दिवस तिसरा : ९ सप्टेंबर २०१८
आराशियामा बांबूचे उपवन
सकाळी हॉटेल जवळच असणाऱ्या एका पारंपरिक उपहार"गृहात" नाश्ता करण्यासाठी गेलो. घरातील हॉलमध्येच तातामी (जपानी चटया) टाकून आणि चौरंग मांडून झकास सोय केली होती.
|
पारंपरिक जपानी घरात क्रिस्ती |
घरातील एक बाहुलीसारखी दिसणारी लहान मुलगी आपले बारीक डोळे उगाच आणखी किलकिले करून आमच्या कडे बघत होती. घरात आलेल्या नवीन पाहुण्यांना लाजत ती इकडे तिकडे पळत होती. जपानी "माच्या फ्लेवर शेव्हड आईस" ही खास डिश आम्ही मागवली आणि सोबत वाफाळता माच्या (हिरवा चहा) पिऊन नाश्त्याचा आनंद द्विगुणित केला.
|
शेव्ह्ड आईस माच्या फ्लेवर्ड |
आराशियामा ला जाण्यासाठी ट्रेन पकडली. हे एक छोटेसे खेडे आहे. बांबूचे उपवन असलेला परिसर विस्तीर्ण असून त्यात मंदीर , तलाव आणि एक छानशी टेकडी यांचा समावेश होतो. स्थानकापासून तेथे चालत जाताना काही जपानी जोडपी मस्तपैकी किमोनो घालून चालताना दिसली. त्यांचा हेवा वाटल्यावाचून राहिले नाही. क्रिस्ती आणि ॲलेक्स ने त्यांच्याबरोबर फोटोपण काढले. खेड्यातील एका गिफ्ट शॉप मधे खरेदी झाली.
बांबूच्या उपवनात दोहो बाजूना बांबू असणाऱ्या वाटेत फोटो काढण्यासाठी ही गर्दी जमली होती. आम्ही थोडा वेळ गर्दी कमी होण्याची वाट पाहून मग तो नाद सोडून दिला.
|
बांबूचे उपवन , आराशियामा |
परिसर अतिशय निसर्गरम्य असल्याने आम्ही भटकण्यासाठी विखुरलो.
शिननोसुके नावाचा वाटाड्या परदेशी पर्यटक कमावू पाहत होता. क्रिस्ती , आलेक्स आणि दान परत भेटेपर्यंत त्याच्याशी थोडे हितगुज केले.
|
शिननोसुके (आराशियामा येथील चुणचुणीत वाटाड्या) |
टेकडी चढून गेल्यास सुंदर देखावा बघायला मिळेल असे (वाटाड्या कडून) कळल्यावर आम्ही उत्साहाने माथ्यावर गेलो. खरोखरच विहंगम असे दृश्य बघावयास मिळाले.
|
आराशियामा येथील टेकडीवरून दिसणारे दृश्य |
अंधार पडेपर्यंत टेकडीवर भटकलो. पुन्हा गावात गेल्यावर ईल मासा खासियत असलेल्या उपहारगृहात जेवायला गेलो. अतिशय पारंपारिक असल्यामुळे तेथील थाट काही औरच होता. मासे खाणार नसल्यामुळे मी छायाचित्रकाराची भूमिका घेतली.
|
उपाहारगृहाच्या बाहेरील दिवा आणि झाड , आराशियामा |
आराशियामा हून क्योतोला परतल्यावर शाकाहारी उपहारगृहात जाऊन मी पोटपूजा केली आणि मिष्टान्न म्हणून केक्स वर ताव मारला.
|
केक प्लेट, उकीशिमा गार्डन रेस्टॉरंट , क्योतो |
शहरात फेरफटका मारत मारत हॉटेलवर परतलो.
(क्रमशः)
Waiting for new posts Unmesha!
उत्तर द्याहटवा