दिवस चौथा : १० सप्टेंबर
सकाळपासून पाऊस पडत होता. अर्थात त्यामुळे आम्ही आमच्या दिवसभराच्या भरगच्चं कार्यक्रमावर पाणी पडू देणार नव्हतो. क्योतो शहरातील सर्वांत प्रसिद्ध फुशिमी इनारी ताईशा-विहार (स्तूप) हा आमच्या प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत अग्रस्थानी होता.
मेट्रोने वीसेक मिनिटांत तेथे पोहोचलो. शिंतो धर्मात असणाऱ्या अनेक देवांपैकी इनारी हा महत्वाचा देव असून त्या देवाचे मंदिर (विहार) म्हणजे इनारी विहार !
इनारी हा तांदळाचा देव असून कोल्हा हे त्याचे वाहन आहे. इनारी देवाचे अनेक विहार जपानभर असले तरीहि क्योतो मधील फुशिमी ताईशा हा प्रमुख इनारी विहार आहे.
या विहाराचे प्रवेशद्वार म्हणजे एक प्रचंड तोरी-दार आहे. तोरी दार हे शेंदरी रंगाची चौकट असलेले एक दार असून ते शिंतो धर्माचे प्रतीक मानले जाते. अशा प्रकारची विशिष्ट चौकट असलेली ही दारे जपानभर मंदिरांत दिसून येतात.
फुशिमी ताईशा या विहारामध्ये अशी दारे असलेला लांब वऱ्हांडा आहे. तेथे फोटो काढण्यासाठी बरीच गर्दी होती.
आम्हीपण त्या गर्दीचा एक भाग झालो आणि एक मनुष्यविरहित फोटो काढण्यात यश मिळवले.
तोरी च्या दारांचा व्हरांडा |
यानंतर आमच्या सहलीचा पुढचा टप्पा होते कियोमिझू-देरा !
कियोमिझू-देरा हे क्योतो मधीलच नव्हे तर जपानमधील एक महत्वाचे बुद्ध मंदिर आहे.
कियोमिझू म्हणजे स्वच्छ पाणी आणि देरा म्हणजे मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर बांधण्यासाठी एकही खिळा वापरलेला नाही. अशा या मंदिराला युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांत स्थान मिळालेले आहे.
कियोमिझू-देरा ला जाण्यासाठी बस पकडली आणि जाताना ताकोयाकी नावाचा जपानी पदार्थ खाल्ला.
या मंदिरात जाण्याच्या रस्त्यावर किमोन विकणारी काही दुकाने होती आणि मला किमोनो घेण्याची अतिशय इच्छा होती. क्रिस्ती आणि मिहाई ला पुढे पाठवून, काही दुकाने धुंडाळून एक करड्या रंगाचा किमोनो आणि निळ्या रंगाचा ओबी (पट्टा ) विकत घेतला. पुरुषांचे किमोनो फार रंगीबेरंगी नसतात आणि फारशी नक्षी असलेले किमोनो सुद्धा पुरुष घालत नाहीत. खरं तर नेसत नाही म्हणायला हवे, कारण साडी नेसण्यासारखाच अवघड(ल्यासारखा) तो प्रकार होता. माझा किमोनो विक्रेत्या महिलेकडूनच नेसवून घेतला. साडी किंवा लांब स्कर्ट घातलेल्या स्त्रियांना चालायला कसा त्रास होऊ शकतो याची जाणीव झाली.
हळूहळू चालत मंदिरात पोचलो. एका डोंगरवजा टेकडी वर वसलेले ही मंदिर येईपर्यंत चांगलीच पायपीट झाली. आणि क्रिस्ती व मिहाई शी पुन्हा संपर्क केला.
किमोनो घातलेला माझा अवतार (चेहरा जपानी दिसत नसल्यामुळे) बघण्यासाठी मंदिरामध्ये अनेकांच्या माना वळल्या.
मंदिरात योगायोगाने भेटलेल्या काही मैत्रिणींसोबत मी फोटो काढले त्यांचे किमोनो फारच रंगीबेरंगी आणि आकर्षक होते.
या बुद्ध मंदिरामध्ये संपूर्ण जपानहून भाविक येतात आणि हे मंदिर टेकडीवर माथ्यावर असल्यामुळे तेथून टेकडीच्या जंगलाचा परिसर फारच रमणीय दिसतो.
कियोमिझू-देरा च्या आवारातील पॅगोडा |
मंदिरामध्ये फिरून झाल्यावर आम्ही आपापल्या वाटेला लागलो. मी गिओन भागातील एका सांस्कृतिक केंद्रामध्ये एक विविध (जपानी) गुणदर्शनाचा कार्यक्रम बघण्यासाठी गेलो.
तेथे एकावेळी अनेक आणि एका पाठोपाठ अनेक अशा कार्यक्रमांची रेलचेल होती.
पहिला कार्यक्रम म्हणजे सतार सदृश वाद्याच्या वादनाबरोबर जपानी पद्धतीने चहा बनवणे व इकेबाना पद्धतीची पुष्परचना करणे.
पहिल्या ओळीत किमोनो घालून मिरवत असल्यामुळे मला चहाची चव बघण्यासाठी मंचावर पाचारण करण्यात आले.
एखादा कर्मठ ब्राह्मण जेवढे सोवळे-ओवळे करणार नाही तेवढे तो चहा घशाखाली उतरवण्यासाठी करावे लागले.
बसायची विशिष्ट पद्धत, कोणत्या हाताने किटली, कप धरावयाचा, कसा ओतायचा, देणाऱ्याला कसे अभिवादन करावे, या सर्व गोष्टींसाठी सव्यापसव्याप्रमाणे संकेत होते.
त्यानंतरचे कार्यक्रम एक छोटेसे जपानी नाटुकले आणि जपानी बाहुलीनाट्य फारच मजेदार होते.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते जपानी गेईश्या-नाच! त्यांना क्योतो मध्ये माइको-सान म्हटले जाते. सुंदर किमोनो घातलेल्या आणि चेहऱ्यावर आणि केसांवर डोके जणूकाही फुलदाणी असल्याप्रमाणे भरगच्च मेकअप केलेल्या त्या माइको फारच सफाईने हालचाली करत होत्या.
विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपल्यावर संपल्यावर मी एका नेपाळी उपहारगृहात जेवण केले त्यानंतर एका बार मध्ये ख्रिस्ती आणि मिहाईला भेटलो. तेथे विशेष जपानी ओटमील बिअर (आणि इतर बिअर्स) पिऊन दिवसाची सांगता केली.
(क्रमशः)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा