दिवस दुसरा : ८ सप्टेंबर २०१८
क्योतो सुवर्ण मंदीर आणि गेईशा मुलूख
भूकंप म्हणजे जपान साठी रोज होणारा गजर आहे. कुठे ना कुठेतरी रोज कमी अधिक तीव्रतेचा भूकंप जपानमध्ये होत असतो. म्हणूनच भूकंपरोधक घरे बांधण्यात जपानी लोक प्रवीण आहेत.
क्योतो सुवर्ण मंदीर आणि गेईशा मुलूख
ठरवूनसुद्धा कुणीच लवकर उठले नाही. निवांत आवरुन नाश्ता करुन टोकियोहून निघेपर्यंत बारा वाजून गेले. क्योतो ला जाण्यासाठी आम्ही टोकियो स्थानकापासून बुलेट ट्रेन घेणार होतो. कोमागोमे हून तेथे जाताना वाटेत बेकरीमधून काही पदार्थ बांधून घेतले.
रेल्वे आणि स्थानके यांबद्दल अप्रूप वाटावे असे बरेच होते. फलाटावर रेल्वेची बोगी नेमकी कुठे थांबणार त्या ठिकाणी पादुका ठेवाव्यात तशा पाऊलखुणा होत्या. रेल्वेमधे जाऊ इच्छिणारे लोक तेथे रांग लावतात. अर्थात रेल्वेमधून बाहेर येणारी माणसे संपल्याशिवाय कुणीच आत जाण्यासाठी घाई करत नाही. टोकियोमधील मेट्रो, रेल्वे यांचे जाळे अतिशय गुंतागुंतीचे असूनही रेल्वे कायमच वेळेवर येतात आणि सुटतातही ! केवळ भूकंप किंवा चक्री वादळ अथवा त्सुनामी अशा कारणास्तवच रेल्वे उशीरा येते किंवा रद्द होते.
भूकंप म्हणजे जपान साठी रोज होणारा गजर आहे. कुठे ना कुठेतरी रोज कमी अधिक तीव्रतेचा भूकंप जपानमध्ये होत असतो. म्हणूनच भूकंपरोधक घरे बांधण्यात जपानी लोक प्रवीण आहेत.
बुलेट ट्रेन चा पहिला अनुभव मोठा रोमांचक होता. हिकारी नावाची बुलेट ट्रेन, जी ताशी सुमारे २८०-३०० किमी एवढ्या वेगाने धावते. बुलेट ट्रेन चा प्रवास वेगवान असला तरीहि आसनाला आणि डब्याला कमालीचे स्थैर्य होते. ट्रेन मधील आसने १८० कोनामध्ये फिरवता येत होती जेणेकरून रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने तोंड करून बसणे नेहमीच शक्य होते. हिकारीमध्ये बसून आम्ही दोन तासांत क्योतो ला पोचलो.
क्योतो स्थानक हे प्रचंड मोठे होते. स्थानकामध्ये अनेक दुकाने होती. पैकी खाण्याच्या दुकानांच्या बाहेर खाद्यपदार्थ ठेवलेल्या ताटल्या हातात घेऊन उभ्या असलेल्या, विशेष पेहराव केलेल्या मुली लक्ष वेधून घेत होत्या. येणाऱ्याजाणाऱ्या प्रवाशांना चवीपुरते पदार्थ देऊन ते विकत घेण्यासाठी प्रवृत्त करायचे हे त्यांचे काम. आम्ही निर्लज्ज पणे फक्त चव घेऊन आमच्या मार्गी लागलो.
स्थानकावरील दुकानांबाहेर थांबलेल्या विक्रेत्या |
स्थानकामधील मोठ्ठा आणि लांब असा वरांडा शाळकरी मुलांनी फुलून गेला होता. त्यांच्या शाळेची सहल निघाली होती असे काही मुलांकडून समजले.
"वन मोअर हार्ट" अशा काव्यमय नावाच्या हॉटेलमधे आम्ही बुकिंग केले होते. क्योतो स्थानकापासून वीस मिनिटे चालावे लागले. क्योतो हे अतिशय साधे शहर असल्याचे दिसून आले.
गगनचुंबी इमारती नाहीत की लाकडी घरे नाहीत. अत्याधुनिकही नाही आणि खेडवळही नाही. ठिकठिकाणी विजेचे खांब बघून तर थोडेसे मागास शहर असल्यासारखी वाटले. युरोप मध्ये सर्व वीज वाहिन्या जमिनीखालून जात असल्याने
शहरांच्या सौंदर्यात बाधा येत नाही. जपान हा तथाकथित आधुनिक आणि प्रगत देश असल्यामुळे त्यामुळे येथे विजेचे खांब बघून नवल वाटल्यावाचून राहिले नाही.
हॉटेलमध्ये सामान ठेवून आम्ही क्योतो दर्शनाला प्रारंभ केला.
बसने किनकाकुजी सुवर्णमंदीर गाठले. एका मोठ्या बागेत तलावाच्या काठी सोनेरी छत असलेले ते मंदीर कुणाच्याही मनात श्रद्धा निर्माण करेल. मंदिराचे फोटो काढण्यासाठी जे चांगले स्पॉट आहेत तेथे जाण्यासाठी बागेतील कर्मचारी खुणावत होते. तेथे येणाऱ्या छायाचित्रकारांसाठी ती मोठीच सोय होती.
सुवर्ण मंदीर (किनकाकुजी) , क्योतो |
मंदीराच्या आत जाण्यास मनाई होती मात्र बागेचे आवार मोठे असल्याने प्रेक्षणीय ठिकाणे काही कमी नव्हती. धबधबे, तलाव , बुद्धमूर्ती डोळ्यांत आणि कॅमेरात टिपत आम्ही मंदिराचा निरोप घेतला.
कोमे नदीवर जाण्यासाठी बसने जायचे ठरवले. बस स्टॉप वर बस कधी येणार हे समजावे यासाठी एक आकर्षक सूची केली होती. त्या सूचीमध्ये तीन दिवे होते. एक दिवा बस साठी अजून पाच मिनिटे हे दाखवणारा तर इतर दोन दिवे अनुक्रमे तीन आणि शून्य मिनिटे बाकी आहे असे दाखवत होते. विशेष म्हणजे ही सूची डिजिटल असूनही यांत्रिक असल्यासारखी दिसत होती. बस स्टॉप जवळच दत्ताचे मंदीर असावे असे वाटणारे एक बुद्ध मंदीर होते तेही उलट्या स्वस्तिकासकट !
कोमे नदी ही क्योतो मधील सर्वांत लांब नदी आहे. पुण्याची जशी मुळामुठा तशी क्योतो ची कोमे .. अपवाद फक्त स्वच्छतेचा. गेल्याच आठवड्यात आलेल्या पुरामुळे नदी दुथडी भरून वाहत होती. वादळाचे तडाखे किनाऱ्यावर जखमांचे व्रण ठेवून गेले होते. नदी किनाऱ्यावरील अनेक झाडे विस्कळीत झालेली दिसत होती काही झाडे उन्मळून पडली होती. तरीहि नदीकिनारी चालणे हा सुरेख अनुभव होता. नदीच्या किनारी चालण्यासाठी आणि पळण्यासाठी खास रस्ते होते. दोन्ही बाजूंना हिरवाई आणि फक्त वाहत्या पाण्याचा आवाज. मुळामुठेच्या लगत चालताना जसा कधी सिंहगड दिसतो तसे डोंगर कोमे नदीच्या प्रवाहाच्या दिशेला क्षितिजावर दिसत होते.
कोमे नदी , क्योतो |
साधारण दोन किलोमीटर चालून झाल्यावर सहाजिकच आम्हाला भूक लागली.
जेवणासाठी शाकाहारी रेस्टॉरंट शोधणे हे एक दिव्य होते. आम्ही जेवणापुरते वेगळे झालो. मी एका थाय रेस्टॉरंटमधे जेवलो आणि इतर तिघे गोमांस ही खासियत असलेल्या जपानी रेस्टॉरंटमधे जेवूनआले.
मग आम्ही सर्व जण एकत्र केक आणि चहा साठी एका बेकरीवजा रेस्टॉरंट मधे गेलो. क्योतो मधे जिथे तिथे हिरवा चहा (कोच्या) युक्त पदार्थांची रेलचेल होती. येथेही केक मधे कोच्या फ्लेवर होताच.
उदरभरण झाल्यावर शतपावली करावी असा विचार चालू असतानाच क्योतो च्या गिओन भागात चालत जावे असा प्रस्ताव क्रिस्ती ने मांडला. मग आम्ही कितीतरी सहस्त्र पावले मोजून , बागांतून जाणाऱ्या रस्त्याने जात गिओन मधे पोचलो.
गिओन हा भाग गेश्या ज्यांना येथे माइको सान असे म्हटले जाते, त्यांच्या वावरासाठी प्रसिद्ध आहे.
सान हे संबोधन जपान मधे आदरार्थी म्हणून वापरले जाते.
माइको म्हणजे चौदा पंधरा वर्षीय मुली ज्यांना गाणे, नाच अणि वाद्य कला यांचे प्रशिक्षण दिलेले असते.
अशा माइको बरोबर चहापान करण्यासाठीसुद्धा आरक्षण करावे लागते , शिवाय खास क्लबचा सदस्य व्हावे लागते. आम्हाला याची कल्पना नसल्याने हा योग घडून आला नाही. मात्र गिओन मधील त्या विशेष गल्ल्या आणि त्यात माइको सान फक्त बघायला मिळावी यासाठी थांबलेली माणसे बघितली. आम्हालाही सुंदर किमोनो परिधान केलेली, चेहरा रंगवलेली आणि डोके फुलदाणी असल्याप्रमाणे केशभूषा केलेली माइको सान बघायला मिळाली.
गिओन भागातील एक गल्ली, क्योतो |
एकंदरीत क्योतो मधील पहिला दिवस सार्थकी लागला होता.
(क्रमशः)
छान लिहिलं आहे ...... असच लिहीत रहा . जपान चे वर्णन जमलेलं आहे !!
उत्तर द्याहटवा