शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

देवांच्या देशात ("ग्रीस"हल) : बीच हाऊस आणि बीचेसची हौस


 
दिवस तिसरा : ३० ऑगस्ट २०२१, बीच हाऊस

 आज आमची रोड ट्रिप खऱ्या अर्थाने सुरु होणार होती. आवरुन आणि नाश्ता करुन आम्ही वासिलीस च्या आईबाबांकडे निघालो. त्यांना त्याची छोटी गाडी दिली आणि त्या बदल्यात त्यांची मोठी कार वासिलीसने  ताब्यात घेतली.  त्या बदल्यात बाबांच्या असंख्य सूचना ऐकल्या. विशेषतः गाडी कशी चालवावी याबाबतीतल्या सूचना ऐकून गेली दहा वर्षे कार चालवणारा वासिलीस वैतागला होता. कसेबसे बाबांना समजावून त्याने कार चालू केली आणि आम्ही अथेन्सच्या वायव्येस कूच केले . Sykia नावाच्या एका खेडेगावी त्याच्या पालकांचे बीच हाऊस होते. तिथे जाण्यासाठी अंदाजे दोन- अडीच तास लागले. वाटेत Heros या पुस्तकात वाचलेली काही गावे लागली. प्रत्येकच गाव ग्रीक पुराणाशी कसे ना कसेतरी जोडले गेलेले होते. Sykia जवळ आलो तेव्हा सणकून भूक लागली होती. एका ढाबेवजा हॉटेल मधे शिरलो. 

तेथे भरपेट जेवण केले. राकिया नावाचे पाचक पेय प्यायले. तेथून जवळच असलेल्या एका सुपरमार्केट मधे पुढील काही दिवस लागतील असे खाण्यापिण्याचे जिन्नस आणले. आणि वासिलीस च्या बीच हाऊसवर गेलो . समुद्र किनाऱ्यापासून अक्षरशः हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका इमारतीत पहिल्या मजल्यावर त्याची सदनिका होती. तीन चांगल्या ऐसपैस खोल्या , मोठ्ठी बाल्कनी आणि तेथून दिसणारा समुद्र! 

सिकीया येथील समुद्र किनारा 



 खोल्यांमध्ये सामान टाकून फक्त टॉवेल घेऊन आम्ही पोहायला निघालो. बीच वर सागरगोटे असल्यामुळे पायाला टोचत होते आणि लेदर चे सॅंडल्स घालून मी पाण्यात जात नव्हतो. तेव्हा (पाण्यात) जाता जाता नाथन ने आपण बरोबर आणलेल्या वॉटरप्रूफ सॅंडल्स चे कौतुक करुन घेतले. समुद्राचे पाणी मात्र पोहण्यास योग्य तापमानाचे होते. आणि नुसते बघत बसावे असे प्रेक्षणीयसुद्धा ! मनसोक्त पोहून झाल्यावर आम्ही तेथे बीचवर  टॉवेल्स अंथरून पहुडलो. सागरगोटे एकमेकांवर रचून त्याचे इमले बांधणे , चपटे दगड पाण्यात भिरकावून त्याचे टप्पे पाडणे असे लहानपणाला उजाळा देणारे प्रकार झाले. संध्याकाळी जेव्हा अंधार पडून डास चावायला सुरुवात झाली तेव्हा कुठे आम्ही घरी परतलो. जेवणासाठी मस्तपैकी ग्रीक सॅलड आणि ड्राय ब्रेड विथ hummus. आणि अर्थातच राकिया !

घरगुती ग्रीक सॅलड 



 बाल्कनीमधे बसून जेवताना अनेक विषय चघळले गेले. वासिलीस आणि नाथन अथक बोलत होते. जसे ऑफिस चे विषय सुरु झाले तसा मी झोपण्यासाठी माझ्या रुम कडे मोर्चा वळवला. सुट्टीवर असताना कामाचे विषय मला ऐकायची सुद्धा इच्छा नव्हती.





दिवस चौथा : ३१ ऑगस्ट २०२१, बीच हौस

झोपेतून उठलो तेव्हा उन्हं वर आली होती. नाश्त्याची मांडामांड केली तेव्हा सूर्याने बाल्कनीमध्ये नैसर्गिक ओव्हनच जणू चालू केला होता. तेथे बसल्या बसल्या ब्रेड सकट आमची त्वचा सुद्धा भाजून निघाली असती. सावली साठी पडदे ओढून नाश्ता केला.  
आजचा दिवस बीच चा असे ठरवूनच घराबाहेर पडलो. Sykia (सिकीया) या छोट्या गावाच्या जवळ जेथे organized beach (म्हणजे थोडक्यात जेथे शॅक भाड्याने घेऊन , खाऊ पिऊ असे करता येते असे बीच) तेथे गेलो.

बीचिंग 



कमी गर्दीची जागा पकडून आराम खुर्च्या पकडल्या. कोल्डकॉफी, लिंबू सरबत (यांची ग्रीक नावे भलतीच लक्षात न राहण्याजोगी वाटली) . यांचे रतीब सुरु झाले.
पोहणे, रॅकेट बॉल खेळून झाल्यावर तेथेच जेवणाचीही सोय होती.

रॅकेट बॉल / बीच पॅडेल 



हा बीच सुद्धा सागरगोट्यांचा असल्याने पुढील बीच रेतीचा असावा अशी आग्रही मागणी नाथन व मी केली.

बिचाऱ्या वासिलीस ने मग लोकांना विचारत विचारत आम्हाला आसोस (asos)येथील एका रेतीच्या बीच वर आणले. हा बीच अतिशय छोटा आणि कुटुंब आणिलहान मुलांकरिता योग्य असा होता. तेथे थोडा वेळ आराम करुन , कॉफी, आईसक्रीम चा एक एक राउंड करुन आम्ही आमच्या बीच हाऊसकडे निघालो.

असोस  येथील बीच 



दिवसभराचे घामाचे अंग मस्त आंघोळ करुन धुवून काढले आणि रात्रीच्या जेवणासाठी झायलोकास्त्रो (xylokastro) नावाच्या गावात गेलो. या गावात फक्त किशोरवयीन मुले किंवा पिकली पानेच दिसत होती. जणू काही वयात आल्यावर गाव सोडून गेलेले कुणीच म्हातारे झाल्याशिवाय परतत नव्हते. गावात गाडी लावून फिरताना जागोजागी कट्टे आणि चावड्या दिसत होते. त्यांवर आजी आजोबांचेअड्डे जमले होते. कुठे पत्ते तर कुठे बुद्धिबळ असे खेळ रंगात आले होते.
ऱस्त्यावर एखाद दुसरी षोडशवर्षीय ललना भडक मेक अप करुन घाईघाईने कुठेतरी जाताना दिसत होती. पर्यटक तर कुठेच नव्हते.

झायलोकास्त्रो गावातील चर्च  



गावात फिरताना अनेक नजरा नाथन वर आणि खास करुन माझ्यावर स्थिरावत होत्या. माझ्या अंगाला जणू "ग्रीस" लागल्यासारखे बघत होते. कदाचित फक्त गोरे पर्यटक किंवा ग्रीस मधील लोक येण्याचीच सवय या गावाला असावी.
असो. ग्रीक गावकऱ्यांची नजर न लावून घेता आम्ही चांगला लांबलचक फेरफटका मारला आणि एक बऱ्या दिसणाऱ्या हॉटेलमधे खानपान केले.

बीच हाऊसवर परतून पुन्हा गप्पा मारत मारत झोपी गेलो.

(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा