जागा मिळाली. कनक ने आम्रखंडाचा डबा काढून आम्हाला सुखद धक्का दिला. रोहनने सॅण्डविचेस , पंचाने भेळ आणली होती.

Lunch with Katrina !


त्यासोबत खाण्यासाठी आणलेली मटकीची उसळ मात्र खराब झालेली असल्याने ती टाकून देण्याचा निर्णय झाला. आमच्या कडे एकूण १०  पोळ्या असल्याने आणि रोहनची सॅण्डविचेस भलतीच हिट झाल्याने त्या कशा संपणार अशी विवंचना होती, पण त्याच निर्णायक क्षणी पुष्करने हजेरी लावली. किल्ल्यावरील एक भटक्या कुत्र्याला आम्ही आमचा परम मित्र पुष्कर ऊर्फ पुक्या असे बोलवत होतो. 


पुक्या !


त्याने त्याच्या वाट्याच्या पोळ्या खाल्ल्या आणि आम्हाला हायसे वाटले. पंचा ने चुरमुरे आणि फरसाण वेगळे आणले असल्याने दाणे चट्कन दिसत नव्हते. ते एकत्र केल्यावर दाणे शोधण्यासाठी अभूतपूर्व अहमहमिका रंगली.  मात्र कनकने त्याने शोधलेल्या दाण्यांचे समान वाटप करुन त्या बालिश स्पर्धेतील हवाच काढून घेतली. 
हास्यविनोद करत भरपेट जेवण झाले. त्यानंतर पुन्हा किल्ला बघण्यासाठी धुक्यातून वाट काढत जाऊ लागलो. चोर दरवाजा, चुन्याच्या घाण्याचे अवशेष अशा नमुनेदार गोष्टी पहावयास मिळाल्या. 


चुन्याची घाणी, रोहिडेश्वर 


किल्ल्यावरील रोहिडमल्ल म्हणजेच भैरवनाथाच्या मंदिरात बरीच गर्दी होती. आम्ही गर्दी अजून न वाढवता गड उतरण्यास सुरवात केली. 
प्रवेशद्वारा पाशी अभिप्राय लिहून आम्ही गडावरील संवर्धनकार्यास उत्तेजन देण्यासाठी अल्पशी देणगी दिली. 
किल्ला उतरताना आमची खरी कसोटी होती. हळूहळू धावा जमवण्यास सुरवात झाली (म्हणजे घसरण्यास).


रोहिडेश्वराची हिरवाई 


कनक सर आता स्थापत्यशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांवर बोलून झाल्याने ज्योतिषशास्त्र आणि ग्रहगणित यांवर बोलू लागले. शरद उपाध्ये आणि त्यांचे (अश्लील) राशीभविष्य यावरही बरीच चर्चा रंगली. शास्त्राच्या संकल्पना मांडून दाखले  की निसर्गातील दाखले बघून शास्त्र संकल्पना असा एक उद्बोधक परिसंवाद पंचा व कनक या दोघांत रंगला. मी व रोहनने त्यावर अलिप्तपणे शेरे मारून त्याची मजा लुटली. अनुरूप ही विवाहसंस्था आणि एकंदरीतच लग्न जुळवण्याची पद्धत, त्यात काळानुरुप आलेले बदल यावर कनक व रोहन ने १००० मुली डोळ्याखालून घातल्यासारखे दांडग्या अनुभवाचे डोस पाजले. गप्पा मारत  निवांतपणे २ वाजेपर्यंत खाली आलो. शाळेजवळच्या टपरीवर चहा घेतला. 
पुण्याला परत जाताना बनेश्वरला थांबलो. तेथील मंदिरात कनक सरांनी परकीय आक्रमणेआणि राजांची देवस्थाने या विषयावर प्रबोधन केले. मंदिरातील कुंड आणि त्यातील चक्रव्यूह, पाणी साठवण्याची व्यवस्था
प्रेक्षणीय होती. जलक्रीडा करणारी कासवे आणि त्यांच्या सोबत मिळून मिसळून राहणारे मासे लोभस दिसत होते.


बनेश्वर येथील कुंड 


 दर्शन घेऊन आम्ही बाहेरील एका टपरीवर चहा व वडापाव रिचवला. बनेश्वर येथील वन उद्यानात जाण्यास कुणीच उत्सुक नसल्याने आम्ही पुण्याची वाट धरली. नेकलेस पॉईंट पाशी थांबलो. मोठ्या आशेने एकांतासाठी तेथे आलेल्या प्रेमी युगुलांना फारसा त्रास न देता काही छायाचित्रे टिपून (युगुलांची नव्हे) आम्ही ५ च्या सुमारास पुण्यात परतलो.
नेकलेस पॉईंट 


 एक निवांत एक दिवसाचा ट्रेक झाला होता. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच काही नवीन आठवणी तयार केल्या होत्या. 
चार यार !



९ टिप्पण्या:

  1. bhaltach kalla kelela disto..ya sarvace uncensored version aikayche ahe..
    Pukya wala balach ahe barr ka..baki photo bhari ale ahet

    उत्तर द्याहटवा
  2. Sahich re unmya..... harami sagya...sagala khara aahe...tuzyavar pan hota te uncensored madhe aahe

    उत्तर द्याहटवा
  3. Google translation sucks :p Hope you enjoyed India (looks like india at least) :)

    उत्तर द्याहटवा
  4. Uttam likhan... __/\__
    Unmesh, me nimitta matra hoto re photos sathi... :P (kharach sarva kahi blog sathi kele...)

    उत्तर द्याहटवा