Translate

japan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
japan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

उगवत्या सूर्याच्या देशात : धार्मिक , सामाजिक आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण


दिवस चौथा : १० सप्टेंबर 

सकाळपासून पाऊस  पडत होता. अर्थात त्यामुळे आम्ही आमच्या दिवसभराच्या भरगच्चं कार्यक्रमावर पाणी पडू देणार नव्हतो. क्योतो शहरातील सर्वांत प्रसिद्ध फुशिमी इनारी ताईशा-विहार (स्तूप) हा आमच्या प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत अग्रस्थानी होता. 
मेट्रोने वीसेक मिनिटांत तेथे पोहोचलो. शिंतो धर्मात असणाऱ्या अनेक देवांपैकी इनारी हा महत्वाचा देव असून त्या देवाचे मंदिर (विहार) म्हणजे इनारी विहार ! 


इनारी हा तांदळाचा देव असून कोल्हा हे त्याचे वाहन आहे. इनारी देवाचे अनेक विहार जपानभर असले तरीहि क्योतो मधील फुशिमी ताईशा हा प्रमुख इनारी विहार आहे.

इनारीचे  वाहन कोल्ह्याचा पुतळा 



या विहाराचे प्रवेशद्वार म्हणजे एक प्रचंड तोरी-दार आहे. तोरी दार हे शेंदरी रंगाची चौकट असलेले एक दार असून ते शिंतो धर्माचे प्रतीक मानले जाते. अशा प्रकारची विशिष्ट चौकट असलेली ही दारे जपानभर मंदिरांत दिसून येतात.  

फुशिमी ताईशा या विहारामध्ये अशी दारे असलेला लांब वऱ्हांडा आहे.  तेथे फोटो काढण्यासाठी बरीच गर्दी होती.
आम्हीपण त्या गर्दीचा एक भाग झालो आणि एक मनुष्यविरहित फोटो काढण्यात यश मिळवले.  

तोरी च्या दारांचा व्हरांडा  



मंदिराच्या आवारात अनेक वस्तू विकायला ठेवल्या होत्या.  शेंदरी रंगाच्या चौकटीच्या दारांच्या पार्श्वभूमीवर, कोल्ह्याच्या पुतळ्यांसोबत वगैरे अनेक फोटो काढत आम्ही मंदिरात फेरफटका मारला.   



यानंतर आमच्या सहलीचा पुढचा टप्पा होते कियोमिझू-देरा ! 
कियोमिझू-देरा हे क्योतो मधीलच नव्हे तर जपानमधील एक महत्वाचे बुद्ध मंदिर आहे. 
कियोमिझू म्हणजे स्वच्छ पाणी आणि देरा म्हणजे मंदिर. या  मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर बांधण्यासाठी एकही खिळा वापरलेला नाही. अशा या मंदिराला युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांत स्थान मिळालेले आहे. 

कियोमिझू देरा मंदिराच्या आवारातील एक मंदिर 



कियोमिझू-देरा ला जाण्यासाठी बस पकडली आणि जाताना ताकोयाकी नावाचा जपानी पदार्थ खाल्ला.  

थोडे ताकोयाकी टाकूया की !



या मंदिरात जाण्याच्या रस्त्यावर किमोन विकणारी काही दुकाने होती आणि मला किमोनो घेण्याची अतिशय इच्छा होती. क्रिस्ती आणि मिहाई ला पुढे पाठवून,  काही दुकाने धुंडाळून एक करड्या रंगाचा किमोनो आणि निळ्या रंगाचा ओबी (पट्टा ) विकत घेतला.  पुरुषांचे किमोनो फार रंगीबेरंगी नसतात आणि फारशी नक्षी असलेले किमोनो सुद्धा पुरुष घालत नाहीत. खरं तर नेसत नाही म्हणायला हवे, कारण साडी नेसण्यासारखाच अवघड(ल्यासारखा) तो प्रकार होता. माझा किमोनो विक्रेत्या महिलेकडूनच नेसवून घेतला. साडी किंवा लांब स्कर्ट घातलेल्या स्त्रियांना चालायला कसा त्रास होऊ शकतो याची जाणीव झाली. 

हळूहळू चालत मंदिरात पोचलो. एका डोंगरवजा टेकडी वर वसलेले ही मंदिर येईपर्यंत चांगलीच पायपीट झाली. आणि  क्रिस्ती व मिहाई शी पुन्हा संपर्क केला. 
किमोनो घातलेला माझा अवतार (चेहरा जपानी दिसत नसल्यामुळे) बघण्यासाठी मंदिरामध्ये अनेकांच्या माना वळल्या. 
मंदिरात योगायोगाने भेटलेल्या काही मैत्रिणींसोबत मी फोटो काढले त्यांचे किमोनो फारच रंगीबेरंगी आणि आकर्षक होते. 

किमोनो नेसण्याची हौस 



या बुद्ध मंदिरामध्ये संपूर्ण जपानहून भाविक येतात आणि हे मंदिर टेकडीवर माथ्यावर असल्यामुळे तेथून टेकडीच्या जंगलाचा परिसर फारच रमणीय दिसतो. 

कियोमिझू-देरा च्या आवारातील पॅगोडा 



मंदिरामध्ये फिरून झाल्यावर आम्ही आपापल्या वाटेला लागलो.  मी गिओन  भागातील एका सांस्कृतिक केंद्रामध्ये एक विविध (जपानी)  गुणदर्शनाचा कार्यक्रम बघण्यासाठी गेलो.  

तेथे एकावेळी अनेक आणि एका पाठोपाठ अनेक अशा कार्यक्रमांची  रेलचेल होती. 
पहिला कार्यक्रम म्हणजे सतार सदृश वाद्याच्या वादनाबरोबर जपानी पद्धतीने चहा बनवणे व इकेबाना  पद्धतीची पुष्परचना करणे.  
पहिल्या ओळीत किमोनो घालून मिरवत असल्यामुळे मला चहाची चव बघण्यासाठी मंचावर पाचारण करण्यात आले. 
एखादा कर्मठ ब्राह्मण जेवढे सोवळे-ओवळे करणार नाही तेवढे तो चहा घशाखाली उतरवण्यासाठी करावे लागले. 
बसायची विशिष्ट पद्धत, कोणत्या हाताने किटली, कप धरावयाचा, कसा ओतायचा, देणाऱ्याला कसे अभिवादन करावे, या सर्व गोष्टींसाठी सव्यापसव्याप्रमाणे संकेत होते. 



त्यानंतरचे कार्यक्रम एक छोटेसे जपानी नाटुकले आणि जपानी बाहुलीनाट्य फारच मजेदार होते. 




कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते जपानी गेईश्या-नाच! त्यांना क्योतो मध्ये माइको-सान म्हटले जाते.  सुंदर किमोनो घातलेल्या आणि चेहऱ्यावर आणि केसांवर डोके जणूकाही फुलदाणी असल्याप्रमाणे भरगच्च मेकअप केलेल्या त्या माइको फारच सफाईने हालचाली करत होत्या. 

गेईश्या नाच  

विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपल्यावर संपल्यावर मी एका नेपाळी उपहारगृहात जेवण केले त्यानंतर एका बार मध्ये ख्रिस्ती आणि मिहाईला भेटलो. तेथे विशेष जपानी ओटमील बिअर (आणि इतर बिअर्स) पिऊन दिवसाची सांगता केली. 




(क्रमशः)



गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

उगवत्या सूर्याच्या देशात : टोकियोत आगमन


७ सप्टेंबर २०१८

दिवस पहिला : टोकियोत आगमन


या प्रवासवर्णनाला एक प्रस्तावना पुरेशी नाही.

प्रस्तावना #१
२००३ साली केवळ मित्राने जपानी भाषेचा क्लास लावला म्हणून जपानी शिकायला सुरुवात केली.
तीन वर्षे शिकून जपानीच्या परीक्षाही दिल्या आणि नंतर संगणक शास्त्राच्या अभ्यासक्रमात गुंतल्यामुळे जपानीशी संपर्क तुटला. आता एक तप उलटल्यानंतर अचानक जपानी बोलावे लागेल आणि क्लास मध्ये शिकलेले आठवेल याची तसूभरही कल्पना मला नव्हती.

प्रस्तावना #२
आमस्टरडॅम मध्ये शिकताना काही सहाध्यायी जवळचे मित्र झाले. विशेषतः रोमेनियन लोकांशी खूपच चांगले बंध निर्माण झाले.  क्रिस्ती आणि मिहाई  हे त्यांपैकीच दोन अवलिया रोमेनियन.
२०१८ च्या फेब्रुवारी मध्ये मिहाई टोकियो मधील एका नावारूपाला येऊ पाहणाऱ्या स्टार्ट अप मध्ये रुजू झाला. आणि माझा फ्लॅटमेट क्रिस्ती आणि मी जपान भेटीची आखणी केली. टोकियो मध्ये राहण्याची सोय झाली होतीच. जपानमधील इतर शहरे, तेथील प्रेक्षणीय ठिकाणे आदी गोष्टींची यादी करणे सुरु झाले.  फोन वर डुओलिंगो नावाच्या ऍप वर जपानी भाषेचा सराव सुरु केला. आणि हां हां म्हणता तो दिवस उजाडला.

विमान प्रवासाविषयी फारसे लिहीण्यासारखे नाही. आमस्टरडॅम ते म्युनिक हा पल्ला दोनच तासांत पार झाला. म्युनिक पासून टोकियोला जाण्यासाठी तब्बल ४ चित्रपट (साडेदहा तास) एवढा वेळ लागला.
टोकियो ला पोचलो तेव्हा तेथील प्रमाणवेळेनुसार दुपारचे दोन वाजले होते. मिहाई आम्हाला घ्यायला आला होता.
सिमकार्ड घेणे आणि मेट्रो आणि अंतर्गत वाहतुकीसाठी सोईस्कर  असे सुईका नावाचे कार्ड घेतले.

मिहाई च्या घरी जाण्यासाठी टोकियोच्या उत्तरेस असलेल्या कोमागोमे या स्थानकाला आलो. तेथून पाच मिनिटे चालत जाण्याच्या अंतरावर मिहाई चे घर होते.
स्टुडिओ प्रकारात मोडणारी त्याची सदनिका होती. म्हणजे एकाच खोलीत स्वयंपाकघर आणि बेडरूम.
मित्र रहायला येणार अशी खात्री असल्याने त्याने बंक बेड बसवला होता. आणि मोकळ्या जागेत हवा भरुन फुलवता येतील अशा दोन गाद्या होत्या.

क्रिस्तीचा भाऊ दान आणि मित्र आलेक्स तेथे आधीच आले होते.
फ्रेश होऊन आम्ही जेवायला बाहेर पडलो. Denny's नावाच्या अमेरिकन रेस्टॉरंट मधे गेलो जे कोमागोमे स्थानकाच्या अगदी जवळ होते. तेथे टेबल साठी वेटिंग होते आणि नाव लिहिण्यासाठी जी वही होती त्यात सर्व कॉलम जपानी मधे होते. जपानी भाषेची पहिली कसोटी पार पडली.

नाव, किती जण, धूम्रपान करणार की नाही वगैरे कॉलम्स असलेली वही 

जपान मधे शाकाहारी जेवण मिळणे कठीण असते असे ऐकले होते. या पहिल्याच रेस्टॉरंटमधे त्यावर शिक्कामोर्तब झाले. पुढील पंधरा दिवस पोटाला चिमटे काढण्याची मानसिक तयारी केली.
जेवण झाल्यावर आम्ही शहरात फेरफटका मारावयास निघालो.
शहराच्या या भागात आजिबात पदपथ नव्हते. सायकल साठी वेगळे रस्तेही नव्हते. ऱस्त्यावर चालताना धूम्रपान करण्यास मनाई होती; तशा सूचना जागोजागी लावल्या होत्या.


चालताना धूम्रपान वर्ज्य, टोकियो , जपान 

सिगारेट ओढण्यासाठी विशिष्ट जागा राखीव होत्या. कोमागोमे ते ताबाता स्थानक हे अंतर आम्ही आजूबाजूचा परिसर न्याहाळत आणि दुकानांना भेटी देत पार केले.
जपान मधे फिरण्यासाठी आम्ही ॲम्स्टरडॅम मधून JR रेल्वेचा ७ दिवसाचा पास ऑनलाईन विकत घेतला होता. तो बदलून जपानी पास घेणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी JR पास चे ऑफिस शोधणे हे एक आव्हान ठरले. गूगल मॅप ने सांगितल्याप्रमाणे मार्गक्रमणा केली तर आम्ही एका उड्डाणपुला खाली आलो. कुठे जावे हे कळत नसल्याने तेथे एका माणसाला विचारले , तर तो आमच्या बरोबरच आला.
बरीच तंगडतोड आणि विचारपूस केल्यावर एकदाचे ते ऑफिस सापडले. मात्र तेथे JR पास बदलून मिळत नाही असे सांगताच आमचा विरस झाला. आता पास बदलण्यासाठी टोकियो स्थानक गाठणे भाग होते.
मेट्रोने टोकियो स्थानकापर्यंत गेलो. पास बदलून घेतले. टोकियो हे स्थानक भव्य-दिव्य आहे. दररोज वीस फलाट आणि वीस लाख माणसांची लाट हाताळणारी तेथील व्यवस्था बघून अवाक व्हायला होते.  
मिहाई ऑफिस सुटल्यानंतर तेथे आला आणि आम्ही टोकियो स्थानकाच्या आसपासचा चकचकीत (शब्दशः) आणि गगनचुंबी इमारतींचा परिसर पालथा घातला.

टोकियो स्थानक, जपान 

दमून घरी आलो आणि गप्पा मारत झोपी गेलो.

(क्रमशः)