Saturday, October 9, 2010

रतनगड : सह्याद्रीतील एक दुर्गरत्न

रतनगड
निसर्ग सौंदर्याने नटलेले आणि कळसूबाईच्या डोंगररांगांचे मुकुट मणी शोभावे असे सह्याद्रीतील एक दुर्ग रत्न म्हणजे रतनगड होय.
पाऊस पडून गेला, की SEPTEMBER महिना हा भटक्यांसाठी जणू पर्वणीच असतो.  यंदाच्या पावसानंतर खूप दिवसांनी आम्हा मित्र मंडळींचा रतनगड चा बेत ठरला.
कनक , अनयदादा, सिद्धेश व मी अशी आमची चौकडी २४ सप्टेंबर च्या रात्री शिवाजी-नगर स्थानकावर जमली. रात्री १२.३० च्या गाडीने संगमनेर ला प्रयाण केले. लाल डब्यातला हा प्रवास नेहमीप्रमाणे रंगला. एस. टी. तील वल्ली व्यक्तींचे निरीक्षण करण्यात आणि हसण्या-हसवण्यात हा वेळ मजेत गेला. साडेचार च्या सुमारास इच्छित स्थळी पोचलो. "संगमनेर - कसारा"  ही एस.टी. आता आम्हाला हवी होती. त्यासाठी सकाळी ६ वाजेपर्यंत थांबणे भाग होते. एस. टी. स्थानक चांगले प्रशस्त असले तरीहि तेथे झोपणे आम्हाला प्रशस्त वाटले नाही. चहा मारणे, पेपर वाचणे, कोडी सोडवणे वगैरे गोष्टी करण्यात वेळ मस्त गेला.

सहा वाजता मिळालेल्या गाडीने आम्ही संगमनेर सोडले. "कसारा" च्या या गाडीत आम्ही झोपेची "कसर" भरून काढली. पावणे दहाच्या सुमारास "शेंडी" या गावी पोचलो,जेथून आम्हाला रतनवाडी ला जाण्याची तजवीज करावयाची होती. "शेंडी" ला उतरल्यानंतर तेथील हॉटेल CAFE DAM कॉर्नर या खानावळीत नाश्ता करून होड्यांची चौकशी केली. होडीचे एका फेरीचे रु.१००० सांगितल्याने   - "वाट पाहीन पण एस. टी. नेच जाईन" असे आम्ही ठरवले. नाहीतरी ११ वाजता एस. टी. होतीच. शेंडी येथून भंडारदरा जलाशयाचे विस्तीर्ण पात्र कळसूबाईच्या पार्श्वभूमीवर अधिकच आकर्षक दिसत होते. त्यामुळे "वेळ कसा घालवायचा ?" असे न वाटता  "एवढ्याश्याच वेळात किती फोटो काढू आणि किती नको" असे आम्हाला झाले.


११ वाजता चक्क वेळेवर आलेली एस. टी. १२ च्या सुमारास "रतनवाडी" या पायथ्याच्या गावी पोचली.  तेव्हा पाऊसही नाही आणि कडक ऊनही नाही असे आल्हाददायक वातावरण होते. त्यामुळे झकास मूड बनला.
रतनवाडी हे गाव अमृतेश्वर च्या मंदिरासाठी सुद्धा सुप्रसिद्ध आहे. हेमाडपंथी वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना म्हणून तसेच प्रवरा नदीचा उगम म्हणून सुद्धा या मंदिराची ओळख सांगता येईल. मंदिराचा गाभारा त्यामुळे कायम पाण्याने भरलेला असतो.  
अमृतेश्वर मंदिराचा गाभारा, रतनवाडी 
आम्ही त्या मंदिरात शिव-स्तुती म्हणून आवारातच डबे उघडले.
अशा प्रकारे आधी विठोबा मग "पोटो"बा आणि मग बराच "फोटो"बा केल्यावर आम्ही किल्ल्याकडे निघालो.
एका स्थानिक मुलाने आम्हाला नदीकडील (जवळच्या) वाटेला लावले.  आम्ही प्रथमच अधून मधून नदीतून जाणाऱ्या आणि अधून मधून जंगलातून जाणाऱ्या वाटेचा आनंद लुटला . नदी पार करताना सुरवातीला घसरा-घसरी होत असली, तरी नंतर आम्ही चांगलेच सरावलो.  नदी पात्रातून जाणारी वाट संपल्यावर अचानक चढण असणारे डोंगर सुरु होतात.

चढण पार केल्यानंतरचे  निवांत क्षण 


हे पार केल्यावर एक छोटे पठार लागले.  तेथून गडावर जाणारी वाट अजून स्पष्ट झाली. सुदैवाने पावसाचा अनपेक्षित "तीर्थ"प्रसाद आम्हाला मिळाला नाही. त्यामुळे नुसती वाटच सुसह्य झाली नाही तर, कॅमेरा सुद्धा अनेकदा "क्लिक-क्लीकाट" करून गेला. किल्ल्याच्या माथ्यापर्यंत पोचण्यासाठी अजून एक दिव्य पार करायचे होते. ते म्हणजे २ लोखंडी शिड्या ! आणि त्यानंतर एक छोटी पण निसरडी खिंड!  हा पॅच हळू हळू (म्हणजे भीतीमुळे  नव्हे तर फोटो काढत काढत ) पार केला.

अंतिम टप्प्यातील लोखंडी शिड्या, रतनगड  


आणि आम्ही चोर दरवाजापाशी पोचलो. जोरदार घोषणा झाल्या - "जय भवानी जय शिवाजी" !!! या दरवाजाचे प्रचलित नाव "हनुमान" दरवाजा आहे कारण याच्या डावीकडील बाजूस मारुतीची  मूर्ती कोरली आहे.  गडावरील पहिली गुहा ही रत्नादेवीचे मंदीर असून ही १५ फूट लांब आहे. दुसरी गुहा तुलनेने मोठी (साधारण ३० फूट)  आहे. या गुहेला लोखंडी ग्रीलचा दरवाजा बसवला आहे. राहण्यासाठी अतिशय सुरक्षित अशी ही जागा होती. तेथे आमच्या सॅक्स ठेवून आम्ही गड फिरावयास निघालो.  गुहांतून दिसणारा भंडारदरा जलाशयाचा परिसर आणि सभोवतालीची  पर्वतराजी पाहून वासोट्याची आठवण झाल्याशिवाय राहिले नाही.  किल्ल्याच्या दक्षिण बुरुजापाशी आम्हाला पुण्याहूनच आलेला एक ग्रुप भेटला. त्यांच्यापैकी अनिकेत नावाच्या मुलाला सह्याद्रीचा भूगोल चांगलाच माहीत होता. या बुरुजावरून सह्याद्रीच्या बेलाग कड्यांचे दृश्य खूपच विलोभनीय दिसत होते. पाबरगड, आजोबागड , कात्राबाईचा कडा आमच्या नेत्रासुखाची पुरेपूर काळजी घेत होते.  सूर्य पश्चिम क्षितिजावर कलत  होता, त्याने आपल्या किरण-शलाकांचा एक झोत त्या कड्यांवर मारला आणि एखाद्या कसलेल्या चित्रकाराने रंगवावे तसे ते कडे खोटे वाटून लागले. "प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट" असे काहीसे ऐकले होते ,येथे मात्र  प्रत्यक्षच "प्रतिमे" हून सुंदर बनून आमच्या पुढ्यात आले होते .

रतनगडावरुन दिसणारा सह्याद्री  


तेथील दृश्य  भरभरून नजरेच्या आणि कॅमेऱ्याच्या चौकटीत भरून घेतले आणि पाणी भरण्यासाठी गडाच्या उत्तरेकडे निघालो. किल्ल्यावर असलेल्या अनेक टाक्यांपैकी मधोमध असलेले एक तलाव-वजा टाके पाण्याने तुडुंब भरलेले होते.

रतनगडावरील तळे  


. पाण्याचा भाग सोडला तर किल्ल्यावर जमीनसुद्धा दिसणे अवघड इतक्या पावसाळी वनस्पती , झाडे-झुडुपे वाटेत होत्या.  प्रमुख आकर्षण असलेले नेढे बघण्याचा कार्यक्रम आम्ही उद्यावर टाकला. आणि मघाच्याच बुरुजावर भेळ खाऊन आम्ही गुहेत परतलो. एव्हाना पाऊस भुरभुरू लागला होता. रात्री त्याचा जोर चांगलाच वाढला. आम्ही गुहेत पराठ्यांचे जेवण करून घेतले. "स्वीट डिश" म्हणून कनकने आणलेले  "आम्रखंड" होतेच. अशा मस्त जेवणानंतर गुहेबाहेर आमचा गप्पांचा फड चांगलाच रंगला. पाऊस जरा उघडल्यानंतर सृष्टीसौंदर्याचा एक आगळाच नजराणा आम्हाला पेश झाला. काळ्या ढगांच्या आडून होणारा लालसर पांढऱ्या चंद्राचा उदय पाहणे हा एक मणीकांचन योग ठरला.  दहाच्या सुमारास आम्ही दमलेल्या शरीराला विश्रांती दिली.
लाल चंद्रोदय !

दिवस दुसरा: (२५ सप्टेंबर) : गडावर निसर्गाचा सहवास आणि एस. टी. चा कंटाळवाणा (परतीचा) प्रवास!!
सहाच्या सुमारास उठलो. आन्हिके उरकून आम्ही  गड फिरावयास निघालो. गडाच्या उत्तर टोकाकडे जाण्याची वाट ही पुन्हा झाडा झुडूपांतून जाणारी होती. गडावर सर्वत्र फुललेली "सोनकीची" पिवळी धमक फुले  सकाळच्या उन्हाची चमक आणखीनच वाढवत होती.

सोनकीची फुले आणि रतनगड  


बरोबर खाण्याच्या गोष्टी आणि पाणी घेऊन आम्ही निघालो होतो. अदमासे अर्धा तास चालल्यावर आम्ही "त्र्यंबक" दरवाजापाशी पोचलो. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाची रचना थेट "जीवधन" च्या दरवाजाची  आठवण करून देणारी आहे. या दरवाजातून खिंडीत जाणाऱ्या खोल खोदीव पायऱ्या सुंदर दिसत होत्या. नेढ्याकडे जाणारी वाट येथून जवळच होती.

खिंडीत जाणाऱ्या पायऱ्या आणि त्यांना वेढून असलेली हिरवाई 


हे नेढे राजगड च्या नेढ्याएवढे मोठे नसले, तरीहि आकर्षक होते. अवघे कोकण दर्शन घडवणारे ते नेढे आम्हाला अर्धा तास तरी तेथे जखडून ठेवण्या-इतके दर्शनीय होते. नेढ्याच्या वर जाणारी वाट कनक ने शोधली आणि आम्ही गडाच्या (बहुतेक) सर्वोच्च स्थानी पोचलो. तेथून अनेक भंडारदरा, घाटघर अशी धरणे, अनेक जलप्रपात (धबधबे) यांचे विहंगम दृश्य दिसत होते.

नेढे (अर्थात वातखिडकी ), रतनगड 


येथून दिसणारा प्रत्येकच VIEW आम्हाला "क्लिक" होत असल्याने कॅमेरा सुद्धा अनेक वेळा "क्लिक"   झाला. वातावण स्वच्छ असल्याने सह्याद्रीचा खजिना डोळे भरून पाहता आला. निसर्गाला त्याबद्दल मनोमन धन्यवाद दिले.  नेढ्यामध्ये  बिस्किटांचा माफक नाश्ता करून आम्ही गुहेकडे निघालो.  गडावरील माकडांनी गुहेची तपासणी केल्याचे उघड झाले, कारण कपडे ठेवलेल्या काही प्लास्टिकच्या बॅगा उचकण्यात आल्या होत्या., इतकेच नव्हे तर काही बॅगा फाडल्या सुद्धा  होत्या. सुदैवाने आमच्या सॅक्स सुरक्षित होत्या. पटकन भेळ-चिवड्याचा नाश्ता करून उतरण्यास प्रारंभ केला. आता मात्र शिड्यांपाशी फार वेळ घेतला नाही. कारण फोटो काढण्याची भानगड नव्हती. बारा वाजताची एस. टी. मिळवण्यासाठी भरभर उतरणे भाग होते. वाटेत धबधब्यांमध्ये जाण्याचा प्रचंड मोह मला होत होता, मात्र सर्वानुमते नदी मध्ये जाऊनच डुंबावे असे ठरले. अखेर गाव जवळ आल्यावर जेथे पात्र जास्त खोल नव्हते तेथे आम्ही १०-१५ मिनिटे मस्त डुंबलो.  बाराच्या सुमारास गावात आलोसुद्धा , पण हाय रे दुर्दैव!!  आम्हाला अपेक्षित एस. टी. साडे अकरालाच येऊन गेली होती.
नाईलाजाने आम्ही होडीची वाट पाहत बसलो. 
भंडारदरा जलाशयाचे पाणी आणि रतनगड 

काल शेंडीला होड्यांची चौकशी करताना घेतलेला "भरत झडे" या नावाड्याचा भ्रमणध्वनी क्रमांक आमच्या कामी  आला. दोन च्या सुमारास आम्ही होडीतून रतनवाडीला राम-राम केला. या  दोन तासांमध्ये तेथे चहा-भजी यांचा नाश्ता झाला होता , एक पावसाची सुखद सर आम्हाला सुखावून गेली होती. पाऊण तासांच्या या बोटिंग मध्ये कळसूबाई ची सर्व डोंगररांग दृष्टीस पडते. सह्याद्रीच्या श्रीमंतीची खरीखुरी जाणीव होते.  शेंडीला पोचलो तेव्हा ट्रेक लौकिकार्थाने संपला होता.  तेथून पुढील प्रवास म्हणजे एस. टी. महामंडळाने आमची घेतलेली सत्वपरीक्षा च म्हणावे लागेल शेंडी - अकोले, अकोले- संगमनेर, संगमनेर-पुणे अशा तीन गाड्या बदलून पुण्यात येईपर्यन्त रात्रीचे बारा वाजून गेले , यावरूनच आमचा संयम आणि सहनशीलता किती असेल याचा अंदाज आला असेल. (शेवटी तरी स्वतःचे कौतुक पाहिजेच!!!!)
अशा प्रकारे सव्वा दोन दिवसांचा हा ट्रेक संपन्न झाला. ट्रेक-शिदोरीमध्ये आणखी एका "रत्नाची" भर पडली.


अमृतेश्वर मंदिराच्या आवारातील मावळे (डावीकडून : उन्मेष, सिद्धेश, अनयदादा, कनक )