मंगळवार, ३० जून, २०२६

तुर्कीय सहल ५. बॉस्फोरसची सामुद्रधुनी आणि खरेदी


पहिला भाग वाचा इथे पहिला दिवस  
दुसरा भाग वाचा इथे  दुसरा दिवस 
तिसरा भाग वाचा इथे तिसरा दिवस 
चौथा भाग वाचा इथे चौथा दिवस 

 दिवस पाचवा : १५ जून २०२६


५. बॉस्फोरसची सामुद्रधुनी आणि खरेदी



अजूनही परवाचे थोडे कलिंगड उरलेच होते. त्यातले थोडे खाऊन उरलेले हॉटेलजवळ असलेल्या फ्रुटस्टॉलवाल्याला ते देऊन टाकले. आजचा दिवस खरेदीचा होता. कालच हवी असलेली दुकाने गुगलवर मॅप करून ठेवली होती. ऊन चांगलेच मी म्हणत होते.

तक्सीम चौकापासून पार्कच्या बाजूने उत्तरेकडे चालत "निशांताशी" (Nişantaşı) या भागात पोचलो. हा नावाप्रमाणेच शांत अगदी प्रसन्न, निवांत रेसिडेन्शियल भाग आहे, इथे यायला ट्रॅमची गरजच पडली नाही. इथे "अटेलिये रेबुल" (Atelier Rebul) आणि "पाशाबाहचे" (Paşabahçe) ही दोन्ही प्रसिद्ध दुकाने तेश्वीकिये कॅडेसी (Teşvikiye Caddesi) याच रस्त्यावर, एकमेकांपासून जेमतेम पन्नास मीटरवर आहेत. दोन्ही दुकानांत जायचे असल्यामुळे हा रस्ता मी निवडला होता. 

अटेलिये रेबुल ही मुळात सन १८९५ मध्ये "ज्याँ सेझार रेबूल" नावाच्या एका फ्रेंच औषधविक्रेत्याने इस्तंबूलमध्ये थाटलेली एक फार्मसी होती. "ग्रांद फार्मासी पॅरिझिएन", जुन्या "रू द पेरा" रस्त्यावर (आजचा इस्तिक्लाल अव्हेन्यू) आहे. सन १९३८ साली त्यांनी काढलेले "रेबुल लाव्हांदा" हे लॅव्हेंडर कोलोन(अत्तर) इतके लोकप्रिय झाले की ते इस्तंबूलमधल्या सभ्य गृहस्थांची जणू ओळखच बनले. आजही जुन्या पिढीतल्या तुर्की लोकांसाठी ते अत्तर म्हणजे नॉस्टॅल्जिया आहे. पुढे रेबूलच्या तरुण विद्यार्थ्याने, केमाल मुदेरिसोग्लूने ही फार्मसी चालवली, आणि सन २०१३ मध्ये त्याच्याच कुटुंबाने या वारशातून "अटेलिये रेबुल" हा आधुनिक परफ्यूम-कॉस्मेटिक ब्रँड उभा केला. इथून मी दोन अत्तरे घेतली. एक माझ्यासाठी आणि एक माझा फ्लॅटमेट कार्लो साठी.  जे अत्तर मी घेतलं, त्याला तब्बल सव्वाशे वर्षांची परंपरा आहे.

"पाशाबाहचे" हा काचसामानाच्या वस्तूंचा प्रसिद्ध ब्रँड ! याचा इतिहास पण रंजक आहे. सन १९३५ साली, खुद्द अतातुर्कांच्या आदेशावरून (तुर्कीचे पहिले राष्ट्रपती), तुर्कस्तानला स्वतःचा काचउद्योग असावा म्हणून "इश बँक" या बँकेने बॉस्फोरसच्या काठावरच्या "पाशाबाहचे" नावाच्या एका छोट्या गावात एक काच-कारखाना उभारला. त्या गावाचं नावच काचेच्या भट्ट्यांसाठी प्रसिद्ध होतं, आणि "पाशाबाहचे" या नावाचा अर्थच आहे "पाशाची बाग"! पुढे सन १९५७ पासून त्यांची स्वतंत्र किरकोळ दुकाने सुरू झाली, आणि आता ऑटोमन काचकलेपासून प्रेरित डिझाईन्स घेऊन हा ब्रँड जगभर पोचला आहे. माझे शेजारी जॉर्जी आणि लाना जे लवकरच लग्न करणार होते त्यांच्यासाठी या दुकानातून कप-बशा घेतल्या. त्या कप-बश्यांमागेही एक राष्ट्रनिर्मितीची गोष्ट  आणि स्वदेशी अभिमानाची गोष्ट दडलेली होती आणि कदाचित म्हणूनच नवीन लग्न झालेल्या जोडप्याला "पाशाबाहचे" मधून क्रॉकरी देण्याचा प्रघात टर्कीमध्ये आहे. 


खरेदी करून परत हॉटेलवर आलो. (Pestemal) "पेष्टेमाल" नावाच्या टर्किश टॉवेलसाठी पुन्हा निघालो. पुण्यात ज्याला "टर्किश टॉवेल" म्हटले जाते तसा तो मुळीच दिसत अथवा जाणवत नाही.

निळ्या मशिदीजवळच्या "आरस्ता" बाजारात जायचे होते. यावेळी बस + ट्रॅमने गेलो. हा "आरस्ता" बाजार म्हणजे सतराव्या शतकात, निळ्या मशिदीच्याच संकुलाचा भाग म्हणून बांधलेली एक छोटी, रांगेत दुकाने असलेली बाजारपेठ. पूर्वी इथे ऑटोमन घोडदळाचे (सिपाही) जिन्नस, खोगीर वगैरे विकले जात, त्यामुळे याला "सिपाही चार्शिसी" असेही म्हणत. इथल्या दुकानांच्या भाड्याच्या पैशातूनच निळ्या मशिदीची देखभाल केली जायची. 



"जेनिफर हमाम" हे दुकान शोधायला तसा वेळ गेला. हातमागावर बनवलेले कापसाचे टॉवेल, रोब विकणारे हे एक विशेष (प्रसिद्ध) दुकान आहे. मी एक बाळाला गुंडाळायचा एक गुलाबी पंचा घेतला (हसन-हाना च्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीसाठी). स्वतःसाठी एक बदामी (पीच) रंगाचा बाथरोब सुद्धा घेतला.

अनेक विक्रेते "Brother" म्हणून मला मामा बनवू पहात होते. आपणहून चहा, टर्किश डिलाईट चवीसाठी देत होते. एकाने तर फुलांचा चहा, हर्बल टी वगैरे म्हणत चक्क कोरडी फुले (निर्माल्य) दाखवली.  आता नदीत फेकण्यापेक्षा त्यांचा असा उपयोग केलेला बरा असे वाटून गेले. निर्माल्य म्हणजे काय हे त्या विक्रेत्याला समजावण्याच्या फंदात मी पडलो नाही. बाजारात काहीजण माझ्याबरोबर चालत चालत गप्पा मारायला आपल्यासारखे दाखवत होते , नंतर हळूच "हे माझं दुकान, let me spend your money" असे विनोद करत होते.

पूजेचे निर्माल्य चहा म्हणून विक्रीला !


खरेदी उरकल्यावर त्याच परिसरात एका ठिकाणी जेवायला थांबलो. चिंचेचे सरबत, फलाफल, सॅलड असं मस्त जेवण झालं.

निवांत चालत "एमिनोनू" फेरी टर्मिनलपर्यंत गेलो. बॉस्फोरस सामुद्रधुनीची सहल बुक केली. ती केवळ १ तासाची होती. फेरीतून सूर्यास्त बघायला मिळेल असे वाटले होते, पण फक्त चमचमणारे पाणी, मशिदी आणि शहराचे "उस्कुदार" सारखे भाग (लांबून) पाहता आले.


या फेरीमधे फेरीवाल्यांची रेलचेल होती. चहा, आईस्क्रिम, कणीस विकणारे सीगल्सच्या सातत्याने घिरट्या घालत होते. पोपट अंगा-खांद्यावर ठेवून फोटो काढून देणारे उच्छाद आणत होते. फेरीचा अनुभव चांगला होता, पण out of the world नव्हता. golden hour मधे दिसणाऱ्या मशिदी उठावदार दिसत होत्या.



फेरी संपल्यावर गालाता पुलावरून सूर्यास्त पाहिला. 

गालाता पुलावरून दिसलेला सूर्यास्त 


मेट्रोने ताकसीम चौकात आलो. घरी खरेदीची पिशवी टाकून जेवायला बाहेर पडलो. बुरेक (एक प्रकारचे टर्किश पॅटिस), फ्रेश ज्यूस खाल्ल्यावर ताक्सिम चौकात आईस्क्रीम पार्लर पाहिले जिथे मजेशीर टुरिस्ट ट्रॅप बघायला मिळाला. कसरती करत आईस्क्रीमचा कोन देणारा पार्लरवाला चांगलीच वाहवा मिळवत होता.



हे "माराश दोंदुर्मा" (Maraş Dondurma) नावाचं खास टर्किश आईस्क्रीम असतं, जे सालेप (एका रानटी ऑर्किडच्या मुळापासून बनवलेलं पीठ) आणि मस्तिक (एका झाडाच्या डिंकासारख्या राळेपासून बनवलेला घटक) घालून बनवलेलं असतं  त्यामुळेच ते इतकं चिकट, लवचिक आणि न वितळणारं असतं की चमच्याऐवजी सुरी-काट्यानेही खावं लागेल! एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासूनच हे आईस्क्रीमवाले गिऱ्हाइकाला कोन हातात द्यायला अशी चालढकल/नाटकं करायची परंपरा चालवत आले आहेत. ती फक्त गिऱ्हाईक आकर्षित करायची एक खास "शोमनशिप" आहे, त्यामागे कुठली खोल परंपरा नाही, पण गंमत म्हणून ती पिढ्यानपिढ्या टिकून आहे.

तिथे मनोरंजन करून घेत सुमार दर्जाचे टर्किश आईस्क्रीम खाल्ले आणि आपणहून त्या पार्लरमधे ट्रॅप झालो.


चार दिवसांपूर्वी फक्त ढगाळ Amsterdam पासून पळ काढायचा म्हणून निघालेली ही ट्रिप.  कुठे चेरी-आर्टीचोकच्या केक पासून   ते हमामातल्या गुदगुल्यांपर्यंत, कुठे हाजिया सोफियाच्या घुमटाखालच्या जुन्या कथांपासून ते या आईस्क्रीमवाल्याच्या नाटकांपर्यंत येऊन पोहोचली होती.... सगळं काही "अनपेक्षित" याच एका शब्दात मावणारं ठरेल.  एकही लँडमार्क बघून "वाह!" असं वाटलं नाही, पण डाळिंबाचे ज्यूस, "Brother" म्हणत जवळ येणारे विक्रेते, आणि हमाम मधील मालिश या गोष्टी कायम लक्षात राहतील.  इस्तंबूल शहराने स्मारकांपेक्षा शहर म्हणून असणाऱ्या व्यक्तिमत्वाने जास्त भुरळ घातली, हे नक्की. युरोप आणि आशिया यांचा विजोड संगम असणारे हे शहर पुन्हा पुन्हा यावेसे वाटेल असेच आहे !

(समाप्त)


पहिला भाग वाचा इथे पहिला दिवस  
दुसरा भाग वाचा इथे  दुसरा दिवस 
तिसरा भाग वाचा इथे तिसरा दिवस 
चौथा भाग वाचा इथे चौथा दिवस 

रविवार, २८ जून, २०२६

तुर्कीय सहल ४. निळी मशीद आणि काळा इतिहास


पहिला भाग वाचा इथे पहिला दिवस  
दुसरा भाग वाचा इथे  दुसरा दिवस 
तिसरा भाग वाचा इथे तिसरा दिवस 


दिवस चौथा : १४ जून


४. निळी मशीद आणि काळा इतिहास 



रोजच्याप्रमाणे आरामात उठून, आवरून टर्किश नाश्ता करून चालत निघालो. (दोन दिवस झाले असल्यामुळे आता रोजच्याप्रमाणे म्हणायला हरकत नाही) आज पहिला खऱ्या अर्थाने "पर्यटन" दिवस.


निळी मशीद (Blue Mosque) हा पहिला टप्पा होता: एक दीड तासाचा रस्ता होता. मुद्दाम चालत गेलो. ऊन खात खात, शहराचा नवीन भाग बघत बघत. जुन्या वस्तूंची दुकाने, "Vitamin" नावाची फळांची दुकाने हरेक कोपऱ्यावर दिसत होती. डाळिंबाचा ज्यूस असलेला ग्लास हातात घेऊन घुटके घेत घेत आरामशीर पावले टाकत जात होतो. पुन्हा मांजरींचे प्रस्थ जाणवले. जागोजागी त्यांच्यासाठी पाणी आणि इतर सोयी केलेल्या होत्या.

इस्तंबूलमधील एक शांत वळण 


जुन्या वस्तूंचे रस्त्यावर मांडलेले दुकान 


काराकॉयपर्यंतचा रस्ता उताराचा होता. काराकॉय (Karakoy) जवळ मोठा पूल आहे. 

हा पूल म्हणजे प्रसिद्ध "गालाता ब्रिज" (Galata Bridge) गोल्डन हॉर्न या निमुळत्या खाडीवरचा, "एमिनोनू" आणि "काराकॉय" या दोन भागांना जोडणारा पूल. पूर्वी काराकॉयला "गालाता" असं नाव होतं, त्यावरूनच पुलाचं नाव पडलं. इथे मासेमारीची परंपरा खूप जुनी आहे. गंमत म्हणजे, सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला सुलतान दुसरा बायझिद याने इथे पूल बांधायचं स्वप्न पाहिलं तेव्हा त्याने चक्क लिओनार्दो दा व्हिंचीला (हो, तोच मोनालिसावाला!) डिझाइनसाठी निमंत्रण दिलं होतं. दा व्हिंचीने एका झोकदार कमानीचा, त्या काळी जगातला सर्वात लांब ठरेल असा पूलही डिझाइन करून दिला, पण सुलतानाने तो मान्य केला नाही आणि कल्पना तब्बल तीनशे वर्षे थंड बस्त्यात गेली! आजचा हा पूल सन १९९४ चा आहे. याआधी इथे अनेक पूल झाले, पहिला कायमस्वरूपी लाकडी पूल तर सन १८४५ चा. इथले मासेमार रोजच्या रोज सिनेकोप (एक प्रकारचा छोटा मासा) आणि पालामुत (बोनिटो मासा) पकडण्यासाठी रांगेत उभे असतात. काहींसाठी हे निव्वळ टाइमपास, तर काहींसाठी रोजच्या उदरभरणाचा मार्ग. त्या पुलावर अनेक मच्छीमार सहकुटुंब आले होते. त्याची गंमत वाटली. कारण ते सहकुटुंब मासेमारी करत होते. वडील गळ टाकून उभे होते, तर मुलगा गळाला लागलेला मासा काढून बॉक्समध्ये ठेवत होता. काही मुले गळावर लावले जाणारे अमिष बदलत होते.

गालाता पूल 


पुलाच्या खालच्या मजल्यावर बाल्क-एकमेक (balık ekmek म्हणजे ग्रिल केलेला मासा घालून केलेलं सँडविच) विकणारी छोटी-छोटी दुकाने/रेस्टॉरंट असतात. ही जवळजवळ दीडशे वर्षे जुनी खाद्यपरंपरा आहे. पण माश्याच्या वासानेसुद्धा मला मळमळायला होतं म्हणून या परंपरेचा मी मनोमन धिक्कार करून तिथून सटकलो.  


त्या परिसरातील पादचारी-भुयारी मार्ग वगैरे बरेच अस्वच्छ होते / गर्दी खूप होती, पण तरीही चालताना तिथे रुळल्यासारखे वाटत होते. घरच्यासारखे. माहीत नाही का! कदाचित सहज उपलब्ध असणारे स्ट्रीट फूड आणि फोनवरून करता येणारे पेमेंट आणि अपेक्षेप्रमाणे चालू असलेली सार्वजनिक वाहतूक यांचा एकत्रित परिणाम असेल.

पुलापासून निळ्या मशिदीपर्यंत जाताना पुन्हा चढणीचा रस्ता होता. अर्ध्या पाऊण तासात निळ्या मशिदीपाशी पोचलो. डोळ्यांचे पारणे फिटावे इतकी प्रेक्षणीय वाटली नाही.

निळी मशीद 


अरेबियन नाईट्समधील अल्लाउद्दीनच्या काल्पनिक कथेची आठवण त्या निळसर घुमटांच्या मशिदीने झाली. तिथे भाविक मात्र मोठ्या संख्येने आले होते.


ही निळी मशीद आणि त्याच्या समोर असणारी हाजिया सोफिया यांबद्दल थोडेसे...


निळ्या मशिदीचे खरे नाव "सुलतान अहमद मशीद". लोक तिला सहज "निळी मशीद" म्हणतात, कारण आतल्या भिंतींवर तब्बल वीस हजारांहून अधिक हाताने रंगवलेल्या निळसर टाइल्स लावलेल्या आहेत. ही मशीद बांधणारा "सुलतान अहमद पहिला" हा गादीवर बसला तेव्हा अवघ्या तेराव्या वर्षी होता, आणि मशीद पूर्ण झाल्यानंतर लगेचच, सत्ताविसाव्या वर्षी तो मरण पावला. "हाजिया सोफिया"ला मागे टाकण्याच्या ईर्ष्येनेच त्याने ही भव्य मशीद बांधून घेतली, अशी नोंद आहे. या मशिदीला सहा मिनार आहेत, आणि त्यामागेही एक मजेशीर आख्यायिका सांगितली जाते: सुलतानाने आर्किटेक्टला "सोन्याचे मिनार" (अल्तीन मिनारलर) हवेत असे सांगितले होते, पण आर्किटेक्टला ते "सहा मिनार" (अल्ती मिनारे) असे ऐकू आले! त्या काळी मक्केतील काबाच्या मशिदीलाच फक्त सहा मिनार होते, त्यामुळे ही चूक मोठा वादाचा मुद्दा बनली. अखेर सुलतानानेच मक्केच्या मशिदीला सातवा मिनार बांधून दिला आणि वाद मिट(व)ला!

"हाजिया सोफिया" च्या काही भागाचा जीर्णोद्धार चालू असल्याने फोटो घ्यावेसे वाटले नाहीत . 

"हाजिया सोफिया" मुसलमानांसाठी अतिशय महत्त्वाची जागा आहे. सन १४५३ मध्ये ऑटोमन सुलतान मेहमेद दुसरा (फातिह) याने कॉन्स्टँटिनोपल (कॉन्स्टँटिनोपल हे इस्तंबूलचे जुने नाव) जिंकल्यानंतर लगेचच या भव्य बायझंटाइन चर्चचे मशिदीत रूपांतर केले, आणि ती जवळजवळ ४८० वर्षे इस्तंबूलची प्रमुख मशीद राहिली. तब्बल १६१६ साली निळी मशीद बांधली जाईपर्यंत. मुसलमानांमध्ये याबद्दल एक श्रद्धामय आख्यायिकाही सांगितली जाते: "हाजिया सोफियाचा मूळ घुमट कोसळला तो दिवस म्हणे पैगंबर मुहम्मदांच्या जन्माच्या रात्रीच होता आणि नंतर पैगंबरांनी स्वप्नात बायझंटाईन सम्राटाला हे चर्च परत बांधण्याची परवानगी दिली. कारण भविष्यात इथे मुसलमान नमाज पढतील असं सांगितलं जातं!" सन १९३४ साली अतातुर्कांनी (Founder of Republic of Turkey) हाजिया सोफियाला संग्रहालयाचा दर्जा दिला, आणि जवळजवळ ८५ वर्षांनी, सन २०२० मध्ये ती पुन्हा एकदा अधिकृतपणे मशीद म्हणून घोषित करण्यात आली.


ओटोमन साम्राज्यातील अनेक पिढ्यांची कबर/थडगी हाजिया सोफियाच्या आवारातच आहेत. इथे एकूण पाच सुलतानांची थडगी आहेत: सुलतान सलीम दुसरा (याचे थडगे प्रसिद्ध आर्किटेक्ट मिमार सिनान याने सन १५७७ मध्ये बांधले. हाजिया सोफियाच्या आवारातले हे पहिलेच थडगे), त्याचा मुलगा मुराद तिसरा, आणि नातू मेहमेद तिसरा. या मेहमेद तिसऱ्याची एक भयानक गोष्ट सांगितली जाते: गादीवर बसताक्षणीच त्याने आपल्या एकोणीस भावांना मारून टाकले, आणि नंतर त्या सर्वांना आपल्या वडिलांच्या (मुराद तिसरा) थडग्यातच सन्मानाने पुरण्यात आले! याशिवाय मुस्तफा पहिला आणि इब्राहिम पहिला ज्यांना त्यांच्या अस्थिर कारकिर्दीमुळे "वेडा" अशी उपाधी मिळाली होती त्यांचेही थडगे इथेच, पूर्वी बाप्तिस्म्यासाठी (baptistry) वापरल्या जाणाऱ्या एका जुन्या बायझंटाइन इमारतीत आहे.


सुलतान अहमद खान (१४वा ऑटोमन सुलतान, आणि निळ्या मशिदीचा निर्माता) विशेष म्हणजे, याचे स्वतःचे थडगे मात्र हाजिया सोफियाच्या आवारात नाही, तर त्याने स्वतः बांधलेल्या निळ्या मशिदीच्याच संकुलात, मशिदीच्या उत्तरेला सुलतानाहमेत पार्ककडे तोंड करून आहे. हाजिया सोफियाला मागे टाकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या तरुण सुलतानाचा मृत्यू मशीद पूर्ण झाल्यावर काही महिन्यांतच झाला, आणि गंमत म्हणजे, त्याचे तीन मुलगे उस्मान दुसरा, मुराद चौथा आणि इब्राहिम हे तिघेही नंतर एकेका वळणावर ऑटोमन साम्राज्याच्या गादीवर बसले.

तर हा या निळ्या मशिदीचा आणि हाजिया सोफियाचा काळा इतिहास !


मशिदींना बाहेरूनच नमस्कार(!) करून मी "सुलतान अहमद" चा परिसर फिरायला सुरवात केली. पाण्याकडे ओढ असल्याने पाणी येईपर्यंत (घामाच्या धारा) चालत राहिलो. मशिदीच्या मागील बाजूस समुद्रकिनारा आहे, तेथे दगडांवर सावलीत बसलो. ध्यान लावले. होड्या बघत बसून राहिलो. कंटाळा आल्यावर / भूक लागल्यावर तिथून उठलो. हॉटेलच्या दिशेने निघालो.

इस्तंबूलच्या "उसकुदार" भागाची skyline 


वाटेत टर्किश कार्पेट विकणाऱ्या एका मुलाने अनपेक्षित सलगी करत जवळजवळ ओढतच त्याच्या दुकानात नेले. सुरेख कार्पेट्स होती. fireproof वगैरे — लायटर लावून जाळायचा प्रयत्न वगैरे केला. एवढं प्रात्यक्षिक वगैरे दाखवूनसुद्धा मी हाताएवढंही कार्पेट/रुमाल घेतलं/घेतला नाही. बिचाऱ्याने घेतलेली मेहनत वाया गेली.

पारंपरिक टर्किश रेस्टॉरंट 


"सुलतान अहमद" परिसरातून जी ट्रॅम जाते ती फारच भयानक आहे. ट्रॅमच्या वाटेत कुणीही सहज येऊ शकतं. फूटपाथवरच्या लोकांना सहज (धक्का) मारून जाईल अशी ही ट्रॅम सतत घंटा वाजवत जात होती. ट्रॅमच्या रुळांच्या बाजूबाजूने जाताजाता एका पारंपरिक दिसणाऱ्या टर्किश restaurant पाशी मी थबकलो. तिथे आत जायचा मोह मला आवरता आला नाही. काचेतून दिसत होती एक पारंपरिक टर्किश/अरबी महिला जी पोळ्या लाटत होती. मी जरी त्याला पोळ्या म्हणत असलो तरी ते टर्किश फ्लॅट ब्रेड होते. लोड तक्क्या लावून सजवलेली बैठक व्यवस्था एकदम शाही होती. मी शाशूका, असपानाक, आणि हुमूस मागवलं. पैकी शाशूका म्हणजे चक्क कंटाळा आलेला असताना केलेले वांग्याचे भरीत होते. नीट धड न कुस्करलेली अर्धवट भाजलेली वांगी आणि बोथट चाकूने कशीबशी कापलेली लाल ढब्बू मिरची त्यांना पुरेसे न शिजवताच मसाला लावला होता. "असपानाक" म्हणजे चक्क पालक भरलेली पोळी होती. त्याला "पराठा" म्हणणे हा पराठ्याचा अपमान होईल. कारण नुसती पालकाची पाने होती, कणीक मळताना पालक शिजवून त्यात मीठ मसाल्यांसकट घातला नव्हता. आणि हुमूस हे खरोखरीच चैत्र-गौरीत खाल्ल्या जाणाऱ्या आंबट डाळीची आठवण होईल, इतके आंबट होते. मला सगळं खाणं आवडलं नाही. पण उदरभरण झाले. गरम चहा मात्र मस्त होता. यज्ञकर्म झाल्यासारखे वाटले. 



त्या पारंपरिक ठिकाणाहून बाजार बघत बघत "गालाता" पुलावर पोहोचलो. पुलाला समांतर पाण्याच्या जवळ असाही एक पूल होता (खालचा मजला). तिथून जायचे ठरवले. त्याला खालचा पूल म्हणूया. खालच्या पुलावरून observation डेक वरून तिथे ८-१० जण वरच्या मोठ्या पुलाच्या कॉलमचा फोटो काढत होते. मी उत्सुकता म्हणून त्या डेक वर गेलो. दहा लोक वर बघायला लागल्यावर कशी बाकीची लोकं वर बघतात. इथे तर अख्खा फोटो होता. आपल्याकडून काही लँडमार्क मिस होतोय का असे वाटून काही पर्यटकपण फोटो घेत होते. "गंजलेल्या जुन्या पुलाच्या कॉलमचा फोटो", हे काही पटलं नाही. एका tripod वाल्या माणसाला विचारलं तर तो म्हणाला, "आमचा फोटोग्राफीचा कोर्स आहे आणि आम्हाला विशिष्ट lighting मधे असे या जागेचे फोटो काढायला सांगितले आहेत." हे ऐकून सगळ्याचा उलगडा झाला.

फोटोग्राफीचा कोर्स करणारी मंडळी 


रमतगमत हॉटेलवर आलो. उरलेले कलिंगड खाल्ले. आराम केला. जवळच्या टर्किश रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण केले आणि लवकर झोपलो.




(क्रमशः)


पहिला भाग वाचा इथे पहिला दिवस  
दुसरा भाग वाचा इथे  दुसरा दिवस 
तिसरा भाग वाचा इथे तिसरा दिवस 

शनिवार, २७ जून, २०२६

तुर्कीय सहल ३. हमाम मे सब ...


पहिला भाग वाचा इथे  पहिला दिवस

दुसरा भाग वाचा इथे दुसरा दिवस


दिवस तिसरा : १३ जून 


३. हमाम मे  सब...



निवांत या शब्दाला नवीन अर्थ देण्याच्या ईर्ष्येने निवांतपणे ११ वाजता उठलो. पावसाळी वातावरण होते. त्यामुळे हमामला जायचे ठरवले होते. त्यापूर्वी दुपारी १२ वाजता नाश्ता (brunch) केला. कालच्यासारखे छान जिन्नस मांडलेले मोठ्ठे टेबल. खाता खाता शेजारीच बसलेल्या टर्किश तरुणाशी संवाद साधला. वीस वर्षांचा कॉलेज तरुण असूनही त्याचे इंग्रजी यथातथाच होते, पण आत्मविश्वास आकाशाला भिडला होता. मी वीस वर्षांचा असतानाचे माझे इंग्रजी फक्त व्याकरण माहीत असणारे होते. प्रत्यक्ष बोलायची/ऐकायची बोंबच होती. पण हा मुलगा अर्धवट इंग्रजीत, अर्धवट टर्किशमध्ये मला टर्किश खाद्यपदार्थांची माहिती सांगत होता.



मी शाकाहारी आहे असे कळल्यावर त्याने पुढील पदार्थांची यादी लिहून दिली: Enginar (एंजिनार म्हणजे आर्टीचोक ची भाजी), Taze fasulye (ताझे फासुल्ये म्हणजे फरसबी), Kuru fasulye pilav (कुरु फासुल्ये पिलाव म्हणजे वालाची उसळ आणि भात), Pazi (याचा उच्चार पाजी असा नसून पझ असा आहे, म्हणजे आपल्याकडची चुक्याची भाजी), Ispanak (असपानाक म्हणजे पालक), Havuc tarator (हवूच तारतोर म्हणजे गाजराची दही घालून केलेली कोशिंबीर), Humus (हुमूस म्हणजे हरभऱ्याचे वाटण, पण "वाटली डाळ" म्हणण्यापेक्षा हुमूस म्हटलं की काहीतरी भारी वाटतं)


ब्रंच संपवून मी हमामकडे निघालो. "गालातासारे" हमाम तब्बल ५०० वर्षांहून अधिक जुना आहे. इसवी सन १४८१ मध्ये, ऑटोमन सुलतान दुसरा बायझिद (Beyazıt II) याच्या आज्ञेने हा बांधला गेला असे सांगितले जाते. या हमामबद्दल एक गोड दंतकथाही प्रचलित आहे: सुलतान बायझिद एकदा शिकारीसाठी या भागात फिरत असताना त्याला गुल बाबा नावाच्या एका फकिराची झोपडी दिसली. सुलतानाने त्याला इच्छा विचारली असता गुल बाबाने एका मदरशाची (शाळेची) आणि घुमटाकार हमामाची मागणी केली. सुलतानाने ती इच्छा पूर्ण केली, आणि त्यातूनच "गालातासारे कुल्लिये" हा संकुल उभा राहिला. कुल्लिये हा शब्द सध्या misleading आहे कारण आतमधे नग्नतेला मज्जाव आहे. त्यामुळे कुल्ले दिसत किंवा दाखवता येत नाहीत.  कुल्लिये या टर्किश शब्दाचा अर्थ  "संकुल" होतो. या संकुलामध्ये आजही प्रसिद्ध असलेली गालातासारे शाळा (तुर्कस्तानमधील सर्वात जुन्या शाळांपैकी एक) आणि हा हमाम, दोन्ही समाविष्ट आहेत. गुल बाबाची कबरही अजूनही याच संकुलात आहे, असे सांगतात. शतकानुशतके या हमामने न्यायाधीश (काजी), वझीर आणि अगदी सुलतानांच्याही अंगाला ऊब दिलेली आहे. आणि अलीकडच्या काळात तर जॉन ट्रॅव्होल्टासारखा हॉलिवूड कलाकारही (सन २००८ मध्ये) इथे येऊन गेला, असं स्थानिक सांगतात! अर्थात आतमध्ये फोटो घेण्याची परवानगी नसल्याने अशा सेलिब्रेटी लोकांचे (अर्ध)नग्न फोटो लावून त्यांनी जाहिरात केली नाहीये, उलट मूळचे बांधकाम, संगमरवरी काम आणि नक्षीदार घुमट शक्यतो जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. 



मुळात "हमाम" हा शब्द अरबी भाषेतल्या "हम्म" (तापवणे) या क्रियापदापासून आला आहे. सार्वजनिक उष्ण स्नानगृहांची परंपरा तर त्याहीआधी रोमन आणि ग्रीक संस्कृतीत रुजलेली होती (आर्किमिडीजने "युरेका!" असं ओरडत स्नानगृहातून उडी मारली, ती आख्यायिकाही अशाच एका सार्वजनिक स्नानगृहाशी जोडलेली आहे!). ऑटोमनांनी ही परंपरा अधिकच समृद्ध आणि शाही रूप देऊन पुढे चालू ठेवली. आजही एकच कुटुंब हा हमाम चालवते.


या हमाम मधे "हमाम" साबण दिला गेला नाही की "हमाम मे सब नंगे होते है" याचा प्रत्यय आला नाही. नग्नतेचे आणि अरब/तुर्की लोकांचे जरा वाकडेच आहे. त्यामुळे पाश्चिम युरोपियन सौना (Sauna) सारखा एकदम "मोकळा" अनुभव नव्हता. मला एक धडधाकट "पाशा" देण्यात आला होता. संगमरवरी फरशीवर (गरम) आराम, स्वतंत्र खोली, फक्त हमाममध्ये घालायला एक चड्डी, जापानी सपातांसारखी लाकडी चप्पल.


Foam bath देताना अंग रगडताना मला गुदगुल्या होत होत्या, हसूही येत होते, ते बघून तो पाशा अल्लाउद्दीन च्या जिनी सारखा हसत होता. मला उगाच  "या फेनमिषे हससी निर्दया कैसा" असे म्हणावेसे वाटले. एकंदरीत फोम बाथ करून घेताना आरामदायकसुद्धा वाटत होते. त्यानंतर टर्किश चहा देण्यात आला, मालकाने आपुलकीने विचारपूस केली आणि माझ्याबरोबर चहा सुद्धा घेतला. मग २० मिनिटांचा मसाज दिला गेला. छान तेल लावून रगडून दिले. शरीरातील प्रत्येक हाडाने आपले अस्तित्व जाणवून दिले. मसाजनंतर शॉवर घेऊन हमामचा निरोप घेतला.


जवळच असलेल्या एका टपरीवजा हॉटेलमध्ये चहा-समोसे खाल्ले. हॉटेलवर येऊन थोडा आराम करण्यापूर्वी एक गोष्ट आठवली.  गालातासारे हमाम जिथे आहे, तो भागच मुळी इस्तंबूलच्या सर्वात बोलक्या रस्त्यावर, इस्तिक्लाल अव्हेन्यूवर (İstiklal Caddesi) आहे. हा दीड किलोमीटर लांबीचा पादचारी रस्ता तक्सीम चौकापासून (Taksim Square) सुरू होऊन तुनेल (Tünel) पर्यंत जातो. ऑटोमन काळात या रस्त्याला "ग्रांद रू द पेरा" (Grand Rue de Pera) म्हणत असत, आणि तेव्हा इथे फ्रेंच, इटालियन, आर्मेनियन, ग्रीक अशा अनेक परदेशी वकिलाती आणि चर्च होती. एक प्रकारचं युरोपीय "मिनी-कॉस्मोपॉलिटन" जग. १९२३ साली तुर्कस्तानचे प्रजासत्ताक स्थापन झाल्यावर, स्वातंत्र्ययुद्धाच्या स्मरणार्थ या रस्त्याचं नाव "इस्तिक्लाल" (म्हणजे "स्वातंत्र्य") असं ठेवण्यात आलं.

"तक्सीम" या शब्दाचाही एक गमतीदार अर्थ आहे: ऑटोमन तुर्की भाषेत "तक्सीम" म्हणजे "वाटणी/वितरण"! या चौकात पूर्वी शहराला पाणी वितरित करणारी एक जलवितरण व्यवस्था (माक्सेम) होती, त्यावरूनच या जागेला हे नाव पडलं. आज तिथे प्रजासत्ताकाच्या स्थापनेचं स्मरण करणारा "रिपब्लिक मोन्युमेंट" उभा आहे, आणि चौकातून मेट्रोची एक महत्त्वाची लाईनही जाते.


रात्रीच्या वेळी दिसणारी तक्सिम मशीद  


तक्सीमपासून चालत निघालं की वाटेत गालातासारे चौक लागतो (जिथे आजची माझी हमामवारी झाली), थोडं पुढे गेलं की १८७६ साली बांधलेली "चिचेक पासाजी" (Çiçek Pasajı, म्हणजे "फुलांचा बाजार") ही जुनी काचेची गॅलरी दिसते. पूर्वी इथे नौम थिएटर होतं, जे एका मोठ्या आगीत भस्मसात झालं, आणि नंतर इथे फुलं विकणाऱ्या बायका बसायला लागल्या म्हणून या जागेला हे नाव पडलं. लाल रंगाची जुनी नॉस्टॅल्जिक ट्राम अजूनही या रस्त्यावरून किणकिणत जाते, आणि रस्त्याच्या शेवटी असलेलं "तुनेल" स्टेशन तर सन १८७५ पासून चालू असलेल्या जगातल्या सर्वात जुन्या भुयारी रेल्वेंपैकी एक आहे, म्हणजे तक्सीमपासून निव्वळ चालत चालत माणूस ऑटोमन इतिहास, युरोपीय वसाहतकाळ आणि आधुनिक प्रजासत्ताक असे तीनही कालखंड एका सरळ रेषेत अनुभवू शकतो!


हॉटेलवर येऊन थोडा आराम करून एका Meetup साठी गेलो. तेथे अनेक आंतरराष्ट्रीय लोकं भेटली. काही ग्रुप्सने आलेली लोकं होती, काही एकटेच आले होते. तिथे टर्किश चहा पीत-पीत गप्पा मारल्या. काही नवीन ओळखी झाल्या. बहुतेक सगळे जण इस्तंबूलमध्ये तात्पुरते राहायला किंवा कामानिमित्त आलेले होते. सगळ्यांना नवीन मैत्र जोडायचे होते. मी ४ दिवस आलोय असे म्हटल्यावर काहींचा माझ्याशी बोलण्याचा उत्साह मावळत होता आणि मी Amsterdam मधे राहतो म्हटल्यावर तो उत्साह द्विगुणित होत होता. माझ्या राहत्या शहरावरून माझी लायकी अशा प्रकारे जोखली जाईल याची कल्पना नव्हती पण त्याची गम्मत वाटली. रात्री उशीरापर्यंत गप्पा आणि हास्यविनोद करून हॉटेलवर परतलो.


(क्रमश:)


पहिला भाग वाचा इथे  पहिला दिवस

दुसरा भाग वाचा इथे दुसरा दिवस


मंगळवार, २३ जून, २०२६

तुर्कीय सहल २. टर्किश Delight(ful)



पहिला भाग वाचा इथे : पहिला दिवस


दिवस दुसरा : १२ जून

२. टर्किश Delight(ful)


१२ जून म्हणजे अस्मादिकांचा वाढदिवस. सकाळी उठून बघतो तर फोन शुभेच्छांनी भरून गेला होता. काही अपेक्षित तर काही अनपेक्षित (लोकांकडून) शुभेच्छा संदेश आले होते. आवरून, आई-प्रणवने पाठवलेला नवीन लिनेनचा शर्ट घालून, गेल्या वर्षी फ्रान्समध्ये घेतलेली लिनेनची पँट, असे माझेच माझ्यासाठी नटून बाहेर पडलो. ३८ वर्षं होऊनही वाढदिवसाबद्दल अजूनही ८ वर्षांचा असल्यासारखं अप्रूप आहे. अर्थात ८ वर्षांचा होतो तेव्हा स्वतःला वाटेल ते घेता किंवा मागता येत नव्हतं. आणि कुठे एकटं जायची तर सोय नव्हतीच ! असो.

दिवसा-उजेडी ताकसिम चौकात लोकांची अजूनच झुंबड उडालेली होती. मला टर्किश ब्रेकफास्ट देणाऱ्या कॅफेमध्ये जायचं होतं. १५-२० मिनिटांचा वॉक होता. घाई अशी नव्हतीच. शहराचा फील घेत, ऊन खात, बाकीच्यांची लगबग (?) पाहत निवांत चालत होतो.

ताक्सिम मशीद 


दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या; भटक्या मांजरी आणि (अति) धूम्रपान.

ताकसिम चौकाजवळच्या भागात इतक्या मांजरी आहेत की कुठेही उभे राहिलात तरी कुठूनतरी म्यांव आवाज तरी येईल किंवा खुद्द मांजर तरी कुठेतरी दिसेल. पर्यटकांना फसवणारे/फसवू पाहणारे किरकोळ विक्रेते सुद्धा कधी मांजराच्या पावलाने तुमच्या मागे येऊन उभे राहतील, तुम्हाला कळणार पण नाही. मांजर-प्रेमी असाल तर इस्तंबूलमध्ये फारच लवकर रुळाल. मला मांजर या प्राण्याचा मनस्वी तिटकारा असल्यामुळे मी चार हात दूर राहण्याच्या प्रयत्नात होतो. पण वाट अडवून पायरीवर राजासारखे बसलेले असेल तर त्या मांजराला हाकलावे तरी कसे. या शहरात मांजर फक्त आडवेच जात नव्हते, तर उभे-आडवे सगळ्या बाजूंनी जात होते. टर्किश लोकांची कामे न होण्याचे आणि ओघाने (?) देशाची अधोगती होण्याचे मुख्य कारण आर्थिक-राजधानीतील मांजरांचा सुळसुळाट हे असावे. (भारताची आर्थिक राजधानी जशी मुंबई तशी तुर्कीची इस्तंबूल मानली जाते)

भटक्या मांजरी 


दुसरी ठळकपणे जाणवलेली बाब म्हणजे धूम्रपान. इतकी नॉर्मलाईज केली आहे (किंवा इतके सामान्यीकरण केले आहे ) की त्याला स्थळ, काळ, वय कशाचेही बंधन नाही. १०-१२ वर्षाची पोरे सुद्धा खुशाल धूर सोडत आधीच प्रदूषित असेलेले शहर अजून प्रदूषित करताना दिसत होते.  रेस्टॉरंट/कॅफेमध्ये दोन झोन (भाग) आहेत असे वाटत होते : धूम्रपान आणि धूम्रपान बंधनकारक!!  नो स्मोकिंग झोन फक्त विमानतळापुरताच मर्यादित होता. अशी मोकळी जागा शोधून सापडत नव्हती जिथे लोक न सिगारेट फुंकता. नुसते उभे राहिले आहेत. असे असूनही मी नाश्त्यासाठी टेरेसवरचे टेबल निवडले. ज्यासाठी एक आगंतुक लोचट मांजर हजर होते. 


टर्किश नाश्ता 


टिपिकल टर्किश नाश्ता म्हणजे टेबलभर ढिगभर पदार्थ येतात; चीज २-३ प्रकारचे, अंडी, टर्किश ब्रेड, खातर आणि डिप्स, हम्मस, क्रीम-मध, काकडी-टोमॅटो ऑलिव्ह. एक-दोन तास निवांत त्या ब्रंचचा आनंद लुटला. अमर्यादित चहा हेसुद्धा या नाश्त्याचे वैशिष्ट्य ! हा चहा मात्र मुळीच आपल्या भारतीय चहा सारखा दिसत नाही. रेड लेबल च्या जाहिरातीमध्ये काचेच्या पात्रात जसा लाल रंगाचं पाणी दिसतं, तसा हा चहा दिसतो. ना दूध ना साखर! चहा म्हणजे फक्त चहा. काळ्या चहापेक्षा बराच कमी कडू लागतो. 

नाश्ता (जेवढा संपेल तेवढा) संपवून कॅफे मधून निघालो आणि वाट फुटेल तिकडे चालत निघालो. दूरवर निळे पाणी दिसत होते. त्या दिशेने गेलो 

इस्तंबूल मधील भुरळ घालणारी निळाई 


काराकोयच्या टर्मिनल स्टेशनपर्यंत मस्त उन्हात चाललो. वाटेत एक मशीद पाहिली, अजान कानावर पडला. निळ्या पाण्याकडे डोळे भरून पाहिले. अपूर्वशी, पंकजशी फोन झाला.


काराकोयपासून ताकसिमला परत येताना हे शहर किती डोंगराळ/उंच-सखल आहे याचा प्रत्यय आला. सुरवातीलाच डाळिंबाचा ज्यूस पिऊन मी तरतरी मिळवली. एखादी टेकडी चढावी तसा चढ आहे कुठल्याही फेरी टर्मिनलपासून ताकसिम चौकात जाण्यासाठी. पण अशा चढणीवरही जागोजागी बाजार आहेत. टपऱ्या आहेत आणि रंगीबेरंगी गोष्टी,  सुकामेवा, खिरापत म्हणून बळजबरीने चव देणारे ठेल्यावरील विक्रेते, चहावाले  होतेच. त्यामुळे मनोरंजनाला कमतरता नव्हती. मजल-मजल करत ताकसिम चौकात आलो. मजला -दर- मजला म्हणावे अशी उंच चढण असलेला रस्ता होता.



टर्किश न्हाव्याकडे हजेरी लावली. दाढी, केस कोरून घेतले, चेहऱ्याला मसाज व फेसपॅक लावला. self care झाल्यावर रिलॅक्स होऊन हॉटेलवर आलो. प्राजक्ता, एल यांच्याशी फोन झाला. थोडी विश्रांती घेऊन  "काबाताश"ला निघालो. तेथून आशियाई बाजूला जाण्यासाठी ‘काडीकोय’ची फेरी घेता येते. मस्त उतरणीचा रस्ता होता त्यामुळे चटकन पोचता आले. फेरी घेण्यापूर्वी तिथेच किनाऱ्यावर / टर्मिनलवर चकरा मारल्या.

काबातास फेरी टर्मिनल 


चकरा मारता मारता श्वेताशी फोन झाला. काडीकोयच्या फेरीवर एक ऐकीव  स्थानिक गोष्ट प्रत्यक्ष बघावयास मिळाला. हावरट सीगल पक्षी संपूर्ण फेरीमध्ये होडीवरच घिरट्या घालत होते / तरंगत होते. स्थानिक लोकांनी त्यांना भरवायला ब्रेड आणले होते. ते निडर निर्ढावलेले पक्षी कधीकधी हातातूनच पावाचे तुकडे उडवत होते / घेऊन उडत होते. एक माणूस मुद्दाम लांब तुकडे फेकत सीगल पक्ष्यांना सूर मारण्यास / हवाई कसरती करण्यास प्रवृत्त करत होता.



अर्ध्या तासात ती फेरी काडीकोयला पोचली. शहराच्या वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी अशा फेऱ्या घेणे तिथल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. फेऱ्यांच्या मार्गाचे जाळे चांगलेच विस्तृत आहे. काडीकोय हा इस्तंबूलचा आशियन भाग आहे. इथे खूप सारी दुकाने असलेले रस्ते आहेत. तुळशीबाग  type feeling आहे, त्या रस्त्यावर टर्किश पदार्थ, कपडे, क्रॉकरी सगळे काही होते. चालत चालत परिमलशी फोनवर बोललो. टर्किश delight जागोजागी दिसत होते. चव म्हणून २-३ प्रकारचे delight खाऊन बघितले पण त्याचे texture फारसे आवडले नाही. ना धड बर्फी ना धड नानकटाई असले काहीतरी कडक जेलीसारखे texture होते.  

भाज्यांप्रमाणे दिसणारी टर्किश मिठाई 



एका बेकरीमध्ये मी ठिय्या दिला. Artichoke in cherry हे खास डेझर्ट वाढदिवसानिमित्त घेतले. बेकरने त्यावर मेणबत्ती लावून दिली. घरी फोन झाला. ऑनलाईन औक्षण झाले. वाढदिवस साजरा झाल्यासारखे वाटले.

आर्टीचोक चेरी केक 


 परतीची फेरी घेऊन "काबाताश"ला आलो. डॉकवर फिरता फिरता सागरशी बोलले. श्वेता-सागर बरोबर हास्यविनोद केले. तेच हसू ओठावर ठेवून ताकसिम चौकापर्यंतचा चढणीचा रस्ता पार केला. टर्किश delight न आवडून सुद्धा वाढदिवस मात्र delightful झाला होता.

हॉटेलवर जाताना कलिंगड  घेऊन गेलो. Watermelon-sugar ने  high न होता झोपलो.


पहिला भाग वाचा इथे : पहिला दिवस

(क्रमशः)


तुर्कीय सहल १. साल, सिगारेट आणि शिशा

तुर्कीय सहल : इस्तंबूल  (११ - १५ जून २०२६)


दिवस पहिला : ११ जून २०२६ 

१. साल, सिगारेट आणि शिशा


यंदाचा वाढदिवस आमस्टरडॅममधे साजरा करायची आजिबात इच्छा नव्हती. याचे मुख्य कारण म्हणजे भर जूनमध्ये पुण्यात पडावा असा मान्सूनसारखा पाऊस ! वर्षातील ९ महिने ढगाळ आणि पावसाळी वातावरण असलेल्या नेदरलँड्स मधे कितीतरी दिवस  "सूर्य उगवतो कधी आणि मावळतो कधी" हे नीटसे कळत नाही.  जून ते ऑगस्ट उन्हाळा चालू असताना सुद्धा पाऊस सुरु झाला तर कहर होतो.  त्याचाच  वैताग येऊन १० जूनला रात्री ठरवलं  की Sun Destination शोधायचं  ! (वर्षासहल च्या उलटी ऊन-सहल अथवा  ग्रीष्म सहल म्हणू शकतो याला) ११ तारखेला दुपारी फ्लाईट होती. ३ तास ४० मिनिटे.


एल निरोप द्यायला प्लॅटफॉर्मपर्यंत आली होती, तर केटीने सिगारेटी (जॉर्जियन क्रिमरोल) पॅक करून दिले. फक्त एक बॅकपॅक घेऊन गेलो होतो. सुरक्षा तपसणीपासून बोर्डिंग वगैरे सगळं वेळेत झालं.


विमान रात्री ९ वाजता इस्तंबूलला पोचलं. 


फ्लाईट मधून दिसणारे विहंगम दृश्य 


इस्तंबूल विमानतळावर तिथलं सार्वजनिक वाहतुकीच कार्ड घेतलं. M4 → B1 → M2 अशा तीन मेट्रो करून ताक्सिम चौकात पोचलो. २ तास लागले. चौकातच मोठ्ठी  मशीद आहे. तिथूनच दोन मिनटांवर माझं हॉटेल होतं. ऑपेरा-हाऊस नावाचं. तेथे मोहम्मद नावाच्या रिसेपनिस्टने अदबीने स्वागत केलं. ६०२ नंबरची खोली उघडून दिली. मोठा बेड, एसी आणि सुसज्ज बाथरूम. फ्रेश होऊन बाहेर पडेपर्यंत मध्यरात्र झाली होती. 


इतकी रात्र  झाल्यावर  खायला-प्यायला काही मिळेल का अशी शंका होती, म्हणून हॉटेल शेजारील चालू दिसणाऱ्या जनरल स्टोअर मधून केळी घेऊन खाल्ली. 

केळ्यांच्या साली टाकण्यासाठी कचरा-पेटीचा शोध मात्र सोपा गेला नाही. चांगलीच  पायपीट करूनही  कचरापेटी शोधताना त्रेधातिरपीट उडाली. जागोजागी न्हावी,  छोट्या कॅफे, फळ विक्रेते दिसतात होते. धूम्रपान चहुकडे जोरात सुरु होते. रस्त्यावर ठिकठिकाणी ash-towers (याला कदाचित राख-दाणी म्हणू शकतो) दिसत होते. कचरापेटी मात्र दिसत नव्हती. अखेर सिगारेट फुकणाऱ्या एका टोळीन रस्त्याच्या कडेला असलेली एक  बांधलेली कचऱ्याची पिशवी सोडून त्यात साल टाकण्याचे सुचवले.साल हातात घेऊन फिरण्यापेक्षा तो उपाय बरा वाटला. 


ताक्सिम  चौकात गेल्यावर संध्याकाळचे ७-८ वाजलेत की काय असे वाटून गेलं. ताकसिम चौकात बऱ्यापैकी वर्दळ होती. भाजलेली कणसे, चेस्टनट्स विकणारे विक्रेते, हातगाडीवर कलिंगड विकणारे, पाण्याच्या बाटल्या, खेळणी, परफ्यूमच्या बाटल्या अशा नानाविध वस्तूंची दुकाने चौकात होती. रात्री साडेबारा वाजता न्हाव्याच्या दुकानात हजामत करून घेण्यासाठी काही टर्किश तरुण आलेले दिसले. काळवेळेचे भान त्यांना नसावे किंवा अमक्या वेळेला तमकी गोष्ट  करू नये असल्या कल्पना फक्त माझ्याच प्रतिगामी डोक्यात होत्या. 

एका झगमगाटी गल्लीत शिशा ठेवलेले हुक्का-बार होते. ते मात्र ठार रिकामे होते. कदाचित मध्यरात्री हजामत आणि  पहाटे हुक्का असा इस्तंबूलच्या तरुणाईचा शिरस्ता  असावा.

हुक्का बार 


(क्रमशः)