Translate

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

देवांच्या देशात ("ग्रीस"हल) : अथेन्स मध्ये आगमन


     २०२० जानेवारी पासून नेदरलँड्स च्या बाहेर पडू शकलो नव्हतो. करोना मुळे प्रवासावर बंधने आली होती. २०२१ च्या समर मध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे जरा फिरायला वाव होता, परंतु जेव्हा हवामान सूर्यप्रकाशित असते तेव्हा नेदरलँड्स मध्ये थांबावे आणि नंतर प्रवासाची आखणी करावी अशा विचाराने ऑगस्ट च्या अखेरीस ग्रीस चा बेत ठरला. पुण्यात असताना जशी थंड हवेची ठिकाणे (माथेरान, महाबळेश्वर) फिरण्यासाठी कायम फॉर्म मध्ये असायची तशी युरोपात उष्ण हवेची किंवा अधिक सूर्यप्रकाशाची ठिकाणे कायम फॉर्म मध्ये असतात. ग्रीस हे तर "हॉट" डेस्टिनेशन !

वासिलीस हा "क्रंचर" कंपनी मध्ये काम सुरु केल्यानंतर झालेला मित्र. मूळचा ग्रीक पण आता ॲम्स्टरडॅम मध्ये स्थायिक. नाथन आणि वासिलीस यांची मैत्री तशी जुनी होती. नाथन ला २०२१ च्या सुरवातीला अती कामामुळे "बर्न आउट" चा  त्रास झाल्यामुळे त्यातून बाहेर यायला मदत म्हणून वासिलीसने आम्हा दोघांना ग्रीस च्या सहलीचे आमंत्रण दिले. तो पूर्ण समर (जून-ऑगस्ट) अथेन्सहूनच काम करणार होता. ऑगस्ट च्या अखेरचे दोन आठवडे सुट्टी घेऊन त्याने त्यातील एक आठवडा आमच्या सोबत रोड ट्रिप करायचे ठरवले. त्यानुसार २८ ऑगस्ट ला आम्ही दुपारच्या विमानाने साडेतीन तास प्रवास करून अथेन्स मध्ये दाखल झालो. 


दिवस पहिला : २८ ऑगस्ट २०२१, अथेन्स मध्ये आगमन 

वासिलीस आम्हाला घ्यायला आला होता. विमानतळाचे गेट ते पार्कींग या शंभर मीटर अंतरातच तापमानातील फरक जाणवला. 

ॲम्स्टरडॅम मधील समर असूनही २० पेक्षा कमी असलेले तापमान आणि अथेन्स मधील समर संपत असताना ३० पेक्षा जास्त असलेले तापमान यामुळे आनंदाने आम्ही जॅकेट उतरवले आणि बॅगमध्ये सर्वांत तळाला ठेवून दिले! पाऊस आणि वारा यांनी संपूर्ण समर ॲम्स्टरडॅम मध्ये तळ ठोकला असल्याने जॅकेट शिवाय बाहेर पडता येणे या गोष्टीचे अप्रूप वाटावे इतकी जॅकेट ची सवय झाली होती. पण अथेन्स मध्ये एकूणच उष्णतेमुळे आणि हवेतील आर्द्रतेमुळे मुंबई विमानतळावर आल्यावर जसे घामेजून जायला होते तसे झाले. वासिलीसने गाडीतील एसी चालू केला तेव्हा कुठे बरे वाटले. गाडी सुरु करताच त्याने त्याच्या पाठदुखीच्या त्रासाचे गाऱ्हाणे सांगितले आणि त्याची गाऱ्हाणी आम्हाला सहल-भर ऐकून घ्यावी लागतील अशी ताकीदही दिली. मी आणि नाथनने त्याची चेष्टा केली जाईल असा त्याला इशारा दिला ;) 

विमानात स्टीफन फ्राय या लेखकाने लिहिलेले "Heros" नावाचे ग्रीक पौराणिक कथांचे पुस्तक वाचायला सुरवात केली होती.  त्यातील ज्ञान पाजळावे म्हणून वासिलीस ला काही प्रश्न विचारावे तर त्याने "मला ग्रीक पुराणकथा काही माहीत नाहीत" असे स्पष्ट सांगून माझीच विकेट काढली. 

वासिलीसच्या बहिणीच्या फ्लॅट वर उतरलो. फ्लॅटची इमारत मुंबई च्या मरीन ड्राइव्ह ची आठवण करून देणाऱ्या रस्त्यावर आहे. 

तेथे पोचताच वासिलीसने ग्रीक सॅलड बनवले. या सॅलड मध्ये काही खास पदार्थ असतात:  ग्रीक टोमॅटो (हे चवीला खरंच वेगळे आणि अधिक रसाळ लागतात), फेटा चीज (ज्याचा फेटे बांधणे या गोष्टीशी काहीही संबंध नसतो किंवा फेटा बांधल्यावर खावी लागते ती  चीज असेही नसते) आणि ऑलिव्ह. "fetta" या मूळ इटालियन शब्दावरून फेटा चीज चे नाव पडले आहे.  "fetta" म्हणजे तुकडा. चीज नीट खाता यावे किंवा भरून ठेवता यावे म्हणून त्याचे घनाकृती तुकडे केले जातात त्यावरून तसे नाव पडले असावे [१] . असे हे सॅलड खाऊन , आवरून आम्ही फेरफटका मारण्यासाठी साठी बाहेर पडलो. 

अथेन्स मधील अफ्रोडाइटीस भागातील समुद्र किनारा 


समुद्रालगत खारे वारे खात , मस्त गप्पा मारत मारत एका पार्क वजा टेकडी पाशी आलो. तेथे कसलासा कार्यक्रम चालू होता. लाईव्ह म्युझिक आणि कसले कसले विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम दाखवणारे  छोटे मंच : एखाद्या आवडणाऱ्या कार्यक्रमापाशी घुटमळत आणि नावडणाऱ्या कार्यक्रमांवर टिकाटिप्पणी करत टेकडीवर फिरलो. 

विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम 


 माथ्यावर एका उपहारगृहात पेयपान करत अगदी दाण्याच्या  चिक्की सारखा दिसणारा कुठलासा ग्रीक पदार्थ खात गप्पा मारल्या. वासिलीसचे मित्र म्हणे आम्हाला भेटायला येणार होते मात्र त्यांनी कल्टी दिली. जवळपास गेले तीन महिने ग्रीस मधेच असल्याने वासिलीसला काही ग्रीक शब्दांना इंग्रजी प्रतिशब्द आठवत नव्हते. मग तो शब्दाचे वर्णन करत असे. नाथन आणि  माझ्यात त्याला नेमका इंग्रजी  शब्द सुचविण्याची अहमहमिका सुरु झाली. उरलेल्या सहलीसाठी ही चुरस पुरणार होती.    

फ्लॅट जवळील एका हॉटेल मध्ये पारंपारिक ग्रीक फलाफल रॅप खाल्ले. त्यानंतर आईस्क्रीम शॉप मध्ये जाऊन चॉकलेट सूप आणि चॉकलेट ब्राउनी-युक्त  चॉकलेट आईस्क्रीम खाऊन पूर्ण आठवड्याभराचे चॉकलेट एका रात्री खाऊन घेतले. 

चॉकलेट सूप आणि पिस्ता आईस्क्रीम 

आणि "Saturday night" असूनही दिवसभर खूप ऊन खाऊन दमल्यामुळे लवकर झोपलो.  

(क्रमशः)

[१]https://en.wikipedia.org/wiki/Feta  

बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

उगवत्या सूर्याच्या देशात : धार्मिक , सामाजिक आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण


दिवस चौथा : १० सप्टेंबर 

सकाळपासून पाऊस  पडत होता. अर्थात त्यामुळे आम्ही आमच्या दिवसभराच्या भरगच्चं कार्यक्रमावर पाणी पडू देणार नव्हतो. क्योतो शहरातील सर्वांत प्रसिद्ध फुशिमी इनारी ताईशा-विहार (स्तूप) हा आमच्या प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत अग्रस्थानी होता. 
मेट्रोने वीसेक मिनिटांत तेथे पोहोचलो. शिंतो धर्मात असणाऱ्या अनेक देवांपैकी इनारी हा महत्वाचा देव असून त्या देवाचे मंदिर (विहार) म्हणजे इनारी विहार ! 


इनारी हा तांदळाचा देव असून कोल्हा हे त्याचे वाहन आहे. इनारी देवाचे अनेक विहार जपानभर असले तरीहि क्योतो मधील फुशिमी ताईशा हा प्रमुख इनारी विहार आहे.

इनारीचे  वाहन कोल्ह्याचा पुतळा 



या विहाराचे प्रवेशद्वार म्हणजे एक प्रचंड तोरी-दार आहे. तोरी दार हे शेंदरी रंगाची चौकट असलेले एक दार असून ते शिंतो धर्माचे प्रतीक मानले जाते. अशा प्रकारची विशिष्ट चौकट असलेली ही दारे जपानभर मंदिरांत दिसून येतात.  

फुशिमी ताईशा या विहारामध्ये अशी दारे असलेला लांब वऱ्हांडा आहे.  तेथे फोटो काढण्यासाठी बरीच गर्दी होती.
आम्हीपण त्या गर्दीचा एक भाग झालो आणि एक मनुष्यविरहित फोटो काढण्यात यश मिळवले.  

तोरी च्या दारांचा व्हरांडा  



मंदिराच्या आवारात अनेक वस्तू विकायला ठेवल्या होत्या.  शेंदरी रंगाच्या चौकटीच्या दारांच्या पार्श्वभूमीवर, कोल्ह्याच्या पुतळ्यांसोबत वगैरे अनेक फोटो काढत आम्ही मंदिरात फेरफटका मारला.   



यानंतर आमच्या सहलीचा पुढचा टप्पा होते कियोमिझू-देरा ! 
कियोमिझू-देरा हे क्योतो मधीलच नव्हे तर जपानमधील एक महत्वाचे बुद्ध मंदिर आहे. 
कियोमिझू म्हणजे स्वच्छ पाणी आणि देरा म्हणजे मंदिर. या  मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर बांधण्यासाठी एकही खिळा वापरलेला नाही. अशा या मंदिराला युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांत स्थान मिळालेले आहे. 

कियोमिझू देरा मंदिराच्या आवारातील एक मंदिर 



कियोमिझू-देरा ला जाण्यासाठी बस पकडली आणि जाताना ताकोयाकी नावाचा जपानी पदार्थ खाल्ला.  

थोडे ताकोयाकी टाकूया की !



या मंदिरात जाण्याच्या रस्त्यावर किमोन विकणारी काही दुकाने होती आणि मला किमोनो घेण्याची अतिशय इच्छा होती. क्रिस्ती आणि मिहाई ला पुढे पाठवून,  काही दुकाने धुंडाळून एक करड्या रंगाचा किमोनो आणि निळ्या रंगाचा ओबी (पट्टा ) विकत घेतला.  पुरुषांचे किमोनो फार रंगीबेरंगी नसतात आणि फारशी नक्षी असलेले किमोनो सुद्धा पुरुष घालत नाहीत. खरं तर नेसत नाही म्हणायला हवे, कारण साडी नेसण्यासारखाच अवघड(ल्यासारखा) तो प्रकार होता. माझा किमोनो विक्रेत्या महिलेकडूनच नेसवून घेतला. साडी किंवा लांब स्कर्ट घातलेल्या स्त्रियांना चालायला कसा त्रास होऊ शकतो याची जाणीव झाली. 

हळूहळू चालत मंदिरात पोचलो. एका डोंगरवजा टेकडी वर वसलेले ही मंदिर येईपर्यंत चांगलीच पायपीट झाली. आणि  क्रिस्ती व मिहाई शी पुन्हा संपर्क केला. 
किमोनो घातलेला माझा अवतार (चेहरा जपानी दिसत नसल्यामुळे) बघण्यासाठी मंदिरामध्ये अनेकांच्या माना वळल्या. 
मंदिरात योगायोगाने भेटलेल्या काही मैत्रिणींसोबत मी फोटो काढले त्यांचे किमोनो फारच रंगीबेरंगी आणि आकर्षक होते. 

किमोनो नेसण्याची हौस 



या बुद्ध मंदिरामध्ये संपूर्ण जपानहून भाविक येतात आणि हे मंदिर टेकडीवर माथ्यावर असल्यामुळे तेथून टेकडीच्या जंगलाचा परिसर फारच रमणीय दिसतो. 

कियोमिझू-देरा च्या आवारातील पॅगोडा 



मंदिरामध्ये फिरून झाल्यावर आम्ही आपापल्या वाटेला लागलो.  मी गिओन  भागातील एका सांस्कृतिक केंद्रामध्ये एक विविध (जपानी)  गुणदर्शनाचा कार्यक्रम बघण्यासाठी गेलो.  

तेथे एकावेळी अनेक आणि एका पाठोपाठ अनेक अशा कार्यक्रमांची  रेलचेल होती. 
पहिला कार्यक्रम म्हणजे सतार सदृश वाद्याच्या वादनाबरोबर जपानी पद्धतीने चहा बनवणे व इकेबाना  पद्धतीची पुष्परचना करणे.  
पहिल्या ओळीत किमोनो घालून मिरवत असल्यामुळे मला चहाची चव बघण्यासाठी मंचावर पाचारण करण्यात आले. 
एखादा कर्मठ ब्राह्मण जेवढे सोवळे-ओवळे करणार नाही तेवढे तो चहा घशाखाली उतरवण्यासाठी करावे लागले. 
बसायची विशिष्ट पद्धत, कोणत्या हाताने किटली, कप धरावयाचा, कसा ओतायचा, देणाऱ्याला कसे अभिवादन करावे, या सर्व गोष्टींसाठी सव्यापसव्याप्रमाणे संकेत होते. 



त्यानंतरचे कार्यक्रम एक छोटेसे जपानी नाटुकले आणि जपानी बाहुलीनाट्य फारच मजेदार होते. 




कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते जपानी गेईश्या-नाच! त्यांना क्योतो मध्ये माइको-सान म्हटले जाते.  सुंदर किमोनो घातलेल्या आणि चेहऱ्यावर आणि केसांवर डोके जणूकाही फुलदाणी असल्याप्रमाणे भरगच्च मेकअप केलेल्या त्या माइको फारच सफाईने हालचाली करत होत्या. 

गेईश्या नाच  

विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपल्यावर संपल्यावर मी एका नेपाळी उपहारगृहात जेवण केले त्यानंतर एका बार मध्ये ख्रिस्ती आणि मिहाईला भेटलो. तेथे विशेष जपानी ओटमील बिअर (आणि इतर बिअर्स) पिऊन दिवसाची सांगता केली. 




(क्रमशः)