बुधवार, २० नोव्हेंबर, २०२४

बॉस्टन मधील घष्टन


 बॉस्टन विमानतळावर विमान उतरले तेव्हा चांगलाच पाऊस पडत होता. उबर पिक अप पॉइंट शोधणे एक दिव्य ठरले. दोन तीन मजली पार्किंग आणि प्रत्येक मजल्यावर राईड शेअरिंग ॲप चे पिक अप होते. दोन मजले खाली वर करून ५-१० मिनिटांनंतर एकदाचा तो कावलेला उबर चालक सापडला. बिचारा थांबून राहिला होता. एखादा दुसरा असता तर राईड कॅन्सल करून गेला असता.

जुल्स मला घ्यायला दारापाशीच थांबला होता. त्याने चक्क गरमागरम पराठे करून माझे स्वागत केले. जोडीला त्याच्या पाकिस्तानी प्रेयसीने केलेला मटार पुलाव आणि रायते होते. तिचे नाव "कायनात" हे फक्त हिंदी चित्रपटात शाहरुख खानच्या तोंडी च ऐकले होते. त्यांनी माझे छान आदरातिथ्य केले. चकली आणि फरसाण चे भरून ठेवलेले डबे बघून तर एखाद्या भारतीय घरी असल्या सारखे वाटले. माझा बेड तयार करून ठेवला होता. मस्तपैकी आंघोळ करून लवकर झोपलो.

बॉस्टन मधील भारतीय जेवण



रविवार २२ सप्टेंबर

जुल्स ने नाश्त्याला पुन्हा गरम गरम पराठे केले. माझ्या पद्धतीने सुद्धा मी त्याला दोन पराठे करून दाखवले.

पराठे करताना जूल्स 



नाश्ता करून जुल्स जिम ला गेला आणि मी वॉक साठी बाहेर पडलो. जॉन फित्झिराल्ड केनेडी या अमेरिकेच्या एका माजी राष्ट्राध्यक्षाचे घर बाहेरून पाहिले. बॉस्टन युनिव्हर्सिटी student village मधे जाऊन तेथील gym पाहिले. Christie बरोबर Life Live नावाच्या रेस्टॉरंट मधे जेवलो. तिला ८ वर्षांनी भेटत होतो. बऱ्याच शिळोप्याच्या गप्पा झाल्या. तिच्या दोन मांजरी, आमचे सीॲटल चे मित्र सगळ्याला उजाळा दिला. ब्लू स्पिरुलिना स्मूथी पिऊन एकमेकांचा निरोप घेतला.

ख्रिस्टी आणि मी बॉस्टन मधे  



ब्लू बाईक रेंट करून मी बॉस्टन डाउनटाउन मध्ये गेलो. सायकलच्या लेन्स हिरव्या रंगाने मार्क केल्या होत्या. ऑस्टिन पेक्षा बरीच चांगली अवस्था होती. सायकलला थोडा तरी मान होता. जुल्स आणि कायनात आधीच डाउनटाउन मधे गेले होते. त्यांना भेटलो आणि आमची छोटीशी वॉकिंग टूर सुरू झाली. बॉस्टन चे डाउनटाउन थोडेसे लंडन सारखे वाटते. बऱ्याच जुन्या धाटणीच्या इमारती आणि लाल विटांची घरे (म्हणजे लाल विटा स्पष्ट दिसतील अशी घरे, इतर घरांमध्ये ही लाल विटा वापरल्या असतील तरी त्या प्लॅस्टर वगैरे करून झाकल्या होत्या).
एका मोठ्या मॉल मध्ये फुलांचे प्रदर्शन बघायला गेलो. मॉल मधे ठिकठिकाणी फुलांनी माणसाचे पुतळे सजवले होते. त्यात एक तथाकथित मुघल कालीन भारतीय स्त्री ची प्रतिमा होती. तिला पिवळ्या फुलांचा साज चढवला होता.
Newberry street नावाच्या प्रसिद्ध रस्त्यावरून चालत आम्ही तेथील खास शैलीत बांधलेल्या इमारती पहिल्या आणि अर्थातच फोटो काढले.

जूल्स आणि मी बॉस्टन मधे  



कायनात आमचे फोटो काढून अभ्यास करायला घरी निघून गेली. जुल्स आणि मला छान गप्पा करायला वेळ मिळाला. नदी किनारी पार्क मधे चालता चालता आम्ही निवांत हितगुज केले. ऊन खात खात आकाश आणि त्याचे मन दोन्ही मोकळे होत होते. मुलीच्या येण्याने आयुष्यात होणारे बदल हे सार्वत्रिक असतात हे लक्षात आले. त्याचे उर्दू शिकणे, भारतीय/पाकिस्तानी स्वयंपाक करायला आणि तिखट खायला शिकणे सगळेच मजेदार होते. Acorn street पर्यंत सोबत करून जुल्स त्याच्या घरी गेला. Acorn शोधायचा बराच प्रयत्न करूनही त्या रस्त्यावर काही केल्या acorn सापडला नाही.

Acorn street , बॉस्टन 



मग लक्षात आले की रस्त्यावरील ८ क्रमांकाच्या घरावर अकॉर्न च्या आकाराचा knocker होता, त्यामुळे त्या रस्त्याला तसे नाव मिळाले होते.

घर क्र. ८ Acorn street 



बॉस्टन कॉमन नावाच्या पार्क मधे फिरायला गेलो. तिथे शेकडोच्या संख्येने खारी होत्या. नुसत्या बागडत नव्हत्या तर बाकांवर बसलेल्या गरीब पर्यटकांना दम देऊन तर कधी काकुळतीला आल्या सारखे दाखवून त्यांच्या कडून खाऊ मिळवत होत्या. साहजिकच खाऊन माजलेल्या आणि त्यामुळे ढोल्या झालेल्या त्या खारी त्यांच्या ढोल्यांमधे मावत नव्हत्या. बॉस्टन कॉमन मधे खारींचा असा मुक्त संचार बघणे अनकॉमन होते.

बॉस्टन कॉमन 


खारींच्या लीला बघून मी Macy's मधे गेलो. एक ट्रीप पुरता वापरता येईल असा टॉवेल घेतला. संध्याकाळी एवन कडे जेवायचे निमंत्रण होते. एवन ब्रुसेल्स मध्ये भेटला होता आणि आम्ही निर्वासितांना कॉम्प्युटर एकत्र शिकवले होते. तो नुकताच बॉस्टन मध्ये move झाला होता. त्याच्यासाठी वाईन घेतली . त्याचे घर पूर्ण रिकामे होते. वाईन ओपनर सुद्धा नव्हता की बसायला खुर्च्या.
पण त्याने हॉल मध्ये मेणबत्त्या लावून बाजूला सतरंज्या घातल्या होत्या. ओवन मधे टाकून बनवता येतील असे पदार्थ आणले होते. रेडी टु इट असे इंडियन पदार्थ होते (छोले, पालक पनीर) पण त्याबरोबर खाता येतील असे नान किंवा भात असे पदार्थ नव्हते. त्याचा चुलत भाऊ बेंजी त्याच्या शेजारी राहत होता. त्याच्याकडून भात आणि पातेले घेऊन आम्ही तिथे भात रांधला. Mulled tea आणि वाईन पीत गप्पा केल्या. एवानचा मित्र joao जोआओ आणि माझा मित्र जुल्स हे पण जेवायला आले होते. जोआओ MIT मधे phd करत आहे आणि शिवाय बरनिंग मॅन ला जाऊन आलेला होता. त्याचा सेन्स ऑफ ह्यूमर आवडला. त्याने सांगितलेला एक जोक चांगलाच लक्षात राहिला. How does a mansplainer get his water? Answer " From a Well actually".
एवनचा भाऊ बेन्जी डॉक्टर होण्यासाठी अभ्यास करत होता. त्याच्यात शालासुलभ उत्सुकता होती. आणि आमच्याशी बोलताना त्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्याने आमच्या साठी कूकी बेक केल्या.
संपूच नये असे वाटणारे ते गप्पांचे गाव आवरते घ्यावेच लागले.
झोपताना एवान ला एक अनोखी फरमाई श केली. फ्रेंच गोष्ट ऐकत झोपावे असे मला वाटत होते. फ्रेंच भाषेचा ध्वनी मला फारच गोड वाटतो आणि एव न उत्तम फ्रेंच बोलू शकतो. त्याने फ्रेंच व्यंग चित्रकाराने केलेले एका मांजरीचे पुस्तक वाचून दाखवले.

mull केलेली वाईन 



सोमवार २३ सप्टेंबर

MIT कॉलेज ची टूर बुक केली होती. त्यासाठी सकाळी सकाळी लवकर आवरून आम्ही पावणे दहाच्या सुमारास त्यांच्या स्वागत कक्ष असलेल्या इमारतीत पोचलो. फक्त जाहिरात असेल असे वाटलेल्या प्रेझेंटेशन मधून MIT बद्दल काही रंजक गोष्टी समजल्या.

कुनिही MIT मधे आला की त्याला ६ कोर्सेस कम्पल्सरी घ्यावे लागतात. त्यांपैकी दोन Calcuis शी निगडीत आहेत. सायकॉलॉजी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा Calculus शी संबंधित हे कोर्सेस करावेच लागतात.

शिवाय पोहणे ही एक graduation requirement आहे. पोहता येत नसेल तर तुम्हाला डिग्री मिळत नाही. बॉस्टन मधे बरेच तलाव आणि नदी असल्यामुळे पोहता न आल्यामुळे आमचे गुणवंत विद्यार्थी मरु नयेत असा त्यामागे उद्देश असावा.

MIT मधे वर्गांत रँक किंवा डिग्री साठी ऑनर्स अशा गोष्टी अस्तित्वात नाहीयेत. कारण नाहीतर विद्यार्थी एकमेकांशी स्पर्धा करतील आणि collaboration (परस्पर सहयोग?) कमी होईल.

MIT, Boston 



MIT चा सुप्रसिद्ध डोम  



आमची टूर गाईड दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती जिला MIT बद्दल फारशी माहिती तर नव्हतीच शिवाय टूर गाईड कडे असायला हवा तो उत्साह सुद्धा नव्हता. आमच्या प्रश्नांना ती गुगल करा असे त्रोटक उत्तर देत होती. अर्ध्या तासानंतर कंटाळून आम्ही टूर मधून शब्दशः काढता पाय घेतला. जोआओ ज्या इमारतीत कामाला होता तेथे गेलो. त्याने आमचे चांगले स्वागत केले आणि आम्हाला brain and cognitivie science बिल्डिंग ची चांगली ओळख करून दिली. त्याचे ऑफिस दाखवले. मेंदूच्या रचनेची प्रेरणा घेऊन बनवलेले sculpture दाखवले.
MIT नंतर एवन ला घरी काम असल्याने मी एकटाच शहरात गेलो.
बॉस्टन मधील माझ्या कंपनीच्या सहकाऱ्यांना भेटलो आणि आम्ही एकत्र लंच केला.

Crunchr टीम @ बॉस्टन 



बॉस्टन वॉकिंग टूर साठी गेलो. Long wharf नावाच्या डॉक ला जिथे बोटी बघता येतील आणि फेरी घेता येतील अशा फेरी टर्मिनल पर्यंत चालत गेलो. वाटेत पुन्हा बॉस्टन कॉमन या पार्क मधून फेरफटका मारला . Dunkin donuts कडे ढुंकूनही पाहिले नाही.

फेरी टर्मिनल डॉक 

पावला-पावलावर दिसणारे इतिहास जतन करण्याचे प्रयत्न 

बॉस्टन मधील एक रंगीत चौक 

सोनेरी गाढवाची गोष्ट सांगत लोकांना गाढव बनवणारा टूर गाईड 

साडे सहा वाजता सालसा क्लास साठी जायचे होते. त्यासाठी बॉस्टन मेट्रो वापरून बघितली. बऱ्यापैकी युरोपियन मेट्रोज सारखीच होती. जुल्स, कायनात आणि त्यांचा मित्र अली सगळे सालसा नाचासाठी तय्यार होते. साधारण तासाभराचा क्लास होता. मी आधी सालसा शिकलेलो असल्याने बेसिक्स माहीत होते. पण त्या क्लासमध्ये छान नवीन turns (म्हणजे वळणे नव्हे तर गिरक्या) शिकायला मिळाले/मिळाल्या. मनसोक्त गिरक्या घेऊन आणि क्लास चालू असताना एकमेकांच्या फिरक्या घेऊन आम्ही सालसा क्लास ची मजा लुटली.
क्लास नंतर जुल्स आणि कायनात बरोबर एक चक्कर मारली. एवन एव्हाना क्लासच्या परिसरात आला होता. त्याच्याबरोबर कायनात ने सुचवलेल्या थाय रेस्टॉरंट मध्ये गेलो. आम्हाला बसायला नेमकी फिश टँक शेजारची जागा मिळाली होती. त्यामुळे ऑर्डर केल्यावर माश्यांचे निरीक्षण आणि त्यांवर अनावश्यक टिप्पणी करण्यात वेळ मजेत गेला.
आमचे जेवण पूर्ण होईपर्यंत एक सोनेरी मासा एका कोपऱ्यात न हलता बसून/उभा राहिला होता, किंवा तरंगत होता (पण तो तर पाण्यात बुडालेला होता, असे म्हणूया की तो पाण्या खाली अविचल समाधी मधे गेला होता) तो मेला आहे असे मी सुरवातीच्या पाच मिनिटांतच मी जाहीर केले होते मात्र एवनच्या मते तो निराश मासा होता कारण त्याला त्या पिंजऱ्यात कोंडले गेले होते. ते काही का असेना, आमचे जेवण झाले तसे तो मासा हलला, नुसता हलला नाही तर सुळकन शोभेच्या खडकांत कोरलेल्या शोभेच्या कपारीत शिरला. आम्ही रेस्टॉरंट मधून बाहेर पडलो आणि consumerism नावाच्या खडकातील कुठली शोभेची कपार आम्हाला भुलवती आहे ते बघू लागलो. मेट्रोने एवनच्या घराच्या जवळ गेलो आणि त्या परिसरातील काही शोभिवंत इमारती आणि कारंजी यांचे फोटो काढून घरी परतलो. उद्या सकाळची फ्लाईट लवकर असल्यामुळे लवकर झोपी गेलो.

(क्रमशः)





मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०२४

ऑस्टिनच्या आठवणी

 २०१६ साली अमेरिका सोडून युरोपला आल्यानंतरची ही पहिलीच अमेरिका ट्रिप ... 


१६ सप्टेंबर
न्यू यॉर्क ला उतरल्यावर आवासन (immigration) ५ सेकंदात झाले.
एरवी आवासन होत असताना अवसान गळालेले असते, तो कस्टम ऑफिसर कोणते प्रश्न उलट सुलट विचारून तुमची विकेट काढेल याचा नेम नसतो. मात्र डच पारपत्राचा(passport) प्रभाव लक्षात आला आणि "किती दिवस राहणार" या एका प्रश्नाने माझी सुटका झाली.
 
 
न्यू यॉर्क ते ऑस्टिन फ्लाईट दुसऱ्या टर्मिनल वरून होती. तिथे जाईपर्यंत बराच वेळ गेला. शिवाय सिक्युरिटी साठी त्या टर्मिनल वर फारच गर्दी होती. ओळीला "रांग" का म्हणतात हे तिथे लक्षात आले. अक्षरशः रांगत जावे लागेल अशा गतीने ती मोठ्ठी रांग पुढे सरकत होती. ऑस्टिन च्या फ्लाईट ची वाट बघत असताना Dunkin donuts मधून pumpkin spice latte घेतली. जवळजवळ लीटर भर मोठ्ठ्या ग्लासात अर्धा किलो साखर घातलेले ते पेय, वेळ घालवण्याचे साधन म्हणून कामी आले. ऑस्टिन चे विमान वेळेच्या अर्धा तास आधी पोचले.
हर्षल मला घ्यायला आला होता. विमानतळावरून त्याच्या घरी जायला अर्धा तास लागला. जाताना टेस्ला कंपनीची लांबलचक इमारत दिसली. हर्षलचे घर फ्लुगरविल या गावात होते. रात्रीच्या वेळी तिथे कमालीची शांतता होती.
घरी पोचताच मला हर्षलने गरम गरम पोळ्या करून घातल्या. त्याला मी मजेने हर्षल-माऊली असे नाव दिले.

हर्षल-माऊली  



फ्लॉवर बटाट्याची भाजी आणि पोळ्या खाऊन मी तृप्त झालो. त्याची बायको स्नेहल आणि त्याने माझ्यासाठी एक खोली तयार केली होती. उत्तम अशी बडदास्त ठेवण्यात आली होती. सुरेख रंगसंगती असलेले पडदे, चादरी आणि अभ्रे, पाण्याच्या बाटल्या, फ्रेश टॉवेल, जे काय हवे असू शकते त्या सर्व गोष्टींचा विचार केलेला होता.


१७ सप्टेंबर 

सकाळी गजर न लावता उठलो. चहा-पोहे हा टिपिकल मराठी नाश्ता मिळाला. सकाळी स्नेहलशी ओळख झाली. नाश्ता करत आणि पुण्यातल्या मित्रांशी फोन वर हितगुज करत करत आम्ही दिवसाचं प्लॅनिंग केलं.
हर्षल ने त्याच्या कामातून वेळ काढून मला त्यांचा महाल दाखवला , त्यांच्या घराला घर म्हणणे जिवावर येत होते. सकाळच्या मस्त सूर्य प्रकाशात आम्ही बाहेरून घराची टूर सुरू केली.

हर्षल चे "स्नेह"ल  सदन  



टुमदार हे विशेषण त्या घरासाठीच बनले आहे असे वाटले. प्रशस्त नाही अशी कुठलीच गोष्ट त्या घरात नव्हती. स्वयंपाक घर असो की लिव्हिंग रूम, पॉर्च असो की बेडरुम सर्वकाही भव्य होते. दुपारचे जेवण म्हणजे मुगाची उसळ आणि पोळ्या होते. स्नेहल आणि हर्षल ने केलेली लसणाची चटणी जेवणाची लज्जत वाढवीत होती. पुन्हा चविष्ट मराठी जेवण करून मी त्यांचा निरोप घेतला.
उबर करून पॉल कडे जायला निघालो. पॉलचा तिसावा वाढदिवस होता.
उबरचा चालक फारच मदतसू होता. वाटेत सेवन इलेवन मधून मला काही खरेदी करायची होती तर तो शांतपणे बाहेर थांबला. तीस चोखता येतील अशा गोळ्या (जंबो) घेऊन (३० थर्टी sucks) अशी विनोदी भेट त्याला द्यायची होती. मात्र माझे एकही कार्ड तेथे चालले नाही. अखेर पॉल भेटल्यावर त्याला कोरड्या शुभेच्छा देऊन माझी बॅग त्याच्या अपार्टमेंट मध्ये टाकली. आणि आम्ही सायकली काढल्या . सीॲटलमधे राहत असताना पॉलसोबत असंख्य वेळा एकत्र बाईक राईड केल्या होत्या. एकदम उत्साहाने आणि आत्मविश्वासाने हेल्मेट न घालता Hyde park हून आम्ही डाउनटाउन कडे निघालो. ऊन रणरणत होते. ३४-३६ अंश सेलसिअस तापमान होते. हॅट-गॉगल्स असा सगळा जामानिमा केला होता.
UT Austin 


वाटेत UT Austin चा कॅम्पस लागला. तेथील इमारती सप्टेंबर महिना असल्याने विद्यार्थ्यांनी फुलून गेल्या होत्या. कॅम्पस मध्ये introduction month निमित्त विशेष कार्यक्रमांची रेलचेल दिसत होती.
डाउनटाउन मधून जाताना मधेच बाईक लेन मिळत होती, मधेच इतर वाहनांसोबत जीव मुठीत घ्यावा लागत होता. कॉलोराडो रिव्हर ही नदी ऑस्टिन मधून वाहते. या नदीच्या किनाऱ्या किनाऱ्याने दोन्ही बाजूंस सायकल/पादचारी मार्ग केला आहे. आम्ही सायकली चालवत (इथे पुलंच्या "पुणेकर मुंबईकर नागपूरकर" मधील पुण्यात सायकल चालवणे हे हत्यार चालवणे किंवा चळवळ चालवणे अशा अर्थाने अभिप्रेत आहे)
किनाऱ्यावरील प्रेक्षणीय स्थळे पाहत होऊ घातलेला सूर्यास्त आणि उतरतानाही चटका देणारी उन्हे अनुभवत होतो. Deep Eddy pool नावाच्या तलावा पर्यंत पोचलो तेव्हा दोघांचे कपडे घामाने चिंब झाले होते. ते बदलून आम्ही तलावात येथेच्छ डुंबलो. सूर्यास्त होऊन तलाव बंद होईपर्यंत पाण्याचा आस्वाद घेतला.
Torchy Tacos मधे जाऊन Texmex खाल्ले. Fried Avocado हा प्रकार पहिल्यांदाच खाल्ला. त्यानंतर Hopfields नावाच्या लोकल बार मधे जाऊन अपेयपान केले आणि केक व पाय सारखे मिष्टान्न सुद्धा रिचवले. जड जेवण आणि पोर्ट वाईन यांच्या संयुक्तिक परिणामामुळे मस्त झोप लागली.

१८ सप्टेंबर 

बुधवारचा तसा काही प्लॅन ठरवला नव्हता. Quacky नावाच्या बेकरी मधे सकाळी चालत गेलो. Hyde park नावाचा भाग जवळून बघता आला. पॉलच्या घराजवळच Baptist Church होते. एकंदर शेजार टिपिकल Texan सबर्ब सारखा वाटत होतं. Young Sheldon या मालिकेची आठवण करून देणारा परिसर होता अगदी. ती बेकरी पण विशेष होती. Kolache आणि Danish अशी नावे धारण केलेली पॅटीस तिथे होती. शिवाय croissant वर अत्याचार करून ओढून ताणून (शब्दशः) काही पदार्थ बनवून ठेवले होते. Cupcakes चे अनेक प्रकार होते. पॉलला आवडणारे काही आणि मला आवडलेले काही असे पदार्थ घेऊन पॉलच्या घरी परतलो. एकत्र नाश्ता केला.
टोनी नावाचा couch surfing वर भेटलेला मित्र मला घ्यायला आला.
व्हेनेझुएला हून येऊन अमेरिकेत त्याने ग्रीन कार्ड मिळवले होते. त्यालाही lake Travis येथे जायचे होते आणि मलाही. आम्ही गॅस शेअर करण्याच्या तत्त्वावर एकत्र निघालो. प्रवासात त्याने त्याचे अमेरिकन ड्रीम त्याने कसे साकारले याची गोष्ट ऐकवली. कुणाही थर्ड वर्ल्ड देशांमधून अमेरिकेत आलेल्या व्यक्तीची जशी एक कहाणी असते तशीच त्याचीपण होती. पण त्याच्या बोलण्यातून अहंकार किंवा अभिनिवेश जाणवत नव्हता. हिप्पी हॉलो नावाच्या नुडिस्ट भागात आम्ही छान सावली बघून पसरलो. गप्पा, थोडे ध्यान आणि बरेचसे पोहून आम्ही लेक Travis चा आनंद लुटला. या तलावातील पाणी अतिशय स्वच्छ होते. पाण्यापर्यंत पोचण्यासाठी मात्र खडकाळ भागातून चढ उतार करावे लागत होते. पण रणरणत्या उन्हात थंड पाण्यात पोहण्याचा आनंद काही औरच होता.

हिपी हॉलो, टेक्सास 



परत ऑस्टिन कडे येताना टोनी कडून तेथील फूड ट्रक कल्चर बद्दल कळले. अनेक चांगले शेफ प्रसिध्दी मिळावी म्हणून हॉटेल्स मधील नोकऱ्या सोडून स्वतःचे फूड ट्रक चालवू लागले, हे चालवणे पुन्हा चळवळ चालवणे अशा अर्थी आहे कारण एके काळी तो ट्रेण्ड बनला होता आणि त्यामुळेच आज ऑस्टिन मधे शेकडो फूड ट्रक आहेत जेथे स्वस्त आणि मस्त जेवण मिळते. अशाच एका फूड ट्रक मधे आम्ही "पोके बोल" घेतला आणि Juice Land या ज्यूस साठी प्रसिध्द असलेल्या दुकानामधून "असाही" बोल घेतला. असाही असा-ही एक पदार्थ असतो हा एक शोध लागला. यात ब्राझिलियन "असाही" नावाचे सुपरफुड berries 🍒 बरोबर serve केले जाते.

"असाही" एक bowl  



Granola बरोबर फळे आणि योगर्ट खावे तसा तो बोल दिसत होता. पण त्यात फ्रोजन नारळ आणि "असाही" हे नवीन पदार्थ होते. साधारणपणे नाश्त्याला खाल्ला जाणारा हा पदार्थ इथे ज्यूस शॉप मधे मिळतो आणि तो कधीही हेल्दी म्हणून खाल्ला जातो असाही एक शोध लागला.
पोटपूजा करून esercy सारख्या नावाच्या liquor shop मधे गेलो. तिथून पॉल साठी वाईन बॉटल ठेवण्यासाठी vintage लाकडी पेटी आणि हर्षल स्नेहल साठी मॉस्को-म्युल पिण्यासाठी खास असे तांब्याचे कप घेतले. तिथे चक्क रातकिडे आणि इतर छोटे कीटक वाळवून खारवून विकायला ठेवले होते. एका पॅकेज मधे विंचू होता (मेलेला आणि खाण्यासाठी भिजवलेला)


विंचू कँडी 


टोनी ने मला पॉल कडे सोडले. पॉलचे काम संपल्यावर आम्ही HEB मधे गेलो. HEB म्हणजे तिथले एक मोठ्ठे सुपरमार्केट आहे. तिथून भारतीय स्वयंपाक करण्यासाठी साहित्य आणले. पपई, कलिंगड आणि "तेखोकोते" नावाचे नवीन मेक्सिकन फळ घेतले. शिवाय Grandma's hummus आणि चिप्स घेतले. घरी येईपर्यंत खूप दमून गेलो होतो. फक्त हमस आणि चिप्स खात गप्पा मारल्या. "Family Guy" बघता बघता झोपी गेलो.


१९ सप्टेंबर
Quacky बेकरी पासून दिवसाची सुरूवात झाली. आज काल पेक्षा वेगळे पदार्थ ट्राय केले. नवीन चवीचे कपकेक्स, iced coffee इत्यादी घेऊन पॉलकडे आलो. एकत्र नाश्ता केला. मग मी कंटाळा न करता ब्राऊन राईस आणि मुगाची उसळ असे जेवण बनवले. पॉलने चवीने उसळ खाल्ली. जेवण करून मी एकटाच डाउनटाउन मधे फिरायला गेलो. मुख्य आकर्षण म्हणजे Austin Central Library. या वाचनालयाला संग्रहालय म्हणणे सुद्धा वावगे ठरणार नाही. सहा मजली आकर्षक इमारत. प्रत्येक मजला विशिष्ट वयाच्या लोकांसाठी किंवा विशिष्ट गोष्टींसाठी राखीव होता. जसे की पहिला मजला फक्त लहान मुलांची पुस्तके, मासिके, वगैरे. पाचवा मजला बोर्ड गेम्स खेळणाऱ्या लोकांसाठी राखीव. ठिकठिकाणी बसायची व्यवस्था होती. दोन मजल्यांवर कॉम्प्युटर उपलब्ध होते. विशेष म्हणजे तिसऱ्या मजल्यावरील एक विभाग आंतरराष्ट्रीय पुस्तकांसाठी राखीव होता आणि त्यात चक्क मराठी पुस्तके होती.
होय, अगदी देवनागरी मध्ये लिहिलेली. "नारायण धारप" सारखी नावे ऑस्टिन मधील वाचनालयात वाचून मराठी ऊर भरून आला.

ऑस्टिन वाचनालयातील मराठी पुस्तके 



वाचनालयातून बाहेर पडल्यावर शहरात निरुद्देश भटकलो. कोणत्याही दुकानात जा, काहीबाही विचार, कुठेतरी फोटो काढ असे करत वेळ घालवला.




Austin Downtown 



हर्षल आणि स्नेहल संध्याकाळी मला घ्यायला आले. त्यांच्या नेहमीच्या थाय रेस्टॉरंट मधे घेऊन गेले. तिथे भेंडी घातलेली हिरवी करी मला खूप आवडली. Lotus मार्गारिटा आणि व्हिस्की सारखे पण मेक्सिकन पेय असलेले कॉकटेल सुद्धा आवडले. एवढे जेवण होऊन सुद्धा काहीतरी वेगळे म्हणून फ्रोजन milk-icecream खायला गेलो. बासुंदी युक्त आइस्क्रीम असा तो अतीगोड प्रकार होता. मला अर्थातच आवडला. हर्षल+स्नेहलच्या घरी आल्यावर चकाट्या पिटणे आणि गॉसिप असा प्लॅन होता, मात्र सोफ्यावर बसल्यावर ५ मिनिटांतच हर्षल ची विकेट पडली आणि आम्ही लवकर झोपलो.

२० सप्टेंबर

आजचा दिवस अमराठी नाश्त्याचा होता. ऑमलेट आणि ब्रेड. खसखस वगैरे घातलेले ब्रेड स्नेहल ने मस्त तूप लावून भाजून दिले. ते ब्रेड आणि ऑमलेट, चहा असा नाश्ता करून मी जवळील तलावावर जाण्यासाठी निघालो. हर्षलची सायकल घेऊन आणि जीव मुठीत घेऊन (आणि आज मात्र हेल्मेट घालून) निघालो. या भागात तर सायकल लेन्स नावाला सुद्धा नव्हत्या. सुदैवाने कार सायकल पाहून जपून बाजूने जात होत्या.

फ्लुगरविल तलाव 



लेक फ्लुगरविल हा तलाव मानवनिर्मित असून त्याच्या आजूबाजूला फारशी झाडे नाहीत. वाळूचा बीच छान ठेवला आहे. फारशी गर्दी नव्हती. घाम येईपर्यंत सूर्यस्नान करून मी पोहून घेतले.

फ्लुगरविल तलावालगतचे कधीही न वितळणारे आईस्क्रिम



ऊन आता मी म्हणायला लागले होते. हर्षल च्या महाली परतलो. त्यांनी आज खास घरगुती दाणे युक्त मसाला वापरून रस्सा भाजी केली होती. भात, पापड , ती भाजी आणि सॅलड असा मस्त बेत होता. दुपारी त्यांची ऑफिस ची कामे उरकेपर्यंत मी Trail नावाचा बोर्ड गेम शिकून घेतला.
हर्षल चे काम झाल्यावर कॉस्टको मध्ये जाऊन मला आवडलेले नीरा सारखे लागणारे नारळ पाणी घेतले. पॉल साठी candies घेतल्या. घरी आल्यावर ३० candies निवडून त्याचा हार केला. स्नेहल ने "थर्टी sucks" असे मस्त फाँट मधे लिहून दिले.

सर्व आवरून आम्ही अखेरची संध्याकाळ एकत्र घालवायला निघालो. सुरूवात बियर ने झाली. त्याबरोबर focaccia नावाचा भन्नाट इटालियन ब्रेड आला होता. चीज आणि ब्रेड इतके बेमालूम एकमेकांत मिसळले होते की प्रत्येक घासाला दोन्ही सम प्रमाणात लागत होते. बरोबर मिळालेल्या लसूण सॉस ने त्या अनुभवात आणखीन च लज्जत आणली. संगम नावाच्या चेट्टीनाड रेस्टॉरंट मधे वेटींग असून थांबून गेलो आणि त्याचे सार्थक झाले. मेदू वडा सांबार, पनीर चिली आणि चिक्कू शेक सगळेच घरची आठवण आणणारे होते.
भरपेट जेवण झाल्यावर त्यांनी मला "निकेल सिटी" या बार मधे सोडले जिथे पॉल त्याचा वाढदिवस साजरा करत होता.
हर्षल कडून माझे कपडे आणि इतर सामान प्लास्टिक पिशवीत आणि बॅकपॅक मधे होते. शिवाय नीराच्या बाटल्या होत्याच. पॉल साठी केलेला हार अजून वेगळ्या पिशवीत होता. सगळे सांभाळत बार मधे शिरलो आणि लोकांच्या नजरांची तमा न बाळगता पॉल-शोध-मोहीम आरंभली. त्याने १५-१६ लोकांना बोलावले होते त्यामुळे त्याचे मित्र बारमध्ये चहूकडे पसरले होते. अखेर एका कोंडाळ्या मध्ये त्याला हेरले. एक छोटासा भरतभेटी सारखा प्रसंग झाला. त्याला "३० sucks" वाला बनवलेला हार घातला. त्याचे मित्र बहुतेक सायकल चालवणारे किंवा आवडणारे असे होते. ब्रिटनी एक मस्त मजेदार मुलगी होती, तिचा बॉयफ्रेंड सॅम, फिनाशी डच मधे बोललो. Travis हा तिचा बॉयफ्रेंड पण बोलका होता. सगळ्या १५-१६ मित्रांशी बोलता आले नाही. जतिन आणि समा विशेष भावले. आमच्या vibes चांगल्या मॅच झाल्या. दीड पर्यंत बार मधे टाईमपास करून पॉलच्या घरी परतलो. समा, जतिन यांनी सकाळी गाजर हलवा केला होता तो खाल्ला. फारच मस्त जमला होता. माफक गप्पा करून झोपलो.


२१ सप्टेंबर

आज पुन्हा Quacky बेकरी ! समाने आणलेल्या tandem bike वरून त्या बेकरीत गेलो. आज बेकरी मधे बसून सगळ्या गोष्टी फ्रेश आणि गरम खाल्ल्या.

जतीन, पॉल , समा आणि मी @ Quacky बेकरी  



पुन्हा पॉलच्या घरी येऊन आवरून (मी माझी बॅग वगैरे पॅक करून) बार्टन स्प्रिंग येथे जायला निघालो. ऑस्टिन मधील नैसर्गिक जिवंत पाण्याचे झरे असलेले ठिकाण म्हणजे बार्टन स्प्रिंग.




तेथे पेड आणि फ्री असे दोन भाग होते. आम्ही अर्थातच फ्री भागात गेलो. कार ने जाऊनही पार्किंग मिळणार नाही या भीतीने दूरवर एका पुलाखाली गाडी लावून आम्ही अर्धा तास चालत त्या स्पॉट वर पोचलो. झऱ्याचे पाणी एका छोट्या नदीच्या प्रवाहा सारखे दिसत होते. पाणी गार होतेच शिवाय जिवंत झऱ्याचे असल्याने स्वच्छ सुद्धा होते. आम्ही ज्या भागात गेलो होतो तेथे एका झाडाला दोर लावला होता. ज्यावर झोके घेऊन पाण्यात उडी मारता येत होती. अर्थात हा प्रयोग मला करायचाच होता. पहिली उडी फेल गेली, दोरी हातातून निसटली आणि उजव्या हाताची बोटे दोरीवर घासली गेली. दोरीला अनेक ठिकाणी मजबूत गाठी मारलेल्या असल्यामुळे बोटांना झटका चांगलाच जाणवला. दुसरी उडी मस्त जमली. दोरीच्या उडी नंतर पुढील आव्हान होते पुलावरून उडी मारण्याचे. हा पूल २६ फूट उंच होता, तिथे अनेक तरुण मुले उड्या मारत होती त्यामुळे हुरुप आला आणि ते धाडस केले. मजा आली. मस्त कलिंगड खात आमच्या भेटीचा समारोप केला. पॉल ने मला विमानतळावर सोडले आणि घट्ट आलिंगन देऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.