Translate

सोमवार, २४ जून, २०१३

बाबा , मी तुमच्या सारखा दिसायला लागलोय !

बाबा , मी तुमच्या सारखा दिसायला लागलोय !
तुमचेच डोळे , तुमचीच जिवणी आणि हनुवटी
इतकंच  काय , पण हल्ली राग सुद्धा मला तुमच्या सारखा येतोय
बाबा, मी तुमच्या सारखा दिसायला लागलोय

हातवारे आणि सवयी सगळ्या मला माझ्या वाटेनाशा झाल्यात 
व्यक्तिमत्वही माझे तुमचेच आहे
ममत्वही जे थोडे , तुमचेच आहे
बाबा मी तुमच्या सारखा व्हायला लागलोय

चालणे बोलणेही तुमचेच
हसणे रडणे ही तुमचेच
राग-राग आणि चिडचिड माझ्यात कुठून आली बाबा
सभोवती साठी कळवळा कुठून आला बाबा
तुम्हीच मला काही देऊन तर गेला नाहीत ना

न कळणारं काहीतरी आहे असं वाटतं
पण  त्याचीही आता जाणीव व्हायला लागलीय
तुमची सह अनुभूती येऊ लागलीय
माझ्या हृदयाचे अंतर्हृदय सांगत आहे
बाबा , मी "तुम्ही" होऊ लागलोय !

                                              - उन्मेष

बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१३

हिमा !

हिमा, तुला पावसाची सर नाही रे
पांढरा शुभ्र असलास तरी बरं नाही रे

हलके हलके सहज तू रंग सगळे चोरलेस
चांदणे रातीचे दिवसा इथे पेरलेस
पण तरीसुद्धा खिडकी माझी धूसर नाही रे
हिमा, तुला पावसाची सर नाही रे...

गोठवतोस तू अंग आणि आटवतोस  तू पाणी
आठवतोस तू मोसमातील नाताळाची गाणी
पण, थरथर, चिंब, ओली माती असं काहीच नाही रे
हिमा, तुला पावसाची सर नाही रे...

इंद्रधनुष्य नाही , अशी  अभ्रांची ही दाटी
पांढरपेशा जगात तुझ्या हिरवाईशी कट्टी
क्षणभंगुर रूप  तुझे , होणार तुझे पाणी
तुझ्याकडे फारसा अवसर नाही रे
हिमा, तुला पावसाची सर नाही रे...

                                         -उन्मेष