कोस्टा रिका सहल : अमेरिकेचे श्रीमंत कोकण !
![]() |
११ ऑगस्ट : सॅन होजे ते ड्रेक बे व्हाया सिएर्पे
सकाळी ७ वाजताच विल्यम मला घ्यायला आला. साडेसात वाजता आम्ही बस स्थानकावर पोचलो. आमची बस साडेआठ वाजता होती, इतक्या लवकर का आलो असे विचारण्यात अर्थ नव्हता. बस लवकर येऊ शकते, आयत्या वेळी बसचा थांबा बदलू शकतो अशी अनेक कारणं होती. मात्र त्यापैकी काहीही झाले नाही. अपेक्षित वेळी, अपेक्षित ठिकाणी बस आली आणि वेळेवर सुटली देखील!
आज खऱ्या अर्थाने सहलीला सुरवात झाली असे म्हणता येईल. ओसा द्वीपकल्प (peninsula) हा आमच्या रडार वर होता. कोस्टा रिकाच्या नैऋत्येला असलेला हा द्वीपकल्प अतिशय निर्जन आणि दुर्गम आहे. जगातील अडीच टक्के जैवविधता (biodiversity) या छोट्याश्या द्वीपकल्पावर आढळून येते.
आमची बस सिएर्पे पर्यंत जाणार होती. सॅन होजे ते सिएर्पे हा रस्ता प्रवास तसा लांबलचक होता (आठ तास), पण मधे ४ थांबे होते. पहिल्या थांब्यावर ग्लासमध्ये फ्रुट सलाड विकत होते. फ्रुट सलाड मधे पेरू आणि पपई यांचा मुबलक वापर होता. दोन्ही माझी आवडती फळे असल्यामुळे फ्रुट सॅलड चा नाश्ता मी एका थांब्यावर करून घेतला. गाडीचा रस्ता डोंगर घाटांचा होता. जुलै- ऑगस्ट हे (इथे सुद्धा) पावसाळी महिने असल्यामुळे चहूबाजूला हिरवाई होती. पुणे मुंबई प्रवासातील घाट रस्ता आणि काही कोकणातले रस्ते पावसाळ्यात जसे दिसतात तसेच हे हिरवी चौकट लावलेले रस्ते आणि डोंगर दिसत होते.
![]() |
| हिरव्या डोंगर-रांगा |
प्रत्येक बस थांब्यावर मी खाली उतरून काय पदार्थ विक्रीला ठेवले आहेत हे पाहत होतो; एका थांब्यावर चक्क खोबऱ्याच्या वड्या आणि इतर खोबऱ्याचे सारण घालून केलेले पदार्थ दिसले. कोकणात जसा नारळ भरपूर वापरला जातो तसेच इथेही असावे.
![]() |
| कोस्टा रिकन खोबऱ्याच्या वड्या |
सिएर्पे गाव आले तेव्हा ४ वाजत आले होते. सिएर्पे हे एक छोटेसे, शांत गाव आहे. इथूनच पुढचा प्रवास बोटीचा होता. बोटीच्या स्थानकाजवळ जाताच एका मगरीने आमचे स्वागत केले. पाण्यात डुलणाऱ्या अनेक बोटींपैकी एका बोटीजवळ तिची टणक पाठ आणि शेपटीचा काही भाग दिसला.
![]() |
| मगर |
आमची बोट साडेचार वाजता होती. बोट स्थानकाजवळ असलेल्या छोट्या उपहारगृहात आम्ही अल्पोपहार करायचा प्रयत्न केला. तो अत्यल्पोपहार ठरला कारण बनवायला त्यांनी वेळ लावला आणि काही घास खाईपर्यंत साडेचार वाजले होते. तळलेले प्लातानोस (म्हणजे हिरवे केळ्यासारखे फळ) दिसताना ते अगदी कच्च्या केळ्यासारखे दिसते पण या फळाला केळं म्हटल्यास स्थानिक लोक नाराज होतात कारण केळे शिजवले जात नाही आणि प्लातानो शिजवले जाते. (सहसा उकडले किंवा तळले जाते) असो, तर हे असे तळलेले प्लातानोस आणि कुस्करलेली राजम्याची उसळ (mashed beans) हे जेवण घाईघाईत खाऊन आम्ही बोटीत बसलो.
सिएर्पे नदीतून बोट निघाली आणि काही वेळातच आम्ही टेराबा-सिएर्पे या मध्य अमेरिकेतल्या सर्वांत मोठ्या खारफुटीच्या (mangrove) जंगलातून जात होतो. नदीचे दोन्ही काठ हिरव्या भिंतीसारखे भासत होते आणि पाणी शांत, तपकिरी रंगाचे. नदीचा प्रवाह/रस्ता हा अतिशय वळणावळणाचा होता आणि तरीही बोटीने चांगलाच वेग पकडला होता. आम्ही सर्वांत पुढे बसलेलो असल्याने फारसे पाणी अंगावर उडले नाही आणि आम्हाला जंगलाचे दृश्य छान बघायला मिळाले. नदीतून समुद्रात शिरल्यावर बोट अधिक हलू लागली, लाटांवर आदळत आदळत ड्रेक बे (Drake Bay) च्या दिशेने निघाली.
![]() |
| बोटीतून ड्रेक बे कडे जाताना |
ड्रेक बे च्या नावाबद्दल एक गंमतीशीर आख्यायिका आहे. सोळाव्या शतकात सर फ्रान्सिस ड्रेक हा इंग्लिश खलाशी (काहींच्या मते शोधक, काहींच्या मते चाचा (pirate)) स्पॅनिश जहाजांवर हल्ले करत या भागात फिरत असे, आणि याच आखाताचा उपयोग तो लपण्यासाठी करत असे असे मानले जाते. काहीजण तर असेही सांगतात की त्याने आपला काही खजिना इथेच कुठेतरी लपवून ठेवला आहे, जो आजतागायत सापडलेला नाही! अर्थात याला ऐतिहासिक पुरावा फारसा नाही, पण अशी दंतकथा असलेल्या खाडीत बोटीने शिरताना रोमांचक वाटत होते.
ड्रेक बे मध्ये उतरल्यावर आमच्या Mariposa Drake या Airbnb मध्ये चेक-इन केले. मारिया नावाची मालकीण प्रेमळ आजीसारखी विचारपूस करत होती. तिचे घर जंगलाच्या अगदी कडेला होते, आणि आमच्या खोलीच्या खिडकीतूनच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. आम्ही सामान ठेवून तुरळक खरेदी करण्यासाठी बाहेर पडलो. पपई आणि केळी यांचे फ्रुट सॅलड खाऊन उद्याच्या मोठ्या दिवसासाठी, म्हणजे कोरकोवादो नॅशनल पार्कच्या जंगल सफारीसाठी, लवकर झोपलो.
२ ऑगस्ट : कोरकोवादो जंगलाची जिवंत गोष्ट
पहाटे उठून बोटीने पुन्हा एकदा बे मधून प्रवास सुरू झाला, यावेळी लक्ष्य होते सिरेना स्टेशन (Sirena Station) कोरकोवादो नॅशनल पार्कच्या मधोमध वसलेले एक रेंजर स्टेशन आणि जंगलाचे प्रवेशद्वार. जसे ताडोबा जंगलाला अनेक गेट्स आहेत तसेच या नॅशनल पार्कला अनेक प्रवेश आहेत आणि सिरेना हे आम्ही निवडले होते कारण येथून जास्तीत जास्त प्राणी-पक्षी दिसू शकतात. "Sirena" म्हणजे स्पॅनिशमध्ये "सायरन किंवा जलपरी", जी आपल्याला/खलाशांना भुलवून नेते अशी दंतकथा आहे.
कोरकोवादो हे कोस्टा रिकाचे सर्वांत मोठे राष्ट्रीय उद्यान. २४ ऑक्टोबर १९७५ रोजी हे उद्यान स्थापन झाले, आणि अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावरचे सर्वांत मोठे प्राथमिक (primary) जंगल इथेच टिकून आहे. नॅशनल जिओग्राफिकने या जागेला "पृथ्वीवरचे जैविकदृष्ट्या सर्वांत दाट/तीव्र (most biologically intense) ठिकाण" असे म्हटले आहे. जगातल्या एकूण जैवविविधतेच्या अडीच ते पाच टक्के भाग या इवल्याशा जंगलात सामावलेला आहे. कोस्टा रिकातली सगळी चार प्रकारची माकडे इथे एकाच जंगलात सापडतात, ही तशी दुर्मिळ गोष्ट.
बोटीतून उतरून सिरेना स्टेशनच्या रस्त्याने जंगलात शिरलो आणि जंगल हळूहळू आपली गोष्ट सांगू लागले. आमचा ग्रुप ८ जणांचा होता आणि फ्रेरियन नावाचा स्थानिक आमचा वाटाड्या (गाईड) होता.
![]() |
| राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार |
जंगलात चालायला सुरवात करताच सगळ्यात आधी दिसला तो ग्रेट कुरासाओ (Great Curassow): जमिनीवर चालणारा, काळ्याभोर पिसाऱ्याचा आणि टर्कीसारखा दिसणारा मोठा पक्षी, पण अगदी दिमाखात, कोणाची पर्वा न करता चालत होता. जरा पुढे गेल्यावर एका झाडावरून "टक्-टक्-टक्" असा ठोकल्यासारखा आवाज ऐकू आला. एक सुतार-पक्षी झाडाच्या खोडावर आपले काम करत होता. त्याचा तो आवाज ऐकताना असे वाटले की जणू तो जंगलाचे दार ठोठावत आहे आणि जंगलाला आम्ही आल्याची वर्दी देतो आहे "प्राण्यांनो, काही माणसं येत आहेत, सावध !"
थोडे पुढे गेल्यावर पाण्याच्या काठावर एक ग्रीन हेरॉन (green heron) शांतपणे शिकारीची वाट बघत उभा दिसला. निदान आम्हाला तरी तोच पक्षी वाटला. दुसऱ्या ग्रुपच्या गाईड ने आपल्या तीक्ष्ण नजरेने (eagle-eyes) ने झाडावर साधना करत असेलला एक सरडा हेरला. त्याचा रंग जंगलाशी इतका मिळताजुळता होता की टेलिस्कोप ने पाहीपर्यंत तो तसा बसलेला लक्षातही आला नाही.
![]() |
| कुंपणाच्या कितीतरी पलीकडे धाव घेतलेला सरडा ! |
मग दिसला एक कोळी : मोठ्ठा, पायांवर चट्टेपट्टे असलेला, त्याच्या जाळ्यात जागच्या जागी स्तब्ध बसलेला. त्याच्याकडे बघून सगळ्यांनीच जरा अंतर राखून फोटो काढला!
या जंगलीपणाला न साजेशी एक मानवीय गोष्ट बघायला मिळाली : एक जुने अपघात ग्रस्त विमान! अनेक वर्षांपूर्वी या जंगलात दोन वैमानिक अपघाताने मरण पावले होते त्या विमानांचे अवशेष अजूनही जंगलात (जतन करून ठेवले) आहेत. इतक्या सुंदर झकास जंगलात ते अर्धेमुर्धे विमान कसेसेच दिसत होते.
![]() |
| जंगलाच्या हिरवाईत मिसळून गेलेले विमानाचे अवशेष |
त्या विमानाच्या आडोशाला किंमत न देता एका सुरेख पक्षाने आपले रेखीव घरटे बांधायला काढले होते. त्याचे काड्या गोळा करताना निरीक्षण केले. या पक्षाचे नाव आठवत नाहीये पण फोटो बघून काही पक्षी निरीक्षक नक्की सांगू शकतील इतका स्पष्ट त्याचा फोटो मिळाला आहे :
![]() |
| काडीची अक्कल असलेला पक्षी |
जंगलातला सगळ्यात मोठा धडा मिळाला तो फायर अँट्स (fire ants) कडून. गाईडने वाटेतल्या एका काटेरी झाडाकडे बोट दाखवले . एक अकेशिया (acacia) जातीचे झाड, ज्याच्या फुगीर काट्यांमध्ये फायर अँट्सची पूर्ण वसाहत राहते. या मुंग्या झाडाला कोणत्याही किडीपासून, अगदी मोठ्या शाकाहारी प्राण्यांपासूनसुद्धा जिवापाड जपतात, आणि त्या बदल्यात झाड त्यांना राहायला पोकळ काटे आणि खायला गोड रस पुरवते. निसर्गातलं हे परस्परसहकार्य (symbiosis) बघून खरंच थक्क व्हायला झाले. मुंगी झाडाचे रक्षण करते आणि झाड मुंगीचे पोषण करते. एकही पान न कापता झाड जिवंत राहते, कारण त्याचे सैनिक चोवीस तास पहारा देत असतात.
![]() |
| अकेशिया आणि सैनिक मुंगी |
या जंगलात फिरणारे गाईड सुद्धा परस्पर सहकार्य करीत होते. एका गाईडला उंचीवरच्या फांद्यांमधून हालचाल जाणवली आणि त्याने सगळ्यांचे लक्ष वेधले: कोळी -माकडे (spider monkeys) आणि खार -माकडे (squirrel monkeys) यांचा एक घोळका या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत चालला होता. स्पायडर मंकीची लांब शेपटी जणू पाचवा हातच वाटत होती, या कोळी माकडांचे हात आणि पाय कायम लांब पसरलेले असतात त्यावरून त्यांना हे नाव मिळाले आहे. तर स्क्विरल मंकी आकाराने खारी एवढे असतात पण खारींप्रमाणे चपळ सुद्धा! एक कोळी-माकड फलाहार करताना बघायला मिळाले.
ते पाहून आम्हाला भूक लागली नसती तरच नवल होते. सुदैवाने जेवणाची वेळ आणि जागा जवळ आली होती, सिरेना स्थानकाचा मुख्य हॉल जंगलात जरासा दूरवर बांधलेला आहे आणि तिथे जेवणाची उत्तम सोय केली होती. भात, काळ्या वाटाण्याची उसळ आणि तळलेले प्लातानितो ! जोडीला मस्त रसरशीत फ्रूट ज्यूस!
अंगात पुन्हा त्राण आले. जेवणानंतर जंगल सफारीचा दुसरा टप्पा सुरु झाला: एका झाडाच्या शेंड्यावर एक ससाणा बसेलला दिसला. गाईडने पुढे एका नदीकडे नेले, त्या नदीच्या पात्रात एक छोटे बेट आहे जिथे तापीर (tapir) लपून बसतात, बुजरा आणि रात्री सक्रिय असणारा हा प्राणी दिवसा सहसा असाच लपून राहतो, त्यामुळे प्रत्यक्ष तापीर दिसला नाही, पण त्याची "घरं" बघायला मिळाली. पुढे जंगलातून एक जोरदार, खोल आवाज घुमला! तो हाऊलर मंकी (howler monkey) चा.
![]() |
| कर्कश्श (ओरडणारे) माकड |
यांना मराठीत किंचळणारी माकडे म्हणावेसे वाटत होते पण सगळ्याच माकडांचे ओरडणे हे शेवटी किंचाळी सारखे असते. पण या माकडाचा आवाज इतका मोठा असतो की जंगलातल्या सगळ्या प्राण्यांच्या आवाजांत सहज ओळखू येतो, आणि तो ऐकून अंगावर काटा आला. कर्कश्श माकडे हा शब्द कदाचित या माकडांसाठी चपखल बसेल.
परतीच्या वाटेत अचानक घाईघाईने जाणारा एक घोळका दिसला. पेकरींची (peccaries) एक गँग! जंगली डुकरांसारखे दिसणारे हे प्राणी कळपाने कुठेतरी चालले होते आणि आपापसात सतत काहीतरी "गुरगुर" बोलत होते. येथील जंगलात आढळणाऱ्या बिबट्याचे हे आवडते अन्न आहे असे कळले, सुदैवाने एकही बिबट्या त्यावेळी भुकेला नव्हता नाहीतर पायी चालत असणाऱ्या आमची अवस्था डुकरांपेक्षा बेहत्तर झाली असती.
आणखी एक सरडा वाटेत भेटला जो अगदी वाळलेल्या पानासारखा दिसत होता , आणि शेवटी, अगदी समुद्र किनाऱ्याजवळ एका उंच झाडाच्या ढोलीत एक स्लॉथ (sloth) संथपणे लटकलेला दिसला. इतका शांत आणि निवांत, की जणू वेळच त्याच्यासाठी थांबलेला होता. या एका स्लॉथने दिवसाचा शेवट अगदी परिपूर्ण केला.
![]() |
| स्लॉथ (एक सुस्त झाडावर राहणारा प्राणी) |
इतके सगळे प्राणी, इतके सगळे आवाज, इतकी सगळी झाडे-वेली एकाच दिवसात बघून जंगलातून बाहेर पडताना पाय दमले होते पण मन पूर्ण भरून गेले होते.
Airbnb वर परत येऊन थोडी विश्रांती घेतली. संध्याकाळी जवळच्याच एका व्ह्यू असलेल्या रेस्टॉरंटपर्यंत एक छोटासा हाईक केला, वाटेत पहिला झुलता पूल (hanging bridge) लागला, तो हलत हलत ओलांडताना मजा आली.
![]() |
| झुलता पूल (पहिला) |
रेस्टॉरंटमध्ये बसून गप्पा मारता मारता विषय अल्कोहोलच्या दुष्परिणामांवर वळला आणि गंमत म्हणजे हे बोलणे चालू असतानाच हातात ग्लास होताच! त्या विरोधाभासावर खूप हसायला आले.
![]() |
| माहोल |
जेवण झाल्यावर अंधारातून परत चालायला निघालो, आणि रस्ता जरा चुकला. पाऊसही सुरु झाला. काही मिनिटे नक्की कुठे जायचे तेच कळेना. त्यात वाटेत भटक्या कुत्र्यांची एक टोळी आडवी आली, ते बघून जरा जीव धस्स झाला, पण सुदैवाने कुत्री शांत निघाली आणि आम्ही सुखरूप Airbnb वर पोहोचलो.
३ ऑगस्ट : शेंदरी पोपट बीचवर "कोकालितो"
तिसऱ्या दिवशीची सकाळ अगदी निवांत उजाडली. जवळच्याच एका छोट्या बेकरीत (panadería) गेलो. नाश्त्याला पपईचा मिल्कशेक घेतला. ताज्या पपईचा गोडवा आणि थंडगार मिल्कशेकचा घोट, यापेक्षा उत्तम सुरुवात असूच शकत नव्हती. नाश्ता झाल्यावर ड्रेक बे बीचवर गेलो. एका उंच तिरक्या माडाच्या झाडाखाली लांबलचक फोटोशूट झाले.
![]() |
| माडाच्या झाडाखाली |
माडाशी केलेली सलगी थोडी अंगाशी आली: (माडावर) योगासने करत असताना केला एकदा तोल जाऊन पडलो आणि गुडघ्याला थोडे खरचटले. पण तरीही फोटो चांगले आल्यामुळे सांडलेले रक्त वाया गेले नाही (!!)
त्यानंतर निघालो कोकालितो बीचच्या (Playa Cocalito) हाईकसाठी. वाटेत जंगल आणि समुद्रकिनारा असे दोन्ही सृष्टीसौंदर्य एकत्र अनुभवायला मिळत होते. ट्रेकची वाट चांगलीच चढणीची आणि बीच जवळ आल्यावर उतरणीची होती, वाटेत एक सुंदर झुलता पूल आणि त्याखालील हिरवे-निळे पाणी बघून गुडघ्याला लागले आहे हे मी पार विसरून गेलो.
![]() |
| झुलता पूल (दुसरा) |
कोकालितो बीच अतिशय शांत आणि स्वच्छ होता. ३-४ लोकं आणि ५-१० बदामाची झाडे, बस्स! आणि समोर समुद्र ! समुद्राचे पाणी बऱ्यापैकी कोमट होते, थंड नव्हते; पण लाटा मात्र जोरदार (wild sea) होत्या . नुसते गाफील उभे राहिलेल्या माणसाला ढकलून द्यायच्या. किनाऱ्यावर बसून पुस्तक वाचत, आलटून पालटून पोहत आम्ही मस्त वेळ घालवला.
अचानक पक्ष्याचा ओरडण्याचा आवाज आला, अगदी जवळून शेंदरी रंगाचे भलेमोठे पोपट (scarlet macaws) उडताना दिसले ; एकपत्नीत्व (monogamy) पाळणारे हे पोपट कायम जोडीने उडतात. ते पोपट इतके जवळून गेले की त्यांच्या पंखांचे रंग अगदी स्पष्ट दिसत होते. शेंदरी-लाल पिसे अंगभर, छातीपाशी निळ्या-पिवळ्या रंगांचा टाय घातल्यासारखे हे रुबाबदार पोपट बघून पूर्ण दिवसाचा शीण कुठल्याकुठे पळून गेला.
दुपार टळून गेली होती आणि पोहणे आणि रेतीमध्ये किल्ला करणे रंगात आले होते. किल्ल्याला बाजूने मोट बनवून लाटांपासून तो वाचवायचा आम्ही प्रयत्न केला मात्र भरती सुरु होत होती आणि पाचव्या लाटेने आमचा किल्ला गिळंकृत केला. आम्ही त्याच लाटेवर स्वार होऊन कोलंबसाच्या जिद्दीने समुद्राला जाब विचारायला गेलो. पण त्याने आम्हाला बिनधास्त दुसऱ्या लाटेवर ढकलून दिले :) भरतीबरोबरच आकाशात ढगांची भरती सुरु झाली आणि पाऊस सुरु झाला. उष्ण हवामान, पाऊस आणि बीच ! काय माहोल होता , जगात कुठलाच असा कॅमेरा नसेल ज्यात तो माहोल आणि ती vibe कैद होऊ शकली असती.
पाऊस जरा कमी झाल्यावर आम्ही परत आलो. संध्याकाळी Airbnb च्याच जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवण ऑर्डर केले आणि AirBnb मधील किचन मध्ये घेऊन आलो. त्या किचन मधील खुर्च्या जणू काही वर्क आउट साठी बनवलेल्या होत्या इतक्या त्या जड होत्या! जेवत असताना एक लोचट मांजर उच्छाद आणत होते. त्याचा वैताग येऊन मी आमच्या खोलीत येऊन जेवण संपवले. विल्यम मार्जार-कुळाचा चाहता असल्यामुळे कदाचित त्याने मांजराला त्याचे अर्धे जेवण दिले असावे, असा मजेशीर विचार मला चाटून गेला.
हे माणूस आणि मांजरीमधले परस्पर-सहकार्य (symbiosis) कधी सुरु झाले असेल कुणास ठाऊक, तसे आमचे ड्रेक बे मधील दिवस परस्पर सहकार्याचेच होते , एकमेकांकडून शिकणे, निसर्गाकडून शिकणे... जंगलाकडून शिकणे! खरेच आहे. एका छोट्याशा काटेरी झाडावरच्या मुंग्यांपासून ते उंच झाडावर संथ लटकलेल्या स्लॉथपर्यंत कोरकोवादो जंगलाने प्रत्येक क्षणी हेच दाखवून दिले की इथे प्रत्येक जीव एकमेकांशी कुठल्या ना कुठल्या धाग्याने जोडलेला आहे.
(क्रमशः)
















कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा