रविवार, ३१ डिसेंबर, २०२३

चंद्र मी व्हावे

चांदण्याला तेथे  प्रवेश नाकारताना 

जेथे शरीरसंपदा तुझी साकारताना 

रेलावे  की चूर व्हावे खेटून तुला ओणवे 

रात्र"ही" थकून जावी अन् चंद्र मी व्हावे 


गोपचांदण्या गोफ लोभसे पाहती बांधू मला 

राधाअवनी प्रीत मोहक पाहती रांधू मला  

तिला सतवाया जरासे कलेकलेने गुप्त व्हावे

भरती सागरास यावी अन् चंद्र मी व्हावे 


उल्का लाखो, तारे चमचमणारे कोट्यावधी 

निखळती नक्षत्रे सारी नजर तुझी पारधी

आकाशगंगा ही करी तुला पाचारण हळवे

नक्षत्र तू अठ्ठाविसावे अन् चंद्र मी व्हावे 


अमावस्या भूतलावरी, असणे माझे सुप्त व्हावे

संमीलन ग्रहगोलांचे आपल्यासाठी लुप्त व्हावे

आकाशाचे श्याम राज्य तुझ्या सवे संपन्न व्हावे

पौर्णिमा ही फिकी ठरावी अन् चंद्र मी व्हावे