Sunday, March 23, 2014

मध्य युरोपिअन सहल : Hangover आणि निरोप !

रविवार २३ मार्च २०१४: शेवटचा दिवस !

अकरा वाजता जाग आली, तेव्हा सर्व जण अगोदरच उठेलेले होते आणि आता नाश्ता करत होते. Hangover मधून बाहेर यायला मला थोडा जास्त वेळ लागला. त्यांच्या बरोबर नाश्ता करून पोटाला पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला.  कालच्या अभूतपूर्व मद्यपाना नंतर मला घरी कसे आणण्यात आले याचा एक विडिओ त्यांनी शूट केला होता , तो बघून आमची सर्वांची हसून पुरेवाट झाली.
निघायच्या आधी आम्हाला थोड्या खरेदीसाठी जायचे होते. आमच्या अॅमस्टरडॅम मधील झेक -स्लोवाक मित्रांसाठी  झेक मिठाया आणि स्मरणिका खरेदी करण्यासाठी एका सुपर मार्केट मध्ये गेलो. चार दिवस छान सूर्य प्रकाशित दिवस मिळाल्यानंतर आजचा दिवस पावसाळी होता. पण घरी परत जात असल्याने आता परत पावसाची सवय करून घ्यायला हवीच होती ! (टीप : अॅमस्टरडॅम मध्ये पाऊस कधी पडेल याचा नेम नसतो !)
झेक घरात राहण्याचा छान अनुभव दिल्याबद्दल रोमान च्या आईचे आणि बहिणीचे आभार मानले आणि निघताना रोमान च्या आज्जीला भेटायला विसरलो नाही. रोमान हॉस्टेल वर माझ्या सोबत राहत असताना ही आज्जी त्याला पत्र लिहित असे आणि हा पत्रोत्तर ! हा जिव्हाळा आणि अशी नात्याची वीण खूपच कमी कुटुंबांत मी पहिली आहे ! त्याच्या आज्जीने मला तिने स्वतः काढलेली काही चित्रे भेट दिली :
रोमान ची आज्जी
रोमान आणि राडेक आम्हाला सोडायला विमान तळापर्यंत आले. इतकेच नव्हे तर विमानाची वेळ होईपर्यंत थांबून होते.
गेले चार दिवस त्यांनी आम्हाला फक्त त्याच्या घरातच राहायला जागा दिली नव्हती तर त्यांच्या आठवणीतही राहायला जागा दिली होती. दारू पिण्यात अग्रेसर असलेले हे झेक मित्र त्यांच्या सहवासाचा Hangover माझ्या मनात कायमचा सोडून गेले आहेत.
रोमान च्या घरात !
(समाप्त)

Saturday, March 22, 2014

मध्य युरोपिअन सहल : "मेंडेल" चे शहर ब्रनो (दिवस चौथा)

शनिवार २२ मार्च २०१४ :  ब्रनो  दर्शन !

राडेक च्या घरी लवकर जाग आली आणि त्याच्या घरामधील सदस्यांबरोबर थोडा सुसंवाद साधता आला. त्याचे आई - वडील तोडके मोडके इंग्रजी बोलून माझ्याशी तर मी माहीत असलेले काही झेक शब्द वापरून त्यांच्याशी बोलत होतो. भरपेट नाश्ता करून आणि तिफ़ो नावाच्या त्यांच्या कुत्र्यासकट सगळ्यांबरोबर, त्यांच्या घराच्या परसात , एक आठवण फोटो काढून आम्ही निघालो. 

राडेक चे कुटुंब !

निघे-निघेपर्यंत दहा वाजून गेले होते. प्रागहून आमची बस अकरा वाजता निघणार असल्याने राडेकच्या बाबांनी कार चा ताबा घेतला. एकशेवीसच्या स्पीड ने (खरोखर) त्यांनी गाडी दामटली. त्यांनी आमची बस चुकणार नाही याची काळजी घेतली खरी , पण हाय-वे वरून गाडी जात असताना आमचा काळजाचा ठोका चुकला होता हे निश्चित !प्राग ते ब्रनो प्रवास हसत खिदळत गप्पा मारत पार पडला . 

Eurolines bus - Prague -Brno

 रोमन साम्राज्यातून आता आम्ही परत "रोमान"(च्या)  साम्राज्यात आलो होतो. आजचा दिवस ब्रनो-दर्शन चा होता. ब्रनो हे झेक प्रजासत्ताक मधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून मोराविया प्रांतातील सर्वांत मोठे शहर आहे. विएन्ना (ऑस्ट्रिया ची राजधानी)आणि ब्राटिस्लवा (स्लोवाकिया ची राजधानी) या महत्वाच्या शहरांच्या जवळ असल्याने भौगोलिक दृष्ट्या ब्रनो ला महत्व आहे. या भौगोलिक स्थानामुळे तसेच मोक्याच्या जागी किल्ले असल्यामुळे  सोळाव्या शतकापासून सर्व युद्धांत आपोआप ओढले गेलेले  शहर म्हणूनही ब्रनो प्रसिद्ध आहे.  

 बस मधून उतरल्यानंतर घरी जाण्या अगोदर वाटेत रोमान ने एक कॅथेड्रल दाखवले: Cathedral of Saints Peter and Paul ! शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे चर्च तीन शतकांहून अधिक काळ उभे असल्याने राष्ट्रीय वारसा मानले जाते. Gothic शैलीने उभारलेले त्याचे मनोरे विशेष लक्षवेधी आहेत :

Cathedral of Saints Peter and Paul

या चर्चची दुपारची घंटा सर्वसाधारण कॅथोलिक चर्चप्रमाणे बारा वाजता न "वाजता" ११ वाजता वाजवली जाते! याविषयीची आख्यायिका मनोरंजक आहे : १६१८-१६४८ अशी तीस वर्षे सलग चाललेल्या युरोपातील सर्वांत मोठ्या युद्धात जेव्हा कधीतरी स्वीडिश सैन्य ब्रनो ला वेढा देऊन बसले होते तेव्हा ब्रनो ने निकराचा लढा दिल्याने स्वीडिश सेनापतीने "जर मला उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत ब्रनो शहर मिळवता आले नाही तर मी वेढा सोडून माघार घेईन" असे वचन ब्रनो-वासीयांना दिले होते. त्या दिवशी एका धूर्त नागरिकाने या चर्च ची बेल १ तास अगोदर वाजवली आणि स्वीडिश आक्रमणापासून ब्रनो बचावले. तेव्हापासून या कॅथोलिक चर्च ची बेल नेहमी १२ ऐवजी ११ ला वाजवतात.

Lunch at Cathedral of Saints Peter and Paul

चर्च च्या आवारात एक बाक पकडून आम्ही जेवण उरकले. राडेकच्या आईने सर्वांना पुरून उरेल एवढा डबा भरून खाण्याचे पदार्थ दिले होते. ते संपवून चर्च बघून आम्ही रोमान च्या घरी गेलो. 

रोमान च्या  खोलीत

अर्धा तास  विश्रांती घेऊन आणि रोमान च्या घराचे फोटो काढून आम्ही शहर बघावयास निघालो:

रोमान चे घर (त्याच्या बागेतून घेतलेला फोटो)

टेकडीच्या वाटेने जाताना रंगीबेरंगी फुलांद्वारे वसंत ऋतू आपले अस्तित्व दाखवून देत होता. शहराची सैर करण्यासाठी रोमान ने निवडलेला पहिला थांबा म्हणजे Basilica of The Assumption of Our Lady हा होता. हे स्मारक म्हणजे दुतर्फा खांबांची रांग व अर्धवर्तुळाकार घुमट असलेला एक  लांबट आकाराचा दिवाणखाना आहे. या Basilica च्या शेजारीच मध्ययुगीन मठ असून अनेक ख्रिश्चन साध्वी येथे अठराव्या शतकापासून उपासना करत आलेल्या आहेत. 

Basilica of The Assumption of Our Lady

 यानंतर आम्ही पोचलो ते मेंडेल संग्रहालयाच्या आवारात ! मेंडेल संग्रहालय हे मेसेरिक (Meseryk) विद्यापीठाचा एक भाग असून २००२ साली बांधले गेले. थोर जनुक-शास्त्रज्ञ ग्रेगर मेंडेल यांची कर्मभूमी ही संग्रहालयाच्या समोरच असलेल्या Saint  Thomas's  Abbey या चर्चमध्ये आहे. या चर्चच्या आवारातील  बागेत वाटाण्याच्या रोपांवर प्रयोग करून मेंडेल यांनी, जनुकशास्त्र आणि आनुवंशिकशीलता या क्षेत्रांत मैलाचा दगड ठरलेले  सिद्धांत मांडले होते.

मेंडेल संग्रहालय

StaroBrno या ब्रनो च्या स्थानिक बिअर Brewery कडे जाताना मेंडेल यांचे नाव दिलेला चौक "मेंडेल स्क्वेअर" दिसतो. आम्ही Brewery च्या बाहेरील भागात असलेल्या हॉटेल मध्ये गेलो. तेथील खासियत म्हणजे ऑर्डर केलेली सर्व पेय आगगाडी च्या डब्यावरून सर्व्ह केली जातात :

StaroBrno !
तिथे बिअर घेऊन आम्ही ब्रनो च्या प्रसिद्ध  Špilberk (श्पील्बेर्क) किल्ल्याकडे कूच केले. हा किल्ला तेराव्या  शतकापासून बराक आणि तुरुंग यांसाठी ओळखला जातो.  या किल्ल्याची मजबूत तटबंदी तीस वर्षे चाललेल्या युद्धात स्वीडिश सैन्याविरुद्ध लढा देण्यासाठी विशेष उपयोगी ठरली होती. 
Špilberk किल्ला
 
किल्ल्यावरील एक बुरुज हे किल्लाच फक्त दिलखेचक  नसून किल्ल्यावरून दिसणारे शहराचे दृश्यही प्रेक्षणीय आहे.
 
किल्ल्यावरून दिसणारे ब्रनो !
किल्ल्या"मध्ये "असलेले  तुरुंग !

किल्ला फिरून झाल्यावर आम्ही मागच्या बाजूने उतरलो जेणेकरून आम्हाला शहराच्या दुसऱ्या भागात जाता येणार होते:

 
किल्ल्याबाहेर पडल्यावर नजरेस पडणारा सुंदर परिसर !

 शहरात पुनर्प्रवेश केल्यावर सर्व प्रथम दिसले ते म्हणजे Red Church : हे चर्च protestant पंथाच्या अनुयायांचे चर्च असून रोमन कॅथोलिक चर्च च्या विचारसरणी ला आव्हान देणाऱ्या Protestantism या सुधारित ख्रिस्ती पंथाचे ते प्रार्थनास्थळ आहे. 
Red Church
 यानंतर ब्रनो मधील ऐतिहासिक Saint James चर्च (हे मात्र कॅथोलिक आहे ) दृष्टीस पडते.
 
Saint James Church (Image from Wikipedia)
 
या चर्च चा इतिहास (सुद्धा) तेराव्या शतकापर्यंत मागे जातो, मात्र याची महती आणखी एका अभूतपूर्व घटनेने अधोरेखित होते : २००१ साली केलेल्या पुरातत्वीय उत्खननात या चर्च च्या (जमिनीच्या) 
खाली प्राचीन दफनभूमी असल्याचे आढळून आले.  तीमध्ये तब्बल पन्नास हजार मृतांचे सांगाडे (अवशेष )सापडले. 
अर्थातच याचा व्यवसाय म्हणून झेक सरकारने त्याचे पर्यावसान संग्रहालयामध्ये केले :
दफनभूमी ! (Brno Ossuary )
 दफन झालेल्या या मृतांच्या anthropological (मानवशास्त्रीय) अभ्यासावरून असे सांगण्यात येते की - मध्युगात जेव्हा प्लेग आणि कॉलरा यांच्या "साथी"मुळे दगावलेली लोकं आणि तीस वर्षे चाललेल्या युद्धातील झेक सैनिकांचे "साथी"दार यांना "पुरून" ही हाडे उरली आहेत !!
 या संग्रहालयात फिरताना अधिक फील यावा (किंवा भीतीदायक वातावरण निर्मिती करण्यासाठी ) म्हणून जुन्या भयपटांचे पार्श्वसंगीत ऐकवले जाते. 
दफनभूमीच्या संग्रहालयातील एक हाड-स्तंभ !
 या भयानक आणि मजेशीर अनुभवानंतर आम्ही शहरातील मुख्य चौकात आलो : 


तेथे The Plague Column हा एक स्तंभ उभारण्यात आलेला आहे : प्लेग ची साथ आटोक्यात आल्यानंतर कृतज्ञता म्हणून हे स्मारक उभारण्यात आले होते.
The Plague Column

 यानंतरचे आकर्षण होते :  Old Town हॉल. हा  हॉल म्हणजे ब्रनो मधील प्रमुख आख्यायिकांचा जनक आणि संकलक आहे. या town हॉल च्या इमारतीच्या दर्शनीय कमानीपासूनच आम्हाला प्रश्न पडत गेले आणि रोमान , राडेक यांनी सर्व आख्यायिका खुलवून सांगितल्या :
entrance of the town hall with a deformed phial

 Master Antonin Pilgrim याला Town हॉल बांधण्याचे कंत्राट दिले होते. त्याला कामाचा पूर्ण मोबदला वेळेवर न दिल्याने त्याने प्रवेश द्वाराचा महत्वाचा मधला शोभेचा खांब वाकडा बांधला. एक वदंता अशीही आहे की खूप दारू पिऊन झिंगल्यामुळे त्याने तो खांब वाकडा बांधला. 
town हॉल च्या प्रवेश द्वारामधून आत गेल्यावर छताला  एक मगर टांगलेली दिसते :
Brno Dragon
 त्याविषयीची गोष्ट ही पुढीलप्रमाणे :
फार वर्षांपूर्वी एका मगरीने ब्रनो मध्ये दहशत निर्माण केली होती जी दररोज माणसे मारून खात असे. याआधी झेक लोकांनी हा प्राणी पाहिलेला नसल्याने ते त्याला ब्रनो चा dragon म्हणत असत. एका शूर माणसाने मेलेल्या जनावराच्या शरीरात विष घालून ते जनावर त्या मगरीला खायला दिले आणि त्या मगरीपासून ब्रनो ची सुटका केली. 

town हॉल च्या एका भिंतीवर एक मोठ्ठे जुने चाक टांगलेले दिसते :

The Brno Waggon Wheel


असे सांगितले जाते की Georg Birk नावाच्या सुताराने आपल्या मित्राशी पैज लावली होती की एका रात्रीत तो शहरापासून ५० मैल लांब असलेल्या झाडाच्या लाकडापासून बनवून ते चाक फिरवत फिरवत शहरात आणेल. ही अमानवी गोष्ट त्याने करून दाखवली आणि त्यासाठी त्याने कुण्या सैतानाची मदत घेतली होती असे म्हणतात. ब्रनोच्या इतिहीसाची अनेक पाने अशा रंजक गोष्टी आणि लोककथांनी भरली आहेत. 

town हॉल च्या (सुद्धा) मागील दाराने बाहेर पडलो आणि एका तऱ्हेवाईक कारंज्या पाशी येऊन पोचलो. Parnas fountain या नावाने प्रसिद्ध असलेले हे कारंजे इग्नाझ बेंडल (Ignaz Bendl) या कारागिराने घडवले असून त्यावरील रूपकात्मक नक्षीदार कोरीवकाम विएन्ना मधील Plague Column च्या स्तंभाशी तंतोतंत जुळणारे आहे. 
विएनीज वास्तुविशारद Johann Bernhard Fischer von Erlach याने design केलेली कलाकृती तत्कालीन ऑस्ट्रिया च्या राजवटीचा भाग होती. ब्रनो (दक्षिण मोराविया) झेकोस्लोवाकिया मध्ये विलीन झाल्यानंतरही  झेक नागरिकांनी ऑस्ट्रियन कलेचा आदर राखत सर्व स्मृतीशिल्पे जपली आहेत.
Parnas Fountain


आता आमच्या प्रदक्षिणेचा अंतिम टप्पा म्हणून आम्ही पुन्हा
Cathedral of Saints Peter and Paul मध्ये आलो. सकाळी याच ठिकाणाहून आम्ही ब्रनो दर्शन सुरु केले होते. रोमान ने परिपूर्ण शहर दर्शन घडेल असा मार्ग निवडल्याने त्याला मनापासून धन्यवाद दिले. चर्च च्या आवारातील बागा , काही ठिकाणी मुद्दाम न केलेली डागडुजी , रंग उडालेल्या भिंती आणि पडक्या सज्जा या सर्व गोष्टी त्या कातरवेळेला कुणालाच्याही मनाला एक दोन शतके सहज मागे नेऊ शकत होत्या. 
 
Cathedral of Saints Peter and Paul(back side )

अशा प्रकारे शहर दर्शन झाल्यानंतर breweries बघणे आणि तिथे मनसोक्त मद्यपान हा प्रोग्राम होता.  पिण्या अगोदर पोटात काहीतरी असावे म्हणून डिनर साठी एका हॉटेल मध्ये गेलो:

नमुनेदार झेक जेवण !

तेथून सुरु झाला आमचा pub-crawl ! बुधवारी रोमान बरोबर फिरलेले सर्व बार आम्ही पालथे (होऊन) घातले. प्रत्येक ठिकाणी तिथली खास बिअर आणि खास शॉट हे ओघाने आलेच. अशातच एका पब मध्ये आम्हाला बुद्धीबळ खेळायची हुक्की आली. डाव बराच वेळ रंगला आणि त्याच्या सम प्रमाणात आमचे बिल सुद्धा !

 

 pub-crawl चा खरा अर्थ त्या दिवशी कळला. पाच ते सहा बार फिरून झाल्यावर घरी जाताना चालता येणे मला मुश्किल झाले होते. अशा प्रमाणात दारू पिण्याची सवय नसल्याने मी पुरता झिंगलो होतो. रोमान आणि राडेक यांनीच मला घरी आणले असावे कारण माझ्या कॅमेरा मधील शेवटचा फोटो हा या बार चा आहे आणि तेथून मी घरी कसे आलो हे मला आठवतच नाहीये ! (क्रमशः)

शेवटचा बार !

Friday, March 21, 2014

मध्य युरोपिअन सहल : "प्रागै"तिहासिक प्राग आणि युनिक म्यएनिक (दिवस तिसरा)


प्रागला जाण्याचे वेध आदल्या रात्रीपासून लागले असल्याने ब्रनो मध्ये सूर्याची किरणे यायच्या आधी आम्हाला जाग आली होती. आमची प्राग ला जाणारी बस साडेसात वाजता "विक्टोरिया हॉटेल" या बस स्थानकाहून निघणार होती. रोमान च्या घरासमोरच ट्राम चा थांबा असल्याने आम्ही सात वाजता घर सोडले.  बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश पडल्याने एक चांगला दिवस प्राग मध्ये घालवायला मिळणार याची खात्री झाली :
रोमान च्या घराबाहेरील ट्राम च्या थांब्यावर टिपलेली सकाळ

सकाळची वेळ असल्याने गाडीला शहराबाहेर जाण्यास फार वेळ लागला नाही. ब्रनो ते प्राग हा हाय- वे सुरु झाल्यावर अचानक गाडीला ठराविक अंतरानंतर हादरे बसू लागले. सिमेंट च्या रस्त्याचे काम नीट न झाल्याने मध्ये मध्ये ब्लॉक्स सुटले (किंवा तुटले ) आहेत असे रोमानचे स्पष्टीकरण ! झेक लोक या रस्त्याला विनोदाने " मोटोक्रॉस चा सर्वांत लांब track " असे  म्हणतात. झेक नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे हा महा(ग)मार्ग युरोपातील सर्वांत महाग ठरला आहे.
दोन तासांच्या या प्रवासात बराचसा वेळ झोप काढली. प्राग शहरात आल्यावर सूर्याच्या किरणांनीच आम्हाला जागे केले. संपूर्ण शहर मस्त सूर्य प्रकाशात न्हाऊन निघाले होते:
प्राग मध्ये शिरताना
प्राग हे बोहेमिया प्रांतामधील एक महत्वाचे शहर असून राजधानी च्या शहराचा मान या शहराने रोमन साम्राज्याच्या काळापासून मिरवला आहे. व्लातावा नदीकिनारी वसलेल्या प्राग ने एक हजार हून अधिक पावसाळे (किंवा युरोपिअन हिवाळे) पाहिलेले आहेत, त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेल्या प्राग च्या इतिहासाला
"प्रागैतिहास" म्हणायला हरकत नाही.  झेकोस्लोवाकिया हा एक देश असतानासुद्धा प्राग हीच त्या देशाची राजधानी होती आणि स्लोवाकिया वेगळा झाल्यानंतरही झेक प्रजासत्ताक (इंग्रजी नाव चेक रिपब्लिक) ने प्राग ला या पदापासून परागंदा केले नाही. तर अशा या सुप्रसिद्ध शहरात फिरण्यासाठी आम्ही सिद्ध झालो होतो.
राडेक आणि पात्रीसिया हे दोघेही चार्ल्स चौकाजवळ च्या (Charles  square)  एका पार्क मध्ये आमची वाट बघत थांबले होते. या पार्कला लागूनच Town Hall  आहे. येथे Judah Loew Ben Bezalel या ज्यू-पंडिताचा पुतळा आहे. मोराविया मधील मिकुलोव आणि बोहेमिया मधील प्राग या दोनही शहरांमध्ये यहुदी धर्मगुरू म्हणून त्याने काम केले होते.

त्याला MaHaRaL असेही म्हटले जाते. हिब्रू भाषेत "Moreinu Ha-Rav Loew," (याचा अर्थ आमचा गुरु-यहुदी धर्मगुरू Loew असा होतो.  )   प्रागबाबतीत सर्वांत प्रसिद्ध आख्यायिका "गोलेम" चा रचनाकार म्हणून हा विद्वान प्रसिद्ध आहे. मातीपासून तयार केलेल्या पुतळ्यामध्ये त्याने प्राण फुंकले आणि त्या प्राण्याला "गोलेम" नाव दिले. प्राग मधील ज्यू लोकांचे कट्टर ज्यू द्वेष्ट्या लोकांपासून संरक्षण करण्यासाठी त्याने ही निर्मिती केली होती असे मानतात.

ऊन खात बसलेले बाक आणि बाग (New Town Hall in the background )
तर अशा या बागेला Town Hall आणि गोलेम चा जनक Judah यांची पार्श्वभूमी लाभली आहे. येथे त्या दिवशी एक अनोखा उपक्रम राबवला जात होता : एक मोठ्ठे गुलाबी फुगा-रुपी डुक्कर तेथे उभारले (किंवा फुगवले) होते आणि वराह पालनासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी तेथे काही जणांचा गट सज्ज होता . तसेच डुक्करांची निगा राखण्यासाठी तेथे मार्ग दर्शन केले जात होते. आणि हे सगळे कशासाठी, तर मारण्यापूर्वी डुक्कर तंदुरुस्त आणि निरोगी असावे म्हणून !


हे डुक्कर अर्थातच आमचे भेटण्याचे संकेतस्थळ ठरले होते. राडेक प्राग मध्ये शिकत असल्याने त्याने आम्हाला शहर दाखवण्याची जबाबदारी घेतली होती. प्रागच्या गल्ल्या त्याला सुपरिचित होत्या आणि आम्हाला नकाशा शिवाय बिनधास्त फिरता येणार होते. सर्व प्रथम राडेक ने आम्हाला त्याचा आवडता पब दाखवला:


प्राग मधील प्रमुख आकर्षणांमध्ये याचा समावेश होत नाही, परंतु आमचा गाईड प्रागचा तरुण- राडेक असल्याने आम्हाला त्याच्या नजरेतून प्राग बघणे भाग होते. त्याने आमच्या साठी बहुतेक प्रेक्षणीय स्थळे बघता येतील असा मार्ग निवडला होता. त्याप्रमाणे वाटेत सर्वप्रथम बघावयास मिळाले ते म्हणजे वेलवेट क्रांतीचे स्मृतिशिल्प :
Velvet Revolution memento

झेकोस्लोवाकिया वर ४१ वर्षे राज्य केलेल्या साम्यवादी (Communist) पक्षाविरोधी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली तो हा दिवस :१७ नोव्हेंबर १९८९!  हा दिवस जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून ओळखला जातो , कारण या क्रांतीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग फार मोठा होता. या क्रांतीनंतर झेकोस्लोवाकियामध्ये प्रजासत्ताक स्थापन झाले.
या क्रांती विषयक माहिती घेतल्यानंतर प्रागच्या (फक्त राडेक साठी प्रसिद्ध असलेल्या) गल्ल्या (जेथे तो राहत असे) खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी धुंडाळण्यात आल्या.


दुर्दैवाने राडेकचे "नेहमीचे" दुकान बंद असल्याने त्याला जिभेचे चोचले पुरवता आले नाही आणि आम्ही पुढे निघालो.
एका झगमगीत मोठ्ठ्या इमारतीने आमचे लक्ष वेधून घेतले. Laterna Magika या नावाचे हे मूक-नाट्यगृह असून शाब्दिक संवाद नसल्याने येथील नाटके कुणालाही समजू शकतात. या नाट्य गृहाला लागूनच झेक प्रजासत्ताक चे राष्ट्रीय नाट्यगृह (National Theatre) असून "झेक ओपेरा " या नावाने ते प्रसिद्ध आहे. १८८१ साली सुरु झालेल्या , शंभर वर्षाचा इतिहास असलेल्या या नाट्यगृहाने झेक संस्कृती आणि भाषा जपण्याचे काम चोख बजावले आहे.
Laterna Magika
या नाट्य गृहांना वळसा घालून पुढे गेलो आणि त्याचा परिणाम म्हणून की काय, पात्रीसियाने एक नाटकी टूम काढली. "आपण कोणत्या रस्त्याने जात जात, काय काय बघणार आहोत" याची उत्सुकता वाढल्याने तिने हट्टाने एक नकाशा विकत घेतला आणि राडेक ला (बरोबर) रस्ते खरंच माहीत आहेत का, याची खात्री करण्यास तिने सुरवात केली.
आणि मग राडेक आणि पात्रीसिया दोघांच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही वेन्सिस्लास चौकात (Wenceslas Square) आलो. बोहेमियन संत वेन्सिस्लास यांचे नाव या चौकाला देण्यात आलेले आहे. प्राग मधील New Town या भागातील हा महत्वाचा चौक असून प्रागच्या  ऐतिहासिक केंद्रांमध्ये त्याचा समावेश आहे, इतकेच नव्हे तर "युनेस्को"ने जागतिक वारसा म्हणून गणल्या गेलेल्या स्थळांच्या यादीत वेन्सिस्लास चौकाचे नाव नोंदवलेले आहे.
Wenceslas Square
१३४८ साली जेव्हा बोहेमियन राजा चौथा चार्ल्स याने New Town बांधायला घेतले ,तेव्हा त्याच्या प्लान मध्ये घोड्यांच्या मार्केट साठी वेन्सिस्लास चौकाचा भाग राखून ठेवण्यात आला होता. याचे तत्कालीन नाव Koňský trh ( म्हणजे झेक भाषेत Horse Market) असे होते. पुढे एकोणीसाव्या शतकात जेव्हा संत वेन्सिस्लास यांचा पुतळा येथे बांधण्यात आला , तेव्हा या चौकाचे पुन्हा नामकरण करण्यात आले. चौदाव्या शतकापासून घडत आलेल्या युरोपातील अनेक महत्वाच्या घटना येथून सुरु झाल्याचे सांगण्यात येते. महत्वाची आंदोलने , निदर्शने , १९८९ मधील वेलवेट क्रांती, आणि सध्याच्या काळात झेक बिअर फेस्टिवल … प्राग मधील झेक लोकांचे (कुठल्याही कारणासाठी) एकत्र येण्याचे एक आवडते ठिकाण म्हणजे वेन्सिस्लास चौक !

National Museum

 या वेन्सिस्लास स्क्वेअर च्या एका  बाजूला National Museum आहे ज्यामध्ये एक कोटी चाळीस लाख वस्तूंचा संग्रह केला आहे, असे सांगण्यात आले. आत जाऊन शहानिशा करायला अर्थातच वेळ नव्हता !
तेथे एक ग्रुप फोटो काढून आम्ही Republic Square कडे निघालो. प्राग च्या Old Town भागामधील हा महत्वाचा चौक आहे. Municipal House ची आकर्षक इमारत पटकन नजरेत भरते.
एके काळी बोहेमियन राजा चौथा चार्ल्सच्या राहण्याचे ठिकाण असलेली ही इमारत सध्या  "स्माताना हॉल" या प्रसिद्ध concert हॉल ला आपल्यात सामावून घेऊन बसली आहे.
Municipal House
या हॉल च्या शेजारीच अकराव्या शतकापासून अस्तित्वात असलेले प्राचीन Powder Gate आहे. Old Town चे प्रवेशद्वार म्हणून बांधले गेलेले हे महाद्वार चौदाव्या शतकात स्तंभरुपात घडवण्यात आले. बोहेमियन राजांनी याचा उपयोग प्रामुख्याने बंदुकीची दारू (गन पावडर ) ठेवण्यासाठी केलेला असल्याने याचे नाव "Powder Gate" पडले.
Powder Gate

 पावडर गेट पासून काहीच मिनिटांच्या अंतरावर झेक राष्ट्रीय बँकेचे प्रमुख कार्यालय आहे: त्यावरील सिंहावर आरूढ झालेल्या पिळदार शरीर यष्टीच्या , हाती मशाल घेतलेल्या तरुणाची प्रतिकृती उठून दिसते. सिंह आणि  झेक राजे यांचे एक अतूट नाते आहे आणि ते एका आख्यायिकेवर बेतलेले आहे. ही आख्यायिका थोडक्यात (राडेक च्या शब्दांत ) पुढीलप्रमाणे : बृंचविक (Bruncvík) नावाचा राजा जेव्हा प्राग सोडून राज्यविस्तार करण्यासाठी मोहिमा आखत  होता तेव्हा रस्ता चुकून तो एका अरण्यात आला. त्याने पांढऱ्या सिंहाला एका नऊ तोंडे असलेल्या dragon बरोबर लढताना पाहिले. तेव्हा त्याने दोन दिवस लढाई करून सिंहाला वाचवले आणि dragon ची नऊ मुंडकी कापून काढली. तेव्हापासून तो सिंह राजाचा एकनिष्ठ सेवक राहिलेला आहे. या प्रवासात राजाला जादूची तलवार मिळाली जिला फक्त हुकुम केला असता शत्रूची डोकी आपोआप उडवणे शक्य होते.
Czech National Bank
Old Town प्राग मध्ये चार्ल्स विद्यापीठ बाहेरून पाहण्याचा योग आला. युरोपातील चौदाव्या शतकापासून अव्याहतपणे चालू असलेल्या मोजक्या जुन्या विद्यापीठांपैकी एक म्हणजे चार्ल्स विद्यापीठ होय. बोहेमियन राजा चौथा चार्ल्स याने हे विद्यापीठ १३४८ साली सुरु केले. Latin मध्ये हे नाव Universitas Carolina असे लिहिले जाते :

Old Town चा एक भाग विविध नाट्य गृहांनी व्यापला आहे. त्यापैकी उल्लेखनीय म्हणजे Stavovské divadlo (म्हणजे इस्टेट theatre) आणि Black Light Theatre ! स्तवोव्स्के हे नाट्यगृह हे खास झेक संस्कृतीशी निगडीत खेळ दाखवण्यासाठी प्रसिद्ध आहे. Black Light Theatre हे काळे पडदे आणि काळाकुट्ट सेट तयार करतात आणि कलाकार fluorescent कपडे घालून आणि अतिनील (ultra -violet) प्रकाशाचा वापर करून दृग्गोचर भास (दृष्टीला फसवतील असे) पेश करून मनोरंजन करतात:

त्यांचा शो पाहण्याची मला खूप उत्सुकता होती, मात्र रात्री साडेआठ च्या आधी एकही खेळ नसल्याने आम्ही पुढे निघालो.  एव्हाना बारा वाजत आले होते. बाराच्या ठोक्याला आम्हाला प्रागच्या अतिभव्य खगोलशास्त्रीय घड्याळाच्या पुढे उभे राहायचे होते. दर तासाला या घड्याळातील  (बायबल मध्ये सांगितल्याप्रमाणे) येशूने ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी पाठवलेले बारा  Apostle आणि इतर शिल्पे ( एक मानवी हाडांचा सांगाडा सुद्धा) यांचा हलता देखावा बघावयास मिळतो.
At Astronomical Clock (from left) Radek, Patricia, Unmesh , Roman

Old Town Square या आणखी एका महत्वाच्या चौकात असलेल्या Old Town हॉल च्या दक्षिण बाजूकडील भिंतीवर हे भव्य मध्ययुगीन घड्याळ घडवण्यात आलेले आहे. तिथे पर्यटकांची तोबा गर्दी जमली होती. Old Town Square या परिसरात मध्ययुगीन इमारती आणि शिल्पे यांची रेलचेल आहे.
"Church of Our Lady in front of Týn" with Patricia
मध्ययुगीन Gothic शैलीचे नमुनेदार उदाहरण म्हणून "Church of Our Lady in front of Týn" हे चर्च प्रसिद्ध आहे. त्याचे उंच निमुळते मनोरे फक्त सौन्दर्यातच भर घालत नाहीत तर या चर्चला एकमेवाद्वितीय बनवतात.
या चर्चच्या समोरच झेक समाज-सुधारक आणि तत्वज्ञ जॉन हस (John Hus) याचे स्मृतीशिल्प आहे. कट्टर कॅथोलिक परंपरांना आणि तत्कालीन चर्चच्या जाचक अंधश्रद्धा यांना आव्हान देणारी त्याची विचारसरणी आणि चार्ल्स विद्यापीठाला त्याने दिलेले योगदान यांमुळे त्याला युरोपातील पहिला धर्म-सुधारक मानले जाते.
John Hus Statue at Old Town Square
या गर्दीने गजबजलेल्या भागातून बाहेर पडल्यावर आणखी काही नाट्यगृहे बाहेरून पाहून चार्ल्स ब्रिज पाहायला जायचे होते.
बाहुलीनाट्य सादर करणारे Marionette Theatre
 आणि
Ta Fantastika !
दुपारचे जेवण एका बिअर बार मध्ये उरकून आम्ही सुप्रसिद्ध चार्ल्स ब्रिज कडे निघालो. ब्रिज च्या समोरच प्राग मधील सर्वांत जुने चर्च "Church of the Most Holy Saviour" असून पूर्वीच्या काळी येथे शाही टांकसाळ (नाणी घडवण्याची जागा) होती.
Church of the Most Holy Saviour
चार्ल्स ब्रिज चे झेक नाव Karlův most असून रोमन सम्राट चौथा चार्ल्स याने या पुलाची पहिली वीट बसवली होती.
अंकशास्त्राचा प्रभाव असणारा राजा असल्याने या पुलाचे बांधकाम मुहूर्त साधून सुरु करण्यात आले होते : १३५७,९,७,५.३१ : म्हणजे १३५७ साली ९ जुलै सकाळी ५ वाजून एकतीस मिनिटे ! बरोब्बर या वेळी पहिला दगड रचण्यात आला. हा आकडा कुठूनही वाचला तरीही तोच राहतो (palindrome number). हा पूल म्हणजे प्राग चा किल्ला आणि Old Town हा भाग यांच्यातील महत्वाचा दुवा आहे.


Charles Bridge and Prague Castle (to the right)

 १८४१ सालापर्यंत हे दोन भाग जोडणारा हा एकमेव पूल होता. अनेक युद्धे आणि योद्धे पाहिलेल्या या "पुलाखालून बरेच पाणी गेलेले आहे" आणि या पुलाच्या विटा न विटा इतिहासातील रंजक गोष्टी सांगू शकतील असे वाटते. 
 
Tower of the Charles Bridge

 पूल ओलांडून आम्ही किल्ल्याकडे कूच केले. वाटेत एका फेरीवाल्याकडून झेक पारंपारिक चमचमीत खाद्यपदार्थ "Trdelník"  घेतला. मूळच्या हंगेरीचा असणारा हा गोड पदार्थ आपल्याकडच्या चिरोट्या सारखा लागतो :
Trdelník

 किल्ल्यावर जाण्यासाठी चढाचा रस्ता असला तरी हा चढ फारसा दमवणारा नाही. प्राग चा किल्ला हा नवव्या शतकापासून अस्तित्वात असून जगातील सर्वांत जुना किल्ला म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये त्याची नोंद आहे. किल्ल्याच्या आवारात अनेक देखणे राजवाडे, पवित्र चर्च , वैशिष्ट्यपूर्ण कॅथेड्रल्स , प्रसन्न बागा आणि ऐतिहासिक हॉल्स आहेत.
A Palace and  St.Vitus Cathedral of the Prague Castle


 प्राग च्या किल्ल्यावरून Little Quarter आणि Old Town हे प्राग चे  भाग अतिशय सुंदर दिसतात.
Bird Eye view of Prague from Prague Castle
किल्ला फिरून झाल्यावर किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूने उतरलो. तेथून राडेकने जिथे कार पार्क केली होती त्या ठिकाणी जायला सोईची मेट्रो होती. मेट्रो स्टेशन जमिनीखाली जवळ जवळ दोन-तीनशे मीटर खोल होते. स्टेशन पर्यंत जाण्यासाठी क्षणभर धडकी भरेल असा escalator होता :
Escalators in Prague Metro stations
 
राडेक ने आम्हाला अर्ध्या  दिवसात प्राग दर्शन घडवले होते… आता येथून पुढे त्याला त्याच्या घरी म्यएनिक ला जाण्याचे वेध लागले होते.  म्यएनिक हे प्राग च्या उत्तरेस असलेले, व्लतावा आणि लाबं या नद्यांच्या संगमावर वसलेले एक छोटे शहर आहे. प्रामुख्याने वाईन उद्योगासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. हायवे ने तासाभरात आम्ही म्यएनिकला पोचलो सुद्धा !
 म्यएनिकचा प्रसिद्ध किल्ला शहरात प्रवेश करतानाच उजवीकडे दिसतो. या किल्ल्याला वाईन ठेवण्यासाठी मोठ्ठी तळघरे आहेत आणि नदीच्या बाजूस आता रोइंग क्लब विकसित केला आहे. 
The Castle of Melnik

Confluence of the Vltava and the Labe

 व्लतावा आणि लाबं या नद्यांचा संगम पाहून आम्ही राडेक च्या घरी गेलो. राडेकचे घर टुमदार हे विशेषण मनात ठेवूनच बनवले असावे असे वाटले :

 राडेकला संगीतात विशेष रुची असल्याने आणि तो एक उत्तम rower (नौकानयन-पटू) असल्याने त्याची खोली गिटार , ग्रामोफोन, त्याची मेडल्स आणि बक्षिसे यांनी भरून गेली होती. मी सोडून इतर सर्वांना गिटार वाजवता येत असल्याने रोमान, पात्रीसिया आणि राडेक यांनी एक छान मैफिल जमवली. नंतर राडेक ने खास आमच्या साठी राखून ठेवलेली El Dorado उघडली आणि आम्ही शांत संगीत ऐकण्यात "रम"माण झालो.
 राडेक च्या आईने तोपर्यंत स्वयंपाक तयार ठेवला होता. मी एकटा शाकाहारी असल्याने माझा खास विचार करून राडेकने त्याच्या आईला स्वयंपाक करायला सांगितला होता . कोबीचे वडे, भाज्यांचे मिश्रण घालून केलेले पकोडे आणि चॉकलेट केक अशी माझ्या सोईने मी त्या खाद्य पदार्थांना नावे दिली.
Dinner prepared by Radek's mother
दमदमीत डिनर करून आम्ही शहरात फिरायला (खरं म्हणजे प्यायला) निघालो. राडेक चा भाऊ शेपान कार ने आम्हाला सोडायला आला. Němý Medvěd (न्यमी मेदव्यद) या बिअर बार मध्ये दोन-अडीच तास घालवले. राडेक च्या मते हा तिथला सर्वांत चांगला बार असल्याने इतर कुठेही जाण्याची गरज नव्हती. राडेक ला तिथेच त्याचा एक जुना मित्र भेटल्याने त्याला झिंगायला फार वेळ लागला नाही.


तिथली बिअर स्वादिष्ट होती यात वाद नव्हता पण घरी चालत जायचे होते हा विचार करून आम्ही प्रमाणात घेतली होती. बार मधून बाहेर पडल्यावर मात्र राडेक ला उचलून घरी न्यावे लागणार असे वाटत होते. मात्र एक -दीड किलोमीटर चालून गेल्यानंतर चमत्कार झाला: राडेक  घराच्या दिशेने पळू लागला. आणि पाहता पाहता दृष्टीआड  गेला. मोठीच पंचाईत झाली ! आम्हाला कुणालाही घराचा रस्ता माहीत नव्हता. कारने बार पर्यंत आलेलो असल्याने आणि अशी काही वेळ येईल याची काडीमात्र कल्पना नसल्याने आम्हाला काय करावे कळत नव्हते. राडेकचा फोन घरी होता. आणि त्याचा आईचा किंवा भावाचा फोन नंबर घेतला नव्हता. दिशांचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे चालू लागलो. एका अनपेक्षित वळणावर राडेक आमची वाट बघत थांबला होता. त्याचे स्पष्टीकरण तर वळणापेक्षाही अनपेक्षित होते : तो म्हणाला, " मी नेहमीच दारू पिऊन घरी पळत जातो , म्हणजे लवकर घरी पोचता येते, आज मात्र अर्धे अंतर गेल्यावर लक्षात आले की तुम्हाला मागे सोडून आलो आहे… ".  घरी पोचेतो बारा वाजून गेले होते आणि घरी पोचलो याच गोष्टीचा खूप आनंद झाला होता. (क्रमशः )

सर्व छायाचित्रे : उन्मेष, पात्रीसिया
संदर्भ : विकिपीडिया, झेक मित्रांकडून ऐकलेल्या लोककथा