२० जून २०१५
वसंत संपून उन्हाळ्याची चाहूल लागली होती. सीअॅटल मध्ये सूर्य नेमाने तळपू लागला होता. वर्षाचे ८ महिने सूर्य दर्शन दुर्मिळ असलेल्या शहराला याचे अप्रूप नसले तरच नवल.२१ जून हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस : उन्हाळा अयन दिवस. या दिवशी फ्रेमोंट या भागातील कला मंडळ शोभा यात्रा आयोजित करते. सालाबाद प्रमाणे यंदाही या यात्रेची प्रमुख आकर्षण असणार होती: आदल्या दिवशी होणारी Naked Bike ride , म्हणजेच विवस्त्र सायकल फेरी ! वरकरणी अश्लील वाटणाऱ्या या सायकल फेरीमागे नेमके काय दडले आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता मला होती. आणि मी राहतो त्याच्या आजूबाजूला अशी आगळी वेगळी गोष्ट घडणार असताना त्याचा आंबटशौकीन साक्षीदार होण्यापेक्षा त्या फेरीत सहभागी का होऊ नये असा विचार मनात येऊन गेला. मित्र पॉल हा सुद्धा बरोबर येण्यास तयार झाला.
२१ जून च्या आदल्या दिवशी म्हणजेच २० तारखेला सकाळी ९:३० पासून CSR marine या होड्या दुरुस्त करणाऱ्या कंपनीच्या मोठ्ठ्या आवारात फ्रेमोंट कला दालनाचे उत्साही रंगारी रंग आणि ब्रश घेऊन हजर होते. दहा वाजल्यापासून सायकल स्वारांना १०$ शुल्क आकारून प्रवेश दिला जात होता. बहुतेक सायकलस्वार गाडीने प्रवेशद्वारा पर्यंत येऊन , फक्त सायकल घेऊन विवस्त्र प्रवेश करत होते. काही जण आपापला ग्रुप करून एकमेकांना रंगवत होते तर काही जण व्यावसायिक पेण्टर्स कडून रंगवून घेत होते.
मी पूर्ण कपड्यानिशी आत गेलो, पण मला संकोचल्या सारखे होऊ लागले. तेथे फक्त परवाना घेऊन आलेले छायाचित्रकार कपडे घालून वावरत होते, इतर सर्व जण कोणतीही लाज न बाळगता विवस्त्र फिरत होते. मी लवकरच त्यांच्यातील एक झालो आणि अंगावर काळे पांढरे पट्टे रंगवून घेण्यास सुरवात केली. झेब्रा प्रमाणे स्वतःला रंगवून होईपर्यंत पॉल तेथे आला, त्याला रंगवण्यास मदत केली. अनपेक्षित पणे ऑफिस मधला जुना मित्र साशा आणि त्याची होणारी बायको हे सुद्धा तेथे भेटले. सर्वांचे एक छोटेशे फोटो सेशन झाले. त्यांनी हेल्मेट ऐवजी घालण्यासाठी लाल कुरळ्या केसांचा विगसुद्धा आणला होता.
प्रत्येकालाच आपले शरीर वेगळे आणि आकर्षक दिसावे असे वाटत होते. पण त्यासाठी आता महागड्या कापडाचा आधार नव्हता. रंग हेच कापड , त्याला कल्पनाशक्तीचे अस्तर आणि कलात्मकतेने चालणारी रंगारी बोटे !
फळे, फुले , झाडे आणि प्राणी सर्व जण मनुष्याच्या कॅनव्हास वर थाटाने विराजमान झाले होते. वाघ आणि सिंह तर कित्येकांनी रंगवून घेतले होते. काही जणांनी चमचमणारे रंग वापरून आपण जणू एखादा भारी ड्रेस घातला आहे असे भासवले होते. मुलींमध्ये परी आणि राणी यांची नक्कल बऱ्याच जणींनी केली होती. माणसाच्या सुप्त इच्छा रंगाच्या माध्यमातून गुप्त पणे व्यक्त होत असतात असे दिसत होते. इजिप्त च्या राणीची रंगभूषा केलेल्या स्त्रीने सर्वांच्या नजरा जिंकल्या.
अनेक जण तेथे सह कुटुंब आले होते आणि त्यांची सर्जनशीलता आणि रंगकामाची प्रतिभा थक्क करणारी होती.
ते फक्त शरीरच रंगवत नव्हते तर त्याबरोबर काही फलक सुद्धा रंगवत होते , त्यातून पर्यावरण वाचवा , सायकल चालवा अशा आशयाची घोषवाक्ये लिहून संदेश देण्याचा हेतू होता. लहान मुलांना त्या वयातच न बोलता लैंगिक शिक्षण मिळत होते. किमान त्यांची नग्नपणाविषयी एक निरोगी दृष्टी नक्कीच तयार होत होती. तेथे कुणीही एकमेकांकडे टक लावून बघत नव्हते की अश्लील टिप्पण्या करून हसत विचकत नव्हते. उन्हाचे स्वागत कपडे काढून करणे हा इतकाच साधा स्वच्छ हेतू होता.
बरोब्बर २ वाजता सायकल फेरी सुरु झाली. त्या अगोदर आम्ही बरोबर आणलेला खाऊ खाऊन घेतला. सायकली काढून सज्ज झालो . सायकल च्या सीट वर आठवणीने प्लास्टिकची पिशवी बांधली (रंग लागू नये म्हणून!) फेरीचा रस्ता ठरलेला होता.
शहरातून जाताना कुणी ओळखेल अशी सुतराम शक्यता नव्हती (इतके रंगकाम चेहऱ्यावर सुद्धा केले होते ) बरेच जण तर तऱ्हेतऱ्हेचे चित्र-विचित्र मुखवटे घालून सायकल चालवत होते. शिंग असलेले हेल्मेट आणि काळवीट रंगवलेले शरीर सायकल चालवताना मजेशीर दिसत होते. अनेक सायकली सुद्धा स्वारांइतक्याच नटल्या होत्या. सायकल चालवताना मला इतर काही झेब्रांचा कळप (सायकल वर) दिसला, त्यांनी आनंदाने मला त्यांच्यात सामावून घेतले.
रथ यात्रा सुरु होणाऱ्या रस्त्यावर बघ्यांची ही गर्दी उसळली होती. रस्त्याच्या दुतर्फा सायकल चालवणाऱ्या आम्हा नग्न स्वारांना बघण्यासाठी झालेली गर्दी , त्यांनी वाजवलेल्या टाळ्या आणि दिलेल्या घोषणा , या सर्व गोष्टींमुळे सगळीच भीड चेपली गेली. कोणालाच आपली ओळख कळणार नाही याबाबत खात्री असल्याने उन्हात विवस्त्र सायकल चालवणे या गोष्टीचा आनंद लुटता आला.
तासभर सायकल चालवल्यानंतर या सायकल फेरीची सांगता होण्यास सुरवात झाली. एक एक करून सायकल स्वार Gasworks Lake Park या पार्क कडे सायकल वळवू लागले. येथील तलावामध्ये आंघोळ करून रंग धुवून काढावेत आणि (कपडे घालून) घरी जावे अशी योजना होती. मी backpack मधेच बदलण्यासाठी कपडे आणले होते. तलावामध्ये मनसोक्त डुंबून पार्क मधील हिरवळीवर थोडा वेळ पहुडलो. संध्याकाळची उन्हे उतरू लागली तसे कपडे घालून घरी जाण्यासाठी सायकल वर टांग मारली. एक अभूतपूर्व अनुभव घेऊन तो आठवणींच्या गाठीशी बांधला होता.
(समाप्त)
Nehmipramanech surekh blog!
उत्तर द्याहटवाThank you thank you !
हटवाWow awesome Unmesh !!!
उत्तर द्याहटवाThanks. I would like to know who is the Unknown admirer !
उत्तर द्याहटवाMasta lihilays .. :)
उत्तर द्याहटवा