रविवार, ९ फेब्रुवारी, २०१४

माय (My) भूमी

मायभूमी ची व्याख्या नव्याने मला कळत आहे. 
अनुभवांची शिदोरी जागोजागी भरत आहे.
जन्मभूमी सोडून जाताना मनात उठलेले कल्लोळ आजही आठवतात…
कधीच वाटलं नव्हतं तेव्हा …
दुसरा देश , दुसरी जमीन , एवढी जवळची वाटेल.
पण, वर्षभरात दुसऱ्या लोकांनी लळा लावला खरा…
एक छोटंसं विश्व निर्माण झालंय दुसऱ्या भूमीवर…

जगाची व्याख्या आता नव्याने मला कळत आहे.
आपल्या छोट्याश्या जगाला सुंदर बनवणारा निसर्ग
कधी मोहक तर कधी दाहक
कधी लुब्ध करणारा निसर्ग,  तर
कधी स्तब्ध करणारा निसर्ग
नैसर्गिक गोरी असलेली दुसऱ्या जगातली ही माणसं
मी आवडून घेतलेली माणसं
आपली "जागा" दाखवणारी माणसं
"आपल्याला" जागा दाखवणारी माणसं
स्वतःचीच वैशिष्ट्ये जपणारी माणसं
आपली नसूनही "आपली" वाटणारी माणसं

आपल्या माणसांची व्याख्या सुद्धा आता नव्याने कळत  आहे.
हवे तेव्हा बोलणारे आणि बोलावणारे मित्र…
परीक्षेसाठी शुभेच्छा देणारे शेजारी…
स्वयंपाक छान झाल्यावर मिठी मारणारी मैत्रीण…
आपुलकीने चौकशी करणारे प्रोफेसर्स…
ओळख नसूनसुद्धा ओळखीचे हसणारे येणारे जाणारे लोक…
मी असलो की मुद्दाम इंग्रजीमध्ये बोलणारे डच मित्र…

मैत्री आणि मित्राची व्याख्या सुद्धा मला नव्याने कळत  आहे …
स्वयंपाकाला मदत करणारा मित्र…
बिअर साठी कंपनी देणारा मित्र…
भाजी- मंडई साठी बरोबर येणारा मित्र…
पळायला आणि खेळायला घेऊन जाणारा मित्र…
आपले छंद जोपासणारा आणि मला माझे छंद जोपासायला लावणारा मित्र…
"जगण्यात मौज असते" हे शिकवणारा मित्र…

जगण्याची व्याख्या आता नव्याने कळत आहे…
परभूमी आता My भूमी झालीय.
परकं होतं असं शहर आता इतकं आपलं वाटतंय की
इथली थंड हवा भरून घेण्यासाठी फुफ्फुसं मनाकडे विनवण्या करतात…
तात्पुरते शेजारी राहायला आलेले मित्र मनाचा एक काळीजकप्पा कायमचा आरक्षित करून गेलेत…
धर्म, जात, भाषा , सगळ्यांना पुरून उरलेली नाती इथल्या जगण्याचं वेगळेपण ठरली आहेत.

नात्यांच्या या "दुसऱ्या" जगात "स्व"तःची  ओळख नव्याने कळू लागली आहे…

                                                                                                                         - उन्मेष 


1 टिप्पणी: