तुर्कीय सहल : इस्तंबूल (११ - १५ जून २०२६)
दिवस पहिला : ११ जून २०२६
१. साल, सिगारेट आणि शिशा
यंदाचा वाढदिवस आमस्टरडॅममधे साजरा करायची आजिबात इच्छा नव्हती. याचे मुख्य कारण म्हणजे भर जूनमध्ये पुण्यात पडावा असा मान्सूनसारखा पाऊस ! वर्षातील ९ महिने ढगाळ आणि पावसाळी वातावरण असलेल्या नेदरलँड्स मधे कितीतरी दिवस "सूर्य उगवतो कधी आणि मावळतो कधी" हे नीटसे कळत नाही. जून ते ऑगस्ट उन्हाळा चालू असताना सुद्धा पाऊस सुरु झाला तर कहर होतो. त्याचाच वैताग येऊन १० जूनला रात्री ठरवलं की Sun Destination शोधायचं ! (वर्षासहल च्या उलटी ऊन-सहल अथवा ग्रीष्म सहल म्हणू शकतो याला) ११ तारखेला दुपारी फ्लाईट होती. ३ तास ४० मिनिटे.
एल निरोप द्यायला प्लॅटफॉर्मपर्यंत आली होती, तर केटीने सिगारेटी (जॉर्जियन क्रिमरोल) पॅक करून दिले. फक्त एक बॅकपॅक घेऊन गेलो होतो. सुरक्षा तपसणीपासून बोर्डिंग वगैरे सगळं वेळेत झालं.
विमान रात्री ९ वाजता इस्तंबूलला पोचलं.
![]() |
| फ्लाईट मधून दिसणारे विहंगम दृश्य |
इस्तंबूल विमानतळावर तिथलं सार्वजनिक वाहतुकीच कार्ड घेतलं. M4 → B1 → M2 अशा तीन मेट्रो करून ताक्सिम चौकात पोचलो. २ तास लागले. चौकातच मोठ्ठी मशीद आहे. तिथूनच दोन मिनटांवर माझं हॉटेल होतं. ऑपेरा-हाऊस नावाचं. तेथे मोहम्मद नावाच्या रिसेपनिस्टने अदबीने स्वागत केलं. ६०२ नंबरची खोली उघडून दिली. मोठा बेड, एसी आणि सुसज्ज बाथरूम. फ्रेश होऊन बाहेर पडेपर्यंत मध्यरात्र झाली होती.
इतकी रात्र झाल्यावर खायला-प्यायला काही मिळेल का अशी शंका होती, म्हणून हॉटेल शेजारील चालू दिसणाऱ्या जनरल स्टोअर मधून केळी घेऊन खाल्ली.
केळ्यांच्या साली टाकण्यासाठी कचरा-पेटीचा शोध मात्र सोपा गेला नाही. चांगलीच पायपीट करूनही कचरापेटी शोधताना त्रेधातिरपीट उडाली. जागोजागी न्हावी, छोट्या कॅफे, फळ विक्रेते दिसतात होते. धूम्रपान चहुकडे जोरात सुरु होते. रस्त्यावर ठिकठिकाणी ash-towers (याला कदाचित राख-दाणी म्हणू शकतो) दिसत होते. कचरापेटी मात्र दिसत नव्हती. अखेर सिगारेट फुकणाऱ्या एका टोळीन रस्त्याच्या कडेला असलेली एक बांधलेली कचऱ्याची पिशवी सोडून त्यात साल टाकण्याचे सुचवले.साल हातात घेऊन फिरण्यापेक्षा तो उपाय बरा वाटला.
ताक्सिम चौकात गेल्यावर संध्याकाळचे ७-८ वाजलेत की काय असे वाटून गेलं. ताकसिम चौकात बऱ्यापैकी वर्दळ होती. भाजलेली कणसे, चेस्टनट्स विकणारे विक्रेते, हातगाडीवर कलिंगड विकणारे, पाण्याच्या बाटल्या, खेळणी, परफ्यूमच्या बाटल्या अशा नानाविध वस्तूंची दुकाने चौकात होती. रात्री साडेबारा वाजता न्हाव्याच्या दुकानात हजामत करून घेण्यासाठी काही टर्किश तरुण आलेले दिसले. काळवेळेचे भान त्यांना नसावे किंवा अमक्या वेळेला तमकी गोष्ट करू नये असल्या कल्पना फक्त माझ्याच प्रतिगामी डोक्यात होत्या.
एका झगमगाटी गल्लीत शिशा ठेवलेले हुक्का-बार होते. ते मात्र ठार रिकामे होते. कदाचित मध्यरात्री हजामत आणि पहाटे हुक्का असा इस्तंबूलच्या तरुणाईचा शिरस्ता असावा.
![]() |
| हुक्का बार |
(क्रमशः)


Nice , would have loved to join you for birthday bash!!
उत्तर द्याहटवाIndeed! Thank you
हटवा