प्रागला जाण्याचे वेध आदल्या रात्रीपासून लागले असल्याने ब्रनो मध्ये सूर्याची किरणे यायच्या आधी आम्हाला जाग आली होती. आमची प्राग ला जाणारी बस साडेसात वाजता "विक्टोरिया हॉटेल" या बस स्थानकाहून निघणार होती. रोमान च्या घरासमोरच ट्राम चा थांबा असल्याने आम्ही सात वाजता घर सोडले. बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश पडल्याने एक चांगला दिवस प्राग मध्ये घालवायला मिळणार याची खात्री झाली :
रोमान च्या घराबाहेरील ट्राम च्या थांब्यावर टिपलेली सकाळ |
सकाळची वेळ असल्याने गाडीला शहराबाहेर जाण्यास फार वेळ लागला नाही. ब्रनो ते प्राग हा हाय- वे सुरु झाल्यावर अचानक गाडीला ठराविक अंतरानंतर हादरे बसू लागले. सिमेंट च्या रस्त्याचे काम नीट न झाल्याने मध्ये मध्ये ब्लॉक्स सुटले (किंवा तुटले ) आहेत असे रोमानचे स्पष्टीकरण ! झेक लोक या रस्त्याला विनोदाने " मोटोक्रॉस चा सर्वांत लांब track " असे म्हणतात. झेक नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे हा महा(ग)मार्ग युरोपातील सर्वांत महाग ठरला आहे.
दोन तासांच्या या प्रवासात बराचसा वेळ झोप काढली. प्राग शहरात आल्यावर सूर्याच्या किरणांनीच आम्हाला जागे केले. संपूर्ण शहर मस्त सूर्य प्रकाशात न्हाऊन निघाले होते:
प्राग मध्ये शिरताना |
"प्रागैतिहास" म्हणायला हरकत नाही. झेकोस्लोवाकिया हा एक देश असतानासुद्धा प्राग हीच त्या देशाची राजधानी होती आणि स्लोवाकिया वेगळा झाल्यानंतरही झेक प्रजासत्ताक (इंग्रजी नाव चेक रिपब्लिक) ने प्राग ला या पदापासून परागंदा केले नाही. तर अशा या सुप्रसिद्ध शहरात फिरण्यासाठी आम्ही सिद्ध झालो होतो.
राडेक आणि पात्रीसिया हे दोघेही चार्ल्स चौकाजवळ च्या (Charles square) एका पार्क मध्ये आमची वाट बघत थांबले होते. या पार्कला लागूनच Town Hall आहे. येथे Judah Loew Ben Bezalel या ज्यू-पंडिताचा पुतळा आहे. मोराविया मधील मिकुलोव आणि बोहेमिया मधील प्राग या दोनही शहरांमध्ये यहुदी धर्मगुरू म्हणून त्याने काम केले होते.
त्याला MaHaRaL असेही म्हटले जाते. हिब्रू भाषेत "Moreinu Ha-Rav Loew," (याचा अर्थ आमचा गुरु-यहुदी धर्मगुरू Loew असा होतो. ) प्रागबाबतीत सर्वांत प्रसिद्ध आख्यायिका "गोलेम" चा रचनाकार म्हणून हा विद्वान प्रसिद्ध आहे. मातीपासून तयार केलेल्या पुतळ्यामध्ये त्याने प्राण फुंकले आणि त्या प्राण्याला "गोलेम" नाव दिले. प्राग मधील ज्यू लोकांचे कट्टर ज्यू द्वेष्ट्या लोकांपासून संरक्षण करण्यासाठी त्याने ही निर्मिती केली होती असे मानतात.
ऊन खात बसलेले बाक आणि बाग (New Town Hall in the background ) |
हे डुक्कर अर्थातच आमचे भेटण्याचे संकेतस्थळ ठरले होते. राडेक प्राग मध्ये शिकत असल्याने त्याने आम्हाला शहर दाखवण्याची जबाबदारी घेतली होती. प्रागच्या गल्ल्या त्याला सुपरिचित होत्या आणि आम्हाला नकाशा शिवाय बिनधास्त फिरता येणार होते. सर्व प्रथम राडेक ने आम्हाला त्याचा आवडता पब दाखवला:
प्राग मधील प्रमुख आकर्षणांमध्ये याचा समावेश होत नाही, परंतु आमचा गाईड प्रागचा तरुण- राडेक असल्याने आम्हाला त्याच्या नजरेतून प्राग बघणे भाग होते. त्याने आमच्या साठी बहुतेक प्रेक्षणीय स्थळे बघता येतील असा मार्ग निवडला होता. त्याप्रमाणे वाटेत सर्वप्रथम बघावयास मिळाले ते म्हणजे वेलवेट क्रांतीचे स्मृतिशिल्प :
Velvet Revolution memento |
झेकोस्लोवाकिया वर ४१ वर्षे राज्य केलेल्या साम्यवादी (Communist) पक्षाविरोधी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली तो हा दिवस :१७ नोव्हेंबर १९८९! हा दिवस जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून ओळखला जातो , कारण या क्रांतीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग फार मोठा होता. या क्रांतीनंतर झेकोस्लोवाकियामध्ये प्रजासत्ताक स्थापन झाले.
या क्रांती विषयक माहिती घेतल्यानंतर प्रागच्या (फक्त राडेक साठी प्रसिद्ध असलेल्या) गल्ल्या (जेथे तो राहत असे) खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी धुंडाळण्यात आल्या.
दुर्दैवाने राडेकचे "नेहमीचे" दुकान बंद असल्याने त्याला जिभेचे चोचले पुरवता आले नाही आणि आम्ही पुढे निघालो.
एका झगमगीत मोठ्ठ्या इमारतीने आमचे लक्ष वेधून घेतले. Laterna Magika या नावाचे हे मूक-नाट्यगृह असून शाब्दिक संवाद नसल्याने येथील नाटके कुणालाही समजू शकतात. या नाट्य गृहाला लागूनच झेक प्रजासत्ताक चे राष्ट्रीय नाट्यगृह (National Theatre) असून "झेक ओपेरा " या नावाने ते प्रसिद्ध आहे. १८८१ साली सुरु झालेल्या , शंभर वर्षाचा इतिहास असलेल्या या नाट्यगृहाने झेक संस्कृती आणि भाषा जपण्याचे काम चोख बजावले आहे.
Laterna Magika |
आणि मग राडेक आणि पात्रीसिया दोघांच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही वेन्सिस्लास चौकात (Wenceslas Square) आलो. बोहेमियन संत वेन्सिस्लास यांचे नाव या चौकाला देण्यात आलेले आहे. प्राग मधील New Town या भागातील हा महत्वाचा चौक असून प्रागच्या ऐतिहासिक केंद्रांमध्ये त्याचा समावेश आहे, इतकेच नव्हे तर "युनेस्को"ने जागतिक वारसा म्हणून गणल्या गेलेल्या स्थळांच्या यादीत वेन्सिस्लास चौकाचे नाव नोंदवलेले आहे.
Wenceslas Square |
National Museum |
या वेन्सिस्लास स्क्वेअर च्या एका बाजूला National Museum आहे ज्यामध्ये एक कोटी चाळीस लाख वस्तूंचा संग्रह केला आहे, असे सांगण्यात आले. आत जाऊन शहानिशा करायला अर्थातच वेळ नव्हता !
तेथे एक ग्रुप फोटो काढून आम्ही Republic Square कडे निघालो. प्राग च्या Old Town भागामधील हा महत्वाचा चौक आहे. Municipal House ची आकर्षक इमारत पटकन नजरेत भरते.
एके काळी बोहेमियन राजा चौथा चार्ल्सच्या राहण्याचे ठिकाण असलेली ही इमारत सध्या "स्माताना हॉल" या प्रसिद्ध concert हॉल ला आपल्यात सामावून घेऊन बसली आहे.
Municipal House |
Powder Gate |
पावडर गेट पासून काहीच मिनिटांच्या अंतरावर झेक राष्ट्रीय बँकेचे प्रमुख कार्यालय आहे: त्यावरील सिंहावर आरूढ झालेल्या पिळदार शरीर यष्टीच्या , हाती मशाल घेतलेल्या तरुणाची प्रतिकृती उठून दिसते. सिंह आणि झेक राजे यांचे एक अतूट नाते आहे आणि ते एका आख्यायिकेवर बेतलेले आहे. ही आख्यायिका थोडक्यात (राडेक च्या शब्दांत ) पुढीलप्रमाणे : बृंचविक (Bruncvík) नावाचा राजा जेव्हा प्राग सोडून राज्यविस्तार करण्यासाठी मोहिमा आखत होता तेव्हा रस्ता चुकून तो एका अरण्यात आला. त्याने पांढऱ्या सिंहाला एका नऊ तोंडे असलेल्या dragon बरोबर लढताना पाहिले. तेव्हा त्याने दोन दिवस लढाई करून सिंहाला वाचवले आणि dragon ची नऊ मुंडकी कापून काढली. तेव्हापासून तो सिंह राजाचा एकनिष्ठ सेवक राहिलेला आहे. या प्रवासात राजाला जादूची तलवार मिळाली जिला फक्त हुकुम केला असता शत्रूची डोकी आपोआप उडवणे शक्य होते.
Czech National Bank |
Old Town चा एक भाग विविध नाट्य गृहांनी व्यापला आहे. त्यापैकी उल्लेखनीय म्हणजे Stavovské divadlo (म्हणजे इस्टेट theatre) आणि Black Light Theatre ! स्तवोव्स्के हे नाट्यगृह हे खास झेक संस्कृतीशी निगडीत खेळ दाखवण्यासाठी प्रसिद्ध आहे. Black Light Theatre हे काळे पडदे आणि काळाकुट्ट सेट तयार करतात आणि कलाकार fluorescent कपडे घालून आणि अतिनील (ultra -violet) प्रकाशाचा वापर करून दृग्गोचर भास (दृष्टीला फसवतील असे) पेश करून मनोरंजन करतात:
त्यांचा शो पाहण्याची मला खूप उत्सुकता होती, मात्र रात्री साडेआठ च्या आधी एकही खेळ नसल्याने आम्ही पुढे निघालो. एव्हाना बारा वाजत आले होते. बाराच्या ठोक्याला आम्हाला प्रागच्या अतिभव्य खगोलशास्त्रीय घड्याळाच्या पुढे उभे राहायचे होते. दर तासाला या घड्याळातील (बायबल मध्ये सांगितल्याप्रमाणे) येशूने ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी पाठवलेले बारा Apostle आणि इतर शिल्पे ( एक मानवी हाडांचा सांगाडा सुद्धा) यांचा हलता देखावा बघावयास मिळतो.
At Astronomical Clock (from left) Radek, Patricia, Unmesh , Roman |
Old Town Square या आणखी एका महत्वाच्या चौकात असलेल्या Old Town हॉल च्या दक्षिण बाजूकडील भिंतीवर हे भव्य मध्ययुगीन घड्याळ घडवण्यात आलेले आहे. तिथे पर्यटकांची तोबा गर्दी जमली होती. Old Town Square या परिसरात मध्ययुगीन इमारती आणि शिल्पे यांची रेलचेल आहे.
"Church of Our Lady in front of Týn" with Patricia |
या चर्चच्या समोरच झेक समाज-सुधारक आणि तत्वज्ञ जॉन हस (John Hus) याचे स्मृतीशिल्प आहे. कट्टर कॅथोलिक परंपरांना आणि तत्कालीन चर्चच्या जाचक अंधश्रद्धा यांना आव्हान देणारी त्याची विचारसरणी आणि चार्ल्स विद्यापीठाला त्याने दिलेले योगदान यांमुळे त्याला युरोपातील पहिला धर्म-सुधारक मानले जाते.
John Hus Statue at Old Town Square |
बाहुलीनाट्य सादर करणारे Marionette Theatre |
Ta Fantastika ! |
Church of the Most Holy Saviour |
अंकशास्त्राचा प्रभाव असणारा राजा असल्याने या पुलाचे बांधकाम मुहूर्त साधून सुरु करण्यात आले होते : १३५७,९,७,५.३१ : म्हणजे १३५७ साली ९ जुलै सकाळी ५ वाजून एकतीस मिनिटे ! बरोब्बर या वेळी पहिला दगड रचण्यात आला. हा आकडा कुठूनही वाचला तरीही तोच राहतो (palindrome number). हा पूल म्हणजे प्राग चा किल्ला आणि Old Town हा भाग यांच्यातील महत्वाचा दुवा आहे.
Charles Bridge and Prague Castle (to the right) |
१८४१ सालापर्यंत हे दोन भाग जोडणारा हा एकमेव पूल होता. अनेक युद्धे आणि योद्धे पाहिलेल्या या "पुलाखालून बरेच पाणी गेलेले आहे" आणि या पुलाच्या विटा न विटा इतिहासातील रंजक गोष्टी सांगू शकतील असे वाटते.
Tower of the Charles Bridge |
पूल ओलांडून आम्ही किल्ल्याकडे कूच केले. वाटेत एका फेरीवाल्याकडून झेक पारंपारिक चमचमीत खाद्यपदार्थ "Trdelník" घेतला. मूळच्या हंगेरीचा असणारा हा गोड पदार्थ आपल्याकडच्या चिरोट्या सारखा लागतो :
Trdelník |
किल्ल्यावर जाण्यासाठी चढाचा रस्ता असला तरी हा चढ फारसा दमवणारा नाही. प्राग चा किल्ला हा नवव्या शतकापासून अस्तित्वात असून जगातील सर्वांत जुना किल्ला म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये त्याची नोंद आहे. किल्ल्याच्या आवारात अनेक देखणे राजवाडे, पवित्र चर्च , वैशिष्ट्यपूर्ण कॅथेड्रल्स , प्रसन्न बागा आणि ऐतिहासिक हॉल्स आहेत.
A Palace and St.Vitus Cathedral of the Prague Castle |
प्राग च्या किल्ल्यावरून Little Quarter आणि Old Town हे प्राग चे भाग अतिशय सुंदर दिसतात.
Bird Eye view of Prague from Prague Castle |
Escalators in Prague Metro stations |
राडेक ने आम्हाला अर्ध्या दिवसात प्राग दर्शन घडवले होते… आता येथून पुढे त्याला त्याच्या घरी म्यएनिक ला जाण्याचे वेध लागले होते. म्यएनिक हे प्राग च्या उत्तरेस असलेले, व्लतावा आणि लाबं या नद्यांच्या संगमावर वसलेले एक छोटे शहर आहे. प्रामुख्याने वाईन उद्योगासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. हायवे ने तासाभरात आम्ही म्यएनिकला पोचलो सुद्धा !
म्यएनिकचा प्रसिद्ध किल्ला शहरात प्रवेश करतानाच उजवीकडे दिसतो. या किल्ल्याला वाईन ठेवण्यासाठी मोठ्ठी तळघरे आहेत आणि नदीच्या बाजूस आता रोइंग क्लब विकसित केला आहे.
The Castle of Melnik |
Confluence of the Vltava and the Labe |
व्लतावा आणि लाबं या नद्यांचा संगम पाहून आम्ही राडेक च्या घरी गेलो. राडेकचे घर टुमदार हे विशेषण मनात ठेवूनच बनवले असावे असे वाटले :
राडेकला संगीतात विशेष रुची असल्याने आणि तो एक उत्तम rower (नौकानयन-पटू) असल्याने त्याची खोली गिटार , ग्रामोफोन, त्याची मेडल्स आणि बक्षिसे यांनी भरून गेली होती. मी सोडून इतर सर्वांना गिटार वाजवता येत असल्याने रोमान, पात्रीसिया आणि राडेक यांनी एक छान मैफिल जमवली. नंतर राडेक ने खास आमच्या साठी राखून ठेवलेली El Dorado उघडली आणि आम्ही शांत संगीत ऐकण्यात "रम"माण झालो.
राडेक च्या आईने तोपर्यंत स्वयंपाक तयार ठेवला होता. मी एकटा शाकाहारी असल्याने माझा खास विचार करून राडेकने त्याच्या आईला स्वयंपाक करायला सांगितला होता . कोबीचे वडे, भाज्यांचे मिश्रण घालून केलेले पकोडे आणि चॉकलेट केक अशी माझ्या सोईने मी त्या खाद्य पदार्थांना नावे दिली.
Dinner prepared by Radek's mother |
तिथली बिअर स्वादिष्ट होती यात वाद नव्हता पण घरी चालत जायचे होते हा विचार करून आम्ही प्रमाणात घेतली होती. बार मधून बाहेर पडल्यावर मात्र राडेक ला उचलून घरी न्यावे लागणार असे वाटत होते. मात्र एक -दीड किलोमीटर चालून गेल्यानंतर चमत्कार झाला: राडेक घराच्या दिशेने पळू लागला. आणि पाहता पाहता दृष्टीआड गेला. मोठीच पंचाईत झाली ! आम्हाला कुणालाही घराचा रस्ता माहीत नव्हता. कारने बार पर्यंत आलेलो असल्याने आणि अशी काही वेळ येईल याची काडीमात्र कल्पना नसल्याने आम्हाला काय करावे कळत नव्हते. राडेकचा फोन घरी होता. आणि त्याचा आईचा किंवा भावाचा फोन नंबर घेतला नव्हता. दिशांचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे चालू लागलो. एका अनपेक्षित वळणावर राडेक आमची वाट बघत थांबला होता. त्याचे स्पष्टीकरण तर वळणापेक्षाही अनपेक्षित होते : तो म्हणाला, " मी नेहमीच दारू पिऊन घरी पळत जातो , म्हणजे लवकर घरी पोचता येते, आज मात्र अर्धे अंतर गेल्यावर लक्षात आले की तुम्हाला मागे सोडून आलो आहे… ". घरी पोचेतो बारा वाजून गेले होते आणि घरी पोचलो याच गोष्टीचा खूप आनंद झाला होता. (क्रमशः )
सर्व छायाचित्रे : उन्मेष, पात्रीसिया
संदर्भ : विकिपीडिया, झेक मित्रांकडून ऐकलेल्या लोककथा
Czechoslovakia la jaun alas..naaw kadhlas bhawa :D..yabaddal Akhil 'Suar'gate Tam-tam sanghatana ani 'Khaasgi' travels mitra mandal yanchyatarfe 'Takli Dhokeshwar' yethe Winamulya sahalisathi nenyat yeil
उत्तर द्याहटवा-Hukumawarun :D