शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

देवांच्या देशात ("ग्रीस"हल) : एलाफांसोस : दक्षिण ग्रीस मधील सुंदर बेट


 दिवस सहावा : २ सप्टेंबर २०२१, एलाफांसोस : दक्षिण ग्रीस मधील सुंदर बेट


निवांतपणे उठून आवरून दक्षिणेस निघालो. एलाफांसोस नावाच्या बेटावर बीच वर दिवस घालवणार होतो. वासिलीस ने पुन्हा चालकाची आणि मी DJ ची जबाबदारी घेतली. पुन्हा डोंगराळ असा घाटरस्ता होता. मात्र या रस्त्यावर गाड्यांची वर्दळ दिसत होती.
सुंदर विहंगम असे काही दिसताच गाडी थांबवून फोटो काढत पुढे जात राहिलो. एलाफांसोस ला जाण्यासाठी फेरीबोट घ्यावी लागते. त्याच्या रांगेत जवळपास एक तास गेला. फेरीतून दिसणारे बेट फारच सुंदर दिसत होते.

फेरीतून दिसणारा निळाशार  समुद्र 

फेरीमध्ये अर्थातच गाडी नेली होती. गाडीने सिमोसा नावाच्या बीच वर गेलो. हा बीच नितांतसुंदर आहे. निळेशार स्वच्छ पाणी , समुद्राचा तळ दिसेल इतके पारदर्शक पाणी आणि पांढऱ्या रेतीचा ऐसपैस किनारा. सावली देणारीएक मोठ्ठी छत्री आम्ही त्या दिवसापुरती भाड्याने घेतली. खाण्या पिण्याच्या ऑर्डरी देऊन आम्ही आराम खुर्च्यांत पसरलो. बीचवर सूर्यस्नान , समुद्रात पोहणे आणि खाणे- पिणे , या गोष्टी एका पाठोपाठ एक करत राहिलो. नाथन ने आणलेले स्नॉर्केल वापरुन समुद्राखालील जग बघण्याचाही प्रयत्न करुन झाला. मात्र त्या सागरी परिसरात फारसे मासे वगैरे नसल्याने समुद्री वनस्पती पाहूनच समाधान करुन घेतले.

सिमोसा येथील बीच 



बीचवर दूरपर्यंत वॉक साठी गेलो. पाण्यात मनसोक्त पोहलो. सूर्यास्ताच्या वेळी बीच वर योगासने केली. माझी व नाथन ची बीच वर तारे बघत आणि गप्पा मारत रात्रभर थांबण्याची इच्छा होती. वासिलीस आमच्यासाठी हो म्हणाला. बीचपासून जवळ असलेल्या गावात जाऊन आम्ही रात्रीच्या खाण्या पिण्याची आणि सकाळच्या नाश्त्याची सोय केली आणि एका हॉटेल मधे रात्रीचे जेवण केले.

बीच योगा 

चांगला अंधार पडल्यावर बीच वर परतलो आणि आमची भट्टी जमली. गाडीतून आणलेली गिटार, त्यावर कसरत करणारी नाथन ची बोटे, वासिलीस गात असलेली सुरेल गाणी आणि अधूनमधून थिरकणारे आमचे पाय , यांनी एक माहोल बनला. संगीतविषयक द्न्यान त्या दोघांनाही बरेच असल्याने माझ्या ज्ञानात भर पडत होती. नाथन ला एखादे गाणे ऐकवल्यास तो काही मिनिटांतच त्याची मेलडी गिटार वर वाजवू शकत होता. त्यांनी पाश्चात्य संगीत आणि भारतीय संगीत यांच्यामधील सांगडही छान घालून दाखवली.

आकाश कालच्या तुलनेने काहीसे ढगाळ असल्याने म्हणावे तितके तारे दिसत नव्हते. मात्र आम्ही निग्रहाने जागे राहिलो होतो. ताऱ्यांचे दर्शन झाल्यावरच आम्ही झोपेची आराधना सुरु केली. वारा मस्त वाहत होता आणि आम्हाला जणू जोजवत होता. तारे बघता बघता कधी झोप लागली कळलेच नाही.


दिवस सातवा : ३ सप्टेंबर २०२१, अथेन्स मधील अखेरची संध्या

बीच वर जाग आली तेव्हा कळले की वासिलीस त्याच्या आरामखुर्चीत नाहीये.

पहाटे च्या वेळेचा सिमोसा चा समुद्र किनारा 


नाथन ला उठवून आम्ही समुद्रात डुबकी मारुन फ्रेश झालो. परत गाडीकडे गेल्यावर समजले की थंडीमुळे वासिलीस रात्रीच गाडीत येऊन झोपला होता.
गावातील एका बेकरीमधे ताजे ग्रीक केक्स खाऊन आम्ही फेरी मधे शिरलो. गाडीच्या बाहेर जाऊन हवा खाण्याचा आता मूड नव्हता. Airbnb मधे येऊन आंघोळी करुन आम्ही अथेन्स ला निघालो. वाटेत कोल्डकॉफी झाली. जेवणासाठी एका फूड कोर्ट ला भेट दिली.

अथेन्स ला परत जाताना परत डोंगराळ घाटरस्ता रस्ता आणि विविध ऐतिहासिक नावांची शहरे ओलांडली. वासिलीसशी गप्पांमधून बरीच माहिती मिळत होती.
ऑलिंपिक, होमर या कवीचे गाव, हर्क्युलसच्या साहसकथांशी निगडीत गावे , सगळे बघणे शक्य नव्हते. त्यासाठी ग्रीस मधेच जन्म घ्यावा लागेल.

टळटळीत दुपारी अथेन्स मधे पोचलो. वासिलीस च्या प्रेयसीने आमचे स्वागत केले. नाथन व मी तास दोन तास विश्रांती घेतली. संध्याकाळी आठ वाजता कोस्तास नावाच्या एका मित्राला भेटायला शहरच्या मध्यवर्ती भागात गेलो. सार्वजनिक वाहतूक तितकिशी सोपी नाही हे समजले. बस साठीची तिकिटे छोट्या दुकानांतून घ्यावी लागतात, Uber सारखे ॲप चालत नाही , आम्ही वासिलीस च्या कार वर किती अवलंबून होतो ते समजले. बस स्टॉप वरील दोन तरुणांनी आमच्यासाठी त्यांच्या ॲप मधून टॅक्सी मागवली. सुदैवाने रोख पैसे देण्याची सोय होती.
शहरातील गजबजलेल्या भागात जाताच आम्हाला आम्ही पर्यटक असल्याची पुनर्जाणीव झाली आणि आम्ही काही स्मरणिका खरेदी केल्या.
कोस्तास ठरलेल्या वेळी नियोजित ठिकाणी आला. सोशल हॅकर्स ॲकॅडमी चा शिक्षणाधिकारी असलेल्या कोस्तास शी " हॅक युअर फ्युचर" साठी स्वयंसेवकम्हणून काम करताना ऑनलाईन बराचसा संपर्क झालेला होता. आम्ही दोघेही निर्वासितांच्या संगणक शिक्षणासाठी काम करत असल्याने आम्हाला बोलायला विषय खूप होते. नाथनही संगणक क्षेत्रात काम करत असल्याने तोही आमच्या संभाषणात हिरिरीने सहभाग घेत होता.

नाथन आणि कोस्तास बरोबर अथेन्स मध्ये 


रात्री आईस्क्रीम खाण्यासाठी पुन्हा वासिलीस ला भेटलो आणि सहलीतील खास क्षणांची उजळणी केली.

मारिया, वासिलीस , नाथन आणि मी 



वासिलीस मुळे एक अस्सल ग्रीक सहल सहज पार पडली होती. ग्रीसमधील फारशा माहीत नसणाऱ्या ठिकाणांना भेटी देता आल्या होत्या. कंपनीतील सहकाऱ्यांचे मित्रांत रुपांतर झाले होते.

(समाप्त)

देवांच्या देशात ("ग्रीस"हल) : मोनेमवासिया , एक अनोखा द्वीपकल्पीय दुर्ग

दिवस पाचवा : १ सप्टेंबर २०२१, मोनेमवासिया, एक अनोखा द्वीपकल्पीय दुर्ग


सकाळी लवकर उठून आवरुन ग्रीस च्या दक्षिणेस मार्गक्रमण केले. वाटेत पेट्रोल, कॉफी असे थांबे झाले.
त्रिपोली नावाच्या गावी एक चालकाला (म्हणजे वासिलीस ला) विश्रांतीसाठी मोठा ब्रेक घेतला.
माझ्याकडे गाडी चालवण्यासाठी परवाना असला तरी परवानगी नव्हती. वासिलीस च्या बाबांनी त्याला फक्त तूच गाडी चालव अशी ताकीद दिली होती. मी आणि नाथन गाणी लावत आणि गप्पा मारत त्याचे मनोरंजन करत होतो.
एका फूड कोर्ट पाशी ब्रेक घेऊन आम्ही काही स्थानिक खाऊ खाल्ला आणि भरुन घेतला.

फूड कोर्ट चे टेरेस 


चिक्की सारख्या वेगवेगळ्या चवीच्या वड्या विशेष चविष्ट होत्या. फावा नावाची तुरीच्या डाळीसारखी दिसणारी एक डाळ वासिलीस ने दाखवून त्यापासून ग्रीक रेसिपी कशी करतात ते सांगितले.

मोनेमवासिया ला जाण्यासाठी गुगल बाबांनी दाखवलेला रस्ता बराच डोंगराळ होता. घाटातून जाताना वासिलीस चे चालक कौशल्य दिसत होते. अवघड वळणांच्या या रस्त्यावर एकही गाडी आमच्या गाडीच्या मागे अथवा पुढे दिसली नाही, त्यामुळे काही वेळा रस्ता चुकलो की काय अशी शंकेची पाल चुकचुकली. मात्र सुदैवाने तसे झाले नाही.
मजल दरमजल करत आम्ही आमच्या AirBnb घरी पोचलो. हे घर मोनेमवासिया पासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर होते. तेथे बॅगा ठेवून आणि आंघोळी करुन आम्ही थेट मोनेमवासिया द्वीपकल्पावर वर निघालो.

मोनेमवासिया द्वीपकल्पीय दुर्ग


एका मोठ्ठया टेकडीवर बांधलेला रेखीव जलदुर्ग म्हणजे मोनेमवासिया होय. अंदाजे ३००-४०० मीटर उंचीचा हा किल्ला समुद्री चाच्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून बांधला गेला होता.

किल्ल्यावर जायची वाट पूर्ण दगडी होती. किल्ल्याच्याच दगडी बांधकामात सामावून घेतलेली अनेक छोटी मोठी दुकाने , हॉटेल्स,
सुरुवातीला दिसली. त्यांत नुसते डोकावून आम्ही वर जात राहिलो. वासिलीस ला तिथे कोणीतरी मित्र भेटल्याने त्याच्या ओळखीतून एका चांगल्या हॉटेलची शिफारस मिळाली.
किल्ल्यावर जाणारी वाट बरीच वळणावळणाची असली तरी फोटो काढत काढत जात असल्याने आपोआप थांबे मिळत होते.
वाटेत जागोजागी आणि तिथे असलेल्या घरांच्या अंगणात भले मोठ्ठे रांजण दिसत होते. वासिलीस ला विचारले असता मूळचे क्रेटा च्या बेटावर बनवले जाणारे हे रांजण ग्रीसच्या अनेक भागांत धान्यधुन्य साठवण्यासाठी वापरले जातात असे समजले.

किल्ल्यावरून दिसणारे एक दृश्य 



अर्ध्या तासात आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर पोचलो. किल्ल्याची जुजबी माहिती घेऊन काही अवशेष बघितले. तटबंदी आणि कडे जरासे धडकी भरवणारे होते. किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेली छोटी वस्ती एकदम चित्रातल्यासारखी मांडून ठेवलेली वाटत होती.

मोनेमवासिया च्या पायथ्याचे गाव  


सूर्यास्त होईपर्यंत माथ्यावर थांबून मग आम्ही खाली उतरायला सुरुवात केली.
पायथ्याशी गावात वासिलीस च्या मित्राच्या हॉटेलमधे गेलो. हे हॉटेल अगदी दगडी बांधकामातील होते. गुहेसदृश दिसणाऱ्या एका कोपऱ्यात आम्ही टेबल निवडले. खास ग्रीक पदार्थांवर ताव मारला.

डेझर्ट सारखे दिसणारे ग्रीक सॅलड  आणि आईस्क्रीम सारखे दिसणारे हुमूस चे गोळे 

त्यानंतर त्या हॉटेलसमोरच असलेल्या रूफ टॉप कॉकटेल बार मधे गेलो.
तेथून रात्रीचा समुद्र सुंदर दिसत होता. कॉकटेलच्या घुटक्यांसोबत गप्पांना रंग चढत होता. परत घरी येताना (आकाशात) तारे दिसत होते. किल्ल्याच्या पायथ्याशी आजिबात च दिवे नसल्याने आकाशदेखावा ताऱ्यांनी बहरून गेला होता. आकाशगंगा देखील उघड्या डोळ्यांना दिसत होती.

आकाशगंगेला milky way का म्हणतात याची एक रोचक कथा ग्रीक पुराणात आहे :
हर्क्युलस च्या सावत्र आईला (हीरा ला) त्याचा राग होता त्यामुळे तिने त्याला अंगावर पाजायला नकार दिला होता. मात्र हर्क्युलस बाळ असतानाही एकदम शक्तिशाली होता. त्याने म्हणे एका रात्री बेसावध क्षणी हीरा चे स्तन इतक्या जोरात पिळले की त्यांतून दुधाच्या चिळकांड्या उडाल्या. या दुधापासून तयार झाली ती milky way.

या आणि अशा ग्रीक पौराणिक कथा ऐकवत ऐकत आम्ही AirBnb मधे पोचलो आणि दुसऱ्यादिवशी गजर न लावता उठायचे असे ठरवून ताणून दिली.


( क्रमशः )

देवांच्या देशात ("ग्रीस"हल) : बीच हाऊस आणि बीचेसची हौस


 
दिवस तिसरा : ३० ऑगस्ट २०२१, बीच हाऊस

 आज आमची रोड ट्रिप खऱ्या अर्थाने सुरु होणार होती. आवरुन आणि नाश्ता करुन आम्ही वासिलीस च्या आईबाबांकडे निघालो. त्यांना त्याची छोटी गाडी दिली आणि त्या बदल्यात त्यांची मोठी कार वासिलीसने  ताब्यात घेतली.  त्या बदल्यात बाबांच्या असंख्य सूचना ऐकल्या. विशेषतः गाडी कशी चालवावी याबाबतीतल्या सूचना ऐकून गेली दहा वर्षे कार चालवणारा वासिलीस वैतागला होता. कसेबसे बाबांना समजावून त्याने कार चालू केली आणि आम्ही अथेन्सच्या वायव्येस कूच केले . Sykia नावाच्या एका खेडेगावी त्याच्या पालकांचे बीच हाऊस होते. तिथे जाण्यासाठी अंदाजे दोन- अडीच तास लागले. वाटेत Heros या पुस्तकात वाचलेली काही गावे लागली. प्रत्येकच गाव ग्रीक पुराणाशी कसे ना कसेतरी जोडले गेलेले होते. Sykia जवळ आलो तेव्हा सणकून भूक लागली होती. एका ढाबेवजा हॉटेल मधे शिरलो. 

तेथे भरपेट जेवण केले. राकिया नावाचे पाचक पेय प्यायले. तेथून जवळच असलेल्या एका सुपरमार्केट मधे पुढील काही दिवस लागतील असे खाण्यापिण्याचे जिन्नस आणले. आणि वासिलीस च्या बीच हाऊसवर गेलो . समुद्र किनाऱ्यापासून अक्षरशः हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका इमारतीत पहिल्या मजल्यावर त्याची सदनिका होती. तीन चांगल्या ऐसपैस खोल्या , मोठ्ठी बाल्कनी आणि तेथून दिसणारा समुद्र! 

सिकीया येथील समुद्र किनारा 



 खोल्यांमध्ये सामान टाकून फक्त टॉवेल घेऊन आम्ही पोहायला निघालो. बीच वर सागरगोटे असल्यामुळे पायाला टोचत होते आणि लेदर चे सॅंडल्स घालून मी पाण्यात जात नव्हतो. तेव्हा (पाण्यात) जाता जाता नाथन ने आपण बरोबर आणलेल्या वॉटरप्रूफ सॅंडल्स चे कौतुक करुन घेतले. समुद्राचे पाणी मात्र पोहण्यास योग्य तापमानाचे होते. आणि नुसते बघत बसावे असे प्रेक्षणीयसुद्धा ! मनसोक्त पोहून झाल्यावर आम्ही तेथे बीचवर  टॉवेल्स अंथरून पहुडलो. सागरगोटे एकमेकांवर रचून त्याचे इमले बांधणे , चपटे दगड पाण्यात भिरकावून त्याचे टप्पे पाडणे असे लहानपणाला उजाळा देणारे प्रकार झाले. संध्याकाळी जेव्हा अंधार पडून डास चावायला सुरुवात झाली तेव्हा कुठे आम्ही घरी परतलो. जेवणासाठी मस्तपैकी ग्रीक सॅलड आणि ड्राय ब्रेड विथ hummus. आणि अर्थातच राकिया !

घरगुती ग्रीक सॅलड 



 बाल्कनीमधे बसून जेवताना अनेक विषय चघळले गेले. वासिलीस आणि नाथन अथक बोलत होते. जसे ऑफिस चे विषय सुरु झाले तसा मी झोपण्यासाठी माझ्या रुम कडे मोर्चा वळवला. सुट्टीवर असताना कामाचे विषय मला ऐकायची सुद्धा इच्छा नव्हती.





दिवस चौथा : ३१ ऑगस्ट २०२१, बीच हौस

झोपेतून उठलो तेव्हा उन्हं वर आली होती. नाश्त्याची मांडामांड केली तेव्हा सूर्याने बाल्कनीमध्ये नैसर्गिक ओव्हनच जणू चालू केला होता. तेथे बसल्या बसल्या ब्रेड सकट आमची त्वचा सुद्धा भाजून निघाली असती. सावली साठी पडदे ओढून नाश्ता केला.  
आजचा दिवस बीच चा असे ठरवूनच घराबाहेर पडलो. Sykia (सिकीया) या छोट्या गावाच्या जवळ जेथे organized beach (म्हणजे थोडक्यात जेथे शॅक भाड्याने घेऊन , खाऊ पिऊ असे करता येते असे बीच) तेथे गेलो.

बीचिंग 



कमी गर्दीची जागा पकडून आराम खुर्च्या पकडल्या. कोल्डकॉफी, लिंबू सरबत (यांची ग्रीक नावे भलतीच लक्षात न राहण्याजोगी वाटली) . यांचे रतीब सुरु झाले.
पोहणे, रॅकेट बॉल खेळून झाल्यावर तेथेच जेवणाचीही सोय होती.

रॅकेट बॉल / बीच पॅडेल 



हा बीच सुद्धा सागरगोट्यांचा असल्याने पुढील बीच रेतीचा असावा अशी आग्रही मागणी नाथन व मी केली.

बिचाऱ्या वासिलीस ने मग लोकांना विचारत विचारत आम्हाला आसोस (asos)येथील एका रेतीच्या बीच वर आणले. हा बीच अतिशय छोटा आणि कुटुंब आणिलहान मुलांकरिता योग्य असा होता. तेथे थोडा वेळ आराम करुन , कॉफी, आईसक्रीम चा एक एक राउंड करुन आम्ही आमच्या बीच हाऊसकडे निघालो.

असोस  येथील बीच 



दिवसभराचे घामाचे अंग मस्त आंघोळ करुन धुवून काढले आणि रात्रीच्या जेवणासाठी झायलोकास्त्रो (xylokastro) नावाच्या गावात गेलो. या गावात फक्त किशोरवयीन मुले किंवा पिकली पानेच दिसत होती. जणू काही वयात आल्यावर गाव सोडून गेलेले कुणीच म्हातारे झाल्याशिवाय परतत नव्हते. गावात गाडी लावून फिरताना जागोजागी कट्टे आणि चावड्या दिसत होते. त्यांवर आजी आजोबांचेअड्डे जमले होते. कुठे पत्ते तर कुठे बुद्धिबळ असे खेळ रंगात आले होते.
ऱस्त्यावर एखाद दुसरी षोडशवर्षीय ललना भडक मेक अप करुन घाईघाईने कुठेतरी जाताना दिसत होती. पर्यटक तर कुठेच नव्हते.

झायलोकास्त्रो गावातील चर्च  



गावात फिरताना अनेक नजरा नाथन वर आणि खास करुन माझ्यावर स्थिरावत होत्या. माझ्या अंगाला जणू "ग्रीस" लागल्यासारखे बघत होते. कदाचित फक्त गोरे पर्यटक किंवा ग्रीस मधील लोक येण्याचीच सवय या गावाला असावी.
असो. ग्रीक गावकऱ्यांची नजर न लावून घेता आम्ही चांगला लांबलचक फेरफटका मारला आणि एक बऱ्या दिसणाऱ्या हॉटेलमधे खानपान केले.

बीच हाऊसवर परतून पुन्हा गप्पा मारत मारत झोपी गेलो.

(क्रमशः)

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

देवांच्या देशात ("ग्रीस"हल) : ग्रीक आतिथ्य

 

दिवस दुसरा : २९ ऑगस्ट २०२१, ग्रीक आतिथ्य

सकाळी सुट्टीमध्ये उठायला हवे तसे निवांत उशीर उठलो. अथेन्समधील एका "अर्क" नावाच्या हॉटेल मधे कॉफी साठी गेलो. हे हॉटेल समुद्राजवळ आहे. तेथे लाटा पायाशी खेळतील अशी जागा पकडून आम्ही कोल्ड कॉफी मागवली.

अर्क हॉटेल , अथेन्स 


फ्रेदो कापोचिनो (म्हणजे थंड cappucino ) हे ग्रीक उन्हाळी पेय आमचे लाडके पेय झाले. सूर्य चांगलीच आग ओकत होता. सुमारे ३२ ° सेल्सियस एवढेतरी तापमान असेल. आमची पहिली कॉफी संपेपर्यंत लिओनार्डोस तेथे पोचला. लिओ आणि मी दोघेही एकत्र ॲम्स्टरडॅममधे पीएचडी करत आहोत. लिओ सध्या अथेन्समधे असल्याने त्याला भेटायचा योग जुळून आला होता. अजून एक " कॉफी विथ लिओ" करुन आम्ही " अर्क" हॉटेलमधील कॉफीचे सर्व अर्क अनुभवले.

शहरात फेरफटका मारता मारता लिओ च्या प्रेयसी निकीला भेटलो आणि पुन्हा एका हॉटेलमधे पेयपान करण्यासाठी गेलो.

(डावीकडून) नाथन, वासिलीस, निकी आणि लिओनार्दोस



दुपारी वासिलीस च्या आईबाबांच्या घरी जेवायला जायचे असल्याने नाश्ता टाळला होता आणित्यांच्या घरी पोचताच तो निर्णय योग्य च होता असे वाटून गेले. वासिलीस च्या आईने नाना तऱ्हेचे पदार्थ बनवून टेबल सजवले होते. दाकोस, ग्रीक सॅलड, मॅश्ड डाळ, भरल्या भोपळी मिरच्या, भरले टोमॅटो, फेटा चीज, तळलेली झुकिनी आणि नाथन साठी खास बोकडाचे मटण.

भरली भोपळी मिरची आणि भरले टोमॅटो 



वासिलीस चे बाबा उत्तम इंग्रजीमधे बोलू शकत होते. त्याची आई मात्र eat आणि thank you व्यतिरिक्त फारसे बोलत नव्हती. तिच्या आग्रहाला मात्र सुमार नव्हता. माझे किंवा नाथन चे ताट जरा जरी मोकळे झाले की तेथे नवीन पदार्थ जादूच्या थाळी सारखा प्रकट होत असे. वासिलीस ने मध्यस्थी केली तेव्हा कुठे ताट पूर्ण संपवता आले. वासिलीस चे बाबा कुठल्याश्या विमा कंपनी मधे अनेक वर्ष काम करुन निवृत्त झाले होते. बरेच जग
सुद्धा फिरलेले होते. आता निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी स्वतःला छान गुंतवून ठेवले होते. त्यांना लाकडी मूर्ती किंवा प्रतिकृती करण्याचा छंद होता. त्यांच्या खोलीत आणि दिवाणखान्यात लाकडी कोरीव काम केलेल्या अनेक सुबक मूर्ती आणि रेखीव प्रतिकृती होत्या.

वासिलीस च्या बाबांनी बनवलेली लाकडी चित्रे 



त्यांनी एवढे सगळे दाखवल्यानंतर त्याची आई कशी मागे राहील ? तिनेही स्वतः विणलेल्या आणि सुंदर भरतकाम केलेल्या नक्षीदार सतरंज्या दाखवल्या. अर्थात आम्ही दोन्हीची वाहवा केली.
जेवणानंतर मिष्टान्न म्हणून एक वेगळा मेनूच होता : त्यात केक, फळे आणि आईस्क्रीम यांचा समावेश होता. चॉकलेट्स आम्ही नम्रपणे नाकारली.
वासिलीस च्या आईबाबांना उदबत्तीचा पुडा स्मरणिका म्हणून देऊन त्यांचा निरोप घेतला.

वासिलीस चे कुटुंब आणि नाथन 



एवढे जड जेवण झाल्यावर शतपावली ऐवजी चांगली दशलक्षपावली झाली असती तरी हरकत नव्हती. वासिलीस च्या एका मैत्रिणीला, एलेनाला बरोबर घेऊन आम्ही कारने अथेन्सच्या मध्यवर्ती भागात पोचलो. त्या भागाला Acropolis म्हणतात. acro म्हणजे शिखर किंवा माथा आणि polis म्हणजे शहर. शहराचे शिखर म्हणून मिरवणारी एक टेकडी इथे आहे. या टेकडीवर जुन्या किल्ल्याचेअवशेष आहेत. ते बघायला एक दिवस सुद्धा पुरला नसता. म्हणून आम्ही त्या टेकडीला प्रदक्षिणा घालायची असे ठरवले. एलेना तेथील शाळेत रसायनशास्त्र शिकवत होती आणि एकंदरीतच हुशार आणि मनमिळाऊ दिसत होती. तिला टेकडीचा भागही चांगलाच माहीत होता. तीच आमची वाटाडी झाली. प्राचीन ग्रीक मधे त्या टेकडी चा वापर कसा केला जात होता, माथ्यावरील किल्ल्यावर जाण्यासाठी कशा शेकडोवाटा आहेत अशी रोचक माहिती तिने दिली.

किल्ल्यावर जाणारी एक सुंदर वाट 



वाटेत एक दुतर्फा दुकाने असलेले अनेक बोळ होते. त्यापैकी एकात शिरुन मी पट्कन गॉगल्स विकत घेतले. मी बरोबर आणलेल्या गॉगल्स ची काडी तुटल्यामुळे अशी काही सोय करणे भाग होते. गॉगल्स शिवाय मी बीच वर फोटो कसे काढून घेणार होतो!? ही अत्यावश्यक खरेदी झाल्यावर आम्ही एका छोटेखानी हॉटेलमधे कॉफी साठी गेलो.
नंतर टेकडी वरील आडवाटा आणि त्यावर पायऱ्या पायऱ्यांगणिक वाटेत पसरलेली उपहारगृहे , मांडलेल्या रंगीबेरंगी टेबल- खुर्च्या हे सर्व बघत शहराकडे निघालो.

चौकाचौकात जुन्या वास्तू, भग्नावशेष, फुटके बुरुज हे सर्व सळया लावून सुरक्षित केले होते.

अथेन्स मधील काही भग्न अवशेष  



त्यातून कुठे जागा उरली तर तेथे आधुनिक इमारती किंवा दुकाने. पर्यटकांची ही गर्दी उसळली होती. आमच्याबरोबर स्थानिक असल्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. वासिलीस आणि एलेना आम्हाला बरोब्बर छोट्याछोट्या गल्लीबोळातून मार्ग काढत इच्छित स्थळी नेत होते.
आमचे पुढील प्रेक्षणीय स्थळ होते Couleur Locale नावाचा रूफ टॉप कॉकटेल बार ! तेथे जाण्यासाठी चांगला तासभर रांगेत उभे रहावे लागले. वाट बघत असताना वासिलीस ने माझ्या गॉगल्स ची काडी दुरुस्त करुन आणली. हा रूफ टॉप बार मात्र खास होता.
टेकाडमाथ्यावरील किल्ला दिव्यांच्या रोषणाईत खूपच सुरेख दिसत होता.

रूफ टॉप बार वरून दिसणारा किल्ला 



ते सुंदर दृश्य बघत , चविष्ट अशा कॉकटेल चे घुटके घेत घेत गप्पागोष्टी करणे यात वेळ कसा गेला कळलेच नाही.
मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतलो आणि वायफळ गप्पा करत झोपी गेलो.
(क्रमशः)

देवांच्या देशात ("ग्रीस"हल) : अथेन्स मध्ये आगमन


     २०२० जानेवारी पासून नेदरलँड्स च्या बाहेर पडू शकलो नव्हतो. करोना मुळे प्रवासावर बंधने आली होती. २०२१ च्या समर मध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे जरा फिरायला वाव होता, परंतु जेव्हा हवामान सूर्यप्रकाशित असते तेव्हा नेदरलँड्स मध्ये थांबावे आणि नंतर प्रवासाची आखणी करावी अशा विचाराने ऑगस्ट च्या अखेरीस ग्रीस चा बेत ठरला. पुण्यात असताना जशी थंड हवेची ठिकाणे (माथेरान, महाबळेश्वर) फिरण्यासाठी कायम फॉर्म मध्ये असायची तशी युरोपात उष्ण हवेची किंवा अधिक सूर्यप्रकाशाची ठिकाणे कायम फॉर्म मध्ये असतात. ग्रीस हे तर "हॉट" डेस्टिनेशन !

वासिलीस हा "क्रंचर" कंपनी मध्ये काम सुरु केल्यानंतर झालेला मित्र. मूळचा ग्रीक पण आता ॲम्स्टरडॅम मध्ये स्थायिक. नाथन आणि वासिलीस यांची मैत्री तशी जुनी होती. नाथन ला २०२१ च्या सुरवातीला अती कामामुळे "बर्न आउट" चा  त्रास झाल्यामुळे त्यातून बाहेर यायला मदत म्हणून वासिलीसने आम्हा दोघांना ग्रीस च्या सहलीचे आमंत्रण दिले. तो पूर्ण समर (जून-ऑगस्ट) अथेन्सहूनच काम करणार होता. ऑगस्ट च्या अखेरचे दोन आठवडे सुट्टी घेऊन त्याने त्यातील एक आठवडा आमच्या सोबत रोड ट्रिप करायचे ठरवले. त्यानुसार २८ ऑगस्ट ला आम्ही दुपारच्या विमानाने साडेतीन तास प्रवास करून अथेन्स मध्ये दाखल झालो. 


दिवस पहिला : २८ ऑगस्ट २०२१, अथेन्स मध्ये आगमन 

वासिलीस आम्हाला घ्यायला आला होता. विमानतळाचे गेट ते पार्कींग या शंभर मीटर अंतरातच तापमानातील फरक जाणवला. 

ॲम्स्टरडॅम मधील समर असूनही २० पेक्षा कमी असलेले तापमान आणि अथेन्स मधील समर संपत असताना ३० पेक्षा जास्त असलेले तापमान यामुळे आनंदाने आम्ही जॅकेट उतरवले आणि बॅगमध्ये सर्वांत तळाला ठेवून दिले! पाऊस आणि वारा यांनी संपूर्ण समर ॲम्स्टरडॅम मध्ये तळ ठोकला असल्याने जॅकेट शिवाय बाहेर पडता येणे या गोष्टीचे अप्रूप वाटावे इतकी जॅकेट ची सवय झाली होती. पण अथेन्स मध्ये एकूणच उष्णतेमुळे आणि हवेतील आर्द्रतेमुळे मुंबई विमानतळावर आल्यावर जसे घामेजून जायला होते तसे झाले. वासिलीसने गाडीतील एसी चालू केला तेव्हा कुठे बरे वाटले. गाडी सुरु करताच त्याने त्याच्या पाठदुखीच्या त्रासाचे गाऱ्हाणे सांगितले आणि त्याची गाऱ्हाणी आम्हाला सहल-भर ऐकून घ्यावी लागतील अशी ताकीदही दिली. मी आणि नाथनने त्याची चेष्टा केली जाईल असा त्याला इशारा दिला ;) 

विमानात स्टीफन फ्राय या लेखकाने लिहिलेले "Heros" नावाचे ग्रीक पौराणिक कथांचे पुस्तक वाचायला सुरवात केली होती.  त्यातील ज्ञान पाजळावे म्हणून वासिलीस ला काही प्रश्न विचारावे तर त्याने "मला ग्रीक पुराणकथा काही माहीत नाहीत" असे स्पष्ट सांगून माझीच विकेट काढली. 

वासिलीसच्या बहिणीच्या फ्लॅट वर उतरलो. फ्लॅटची इमारत मुंबई च्या मरीन ड्राइव्ह ची आठवण करून देणाऱ्या रस्त्यावर आहे. 

तेथे पोचताच वासिलीसने ग्रीक सॅलड बनवले. या सॅलड मध्ये काही खास पदार्थ असतात:  ग्रीक टोमॅटो (हे चवीला खरंच वेगळे आणि अधिक रसाळ लागतात), फेटा चीज (ज्याचा फेटे बांधणे या गोष्टीशी काहीही संबंध नसतो किंवा फेटा बांधल्यावर खावी लागते ती  चीज असेही नसते) आणि ऑलिव्ह. "fetta" या मूळ इटालियन शब्दावरून फेटा चीज चे नाव पडले आहे.  "fetta" म्हणजे तुकडा. चीज नीट खाता यावे किंवा भरून ठेवता यावे म्हणून त्याचे घनाकृती तुकडे केले जातात त्यावरून तसे नाव पडले असावे [१] . असे हे सॅलड खाऊन , आवरून आम्ही फेरफटका मारण्यासाठी साठी बाहेर पडलो. 

अथेन्स मधील अफ्रोडाइटीस भागातील समुद्र किनारा 


समुद्रालगत खारे वारे खात , मस्त गप्पा मारत मारत एका पार्क वजा टेकडी पाशी आलो. तेथे कसलासा कार्यक्रम चालू होता. लाईव्ह म्युझिक आणि कसले कसले विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम दाखवणारे  छोटे मंच : एखाद्या आवडणाऱ्या कार्यक्रमापाशी घुटमळत आणि नावडणाऱ्या कार्यक्रमांवर टिकाटिप्पणी करत टेकडीवर फिरलो. 

विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम 


 माथ्यावर एका उपहारगृहात पेयपान करत अगदी दाण्याच्या  चिक्की सारखा दिसणारा कुठलासा ग्रीक पदार्थ खात गप्पा मारल्या. वासिलीसचे मित्र म्हणे आम्हाला भेटायला येणार होते मात्र त्यांनी कल्टी दिली. जवळपास गेले तीन महिने ग्रीस मधेच असल्याने वासिलीसला काही ग्रीक शब्दांना इंग्रजी प्रतिशब्द आठवत नव्हते. मग तो शब्दाचे वर्णन करत असे. नाथन आणि  माझ्यात त्याला नेमका इंग्रजी  शब्द सुचविण्याची अहमहमिका सुरु झाली. उरलेल्या सहलीसाठी ही चुरस पुरणार होती.    

फ्लॅट जवळील एका हॉटेल मध्ये पारंपारिक ग्रीक फलाफल रॅप खाल्ले. त्यानंतर आईस्क्रीम शॉप मध्ये जाऊन चॉकलेट सूप आणि चॉकलेट ब्राउनी-युक्त  चॉकलेट आईस्क्रीम खाऊन पूर्ण आठवड्याभराचे चॉकलेट एका रात्री खाऊन घेतले. 

चॉकलेट सूप आणि पिस्ता आईस्क्रीम 

आणि "Saturday night" असूनही दिवसभर खूप ऊन खाऊन दमल्यामुळे लवकर झोपलो.  

(क्रमशः)

[१]https://en.wikipedia.org/wiki/Feta