पहिला भाग वाचा इथे : पहिला दिवस
दिवस दुसरा : १२ जून
२. टर्किश Delight(ful)
१२ जून म्हणजे अस्मादिकांचा वाढदिवस. सकाळी उठून बघतो तर फोन शुभेच्छांनी भरून गेला होता. काही अपेक्षित तर काही अनपेक्षित (लोकांकडून) शुभेच्छा संदेश आले होते. आवरून, आई-प्रणवने पाठवलेला नवीन लिनेनचा शर्ट घालून, गेल्या वर्षी फ्रान्समध्ये घेतलेली लिनेनची पँट, असे माझेच माझ्यासाठी नटून बाहेर पडलो. ३८ वर्षं होऊनही वाढदिवसाबद्दल अजूनही ८ वर्षांचा असल्यासारखं अप्रूप आहे. अर्थात ८ वर्षांचा होतो तेव्हा स्वतःला वाटेल ते घेता किंवा मागता येत नव्हतं. आणि कुठे एकटं जायची तर सोय नव्हतीच ! असो.
दिवसा-उजेडी ताकसिम चौकात लोकांची अजूनच झुंबड उडालेली होती. मला टर्किश ब्रेकफास्ट देणाऱ्या कॅफेमध्ये जायचं होतं. १५-२० मिनिटांचा वॉक होता. घाई अशी नव्हतीच. शहराचा फील घेत, ऊन खात, बाकीच्यांची लगबग (?) पाहत निवांत चालत होतो.
![]() |
| ताक्सिम मशीद |
दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या; भटक्या मांजरी आणि (अति) धूम्रपान.
ताकसिम चौकाजवळच्या भागात इतक्या मांजरी आहेत की कुठेही उभे राहिलात तरी कुठूनतरी म्यांव आवाज तरी येईल किंवा खुद्द मांजर तरी कुठेतरी दिसेल. पर्यटकांना फसवणारे/फसवू पाहणारे किरकोळ विक्रेते सुद्धा कधी मांजराच्या पावलाने तुमच्या मागे येऊन उभे राहतील, तुम्हाला कळणार पण नाही. मांजर-प्रेमी असाल तर इस्तंबूलमध्ये फारच लवकर रुळाल. मला मांजर या प्राण्याचा मनस्वी तिटकारा असल्यामुळे मी चार हात दूर राहण्याच्या प्रयत्नात होतो. पण वाट अडवून पायरीवर राजासारखे बसलेले असेल तर त्या मांजराला हाकलावे तरी कसे. या शहरात मांजर फक्त आडवेच जात नव्हते, तर उभे-आडवे सगळ्या बाजूंनी जात होते. टर्किश लोकांची कामे न होण्याचे आणि ओघाने (?) देशाची अधोगती होण्याचे मुख्य कारण आर्थिक-राजधानीतील मांजरांचा सुळसुळाट हे असावे. (भारताची आर्थिक राजधानी जशी मुंबई तशी तुर्कीची इस्तंबूल मानली जाते)
![]() |
| भटक्या मांजरी |
दुसरी ठळकपणे जाणवलेली बाब म्हणजे धूम्रपान. इतकी नॉर्मलाईज केली आहे (किंवा इतके सामान्यीकरण केले आहे ) की त्याला स्थळ, काळ, वय कशाचेही बंधन नाही. १०-१२ वर्षाची पोरे सुद्धा खुशाल धूर सोडत आधीच प्रदूषित असेलेले शहर अजून प्रदूषित करताना दिसत होते. रेस्टॉरंट/कॅफेमध्ये दोन झोन (भाग) आहेत असे वाटत होते : धूम्रपान आणि धूम्रपान बंधनकारक!! नो स्मोकिंग झोन फक्त विमानतळापुरताच मर्यादित होता. अशी मोकळी जागा शोधून सापडत नव्हती जिथे लोक न सिगारेट फुंकता. नुसते उभे राहिले आहेत. असे असूनही मी नाश्त्यासाठी टेरेसवरचे टेबल निवडले. ज्यासाठी एक आगंतुक लोचट मांजर हजर होते.
![]() |
| टर्किश नाश्ता |
टिपिकल टर्किश नाश्ता म्हणजे टेबलभर ढिगभर पदार्थ येतात; चीज २-३ प्रकारचे, अंडी, टर्किश ब्रेड, खातर आणि डिप्स, हम्मस, क्रीम-मध, काकडी-टोमॅटो ऑलिव्ह. एक-दोन तास निवांत त्या ब्रंचचा आनंद लुटला. अमर्यादित चहा हेसुद्धा या नाश्त्याचे वैशिष्ट्य ! हा चहा मात्र मुळीच आपल्या भारतीय चहा सारखा दिसत नाही. रेड लेबल च्या जाहिरातीमध्ये काचेच्या पात्रात जसा लाल रंगाचं पाणी दिसतं, तसा हा चहा दिसतो. ना दूध ना साखर! चहा म्हणजे फक्त चहा. काळ्या चहापेक्षा बराच कमी कडू लागतो.
नाश्ता (जेवढा संपेल तेवढा) संपवून कॅफे मधून निघालो आणि वाट फुटेल तिकडे चालत निघालो. दूरवर निळे पाणी दिसत होते. त्या दिशेने गेलो
![]() |
| इस्तंबूल मधील भुरळ घालणारी निळाई |
काराकोयच्या टर्मिनल स्टेशनपर्यंत मस्त उन्हात चाललो. वाटेत एक मशीद पाहिली, अजान कानावर पडला. निळ्या पाण्याकडे डोळे भरून पाहिले. अपूर्वशी, पंकजशी फोन झाला.
काराकोयपासून ताकसिमला परत येताना हे शहर किती डोंगराळ/उंच-सखल आहे याचा प्रत्यय आला. सुरवातीलाच डाळिंबाचा ज्यूस पिऊन मी तरतरी मिळवली. एखादी टेकडी चढावी तसा चढ आहे कुठल्याही फेरी टर्मिनलपासून ताकसिम चौकात जाण्यासाठी. पण अशा चढणीवरही जागोजागी बाजार आहेत. टपऱ्या आहेत आणि रंगीबेरंगी गोष्टी, सुकामेवा, खिरापत म्हणून बळजबरीने चव देणारे ठेल्यावरील विक्रेते, चहावाले होतेच. त्यामुळे मनोरंजनाला कमतरता नव्हती. मजल-मजल करत ताकसिम चौकात आलो. मजला -दर- मजला म्हणावे अशी उंच चढण असलेला रस्ता होता.
टर्किश न्हाव्याकडे हजेरी लावली. दाढी, केस कोरून घेतले, चेहऱ्याला मसाज व फेसपॅक लावला. self care झाल्यावर रिलॅक्स होऊन हॉटेलवर आलो. प्राजक्ता, एल यांच्याशी फोन झाला. थोडी विश्रांती घेऊन "काबाताश"ला निघालो. तेथून आशियाई बाजूला जाण्यासाठी ‘काडीकोय’ची फेरी घेता येते. मस्त उतरणीचा रस्ता होता त्यामुळे चटकन पोचता आले. फेरी घेण्यापूर्वी तिथेच किनाऱ्यावर / टर्मिनलवर चकरा मारल्या.
![]() |
| काबातास फेरी टर्मिनल |
चकरा मारता मारता श्वेताशी फोन झाला. काडीकोयच्या फेरीवर एक ऐकीव स्थानिक गोष्ट प्रत्यक्ष बघावयास मिळाला. हावरट सीगल पक्षी संपूर्ण फेरीमध्ये होडीवरच घिरट्या घालत होते / तरंगत होते. स्थानिक लोकांनी त्यांना भरवायला ब्रेड आणले होते. ते निडर निर्ढावलेले पक्षी कधीकधी हातातूनच पावाचे तुकडे उडवत होते / घेऊन उडत होते. एक माणूस मुद्दाम लांब तुकडे फेकत सीगल पक्ष्यांना सूर मारण्यास / हवाई कसरती करण्यास प्रवृत्त करत होता.
अर्ध्या तासात ती फेरी काडीकोयला पोचली. शहराच्या वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी अशा फेऱ्या घेणे तिथल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. फेऱ्यांच्या मार्गाचे जाळे चांगलेच विस्तृत आहे. काडीकोय हा इस्तंबूलचा आशियन भाग आहे. इथे खूप सारी दुकाने असलेले रस्ते आहेत. तुळशीबाग type feeling आहे, त्या रस्त्यावर टर्किश पदार्थ, कपडे, क्रॉकरी सगळे काही होते. चालत चालत परिमलशी फोनवर बोललो. टर्किश delight जागोजागी दिसत होते. चव म्हणून २-३ प्रकारचे delight खाऊन बघितले पण त्याचे texture फारसे आवडले नाही. ना धड बर्फी ना धड नानकटाई असले काहीतरी कडक जेलीसारखे texture होते.
![]() |
| भाज्यांप्रमाणे दिसणारी टर्किश मिठाई |
एका बेकरीमध्ये मी ठिय्या दिला. Artichoke in cherry हे खास डेझर्ट वाढदिवसानिमित्त घेतले. बेकरने त्यावर मेणबत्ती लावून दिली. घरी फोन झाला. ऑनलाईन औक्षण झाले. वाढदिवस साजरा झाल्यासारखे वाटले.
![]() |
| आर्टीचोक चेरी केक |
परतीची फेरी घेऊन "काबाताश"ला आलो. डॉकवर फिरता फिरता सागरशी बोलले. श्वेता-सागर बरोबर हास्यविनोद केले. तेच हसू ओठावर ठेवून ताकसिम चौकापर्यंतचा चढणीचा रस्ता पार केला. टर्किश delight न आवडून सुद्धा वाढदिवस मात्र delightful झाला होता.
हॉटेलवर जाताना कलिंगड घेऊन गेलो. Watermelon-sugar ने high न होता झोपलो.
पहिला भाग वाचा इथे : पहिला दिवस
(क्रमशः)








Awesome clips Unmesh with description 😉
उत्तर द्याहटवाThank you !
हटवा