शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

पन्हाळगड ते विशाळगड : एक वर्णनीय ट्रेक : दिवस दुसरा


दिवस दुसरा: १४ ऑगस्ट : पद-क्षरण आणि म्हसवडयाचे निबीड अरण्य 
अनेक गजर लावून सुद्धा , पहाटे जाग येऊनसुद्धा कोणीही एकमेकांना उठवले नाही. सर्वांनाच झोप हवी होती. नाईलाजानेच साडेसातला उठलो. चहा व "ओघाने"  येणारे कार्यक्रम उरकले. नंतर उपीट करायला घेतले. हा नाश्ता मात्र फक्कड जमला होता. पाणी जरा जास्त झाले असले तरी उपमा चविष्ट झाला होता. कालचा तो बिलंदर पोरगा सकाळीसुद्ध तेथे अवतरला होता, त्याचे नाव आशिष आहे असे कळले. तो व त्याची बहीण यांच्याबरोबर फोटो काढले आणि निघालो. एव्हाना गिरीदर्शनचे ट्रेकिंग क्लबचे  लोक त्यांच्या कालच्या मुक्कामाहून निघून आमच्या मुक्कामी पोचले होते. आता घाई करायलाच हवी होती. त्यातल्या त्यात हळू चालणाऱ्या हर्षद ला पुढे पाठवले. तो बिचारा वाट चुकला. गिरी-दर्शन वाल्या एकाही सुजाण ट्रेकरने  त्याला चुकीच्या वाटेने जात असताना अडवले नाही याचे आश्चर्य वाटले.. लवकरच आम्ही बरोबर वाटेला लागलो. गिरी-दर्शन च्या ग्रुपमध्ये काही ओळखीचे माजी रमणबागीय भेटले. ते २८ जण असल्याने अचानक गर्दी झाल्यासारखे वाटले. मग त्या गर्दीतूनच वाट काढत आता भातशेतांसोबत "हिरवळ" सुद्धा बघत पुढे जाऊ लागलो.

वाडीतील चित्रवत भासणारे घर 


करपेवाडीत गोळ्यांचा "कर" भरून त्वरित पुढे मार्गस्थ झालो. आता वाटेवर बाण दिसू लागल्यामुळे किल्ल्यावर आल्यासारखे वाटत होते.  झाडे , खडक , जमेल त्या ठिकाणी ट्रेकरच्याच  नजरेत भरतील असे काढलेले ते बाण आमचा उत्साह वाढवत होते. आंबेवाडी ही पुढची वाडी होती.  पावसाळी वातावरणामुळे दम चांगला राहत होता आणि डोळ्यांचे पारणे जागोजागी फिटत होते. आंबेवाडी नंतर दोन नकाशात नसलेल्या वाड्या लागल्या:  कळकेवाडी  आणि रिंगेवाडी! कुठल्यातरी एक वाडीबाहेर मोठ्ठी विहीर लागली. तेथे जरा वेळ विश्रांती घेतली. जंगलातल्या वाटा कापताना डिस्कवरी वरच्या MAN VS WILD या मालिकेची आठवण होत होती.

जंगलातील एक वाट 


जमिनीवर अभावानेच माती दिसत होती. गळलेल्या पानांमुळे सगळी वाट झाकली गेली होती. अशा विरळ मनुष्य वस्तीच्या वाडीत कोणाला काही  झाले तर काय करत असतील, त्याला डॉक्टर कडे कसे नेत असतील हा विचार करवत नव्हता. अशातच  आम्हाला एक आज्जी दुरून हात दाबत येताना दिसल्या. त्यांच्या हाताला बरेच  खरचटले होते ,  तसेच सूजसुद्धा आली होती. त्यांना मलमपट्टी करून व आयोडेक्स देऊन पुढे निघालो. शेतातील एका मचाणापाशी थांबून बिस्किटांचा व बाकरवडीचा नाश्ता केला. तेथे तुरळक फोटो सेशनसुद्धा झाले.
पाटेवाडीला जेवायचे नक्की केले होते, मात्र २ वाजत आले तरीहि वाडीची चिन्हे दिसेना. अशातच अजून एक अनपेक्षित वाडी लागली: माळेवाडी. त्या वाडीतच एका मंदिराबाहेर जेवायला  बसलो.  पराठे, गुळाच्या पोळ्या , आम्रखंड , श्रीखंड असे गोडधोडाचे जेवण झाले. एव्हाना गिरीदर्शनवाली मंडळी पाटेवाडीला जाऊन जेवण करत असतील असा एक अंदाज बांधला. त्यांच्या बरोबर गेलो तर पांढरेपाणी गाठता येईल हा विश्वास होता, कारण त्यांनी तेथे खोल्या व जेवण सांगून ठेवले होते. माळेवाडीहून पाटेवाडी २ किलोमीटर लांब आहे. चक्क डांबरी रस्तापण आहे. त्यावरून जाताना मात्र आता कंटाळा येत होता. शिवाय माती-चिखलाला सरावलेले बूट  डांबरावरून  जाताना स्वतःची नाराजी तळपायाकडे व्यक्त करत होते. त्यामुळे पायाची बोटे दुखू लागली. मला पायांना फोड आल्यासारखे  वाटत होते पण बूट काढून त्याची शहानिशा करण्याएवढा वेळ नव्हता. पाटेवाडीत पोचलो तेव्हा सुदैवाने गिरी-दर्शनची शेवटची तुकडी निघायच्या बेतात होती. त्यांना गाठून आम्ही तरातरा पुढे निघालो. वाटेत एका भाताच्या खाचरात घसरून मी कोपरापर्यंत हात चिखलाने बरबटवला ही फजिती एकदा तरी व्हायचीच होती. ती झाली. सुकामाचा धनगरवाडा येईपर्यन्त फारसे कोणीच कोणाशी बोलले नाही. वाटेत विशाळगडावरून येणारा एक ग्रुप भेटला. त्यांचे खरच कौतुक वाटले. कारण सर्व दिशादर्शक बाण विरुद्ध दिशेला आहेत.
धनगरवाडीपासून गिरी-दर्शन टीमने वाटाड्या बरोबर घेतला होता. कारण यापुढे आमची वाट पाहत होते : म्हसवड्याचे घनदाट जंगल.  हे पार केल्यानंतर म्हसवडे गाव लागते अशी माहिती होती. आम्हाला सुदैवाने त्याच गावाकडे जाणारे तीन गावकरी भेटले आणि जंगलाची वाट थोडी सुकर झाली. "निबीड" हा शब्द ज्याकडे पाहून लिहावा असे हे जंगल आहे. या जंगलात बिबटे, गवे, भेकर, हरणे असे प्राणी आहेत असे आम्हाला वाट दाखवणाऱ्या त्रिकूटाकडून समजले. रात्री या जंगलातून जाण्याची वेळ आली नाही हे नशीबच! सूर्यप्रकाशात झकास दिसत असणारे ते जंगल रात्री नक्कीच भयाण वाटत असणार. जंगलाने आम्हाला अनेक सुंदर दृश्ये दाखवली. अनेक ओढ्यांनी आमचे दुखरे पाय भिजवले.


कनक आणि मी म्हसवडे जंगलातील एक ओढा ओलांडताना 


म्हसवडे आले तेव्हा एक विलक्षण घटना घडली. गावाच्या वेशीवरच एका "आज्जींनी" आमच्याकडे गोळी मागितली; आम्ही थक्क! डोके दुखत असल्याने त्या औषधाची गोळी मागत आहेत हे कळल्यावर मात्र आमची हसून पुरेवाट झाली.  खरी गम्मत तर पुढेच आहे. पुढील घरातील बाईने "त्या आज्जींना दिलेली गोळी मला पण द्या" असा बालिश हट्ट धरला. तिच्यापुढे आम्ही हात टेकले. म्हसवडे गाव ओलांडताना मलकापूर-अणुस्कुरा महामार्ग लागतो. त्या फाट्याला पोचेपर्यंतसुद्धा  लहान लहान मुलांपासून तरण्याताठ्या मुलींपर्यंत सर्वांनी गोळ्या-बिस्किटांची खंडणी मागून झाली होती. प्रत्येक वाडीत गोळ्या-बिस्किटे देण्याचा आता वैताग आला होता. आणि लहान मुले अक्षरशः अंगावर धावून येत होती.  "दादा, गोळ्या द्या" हे जणू त्या मुलांचे घोषवाक्य झाले होते. त्यातील काही धाडसी मुले तर गोळ्या नाही तर पैसे द्या अशीही मागणी करत होते. "मागण्याची" त्यांना लागलेली किंवा लावलेली सवय निश्चितच घातक होती. परिस्थिती माणसाला काहीही करायला लावू शकते हेच खरे!

महामार्गाच्या कडेलाच आम्ही सांडलो. 

मलकापूर - अणुस्कुरा महामार्ग आणि आमचा गट 


बिस्किटे , वेफर्स खाऊन थोडी विश्रांती घेऊन पुढे निघालो. आता येथून पुढचा रस्ता हा राज्य महामार्ग होता. पांढरेपाणी अंदाजे ६ किलोमीटरवर असावे. अंधार पडत असल्याने रातकिडे आणि बेडूक यांचे "सारेगमप" सुरु झाले होते.  "डराव डराव" असा पुस्तकात वाचलेला आवाज मात्र ऐकायला आला नाही. पांढरेपाणी गावाला पोचेपर्यंत बहुतांश स्तोत्रे म्हणून झाली होती. खूप छान वाटले. गिरीदर्शन क्लब ची म्हसवडे-ते-पांढरेपाणी गाडी असल्याने त्या मुलांचा ट्रेक आता संपला होता. पांढरेपाणी येईपर्यन्त डोळ्यांत पाणी येणेच फक्त बाकी होते. आजची चाल किमान २३ किलोमीटर झाली असेल. गावात पोचल्यावर तेथील शाळेतील कोळी सरांच्या कृपेने ४थी च्या वर्गात झोपायला जागा मिळाली.  आम्ही जंगलात बरेच रक्त-दान केल्याचे बूट-मोजे काढल्यावर लक्षात आले. आमच्यापैकी बहुतेकांना जळवा डसल्या होत्या.  सरांनी त्यांची (म्हणजे जळवांची नव्हे, जखमांची )  आपुलकीने चौकशी  केली आणि दिव्याची व पाण्याची सोयसुद्धा ! आजचे रात्रीचे जेवण होते : पुलाव व मॅगी ! या वर्गात दोऱ्या बांधायची सोयपण छान झाल्याने ओल्या कपड्यांना वाळायला संधी मिळाली.
गिट्स चे पुलाव रेडी मिक्स खूप "हिट" झाले.

रात्रीचा स्वयंपाक करताना अनय दादा, हर्षद आणि मी 


आणि पुढील प्रत्येक ट्रेकला न्यावे असे एकमताने ठरले. मॅगी कुठेही करा, नेहमीच चांगली होते , इथेही झाली आणि त्या गरम गरम जेवणाने शरीराला अत्यावश्यक ऊबदेखील मिळाली. खोलीतील बल्बचा प्रकाश जास्तच डोळ्यावर येत होता , कनकच्या सुपीक डोक्यातून एक युक्ती निघाली. नाडीची दोरी आणि रद्दी पेपर्स यांनी त्याने व दादाने एक लहानसा आकाश-कंदील बनवला आणि आमची वाहवा मिळवली.  
कनक ने बनवलेला कंदील 
दादाने मग कालचे राहिलेले वर्णन वाचायला घेतले. मी एकटाच बहुतेक मन लावून ऐकत होतो. बाकी सगळे डुलक्या खात ऐकत होते. अखेर साडेबारा वाजता कनक अर्धवट झोपेत आम्हाला "झोप आता" असे काहीसे बरळला आणि तेव्हा कुठे शिवाजीमय झालेली मने पावनखिंडीची स्वप्ने बघत झोपून गेली.

आमचा गट : (डावीकडून) अक्षय, कनक, हर्षद, उन्मेष, अनय दादा 

( क्रमशः )

३ टिप्पण्या: