बुधवार, १९ मार्च, २०१४

मध्य युरोपिअन सहल : प्राग, ब्रनो, विएन्ना आणि म्यएनिक (दिवस पहिला)


बुधवार १९ मार्च २०१४ : ब्रनो , रोमान आणि भेटी गाठी
अॅमस्टरडॅम मध्ये हॉस्टेल वर राहत असताना झालेल्या अनेक जिवाभावाच्या मित्रांपैकी एक म्हणजे रोमान  विशकोव्स्की (Roman Vyškovský).  २ फेब्रुवारीला रोमान हॉस्टेल सोडून त्याच्या घरी परतला. आमचा निरोप घेताना,  झेक प्रजासत्ताक मधील ब्रनो या शहरात राहणाऱ्या रोमानने त्याच्या घरी येण्याचे आमच्याकडून  कबूल करून घेतले होते .  त्याप्रमाणे पात्रीसिया व मी एका छोट्या सहलीची आखणी केली. त्यानुसार बुधवारी सकाळी ९ वाजता मी घर सोडले. रुडी (Ruddy ) नावाचा एक तिकीट-एजंट Eindhoven  विमानतळापर्यंत १० युरो मध्ये सोडणार होता. ठरल्याप्रमाणे त्याला १० वाजता अॅमस्टरडॅम सेन्ट्रल या रेल्वे स्थानकाजवळ  भेटलो. तेथून  Eindhoven रेल्वे स्थानक (दीड तास ) व तिथपासून विमानतळ (वीस मिनिटे ) असा अपेक्षित प्रवास होऊन १२ च्या सुमारास विमानतळावर पोचलो. Eindhoven च्या विमानतळाला भव्य सज्जा आहे, तेथून  विमाने उडण्यासाठी सज्ज होताना बघता येतात ! त्यामुळे विमानतळावर उगाच विंडो शॉपिंग करण्यात वेळ काढावा लागला नाही. १३:५० ला  विमानाने  Eindhoven वरून उड्डाण केले आणि १५:२० वाजता ब्रनो येथे पोचले.

रोमान मला घ्यायला आला होता. त्याच्या घरी जाताना वाटेत त्याची university  (Masaryk University) बघायला मिळाली. बऱ्याच दिवसांनी पुन्हा डोंगर-टेकड्या यांचे दर्शन होत असल्याने मी सुखावलो होतो. ब्रनो मध्ये " greater pasque flower "  नावाच्या जांभळ्या फुलांचे संवर्धन केंद्र एका टेकडीवर वसवले आहे. ती फुले फक्त वसंतातील काही दिवसच उमलतात. त्यांचा बहर बघण्याचा योग आला.

टेकडीवरून उतरताना पावसाने आमचे "ब्रनो" मध्ये स्वागत केले. गाडीत बसताच समोर इंद्रधनुष्याची कमान नैसर्गिक रंग-सौंदर्य आणि मानवनिर्मित रंग-सौंदर्य यांतील फरक स्पष्ट करून गेली.

 रोमानचे टुमदार घर मध्यवस्ती पासून थोडे दूर एका टेकडीवर आहे. रोमान च्या घरी तो, त्याची आई, आई चा बॉयफ्रेंड (!) , आज्जी, आणि बहीण असे पाच जण राहतात. घराच्या बहुतेक सर्व भिंती चित्रे टांगून सुशोभित केल्या आहेत. त्यातील बहुतांश चित्रे त्याच्या आज्जीने काढलेली आहेत. ८४ वय असलेली त्याची आज्जी अजूनही चित्रे काढण्यात आणि रंगवण्यात मन रमवते . रोमान ची आई प्रवासी कंपनी (V-Tour) चालवते. जोडीला चलन देवाणघेवाण (currency exchange ) हा देखील व्यवसायाचा भाग असल्याने मला त्याच्या घरूनच युरो च्या बदल्यात झेक क्राउन्स (Crown ) मिळवता आले.   रोमानच्या घरी त्याच्या आईने आमचे स्वागत केले. आपल्याकडे "चहा घेणार का ? " च्या धर्तीवर मला "शॉटस  किती घेणार ? " हा प्रश्न विचारण्यात आला. आपण जगातील   दारू पिण्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या देशात आलो आहोत याची जाणीव झाली. रोमान च्या आई ने घरी बनवलेल्या वोडकाचा आम्ही आस्वाद घेतला.

 ताजेतवाने (?)  होऊन आम्ही बाहेर फेरफटका मारण्यास निघालो. सुपर मार्केट, बेकऱ्या, आणि इतर अनेक दुकाने पटकन लक्षात येणार नाहीत अशा प्रकारे रस्त्यावर लपली होती. पब्स आणि बार यांच्या मात्र भल्या मोठ्या पाट्या रत्यावर लक्ष वेधून घेत होत्या. माझ्या साठी  भाज्यांची तुरळक खरेदी करून आम्ही एके ठिकाणी पिझ्झा खाल्ला. त्यानंतर रोमानच्या (घराजवळ असल्यामुळे ) आवडीच्या  पब मध्ये गेलो (Johnny 's bar ). तेथे नमुनेदार झेक बिअर घेतली. त्यानंतर रोमानची मैत्रीण शार्का हिला भेटण्यासाठी "Tři  Ocásci " नावाच्या पब मध्ये गेलो. हा पब तथाकथित जिप्सी लोकांचा असून येथे जुन्या व्यापार पद्धती प्रमाणे वस्तूविनिमय करता येतो. तेथील पबचे प्रमुख आकर्षण असणारे सफरचंदाचे पेय (Jablečný mošt) मी घेतले. एव्हाना "डिनर" ची वेळ झाली होती, त्यामुळे घरी जाणे भाग होते. रोमानने माझ्यासाठी सलाड बनवले तर रोमानच्या आईने ब्रेड साठी चटणी !
झेक ब्रेडला स्वतःची अशी चव असल्याने डच ब्रेड पेक्षा मला ते आवडले.  डिनर नंतर परत एका बार मध्ये जाणे भाग होते. अॅमस्टरडॅम ला येऊन गेलेला रोमान चा मित्र यिरका आम्हाला भेटायला येणार होता. Pivovar StaroBrno या पबच्या नावात pivo म्हणजे झेक भाषेत दारु आणि Staro म्हणजे जुने ,असे दोनही शब्द असल्याने अस्सल झेक Brewery बघायला मिळणार याची खात्री झाली. यिरका चा स्वभाव बराच मनमोकळा असल्याने आणि तेथील बिअर चविष्ट असल्याने वेळ मस्त गेला. दुसऱ्या दिवशी विएन्ना  (झेक मध्ये  Vídeň ) ला जायचे असल्याने लवकर घरी जाणे (आणि लवकर झोपणे ) आवश्यक होते. घरी परत जाण्याची वाट ही टेकडी ओलांडून जाणारी होती. रोमान ने टेकडी च्या माथ्यावरील त्याचा आवडीचा बाक आणि तेथून दिसणारे शहराचे विलोभनीय दृश्य दाखवले. बेंच वर बसून गप्पा मारता मारता एक प्रहर उलटून गेला. घरी पोचून झोपेपर्यंत दोन वाजून गेले होते.

(क्रमशः)

२ टिप्पण्या: