कोस्टा रिका सहल : अमेरिकेचे श्रीमंत कोकण !
![]() |
| Scarlet Macaw |
शुक्रवार, १४ ऑगस्ट : जीप-बोट-जीप : ला फोर्तुना ते मोंतेवेर्दे
सकाळी ७:५० ला पिक-अप होता. आजही पावसाने चांगलाच जोर लावला होता. कदाचित रात्रीपासून थांबलाच नसेल.
ला फोर्तुनाहून मोंतेवेर्देला जाण्यासाठी "जीप-बोट-जीप" नावाचा एक अजब पण अत्यंत शहाणा प्रकार आहे. गंमत अशी की या नावातली "जीप" ही खरे तर मिनीव्हॅन असते; पण "व्हॅन-बोट-व्हॅन" म्हटले तर साहस कमी वाटेल आणि तिकीट स्वस्त द्यावे लागेल, हे पर्यटन-व्यवसायाला चांगले माहीत आहे.
या प्रवासाचे कारण भूगोलात आहे. ला फोर्तुना आणि मोंतेवेर्दे यांच्यामधे लेक अरेनाल आडवा येतो. त्याला वळसा घालून रस्त्याने गेल्यास तीन-चार तास सहज जातात. पण तलाव आडवा कापला तर वीस-पंचवीस मिनिटांत पलीकडचा किनारा. म्हणजे एका बाजूने जीप, मग बोट आणि पलीकडे पुन्हा जीप. १९७९ साली धरणाने जो तलाव तयार केला, त्यानेच पुढे एक नवा "जलमार्ग" तयार करून दिला, असे म्हणता येईल.
![]() |
| बोटीतून अरेनाल लेक क्रोस करताना |
वाटेत एका फार्मच्या फाटकावर "पेराल तिथे उगवेल" या अर्थाचे ब्रीदवाक्य लिहिलेले दिसले. या भागाबद्दल हे अजिबात अतिशयोक्त नाही. ज्वालामुखीय माती, वर्षभर पडणारा पाऊस आणि सौम्य तापमान, या तिघांच्या संगनमताने इथे काहीही रुजते. आपल्याकडे "पेराल ते उगवेल" हे नैतिक सुभाषित आहे; इथे ते कृषिविषयक वस्तुस्थिती आहे. अक्षरशः सगळीकडे हिरवे आणि काहीवेळा तर झाडांवर सुद्धा इतर झाडे उगवली होती...
मोंतेवेर्दे आले आणि पहिली जाणीव झाली ती वाऱ्याची. कॅरिबियन समुद्रावरून येणारे व्यापारी वारे (trade winds) डोंगररांग ओलांडताना इथे अक्षरशः शिट्ट्या वाजवत जातात. याचे गाव "मोंते-वारा-दे" असेही ठेवायला हरकत नाही. नावात "हिरवा डोंगर" आहे, पण अनुभवात "वारा" आहे. (verde म्हणजे स्पॅनिश मधे हिरवा रंग आणि monte म्हणजे डोंगर)
![]() |
| फक्त हिरव्या कुंचल्याने काढलेले (निसर्ग) चित्र |
हे कोस्टा रिकातले थंड हवेचे ठिकाण. इथे उभे राहिल्यावर माथेरान किंवा महाबळेश्वरची आठवण झाल्याशिवाय राहत नाही : तेच धुके, तीच थंडी, तेच निसरडे रस्ते आणि तीच "आत्ता ऊन होते, आत्ता नाही" ही ढगांची लहर.
माझे हॉस्टेल La Suerte म्हणजे "नशीब". मागच्या भागात "ला फोर्तुना" म्हणजे (चांगले) नशीब आणि आता "ला सुएर्ते" म्हणजेही नशीब. या हॉस्टेलचे थोडक्यात वर्णन: लाकडी बांधकाम, कुटुंबाने चालवलेले, नाश्त्याची सोय, मोठ्ठी लिविंग रूम, TV, सोफा आणि सुंदर view असलेली बाल्कनी. होस्टेलवर चेक इन करून थोडा अराम केला.
![]() |
| हॉस्टेलमधील बाल्कनी |
जवळच्या "सोडा"मध्ये जेवायला गेलो. तिथे भिंतीवर मस्त quotes लावलेले होते आणि योगायोगाने आमच्या धबधब्याच्या ट्रिपमध्ये बरोबर असलेली फ्रेंच मुलगी तिथेच भेटली. मग एकत्रच जेवण, आणि एकमेकांचे ट्रिपचे किस्से ऐकत-ऐकवत वेळ मजेत गेला. प्रवासात ओळखी अशाच होतात : एकदा भेटलेली माणसे तीनशे किलोमीटर पुढे पुन्हा भेटतात आणि एका क्षणात जुनी ओळख असल्यासारखे वाटू लागते.
![]() |
| Soda रेस्टॉरंट मधील फलक |
जेवण झाल्यावर सिटी सेंटरमध्ये चालत गेलो. ATM मधून पैसे काढले आणि फळे विकत घेतली : एक मोठ्ठी पपई, दोन पेरू आणि "मामोन चिनो" नावाचे एक लाल, केसाळ फळ. आपल्याकडे त्याला रामबुटान म्हणतात. स्पॅनिशमध्ये "मामोन चिनो" म्हणजे "चिनी मामोन", कारण ते मूळचे आग्नेय आशियातले आहे आणि इथे आयात होऊन इतके रुळले की आता स्थानिकच वाटते. बाहेरून बघितले तर एखाद्या लहान मुलाने रंगवलेला केसाळ राक्षस, आणि आत मात्र लिचीसारखा नाजूक गोडवा.
![]() |
| रामबुटान फळे उजव्या कोपऱ्यात खाली |
हॉस्टेलवर परत येऊन वामकुक्षी झाली. संध्याकाळी टुरिस्ट सेंटरमध्ये चौकशीला गेलो : काय पाहायचे, काय टाळायचे. सल्ले चांगले मिळाले आणि अर्थातच शेवटी त्याच्यामार्फत "शटल" म्हणजे प्रायव्हेट गाडी बुक करावी असे सुचवले गेले. माझ्यासमोरच त्याने एका डच जोडप्याला अगदी व्यवस्थित बाटलीत उतरवले होते. डच माणूस पैशाच्या बाबतीत जगात सर्वात कठीण गिऱ्हाईक मानला जातो; तोच जर इथे विरघळत असेल तर आपली काय कथा, या विचाराने मी पुढचे प्रश्न फार जपून विचारले आणि त्याच्या ऑफर्स ना विनयाने नकार दिला.
एका बारमध्ये कॉकटेल घेतले आणि गावात फेरफटका मारला. तिथल्या वेटरशी गप्पा झाल्या आणि त्याने मला "कासादो" या पदार्थाच्या नावाची गोष्ट सांगितली. हा पदार्थ मी गेले काही दिवस खात होतो त्यामुळे नावाबाबतीत माझी उत्सुकता चाळवली गेली होतीच:
कासादो (casado) म्हणजे स्पॅनिशमध्ये "विवाहीत पुरुष". आणि हा पदार्थ म्हणजे भात, बीन्स, प्लातानो-केळे, कोशिंबीर आणि थोडे मांस किंवा अंडे, सगळे एका ताटात. नाव कसे पडले? कॉफीच्या मळ्यांत काम करणाऱ्या मजुरांच्या जेवणाच्या सुट्टीत याचे रहस्य आहे. ज्याचे लग्न झाले आहे अशा मजुराकडे बायकोने भरून दिलेला डबा असायचा, तो अर्थातच साग्रसंगीत असायचा आणि अविवाहित माणसाला मात्र खानावळीत जे मिळेल ते. त्यामुळे "पूर्ण जेवण" म्हणजे "विवाहित माणसाचे जेवण", म्हणजे कासादो.
म्हणजे इथे रेस्टॉरंटमध्ये "मला एक कासादो द्या" असे सांगणे म्हणजे तांत्रिकदृष्ट्या "मला एक नवरा द्या" असे मागणे. भाषाशास्त्रज्ञ या व्युत्पत्तीबद्दल साशंक आहेत, पण गोष्ट इतकी गोड आहे की खरी नसली तरी चालेल. आपल्याकडे "डबा" या शब्दातही नेमकी हीच भावना आहे, फक्त आपण तिला असे चावट नाव दिलेले नाही.
![]() |
| कॉकटेल |
हॉस्टेलवर येऊन पास्ता बनवून खाल्ला आणि उद्याच्या ट्रिपसाठी लवकर झोपलो.
शनिवार, १५ ऑगस्ट : ढगांच्या पोटातले जंगल
आजचा दिवस मोंतेवेर्दे क्लाउड फॉरेस्टचा.
हॉस्टेलकडून बुक केलेली शटल वेळेवर आलीच नाही. ७:३० चा स्लॉट बुक केलेला असल्याने धावपळ होईल असे वाटले होते पण उशीरा आलेली शटल बरोब्बर साडेसात वाजता पोचली. आदल्या दिवशी टुरिस्ट सेंटरवाल्याच्या sales pitch ला मी बळी पडलो नव्हतो याचे समाधान आणि हवी असलेली शटल वेळेवर न आल्याचा राग, या दोन भावना एकाच वेळी बाळगणे अवघड होते.
formalities पूर्ण करून प्रवेश मिळाला आणि आत शिरलो.
हे जंगल जगप्रसिद्ध का आहे, हे आत गेल्यावर पाच मिनिटांत कळते. साधारण १४००-१८०० मीटर उंचीवर, जिथे कॅरिबियनकडून येणारे दमट वारे डोंगररांगेवर आदळतात आणि थंड होऊन त्यांचे ढगात रूपांतर होते, तिथे हे जंगल वसले आहे. इथे पाऊस वरून पडतो हे खरे, पण त्याहून जास्त पाणी झाडे ढगांतून थेट "पकडून" घेतात. पानांवर, फांद्यांवर, शेवाळ्यावर ढग अडकतो, थेंब होतो आणि खाली ठिबकतो. मराठीत याला "ढगजंगल" असे काहीतरी म्हणावे लागेल. इथे धुके ही हवामानाची लहर नाही, ती परिसंस्थेतली (ecosystem) एक अधिकृत जागा आहे. धुके नसेल तर हे जंगलच नाही.
![]() |
| cloud forest |
इथली पर्वतराजी हिरवीगार आहेच शिवाय वृक्ष "राजी" नसतानाही त्याच्यावर चढणारी आणि हात पाय पसरणारी अनेक बांडगुळे इथे आहेत आणि म्हणूनच इथले सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एपिफाइट्स (शुद्ध मराठीत अधिपादप) : दुसऱ्या झाडावर वाढणाऱ्या वनस्पती. मुळे जमिनीत न घालता, फांदीवर बसून, हवेतून आणि पावसातून अन्नपाणी मिळवणारी ही मंडळी. मोंतेवेर्देत यांच्या जवळपास ८७८ जाती आहेत, म्हणजे इथल्या एकूण वनस्पतींपैकी जवळजवळ तीस टक्के. ऑर्किड्स तर पाचशेहून अधिक जातींची, आणि त्यातल्या चौतीस जाती तर जगाला इथेच पहिल्यांदा कळल्या. इथे प्रत्येक झाड म्हणजे एक चाळ आहे, आणि प्रत्येक फांदीवर भाडेकरू.
मी continental divide trail निवडली होती. या ठिकाणी एक भौगोलिक गंमत आहे : डोंगराच्या माथ्यावरची एक अदृश्य रेषा ठरवते की इथे पडलेला थेंब पॅसिफिक महासागरात जाणार की कॅरिबियनमध्ये. एकाच पानावर पडलेले दोन थेंब वेगवेगळ्या महासागरांत जाऊ शकतात. उभे राहिल्यावर काहीच जाणवत नाही; फक्त वारा जोरात असतो. पण पायाखालून जगाचे पाणी वाटले जात आहे ही कल्पना अंगावर काटा आणते.
एकट्याने चालताना मनात मिश्र भावनांची गर्दी होती, आणि त्यात प्रामुख्याने भीती होती. प्राणी दिसायलाही हवे होते आणि नकोही. पाऊस होताच, पण पांचो पांघरलेला असल्याने भिजायची भीती नव्हती; बिबट्या समोर आल्यास थिजायची भीती मात्र नक्कीच होती. या जंगलात जगातल्या सहाही मांजरजातींपैकी सगळ्या आढळतात. (हे मला नंतर कळले. आधी कळले असते तर मी काठीऐवजी झाड शोधले असते.)
जसजसे पुढे गेलो तसतसे इतर ट्रेकर्स दिसू लागले आणि मनावरचे दडपण उतरले. वाटेत एक लांब, मजबूत काठी मिळाली; ती हातात घेतल्यावर आत्मविश्वास एकदम दुप्पट झाला. काठीचा प्रत्यक्ष उपयोग शून्य असतो हे मला माहीत आहे, पण मानसिक उपयोग अफाट असतो.
या जंगलात अचानक लाल निळ्या बेडकाने दर्शन दिले, या बेडकाला निळी जीन्स घातलेला बेडूक असेही म्हटले जाते. हा विषारी असून याच्या अंगातून विष स्रवले जाते आणि येथील आदिवासी जमाती त्यांच्या बाणांच्या टोकावर लावण्यासाठी या विषाचा उपयोग करतात.
![]() |
| poison dart frog (Blue jeans frog) |
पाण्याजवळ खेकडे दिसले! जंगलात, समुद्रापासून इतक्या उंचावर खेकडे बघणे हा एक वेगळाच अनुभव. मधूनमधून पक्षी दिसत होते आणि एक-दोन छोटे धबधबेही...
![]() |
| जंगलातील एक दृश्य |
त्या ट्रेलवरच्या प्रसिद्ध झुलत्या पुलावरून जाताना मात्र एक वेगळीच जाणीव झाली : आपण या जंगलात किती आत आलो आहोत, यापेक्षा "माणूस" या जंगलात किती आत आला आहे. आपण झाडांच्या डोक्यावरून चालण्यासाठी पूल बांधले आणि तेच पूल आता माकडांचीही सोय करत आहेत.
![]() |
| ऐन जंगलात बांधलेला एक पूल |
आणि या जंगलाची गोष्ट सांगायची तर ती एका नामशेष झालेल्या बेडकाशिवाय पूर्ण होत नाही. इथे "गोल्डन टोड" नावाचा एक बेडूक राहायचा. नर चमकदार केशरी, जणू कुणीतरी रंगवून ठेवलेला; मादी काळसर-हिरवी, लाल ठिपक्यांची. फक्त चारेक चौरस किलोमीटर एवढाच त्याचा अख्खा संसार. १९६४ साली त्याचा शोध लागला. १९८७ साली एका प्रजननकाळात दीड हजारांहून अधिक बेडूक मोजले गेले. १९८८ साली दहा उरले. आणि १५ मे १९८९ रोजी एक एकटा नर दिसला तो शेवटचा! एल निन्योमुळे आलेला कोरडेपणा, बदललेले ढगांचे थर आणि "काईट्रिड" नावाची बुरशी, या तिघांनी मिळून काम तमाम केले. २००४ साली त्याला अधिकृतरीत्या नामशेष घोषित करण्यात आले.
हवामान बदलामुळे नामशेष झालेली पहिली प्रजाती म्हणून याच बेडकाचे नाव जगभर घेतले जाते. शास्त्रज्ञ यावर अजूनही वाद घालतात, पण एक गोष्ट निर्विवाद आहे : ज्या जंगलाचे रक्षण करण्यासाठी माणसांनी १९७२ साली राखीव क्षेत्र जाहीर केले, त्याच राखीव क्षेत्रात, कोणीही एकही झाड न तोडता, एक प्रजाती नाहीशी झाली. कुंपण घातले होते, पण हवामानाला आणि उत्क्रांतीला कुंपण नसते.
पंचवीस वर्षे धुक्यात हरवलेल्या या जंगलात फिरताना पायाखालच्या प्रत्येक डबक्याकडे मी जरा जास्तच वेळ बघत होतो. काहीही सापडणार नाही हे माहीत असूनही...
परत हॉस्टेलवर आलो तर माझ्याच खोलीत दोन स्विस मुली उतरल्या होत्या. ओळख करून घेतली आणि आम्ही एकत्र पपई खाल्ली, पेरूही संपले. (फळे) वाटून खाल्ल्याने ओळखी लवकर होतात, हा प्रवासातला अनुभव-सिद्ध नियम आहे.
नंतर Monteverde Art House या कलादालनाला भेट दिली. २०-२५ मिनिटे टेकड्या चढत, पावसात, मुख्य रस्त्याच्या कडेकडेने चालत जावे लागले. तिथे फोटो काढले आणि परत येताना एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये मोठ्या कौतुकाने जाऊन चहा प्यायलो.
![]() |
| कला दालन |
सात हजार किलोमीटर दूर, ढगांत बुडालेल्या डोंगरावर, आल्याचा चहा. एकदम भारी वाटले! अर्थात कोस्टा रिका तिथल्या कॉफी साठी प्रसिद्ध आहे पण कॉफीचे आणि माझे वाकडे आहे, त्यामुळे उगाच प्रसिद्ध आहे म्हणून तोंड वाकडे करत कॉफी पिण्यापेक्षा आवडत असलेला देशी चहा पिणे मी पसंत केले.
![]() |
| भारतीय रेस्टॉरंट मधील अंतर्गत सजावट |
हॉस्टेलवर परतल्यावर आणखी दोन पाहुणे आले होते: एक माजुरडा ब्रिटिश मुलगा आणि एक हसरा अमेरिकन. अर्थातच अमेरिकन ब्रायनशी माझे जमले. तो सिॲटलचा असल्याने आमच्याकडे बोलण्यासारखे बरेच काही निघाले. आणि त्याचा प्रवास तर अफलातून होता : स्वतःची मोटारबाईक घेऊन टेक्सासमार्गे मेक्सिको, मग ग्वातेमाला आणि तसा तसा खाली येत तो कोस्टा रिकापर्यंत पोचला होता. मी बसच्या वेळापत्रकाशी झगडत होतो आणि हा माणूस अख्खा खंड चाकांवर मोजत होता.
रविवार, १६ ऑगस्ट : फुलपाखरी दिवस आणि डराव(नी) रात
आजचा El Tigre चा ट्रेक रद्द झाला. पाऊस इतका झाला होता की ट्रेकच्या मार्गावर दरड कोसळली होती. "आज ट्रेक नाही" ही बातमी सांगताना तिथल्या माणसाच्या चेहऱ्यावर जे "इथे असे होतच असते" असे भाव होते, ते बघून मी वादच घातला नाही.
त्याऐवजी बटरफ्लाय गार्डनला गेलो.
![]() |
| फुलपाखरू सुंदर किती दिसते ... |
तिथे मला सर्वात जास्त भावली ती फुलपाखरे नव्हेत, तर strangler figs गळा दाबणारे अंजीर . या वनस्पतीची जगण्याची पद्धत भयंकर संयमी आणि तितकीच निर्दय आहे. एखादा पक्षी बी खाऊन झाडाच्या फांदीवर विष्ठा टाकतो, तिथे बी रुजते. मग ते रोप वरून खाली मुळे सोडते, ती जमिनीपर्यंत पोचतात, आणि हळूहळू यजमान झाडाला वेढून, आवळून, प्रकाशापासून तोडून टाकते. काही दशकांनी आतले मूळ झाड कुजून जाते आणि उरतो फक्त एक पोकळ, वेटोळ्यांचा मनोरा. स्पॅनिशमध्ये याचे नावच "मातापालो" म्हणजे "झाड-मारी", पण वेढे घालणाऱ्या या अंजिरा सारख्या झाडाला "जंजीर धारी अंजीर" म्हणावेसे वाटते.
![]() |
| जंजीर आवळणारे अंजीर |
फुलपाखरे, झुरळे आणि कोळी यांची live प्रदर्शने ३-४ वेगवेगळ्या ग्रीन हाऊसेस मधून मांडली होती
फुलपाखरू उद्यानातून बाहेर आलो तर समोर चक्क ब्रायन होता , त्याची मोटारबाईक घेऊन तो इथेच आला होता , पण २० डॉलर तिकीट असल्याने त्याने त्याचा प्लॅन बदलला आणि आम्ही त्याच्या बाईकवर बसून जवळ असलेल्या एका अगदी रँडम पॉईंट कडे निघालो. तिथे एक गंमत दिसली : एका वाकड्या झाडाचे आडवे मूळ चक्क एका छोट्या नदीवर पूल बनवून बसले होते. मेघालयातल्या "living root bridges" ची आठवण झाली. फरक इतकाच की तिथे माणसांनी मुळांना पूल व्हायला शिकवले आहे, आणि इथे झाडाने ते स्वतःच ठरवले होते.
![]() |
| "मुळात" असलेला पूल |
नाईट वॉक टूर हे आजचे मुख्य आकर्षण होते. टूर आठ वाजता सुरू होणार होती, पण मी चार-साडेचारलाच चालत निघालो. अंधार पडायच्या आत पोचावे म्हणून. वाटेत एका सोडामध्ये 'कासादो" चे जेवण केले. दोन दिवसांपूर्वी ज्याच्या नावाची गोष्ट ऐकली होती, तो पदार्थ आता ताटात होता; आणि हो, तो खरोखरच एका पूर्ण संसाराइतका भरगच्च होता.
८ वाजताच्या टूरसाठी मी ६ वाजताच पोचलो होतो त्यामुळे मी आधीचा स्लॉट घेऊ शकतो असे रिसेप्शन वरील मुलीने सुचवले , मात्र पाब्लो बद्दल खूप चांगले reviews वाचले असल्याने मला तोच गाईड हवा होता. म्हणून दोन तास तिथे वेळ काढला. फेऱ्या मारत, बाकावर चिंतन करत आणि souvenir शॉप मधील overpriced गोष्टी न्याहाळत.
पाब्लो एक नंबर गाईड होता. त्याच्यासाठी थांबणे worth ठरले. रात्रीच्या जंगलाचा नियम सोपा असतो : तुमचे डोळे निरुपयोगी असतात आणि गाईडचे डोळे हेच तुमचे डोळे. टॉर्चच्या झोतात त्याने जे दाखवले, ते दिवसा दहा वेळा त्याच वाटेने गेलो असतो तरी दिसले नसते.
- काचेचे बेडूक (glass frogs) जोडीने. या बेडकांची पोटाकडची कातडी इतकी पारदर्शक असते की खालून बघितल्यावर आतले हृदय, यकृत आणि आतडी दिसतात. निसर्गाने बनवलेले हे "transparent UI" आहे. आणि गंमत म्हणजे या जातींत नर अंडी उबवण्याची जबाबदारी घेतो, पानाखाली बसून त्यांची राखण करतो.
- एक विषारी साप आणि एक विंचू. विंचू शोधण्यासाठी पाब्लोने UV टॉर्च वापरला, कारण विंचवाची कवचे अतिनील प्रकाशात निळसर-हिरवी चमकतात. जंगलात लपून बसण्यात आयुष्य घालवायचे आणि नेमके UV खाली उजळून निघायचे, बिचारा विंचू !
- तुकान सप्तरंगी चोचीचा पक्षी. ती अवाढव्य चोच बघून वाटते की तो पुढे कोसळेल, पण ती आतून पोकळ आणि हलकी असते. शिवाय ती शरीरातली उष्णता बाहेर टाकण्यासाठी रेडिएटरसारखी वापरली जाते. म्हणजे ती चोच म्हणजे फळ तोडण्याचे साधन, प्रदर्शनाची वस्तू आणि AC, तिन्ही एकत्र !
- आणि सर्वात मोठे बक्षीस : केत्साल (Quetzal) पक्ष्याची मादी.
![]() |
| हिरवा viper साप |
केत्सालबद्दल थोडे सांगायलाच हवे. तसे हे नाव टेक्निकल लोकांना अपरिचित नाही . Ubuntu या OS चे १२.१ version म्हणजेच Quantal Quetzal ! तर असा हा Quetzal पक्षी मायन आणि ॲझटेक संस्कृतींत पवित्र मानला जात असे; त्याच्या लांब हिरव्या शेपटीची पिसे सोन्यापेक्षा मौल्यवान समजली जात आणि ती काढून घेतल्यावर पक्ष्याला सोडून देणे बंधनकारक होते, कारण त्याला मारणे हा गुन्हा होता. "केत्सालि" या शब्दाचा अर्थच "मौल्यवान, सुंदर". आजही ग्वातेमालाच्या चलनाचे नाव "केत्सालच" आहे म्हणजे तिथे शब्दशः पक्ष्यांनी खरेदी होते. आणि हा पक्षी पिंजऱ्यात फार काळ जगत नाही, त्यामुळे तो स्वातंत्र्याचे प्रतीक मानला गेला.
![]() |
| Tucan |
नर केत्सालची ती लांबलचक शेपटी पाहायला जगभरातले पक्षीनिरीक्षक इथे तळ ठोकून बसतात. आम्हाला मादी दिसली. नर नाही याची जराशी रुखरुख वाटली, पण मग वाटले : ज्या पक्ष्याला ॲझटेकांनी देव मानला, त्याच्या घरातल्या कुणीतरी आम्हाला दर्शन दिले हे काय कमी आहे?
याशिवाय जंगलात असंख्य कीटक दिसले. काही अगदी वाळक्या काडीसारखे दिसणारे, काही शेवाळ्याचा तुकडा असल्यासारखे. निसर्गातली सर्वोत्तम कला ही "दिसण्या"ची नसून "न दिसण्या"ची आहे, हे रात्रीच्या जंगलात नीट कळते.
![]() |
| (स्वतःच्याच) काड्या करत असलेला किडा |
आणि शेवटी पाब्लोने टॉर्च एका फांदीवर रोखून सांगितले की इथे जगातले सर्वात छोटे ऑर्किड आहे. डोळे ताणून बघितल्यावर एक इवलेसे केशरी ठिपक्यासारखे फूल दिसले. मोंतेवेर्देत पाचशेहून अधिक ऑर्किड्स आहेत आणि त्यांतले काही एवढे लहान आहेत की भिंगाशिवाय ते फूल आहे की धुळीचा कण, हे कळत नाही. आपल्याकडे "फूल" या शब्दाला जी भव्यता चिकटलेली आहे, ती इथे एका क्षणात गळून पडली.
![]() |
| सर्वांत छोटे ऑर्किड |
रात्री उशिरा हॉस्टेलवर परत येऊन ब्रायनशी गप्पा आणि मग झोप.
सोमवार, १७ ऑगस्ट : चीज, शांतता आणि निरोप
आज घाई नव्हती. निवांत उठलो, निवांत नाश्ता केला. बस दुपारी अडीचला होती. पेरूचा केक खाल्ला. लाल पेरूच्या गराचे क्रीम वरून लावले होते. अप्रतिम चव होती.
![]() |
| पेरूचा केक |
आणि निघण्याआधी या गावाची खरी गोष्ट सांगायलाच हवी, कारण मोंतेवेर्दे हे नुसते जंगल नाही; ते एका नकाराचे फळ आहे.
१९४९ साली अमेरिकेतल्या अलाबामा राज्यातील फेअरहोप इथल्या क्वेकर (Quaker) समाजातल्या चार तरुणांना तुरुंगात टाकले गेले. गुन्हा : कोरियन युद्धासाठी सुरू झालेल्या सक्तीच्या लष्करी भरतीसाठी नाव नोंदवायला त्यांनी नकार दिला. क्वेकर हे कट्टर शांततावादी. युद्धासाठी शरीर द्यायचे नाही आणि युद्धासाठी कर भरायचाही नाही, ही त्यांची भूमिका.
चार महिन्यांनी ते सुटले आणि मग या समाजाने एक विलक्षण निर्णय घेतला : देशच सोडायचा. नोव्हेंबर १९५० मध्ये अकरा कुटुंबे, एकूण चव्वेचाळीस माणसे, आपली घरे आणि शेते विकून निघाली. काही विमानाने, काही बोटीने आणि काही चक्क ट्रक घेऊन जमिनीवरून, मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतल्या कच्च्या रस्त्यांवरून खाली येत.
त्यांनी कोस्टा रिका का निवडला? कारण अगदी १९४८ साली, यादवी युद्धानंतर, या देशाने आपले सैन्यच बरखास्त केले होते. ज्या माणसांनी सैन्यात जायला नकार दिला म्हणून तुरुंग भोगला, त्यांनी राहायला असा देश निवडला ज्याला सैन्यच नाही. यापेक्षा सुसंगत निर्णय इतिहासात क्वचित सापडेल.
१९५१ साली ते इथे पोचले. तेव्हा इथे रस्ता नव्हता, वीज नव्हती; बैलगाडीने वर यावे लागे. त्यांनी सुमारे १४०० हेक्टर जमीन घेतली आणि तिचे नाव ठेवले "मोंतेवेर्दे" म्हणजे "हिरवा डोंगर". जमीन कुटुंबांमध्ये वाटली, पण डोंगरमाथ्यावरचे जंगल मात्र मुद्दाम तसेच ठेवले, कारण त्यांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचे झरे तिथे होते. निसर्गप्रेमामुळे नाही, तर साध्या व्यावहारिक शहाणपणामुळे. पण याच निर्णयातून पुढे "मोंतेवेर्दे क्लाउड फॉरेस्ट रिझर्व्ह" जन्माला आले.
आणि उदरनिर्वाहासाठी त्यांनी काय सुरू केले? तर चीजचा कारखाना! दूध लवकर नासते आणि डोंगरावरून खाली न्यायला रस्ता नाही; पण चीज टिकते. १९५२ साली पहिली चीजची batch निघाली, जेमतेम दीडशे किलो. आज तोच कारखाना दिवसाला काही टन चीज बनवतो.
म्हणजे : युद्धाला दिलेल्या नकारातून एक गाव जन्माला आले, पाण्याच्या काळजीतून एक जगप्रसिद्ध जंगल वाचले आणि रस्त्याच्या अभावातून एक चीज ब्रँड तयार झाला. या तिन्ही गोष्टी कोणीही ठरवून केल्या नव्हत्या !
नंतर १९७० च्या सुमारास जॉर्ज पॉवेल हे जीवशास्त्रज्ञ इथे संशोधनासाठी आले आणि त्यांनी या डोंगरात नक्की काय दडले आहे हे स्थानिकांना सांगितले. मूळ क्वेकरांपैकी एक असलेले विल्फर्ड "वुल्फ" गिंदोन जे गंमत म्हणजे कोस्टा रिकातले पहिले चेन-सॉ विक्रेते होते, त्यांचा दृष्टिकोन पूर्ण बदलला. झाड तोडून विकण्यापेक्षा ते उभे राहिले तर जास्त मौल्यवान आहे, हे त्यांना पटले. करवत विकणारा माणूस जंगल वाचवायला लागला, ही या गावातली सर्वात सुंदर कोलांटी - उडी.
पुढे १९८० च्या दशकात याच भागात आणखी एक गोष्ट घडली : स्वीडनमधल्या शाळकरी मुलांनी वर्गणी गोळा करून इथली जमीन विकत घ्यायला सुरुवात केली आणि त्यातून "बोस्के एतेर्नो दे लोस निन्योस" म्हणजे "मुलांचे चिरंतन जंगल" उभे राहिले. आज ते कोस्टा रिकातले सर्वात मोठे खासगी संरक्षित जंगल आहे. सात हजार किलोमीटर दूरच्या मुलांनी खाऊचे पैसे साठवून एका उष्णकटिबंधीय डोंगराचा तुकडा विकत घेतला, ही गोष्ट कुठल्याही परीकथेपेक्षा कमी नाही.
हे सगळे डोक्यात घेऊन मी बस स्थानकाकडे निघालो. आज पाऊस उघडला होता आणि सूर्य अधूनमधून तळपत होता , थोडे धुके सुद्धा कमी होते , त्यामुळे चालत बस स्टॉप कडे जाता जाता एक सुंदर फोटो मिळाला.
![]() |
| घाटरस्त्यातून दिसणारे विहंगम दृश्य |
हॅन्डल तुटलेली बॅग ओढत जाताना थोडे कष्ट पडले. पण मुद्दाम लवकर निघाल्यामुळे तिथे निवांत बसून बसची वाट बघता आली. जवळच्या बेकरीतून चीज-पॅटिससारखे पदार्थ आणून खाल्ले. मोंतेवेर्देला निरोप चीज खाऊनच द्यायचा, असे चीजची गोष्ट वाचून ठरवले होते.
बसला घाटात प्रचंड ट्रॅफिक लागले आणि ती अत्यंत निवांतपणे सॅन होजेला पोचली. पुन्हा त्याच जुन्या हॉस्टेलवर उतरलो. आतापर्यंत तिथल्या रिसेप्शनवरच्या सगळ्यांना मी ओळखीचा झालो होतो "अरे, तू परत आलास!" या स्वागतात प्रवासाच्या शेवटाची चाहूल होती. ३० आणि ३१ जुलै , शिवत ९-१० ऑगस्ट असे दोनदा मी इथेच उतरलो होतो.
मोंतेवेर्देने मला काय दिले? एक वेगळा विचार:
हे गाव काही माणसांनी "नाही" म्हटले म्हणून अस्तित्वात आले. युद्धाला नाही, सक्तीला नाही, आणि नंतर करवतीलाही नाही. आपण सहसा असे मानतो की जग "हो" म्हणणाऱ्यांनी घडवले आहे. पण इथल्या ढगांत उभे राहिल्यावर वाटते की काही ठिकाणे फक्त कुणाच्या तरी ठाम नकारामुळे टिकून राहिली आहेत.
(क्रमशः)






















कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा