Sunday, December 28, 2014

केल्याने देशाटन … चातुर्य येत असे मनुजा !


अॅमस्टरडॅमहून सीअॅटलला आल्याला दोन महिने झाले. दुसऱ्यांदा घर सोडणे हा अनुभव पहिल्या वेळच्या आठवणी जाग्या करून गेला. २०१२ च्या ऑगस्ट ला पहिल्यांदा घर सोडले. पहिल्यांदा पुण्याच्या बाहेर … पहिला विमान प्रवास. खूप गोष्टी पहिल्यांदा घडत होत्या. त्या वेळी अधीरता आणि रोमांच अशा मिश्र भावना होत्या. आत्ता मागे वळून पाहताना वाटतंय की दोन सुटकेसेस मध्ये आयुष्य बांधून मूळ जागा सोडणे हा आतापर्यंत घेतलेला सर्वोत्तम निर्णय होता.  जेव्हा तुम्ही दूर जाता तेव्हा तुमच्या जीवनात अनिश्चितता ही अविभाज्य भाग होते आणि तुम्ही नाना  प्रकारे प्रगल्भ बनता.
नवीन आव्हाने पेलताना तुम्हाला तुमचीच नव्याने ओळख होते. तुम्हाला स्वतःचेच आश्चर्य वाटते. तुम्ही शिकता, क्षितिजाच्याही पलीकडे सीमा आखून ! तुम्ही अ-शिकता स्वतःच्या मर्यादा ओळखून. तुम्ही नम्र होता. तुम्ही व्यक्तिमत्व घडवता. तुम्हाला घराची ओढ लागते. तुम्ही कायम आठवतील अशा आठवणी तयार करायला शिकता. तुम्ही जर घरापासून दूर  (परदेशी किंवा परगावी) राहिलेले असाल तर तुम्हाला पुढीलपैकी काही गोष्टी जाणवल्या असतील.

१. Adrenaline  हा तुमच्या आयुष्याचा भाग होतो: 
अड्रेनलीन हे अधिवृक्क ग्रंथीच्या मध्यातून निर्माण होणारे एक संप्रेरक असून ते ताण, हृदयाचे ठोके वाढणे, अशा अवस्थेत स्त्रवले जाते. ज्या क्षणापासून तुम्ही बाहेर जाण्याचा निर्णय घेता, त्या क्षणापासून भावभावनांचा एक कल्लोळ मनात सुरु असतो. ताण, राग, उत्सुकता, उत्तेजना, सुरसुरी अशा भावनांमुळे Adrenaline ची सवय होऊन जाते. "routine" हा शब्द तुमच्या शब्दकोशामधून नाहीसा होतो. नवीन जागा, नवीन सवयी, नवीन माणसे. शून्यातून सुरवात करणे ज्या गोष्टीची भीती वाटायला हवी, त्या गोष्टीचं व्यसन लागतं.

२. तुम्ही जेव्हा परत जाता, सगळं काही पूर्वीसारखंच वाटतं:
सुट्टी साठी जेव्हा तुम्ही घरी जाता तेव्हा तुम्हाला जाणवतं की तिथे काहीच मोठा बदल झालेला नाहीये. ज्या वेगाने तुमचे आयुष्य वळणे घेत असते त्यासमोर तुम्हाला तुमच्या जुन्या शहरातील आयुष्य खुजे वाटू लागते. रोमांचित होण्यासारखे त्यात आता काही वाटत नाही. आयुष्य तुमच्या साठी थांबणार नाही याची प्रचीति येते. 

३. तुम्हाला व्यक्त होण्यासाठी शब्द कमी पडतात
जेव्हा तुम्हाला कोणी तुमच्या नवीन आयुष्याबद्दल विचारतं , तेव्हा उत्तरासाठी तुम्हाला योग्य शब्द सापडत नाहीत. आणि नंतर संभाषण चालू असताना अचानक तुम्हाला आठवतं - "एकदा मी तिकडे… " पण तुम्ही जिभेला आवर घालता कारण तुम्हाला इतरांना भारावून टाकायचं नसतं, विशेष करून अशा गोष्टी सांगून ज्या परदेशाशी निगडीत आहेत. समोरच्या माणसाला तुम्ही गर्विष्ठ किंवा बढाईखोर वाटू शकता पण त्याला महत्व न देण्याचे तुम्ही केव्हाच शिकलेले असता. 

४. धैर्य आणि शौर्य यांचे इतरांकडून केले जाणारे आकलन तुम्हाला अवाजवी वाटते. 
अनेक जण तुम्हाला सांगतात की तुम्ही खूप हुशार आहात / शूर आहात / तुमच्या कडे धैर्य आहे आणि ते सर्व जण सांगतात की जर का योग्य परिस्थिती असती आणि भीती वाटली नसती तर आम्ही सुद्धा परदेशी स्थायिक झालो असतो.  पण, तुम्हाला माहीत असते की तुम्हाला सुद्धा कधी तरी भीती वाटलीच होती, अंगावर काटा आलाच होता. तुमच्या त्या महत्वाच्या निर्णयात धैर्याचा वाटा केवळ दहा टक्के असतो, उरलेले नव्वद टक्के तुमची इच्छाशक्ती असते. तुमचं मनापासून वाटणं आणि त्यासाठी झोकून देणं असतं. ज्या वेळी तुम्ही ती गोष्टी ठरवता, त्या वेळेपासून तुम्ही भित्रट नसता की तुम्ही शूर नसता, तुम्ही फक्त जे समोर येतं त्याला सामोरे जाता. 

५. तुम्हाला नव्याने स्वातंत्र्य मिळतं 
परदेशी राहातानाचे स्वातंत्र्य वेगळेच असते. तुम्ही अनेक प्रकारच्या सुख सोयींचा त्याग केलेला असतो (आयते खाणे , आयती साफ-सफाई वगैरे) आणि त्या सगळ्याची सवय केलेली असते , घरापासून हजारो मैल दूर राहून !
आपण ठरवले तर काहीही करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण होतो. 

६. तुम्ही कोणतीही एक विशिष्ट भाषा बोलत नाही. 
(अमेरिकेत जेथे मराठी समुदाय मोठ्या प्रमाणात आहे असे भाग अपवाद)
संभाषण करत असताना तुम्ही अचानक दुसऱ्या भाषेचा शब्द वापरता आणि तो हळूहळू सवयीचा होतो. उदाहरणार्थ : वसतीगृहात राहत असताना आम्ही फाताल (fatal म्हणजे स्पानिश मध्ये "वाईट") हा शब्द कुठलीही गोष्ट आवडली नाही की म्हणत असू. स्लोवाक, रशियन, पोर्तुगीज, इटालियन हे सर्व शेजारी हा शब्द सहज वापरत असत. bon appetit या फ्रेंच शब्द-प्रयोगाचेही तेच! युरोपिअन भाषांमध्ये cheers म्हणण्याचे इतके प्रकार आणि संकेत आहेत की त्याचा एक स्वतंत्र कोर्स होऊ शकेल. कधीकधी परकीय भाषेतला एखादा शब्द इतका भावतो आणि चपखल वाटतो की मातृभाषेत बोलतानाही पटकन तोच अगोदर आठवतो. असे झाल्यास समजावे की एखादे मातृभाषेतील पुस्तक वाचण्याची वेळ आली आहे. (शब्दभांडार वाढवण्यासाठी!)

७. तुम्ही आनंदाने निरोप घ्यायला शिकता 
तुम्हाला समजलेले असते की तुमच्या आयुष्यात येणारे बहुतेक लोक क्षणभंगुर आहेत त्यामुळे नात्यांचे बंध निर्माण करतानाच तुम्ही ते सैल विणता, जेणेकरून ते बंध सोडवताना गुंता होत नाही. एखादी गोष्ट सोडून देणे आणि धरून ठेवणे याचा बरोब्बर सुवर्णमध्य तुम्हाला साधता येतो. भूतकालीन आठवणींत रमणे आणि रोजचा व्यवहार यांमधील द्वंद्व तुम्ही लीलया पेलू शकता. 

८. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी (कमीत कमी ) दोन असतात 
दोन सिमकार्ड्स , दोन लायब्ररी कार्ड्स , दोन बँक कार्ड्स , दोन क्रेडीट कार्ड्स , दोन प्रकारची नाणी जी सुट्टे पैसे देताना नेहमीच मिक्स होतात आणि तुम्ही ओशाळता. 

९. सामान्य ? म्हणजे नक्की काय ?
परदेशी राहणे , प्रवास करणे या गोष्टींमुळे एक गोष्ट तुम्हाला पक्की समजते: "सामान्य म्हणजे समाजात आणि संस्कृतीत मिसळणे". जेव्हा तुम्ही नवीन समाजात जाता तेव्हा नित्याच्या गोष्टी आणि सामान्यतेची संकल्पना , या बदलतात. एखादी गोष्ट करण्याचा दुसरा मार्ग , दुसरी पद्धत तुम्हाला समजते. आणि तुम्हाला त्याची सवयही लागते. उदाहरणार्थ : भात खाणे. हाताने कालवून भात खाणे ही गोष्ट आपण लहानपणापासून बघून बघून शिकतो, मात्र चमच्याने भात खाण्याची सवय लागायला वेळ लागत नाही. चांगले किंवा वाईट याबद्दल वाद न घालता तुम्ही  अशा काही सवयी आपोआप बदलता. 

१०. स्वतःच्याच शहरात तुम्ही पर्यटक होता 
तुमच्या शहरातील पर्यटन स्थळे जेथे तुम्ही कदाचित कधीच गेलेला नसता, तेथे जाण्याचे बेत तुम्ही आखू लागता. 
सुरवातीला नवीन नवीन वाटणारे शहर हळूहळू आपलेसे वाटू लागते. शहरातील रस्ते, गल्ल्या, दुकाने आणि उपहारगृहे सर्व विषयांतील तुम्ही तज्ञ होता. तुम्हाला कोणी भेटायला आले की त्यांना काय दाखवू आणि काय नको असे तुम्हास होऊन जाते.

११. तुम्ही सहनशील होता आणि मदत मागायला शिकता. 
जेव्हा तुम्ही परदेशी राहता तेव्हा एखादी सोपी गोष्ट सुद्धा अवघड आव्हान वाटू शकते. एखादे शासकीय काम, परक्या भाषेतील योग्य शब्द वापरणे, फर्निचर जोडणे, एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी कोणती बस घेणे (स्मार्ट फोन नसताना / नकाशे घेऊन एखादे नवीन शहर फिरताना). एक क्षणभर तुम्ही उदास होता , निराश वाटते पण दुसऱ्याच क्षणी तुम्हाला तुमच्या मधील धीर आणि सहनशीलता जाणवते. मदत मागण्याखेरीज दुसरा उपाय नाही हे समजते. मदत मागता येणे ही एक अतिशय चांगली सवय आहे असे मला वाटते. 

१२. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वेळ व्यतीत करता येऊ शकतो. 
हे चालत्या गाडी मधून बाहेर बघण्या सारखे आहे : दूर वर असलेल्या गोष्टी हळूहळू मागे पडतात पण खिडकी समोर असलेल्या गोष्टी निमिषार्धात दृष्टीआड होतात. एकीकडे तुम्हाला घरून बातम्या मिळतात : महत्वाचे वाढदिवस, महत्वाचे सण -समारंभ जे तुम्हाला साजरे करता आले नाहीत , अनेक मित्र-मैत्रिणी, नातेवाईक ज्यांना तुम्हाला निरोप देता आला नाही.  आणि दुसरीकडे तुमच्या नवीन जीवनातील नवीन आव्हाने आणि वेगवान बनू पाहणारे वेळापत्रक. वेळ कुठे उडून जातो ते कळत नाही. मग तुम्हाला वेळेची किंमत अधिकच कळते. एखादा कुटुंबाबरोबर केलेला Skype कॉल , मित्रांबरोबर रंगवलेली Skype मैफल , नवीन मित्रांबरोबर केलेला एकत्र जेवणाचा कार्यक्रम, जाता येता कुणालाही चेहऱ्यावर  कायम हसू ठेवून hello किंवा hi म्हणायची सवय, प्रत्येक गोष्टीत तुम्ही आनंद लुटायला शिकता. 

१३. भूतकाळ अनपेक्षितपणे वीज चमकावी तसा आठवतो.
एखादा पदार्थ, एखादं  गाणं , एखादा गंध, एखादी चव,  एखादी क्षुल्लक गोष्ट तुम्हाला घराची तीव्रतेने आठवण करून देते. तुम्हाला त्या गोष्टी आठवतात ज्या तुम्हाला आठवतील असं कधीच वाटलं नव्हतं. तुम्हाला काही करून क्षणभर का होईना परत जावसं वाटतं. व्याकूळ होणे किंवा भरून येणे असे वाक्प्रचार तुम्ही जगता. तुम्हाला कोणापाशी तरी हे सगळं बोलावंसं वाटतं, कुणी अशी व्यक्ती जी तुम्हाला समजून घेऊ शकेल. 

१४. "कुठे" यामुळे फरक पडत नाही , पण "कधी " आणि "कसं" यामुळे पडतो  
मनात तुम्हाला माहिती असतं की तुम्हाला जागेची/शहराची/गावाची आठवण येत नाहीये, तर आठवण येतीय ती जिव्हाळ्याची माणसं, त्यांच्या बरोबर घालवलेले सोन्यासारखे क्षण, आणि त्यांच्या बरोबर जगलेल्या त्या आयुष्याच्या दिवसांची!  तो काळ जेव्हा तुम्ही मनसोक्त फिरला होता, भटकला होता, जीवनातील काही खास गोष्टी खास लोकांबरोबर शेअर केल्या होत्या, तो काळ, जेव्हा तुम्ही खूष होता. तुमच्यातले तुम्ही हे तुम्ही राहिलेल्या अनेक ठिकाणी विखुरलेले असता. त्या त्या ठिकाणी परत परत जाऊनही त्या ठिकाणांची आठवण येणे थांबत नाहीच. 

१५. तुम्ही (अंतर्बाह्य) बदलता.
तुम्ही life changing trips बद्दल ऐकले असेल. त्या सहज घडत नाहीत. परदेशी राहणे ही एक तशीच ट्रीप असते जी तुम्ही आणि तुमचं आयुष्य बदलून टाकते. तुमचे मूळ हादरवून सोडते. तुमच्या शक्याशक्यता आणि भीती यांना नवीन परिमाणे देते. अॅमस्टरडॅममध्ये राहण्याने मला बदलले, अनेक प्रकारे. आणि त्या बदलानेच मला नवीन बदल अंगीकारण्यासाठी उद्युक्त केले आहे.  कदाचित तुम्हाला आत्ता याचे महत्व समजणार नाही , किंवा विश्वास बसणार नाही, पण काही काळ लोटल्यावर मात्र नक्कीच समजेल: सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ दिसेल : तुमच्या मध्ये उत्क्रांती घडली आहे , तुम्ही काही जुन्या जखमांचे व्रण घेऊन फिरता आहात, तुम्ही जगला आहात. तुम्ही बदलला आहात. 

१६. तुमचे घर एका (किंवा दोन) सुटकेस मध्ये मावते
जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमचे आयुष्य सुटकेस मध्ये बांधता, तेव्हा तुमची घर ही संकल्पना बदलते. ज्या ज्या गोष्टीला तुम्ही घरात स्पर्श करू शकता ती ती गोष्ट तुम्हाला नवीन घ्यावी लागते, बदलावी लागते. जेव्हा तुम्ही (परदेशी) प्रवास करता तेव्हा नवीन कपडे, नवीन पुस्तके, नवीन मग्स अशा गोष्टी साठतातच. अन मग एक दिवस असा येतो जेव्हा या नव्या शहरात तुम्हाला घरी असल्यासारखे वाटते. घर म्हणजे तुमच्यासोबत प्रवास करत असलेला (तुमच्यातला) प्रवासी, तुम्ही मागे सोडून आलेली माणसे, घर म्हणजे रस्ते आणि गल्ल्या जिथे तुमचं आयुष्य घडतं.  घर म्हणजे तुमच्या नवीन अपार्टमेंट मधल्या निरुद्देश्य गोष्टी : अशा गोष्टी ज्या गोष्टी तुम्ही एका मिनिटात फेकून देणार आहात जेव्हा तिथून जायची वेळ येईल. घर म्हणजे आठवणी सुद्धा , घर म्हणजे ते long-distance Skype कॉल्स सुद्धा . घर म्हणजे भिंतीवर चिकटवलेली चित्रे आणि छायाचित्रे , घर तिथे असतं जिथे तुमचं मन असतं !

१७. तुम्ही तटस्थ होता.
तुमच्या आजूबाजूला असणारी माणसे काय करत आहेत , त्यांची आणि तुमची मते जुळतात का, ते समलिंगी आहेत की विरुद्धलिंगी, या आणि अशा गोष्टींबाबत तुम्ही उदासीन होता. तुमचे मत कुणावर लादण्याचा प्रयत्न तुम्ही करत नाही. कुणाच्या विशिष्ट वागण्या-बोलण्याचा तुम्हाला त्रास होणे कमी होते . तुम्ही विवेकी बुद्धीने तटस्थ भूमिका घ्यायला शिकता.

१८. मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी काय खस्ता खाव्या लागतात ते तुम्हाला समजते. 
घरातील स्वयंपाकासाठी वाण-सामान आणण्यापासून ते शयनगृहातील पलंगासाठी चादर आणण्यापर्यंत सर्व गोष्टी तुम्ही स्वतः करत असल्यामुळे घर-खर्चाचा नेमका अंदाज तुम्हाला येऊ लागतो. एखाद्या दिवशी दूध ऊतू गेल्यावर तुमची आई का "चक चक" करायची हे तुम्हाला आता नेमके समजते.  एखादी वस्तू विकत घेण्याआधी त्याची खरंच गरज आहे हे स्वतःलाच विचारून पाहता.

१९. आता परत फिरणे नाही. 
एकदा समजलं की गैरसोईतून सोय कशी करायची आणि शून्यातून सुरवात कशी करायची , मग या विशाल आणि कुतूहलजनक जगात फिरणे हा एक विस्मयकारक आणि रोचक अनुभव होऊ शकतो. एकदा आपला देश सोडलेला माणूस कायमचा परत येत नसेल, तर त्यामागे हा वेड लावणारा प्रवास आणि अनुभवांची आजन्म पुरणारी शिदोरी हीच कारणे असावीत. 

तुम्ही परदेशी राहिलेला आहात का ? तुम्हाला याला काही पुरवणी जोडायची आहे का ? टिप्पणी करा आणि तुमचे अनुभव पोचवा!  
 
[टीप: या लेखाचा उद्देश परदेशी राहण्याचा पुरस्कार करणे नसून आलेल्या अनुभवांना केवळ वाट करून देणे हा आहे. देश/शहर न सोडताही उत्तम प्रगती केल्याची उदाहरणे जगात अनेक असतात. मूळ स्पानिश ब्लॉग
 चा हा भावानुवाद असून माझे काही अनुभवसुद्धा यात जोडले आहेत.]

As we brace ourselves to move abroad for the third time in a few years, I look back and I know that squeezing our lives into a suitcase and leaving our native Barcelona was the best decision that we could have possibly made. Because when you move away, when you turn your life into a journey filled with uncertainty, you grow up in unexpected ways. - See more at: http://masedimburgo.com/2014/06/04/17-things-change-forever-live-abroad/#sthash.EtIRj799.dpuf


As we brace ourselves to move abroad for the third time in a few years, I look back and I know that squeezing our lives into a suitcase and leaving our native Barcelona was the best decision that we could have possibly made. Because when you move away, when you turn your life into a journey filled with uncertainty, you grow up in unexpected ways. - See more at: http://masedimburgo.com/2014/06/04/17-things-change-forever-live-abroad/#sthash.EtIRj799.dpuf
As we brace ourselves to move abroad for the third time in a few years, I look back and I know that squeezing our lives into a suitcase and leaving our native Barcelona was the best decision that we could have possibly made. Because when you move away, when you turn your life into a journey filled with uncertainty, you grow up in unexpected ways. - See more at: http://masedimburgo.com/2014/06/04/17-things-change-forever-live-abroad/#sthash.EtIRj799.dpuf