Translate

शुक्रवार, २१ मार्च, २०१४

मध्य युरोपिअन सहल : "प्रागै"तिहासिक प्राग आणि युनिक म्यएनिक (दिवस तिसरा)


प्रागला जाण्याचे वेध आदल्या रात्रीपासून लागले असल्याने ब्रनो मध्ये सूर्याची किरणे यायच्या आधी आम्हाला जाग आली होती. आमची प्राग ला जाणारी बस साडेसात वाजता "विक्टोरिया हॉटेल" या बस स्थानकाहून निघणार होती. रोमान च्या घरासमोरच ट्राम चा थांबा असल्याने आम्ही सात वाजता घर सोडले.  बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश पडल्याने एक चांगला दिवस प्राग मध्ये घालवायला मिळणार याची खात्री झाली :
रोमान च्या घराबाहेरील ट्राम च्या थांब्यावर टिपलेली सकाळ

सकाळची वेळ असल्याने गाडीला शहराबाहेर जाण्यास फार वेळ लागला नाही. ब्रनो ते प्राग हा हाय- वे सुरु झाल्यावर अचानक गाडीला ठराविक अंतरानंतर हादरे बसू लागले. सिमेंट च्या रस्त्याचे काम नीट न झाल्याने मध्ये मध्ये ब्लॉक्स सुटले (किंवा तुटले ) आहेत असे रोमानचे स्पष्टीकरण ! झेक लोक या रस्त्याला विनोदाने " मोटोक्रॉस चा सर्वांत लांब track " असे  म्हणतात. झेक नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे हा महा(ग)मार्ग युरोपातील सर्वांत महाग ठरला आहे.
दोन तासांच्या या प्रवासात बराचसा वेळ झोप काढली. प्राग शहरात आल्यावर सूर्याच्या किरणांनीच आम्हाला जागे केले. संपूर्ण शहर मस्त सूर्य प्रकाशात न्हाऊन निघाले होते:
प्राग मध्ये शिरताना
प्राग हे बोहेमिया प्रांतामधील एक महत्वाचे शहर असून राजधानी च्या शहराचा मान या शहराने रोमन साम्राज्याच्या काळापासून मिरवला आहे. व्लातावा नदीकिनारी वसलेल्या प्राग ने एक हजार हून अधिक पावसाळे (किंवा युरोपिअन हिवाळे) पाहिलेले आहेत, त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेल्या प्राग च्या इतिहासाला
"प्रागैतिहास" म्हणायला हरकत नाही.  झेकोस्लोवाकिया हा एक देश असतानासुद्धा प्राग हीच त्या देशाची राजधानी होती आणि स्लोवाकिया वेगळा झाल्यानंतरही झेक प्रजासत्ताक (इंग्रजी नाव चेक रिपब्लिक) ने प्राग ला या पदापासून परागंदा केले नाही. तर अशा या सुप्रसिद्ध शहरात फिरण्यासाठी आम्ही सिद्ध झालो होतो.
राडेक आणि पात्रीसिया हे दोघेही चार्ल्स चौकाजवळ च्या (Charles  square)  एका पार्क मध्ये आमची वाट बघत थांबले होते. या पार्कला लागूनच Town Hall  आहे. येथे Judah Loew Ben Bezalel या ज्यू-पंडिताचा पुतळा आहे. मोराविया मधील मिकुलोव आणि बोहेमिया मधील प्राग या दोनही शहरांमध्ये यहुदी धर्मगुरू म्हणून त्याने काम केले होते.

त्याला MaHaRaL असेही म्हटले जाते. हिब्रू भाषेत "Moreinu Ha-Rav Loew," (याचा अर्थ आमचा गुरु-यहुदी धर्मगुरू Loew असा होतो.  )   प्रागबाबतीत सर्वांत प्रसिद्ध आख्यायिका "गोलेम" चा रचनाकार म्हणून हा विद्वान प्रसिद्ध आहे. मातीपासून तयार केलेल्या पुतळ्यामध्ये त्याने प्राण फुंकले आणि त्या प्राण्याला "गोलेम" नाव दिले. प्राग मधील ज्यू लोकांचे कट्टर ज्यू द्वेष्ट्या लोकांपासून संरक्षण करण्यासाठी त्याने ही निर्मिती केली होती असे मानतात.

ऊन खात बसलेले बाक आणि बाग (New Town Hall in the background )
तर अशा या बागेला Town Hall आणि गोलेम चा जनक Judah यांची पार्श्वभूमी लाभली आहे. येथे त्या दिवशी एक अनोखा उपक्रम राबवला जात होता : एक मोठ्ठे गुलाबी फुगा-रुपी डुक्कर तेथे उभारले (किंवा फुगवले) होते आणि वराह पालनासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी तेथे काही जणांचा गट सज्ज होता . तसेच डुक्करांची निगा राखण्यासाठी तेथे मार्ग दर्शन केले जात होते. आणि हे सगळे कशासाठी, तर मारण्यापूर्वी डुक्कर तंदुरुस्त आणि निरोगी असावे म्हणून !


हे डुक्कर अर्थातच आमचे भेटण्याचे संकेतस्थळ ठरले होते. राडेक प्राग मध्ये शिकत असल्याने त्याने आम्हाला शहर दाखवण्याची जबाबदारी घेतली होती. प्रागच्या गल्ल्या त्याला सुपरिचित होत्या आणि आम्हाला नकाशा शिवाय बिनधास्त फिरता येणार होते. सर्व प्रथम राडेक ने आम्हाला त्याचा आवडता पब दाखवला:


प्राग मधील प्रमुख आकर्षणांमध्ये याचा समावेश होत नाही, परंतु आमचा गाईड प्रागचा तरुण- राडेक असल्याने आम्हाला त्याच्या नजरेतून प्राग बघणे भाग होते. त्याने आमच्या साठी बहुतेक प्रेक्षणीय स्थळे बघता येतील असा मार्ग निवडला होता. त्याप्रमाणे वाटेत सर्वप्रथम बघावयास मिळाले ते म्हणजे वेलवेट क्रांतीचे स्मृतिशिल्प :
Velvet Revolution memento

झेकोस्लोवाकिया वर ४१ वर्षे राज्य केलेल्या साम्यवादी (Communist) पक्षाविरोधी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली तो हा दिवस :१७ नोव्हेंबर १९८९!  हा दिवस जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून ओळखला जातो , कारण या क्रांतीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग फार मोठा होता. या क्रांतीनंतर झेकोस्लोवाकियामध्ये प्रजासत्ताक स्थापन झाले.
या क्रांती विषयक माहिती घेतल्यानंतर प्रागच्या (फक्त राडेक साठी प्रसिद्ध असलेल्या) गल्ल्या (जेथे तो राहत असे) खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी धुंडाळण्यात आल्या.


दुर्दैवाने राडेकचे "नेहमीचे" दुकान बंद असल्याने त्याला जिभेचे चोचले पुरवता आले नाही आणि आम्ही पुढे निघालो.
एका झगमगीत मोठ्ठ्या इमारतीने आमचे लक्ष वेधून घेतले. Laterna Magika या नावाचे हे मूक-नाट्यगृह असून शाब्दिक संवाद नसल्याने येथील नाटके कुणालाही समजू शकतात. या नाट्य गृहाला लागूनच झेक प्रजासत्ताक चे राष्ट्रीय नाट्यगृह (National Theatre) असून "झेक ओपेरा " या नावाने ते प्रसिद्ध आहे. १८८१ साली सुरु झालेल्या , शंभर वर्षाचा इतिहास असलेल्या या नाट्यगृहाने झेक संस्कृती आणि भाषा जपण्याचे काम चोख बजावले आहे.
Laterna Magika
या नाट्य गृहांना वळसा घालून पुढे गेलो आणि त्याचा परिणाम म्हणून की काय, पात्रीसियाने एक नाटकी टूम काढली. "आपण कोणत्या रस्त्याने जात जात, काय काय बघणार आहोत" याची उत्सुकता वाढल्याने तिने हट्टाने एक नकाशा विकत घेतला आणि राडेक ला (बरोबर) रस्ते खरंच माहीत आहेत का, याची खात्री करण्यास तिने सुरवात केली.
आणि मग राडेक आणि पात्रीसिया दोघांच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही वेन्सिस्लास चौकात (Wenceslas Square) आलो. बोहेमियन संत वेन्सिस्लास यांचे नाव या चौकाला देण्यात आलेले आहे. प्राग मधील New Town या भागातील हा महत्वाचा चौक असून प्रागच्या  ऐतिहासिक केंद्रांमध्ये त्याचा समावेश आहे, इतकेच नव्हे तर "युनेस्को"ने जागतिक वारसा म्हणून गणल्या गेलेल्या स्थळांच्या यादीत वेन्सिस्लास चौकाचे नाव नोंदवलेले आहे.
Wenceslas Square
१३४८ साली जेव्हा बोहेमियन राजा चौथा चार्ल्स याने New Town बांधायला घेतले ,तेव्हा त्याच्या प्लान मध्ये घोड्यांच्या मार्केट साठी वेन्सिस्लास चौकाचा भाग राखून ठेवण्यात आला होता. याचे तत्कालीन नाव Koňský trh ( म्हणजे झेक भाषेत Horse Market) असे होते. पुढे एकोणीसाव्या शतकात जेव्हा संत वेन्सिस्लास यांचा पुतळा येथे बांधण्यात आला , तेव्हा या चौकाचे पुन्हा नामकरण करण्यात आले. चौदाव्या शतकापासून घडत आलेल्या युरोपातील अनेक महत्वाच्या घटना येथून सुरु झाल्याचे सांगण्यात येते. महत्वाची आंदोलने , निदर्शने , १९८९ मधील वेलवेट क्रांती, आणि सध्याच्या काळात झेक बिअर फेस्टिवल … प्राग मधील झेक लोकांचे (कुठल्याही कारणासाठी) एकत्र येण्याचे एक आवडते ठिकाण म्हणजे वेन्सिस्लास चौक !

National Museum

 या वेन्सिस्लास स्क्वेअर च्या एका  बाजूला National Museum आहे ज्यामध्ये एक कोटी चाळीस लाख वस्तूंचा संग्रह केला आहे, असे सांगण्यात आले. आत जाऊन शहानिशा करायला अर्थातच वेळ नव्हता !
तेथे एक ग्रुप फोटो काढून आम्ही Republic Square कडे निघालो. प्राग च्या Old Town भागामधील हा महत्वाचा चौक आहे. Municipal House ची आकर्षक इमारत पटकन नजरेत भरते.
एके काळी बोहेमियन राजा चौथा चार्ल्सच्या राहण्याचे ठिकाण असलेली ही इमारत सध्या  "स्माताना हॉल" या प्रसिद्ध concert हॉल ला आपल्यात सामावून घेऊन बसली आहे.
Municipal House
या हॉल च्या शेजारीच अकराव्या शतकापासून अस्तित्वात असलेले प्राचीन Powder Gate आहे. Old Town चे प्रवेशद्वार म्हणून बांधले गेलेले हे महाद्वार चौदाव्या शतकात स्तंभरुपात घडवण्यात आले. बोहेमियन राजांनी याचा उपयोग प्रामुख्याने बंदुकीची दारू (गन पावडर ) ठेवण्यासाठी केलेला असल्याने याचे नाव "Powder Gate" पडले.
Powder Gate

 पावडर गेट पासून काहीच मिनिटांच्या अंतरावर झेक राष्ट्रीय बँकेचे प्रमुख कार्यालय आहे: त्यावरील सिंहावर आरूढ झालेल्या पिळदार शरीर यष्टीच्या , हाती मशाल घेतलेल्या तरुणाची प्रतिकृती उठून दिसते. सिंह आणि  झेक राजे यांचे एक अतूट नाते आहे आणि ते एका आख्यायिकेवर बेतलेले आहे. ही आख्यायिका थोडक्यात (राडेक च्या शब्दांत ) पुढीलप्रमाणे : बृंचविक (Bruncvík) नावाचा राजा जेव्हा प्राग सोडून राज्यविस्तार करण्यासाठी मोहिमा आखत  होता तेव्हा रस्ता चुकून तो एका अरण्यात आला. त्याने पांढऱ्या सिंहाला एका नऊ तोंडे असलेल्या dragon बरोबर लढताना पाहिले. तेव्हा त्याने दोन दिवस लढाई करून सिंहाला वाचवले आणि dragon ची नऊ मुंडकी कापून काढली. तेव्हापासून तो सिंह राजाचा एकनिष्ठ सेवक राहिलेला आहे. या प्रवासात राजाला जादूची तलवार मिळाली जिला फक्त हुकुम केला असता शत्रूची डोकी आपोआप उडवणे शक्य होते.
Czech National Bank
Old Town प्राग मध्ये चार्ल्स विद्यापीठ बाहेरून पाहण्याचा योग आला. युरोपातील चौदाव्या शतकापासून अव्याहतपणे चालू असलेल्या मोजक्या जुन्या विद्यापीठांपैकी एक म्हणजे चार्ल्स विद्यापीठ होय. बोहेमियन राजा चौथा चार्ल्स याने हे विद्यापीठ १३४८ साली सुरु केले. Latin मध्ये हे नाव Universitas Carolina असे लिहिले जाते :

Old Town चा एक भाग विविध नाट्य गृहांनी व्यापला आहे. त्यापैकी उल्लेखनीय म्हणजे Stavovské divadlo (म्हणजे इस्टेट theatre) आणि Black Light Theatre ! स्तवोव्स्के हे नाट्यगृह हे खास झेक संस्कृतीशी निगडीत खेळ दाखवण्यासाठी प्रसिद्ध आहे. Black Light Theatre हे काळे पडदे आणि काळाकुट्ट सेट तयार करतात आणि कलाकार fluorescent कपडे घालून आणि अतिनील (ultra -violet) प्रकाशाचा वापर करून दृग्गोचर भास (दृष्टीला फसवतील असे) पेश करून मनोरंजन करतात:

त्यांचा शो पाहण्याची मला खूप उत्सुकता होती, मात्र रात्री साडेआठ च्या आधी एकही खेळ नसल्याने आम्ही पुढे निघालो.  एव्हाना बारा वाजत आले होते. बाराच्या ठोक्याला आम्हाला प्रागच्या अतिभव्य खगोलशास्त्रीय घड्याळाच्या पुढे उभे राहायचे होते. दर तासाला या घड्याळातील  (बायबल मध्ये सांगितल्याप्रमाणे) येशूने ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी पाठवलेले बारा  Apostle आणि इतर शिल्पे ( एक मानवी हाडांचा सांगाडा सुद्धा) यांचा हलता देखावा बघावयास मिळतो.
At Astronomical Clock (from left) Radek, Patricia, Unmesh , Roman

Old Town Square या आणखी एका महत्वाच्या चौकात असलेल्या Old Town हॉल च्या दक्षिण बाजूकडील भिंतीवर हे भव्य मध्ययुगीन घड्याळ घडवण्यात आलेले आहे. तिथे पर्यटकांची तोबा गर्दी जमली होती. Old Town Square या परिसरात मध्ययुगीन इमारती आणि शिल्पे यांची रेलचेल आहे.
"Church of Our Lady in front of Týn" with Patricia
मध्ययुगीन Gothic शैलीचे नमुनेदार उदाहरण म्हणून "Church of Our Lady in front of Týn" हे चर्च प्रसिद्ध आहे. त्याचे उंच निमुळते मनोरे फक्त सौन्दर्यातच भर घालत नाहीत तर या चर्चला एकमेवाद्वितीय बनवतात.
या चर्चच्या समोरच झेक समाज-सुधारक आणि तत्वज्ञ जॉन हस (John Hus) याचे स्मृतीशिल्प आहे. कट्टर कॅथोलिक परंपरांना आणि तत्कालीन चर्चच्या जाचक अंधश्रद्धा यांना आव्हान देणारी त्याची विचारसरणी आणि चार्ल्स विद्यापीठाला त्याने दिलेले योगदान यांमुळे त्याला युरोपातील पहिला धर्म-सुधारक मानले जाते.
John Hus Statue at Old Town Square
या गर्दीने गजबजलेल्या भागातून बाहेर पडल्यावर आणखी काही नाट्यगृहे बाहेरून पाहून चार्ल्स ब्रिज पाहायला जायचे होते.
बाहुलीनाट्य सादर करणारे Marionette Theatre
 आणि
Ta Fantastika !
दुपारचे जेवण एका बिअर बार मध्ये उरकून आम्ही सुप्रसिद्ध चार्ल्स ब्रिज कडे निघालो. ब्रिज च्या समोरच प्राग मधील सर्वांत जुने चर्च "Church of the Most Holy Saviour" असून पूर्वीच्या काळी येथे शाही टांकसाळ (नाणी घडवण्याची जागा) होती.
Church of the Most Holy Saviour
चार्ल्स ब्रिज चे झेक नाव Karlův most असून रोमन सम्राट चौथा चार्ल्स याने या पुलाची पहिली वीट बसवली होती.
अंकशास्त्राचा प्रभाव असणारा राजा असल्याने या पुलाचे बांधकाम मुहूर्त साधून सुरु करण्यात आले होते : १३५७,९,७,५.३१ : म्हणजे १३५७ साली ९ जुलै सकाळी ५ वाजून एकतीस मिनिटे ! बरोब्बर या वेळी पहिला दगड रचण्यात आला. हा आकडा कुठूनही वाचला तरीही तोच राहतो (palindrome number). हा पूल म्हणजे प्राग चा किल्ला आणि Old Town हा भाग यांच्यातील महत्वाचा दुवा आहे.


Charles Bridge and Prague Castle (to the right)

 १८४१ सालापर्यंत हे दोन भाग जोडणारा हा एकमेव पूल होता. अनेक युद्धे आणि योद्धे पाहिलेल्या या "पुलाखालून बरेच पाणी गेलेले आहे" आणि या पुलाच्या विटा न विटा इतिहासातील रंजक गोष्टी सांगू शकतील असे वाटते. 
 
Tower of the Charles Bridge

 पूल ओलांडून आम्ही किल्ल्याकडे कूच केले. वाटेत एका फेरीवाल्याकडून झेक पारंपारिक चमचमीत खाद्यपदार्थ "Trdelník"  घेतला. मूळच्या हंगेरीचा असणारा हा गोड पदार्थ आपल्याकडच्या चिरोट्या सारखा लागतो :
Trdelník

 किल्ल्यावर जाण्यासाठी चढाचा रस्ता असला तरी हा चढ फारसा दमवणारा नाही. प्राग चा किल्ला हा नवव्या शतकापासून अस्तित्वात असून जगातील सर्वांत जुना किल्ला म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये त्याची नोंद आहे. किल्ल्याच्या आवारात अनेक देखणे राजवाडे, पवित्र चर्च , वैशिष्ट्यपूर्ण कॅथेड्रल्स , प्रसन्न बागा आणि ऐतिहासिक हॉल्स आहेत.
A Palace and  St.Vitus Cathedral of the Prague Castle


 प्राग च्या किल्ल्यावरून Little Quarter आणि Old Town हे प्राग चे  भाग अतिशय सुंदर दिसतात.
Bird Eye view of Prague from Prague Castle
किल्ला फिरून झाल्यावर किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूने उतरलो. तेथून राडेकने जिथे कार पार्क केली होती त्या ठिकाणी जायला सोईची मेट्रो होती. मेट्रो स्टेशन जमिनीखाली जवळ जवळ दोन-तीनशे मीटर खोल होते. स्टेशन पर्यंत जाण्यासाठी क्षणभर धडकी भरेल असा escalator होता :
Escalators in Prague Metro stations
 
राडेक ने आम्हाला अर्ध्या  दिवसात प्राग दर्शन घडवले होते… आता येथून पुढे त्याला त्याच्या घरी म्यएनिक ला जाण्याचे वेध लागले होते.  म्यएनिक हे प्राग च्या उत्तरेस असलेले, व्लतावा आणि लाबं या नद्यांच्या संगमावर वसलेले एक छोटे शहर आहे. प्रामुख्याने वाईन उद्योगासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. हायवे ने तासाभरात आम्ही म्यएनिकला पोचलो सुद्धा !
 म्यएनिकचा प्रसिद्ध किल्ला शहरात प्रवेश करतानाच उजवीकडे दिसतो. या किल्ल्याला वाईन ठेवण्यासाठी मोठ्ठी तळघरे आहेत आणि नदीच्या बाजूस आता रोइंग क्लब विकसित केला आहे. 
The Castle of Melnik

Confluence of the Vltava and the Labe

 व्लतावा आणि लाबं या नद्यांचा संगम पाहून आम्ही राडेक च्या घरी गेलो. राडेकचे घर टुमदार हे विशेषण मनात ठेवूनच बनवले असावे असे वाटले :

 राडेकला संगीतात विशेष रुची असल्याने आणि तो एक उत्तम rower (नौकानयन-पटू) असल्याने त्याची खोली गिटार , ग्रामोफोन, त्याची मेडल्स आणि बक्षिसे यांनी भरून गेली होती. मी सोडून इतर सर्वांना गिटार वाजवता येत असल्याने रोमान, पात्रीसिया आणि राडेक यांनी एक छान मैफिल जमवली. नंतर राडेक ने खास आमच्या साठी राखून ठेवलेली El Dorado उघडली आणि आम्ही शांत संगीत ऐकण्यात "रम"माण झालो.
 राडेक च्या आईने तोपर्यंत स्वयंपाक तयार ठेवला होता. मी एकटा शाकाहारी असल्याने माझा खास विचार करून राडेकने त्याच्या आईला स्वयंपाक करायला सांगितला होता . कोबीचे वडे, भाज्यांचे मिश्रण घालून केलेले पकोडे आणि चॉकलेट केक अशी माझ्या सोईने मी त्या खाद्य पदार्थांना नावे दिली.
Dinner prepared by Radek's mother
दमदमीत डिनर करून आम्ही शहरात फिरायला (खरं म्हणजे प्यायला) निघालो. राडेक चा भाऊ शेपान कार ने आम्हाला सोडायला आला. Němý Medvěd (न्यमी मेदव्यद) या बिअर बार मध्ये दोन-अडीच तास घालवले. राडेक च्या मते हा तिथला सर्वांत चांगला बार असल्याने इतर कुठेही जाण्याची गरज नव्हती. राडेक ला तिथेच त्याचा एक जुना मित्र भेटल्याने त्याला झिंगायला फार वेळ लागला नाही.


तिथली बिअर स्वादिष्ट होती यात वाद नव्हता पण घरी चालत जायचे होते हा विचार करून आम्ही प्रमाणात घेतली होती. बार मधून बाहेर पडल्यावर मात्र राडेक ला उचलून घरी न्यावे लागणार असे वाटत होते. मात्र एक -दीड किलोमीटर चालून गेल्यानंतर चमत्कार झाला: राडेक  घराच्या दिशेने पळू लागला. आणि पाहता पाहता दृष्टीआड  गेला. मोठीच पंचाईत झाली ! आम्हाला कुणालाही घराचा रस्ता माहीत नव्हता. कारने बार पर्यंत आलेलो असल्याने आणि अशी काही वेळ येईल याची काडीमात्र कल्पना नसल्याने आम्हाला काय करावे कळत नव्हते. राडेकचा फोन घरी होता. आणि त्याचा आईचा किंवा भावाचा फोन नंबर घेतला नव्हता. दिशांचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे चालू लागलो. एका अनपेक्षित वळणावर राडेक आमची वाट बघत थांबला होता. त्याचे स्पष्टीकरण तर वळणापेक्षाही अनपेक्षित होते : तो म्हणाला, " मी नेहमीच दारू पिऊन घरी पळत जातो , म्हणजे लवकर घरी पोचता येते, आज मात्र अर्धे अंतर गेल्यावर लक्षात आले की तुम्हाला मागे सोडून आलो आहे… ".  घरी पोचेतो बारा वाजून गेले होते आणि घरी पोचलो याच गोष्टीचा खूप आनंद झाला होता. (क्रमशः )

सर्व छायाचित्रे : उन्मेष, पात्रीसिया
संदर्भ : विकिपीडिया, झेक मित्रांकडून ऐकलेल्या लोककथा

गुरुवार, २० मार्च, २०१४

मध्य युरोपिअन सहल : विएन्ना (दिवस दुसरा)


गुरुवार २० मार्च २०१४ :  विएन्ना दर्शन

साडेसात वाजता उठलो.  विएन्ना ला जाणारी बस साडे नऊ वाजता होती. रोमान च्या घरा पासून  ट्रॅम ने  बस स्थानकापर्यंत गेलो.

रोमानला कॉलेज  मध्ये काम असल्याने तो मला बस स्थानकापर्यंत सोडावयास आला होता.
रोमान जर आला नसता तर माझी बस नक्कीच चुकली असती . बस वर Vídeň अशा नावाची पाटी होती. झेक मध्ये विएन्ना या शहराचे नाव Vídeň असे लिहितात. (आणि उच्चार वीदेन्य असा होतो ! )  रोमानने मला बस मध्ये बसवून दिले. student agency या संस्थे च्या बस मध्ये चहा पासून टी.व्ही. पहाण्यापर्यंत सर्व सोयी होत्या.  एक तास आणि चाळीस मिनिटे अशा या प्रवासात मिकुलोव नावाचे एक सुंदर खेडेगाव बघायला मिळते,
Mikulov as seen from the bus

तसेच मोराविया (झेक प्रजासत्ताक चा एक प्रांत) च्या  नैसर्गिक विविधतेचा आढावा या प्रवासात घेता येतो.


साडे अकरा च्या सुमारास विएन्ना मधील Stadioncenter या ठिकाणी पोचलो. तेथून Karlsplatz या स्थानकापर्यंत जांभळ्या मेट्रो लाईन ने जावे लागते. अलेक्स नावाचा मित्र तेथे घ्यायला येणार होता. त्याने सुचवल्याप्रमाणे मी मेट्रो चा एक दिवसाचा पास (७.१० युरो) घेतला. आणि Karlsplatz येथे पोचल्यावर अलेक्सला फोन केला. अलेक्स विएन्नाचा रहिवासी असल्याने त्याने मला शहर दाखवण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारली होती.

तो येईपर्यंत मी रोमान च्या घरून आणलेला डबा संपवला तसेच थोडा फलाहारही केला. अलेक्स च्या  Technische Universität Wien (विएन्ना तंत्र विद्यापीठ ) पासून आम्ही सुरवात केली. विद्यापीठाची इमारत जरी (आतून) नवी असली तरी तिचा इतिहास १३ व्या शतकापर्यंत मागे जातो. विद्यापीठाच्या इमारतींच्या आत मध्ये फिरताना एखाद्या संग्रहालयाचा आणि आवारात फिरताना भव्य चर्च चा फील येत राहतो.
Wien University (मुख्य प्रवेश द्वारातून आत गेल्यानंतर)



विद्यापीठाच्या वाचनालयाची इमारत सुद्धा पटकन नजरेत भरेल अशी आहे :
Wien University Library Building
तेथून जवळच Otto Wagner चे स्मारक आहे. Otto Wagner (१८४१-१९१८) हा विएन्ना मधील अनेक वैशिष्ट्यपूर्ण इमारतींचा रचनाकार असून त्याने आराखडा तयार केलेल्या अनेक वास्तूंवर Jugenstil  या शैलीचा प्रभाव आहे. स्पेन मधील Antoni Gaudi प्रमाणे Otto Wagner याला ऑस्ट्रियामधील  आधुनिक स्थापत्य कलेचा जनक मानले जाते.  Karlsplatz हे मेट्रो चे स्थानक म्हणून अस्तित्वात येण्यापूर्वी या स्मारकाच्या ठिकाणी विएन्ना चे रेल्वे स्थानक होते. १९५९ सालापर्यंत ते कार्यान्वित सुद्धा होते, मात्र त्यानंतर शहराला नवीन रूप देण्यासाठी जेव्हा या भागाची पुनर्रचना करण्यात आली , तेव्हा या भुयारी स्थानकाचे स्मारक करून त्यात Otto  Wagner च्या कार्याची माहिती देणारे संग्रहालय उघडण्यात आले.
Otto Wagner Pavilion on Karlsplatz

 अलेक्स हा स्वतः Architecture चा विद्यार्थी असल्याने आणि इतिहासामध्ये रस घेत असल्याने एका उत्तम टूर गाईड ची भूमिका बजावण्यासाठी सक्षम होता.  त्याने सांगितल्याप्रमाणे शहराची पुनर्बांधणी करताना अनेक भुयारी स्थानकांचे पब्स किंवा संग्रहालये यांमध्ये पर्यावसान झाले आहे. एका पब मध्ये तर चक्क platform आणि रेल्वेचे रूळ सुद्धा तसेच ठेवले आहेत.

Karlsplatz सोडल्यानंतर सिटी सेंटर ला एक मोठ्ठी प्रदक्षिणा घालण्याचा अलेक्स चा बेत होता. त्यासाठी तयारी म्हणून एका मॉल मधून पिण्यासाठी खास ऑस्ट्रियाचे राष्ट्रीय पेय (Almdudler ) घेतले. यात प्रामुख्याने सफरचंद , द्राक्षे, आणि औषधी वनस्पतींचा अर्क यांचा समावेश असतो.
Almdudler

प्रदक्षिणेला सुरवात केल्यानंतर दृष्टीस पडलेले (किंवा  माझ्या लक्षात आणून दिलेले ) पहिले प्रेक्षणीय स्थळ म्हणजे Vienna State Opera ! City of  Music (संगीताचे शहर) अशी ओळख असलेल्या विएन्ना च्या या ओपेरा हाऊस मध्ये विख्यात ओपेरा गायक नेमाने कार्यक्रम करतात. ओपेराच्या त्या इमारतीमध्ये ही एक प्रकारचा लयबद्ध पणा आढळला:

Vienna State Opera

Albertina हे विएन्ना मधील सर्वांत मोठे चित्रांचे संग्रहालय ओपेरा पासून दहाच मिनिटांच्या अंतरावर आहे : या संग्रहालयात सुमारे ६५००० चित्रे असून १४ व्या शतकापासून काढलेल्या चित्रांचा त्यात समावेश आहे. संग्रहालयाची इमारत प्रेक्षणीय असून शहरामधील बहुतांश जुन्या इमारतींप्रमाणे त्यावर घोडेस्वाराची प्रतिकृती आहे. ही शिल्पे बघून, एके काळी युरोपातील बलाढ्य साम्राज्य म्हणून मिरवलेल्या ऑस्ट्रिया मध्ये अनेक शूर वीर योद्धे होऊन गेले असणार याची प्रचीती  येते.

Albertina Museum (side view)
Albrecht Dürer या जर्मन चित्रकाराने १५०२ साली काढलेले सशाचे चित्र अतिशय प्रसिद्ध असून शहरात ठिकठिकाणी त्याची (सशाच्या चित्राद्वारे संग्रहालयाची ) जाहिरात दिसत होती:
Young Hare (Albrecht Dürer, १५०२)
Albertina museum ला लागूनच एक मोठे ग्रीन हाऊस आहे आणि ग्रीन हाऊस मध्येच एक उपहारगृह विकसित केले आहे. त्यामध्ये ग्रीन हाऊस मध्ये पिकवलेल्या ताज्या भाज्यांचे सलाड लोकं आवडीने खातात. Palmen Haus नावाच्या या उपहारगृहा-समोरच एक विस्तीर्ण पार्क आहे. २० मार्च ही खरोखरीच येथील वसंताची सुरवात असल्याने आणि त्यानुसार सूर्याने (आखडते किरण न घेता) लख्ख प्रकाशित दिवस दिल्याने तिथे स्थानिक आणि पर्यटक मंडळींची झुंबड उडाली होती.
शहराच्या मध्य वस्तीत असलेले पार्क

पार्कच्या दुसऱ्या बाजूस Hofburg नावाचा किल्ला (Burg म्हणजेच जर्मन भाषेत किल्ला) आहे. हा किल्ला १२ व्या शतकापासून युरोपमध्ये घडत आलेल्या (राजकीय) घडामोडींचा मूक साक्षीदार आहे.  किल्ल्याच्या प्रदर्शनीय मनोऱ्यावरील एक Latin शिलालेख लक्ष (दिल्यास) वेधून घेतो :
  अलेक्स च्या सांगण्यानुसार त्याचा अर्थ : "या इमारतीमध्ये मी माझ्या देश बांधवांचा स्नेह बांधून ठेवत आहे", असा होतो.
या किल्ल्याचे आवार नवनवीन राजवाडे, संग्रहालये बांधून  वाढवण्यात आलेले आहे. पैकी उल्लेखनीय ठिकाणे पुढीलप्रमाणे :
 Naturhistorisches Museum (ऑस्ट्रियन निसर्गाच्या इतिहासाचे संग्रहालय)
Natural History Museum, Vienna

आणि Kunsthistorisches Museum (ऑस्ट्रियन कलेच्या इतिहासाचे संग्रहालय), ही दोन्ही संग्रहालये एकत्रितपणे जुळी (Twin Museums) म्हणून ओळखली जातात. Burgtheater (फक्त राजघराण्यातील लोकांसाठी सिनेमा बघण्याचे ठिकाण )
Hofburgstheater


,  ऑस्ट्रियाचे  राष्ट्रीय वाचनालय : यात ७४ लाख पुस्तके असून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका म्हणून हे वाचनालय सातही दिवस खुले असते.
Austrian  National Library


Spanische HofreitSchule ( स्पानिश घोड्यांची प्रशिक्षण शाळा ) : "घोड्यांची पागा" यासारखी जागा पुण्या सारख्या ठिकाणी हुजूर-पागा नाहीतर ठोसर-पागा होते, येथे मात्र चार शतकांचा इतिहास असलेल्या या घोड्यांच्या पागेचं "तबेला"पण टिकवून ठेवलं  आहे: Lipizzan जातीच्या (फक्त) करड्या घोड्यांसाठी येथे प्रशाला (अश्वशाळा)  आहे आणि या शाळेत पारंपारिक गणवेश घातलेल्या स्वारांसह Classical Dressage बघण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. Classical Dressage म्हणजे नैसर्गिक घोडे सवारी : घोड्याला लगाम न घालता त्याच्याशी जुळवून घेत घोडा चालवणे. 
Spanish (Horse) Riding School
 वरील चित्रातील घोडे जरी Lipizzan जातीचे असले तरी ते टांग्याला जोडले असल्याने त्यांना वेगळे प्रशिक्षण दिले जाते.  एकंदरीतच Hofburg किल्ल्याचे आवार विस्तीर्ण असल्याने अनेक वास्तू लांबून बघूनसुद्धा भव्य भासतात :
National Library (captured most of its length)

City Hall of Vienna
View of City Center from Hofburg

 Hofburg नंतर प्रदक्षिणेतील महत्वाचा थांबा म्हणजे  Michaelerplatz हा होता. ऐन सिटी सेंटर "मध्येच" मोठ्ठा खड्डा खणून ठेवल्यामुळे काहीसा शोभा घालवणारा हा चौक "खोल" वर जाऊन पाहिल्यास इतिहासातील अनेक रंजक गोष्टी सांगू इच्छितो. पुरातत्वीय उत्खनन करताना येथे , इ.स.पू. १५व्या शतकातील रोमन साम्राज्याच्या इतिहासाशी सुसंगत ( टेहेळणी साठी उपयुक्त अशा चौक्या, तटबंदी वगैरे ) असे अनेक अवशेष आढळले. ऑस्ट्रिया आणि स्लोवेनिया जेव्हा रोमन साम्राज्याचा भाग होते तेव्हा डन्युब नदीने या साम्राज्याची हद्द अधोरेखित केली होती. तेव्हा , या नदीच्या किनारी किल्लेवजा तटबंदी उभारून रोमनांनी Vindobona नावाची लष्करी छावणी स्थापन केली होती. हा भाग आजच्या विएन्ना चा सर्वात गर्दीचा आणि नागरिकांनी एकत्र येण्याचा चौक आहे. ऑस्ट्रियन सैनिक अपवादानेच येथे फिरकतात.
Remains of the Roman outpost at Michaelerplatz
 सिटी सेंटर च्या या भागात ठिकठिकाणी अनेक पुतळे आहेत. घोडेस्वार आणि राजे यांच्या पुतळ्यांच्या गर्दीत (घोड्याशिवाय) उभ्या असलेल्या आणि त्याच्या मागे आश्चर्यचकित झालेल्या माणसांचे पुतळे बघून नवल वाटतं.
Liechtenstein - The  "country"-man

अलेक्सने सांगितलेली पुढील गोष्ट ऐकून तर मोठाच अचंबा वाटला : Liechtenstein  (मराठी उच्चार लीकटेनस्टाईन) या नावाचा देश आहे ज्याचे नाव एका राजाच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे. हा देश ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड यांच्या "मध्ये" असून फक्त १६० स्क्वेअर किलोमीटर इतकाच त्याचा विस्तार आहे. लीकटेनस्टाईन या राजघराण्याने तेराव्या शतकापासून तेथे राज्य केलेले आहे, त्यामुळे तेथे constitutional monarchy (घटनात्मक राजेशाही : जेथे राजा राज्याचा फक्त नामधारी प्रमुख असतो.)  जगातील सर्वांत जास्त (आणि सर्वांत महागड्या ) चित्रांचे संकलन करण्याचा विक्रम लीकटेनस्टाईन राजांचा आहे.

Musiemsquartier  हा सिटी सेंटर मधील museums नी वेढलेला विशाल भाग असून हा जगातील आठव्या क्रमांकाचा मोठा सांस्कृतिक भाग आहे. येथे विएनिस नागरिकांना आवडणारी अशी एक गोष्ट आहे : ते म्हणजे ऊन खाण्यासाठी इथे ठेवलेले बाक. ही अतिशय साधी गोष्ट संपूर्ण विएन्ना अल्पावधीतच सुप्रसिद्ध झाली आणि विएनिस नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनली आहे.
Musiemsquartier

 या बाकांना दरवर्षी कोणता रंग द्यावा यासाठी मतदान होते. येथे बसून घरून आणलेली बिअर (हॉटेल मध्ये न जाता ) पिता यावी यासाठी विएनिस नागरिकांनी आंदोलन केल्याचे अलेक्सने सांगितले. बरेच चालल्यानंतर इथे ऊन खात विश्रांती घेण्याची आम्हाला गरज होतीच.
पुरेशी विश्रांती घेऊन आम्ही पार्लमेंट कडे "मोर्चा" वळवला.
Austrian Parliament
आता आम्ही इतका वेळ लांबून बघत असलेल्या सिटी हॉल च्या पुढ्यात आलो होतो. मी आता पर्यंत बघितलेल्या सिटी हॉल्स पैकी सर्वांत आवडलेली इमारत या हॉल ची आहे :
City Hall of Vienna

 एव्हाना आमच्या प्रदक्षिणेचा अखेरचा टप्पा जवळ आला होता : Graben (ग्राबेन) हा विएन्ना मधला एक अतिशय प्रसिद्ध रस्ता! मराठीत graben याचा अर्थ शब्दशः खणणे असा होतो. पहिले अक्षर कॅपिटल असल्यास जर्मन भाषेत ते नाम (noun) असते, म्हणून Graben चा अर्थ भुयार / बंकर असा घेत येईल.


Graben Street , Vienna
पुरातत्वीय उत्खनन आणि जुन्या रोमन साम्राज्याचे संदर्भ जोडल्यास  Michaelerplatz पासून सुरु झालेली तटबंदी थेट इथपर्यंत येऊन भिडली होती, असे म्हणता येईल. Graben हे नाव त्या काळापासून बदललेले नाही:


 या प्रसिद्ध रस्त्यालगतच तितकेच सुप्रसिद्ध  St. Stephan's Cathedral (सेंट स्टेफन्स कॅथेड्रल) आहे. नूतनीकरणाच्या प्रक्रियेमधून जात असले तरी, त्याचे रंगीबेरंगी छत लक्ष वेधून घेत होते:

या चर्च नंतर पुन्हा Wien University च्या दिशेने जाण्यास सुरवात केली. वाटेत Zanoni & Zanoni या विएन्ना मधील प्रसिद्ध आईस्क्रीम-चेन च्या एका शाखेला भेट देऊन दोघांनी कपभर आईस्क्रीम भरून घेतले :

प्रदक्षिणेतील शेवटची दाखवली गेलेली इमारत म्हणजे युरोपिअन Council ची विएन्ना मधील मुख्य इमारत


दोन डोकी असलेली गरुडाची मूर्ती ऑस्ट्रिया- हंगेरी या दोन राज घराण्यांचे प्रतिनिधित्व करते. काही तत्वज्ञ असेही मानतात  की गरुड हे नेहमीच रोमन साम्राज्याचे आवडते विजयात्मक प्रतीक राहिलेले आहे, आणि पूर्व- पश्चिम दोन्ही दिशांना राज्य करणारे रोमन म्हणून या गरुड-शिल्पाला दोन डोकी आहेत. दोन डोकी असलेला गरुड हा जुन्या रोमन साम्राज्याचा Coat of Arms  ( ढालीवरील सुशोभीकरणासाठी वापरतात ते चिन्ह ) चा भाग आहे.

अशा प्रकारे विएन्ना च्या सिटी सेंटर ला एक प्रदक्षिणा झाल्यावर एक गोड प्रसाद घेणे क्रमप्राप्त होते :
Original Sacher -Torte

विएन्ना येथेच फक्त मिळणारा इथला खास असा चॉकलेट केक म्हणजे Sacher-Torte ! हा केक खाऊन आणि कॉफी पिऊन मी अलेक्स चा निरोप घेतला. त्याला शहर दाखवल्याबद्दल धन्यवाद दिले.
Schönbrunn palace हा विएन्ना मधील सर्वात मोठ्ठा राजवाडा बघण्यासाठी सिटी सेंटर पासून मेट्रोने १५-२० मिनिटे लागतात. राजवाड्यामध्ये जाण्याची वेळ टळून गेल्याने फक्त बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले:
Schönbrunn Castle , Vienna
हा किल्ला बाहेरून फिरून मी Karlsplatz कडे परत फिरलो. ब्रनो ला परत जाणारी बस मला चुकवायची नव्हती.
Stadion या स्टेशन वर बसच्या वेळेच्या तासभर आधी आलो. एका हॉटेल मध्ये जाऊन पिझ्झा खाल्ला. पाय चालून चालून दमले होते.
ब्रनो ला जाणाऱ्या बसमध्ये मस्तपैकी ताणून दिली. साडे नऊ च्या सुमारास ब्रनो ला पोचलो, तर मला घ्यायला रोमान ने चक्क यिरकाला पाठवले होते. तो स्वतः, दानिएला (रोमान ची गर्लफ्रेंड ) बरोबर आम्हाला थेट एका पब मध्ये भेटला.
With Czech Friends @ local pub , Brno, Czech Republic
रोमान च्या घरी जायला बारा वाजून गेले. आजचा दिवस खऱ्या अर्थाने अलेक्सने माझी टूर उत्तम प्रकारे गाईड करून स्मरणीय केला होता.  रोमानला विएन्नाच्या गोष्टी सांगत आणि त्याच्या कडून ब्रनो गोष्टी च्या ऐकत झोप कधी लागली ते समजलेच नाही. स्वप्नात प्रागचा किल्ला आणि प्रागमधील सुंदर पूल येत होते. (क्रमशः)
With Alex in front of the Hofburg