रविवार, ३० ऑगस्ट, २०२६

कोस्टा रिका ४ : "La Fortuna" चे नशीब आणि रिओ सेलेस्तेचा निळा "रंगारी"

कोस्टा रिका सहल : अमेरिकेचे श्रीमंत कोकण !


रिओ सेलेस्ते धबधबा 


सोमवार, १० ऑगस्ट : "नशीबवान" गावाकडे

सकाळी आठची बस. मी वेळेच्या अर्धा तास आधी स्थानकावर हजर. एस.टी. संस्कृतीत ट्रेक केलेल्या मध्यमवर्गीय माणसाला "बस चुकणे" या गोष्टीची जी उपजत भीती असते, ती सातासमुद्रापार गेल्यावरही जात नाही. पण इथे अजब प्रकार घडला : बस तब्बल तासभर उशिरा आली. मी अर्धा तास आधी आणि बस एक तास उशिरा,  म्हणजे दीड तास मी नुसता बाकावर बसून "आत्तापर्यन्त झालेली ट्रिप" यावर मुक्त चिंतन केले. दुसरीकडे विल्यम अगदी शेवटच्या क्षणी धावत आला आणि त्याची बस चुकता चुकता राहिली. मला वक्तशीरपणाचे बक्षीसही नाही मिळाले आणि ना विल्यमला  बेफिकिरीची शिक्षा!

चार-पाच तासांचा प्रवास होता. वाटेत एकच थांबा होता : साऱ्सेरो (Zarcero) नावाचे डोंगरातले टुमदार गाव. गावाच्या मध्यभागी गुलाबी-निळ्या रंगाचे चर्च आणि त्याच्या समोर एक बाग. पण ही साधीसुधी बाग नाही. इथे सायप्रसच्या झाडांना कात्री लावून चक्क प्राणी बनवले आहेत : हत्ती, माकडे, डायनॉसॉर, कमानी. या सगळ्याची सुरुवात १९६४ साली झाली, जेव्हा एव्हांजेलिस्ता ब्लांको नावाच्या पंचविशीतल्या एका तरुणाला नगरपालिकेने "एक बाग करून द्या" एवढेच सांगितले होते. त्याने कारंजे आणि फुलझाडे लावण्याऐवजी झाडांनाच शिल्पे बनवायला घेतले आणि पुढची साठ वर्षे तो त्याच झाडांची दाढी-कटिंग करत राहिला. २०२३ साली त्याचे निधन झाले, पण त्याची झाडे अजून वाढत आहेत. मराठीत याला "वृक्षशिल्प" म्हणता येईल, पण मला सारखे वाटत होते की हा माणूस म्हणजे झाडांचा न्हावी होता, आणि त्याचे गिऱ्हाईक कधीच "जरा मागे थोडे कमी करा" असे म्हणत नव्हते की थोडे सुद्धा हलत नव्हते.

छायाचित्र गुगल वरून साभार 


पुढचा रस्ता हिरव्या डोंगरांतून आणि धुक्यातून जाणारा. विल्यमने वाटेत माहितीचे डबे उघडायला सुरुवात केली : कोस्टा रिकात भूकंप हा हवामानाइतकाच नेहमीचा विषय आहे. देश थेट पॅसिफिक "रिंग ऑफ फायर" वर बसलेला आहे. कोकोस नावाची समुद्रतळाची प्लेट कॅरिबियन प्लेटच्या खाली सरकत जाते आणि त्या घर्षणातून खाली शिजणारा मॅग्मा वर वर येत राहतो. इतक्याशा देशात चारशेहून अधिक ज्वालामुखीय मुखे नोंदवली गेली आहेत, त्यातली वीसेक "गंभीरपणे" घ्यावी अशी. आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यात  एक(तरी) गड असतो, तसा इथे प्रत्येक जिल्ह्यात एक ज्वालामुखी.

वाटेत  केसादा गाव लागले. या भागातून जाताना दुधाच्या पॅकेटांचे बोर्ड सुरू झाले, कारण हा कोस्टा रिकाचा दुग्धपट्टा आहे . "दोस पिनोस" (Dos Pinos) ही इथली दुधाची सहकारी संस्था म्हणजे जणू कोस्टा रिकाची "अमूल" आहे. १९४७ साली पंचवीस दूध उत्पादकांनी सुरू केलेली ही संस्था आज देशातले बहुतांश दूध हाताळते. गावाचे नावच "केसादा", इथेच दुधाचा कारखाना आहे;  नावातच "केसो" (म्हणजे स्पॅनिशमधे "चीज") असलेले हे गाव आपल्या नावाला जागते.

ला फोर्तुना मध्ये पोचलो तेव्हा दुपार झाली होती. ऊन नव्हते कारण सूर्य ढगांआड गेलेला होता मात्र अतिशय दमट हवामान होते आणि खूप घाम येत होता. ला फोर्तुना गावाच्या नावाची गोष्ट खरोखरच अफलातून आहे. २९ जुलै १९६८ च्या सकाळी साडेसात वाजता, जवळजवळ साडेचारशे वर्षे शांत झोपलेल्या अरेनाल ज्वालामुखीने अचानक डोळे उघडले. काही दिवस चाललेल्या त्या उद्रेकात पंधरा चौरस किलोमीटर परिसर राख, दगड आणि लाव्ह्याखाली गाडला गेला, ८७ माणसे गेली आणि ताबाकोन, प्वेब्लो नुएव्हो आणि सान लुईस ही तीन गावे नकाशावरून पुसली गेली. ज्वालामुखीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या "एल बुरीओ" नावाच्या गावाला मात्र ओरखडाही आला नाही. लोककथेप्रमाणे यानंतरच त्या गावाने आपले नाव बदलून "ला फोर्तुना" म्हणजे "नशीबवान" असे ठेवले. 

दुसरी गोष्ट अशी की  हे  नाव त्याआधीच,  साधारण १९४८-५० च्या सुमारास बदलले गेले होते आणि तेही इथल्या सुपीक जमिनीमुळे. पण एका गावाला दोनदा नशीब लाभले, एकदा नावात आणि एकदा प्रत्यक्षात, आणि गंमत अशी की ज्या ज्वालामुखीच्या स्फोटाने तीन गावे संपवली, त्याच स्फोटाने या गावाला जगाच्या नकाशावर आणले. आधी शास्त्रज्ञ आले, मग फोटोग्राफर आले आणि मग पर्यटक आले, जे अजून जातच नाहीयेत.

"ला फोर्तुना" गाव खरोखरच "अति-touristy" दिसत होते. प्रत्येक दुसरे दुकान टूर विकत होते, प्रत्येक तिसरे कॉफी आणि प्रत्येक चौथे souvenir. अतिशय भूक आणि तहान लागलेली असल्याने रेस्टॉरंट शोधले:  "नटी मंकी" नावाची आइस-कॉफी ढोसली.

कोल्ड कॉफी पिताना  

चायनीज डम्पलिंग्ज मागवले.  जेवताना Lizano साल्सा मआवर्जून मागवला. कोस्टा रिका च्या खाद्य संस्कृतीचा हा एक अविभाज्य भाग आहे. मुळात Lizano हा ब्रँड आहे पण त्याने बनवलेला सॉस लिजानो साल्सा म्हणून देशभर प्रसिद्ध आहे आणि सगळ्या पदार्थाना चव आणण्यासाठी तो वापरला जातो !

बस फोटोही काफी है!


रेस्टॉरंट मध्ये माझ्या सामानाच्या ट्रॉलीच्या हॅन्डलने अखेरचा श्वास घेतला. "ला फोर्तुना"त पोचल्या पोचल्या माझ्या ट्रॉलीचे कमनशीब उफाळून आले, हा या गावाच्या "नशीबवान" नावावरचा पहिला विनोद.  उबरने जाऊन Airbnb वर सामान टाकले आणि आम्ही परत चालत चालत सिटी सेंटरला  आलो, अवघे अडीच किलोमीटर अंतर पण ढगाळ वातावरणामुळे चालायला काही वाटले नाही.

जाकुझी : खात्रीचा श्रमपरिहार !


पुढच्या काही दिवसांसाठी खाण्या-पिण्याची खरेदी केली, मोटरबाईक भाड्याने घेण्याचा प्रयत्न केला पण दुकान बंद होते. त्यामुळे परत चालतच Airbnb वर आलो.  घरी पास्ता करून खाल्ला आणि जाकुझीमध्ये पडून राहिलो. "दिवसाचा शेवट गरम पाण्यात", हा इथला अलिखित नियम आहे हे पुढच्या तीन दिवसांत कळणार होते.


मंगळवार, ११ ऑगस्ट : अरेनालचे दर्शन... म्हणजे धुक्याचे दर्शन

सकाळी आठची तिलारानची बस पकडली आणि अरेनालच्या जवळ एका फाट्यावर उतरलो.

इथे मला अगदी हरिश्चंद्रगड आणि पुरंदरची आठवण झाली. एस.टी.तून आळेफाट्याला उतरून पायथ्यापर्यंत तंगडतोड करावी लागते, किंवा कापूरहोळमार्गे गेल्यास पुरंदरसाठी चांगलेच चालावे लागते. इथेही तसेच : महामार्ग सोडून दोन किलोमीटर आत चालल्यावर मुख्य प्रवेशद्वार आले. कुठेही गेले तरी साधारणपणे डोंगराच्या पायथ्यापर्यंत आपल्याला चालावेच लागते. डोंगर स्वतःहून बस स्टॉपपर्यंत येत नाही.

मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर विविध पायवाटा (ट्रेल्स) होत्या आणि त्यांना चक्क नंबर दिले होते. आम्ही सर्वात लांबची निवडली, कारण फलकावर लिहिले होते की तिथून "सुंदर दृश्ये" दिसतात. फलकावर हे लिहिणाऱ्याने "जर धुके नसेल तर" ही तळटीप टाकायला हवी होती!

सुरवात ...


पायवाट व्यवस्थित होती, दिशादर्शक बाण होते. जंगलातून जाताना सरडे दिसले, त्यातला एक तर आमचा पाठलागच करत होता, बहुधा तो त्या ट्रेलचा unofficial गाईड असावा. सुंदर झाडे, पक्ष्यांचे आवाज, माकडांचे आवाज. पण गाईडशिवाय त्यांना spot करणे जमले नाही. आवाज ऐकू येत होते पण मालक दिसत नव्हते, जणू अख्खे जंगल podcast स्वरूपात चालू होते.

निळ्या शेपटीचा सरडा 


आम्ही शक्य तितके शांतपणे चालत होतो, जेणेकरून जंगलाचे आवाज ऐकू यावेत. पण काही मंडळी पर्यटक म्हणून आली होती आणि काही influencers स्वतःचा प्रभाव दाखवण्याच्या नादात बुद्धीचा अभाव दाखवत होते. त्यांची दृष्टी जंगलाकडे नव्हती, तर "जंगल background वर आपण कसे दिसतो" याकडे होती. जंगल त्यांच्यासाठी एक wallpaper होते आणि ते स्वतः त्या wallpaper वरचे notification.

धुक्यात हरवलेला "अरेनाल" 


ट्रेलच्या सर्वोच्च बिंदूवर पोचूनही ज्वालामुखीचे मुख काही दिसले नाही. धुक्याने त्याला पूर्ण गुरफटून टाकले होते. त्याच्या ज्वाला आणि धूर मात्र धुक्याच्या रूपात भरपूर दिसले, म्हणजे "जे मागितले ते नाही, पण त्याच वजनाचे दुसरे काहीतरी" अशी निसर्गाची डिलिव्हरी.

अरेनाल ट्रेक मधील सर्वोच्च बिंदूवरून दिसणारे दृश्य 


तसे पाहिले तर अरेनाल आपल्याला दर्शन देत नाही ही तक्रार जगभरातल्या पर्यटकांची आहे. २०१० च्या ऑक्टोबरपासून हा ज्वालामुखी विश्रांतीच्या अवस्थेत आहे, त्यामुळे रात्री लाव्हा वाहताना बघण्याचे दिवस संपले. पण त्याचा सुबक शंकूचा आकार, जो शे-दीडशे फोटोंत तुम्ही पाहू शकता, तो बघायला मात्र नशीब लागते. आणि गंमत म्हणजे भूगर्भशास्त्राच्या हिशोबात हा ज्वालामुखी अवघा सात हजार वर्षांचा, म्हणजे कोस्टा रिकातला सर्वात तरुण. सात हजार वर्षांच्या तरुणाने चारशे वर्षे झोप काढली आणि जागा झाल्यावर बेचाळीस वर्षे धिंगाणा घातला. वयाच्या मानाने वागणे हे ज्वालामुखींनाही जमत नाही!

आम्ही तेथील viewpoint वर पटकन फोटो काढून काढता पाय घेतला. शेवटची बस पाच वाजता असल्याने आणखी एक ट्रेल करायचे ठरले, जी मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध बाजूला होती. तिथे जाताना एका मोकळ्या सरळसोट रस्त्यावर भरपूर फोटोशूट झाले.

हा माझा मार्ग एकला 


 तासभर चालूनही ट्रेलची काही चिन्हे दिसेनात. मग हळूहळू लक्षात आले : आपली वाट चुकली.

परत येऊन प्रवेशद्वारापाशी ब्रेक घेतला, पाणी-बिस्किटे खाल्ली. तेवढ्यात एका अमेरिकन जोडप्याची अडचण दिसली : एक अमेरिकन तरुण धावत धावत मेन गेटपाशी आला , त्याची बायको ट्रेलवर कुठेतरी पडली होती आणि तिला नीट चालता येत नव्हते. विल्यमने स्पॅनिशमध्ये रुग्णवाहिका आणि नॅशनल पार्क मॅनेजरशी बोलणी सुरू केली आणि मी त्या अमेरिकन  माणसाबरोबर पुन्हा ट्रेलवर गेलो. प्रत्यक्षात रुग्णवाहिकेची गरज नव्हती असे लक्षात आले.  मी hiking साठी उचललेल्या काठ्या बरोबर होत्या, त्यांच्या आधाराने ती व्यवस्थित चालू शकत होती. डोंगरात काठी हे सर्वात कमी किमतीचे आणि सर्वात जास्त उपयोगाचे उपकरण आहे यावर माझा विश्वास पुन्हा दृढ झाला. 

ट्रेल वरून परत येताना अनपेक्षितपणे एक प्राणी दिसला. दिवसभर (फक्त) आवाज ऐकवून छळणाऱ्या जंगलाने अखेर एक भेटवस्तू दिली.

White nosed coati (पांढऱ्या नाकाचे मुंगूस) ने आम्हाला दर्शन दिले. हा प्राणी रकूनच्या घराण्यातील आहे आणि तो प्रामुख्याने फळे , कीटक आणि छोटे प्राणी खातो. coati चे नेमके मराठी भाषांतर होऊ शकत नाही कारण हा प्राणी मुख्यत्वे मध्य अमेरिकेत आढळतो, त्याचे स्पॅनिश नाव pizote असे आहे. दिसायला मुंगसासारखा दिसला म्हणून त्याला आपण पांढऱ्या नाकाचे मुंगूस म्हणूया. 

पांढऱ्या नाकाचे मुंगूस 


आता योग्य रस्ता माहीत असल्याने त्या दुसऱ्या ट्रेलसाठी पाय ओढत निघालो, कारण पाय खरोखर दमले होते. या वाटेवर भरपूर पेरूची झाडे होती. इतर ओळखी अनोळखीची फळझाडे सुद्धा होती. निसर्गात निसर्गाविषयी गप्पा करत चाललो होतो. चालत असताना ज्यांना मदत केली होती तेच अमेरिकन जोडपे जीपमधून गेले आणि "enjoy the hike!" असे ओरडून त्यांनी आम्हाला लिफ्ट न देता आमचे morale मात्र लिफ्ट केल्यासारखे दाखवले. उपकाराची परतफेड शुभेच्छांच्या स्वरूपात, हे अगदी corporate feedback सारखे होते.

या ट्रेलवर आम्ही पुन्हा एकदा माती खाल्ली, रस्ता  चुकवून ! lookout साठी लांबचा रस्ता  निवडला आणि  स्वतःचीच दमछाक करून घेतली. पण त्यानंतर दिसलेले दृश्य मात्र सगळे श्रम विसरायला लावणारे होते. लेक अरेनाल आणि त्यातली बेटे. निळसर पाणी आणि त्यावर तरंगणारे हिरवे ठिपके.

लेक अरेनाल 


आणि या तलावालाही एक गोष्ट आहे. मूळचा हा एक छोटासा नैसर्गिक तलाव. १९७९ साली सांग्रेगादो धरण पूर्ण झाले आणि तो तलाव तिप्पट होऊन कोस्टा रिकातला सर्वात मोठा तलाव झाला, पंच्याऐंशी चौरस किलोमीटर. पण या प्रकल्पाची किंमत कुणालातरी मोजावी लागली : अरेनाल आणि त्रोनादोरा ही दोन अख्खी गावे पाण्याखाली गेली. सुमारे अडीच हजार माणसांना घरे, शाळा, चर्च आणि अगदी त्यांच्या पूर्वजांच्या कबरीही सोडून वर डोंगरावर नव्या गावात जावे लागले. आज हा तलाव देशाच्या वीजनिर्मितीत मोठा वाटा उचलतो. आम्ही ज्या नितळ निळ्या पाण्याकडे बघून "वा!" म्हणत होतो, त्याच्या तळाशी दोन गावांची आठवण झोपली आहे. जणू काही मध्य अमेरिकेतील द्वारकाच ! ( दोन गावे  म्हणून द्वा-रका म्हटले हे चतुर वाचकांच्या लक्षात आले असेलच) डोंगरातले सौंदर्य बघताना खाली काय गाडले गेले आहे हे विचारायची सवय आपल्याला नसते.

लेक अरेनाल कडे पाहण्याचा अजून एक lookout 


पाचच्या बससाठी झपझप पावले टाकत फाट्याकडे निघालो. विल्यम पळत होता, मी गुडघा अजून पूर्ण बरा झालेला नसल्याने भराभर चालत होतो. वाटेत एक साप आडवा गेला आणि त्याने माझ्या चालण्याच्या वेगाचा प्रश्न आपोआप वाढवला. 

ही चाल तुरुतुरु 


 ४:५७ ला बस स्थानकावर पोचलो. हुश्श केले आणि बसची वाट पाहू लागलो. साडेपाच वाजले तरी बस आली नाही. शेवटी विल्यमने एका स्कूल बस वाल्याला विनंती केली आणि तो आम्हाला ला फोर्तुनाला सोडायला तयार झाला, अर्थात पैसे घेऊन. आयुष्यात कधीतरी शाळेची बस चुकवण्याचे स्वप्न बघितले होते, इथे उलट शाळेच्या बसने वाचवले. एका "सोडा" रेस्टॉरंटमध्ये जेवण करून Airbnb वर परतलो आणि जाकुझी मधे दमलेल्या पायांना ऊब दिली.


बुधवार, १२ ऑगस्ट : रिओ सेलेस्ते, म्हणजे निळ्या रंगाचा वैज्ञानिक कट

आजचा दिवस रिओ सेलेस्ते म्हणजे "आकाशी नदी"चा. सकाळी ८ वाजताच Airbnb वर टूर कंपनीची गाडी घ्यायला अली होती. एक एक पर्यटकाला उचलत उचलत गाडी अखेर तेनोरिओ वोल्कॅनो नॅशनल पार्क कडे धावू लागली.

वाटेत  अननसाची अफाट शेते लागली. रांगेत लावलेली, टोकदार पानांची, जमिनीलगतची ती झाडे बघून एखाद्या हिरव्या लष्कराची परेड चालल्यासारखे वाटत होते. कोस्टा रिका हा जगातला अननसाचा क्रमांक एकचा निर्यातदार देश आहे; जागतिक व्यापारातला जवळजवळ निम्मा अननस इथून जातो आणि युरोपात विकल्या जाणाऱ्या दहापैकी आठ-नऊ अननस याच मातीतले असतात. "MD2" किंवा "गोल्डन" जातीचा अननस म्हणजे या देशाचा गोड राजदूत.

अननसाचे शेत 


आमच्या गाईडने एक अवाढव्य जुने झाड दाखवण्यासाठी गाडी मधे थांबवली. तिथे अर्थात छोटेखानी फोटोशूट झाले.

४०० वर्ष जुने झाड 


थोडे पुढे गेल्यावर मालेकू आदिवासी टोळीचा परिसर लागला. कोस्टा रिकातली ही सर्वात लहान आदिवासी जमात, अवघी सहाशे-आठशे माणसे. त्यांची भाषा "मालेकू हाईका", म्हणजे "आपल्या लोकांची बोली", चिब्चन भाषाकुळातली आणि आज गंभीरपणे धोक्यात आलेली. स्पॅनिश येण्यापूर्वी त्यांचा प्रदेश अरेनालपासून रिंकोन दे ला व्हिएहा पर्यंत पसरलेला होता; आज तो काही हजार हेक्टरवर आला आहे आणि त्यातलाही मोठा भाग "बाहेरच्या" लोकांच्या ताब्यात आहे. अरेनाल आणि रिओ सेलेस्ते ही दोन्ही ठिकाणे त्यांच्यासाठी पवित्र आहेत. त्यांच्या एका कथेनुसार धबधब्यात पूर्वी सोन्याचे नैवेद्य टाकले जात, म्हणून आजही तिथे सोन्याचे दागिने घालून पोहू नये असे सांगतात. एका सान होजेच्या "तिको"ने ही सूचना ऐकली नाही आणि त्याची सोन्याची साखळी नदीने कायमची ठेवून घेतली, अशी गोष्ट सांगितली जाते. मला हे ऐकून बरे वाटले, कारण माझ्याकडे (गमावण्यासारखे) सोने नव्हते.  

तिको म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर : कोस्टा रिकन लोक स्वतःला "तिको" म्हणवून घेतात. स्पॅनिशमध्ये एखाद्या शब्दाचे लाडाचे लघुरूप -ito ने होते, पण हे लोक -tico वापरतात. उदा.  momentito ऐवजी momentico. मराठीमध्ये याला तितकेसे नियम नाहीत कारण दूध शब्दाचे लाडाचे रूप "दुदू" होते तर अभिजीत चे "अभ्या"! आणि आणखी लाडाने कोण कोणाला कसे हाक मारेल याचा (पुण्यात) काही नेम नसतो. असो,  या एका सवयीवरून शेजारी देशांनी  दिलेले टोपणनाव कोस्टा रिकन लोकांनी अभिमानाने स्वतःच्या ओळखीत बदलले आहे.

धबधब्याचा hike जंगलातून होता. आमचा गाईड अतिशय उत्साही आणि स्पॅनिशचा कट्टर पुरस्कर्ता होता. बरीच माहिती तो फक्त स्पॅनिश मधे सांगत होता , विल्यम मला गरजेनुसार भाषांतर करून सांगत होता. गाईडने  hike दरम्यान आम्हाला अनेक विशेष झाडे दाखवली:  "किडनी स्टोन प्लांट" हे पहिले ! स्पॅनिशमध्ये तिचे नावच "चांका पिएद्रा" म्हणजे "दगड फोडणारी". मूतखड्यावर तिचा काढा घेतात असे सांगितले. लगेच पुढे नैसर्गिक डास-प्रतिबंधक पाला दाखवला, जो चोळून अंगाला लावायचा.  तेथील जंगलातील माकडे म्हणे हाच पाला त्यांच्या हाता-पायाला चोळतात. एका तासात मला एक औषधालय आणि एक ओडोमॉस मोफत मिळाले होते. खडकावर उगवलेले पिंपळासारखे झाड बघून पुण्यातल्या जुन्या वाड्यांच्या भिंतींची आठवण झाली. पुढे एका फांदीवर विषारी साप दाखवला आणि एका ठिकाणी जमिनीवर टारँटुला नावाचा  केसाळ कोळी. दोघांनाही आम्ही योग्य आदरयुक्त अंतरावरून नमस्कार केला.

टारँटुला कोळी 


आणि मग तो धबधबा दिसला ज्याचे दर्शन घेण्यासाठी सगळे या ट्रेक वर आले होते.. साधारण तीस मीटर उंचीवरून कोसळणारा आणि खाली एका अशा रंगाच्या डोहात पडणारा, जो रंग खरा वाटत नाही. फोटोत तो edited वाटतो आणि प्रत्यक्षात तो fake वाटतो. निसर्गाने इतका saturated रंग वापरणे हे जरा अतिच झाले असे मला वाटले.

रिओ- सेलेस्ते धबधबा 


पण खरी गंमत पुढे होती : दोन नद्यांचा संगम!  रिओ बुएनाव्हिस्ता ही नदी रंगहीन. केब्रादा आग्रिया ("आंबट ओहोळ") हा ओहोळही रंगहीन, पण ज्वालामुखीय वायूंमुळे प्रचंड आम्लधर्मी. दोघे एकत्र येतात आणि पुढे जाणारे पाणी अचानक आकाशी निळे होते. या संगमाच्या जागेला स्पॅनिशमध्ये "एल तेञिदेरो" (El Teñidero) म्हणतात, म्हणजे "रंगाऱ्याचा घाट". नाव इतके चपखल आहे की त्यावर आणखी काही बोलण्याची गरजच नाही.

निळी नदी 


आमच्या गाईडने सांगितले की हे अल्युमिनियम सल्फेटच्या रासायनिक अभिक्रियेमुळे होते. हे version सगळ्या टूर-गाईडांच्या तोंडी असते. पण २०१३ साली कोस्टा रिका विद्यापीठाच्या संशोधकांनी हे प्रकरण प्रयोगशाळेत नेले आणि उत्तर याहून मजेशीर निघाले.

पाण्यात कोणताही निळा रंग विरघळलेला नाही. रिओ बुएनाव्हिस्ताच्या पाण्यात अल्युमिनोसिलिकेटचे अतिसूक्ष्म कण तरंगत असतात, साधारण १८४ नॅनोमीटर आकाराचे. एवढे छोटे कण प्रकाशाला फारसे जुमानत नाहीत. पण जेव्हा आम्लधर्मी "आंबट ओहोळ" त्यात मिसळतो तेव्हा त्याची pH value ६.८ वरून ५ पर्यंत घसरतो, आणि त्या धक्क्याने हे कण एकमेकांना चिकटून सुमारे ५६६ नॅनोमीटरचे गोळे बनतात. आणि हा आकार नेमका असा आहे की सूर्यप्रकाशातला निळा भाग तो विखरून टाकतो. याला "मी स्कॅटरिंग" (Mie scattering) म्हणतात. मी काही म्हणत नाहीये, Mie चे मराठी उच्चारण "मी" असे केले आहे !

म्हणजे थोडक्यात : हा रंग नदीच्या मालकीचा नाहीच. तो प्रकाशाच्या भाड्याने घेतलेला आहे. तुम्ही तेच पाणी ग्लासात भरून बाजूला घेतले तर ते साध्या पाण्यासारखे रंगहीन दिसते. नदीचा निळेपणा हा तिच्या पोटातल्या रंगामुळे नसून तिच्या कणांच्या आकारामुळे आहे. आकाश निळे का दिसते याचे कारणही असेच विखुरलेल्या प्रकाशात आहे. इथे नुसते आकाशाचे प्रतिबिंब नदीत पडलेले नाही, इथे नदीने आकाशाची पद्धतच उचलली आहे.



मला हे कळल्यावर एक विचार आला : ज्या रंगासाठी जगभरातून माणसे इथे येतात, तो रंग "आहे" असे म्हणावे की "दिसतो" असे म्हणावे? आणि मग लक्षात आले, बहुतेक सुंदर गोष्टींचे उत्तर हेच असते. सौंदर्य बघणाराच्या दृष्टीत असते, वस्तूच्या असण्यात नसते !

या निळ्या रंगाबद्दल स्थानिक मान्यता अर्थातच याहून सुंदर आहे : देवाने आकाश रंगवून झाल्यावर म्हणे आपले ब्रश याच नदीत धुतले. विज्ञान आणि लोककथा दोन्ही एकाच निष्कर्षावर येतात, फक्त एकाकडे नॅनोमीटर आहेत आणि दुसऱ्याकडे प्रतिभा !

निळ्या नदीवरील झुलत्या पुलावर आणखी एक फोटोशूट झाले, कारण झुलता पूल दिसल्यावर फोटो न काढणे हा या देशातला  सर्वात मोठा संयम मानला जातो आणि आम्ही कोणी ऋषीमुनी नव्हतो.

वळणदार नदी 


ट्रेक संपवून परत येताना नदीवर पोहण्यासाठी थांबा होता. तिथे मनसोक्त पोहलो , आमच्या ग्रुप मधील इतर लोकांशी थोडीफार मैत्री झालेली होती.   नदीपात्रात आमची जलक्रीडा चालू असताना एकमेकांचे फोटो काढले (जलक्रीडा हा शब्द पंचतंत्रात आणि राजकन्येच्या गोष्टींत इतक्यांदा आला आहे की तो उगाच बदनाम झाला आहे),  आमची निखळ जलक्रीडा चालू असताना आमचा गाईड अननसाचे काप आणि आंब्याच्या फोडी सजवलेली मोठ्ठी ताटली घेऊन आला. 

जलतरण 


पाण्यात चालता -पोहता अननस आणि आंबे खाल्ले. इतके गोड अननस, अक्षरशः "God लेवल चे"  मी आजवर खाल्ले नव्हते. या भागातूनच अननसाची निर्यात होते असे समजल्यावर तर वाटले, आपण थेट शेतातच चव घेत आहोत. अशातच  माकडांची एक टोळी एकामागोमाग एक वेलींवरून कसरती करत गेली. पाण्यात पोहणाऱ्या आमचा ते हेवा करत असावेत, बहुधा आम्ही अननस खात असल्यामुळे! गम्मत म्हणून पोहणारी माकडे तशी मी कुठेच पाहिली नाहीयेत !

Airbnb वर परत आलो. पाऊस मी म्हणत होता. तो जरासा थांबल्यावर जाकुझीचा आनंद लुटला  आणि "Baby Reindeer" ही मालिका पाहत पाहत झोपलो.

आजच्या टूरमधील गाईडचे  एक वाक्य झोपताना डोक्यात राहिले : "I wanna be as civilized as animals". दिवसभर जंगलात फिरून आल्यावर आणि जंगलाची शिस्त पाहिल्यावर हे वाक्य वेगळ्याच अर्थाने पटते.


गुरुवार, १३ ऑगस्ट : पावसात उकळणारी नदी

सकाळपासून पाऊस सुरु होता. विल्यमला त्याच्या थिसीसचे काम होते, आणि मला उष्ण पाण्याचे झरे बघायचेच होते. त्यामुळे एकटाच निघालो, उबरने.

अरेनालच्या पायथ्याशी जमिनीखालचा मॅग्मा भूजल तापवत असतो आणि ते पाणी नद्यांच्या रूपाने बाहेर येते. इथल्या भपकेबाज हॉट-स्प्रिंग रिसॉर्ट्समध्ये तिकीट काढून हेच पाणी मिळते. पण चोयीन (Chollín) नदीजवळ तेच पाणी अगदी फुकट, पुलाखाली, कोणत्याही formalities शिवाय वाहत असते. जिथे निसर्ग स्वतःच बॉयलर चालवतो तिथे तिकीट कसले?

तिथे स्पॅनिश मुलांचा एक मोठा ग्रुप आणि बरेच पर्यटक आले होते. प्रवेश फुकट, पण पाण्याचा जोर चांगलाच होता. दगडावर धरून बसावे लागत होते, नाहीतर नदी तुम्हाला कुठेतरी "पुढच्या स्टॉपला" सोडून देईल.

स्विमिंग कॉस्ट्यूम घालून त्या उष्ण नदीत सगळे फुकट जाकुझी चा आनंद घेत होते. पात्रात काही ठिकाणी नैसर्गिक कुंड तयार झाले होते.  थोड्या वेळात तिथेही पाऊस सुरू झाला.

गरम पाण्यात बसून वरून थंड पावसाच्या धारा झेलणे, हा अनुभव शब्दांत बसवता येत नाही. वास आणि चव यांची फक्त जाणीव होते, गंधकाचा तो सौम्य वास आणि त्वचेवरचा तो निसरडा स्पर्श; तो अनुभव घेण्याचा आहे, सांगण्याचा नाही. आपले शरीर एकाच वेळी "उन्हाळा" आणि "पावसाळा" या दोन ऋतूंत असते आणि मेंदू गोंधळून जाऊन शेवटी शरण जातो.

चोयीन (उष्ण) नदी 


बरोबर कोकादास (cocadas) नावाची खोबऱ्याची बिस्किटे नेली होती. ओल्या नारळाची कारंजी जर जास्त तळली आणि एका बाजूने बंद केली नाही तर जशी लागेल, तशी ही कुकी लागत होती. त्या पावसात कोकादास खाण्याची मजाच काही और होती.

मी अंतर्बाह्य चिंब भिजलो होतो  आणि या अनोख्या उष्ण नदीच्या प्रवाहाने तृप्त झालो होतो.  रेन-पांचोखाली सगळे कोरडे कपडे  सुरक्षित असल्याने AirBnb वर कोरडाच परत आलो. अर्थात उबरने, कारण त्या भागातल्या बसेस या "कधीतरी येतील" या तत्त्वावर चालतात.

परत आल्यावर Airbnb च्या आवारातील स्विमिंग पुलाजवळ चिल केले.  "La casa de papel" ही स्पॅनिश TV सिरीज पहिली, एकत्र स्वयंपाक करून जेवण केले आणि शेवटची जाकुझी-भेट, यावेळी कॉकटेल्ससह ! ला फोर्तुनाला निरोप देण्याची ही आमची पद्धत होती.

Airbnb मधील स्विमिंग पूल 


ला फोर्तुनाचे हे चार दिवस म्हणजे एक विचित्र विरोधाभासाचा खेळ होता.

ज्या ज्वालामुखीसाठी हे गाव प्रसिद्ध आहे, तो आम्हाला दिसलाच नाही. ज्या नदीच्या निळ्या रंगासाठी लोक येतात, तो रंग प्रत्यक्षात "नाहीच" असे विज्ञान सांगते. ज्या तलावाच्या सौंदर्याचे फोटो निघतात, त्याच्या तळाशी दोन बुडलेली गावे आहेत. आणि ज्या स्फोटाने तीन गावे संपवली, त्यानेच या गावाला "नशीबवान" हे नाव मिळवून दिले.

कदाचित प्रवासाचे सार हेच असावे. आपण जे बघायला जातो ते नेहमीच मिळत नाही, पण त्याऐवजी जे मिळते ते जास्त सांगण्यासारखे असते. अरेनालने आपले तोंड दाखवले नाही, पण त्याने आम्हाला एक चुकलेली वाट, एक मदतीचा प्रसंग, एक साप आणि एक शाळेची बस मिळवून दिली. आणि ते बहुधा एका स्वच्छ फोटोपेक्षा जास्त टिकाऊ आहे.

फोटोत ज्वालामुखी आलेला नसला तरी चालेल. कल्पनेत तो आहे, खदखदतो आहे, धुक्याच्या बुरख्याआडून हसतो आहे... 

(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा