७ सप्टेंबर २०१८
दिवस पहिला : टोकियोत आगमन
या प्रवासवर्णनाला एक प्रस्तावना पुरेशी नाही.
प्रस्तावना #१
२००३ साली केवळ मित्राने जपानी भाषेचा क्लास लावला म्हणून जपानी शिकायला सुरुवात केली.
तीन वर्षे शिकून जपानीच्या परीक्षाही दिल्या आणि नंतर संगणक शास्त्राच्या अभ्यासक्रमात गुंतल्यामुळे जपानीशी संपर्क तुटला. आता एक तप उलटल्यानंतर अचानक जपानी बोलावे लागेल आणि क्लास मध्ये शिकलेले आठवेल याची तसूभरही कल्पना मला नव्हती.
प्रस्तावना #२
आमस्टरडॅम मध्ये शिकताना काही सहाध्यायी जवळचे मित्र झाले. विशेषतः रोमेनियन लोकांशी खूपच चांगले बंध निर्माण झाले. क्रिस्ती आणि मिहाई हे त्यांपैकीच दोन अवलिया रोमेनियन.
२०१८ च्या फेब्रुवारी मध्ये मिहाई टोकियो मधील एका नावारूपाला येऊ पाहणाऱ्या स्टार्ट अप मध्ये रुजू झाला. आणि माझा फ्लॅटमेट क्रिस्ती आणि मी जपान भेटीची आखणी केली. टोकियो मध्ये राहण्याची सोय झाली होतीच. जपानमधील इतर शहरे, तेथील प्रेक्षणीय ठिकाणे आदी गोष्टींची यादी करणे सुरु झाले. फोन वर डुओलिंगो नावाच्या ऍप वर जपानी भाषेचा सराव सुरु केला. आणि हां हां म्हणता तो दिवस उजाडला.
विमान प्रवासाविषयी फारसे लिहीण्यासारखे नाही. आमस्टरडॅम ते म्युनिक हा पल्ला दोनच तासांत पार झाला. म्युनिक पासून टोकियोला जाण्यासाठी तब्बल ४ चित्रपट (साडेदहा तास) एवढा वेळ लागला.
टोकियो ला पोचलो तेव्हा तेथील प्रमाणवेळेनुसार दुपारचे दोन वाजले होते. मिहाई आम्हाला घ्यायला आला होता.
सिमकार्ड घेणे आणि मेट्रो आणि अंतर्गत वाहतुकीसाठी सोईस्कर असे सुईका नावाचे कार्ड घेतले.
मिहाई च्या घरी जाण्यासाठी टोकियोच्या उत्तरेस असलेल्या कोमागोमे या स्थानकाला आलो. तेथून पाच मिनिटे चालत जाण्याच्या अंतरावर मिहाई चे घर होते.
स्टुडिओ प्रकारात मोडणारी त्याची सदनिका होती. म्हणजे एकाच खोलीत स्वयंपाकघर आणि बेडरूम.
मित्र रहायला येणार अशी खात्री असल्याने त्याने बंक बेड बसवला होता. आणि मोकळ्या जागेत हवा भरुन फुलवता येतील अशा दोन गाद्या होत्या.
क्रिस्तीचा भाऊ दान आणि मित्र आलेक्स तेथे आधीच आले होते.
फ्रेश होऊन आम्ही जेवायला बाहेर पडलो. Denny's नावाच्या अमेरिकन रेस्टॉरंट मधे गेलो जे कोमागोमे स्थानकाच्या अगदी जवळ होते. तेथे टेबल साठी वेटिंग होते आणि नाव लिहिण्यासाठी जी वही होती त्यात सर्व कॉलम जपानी मधे होते. जपानी भाषेची पहिली कसोटी पार पडली.
नाव, किती जण, धूम्रपान करणार की नाही वगैरे कॉलम्स असलेली वही |
जपान मधे शाकाहारी जेवण मिळणे कठीण असते असे ऐकले होते. या पहिल्याच रेस्टॉरंटमधे त्यावर शिक्कामोर्तब झाले. पुढील पंधरा दिवस पोटाला चिमटे काढण्याची मानसिक तयारी केली.
जेवण झाल्यावर आम्ही शहरात फेरफटका मारावयास निघालो.
शहराच्या या भागात आजिबात पदपथ नव्हते. सायकल साठी वेगळे रस्तेही नव्हते. ऱस्त्यावर चालताना धूम्रपान करण्यास मनाई होती; तशा सूचना जागोजागी लावल्या होत्या.
चालताना धूम्रपान वर्ज्य, टोकियो , जपान |
सिगारेट ओढण्यासाठी विशिष्ट जागा राखीव होत्या. कोमागोमे ते ताबाता स्थानक हे अंतर आम्ही आजूबाजूचा परिसर न्याहाळत आणि दुकानांना भेटी देत पार केले.
जपान मधे फिरण्यासाठी आम्ही ॲम्स्टरडॅम मधून JR रेल्वेचा ७ दिवसाचा पास ऑनलाईन विकत घेतला होता. तो बदलून जपानी पास घेणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी JR पास चे ऑफिस शोधणे हे एक आव्हान ठरले. गूगल मॅप ने सांगितल्याप्रमाणे मार्गक्रमणा केली तर आम्ही एका उड्डाणपुला खाली आलो. कुठे जावे हे कळत नसल्याने तेथे एका माणसाला विचारले , तर तो आमच्या बरोबरच आला.
बरीच तंगडतोड आणि विचारपूस केल्यावर एकदाचे ते ऑफिस सापडले. मात्र तेथे JR पास बदलून मिळत नाही असे सांगताच आमचा विरस झाला. आता पास बदलण्यासाठी टोकियो स्थानक गाठणे भाग होते.
मेट्रोने टोकियो स्थानकापर्यंत गेलो. पास बदलून घेतले. टोकियो हे स्थानक भव्य-दिव्य आहे. दररोज वीस फलाट आणि वीस लाख माणसांची लाट हाताळणारी तेथील व्यवस्था बघून अवाक व्हायला होते.
मिहाई ऑफिस सुटल्यानंतर तेथे आला आणि आम्ही टोकियो स्थानकाच्या आसपासचा चकचकीत (शब्दशः) आणि गगनचुंबी इमारतींचा परिसर पालथा घातला.टोकियो स्थानक, जपान |
दमून घरी आलो आणि गप्पा मारत झोपी गेलो.
(क्रमशः)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा