प्रबळगड (मुरंजन) - कलावंतीण दुर्ग : REUNION ट्रेक२७,२८,२९ एप्रिल २०१२
क"रुणनिर्देश"
प्रस्तुत लेखामधील सर्व पात्रे वास्तविक असून घटना रंजक पद्धतीने सांगण्यासाठी त्यांचा काल्पनिक विस्तार केला आहे. याबद्दल खेद व्यक्त करू नये; या विषयीच्या टिप्पणी (COMMENTS ) विचारात घेतल्या जाणार नाहीत. आता येऊ घातलेल्या वर्णनात असलेले संवाद , सु (किंवा कु) विचार , विनोद या विषयी कोणीही मालकी हक्क सांगू नये. लेखक हा टेप- रेकोर्डर नाही याची कृपया नोन्द घ्यावी. कोणत्याही ओळींत बदल सुचवू नये किंवा वाढीव वाक्य जोडू नये ही नम्र विनंती!
आता खरा ऋणनिर्देश (ACKNOWLEDGEMENTs ) :
हा ट्रेक ठरवण्यासाठी जमलेल्या कनक, रोहन आणि सागरचे सर्वप्रथम आभार ! ट्रेक ठरलाच नसता तर आम्ही गेलोच नसतो :D ट्रेक साठी जमलेले सर्व मावळे ज्यांनी आपापल्या परीने ट्रेक मध्ये "जान" आणली, ज्यांच्यामुळे ट्रेक साठी वर्णन लिहिले जात आहे त्यांची मनस्वी आभार ! सह्याद्री - जो गड-किल्ल्यांच्या दुनियेतला ब्रह्मदेव आहे , ज्याने घडवलेल्या पाषाणपुष्पांचा गंध दुर्गवेड्यांना नियमितपणे आकर्षित करत असतो , त्या सह्य-पर्वताला नमन! ठाकूरवाडीतील ठाकर -भूतांबरा ज्यांनी आम्हाला जीवनच (पाणी) दिले नाही तर जीवनासाठी एक आठवणीची शिदोरी सुद्धा दिली. ठाकरांशिवाय हा ट्रेक यशस्वी होऊच शकला नसता, त्यांना मनापासून धन्यवाद !
आम्हा सर्वांचे पालक ज्यांनी आम्हाला ट्रेकला जाऊ दिले, काळजीचे शब्द ऐकवून , रागावून , ओरडून पण तरीही प्रेमाने पोळीभाजीचा डबा दिला , खाऊचे डबे दिले , आणि "नीट जा" हा निरोप दिला, त्यांचे आशीर्वाद स्मरून ऋण निर्देश संपवतो.
दिवस पहिला : शुक्रवार २७ एप्रिल २०१२ : पन'वेल' पर्यंतचा रम'वेल' असा प्रवास!
यंदाचा हिवाळा ट्रेक न करता गेला या पापाचे प्रायश्चित्त भर उन्हाळ्यात ट्रेक करून घ्यायचे असे ठरवले होते. जवळ-जवळ 2 वर्षांनी शाळेतल्या ग्रुप मधील सर्व मंडळी एकत्र पुण्यात होती (आणि ट्रेकला येण्यास उत्सुक होती ). विशेषतः रोहन-सागर-सिद्धेश हे धमाल त्रिकूट ट्रेक ला येणार होते .
शुक्रवारी ऑफिस मधून येतानाच अनेक अपशकून झाले. परोठे बनवून देणाऱ्या मेस च्या बाईने दीड तास घालवला. बिस्किटे -वेफर्सचे नेहमीचे दुकान बंद होते. भरीस-भर म्हणून घरी पोचलो तेव्हा वीज गेली होती. सर्व तयारी अंधारात विजेरीच्या प्रकाशात करावी लागली. १०.३० वाजता
निघताना दिवे आले आणि चिडचिड करत मी घरातून बाहेर पडलो. आनंदनगर च्या बस-थांब्यावर ११.०० वाजता भेटायचे ठरले होते. ११.५५ ची पुणे-बोरीवली गाडी पकडायची होती. तीत पनवेल पर्यंतचे आरक्षण केले होते. ११.२० झाले तरी कोणाचाही पत्ता नव्हता; फोन केल्यावर "निघालोच आहे, आलोच, इथेच आहे" , अशी मोघम, ठरलेली उत्तरे मिळाली. अखेर ११.३० ला सर्व जण येताना दिसले आणि त्याच सुमारास आलेली स्वारगेट ला जाणारी बस थांबवण्यात आली. रोहन-सागर च्या गगनभेदी हास्याने ट्रेक चा श्रीगणेशा झाला. बस दांडेकर पुलापर्यंत आली तोच मला "भेळ्या"चा फोन आला. भेळ्या म्हणजे "श्रेयस बेलसरे" (जे नाव कधी उच्चारले नाही ते लिहिताना खूप त्रास झाला आहे; हे रमणबागीय वाचकांना सांगणे न लगे ). राजगडच्या ट्रेकला पातेलं वाजवून उपस्थित ट्रेकर्सची वाहवा मिळवलेला; ही त्याची ट्रेकर म्हणून ओळख ! तो त्याच वेळी (११.४५ ला ) पनवेल ला पोचला होता; त्याला "आलोच" म्हणून कळवले.
आम्ही अगदीच वेळेवर स्वारगेटला पोचलो; प्रसाद पैठणकर हा जुना शिलेदार आमचीच वाट पाहत होता. आता आम्ही सात झालो होतो. (कनकानय (ही दोन नावे आहेत), सिद्धेश, सागर, रोहन, पैठ्या (प्रसाद) आणि मी ) एस.टी. महामंडळाने आम्हाला स्थिरावण्यास पुरेसा वेळ दिला. ११.५५ ची गाडी सुमारे १२.३० वाजता निघाली. कनकने सर्वांत मागील जागा आरक्षित करून स्तुत्य कामगिरी केली होती. हसण्यासाठी आता कारण नको होते, जोक्स सुद्धा नको होते, प्रसंग सुद्धा नको होते; हवे होते फक्त मैत्र, निखळ चेष्टा आणि एकमेकांची मर्मस्थाने !
सेनादत्त पोलीस चौकीपाशी गाडी थांबली; कारण: एका मोठ्या कुटुंबाची गाडी चुकली होती; आणि त्यांनी आरक्षण केले होते. ते गाडीत शिरताना त्यांचा चालक-वाहका बरोबरचा वाद चांगलाच रंगला. आम्ही त्यावरही टीका-टिप्पणी करत हसून 'घेतले'. गाडी एक्स्प्रेस हायवेने सुसाट निघाली. कनक वेळोवेळी कुठे आलो आहोत याची माहिती देत होता ; त्याला GPS हे सार्थ नाव मिळाले. लोणावळ्याला गाडी थांबली तेव्हा रोहन व मी सोडून सर्वांनी चहा घेतला आणि हळहळले. चहा इतका पाणचट होता की पूर्ण ग्लास संपवणे त्यांना अशक्य झाले.
पनवेल च्या जवळ एक्स्प्रेस हायवे जेथे सोडणार होतो तेथे वाहतुकीचा खोळंबा झाला होता (TRAFFIC JAM). आडव्या-तिडव्या घुसवलेल्या गाड्या आणि कोणाचेही ऐकत नसलेले ड्रायव्हर यांमुळे पनवेलला वेळेत पोचू की नाही याबद्दल शंका निर्माण झाली. तोच आमच्या कंडक्टरने खाली उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रवाशांना आवाहन केले. आम्ही जणू याची वाटच पाहत होतो. आम्ही ७ जण त्या हायवे वर ट्राफिक पोलिसाचे काम करू लागलो. इतर वाहनांमधूनही काही उत्साही मंडळी मदतीला होती. आमचा मार्ग मोकळा व्हायला अर्धा-पाऊण तास लागला. एक नवीन अनुभव मिळाला. ४ च्या सुमारास पनवेल आगारात गाडी पोचली.
पनवेलला पोचताच भेळ्याला फोन करून तो खरच आला आहे ना याची खात्री करून घेतली. प्रशस्त असलेल्या एस. टी. स्थानकावर चांगली जागा पकडून आम्ही झोपायचा प्रयत्न केला. मला खरच काही वेळ झोप लागली; त्या वेळात माझ्यावर जोक्स झाले असतील याबद्दल माझी खात्री आहे. पाच वाजताची ठाकूरवाडीची एस.टी. आम्हाला हवी होती. झोप झाल्यावर पोह्याची गाडी कुठे दिसती आहे का याचा शोध घेतला; पनवेल सारख्या ठिकाणी पोह्यांचा नाश्ता (पहाटे ४.३० वाजता) मिळू नये ही दुर्दैवी गोष्ट होती (!) अखेर कॉफी पिऊन आम्ही नवीन दिवस सुरु झाला आहे अशी आमची समजूत घातली. या गाडीने सुद्धा उशीर केला. ५.३० च्या सुमारास गाडी आली आणि गाडीत फक्त आम्ही ८ जण होतो; इतर "पब्लिक" नसताना आता दंगा करण्यात काही अर्थ नव्हता. पहाटेची वेळ असल्याने बाहेरचे वातावरण विशेष आल्हाददायक होते. गाडी शेडुंग फाट्यावरून आत गेली आणि प्रबळगड दृष्टीपथात आला.
सव्वा सहा वाजता गाडी ठाकूरवाडीला पोचली. येथील हनुमानाचे दर्शन घेऊन लगेच चढाईला सुरवात केली. या गावातील घरांची उंची तेथे राहणाऱ्या लोकांचे "उंची राहणीमान" दर्शवत होती. धारप इस्टेट नावाचा भाग बंगलेवाल्या मंडळींनी चांगलाच विकसित केला आहे. विशेषतः "खन्ना हाउस" या आकर्षक घराने आमच्या मनात घर केले.
किल्ल्याची उंची बरीच (२३०० फूट) असल्याचे रोहन सुरवातीपासूनच सर्वांना "परत चला, विचार बदला" असे म्हणत होता.आम्ही पश्चिमेने चढाई करत असल्याने ऊन लागेल ही भीती नव्हती. वाटेत उन्हाळा असूनसुद्धा झाडे पुष्कळ दिसत होती. एकमेकांना "घेणे" आणि मुद्दाम जोरात हसणे चालूच होते. आम्हाला चढणीमुळे कमी आणि हसण्यामुळे जास्त दम लागत होता. त्यातच मनीषा नामक अज्ञात प्रेमिकेने प्रियकराचे वाभाडे काढणारा मजकूर वाटेतील एका सिमेंटच्या पाईपवर लिहिलेला आम्हाला दिसला: "प्रेम कर'ने' चूक नाही ..." अशी गावठी सुरवात असणाऱ्या त्या मजकुरात सुरवातीलाच मोठी चूक होती. पुढे वाटेत वेळोवेळी ही मनीषा आमची हसण्याची मनीषा पूर्ण करत राहिली.
साधा रस्ता असून सुद्धा SHORT CUT म्हणून आणि बरोबर असलेली ठाकर मुले गेली म्हणून एकदा आम्ही वेगळा रस्ता घेतला. या वाटेने आमचा चांगलाच दम काढला. विशिष्ट उंची गाठल्यानंतर आम्हाला एक फोटोजेनिक खडक (SPOT )मिळाला. तेथे येथेच्छ फोटोसेशन झाले.
काकड्या खाल्ल्याने ताजेतवाने वाटले .येथून जवळच एक म्हातारी स्त्री पाण्यासाठी आक्रोश करत होती. ती वेडी असावी असे प्रथम-दर्शनी वाटले पण गडावरून खाली येणाऱ्या लहान मुलीमुळे ती वेडी नसल्याचे कळाले. तिने आम्हाला हास्य-विनोदाच्या मूड मधून अचानक चिंतन करण्यास भाग पाडले. जेथे आम्ही दोन दिवस मौज-मस्ती करायला येतो, तथाकथित ट्रेक करतो अशा डोंगर-कड्यांवर घर करून राहणारे ठाकर कशा परिस्थितीशी झुंज देत असतात हे समजले. रोज ट्रेक करूनही त्याबद्दल चकार शब्द न काढणारे ठाकर खरच ग्रेट आहेत. आम्ही दरवाजापाशी पोचेपर्यंत एक ठाकर मुलगा ३ वेळा पोती घेऊन खाली जाऊन वर आला होता. दरवाजाजवळच हनुमान-गणेशाच्या कोरीव मूर्ती आहेत.
दरवाजापाशी तटबंदीचे अवशेष सुद्धा दिसतात. येथी एक छान बांधलेला पार आहे. येथे भेळेचा - बिस्किटांचा नाश्ता झाला. कंटाळा येईपर्यन्त फोटो काढून झाले. अख्खा दिवस नाहीतरी वेळ काढावा लागणार होता, म्हणून निवांतपणेच वर जाणे आम्ही पसंत केले. येथून ५ मिनिटांच्या अंतरावर WELCOME घर आहे. निलेश होम सर्व्हिस चा बोर्ड आपले लक्ष वेधून घेतो.
येथील ठाकर- भूतांबरा यांच्याकडे आम्ही पाणी भरून घेतले. त्यांचे घर जणू नंतर आमचेच झाले होते; इतकी आपुलकी त्यांनी आम्हाला दाखवली. यांना विचारून आम्ही प्रथम कलावंतीण दुर्ग सर करण्याचे ठरवले.
कलावंतीणच्या वाटेने जात असतानाच सागरला गुडघ्याचा त्रास सुरु झाला; आणि त्याने वर न येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आमच्या सॅक्स सागर कडे ठेवून आम्ही वर निघालो. हा रस्ता सुद्धा बराच चढणीचा होता. वाटेत लागलेल्या करवंदांच्या जाळ्यांमुळे ही वाट गोड आणि सुसह्य झाली.प्रबळगड आणि कलावंतीण यांमध्ये एक खिंड आहे तेथून कलावंतीणसाठी डावीकडून जावे लागते. खिंडीतून उजवीकडे गेल्यास एक लपलेली गुहा नजरेस पडते, एखादे भुयार असावे अशी तिची रचना आहे.
खिंडीत पोचतानाच तो सुळका धडकी भरवत होता. फोटोमध्ये दिसत असणाऱ्या नागमोडी सुंदर पायऱ्या या मांडी इतक्या उंचीच्या होत्या. आधाराला रेलिंग किंवा शिडी नव्हती. पण परीक्षेसाठी वर्गात आल्यावर पेपर लिहिणे भाग असते. पास होवो वा नापास ! मनाचा हिय्या करून सुळक्यावर निघालो.
प्रत्येक पाऊल जपून टाकत जात होतो. सर्वोच्च ठिकाणी जाण्यासाठी एक रॉक-पॅच पार करावा लागणार होता. येथून वर जायची काही गरज नाही असे वाटत होते; पण झेंडा फडकविल्याशिवाय परत यायचे नाही असे जणू पैठ्याने ठरवले होते. रॉक-पॅच मधून ROUTE ओपन करण्याचे काम त्याने केले. त्याच्या पावलावर शब्दशः पाऊल ठेवून आम्ही वर पोचलो:
काहीतरी मिळवल्याचे समाधान चेहऱ्यांवर होते. काठीत अडकलेला झेंडा सोडवून झेंडा खरोखरीच फडकवला. जय-भवानी - जय शिवाजी च्या घोषणा दिल्या. आजूबाजूचा परिसर डोळे भरून पहिला. दक्षिणेला माणिकगड, नैऋत्येला कर्नाळा, शेजारी प्रबळगड, इरशाळगड , माथेरानचे पठार .... त्या रखरखीत उन्हात सुद्धा शांत भासत होते. सह्याद्री आहेच मुळी अविचल.. त्याची निर्मिती असलेल्या या सर्व किल्ल्यांना सुद्धा स्थितप्रज्ञ ऋषींची धीरगंभीर मुद्रा लाभली आहे. कधीही बघा, ते डोंगर , ते कडे न बोलताच तुमचे हृदय व्यापून जातील.
अलंकारिक चिंतन संपताच जाणीव झाली की उतरायचे कसे हा विचारच केलेला नाहीये... या वेळी कनक ने पहिला नंबर लावला आणि मग मार्गदर्शन घेऊन इतर खाली उतरू लागले. खाली येताना पाय अक्षरशः थरथरत होते कारण पाय ठेवायचा कुठे हेच दिसत नव्हते. खाली पोचलेल्या मंडळींनी उत्तम गाईड केल्याने खाली उतरता आले. पायऱ्यांचे आव्हान आता इतके राहिले नव्हते. खिंडीत परत पोचलो तेव्हा घसे सुकले होते. कनक-रोहन यांनी त्यांच्या सॅक्स आणल्या होत्या; त्यात जपून ठेवलेले पुण्याचे पाणी काढायची वेळ आता आली होती. तासाभरातच आम्ही सागर जेथे थांबला होता , तेथे पोचलो.
मी सॅक मधून मोसंबी काढली आणि मला पुष्कळ लोकांनी (विशेषतः रोहनने) त्यांचे पुण्य दिले. सुदैवाने मोसंबी गोड निघाली , अन्यथा पुण्य मागे घ्यायला कोणीही मागे-पुढे पहिले नसते. भूतांबरा यांच्या घरी जाऊन लिंबू सरबताचा आनंद घेतला.
कनकने इतक्यात जेवणासाठी सावलीची जागा शोधली होती. उत्साहाने तिकडे गेलो तर ती एक उतरण होती. बसायला किंवा डबे ठेवायला सुद्धा सपाट जागा नव्हती, परत फिरण्याचे त्राण सुद्धा नव्हते. या जागेला "नीलायमचा उतार" (पुण्यातील सहकारनगरकडे जाणारा एक उड्डाणपूल ) असे "वाढीव" नाव देण्यात आले. तेथे आम्ही जेवण आटोपले.
कनक चे पेटंट श्रीखंड-आम्रखंड , रोहन च्या तिखट पुऱ्या हेच ITEM हिट झाले. जेवणानंतर त्या तोकड्या सावलीत झोपण्यासाठी भांडणे झाली. दादा, सिद्धेश व मी पारावर झोपायला गेलो. तेथेही थोड्या वेळाने सूर्य आग ओकू लागला. नाईलाजाने भूताम्बरा यांच्या घरी गेलो व बाहेर झाडाच्या सावलीत पडी टाकली. रोहन, पैठ्या व सिद्धेश सुद्धा तेथेच पहुडले. कोंबडा दुपारी ४ वाजता आरवल्याने व घरातील लहान मुलगा रिषभ याने पातेलं वाजवल्याने झोपमोड झाली आणि मनोरंजन सुद्धा ! "कोंबड्याचा दिवस १२ तासांचा असतो" सारखे पाचकळ विनोद सुद्धा झाले.
५ च्या सुमारास सागर- भेळ्या यशस्वीपणे झोपून परत आले तेव्हा "लगेच घरी जाऊ" या मागणीने जोर धरला. रोहन ला सागर च्या तब्येतीचे उमाळे येत होते. सागर ला त्रास होऊ नये म्हणून घरी जाऊ , त्याला सोबत म्हणून प्रबळगडावर येणार नाही असे सगळे म्हणत होते. दादा व कनक आल्यावर मात्र कोणी खाली जायचे नाव काढेना अन लगेच प्रबळगडावर जायला तयार सुद्धा होईनात. अखेर मुक्काम करून रविवारी सकाळी पुढचा बेत ठरवावा असे ठरले.
पुन्हा एकदा लिंबू सरबत प्राशन झाले. घरातील पाळीव कुत्री, कोंबड्या यांचे फोटो काढले गेले. संध्याकाळ होऊ लागली तसे आम्ही प्रबळमाची वरील मैदानात उतरलो. किल्ल्यावरून सूर्यास्त पाहणे हा नेहमीच सुंदर अनुभव असतो. ट्रिक फोटोग्राफी करण्याचा प्रयत्न झाला.
रात्रीचे जेवण म्हणजे बिर्याणी-रेडी मिक्स होते! कनक ने पाणी छान उकळवले (!) ज्यामुळे बिर्याणी छान शिजली. पिठले-भाकरी, पापड , लोणचे असा खाना आम्ही भूताम्बरा यांजकडून मागवला होता; त्यामुळे फक्कड बेत जमला.
कोंबडा आरवून आरवून दमला, गजर वाजून वाजून बंद पडले. 5 वाजता उठायचे ठरले असताना आम्ही 6.30 पर्यंत लोळत होतो. आन्हिके उरकून चहापान झाले. मी एकट्यानेच मग आणला होता त्यामुळे "मग" त्यात बिस्किटे बुडवण्यासाठी अभूतपूर्व अहमहमिका सुरु झाली. पाळीव कुत्री "लोचट" हे विशेषण आपल्यासाठीच आहे हे सिद्ध करत होती. कोंबड्यांना दिलेली बिस्किटेसुद्धा कुत्रीच फस्त करत होती. अन्नासाठी मग कोंबड्यांनी युद्ध पुकारले. आणि विशेष म्हणजे त्यांनी 2 कुत्र्यांना पळवून लावले. ही लढाई प्रेक्षणीय होती. प्रबळगड प्रीमिअर लीग मधील फायनल जणू ! हो-नाही म्हणता म्हणता सर्व जण प्रबळगडावर यायला तयार झाले. रोहन -सिद्धेश किंवा कुणाकडेच "प्रबळ" गडावर न येण्यासाठी (सागर प्रमाणे ) "सबळ" कारण नव्हते. सागरने गुढघेदुखीमुळे खाली थांबणेच पसंत केले. आम्ही एका सॅक मध्ये पाणी व फराळाचे पदार्थ घेऊन प्रबळ गडाकडे कूच केले.
प्रबळगड : उत्तर कोकणामधील हा किल्ला कल्याण, पनवेल या बंदरांवर नजर ठेवण्यासाठी बांधला असावा. किल्ल्यावरील गुहांवरून याचा कालखंड बौध्द काळाशीही जोडता येऊ शकतो. बहामनीच्या काळात आकारास आलेल्या या किल्ल्याला शिलाहार, यादव राज्यकर्त्यांनी लष्करी चौकी बनवून नाव दिले : "मुरंजन" ! निजामशाही , आदिलशाहीची जुलमी राजवट पाहिल्यानंतर 1656 साली हा किल्ला स्वराज्यात आला तेव्हा त्याचे नाव बदलून "प्रबळगड" ठेवण्यात आले. पुरंदरच्या तहात देण्यात आलेल्या 23 किल्ल्यांपैकी हा एक होय.
प्रबळगडावर जायची वाट तशी सोपीच आहे. एका ठाकर बाई कडून दिशा समजावून घेतली. सदाहरित वनाचा परिसर , ताशीव कडे आणि वाटेतील विलोभनीय दृश्ये यांमुळे पुनश्च फोटोग्राफीला उधाण आले.
किल्ल्यावर जायला आम्ही १०.३० वाजवले. माथ्यावर पोचल्यावर प्रबळ गडाचा प्रचंड विस्तार लक्षात येतो. गडावर भर उन्हाळ्यात सुद्धा घनदाट जंगल होते. किल्ला संपूर्ण पाहून होणे शक्य नव्हते. त्यामुळे कलावंतीण दुर्ग ज्या दिशेला होता, तिकडे आम्ही मार्गक्रमण केले. किल्ल्याच्या ईशान्येकडे असणाऱ्या एका बुरुजाची प्रेक्षणीय माची आम्हाला पाहायला मिळाली. आगगाडी प्रमाणे भासणारी ती माची लोहगडच्या विंचू-काट्याची किंवा राजगडच्या सुवेळा माचीची आठवण करून देत होती. |
पाण्याचे एक छोटे तळे आम्हाला रस्त्यात दिसले आणि सर्वांचीच तहान वाढली. तळ्यातील पाणी चक्क गोड होते. चवदार पाणी पिऊन आम्ही तृप्त झालो. एकमेकांना भिजवणे , डोक्यावरून पाणी ओतणे अशी मस्ती सुद्धा झाली. अखेर आम्ही त्या ठिकाणी पोचलो, जेथे प्रबळगड कलावंतीण च्या सुळक्यापेक्षा उंच असल्याची जाणीव होते आणि कलावंतीणचा दिलखेचक सुळका पाहून निसर्गासमोर आपण स्वतः क्षूद्र असल्याची सुद्धा जाणीव होते. |
जोरदार घोषणा झाल्या: " प्रौढप्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतंस गोब्राह्मण-प्रतिपालक विमलसरित मुघल-दल संहारक श्रीमंत श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय " तशाच भारलेल्या वातावरणात " रणी फडकती लाखो झेंडे .." हे पद्यही म्हटले. गडाच्या या टोकावरून माथेरानचे पठार सुद्धा दृष्टीक्षेपात येते. येथे येथेच्छ फोटो काढले हे वेगळे सांगायला नकोच.
परत फिरून एका झाडाच्या सावलीत खास नाश्ता झाला: चकल्या , चिवडा , बाकरवडी असे खमंग पदार्थ खाऊन आम्ही गड उतरायला सुरवात केली. खाली पोचलो तोपर्यंत सागर पुरता कंटाळला होता; त्याने मॅगीची चांगली तयारी केली होती. सर्वांनाच सडकून भूक लागली होती. घरातील छोट्या रिषभला व त्याच्या बहिणीला आमच्यातील थोडी मॅगी देऊन आम्ही मॅगी वर आडवा हात मारला. लिंबू सरबत प्यायले. |
फार वेळ न दवडता दोन -सव्वा दोन च्या सुमारास भूतंबरा या ठाकर कुटुंबाचा निरोप घेतला. दादा-कनक-
सिद्धेश तरातरा पुढे निघाले. सागरच्या गुढघ्याची काळजी घेत आम्ही इतर पाच जण हळूहळू उतरत होतो. ऊन आता चांगलेच जाणवत होते. पण गप्पांचे विषय इतके होते की उन्हाविषयी बोलेपर्यंत आम्ही खाली आलो होतो. ४ च्या सुमारास आम्ही सर्व गावातील हनुमान मंदिरात आलो. कनक ने कोकम सरबत आणले होते. वरून भरून आणलेले पाणी गरम झाले होते. सरबत गरम सुद्धा छान लागते हे तेव्हा प्रथमच कळले. परत जाताना रेल्वे ने जावे की बस ने यावर कनक चे व माझे (इतरांसाठी )मनोरंजक भांडण झाले. साडेचारच्या सुमारास आम्हाला पनवेलची गाडी मिळाली आणि वादावर पडदा पडला. तासाभरात पनवेलला पोचलो. भेळ्या इथून मुंबईला रवाना झाला. सागरने पुण्याला जाण्यासाठी कर्नाटकची गाडी हेरली. त्यात सर्वांना जागासुद्धा मिळाली. गाडीत एक दारूबाज आमच्याच सीटवर बसला होता. त्यामुळे विनोदाला भलताच वाव मिळाला. पुढील सीटवर एक धमाल काका आमच्या प्रत्येक कमेंटला दाद देत होते. कनक जोक्स पासून अलिप्त राहून हिशोब करत होता. ते काम मात्र त्याने चोख पार पाडले. तरीही त्याच्या हिशोबातील एक चूक सागरने पकडली. हायवे ने जाताना कलावंतीण - प्रबळगड चा "व्ही" आकाराचा डोंगर , नंतर लोहगड, विसापूर, ढाक या किल्ल्यांनी दर्शन दिले.
आनंदनगरला जाताना एका टमटम वाल्याबरोबर कनक चे भांडण झाले. आमच्या कडे दंड वगैरे असल्याने आणि उन्हात रापलेले आमचे चेहरे पाहून त्याने वाद वाढवला नाही आणि चूक त्याचीच होती, (हे महत्वाचे !) दोन टमटम करून आम्ही आनंदनगरला पोचलो. ८.३० वाजता घरात ! उन्हाळ्यात सुद्धा इतका मस्त ट्रेक होऊ शकतो याचे समाधान वाटले. शाळेतल्या ग्रुप बरोबर केलेल्या अनेक ट्रेक्सपैकी हा लक्षात राहील तो अनेक कारणांमुळे : "स्वयंभू" हे मला मिळालेले विशेषण , धारप इस्टेट मधील सुंदर खन्ना हाउस, सर्व जिव्हाळ्याच्या माणसांनी केलेली मस्करी , मनातल्या भावनांची तस्करी , मनसोक्त काढलेले फोटो , भेळेमधील दाण्यासाठी केलेली भांडणे , एकमेकांचा विचार करून जपून प्यायलेले पाणी, कलावंतीणच्या नागमोडी पायऱ्या, आव्हान देणारा कळसावरील झेंडा , प्रबळ-गडावर म्हटलेले पद्य आणि आम्हाला अंगा-खांद्यावर खेळवून "पुनरागमनायचं" म्हणून सुखरूप परत पाठवणारा प्रिय सह्याद्री!
Unmesh.....you have described everything so aptly....making my experience even more memorable!
उत्तर द्याहटवाThank you.
.....Ani wishay sampala...!!! ;-)
उत्तर द्याहटवाgood one!!!
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाSir This is Nilesh Bhutambara From machi Prabal Thank you for visit to pragalgad and kalvantin .... Please visit again specially in rainy season ...
उत्तर द्याहटवाContact No. 08056186321
Email Id .neel.nilesh0506@gmail.com
And Please Visit To my blog For more Detail and More Rainy season's Photo
Blog - wwwnileshprabalgad.blogspot.com
Thank You
Regards
Nilesh Bhutambara
Umesh, Khup chhan lihile ahes. Amacha Sahyadri group, Pune suddha 16 feb 2013 la kalavantin sathi plan kartoy. Prabal machi pasun prabalgadavar janyasathi kiti vel lagato?
उत्तर द्याहटवाMachi prabal Village to Prabalgad He Ek tasachya Antravar ahe ..
उत्तर द्याहटवाAdhik Mahiti ani ... Food , Guide and Room service sathi :-http://prabalgad.jigsy.com/