कोस्टा रिका सहल : अमेरिकेचे श्रीमंत कोकण !
![]() |
| मंतरलेला दिवस |
मंगळवार, १८ ऑगस्ट : कॉफीच्या मळ्यातला बुद्ध आणि मागणारा हात
आजचा दिवस विल्यमबरोबरचा शेवटचा दिवस. सांता आनाला जाणारी बस पकडायला चालतच निघालो. वाटेत "पासेओ कोलोन" या रस्त्यावर एक शिल्प दिसले आणि मी थांबलोच.
ब्राँझमधले, वाऱ्यावर उडणाऱ्या केसांचे आणि कपड्यांचे एक स्त्री-शिल्प. नाव : "Al Viento", म्हणजे "वाऱ्यावर". कोस्टा रिकन शिल्पकार मानुएल वार्गास यांची ही कलाकृती. शिल्पकाराच्या म्हणण्यानुसार हे या देशातल्या स्त्रियांना वाहिलेले अभिवादन आहे; ज्यांचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले असतात आणि ज्यांना आयुष्याच्या वादळांना कसे तोंड द्यायचे हे नेमके ठाऊक असते. पश्चिमेकडून राजधानीच्या मध्यभागात शिरणाऱ्या प्रत्येकाचे हे शिल्प स्वागत करते. ते बघून वाटले : वारा अंगावर घेणे आणि वाऱ्यावर उडून जाणे यात जो फरक आहे, तोच पाय जमिनीवर असण्यात आणि नसण्यात आहे. एका शहराच्या वेशीवर याहून चांगले स्वागत काय असावे!!
![]() |
| "Al Viento", मानुएल वार्गास यांचे शिल्प, फोटो क्रेडिट गुगल |
आमच्या बसला भरपूर ट्रॅफिक लागले. सांता आनापासून पुढे उबर केली आणि "मंत्रा ट्रेल"पर्यंत पोचलो. विल्यमने आदल्याच दिवशी आमची एन्ट्री बुक करून ठेवली होती. तिथे फॉर्मवर सह्या करून, "जे काही होईल ते आमच्याच जबाबदारीवर" असे लेखी कबूल करून आम्ही ट्रेक सुरू केला. या कागदावर सही करताना नेहमी एक विचित्र भावना होते : आपण आपल्याच आयुष्याची जबाबदारी घ्यायला एका संस्थेची परवानगी घेत असतो (खरं तर त्यांना सगळ्या जबाबदारीतून मुक्त करत असतो)
हासिएंदा ला चिंबा नावाच्या एका चालू कॉफी-मळ्यातून ही पाच / नऊ किलोमीटरची पायवाट जाते. "ला चिंबा" हा कोस्टा रिकन बोलीभाषेतला शब्द; अर्थ साधारण "एक नंबर" किंवा "झकास". म्हणजे या मळ्याचे नाव मराठीत "झकासवाडी" असे काहीतरी होईल.
![]() |
| कॉफीच्या मळ्याचे प्रवेशद्वार |
आम्ही ५ किमी चा ट्रेक निवडला होता. वाट बऱ्यापैकी दमवणारी होती. चढ, वळणे आणि उन्हातान्हातून जाणारे टप्पे. दोन्ही बाजूंना भरपूर कॉफीची झाडे आणि मधूनमधून आंब्याची झाडे.
![]() |
| कॉफी चे झाड आणि फळे |
आणि इथे कॉफीबद्दल थोडे सांगायलाच हवे, कारण या देशाचा अख्खा आधुनिक इतिहास याच झुडपाभोवती फिरतो. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला कॉफी इथे आली आणि तिने कोस्टा रिकाला "ग्रानो दे ओरो", म्हणजे सोन्याचा दाणा, दिला. १८४३ साली पहिली मोठी खेप लंडनला गेली आणि युरोपला या इवल्याशा देशाचा पत्ता मिळाला. गंमत अशी की मध्य अमेरिकेतल्या इतर देशांप्रमाणे इथे प्रचंड मोठ्या जमीनदारांच्या हातात सगळे केंद्रित झाले नाही; बरीच कॉफी लहान-लहान शेतकऱ्यांच्या शेतांतून आली. काही इतिहासकार म्हणतात की कोस्टा रिकाची तुलनेने स्थिर लोकशाही आणि तिचा सौम्य स्वभाव यामागे या "छोट्या शेतकऱ्यांच्या कॉफी"चा मोठा वाटा आहे. आपल्याकडे "सहकार चळवळ" या शब्दाला जो अर्थ आहे, तसाच काहीसा.
वाटेत एक बैलगाडीचे शिल्प लागले आणि तिथे तर मी अगदी एखाद्या महाराष्ट्राच्या खेड्यात आहे असे वाटून गेले.
![]() |
| बैलगाडी (शिल्प) |
कोस्टा रिकन बैलगाडी, म्हणजे "कारेता", हे या देशाचे राष्ट्रीय प्रतीक आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर, जेव्हा रस्ते नव्हते आणि रेल्वे नव्हती, तेव्हा मध्यवर्ती खोऱ्यातली कॉफी डोंगर ओलांडून पॅसिफिक किनाऱ्यावरच्या पुंतारेनास बंदरापर्यंत न्यायला दहा ते पंधरा दिवस लागत, आणि ते काम या बैलगाड्या करत. त्यांची चाके मुद्दाम आऱ्यांशिवाय (spokeless) बनवली जात, ॲझटेक चकतीचे आणि स्पॅनिश चाकाचे मिश्रण, जेणेकरून ही चाके चिखलात रुतू नयेत.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला "सार्ची" गावात कुणा "जोआकीन चावेरीने" आपली गाडी रंगवली, म्हणे त्याच्याकडे फक्त केशरी रंग होता म्हणून, आणि पुढे ही रंगरंगोटी इतकी वाढत गेली की गाडीचा रंग हा कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विषय झाला. आजही एक गाडी बांधायला सुमारे शंभर तास आणि रंगवायला सव्वाशे तास लागतात. १९८८ साली सरकारने तिला "राष्ट्रीय श्रम-प्रतीक" घोषित केले आणि २००५ साली युनेस्कोने तिला अमूर्त सांस्कृतिक वारशाचा दर्जा दिला. आपल्याकडे बैलपोळा असतो तसा बहुतेक हा बैलगाडी-पोळा आहे ज्यात गाडीला रंगवण्याचे विशेष महत्व आहे !
म्हणजे : ज्या गाडीने देशाची कॉफी वाहून नेली, तिचा उपयोग संपल्यावर तिला रंगवून संग्रहालयात ठेवण्यात आले. आपल्याकडे बैलगाडी अजून शेतात आहे; इथे ती संस्कृतीत आहे. आणि गंमत म्हणजे नोव्हेंबरात "पासेओ कोलोन"वरून, ज्या रस्त्यावर सकाळी मी "Al Viento" हे शिल्प बघितले होते, तिथून बैलगाड्यांची मोठी मिरवणूक निघते.
![]() |
| सांता आना ची डोंगररांग |
पुढे लागली बुद्धाची मूर्ती. या ट्रेलवरचे सर्वांत मोठे शिल्प, आणि पार्श्वभूमीला सांता आनाचे डोंगर. मध्य अमेरिकेतल्या एका कॅथलिक देशात, कॉफीच्या मळ्यात, ध्यानस्थ बुद्ध बघणे हा अनुभव अनपेक्षित होता. (कोस्टा रिकात ख्रिश्चनेतर धर्मांमध्ये बौद्ध अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे असे नंतर वाचले.) झाडांच्या गडबडीत हा एकच जीव पूर्ण स्थिर होता.
![]() |
| कॉफीच्या मळ्यात राहूनही overstimulate ना झालेला बुद्ध |
आणि त्यानंतर १ किलोमीटर पुढे आला तो अनेक फोटोंतून पाहिलेला हात.
"ला मानो देल मंत्रा", म्हणजे मंत्राचा हात. डोंगरमाथ्यावर उभारलेला हा प्रचंड हात कॉफीच्या झाडांच्या फांद्या-काटक्यांपासून बनवलेला आहे. समोर सांता आनाचे डोंगर आणि खाली पसरलेले सॅन होजेचे खोरे.
पहिल्या नजरेत मला वाटले की हा हात काहीतरी मागतो आहे : निसर्गाकडून, नियतीकडून, कुणाकडून तरी. तळहात उघडा, बोटे किंचित वळलेली, आकाशाकडे रोखलेली. याचना करणारा हात.
![]() |
| मंतरलेला हात |
पण मग लक्षात आले की या हातात लोक जाऊन उभे राहतात. म्हणजे तो मागत नाहीये, तो "धरून आहे". आणि जर तो कॉफीच्या फांद्यांपासून बनवला असेल, तर तो या देशाच्याच मातीचा हात आहे, ज्याने दोनशे वर्षे कॉफी दिली, ज्याने जंगले टिकवली आणि ज्याने माझ्यासारख्या भटक्याला तीन आठवडे सांभाळून घेतले.
एकच शिल्प, दोन अर्थ. मागणारा हात की देणारा हात, हे बहुधा बघणाऱ्याच्या मनःस्थितीवर अवलंबून आहे. आणि माझ्या मनःस्थितीचा त्या क्षणी निकाल लागला होता : हा भरभरून देणारा हात आहे.
सॅन होजेला परत आल्यावर एका फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये fried rice खायला गेलो. तीन आठवडे भात-बीन्स-प्लातानो खाल्ल्यावर fried rice ही चैन वाटत होती. जेवण झाल्यावर विल्यमला निरोप दिला : जड मनाने आणि त्याहून जड पोटाने.
![]() |
| fried rice |
पाच वर्षे "कधीतरी येईन" म्हणून टाळाटाळ केलेल्या मित्राला भेटायला आलो होतो, आणि आता निघताना वाटत होते की पाच वर्षे फार उशीर झाला. वाटेत आमचे मतभेद झाले, विसंवाद झाले, केपोसमध्ये एक रुसवा झाला आणि तो मोकळेपणाने सोडवलाही गेला. मैत्री फुलते ती याच गोष्टींमुळे!
बुधवार, १९ ऑगस्ट : शेवटचे पोहणे, एक स्वीडिश स्वप्न आणि परतीचे विमान
आठ वाजता उठलो आणि हॉस्टेल मधील स्विमिंग पूलमध्ये कोस्टा रिकातले शेवटचे पोहून घेतले. तीन आठवड्यांत ज्या ज्या पाण्यात उडी मारता आली त्या सगळ्यांची उजळणी त्या एका पूलमध्ये झाली : उविताचा धबधबा, केपोसचा infinity pool, ला वाका बीच, रिओ सेलेस्तेची निळी नदी, चोयीनचे उकळते झरे. जलदेवी नमो नमः, शेवटचा नमस्कार.
![]() |
| हॉस्टेलमधील पूल |
चेक-आऊट करून कॉमन एरिया मध्ये पुस्तक वाचत बसलो. फ्लाईट संध्याकाळी सातची होती, पण "तीन-चार तास आधी जा, ट्रॅफिक असते" असे सगळ्यांनीच बजावल्यामुळे मी दोन वाजताच उबर केली.
बरोबर हॉस्टेलमधला स्वीडिश मित्र हॅम्पस होता. गंमत अशी की तो स्वीडनला यथेच्छ शिव्या देत होता आणि अमेरिकेत, साउथ कॅरोलायनाला, शिफ्ट झाला होता. त्याचा व्यवसाय, त्याचे "अमेरिकन ड्रीम" आणि स्वीडनला त्याच्या मते लागलेली उतरती कळा, हे सगळे त्याच्या तोंडून ऐकणे रंजक होते. त्याच्या मते तिथे सांस्कृतिक बदल फार वेगाने झाला आहे; निर्वासितांना मिळणाऱ्या सुविधा, स्थानिकांवरचा कराचा बोजा आणि व्यवसायातले अडथळे, या तिन्हींना कंटाळून त्याने देश सोडला.
मी मुख्यतः ऐकत होतो. नेदरलँड्समध्ये राहणाऱ्या माणसाला हे मुद्दे नवीन नाहीत; तिथेही अगदी हेच वाद, हेच शब्द आणि हेच आवाज ऐकू येतात, फक्त भाषा डच असते. यावर माझे स्वतःचे मत काय, हा वेगळ्या ब्लॉगचा विषय आहे. पण एक निरीक्षण नोंदवण्यासारखे आहे : कोस्टा रिकाच्या विमानतळाकडे जाताना एक स्वीडिश माणूस अमेरिकेत स्थलांतर का करतोय हे मला समजावून सांगत होता, आणि त्याच रस्त्यावर निकाराग्वाहून आलेले मजूर काम करत होते. "स्थलांतर" हा शब्द कोणाच्या तोंडी आहे यावर त्याचा अर्थ किती बदलतो, हे त्या दहा मिनिटांत नीट कळले.
विमानतळावर बसल्या बसल्या तीन आठवड्यांची उजळणी सुरू झाली.
समारोप : अमेरिकेचे श्रीमंत कोकण
३० जुलै ते १९ ऑगस्ट. तीन आठवडे. एक देश. मागे वळून बघताना ती एक सलग गोष्ट वाटते.
सॅन होजेपासून सुरुवात झाली. विमानतळावरची दोन तासांची वाट (पाहणे), चिली-ग्वारोचे झिणझिण्या आणणारे शॉट्स आणि "मेर्कादो सेंट्रल" नावाचा तो तुळशीबागेसारखा चक्रव्यूह. तिथे मला कोस्टा रिकाची पहिली ओळख एका छोट्याशा कापडी कॉफी-गाळण्यात सापडली.
मग ड्रेक बे आणि कोरकोवादो : जगातल्या तीन टक्के जैवविविधतेने भरलेला तो द्वीपकल्प. तिथे अकेशियाचे झाड आणि मुंग्या यांच्यातले परस्परसहकार्य बघून जे शिकलो, ते या अख्ख्या ट्रिपचे सूत्र ठरले : इथे प्रत्येक जीव कुठल्या ना कुठल्या धाग्याने दुसऱ्याशी बांधलेला आहे.
मग उविता आणि केपोस : देवमाशाची शेपटी, झिपलाईनवरून केलेले उड्डाण, फोडलेल्या नारळाचे पाणी आणि रात्री रंगलेली वसाहतवादावरची चर्चा. तिथे "पुरा विदा" हा शब्द नुसता ऐकला नाही, वापरायलाही शिकलो.
मग ला फोर्तुना : न दिसलेला ज्वालामुखी, पाण्याखाली गाडलेली दोन गावे आणि जो रंग प्रत्यक्षात "नाहीच" अशी नदी. तिथे कळले की आपण जे बघायला जातो ते नेहमीच मिळत नाही, पण त्याऐवजी जे मिळते ते जास्त टिकाऊ असते.
मग मोंतेवेर्दे : युद्धाला नकार दिलेल्या काही कुटुंबांनी वसवलेले गाव, ढगांतून पाणी पिणारे जंगल आणि एक नामशेष झालेला केशरी बेडूक. तिथे कळले की काही ठिकाणे फक्त कुणाच्या तरी ठाम "नाही"मुळे टिकून राहिली आहेत.
आणि शेवटी पुन्हा सॅन होजे : तेच हॉस्टेल, तीच रिसेप्शन, तेच चेहरे. फक्त आता ते "अरे, तू परत आलास!" म्हणत होते. वर्तुळ पूर्ण झाले.
कोस्टा रिका मला अगदी पश्चिम भारतासारखा. वाटला आणि त्यातही विशेषतः कोकणासारखा.
विषुववृत्तीय दमट हवामान, अफाट प्राणी-पक्षी संपदा, हातावर पोट असणारी कष्टकरी गावाकडची माणसे, होम-स्टेमधले आपुलकीचे वातावरण, नारळाचे पदार्थ, ताजी फळे, ताज्या भाज्या, सर्वत्र हिरवाई. पण त्याचबरोबर : परदेशी माणूस दिसला की दर वाढवण्याची वृत्ती, वेळेवर कामे न होण्याची सवय आणि तो निवांत "सुशेगाद"पणा. खरे तर "सुशेगाद" या शब्दाला "पुरा विदा" हे चपखल भाषांतर आहे. (हा वाक्प्रचार इथे लोकप्रिय झाला तो १९५६ सालच्या एका मेक्सिकन सिनेमामुळे, असे म्हणतात. सिनेमा फार चालला नाही, पण त्यातला हा शब्द अख्ख्या देशाची ओळख बनून बसला.)
आणखी काही तपशील या देशाबाबत नोंदवण्यासारखे :
- सायकलचा वापर जवळजवळ नाही. नेदरलँड्समधून येणाऱ्या माणसाला ही गोष्ट सर्वात आधी खटकते.
- उबर स्थानिक लोकसुद्धा टॅक्सीपेक्षा आणि चालण्यापेक्षा सुरक्षित मानतात.
- छोट्या गावांत मोटारसायकल चालवणाऱ्या बायका सर्रास दिसतात (पुरुषांपेक्षा खचितच जास्त).
- अनेक सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या हवेत सुद्धा धूम्रपान करण्यास मनाई आहे आणि सर्व लोक काटेकोरपणे त्याचे पालन करतात ! हा अतिशय सुखद धक्का होता.
- नळाला येणारे पाणी थेट पिता येते; मध्य अमेरिकेत ही दुर्मिळ चैन आहे.
- आणि १९४८ पासून या देशाला सैन्य नाही. जगाच्या ०.०३ टक्के भूभागावर जगातली सुमारे ५-६ टक्के जैवविविधता सांभाळणारा हा देश, वीज जवळजवळ पूर्णपणे नवीकरणीय स्रोतांतून (renewable energy) मिळवतो.
पण या सगळ्या उदात्ततेला दारिद्र्य छेद देऊन जाते... (पुल "अंतू बर्वा" मधे म्हणतात तसे)
बऱ्याच ठिकाणी स्थानिक लोक आपले अख्खे आयुष्य युरोपियन आणि अमेरिकन पर्यटकांची सेवा करण्यात घालवतात. महागाई प्रचंड आहे आणि आर्थिक दरी त्याहून जास्त. ज्या ला फोर्तुनाच्या हॉट-स्प्रिंग रिसॉर्टमध्ये एका रात्रीचे भाडे स्थानिक माणसाच्या महिन्याच्या पगाराएवढे असते, त्याच रिसॉर्टच्या मागच्या दाराने त्याच माणसाची मुलगी कामाला जाते. मुबलक संसाधने असूनही ती कोणाच्या हातात आहेत, हा प्रश्न इथेही तसाच शिल्लक आहे.
हे लिहिताना थोडे अपराधी जरूर वाटते, कारण त्या यंत्रणेत तीन आठवडे मीही एक ग्राहक होतो.
पण म्हणूनच मंत्रा-ट्रेलवरचा तो हात मला महत्त्वाचा वाटतो. तो मागतो आहे की देतो आहे, हा प्रश्न कोस्टा रिकाला विचारला तर उत्तर दोन्ही आहे. हा देश भरभरून देतो : जंगल, फळे, पाणी, ऊब, माणसे. आणि त्याच वेळी तो काहीतरी मागतोही आहे. आपल्यासारख्या येऊन-जाणाऱ्या पाहुण्यांकडून थोडी नजर, थोडा आदर आणि त्याच्या हिरवाईमागच्या माणसांची थोडी दखल...
तीन आठवड्यांत मी बरेच काही घेतले. निदान ही दखल तरी मागे ठेवून यावी, म्हणून हे सहा भाग लिहिले.
पुरा विदा ! (हे जीवन सुंदर आहे)
(समाप्त)










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा