दिवस चौथा : १४ जून
४. निळी मशीद आणि काळा इतिहास
रोजच्याप्रमाणे आरामात उठून, आवरून टर्किश नाश्ता करून चालत निघालो. (दोन दिवस झाले असल्यामुळे आता रोजच्याप्रमाणे म्हणायला हरकत नाही) आज पहिला खऱ्या अर्थाने "पर्यटन" दिवस.
निळी मशीद (Blue Mosque) हा पहिला टप्पा होता: एक दीड तासाचा रस्ता होता. मुद्दाम चालत गेलो. ऊन खात खात, शहराचा नवीन भाग बघत बघत. जुन्या वस्तूंची दुकाने, "Vitamin" नावाची फळांची दुकाने हरेक कोपऱ्यावर दिसत होती. डाळिंबाचा ज्यूस असलेला ग्लास हातात घेऊन घुटके घेत घेत आरामशीर पावले टाकत जात होतो. पुन्हा मांजरींचे प्रस्थ जाणवले. जागोजागी त्यांच्यासाठी पाणी आणि इतर सोयी केलेल्या होत्या.
![]() |
| इस्तंबूलमधील एक शांत वळण |
![]() |
| जुन्या वस्तूंचे रस्त्यावर मांडलेले दुकान |
काराकॉयपर्यंतचा रस्ता उताराचा होता. काराकॉय (Karakoy) जवळ मोठा पूल आहे.
हा पूल म्हणजे प्रसिद्ध "गालाता ब्रिज" (Galata Bridge) गोल्डन हॉर्न या निमुळत्या खाडीवरचा, "एमिनोनू" आणि "काराकॉय" या दोन भागांना जोडणारा पूल. पूर्वी काराकॉयला "गालाता" असं नाव होतं, त्यावरूनच पुलाचं नाव पडलं. इथे मासेमारीची परंपरा खूप जुनी आहे. गंमत म्हणजे, सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला सुलतान दुसरा बायझिद याने इथे पूल बांधायचं स्वप्न पाहिलं तेव्हा त्याने चक्क लिओनार्दो दा व्हिंचीला (हो, तोच मोनालिसावाला!) डिझाइनसाठी निमंत्रण दिलं होतं. दा व्हिंचीने एका झोकदार कमानीचा, त्या काळी जगातला सर्वात लांब ठरेल असा पूलही डिझाइन करून दिला, पण सुलतानाने तो मान्य केला नाही आणि कल्पना तब्बल तीनशे वर्षे थंड बस्त्यात गेली! आजचा हा पूल सन १९९४ चा आहे. याआधी इथे अनेक पूल झाले, पहिला कायमस्वरूपी लाकडी पूल तर सन १८४५ चा. इथले मासेमार रोजच्या रोज सिनेकोप (एक प्रकारचा छोटा मासा) आणि पालामुत (बोनिटो मासा) पकडण्यासाठी रांगेत उभे असतात. काहींसाठी हे निव्वळ टाइमपास, तर काहींसाठी रोजच्या उदरभरणाचा मार्ग. त्या पुलावर अनेक मच्छीमार सहकुटुंब आले होते. त्याची गंमत वाटली. कारण ते सहकुटुंब मासेमारी करत होते. वडील गळ टाकून उभे होते, तर मुलगा गळाला लागलेला मासा काढून बॉक्समध्ये ठेवत होता. काही मुले गळावर लावले जाणारे अमिष बदलत होते.
![]() |
| गालाता पूल |
पुलाच्या खालच्या मजल्यावर बाल्क-एकमेक (balık ekmek म्हणजे ग्रिल केलेला मासा घालून केलेलं सँडविच) विकणारी छोटी-छोटी दुकाने/रेस्टॉरंट असतात. ही जवळजवळ दीडशे वर्षे जुनी खाद्यपरंपरा आहे. पण माश्याच्या वासानेसुद्धा मला मळमळायला होतं म्हणून या परंपरेचा मी मनोमन धिक्कार करून तिथून सटकलो.
त्या परिसरातील पादचारी-भुयारी मार्ग वगैरे बरेच अस्वच्छ होते / गर्दी खूप होती, पण तरीही चालताना तिथे रुळल्यासारखे वाटत होते. घरच्यासारखे. माहीत नाही का! कदाचित सहज उपलब्ध असणारे स्ट्रीट फूड आणि फोनवरून करता येणारे पेमेंट आणि अपेक्षेप्रमाणे चालू असलेली सार्वजनिक वाहतूक यांचा एकत्रित परिणाम असेल.
पुलापासून निळ्या मशिदीपर्यंत जाताना पुन्हा चढणीचा रस्ता होता. अर्ध्या पाऊण तासात निळ्या मशिदीपाशी पोचलो. डोळ्यांचे पारणे फिटावे इतकी प्रेक्षणीय वाटली नाही.
![]() |
| निळी मशीद |
अरेबियन नाईट्समधील अल्लाउद्दीनच्या काल्पनिक कथेची आठवण त्या निळसर घुमटांच्या मशिदीने झाली. तिथे भाविक मात्र मोठ्या संख्येने आले होते.
ही निळी मशीद आणि त्याच्या समोर असणारी हाजिया सोफिया यांबद्दल थोडेसे...
निळ्या मशिदीचे खरे नाव "सुलतान अहमद मशीद". लोक तिला सहज "निळी मशीद" म्हणतात, कारण आतल्या भिंतींवर तब्बल वीस हजारांहून अधिक हाताने रंगवलेल्या निळसर टाइल्स लावलेल्या आहेत. ही मशीद बांधणारा "सुलतान अहमद पहिला" हा गादीवर बसला तेव्हा अवघ्या तेराव्या वर्षी होता, आणि मशीद पूर्ण झाल्यानंतर लगेचच, सत्ताविसाव्या वर्षी तो मरण पावला. "हाजिया सोफिया"ला मागे टाकण्याच्या ईर्ष्येनेच त्याने ही भव्य मशीद बांधून घेतली, अशी नोंद आहे. या मशिदीला सहा मिनार आहेत, आणि त्यामागेही एक मजेशीर आख्यायिका सांगितली जाते: सुलतानाने आर्किटेक्टला "सोन्याचे मिनार" (अल्तीन मिनारलर) हवेत असे सांगितले होते, पण आर्किटेक्टला ते "सहा मिनार" (अल्ती मिनारे) असे ऐकू आले! त्या काळी मक्केतील काबाच्या मशिदीलाच फक्त सहा मिनार होते, त्यामुळे ही चूक मोठा वादाचा मुद्दा बनली. अखेर सुलतानानेच मक्केच्या मशिदीला सातवा मिनार बांधून दिला आणि वाद मिट(व)ला!
"हाजिया सोफिया" च्या काही भागाचा जीर्णोद्धार चालू असल्याने फोटो घ्यावेसे वाटले नाहीत .
"हाजिया सोफिया" मुसलमानांसाठी अतिशय महत्त्वाची जागा आहे. सन १४५३ मध्ये ऑटोमन सुलतान मेहमेद दुसरा (फातिह) याने कॉन्स्टँटिनोपल (कॉन्स्टँटिनोपल हे इस्तंबूलचे जुने नाव) जिंकल्यानंतर लगेचच या भव्य बायझंटाइन चर्चचे मशिदीत रूपांतर केले, आणि ती जवळजवळ ४८० वर्षे इस्तंबूलची प्रमुख मशीद राहिली. तब्बल १६१६ साली निळी मशीद बांधली जाईपर्यंत. मुसलमानांमध्ये याबद्दल एक श्रद्धामय आख्यायिकाही सांगितली जाते: "हाजिया सोफियाचा मूळ घुमट कोसळला तो दिवस म्हणे पैगंबर मुहम्मदांच्या जन्माच्या रात्रीच होता आणि नंतर पैगंबरांनी स्वप्नात बायझंटाईन सम्राटाला हे चर्च परत बांधण्याची परवानगी दिली. कारण भविष्यात इथे मुसलमान नमाज पढतील असं सांगितलं जातं!" सन १९३४ साली अतातुर्कांनी (तुर्की लोकांमध्ये अनेक जाती / पंथ आहेत त्यांपैकी एक) हाजिया सोफियाला संग्रहालयाचा दर्जा दिला, आणि जवळजवळ ८५ वर्षांनी, सन २०२० मध्ये ती पुन्हा एकदा अधिकृतपणे मशीद म्हणून घोषित करण्यात आली.
ओटोमन साम्राज्यातील अनेक पिढ्यांची कबर/थडगी हाजिया सोफियाच्या आवारातच आहेत. इथे एकूण पाच सुलतानांची थडगी आहेत: सुलतान सलीम दुसरा (याचे थडगे प्रसिद्ध आर्किटेक्ट मिमार सिनान याने सन १५७७ मध्ये बांधले. हाजिया सोफियाच्या आवारातले हे पहिलेच थडगे), त्याचा मुलगा मुराद तिसरा, आणि नातू मेहमेद तिसरा. या मेहमेद तिसऱ्याची एक भयानक गोष्ट सांगितली जाते: गादीवर बसताक्षणीच त्याने आपल्या एकोणीस भावांना मारून टाकले, आणि नंतर त्या सर्वांना आपल्या वडिलांच्या (मुराद तिसरा) थडग्यातच सन्मानाने पुरण्यात आले! याशिवाय मुस्तफा पहिला आणि इब्राहिम पहिला ज्यांना त्यांच्या अस्थिर कारकिर्दीमुळे "वेडा" अशी उपाधी मिळाली होती त्यांचेही थडगे इथेच, पूर्वी बाप्तिस्म्यासाठी (baptistry) वापरल्या जाणाऱ्या एका जुन्या बायझंटाइन इमारतीत आहे.
सुलतान अहमद खान (१४वा ऑटोमन सुलतान, आणि निळ्या मशिदीचा निर्माता) विशेष म्हणजे, याचे स्वतःचे थडगे मात्र हाजिया सोफियाच्या आवारात नाही, तर त्याने स्वतः बांधलेल्या निळ्या मशिदीच्याच संकुलात, मशिदीच्या उत्तरेला सुलतानाहमेत पार्ककडे तोंड करून आहे. हाजिया सोफियाला मागे टाकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या तरुण सुलतानाचा मृत्यू मशीद पूर्ण झाल्यावर काही महिन्यांतच झाला, आणि गंमत म्हणजे, त्याचे तीन मुलगे उस्मान दुसरा, मुराद चौथा आणि इब्राहिम हे तिघेही नंतर एकेका वळणावर ऑटोमन साम्राज्याच्या गादीवर बसले.
तर हा या निळ्या मशिदीचा आणि हाजिया सोफियाचा काळा इतिहास !
मशिदींना बाहेरूनच नमस्कार(!) करून मी "सुलतान अहमद" चा परिसर फिरायला सुरवात केली. पाण्याकडे ओढ असल्याने पाणी येईपर्यंत (घामाच्या धारा) चालत राहिलो. मशिदीच्या मागील बाजूस समुद्रकिनारा आहे, तेथे दगडांवर सावलीत बसलो. ध्यान लावले. होड्या बघत बसून राहिलो. कंटाळा आल्यावर / भूक लागल्यावर तिथून उठलो. हॉटेलच्या दिशेने निघालो.
![]() |
| इस्तंबूलच्या "उसकुदार" भागाची skyline |
वाटेत टर्किश कार्पेट विकणाऱ्या एका मुलाने अनपेक्षित सलगी करत जवळजवळ ओढतच त्याच्या दुकानात नेले. सुरेख कार्पेट्स होती. fireproof वगैरे — लायटर लावून जाळायचा प्रयत्न वगैरे केला. एवढं प्रात्यक्षिक वगैरे दाखवूनसुद्धा मी हाताएवढंही कार्पेट/रुमाल घेतलं/घेतला नाही. बिचाऱ्याने घेतलेली मेहनत वाया गेली.
![]() |
| पारंपरिक टर्किश रेस्टॉरंट |
"सुलतान अहमद" परिसरातून जी ट्रॅम जाते ती फारच भयानक आहे. ट्रॅमच्या वाटेत कुणीही सहज येऊ शकतं. फूटपाथवरच्या लोकांना सहज (धक्का) मारून जाईल अशी ही ट्रॅम सतत घंटा वाजवत जात होती. ट्रॅमच्या रुळांच्या बाजूबाजूने जाताजाता एका पारंपरिक दिसणाऱ्या टर्किश restaurant पाशी मी थबकलो. तिथे आत जायचा मोह मला आवरता आला नाही. काचेतून दिसत होती एक पारंपरिक टर्किश/अरबी महिला जी पोळ्या लाटत होती. मी जरी त्याला पोळ्या म्हणत असलो तरी ते टर्किश फ्लॅट ब्रेड होते. लोड तक्क्या लावून सजवलेली बैठक व्यवस्था एकदम शाही होती. मी शाशूका, असपानाक, आणि हुमूस मागवलं. पैकी शाशूका म्हणजे चक्क कंटाळा आलेला असताना केलेले वांग्याचे भरीत होते. नीट धड न कुस्करलेली अर्धवट भाजलेली वांगी आणि बोथट चाकूने कशीबशी कापलेली लाल ढब्बू मिरची त्यांना पुरेसे न शिजवताच मसाला लावला होता. "असपानाक" म्हणजे चक्क पालक भरलेली पोळी होती. त्याला "पराठा" म्हणणे हा पराठ्याचा अपमान होईल. कारण नुसती पालकाची पाने होती, कणीक मळताना पालक शिजवून त्यात मीठ मसाल्यांसकट घातला नव्हता. आणि हुमूस हे खरोखरीच चैत्र-गौरीत खाल्ल्या जाणाऱ्या आंबट डाळीची आठवण होईल, इतके आंबट होते. मला सगळं खाणं आवडलं नाही. पण उदरभरण झाले. गरम चहा मात्र मस्त होता. यज्ञकर्म झाल्यासारखे वाटले.
त्या पारंपरिक ठिकाणाहून बाजार बघत बघत "गालाता" पुलावर पोहोचलो. पुलाला समांतर पाण्याच्या जवळ असाही एक पूल होता (खालचा मजला). तिथून जायचे ठरवले. त्याला खालचा पूल म्हणूया. खालच्या पुलावरून observation डेक वरून तिथे ८-१० जण वरच्या मोठ्या पुलाच्या कॉलमचा फोटो काढत होते. मी उत्सुकता म्हणून त्या डेक वर गेलो. दहा लोक वर बघायला लागल्यावर कशी बाकीची लोकं वर बघतात. इथे तर अख्खा फोटो होता. आपल्याकडून काही लँडमार्क मिस होतोय का असे वाटून काही पर्यटकपण फोटो घेत होते. "गंजलेल्या जुन्या पुलाच्या कॉलमचा फोटो", हे काही पटलं नाही. एका tripod वाल्या माणसाला विचारलं तर तो म्हणाला, "आमचा फोटोग्राफीचा कोर्स आहे आणि आम्हाला विशिष्ट lighting मधे असे या जागेचे फोटो काढायला सांगितले आहेत." हे ऐकून सगळ्याचा उलगडा झाला.
![]() |
| फोटोग्राफीचा कोर्स करणारी मंडळी |
रमतगमत हॉटेलवर आलो. उरलेले कलिंगड खाल्ले. आराम केला. जवळच्या टर्किश रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण केले आणि लवकर झोपलो.
(क्रमशः)








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा