शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६

कोस्टा रिका ३ : Whale-come to Uvita आणि केपोसची Zip-Line


कोस्टा रिका सहल : अमेरिकेचे श्रीमंत कोकण !


उविता येथील धबधबा ! (Highlight of Uvita)


मंगळवार, ४ ऑगस्ट : एकांत, एक शाळा आणि उविताच्या बस स्थानकावरचा तमाशा

विल्यम भल्या पहाटेच कधीतरी सॅन होजेला परतला आणि मी जेव्हा उठलो मला हवाहवासा एकांत मिळाला. ड्रेक बे मधल्या त्याच बेकरी-कॅफेत जाऊन नाश्ता केला, पपई ज्यूस आणि चॉकलेटचा क्रीम रोल. निवांतपणे कॅफेतून दिसणारी हिरवी झाडी आणि पक्षी बघत बघत खाण्यात वेगळाच आनंद होता. 

पपई ज्यूस ! 


WiFi नाही, फोन flight मोड वर टाकून  नाश्ता झाल्यावर एकटाच बीचवर फिरायला निघालो. वाटेत एक लोकल शाळा लागली. मैदानावर फुटबॉल खेळणारी मुलं, बाहेरच्या नळावर रांगेत पाणी पिणारी मुलं, गणवेश घालून शिस्तीत ओळीत चालणारी मुलं, हे दृश्य बघून आपल्याकडच्या कुठल्यातरी गावातल्या शाळेची आठवण झाली. काही उत्सुक मुले माझ्याकडे निरखून पाहत होती : "हा इथला आहे का नाही" "रंगाने आपल्यासारखा आहे पण तितका लॅटिनो दिसत नाहीये" अशा काहीशा नजरा होत्या. काही धीट मुले  ग्राउंड च्या कडेला येऊन माझ्याशी बोलू पाहत होती , पण त्यांचे तोडके मोडके इंग्रजी आणि माझे तोडके मोडके स्पॅनिश यांचा मेळ बसेपर्यंत त्यांच्या जोसे (Jose) सरांनी शिट्टी वाजवली आणि त्यांच्या उत्सुकतेवर विरजण पडले. जगात कुठेही जा, शाळेतल्या मुलांचा उत्साह सारखाच असतो याची खात्री पटली.

बीचजवळ असलेल्या एका आंब्याच्या झाडाखाली थोडा वेळ शांत बसून राहिलो, निव्वळ चिंतन, दुसरं काही नाही. बीचवर बदामाची झाडं आणि माणसाच्या उंचीचे मोठे खडक साथीला होते. बाकी आसपास चिटपाखरूही नव्हतं 

दुपारी निवांत पहुडलेला किनारा 


साडेबारा च्या सुमारास किनाऱ्याजवळच्या एका रेस्टॉरंट मधे जेवण केले. जेवणाआधी चविष्ट असे पपया-कोलाडा प्यायले (pina colada सारखे पेय ज्यात pina (अननसा) ऐवजी  पपईचा ज्यूस वापरतात)

papaya - colada ! not pina colada 


अडीच वाजताची सिएर्पेला परतणारी बोट पकडली. बोटीचा कंडक्टर जरा जास्तच "मैत्रीपूर्ण" होता, विशेषतः स्त्री प्रवासांशी त्याची सलगी बघून इतर प्रवाशांना अवघडल्यासारखे होत होते. त्याच्या नजरा आणि हावभाव बघून तो नक्की प्रवासी वाहतुकीत आहे की आणखी कशात, असा प्रश्न पडला! सिएर्पे ला पोचल्यावर काही पुरुष सहप्रवासी आणि तो यांची चांगलीच जुंपली. मगरी असणाऱ्या नदीतून जाताना त्यांच्या बायकांसोबत असे वर्तन त्यांना नक्कीच खपले नसणार.

पाल्मार नोर्तेसाठी केलेली टॅक्सी केली (फक्त ३००० कोलोनेस) माझी वाट पाहत होती.  पाल्मार नोर्ते हून मला (Uvita) उविताची बस पकडायची होती. पण ती उशीरा आली.

पाल्मार नोर्ते-बस स्थानकावर एक बोलघेवडा म्हातारा होता, बहुधा दारू किंवा अफूच्या नशेत, जो रस्त्यावरच्या त्याच्या मित्रांना आणि येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला मजेशीर हाका मारून पूर्ण स्थानकाचं मनोरंजन करत होता. त्याच्या विनोदांना हसून साथ देणाऱ्या बायका, आणि दुर्लक्ष करू न शकणारे पुरुष तयांची गम्मत वाटत होती. त्यांमध्ये  एक चष्मेवाली चाळिशीची बाई, कुठल्यातरी कॉल सेंटरमध्ये काम करणारी तरुणी, पोट पुढे आलेला एक सरकारी कर्मचारी, वेफर्स विकणारे दोन विक्रेते, हे सगळे त्या म्हाताऱ्याच्या "स्टँड-अप कॉमेडी"चे प्रेक्षक झाले होते. पैकी कॉल सेंटर वाली तरुणी फाडफाड इंग्रजी बोलता असल्यामुळे मला मोफत दुभाषी मिळाली. शिवाय इतर पुरुष तिच्या इंग्रजीमुळे किंवा तिच्या कॉल सेंटर च्या जॉब मुळे तिला चांगलाच भाव देत होते. बस उशिरा आली याचं दुःख करण्याऐवजी मी त्या फुकटच्या तमाशाचा आनंद घेत बसलो.

उविताला पोचेपर्यंत चांगलाच अंधार झाला होता. Tucan हॉटेलला चेक-इन करून खोलीत पोचेपर्यंत जवळजवळ आठ वाजले होते . तेवढ्यात विल्यमचा खुशालीचा मेसेज येऊन गेला होता, आणि उशिरा उत्तर दिल्यामुळे त्याला जरा रागच आला होता. (हा किस्सा नंतर सॅन होजेत भेटल्यावर सोडवला, त्याबद्दल पुढे येईलच!)

हॉटेलच्या रिसेप्शनवर असलेला बारटेंडर एकदम मस्त माणूस निघाला, आम्ही एकत्र कॉकटेल घेतले. हॉटेलचा मालक पिअर, फ्रेंच-कॅनेडियन, तोही तितकाच दिलदार निघाला. त्यांच्या सोबत गप्पा मारून त्यांनी सुचवलेल्या "मारकुया" नावाच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं आणि लवकर झोपलो.


बुधवार, ५ ऑगस्ट : देवमासे आणि जलदेवी

आजचा दिवस होता व्हेल-वॉचिंगचा. फळांचा नाश्ता, पपई, अननस, कलिंगड, करून निघालो. हंपबॅक व्हेल टूरचा पिक-अप पॉइंट अर्धा तास चालत जाण्याच्या अंतरावर होता. बरोबर एक काठी घेतली, गुडघ्याला आधार म्हणून, आणि भटक्या कुत्र्यांपासून बचावासाठी सुद्धा !

उविता गावाजवळील समुद्रकिनारा जिथे आहे तो भाग मरिनो बायेना नॅशनल पार्क (Parque Nacional Marino Ballena) म्हणून ओळखला जातो, "बायेना" म्हणजे स्पॅनिशमध्ये व्हेल. १९८९ साली हे राष्ट्रीय उद्यान स्थापन झालं, खास करून इथे प्रजननासाठी स्थलांतर करणाऱ्या हंपबॅक व्हेल्सच्या रक्षणासाठी. गंमत म्हणजे ओहोटीच्या वेळी इथला किनारा एका विशिष्ट आकारात दिसतो, जणू एका प्रचंड व्हेलची शेपटीच समुद्रात उमटलेली असल्यासारखा! त्यामुळे या भागाला "कोला दे ला बायेना" म्हणजे "व्हेलची शेपटी" असंही म्हणतात.  हंपबॅक व्हेल (Humpback Whale) यांना मराठीत शब्दशः कुबडा देवमासा म्हणता येईल पण तो चालत नसल्यामुळे आणि त्याचे कुबड शार्क माशाच्या परासारखे  (फिन सारखे) दिसत असल्यामुळे त्याला कुबड्या म्हणणे हा कुबड्यांचा अपमान आहे असे मला वाटते. त्याऐवजी त्याला मदारी देवमासा हे नाव द्यावेसे वाटते. त्यासाठी दोन कारणे आहेत: समुद्रात तो करत असलेल्या कसरती (उड्या मारणे किंवा शेपटी आपटून पाणी उडवणे वगैरे)  आणि उंटाला जशी मदार असते ज्यामधे चरबी साठवलेली असते तसेच या देवमाशाने प्रजनन काळासाठी भरपूर चरबी साठवलेली असते. या ३-४ महिन्यांत ते काहीही न खाता राहू शकतात, इतकेच नव्हे तर पिलांना दूध देखील पुरवू शकतात. पाजू शकतात म्हटलेले नाही त्याचे कारण पुढे कळेलच...

दोन-अडीच तासांच्या बोट-टूरमध्ये दोन देवमासे आणि एक पिल्लू बघायला मिळालं, हा त्यांचा प्रजननाचा काळ असतो. म्हणूनच ते दिसण्याची शक्यता जुलै-ऑगस्ट महिन्यांत जास्त असते. एका व्हेलची शेपटीही आम्हाला स्पष्ट दिसली. 



एकाने डोक्यावरून कारंजं सोडलं, पण ते कार्टूनमध्ये दाखवतात तसं फेसाळ, पांढरंशुभ्र आणि त्यावर तोल सावरत नाचणारे छोटे मासे वगैरे काहीच नव्हतं. ते कारंजं सुरू होताच संपत होतं, निसर्ग कार्टून स्टुडिओपेक्षा जास्त काटकसरी होता! गाईडने काही  रंजक माहिती पुरवली :

हंपबॅक व्हेल (Humpback Whale), किंवा जणू समुद्रातला "मदारी देवमासा", हा जगातल्या सर्वांत मोठ्या आणि सर्वांत मनोरंजक सस्तन प्राण्यांपैकी एक आहे. पाण्यातून उंच उडी मारणे, शेपटी पाण्यावर आपटणे आणि पंख थपथपावणे, हे त्याचे कसरतीचे खेळ बघून हे नाव अगदी सार्थ वाटतं. प्रत्येक व्हेलच्या शेपटीच्या खालच्या बाजूला (fluke) असलेला रंग, आकार आणि पांढऱ्या-काळ्या ठिपक्यांचा नमुना हा माणसाच्या बोटांच्या ठशांसारखा (fingerprint) पूर्णपणे वेगळा असतो, त्यामुळे संशोधक शेपटीच्या फोटोवरूनच वैयक्तिक व्हेल ओळखू शकतात आणि त्यांच्या स्थलांतराचा मागोवा घेऊ शकतात. या व्हेल्स दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात, थंड ध्रुवीय पाण्यात मुबलक भोजन मिळवतात आणि उष्ण कटिबंधीय, उथळ किनारी पाण्यात, जसं कोस्टा रिकाच्या "उविता" भागात, प्रजननासाठी आणि पिल्लांना जन्म देण्यासाठी स्थलांतर करतात. पिल्लू आईचं दूध पिण्यासाठी /खाण्यासाठी  अवघे काही सेकंद आईच्या पोटाखाली तोंड घासते  आणि लगेचच आईभोवती पाण्यात दुधाचा एक दाट, पांढरा ढग तयार होतो  किंवा पांढरे बुडबुडे तरंगताना दिसतात, कारण हे दूध टूथपेस्टसारखं घट्ट आणि ३५-५०% इतकं स्निग्धांशयुक्त असतं. या दुधाच्या ढगाभोवती कधीकधी घुटमळणाऱ्या डॉल्फिन्सना गाईड्स गमतीने "दुधचोर डॉल्फिन" म्हणतात. नर हंपबॅक व्हेल्स आपली खास आणि गुंतागुंतीची "गाणी" गातात, जी तासन्तास चालू शकतात आणि जोडीदार आकर्षित करण्यासाठी वापरली जातात असं मानलं जातं. डोक्याच्या वरच्या ब्लोहोलमधून श्वास सोडताना दिसणारा फवारा म्हणजे प्रत्यक्षात फुफ्फुसातल्या उबदार हवेची थंड होऊन तयार झालेली वाफ असते, पाणी नव्हे.

व्हेल्स बघून परत बीच वर आलो आणि त्या प्रसिद्ध "व्हेलटेल" बीचवर चालण्याचा आणि पोहण्याचा आनंद लुटला.  चालत चालत रमत गंमत Tucan हॉटेल वर परत आलो.

विश्रांती घेऊन दुपारी उविता धबधब्याकडे निघालो, चालत १५-२० मिनिटांच्या अंतरावर. तिथे उडी मारणे, नासिर्गिक घसरगुंडीवरून धबधब्यासोबत खाली कोसळणे हे प्रकार केले.  



पाण्याच्या प्रवाहात नुसतं बसून राहणे,  वेफर्स खाणे , फोटो काढणे हे सगळं मनसोक्त केलं. तिथे एक अमेरिकन-स्पॅनिश बाई तिच्या तीन मुलांसह आणि नवऱ्यासोबत भेटली, तिने माझे फोटो काढले आणि प्रेमळ विचारपूस केली. एक जर्मन कुटुंबही होतं, ज्यात जुळी भावंडं होती. त्यांनीही उड्या मारायला आणि घसरायला प्रोत्साहन दिले :)  पाण्याचा गारवा आणि धबधब्याचं दर्शन दोन्ही सुखावत होतं. उविताच्या या धबधब्याला मी जलचिंतन धबधबा असे मनोमन नाव दिले.  

उविता धबधबा 


पाण्याची ही ओढ मला नक्की कधीपासून आहे, असा विचार मनात आला. सिऍटलमध्ये असताना उन्हाळ्यात आजूबाजूच्या सगळ्या तलावांत पोहायचो. आताही धबधबा दिसला की "कधी एकदा त्यात उडी मारतो" असं होतं, हे वेड कधीच बरं होणार नाही असं वाटतंय! जलदेवी नमो नमः !

उविता धबधब्यापाशी 


गुरुवार, ६ ऑगस्ट : गायीविना "गायो पिंटो" आणि केपोसचे  नायोमी पार्क 

सकाळी फळांचा नाश्ता आणि वॉल्टरने खास बनवून दिलेलं गायो पिंटो (Gallo Pinto) खाल्लं. नावात "गायो" ऐकून मराठी कानाला आधी वाटलं की यात गाय असेल, पण गायो पिंटो म्हणजे कोस्टा रिकाचा "इंग्लिश ब्रेकफास्ट": बीन्स, अंडं आणि भात, एवढंच. गायीचा आणि याचा दुरान्वयेही संबंध नाही. कोस्टा रिकेत जवळजवळ प्रत्येक नाश्त्यात हे हमखास दिसतं, तांदूळ आणि काळे बीन्स एकत्र परतून बनवलेला हा पदार्थ जणू या देशाचा राष्ट्रीय नाश्ताच आहे.

साडेअकरा वाजता उविता-केपोस (Uvita - Quepos) बस पकडली. 

ही हिरव्या रंगाची बस आपल्या एस.टी.ची आठवण करून देणारी होती. सीट्स अगदी लाल डब्याची आठवण करून देणाऱ्या होत्या.आडगावात ही गाडी सगळीकडे थांबत होती. एस.टी.वर नाव, नंबर काही नव्हते! ड्रायव्हर हाक मारून सांगत होता कुठली एस.टी. आहे ते ! तिकीट वगैरे काही नाही. थेट ड्रायव्हरला "लाच" म्हणून पैसे द्यायचे. काही प्रवासी चक्क ओठांनी शिट्टी वाजवून गाडी थांबवायची विनंती करत होते. "आपणच आपले कंडक्टर" अशी आत्मनिर्भरता माझ्यासाठी अजब होती. सुदैवाने "केपोस" हे मोठे स्थानक असल्याने तिथे शिट्ट्या वाजवायची वेळ माझ्यावर आली नाही; एक तर मला शिट्टी वाजवता येत नाही आणि दुसरं म्हणजे ओठांचा चंबू केल्यावर महिला सहप्रवाशांकडून मारहाणीचा प्रसंग ओढवला असता.

असो, दुपारी दीडच्या सुमारास केपोसमध्ये पोचलो. Planet B नावाच्या मस्त, निसर्गरम्य हॉस्टेलमध्ये चेक-इन केलं, वातानुकूलित खोल्या आणि सगळ्यात जमेची बाजू म्हणजे फुकट लॉन्ड्री! सिमोन (फ्रेंच) आणि यश (बेल्जियन-भारतीय) हे रूम-पार्टनर भेटले, जुजबी गप्पा झाल्या. समोरच्या दोन खोल्यांत ११ स्पॅनिश विद्यार्थ्यांचा एक ग्रुप आला होता, त्यातल्या दानी आणि जोआन यांच्याशी ओळख झाली, पुढच्या दिवसांत ही ओळख चांगलीच वाढणार होती.

संध्याकाळी नायोमी पार्कपर्यंत ट्रेक केला. वाटेत एका आंब्याच्या झाडाखाली पडलेल्या फांद्यांमधून दोन मजबूत काठ्या तोडून घेतल्या, तात्पुरत्या ट्रेकिंग पोल्स म्हणून. नायोमी पार्क खरंच सुंदर होतं, छोटासा जॉगिंग ट्रॅक, आणि तिथून दिसणारा समुद्र. ट्रॅकच्या एका बाजूला खोलवर आत आलेलं समुद्राचं पाणी आणि त्यात ध्यानस्थ मुनींसारखे दिसणारे खडक, तर दुसऱ्या बाजूला दाट पर्णसंभार! खाडीसारखं आत शिरलेलं ते पाणी इतकं स्वच्छ आणि नितळ होतं की जणू पोहायला आमंत्रणच देत होतं.

नायोमी पार्क, केपोस  


नायोमी पार्कपासून केपोस सेंटरपर्यंत समुद्रकिनाऱ्यावर बांधलेल्या प्रोमेनादावरून चालत गेलो. केपोस हे गाव मुळात केळीच्या व्यापारामुळे वसलं, विसाव्या शतकाच्या सुरुवातीला युनायटेड फ्रूट कंपनीने इथे मोठा बंदर आणि रेल्वे उभारली, आणि केळीच्या जहाजांमुळे हे एक गजबजलेलं व्यापारी शहर बनलं. आजही शहराच्या मध्यभागी त्या जुन्या केळी-कंपनीच्या बंदराच्या खुणा  अजूनही शिल्लक आहेत. सूर्यास्त बघत "coffeestop" नावाच्या रेस्टॉरंटमध्ये क्रेप्स खाल्ले आणि दिवस संपवला.

चेकमेट करणारा सनसेट 


शुक्रवार, ७ ऑगस्ट   : Villa Rocca चा infinity पूल आणि एकांडा राजेशाही थाट

आजचा प्लॅन साधा होता, Villa Rocca या हॉटेलमध्ये जाऊन नुसतं "चिल" करायचं. पण त्याआधी केपोसमध्ये दाढी करून घ्यायला गेलो. मला फक्त मिशी शाबूत ठेवून बाकीची दाढी करायची होती, पण इथे "दाढी करणे" (afeitar) या शब्दाचा अर्थ चक्क "संपूर्ण चेहरा गुळगुळीत करणे" असा होतो, हे मला अर्धी मिशी उडवल्यावरच कळलं! अनेक वर्षं जपून वाढवलेल्या मिशांना अचानक निरोप द्यावा लागला, भाषेच्या गैरसमजातून घडलेला हा सगळ्यात महागडा विनोद ठरला.

Villa Rocca बरोबर फोटोंमध्ये दाखवलं होतं तसंच निघालं, आणि गंमत म्हणजे तिथे माझ्याशिवाय कोणीही, कोणीही नव्हतं!  नाही म्हणायला एक घोरपड जणू माझ्यावर लक्ष ठेवायला आली होती 



संपूर्ण स्विमिंग पूल आणि बारटेंडर हे दोन्ही फक्त माझ्यासाठी राखीव होते, जणू एका दिवसासाठी मी एकट्यानेच पूर्ण हॉटेल विकत घेतलं होतं. तिथे एक infinity pool आहे, ज्याच्या मागे समुद्राचं अप्रतिम दृश्य दिसतं. समुद्रात दूरवर एक छोटंसं बेट दिसत असल्यामुळे ती सागरी पार्श्वभूमी अधिकच उठावदार वाटत होती.

Villa Roca येथील इनफिनिटी पूल 


तिथे मनसोक्त पोहलो , कॉकटेल्स प्यायली, जाकुझी मधे विसावलो आणि असंख्य फोटो काढले (हे सांगणे न लगे)

Jacuzzi @Villa Roca 


अंधार पडल्यावर हॉस्टेलवर परत आलो. शेजारच्या रेस्टॉरंटमध्ये कासादो (casado) चं पारंपरिक जेवण घेतलं, ! जेवण झाल्यावर  दानी आणि जोआनशी गप्पा रंगल्या.

शनिवार , ८ ऑगस्ट : झाडांवरून उड्डाण आणि "ला वाका" बीचवरचे फुकटचे  नारळ-पाणी 

सकाळी लवकर उठून दानी आणि जोआनला सूर्यनमस्कार शिकवले, योगाची आपली परंपरा अशी परदेशी मित्रांपर्यंत पोचवताना वेगळाच आनंद मिळाला. एकत्र नाश्ता करून थोडं वाचन केलं आणि साडेअकरा वाजता झिपलाईन टूरसाठी निघालो.

वृक्षासन फक्त पोझ आहे ! (दानी आणि जोआन) 


कोस्टा रिका हा जगातला असा देश आहे जिथे झिपलाईन-कॅनोपी-टूरचा जन्म झाला! सत्तरच्या दशकात इथले संशोधक जंगलाच्या छतापर्यंत (कॅनोपी) पोचण्यासाठी दोरखंड आणि पुलींचा वापर करत, आणि त्यातूनच पुढे हा साहसी खेळ जन्माला आला, अमेरिकेत झिपलाईन लोकप्रिय होण्याच्या तब्बल तीस वर्षं आधी कोस्टा रिकेत हा प्रकार रुळला होता, असं म्हणतात. त्यामुळे आज कोस्टा रिका "झिपलाईनची जन्मभूमी" म्हणून ओळखली जाते, यात नवल नाही.



दोन-तीन तास मस्त गेले. एक फ्रेंच कुटुंब आणि एक अमेरिकन कुटुंबही आमच्याबरोबर होतं. आठ-नऊ झिपलाईन्स होत्या. काही वेळासाठी जंगल झाडांच्या शेंड्यावरून कसं दिसतं, ते प्रत्यक्ष अनुभवलं, पक्ष्यांना जो नजारा रोज दिसतो तो आम्हाला काही मिनिटांसाठी मिळाला. त्यातली एक किलोमीटर लांबीची झिपलाईन तर विलक्षण अनुभव होता, वाऱ्यावर उडत असल्यासारखं वाटलं. काही झिपलाईन च्या सुरवातीला पोचण्यासाठी छोटे १०-१५ मिनिटांचे चालणे होते , या दरम्यान पाब्लो नावाच्या गाईडने आमचे कान भरले (माहिती देऊन)

कोस्टा रिकाचा राष्ट्रीय वृक्ष (guanacaste म्हणजे elephant ear tree), याला मराठीत "गजकर्ण झाड" असे म्हणवत नाहीये !! शूर्पकर्णवृक्ष  हे त्यामानाने बरे आणि सार्थ नाव आहे. या झाडाचा संभार अतिशय मोठा असल्याने त्याला हे नाव आहे. 

पाब्लोने आम्हाला "चालणारे माड" सुद्धा दाखवले. चालत असताना नाही ! हे माड अतिशय स्मार्ट असतात. त्यांची मुळे अर्धी जमिनीबाहेर असतात आणि जिथे अधिक पोषण मिळेल त्या दिशेला नवीन मुळे वाढवतात आणि जुनी मुळे त्यागतात ! त्यामुळे हे माड काही महिन्यांत काही मीटर दूर जाऊ शकतात. त्यामुळे चालणारे किंवा walking palms हे जरा अतिशयोक्तीचेच आहे , त्यांना फार तर रांगणारे किंवा सरकणारे माड म्हणू शकतो.

झिपलाईन टूरवरून परत आल्यावर विश्रांती घेऊन "ला वाका" (याचा स्पॅनिश अर्थ गाय) बीचवर गेलो, ४०-५० मिनिटांचा ट्रेक. "इथे प्रत्येक चालण्याला ट्रेक म्हणावं लागतं," असं मी स्वतःशीच हसत म्हणालो, "कारण प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी एकतर टेकडी चढावी लागते किंवा उतरावी लागते!" या बीच वर गाई दिसल्या नाहीत की गाईच्या आकाराचे काही दिसले नाही , मात्र ला वाका हे नाव मराठी अर्थाशी जुळले.  या बीचवर पोचण्यासाठी तयार केलेला पक्का रस्ता नसल्याने तिथे येताना एका कुंपणाखालून "वाका"वेच लागते ! जुन्या काळी इथे गुरांचे गोठे होते त्यावरून त्याला "ला वाका" हे  नाव मिळाल्याचे समजले.

La vaca बीच ला जाताना 


तिथे तो अख्खा स्पॅनिश विद्यार्थ्यांचा ग्रुप आधीच पोचला होता. सगळे मिळून पोहलो, दानीने एक नारळ शोधून तो फोडला आणि आम्ही त्याचं पाणी प्यायलो, या साध्या कृतीत जो निखळ आनंद होता तो कुठल्याही रेस्टॉरंटच्या ज्यूसमध्ये मिळत नाही. परत येताना अंगावरचा घाम धुण्यासाठी बॉंगो हॉटेलच्या पूलमध्ये पुन्हा एकदा डुंबलो. तिथल्या जाकुझी मधे ज्यूस पीत गप्पा मारल्या.



शेजारच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करून हॉस्टेलवर परत आलो. रात्री गप्पांची मैफल जमली, एक जर्मन मुलगी आणि जोआनसोबत ब्रिटिश वसाहतवादावर चर्चा झाली: भारतीय लोक ब्रिटिशांकडे कसं बघतात, आणि स्पॅनिश वसाहतवादावर: कोस्टा रिकन लोक त्यांच्या इतिहासाकडे कसं बघतात. स्पॅनिश लोकांबद्दल त्यांना काय वाटतं आणि त्यांच्या स्थानिक भाषा आता लयाला गेल्याचे किती दुःख त्यांना आहे वगैरे... अपराधी भावना, वसाहतवाद, संस्कृती, राष्ट्रीयवाद, ओळख, असे अनेक विषय निघाले आणि एक उद्बोधक, विचार करायला लावणारी चर्चा रंगली. जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांतून आलेली माणसं जेव्हा एकत्र बसून आपापल्या देशांच्या जखमांबद्दल मोकळेपणाने बोलतात, तेव्हा प्रवासाचं खरं सार्थक होतं असं वाटलं.

रविवार , ९ ऑगस्ट : केपोसला निरोप आणि सॅन होजेला परत

आज केपोसला निरोप द्यायचा दिवस होता. पॅनकेक आणि फळांचा नाश्ता, आता पपई खाण्याची जणू सवयच जडली होती! योगा केला, आईशी फोनवर बोलणं झालं आणि तेवढ्यात एक शेवटचं गिफ्ट मिळालं, झाडावर हळूहळू चढणारा एक स्लॉथ दिसला. या ट्रिपमधला असा जवळून भेटलेला हा पहिलाच  स्लॉथ!  



घामेघूम होत चालत केपोसच्या बस स्टॉपवर पोचलो. साडेबाराची सॅन होजेची बस दानी आणि इतर स्पॅनिश मित्रांबरोबरच पकडली. वाटेतल्या एका थांब्यावर तुरळक खरेदी करताना चक्क "बासुंदी वडी" नावाचा एक गोड पदार्थ दिसला, नाव वाचून क्षणभर मी पुण्यातल्याच एखाद्या मिठाईच्या दुकानात उभा आहे असं वाटलं!

सॅन होजेला संध्याकाळी सहाच्या सुमारास पोचलो. त्याच जुन्या हॉस्टेलमध्ये चेक-इन करून पूल आणि स्पामध्ये जरा चिल केलं. संध्याकाळी विल्यम भेटायला आला. त्याचा राग आणि गैरसमज मनमोकळेपणाने बोलून दूर केला, त्याला वाटणारी काळजी साहजिकच होती, पण मी कुठे आहे आणि सुरक्षित आहे का याची त्याने सतत काळजी करणं मला अनावश्यक वाटत होतं. आमच्यातले विसंवाद, आयुष्याकडे बघण्याचे वेगळे दृष्टिकोन, फिरण्याच्या आणि बोलायच्या वेगळ्या पद्धती, या सगळ्यावर आम्ही मनापासून चर्चा केली. मन मोकळं केल्याबद्दल त्याचे आभार मानले, आणि तितक्याच मोकळ्या मनाने आणि मोकळ्या पोटाने व्हेज बर्गरची ऑर्डर दिली. हॉस्टेलमधल्याच रेस्टॉरंटमध्ये जेवून लवकर झोपी गेलो.

उविता आणि केपोसचे हे सहा दिवस म्हणजे जणू एका मोठ्या श्वासासारखे होते, कधी अगदी एकटं, शांत चिंतन, तर कधी नव्या मित्रांच्या गराड्यात रंगलेल्या रात्रीच्या गप्पा. देवमाशाच्या शेपटीपासून ते झिपलाईनवरून उडतानाच्या क्षणापर्यंत, आणि एका फुटलेल्या नारळाच्या पाण्यापासून ते जुन्या-नव्या ओळखींवरच्या गहन चर्चांपर्यंत,  बऱ्याच आठवणी दिल्या या दोन गावांनी !एकट्याने फिरताना स्पॅनिश भाषा व्यवहारात वापरता आली. स्थानिक लोक वापरत असलेला वाक्प्रचार मी प्रचारात आणला. "पुरा विदा" (Pura vida) म्हणजे सुंदर आयुष्य! कोस्टा रिकन लोक "पुरा विदा" असे कधीही म्हणू शकतात (hello ऐवजी, गुडबाय ऐवजी, गुड-लक ऐवजी) . आणि पुरा विदा ला उत्तर म्हणून "पुरा विदा " असेच म्हणतात! हे म्हणजे फ्रेंच मधील  "ca va" सारखे आहे. असो. सहा दिवस "पुरा विदा" जगून  सुंदर निसर्ग-सौंदर्य लाभलेल्या कोस्टा रिकाच्या पश्चिम किनारपट्टीला अखेर "अल-विदा" म्हणावेच लागले... 

(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा