रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

देवांच्या देशात ("ग्रीस"हल) : अथेन्स मध्ये आगमन


     २०२० जानेवारी पासून नेदरलँड्स च्या बाहेर पडू शकलो नव्हतो. करोना मुळे प्रवासावर बंधने आली होती. २०२१ च्या समर मध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे जरा फिरायला वाव होता, परंतु जेव्हा हवामान सूर्यप्रकाशित असते तेव्हा नेदरलँड्स मध्ये थांबावे आणि नंतर प्रवासाची आखणी करावी अशा विचाराने ऑगस्ट च्या अखेरीस ग्रीस चा बेत ठरला. पुण्यात असताना जशी थंड हवेची ठिकाणे (माथेरान, महाबळेश्वर) फिरण्यासाठी कायम फॉर्म मध्ये असायची तशी युरोपात उष्ण हवेची किंवा अधिक सूर्यप्रकाशाची ठिकाणे कायम फॉर्म मध्ये असतात. ग्रीस हे तर "हॉट" डेस्टिनेशन !

वासिलीस हा "क्रंचर" कंपनी मध्ये काम सुरु केल्यानंतर झालेला मित्र. मूळचा ग्रीक पण आता ॲम्स्टरडॅम मध्ये स्थायिक. नाथन आणि वासिलीस यांची मैत्री तशी जुनी होती. नाथन ला २०२१ च्या सुरवातीला अती कामामुळे "बर्न आउट" चा  त्रास झाल्यामुळे त्यातून बाहेर यायला मदत म्हणून वासिलीसने आम्हा दोघांना ग्रीस च्या सहलीचे आमंत्रण दिले. तो पूर्ण समर (जून-ऑगस्ट) अथेन्सहूनच काम करणार होता. ऑगस्ट च्या अखेरचे दोन आठवडे सुट्टी घेऊन त्याने त्यातील एक आठवडा आमच्या सोबत रोड ट्रिप करायचे ठरवले. त्यानुसार २८ ऑगस्ट ला आम्ही दुपारच्या विमानाने साडेतीन तास प्रवास करून अथेन्स मध्ये दाखल झालो. 


दिवस पहिला : २८ ऑगस्ट २०२१, अथेन्स मध्ये आगमन 

वासिलीस आम्हाला घ्यायला आला होता. विमानतळाचे गेट ते पार्कींग या शंभर मीटर अंतरातच तापमानातील फरक जाणवला. 

ॲम्स्टरडॅम मधील समर असूनही २० पेक्षा कमी असलेले तापमान आणि अथेन्स मधील समर संपत असताना ३० पेक्षा जास्त असलेले तापमान यामुळे आनंदाने आम्ही जॅकेट उतरवले आणि बॅगमध्ये सर्वांत तळाला ठेवून दिले! पाऊस आणि वारा यांनी संपूर्ण समर ॲम्स्टरडॅम मध्ये तळ ठोकला असल्याने जॅकेट शिवाय बाहेर पडता येणे या गोष्टीचे अप्रूप वाटावे इतकी जॅकेट ची सवय झाली होती. पण अथेन्स मध्ये एकूणच उष्णतेमुळे आणि हवेतील आर्द्रतेमुळे मुंबई विमानतळावर आल्यावर जसे घामेजून जायला होते तसे झाले. वासिलीसने गाडीतील एसी चालू केला तेव्हा कुठे बरे वाटले. गाडी सुरु करताच त्याने त्याच्या पाठदुखीच्या त्रासाचे गाऱ्हाणे सांगितले आणि त्याची गाऱ्हाणी आम्हाला सहल-भर ऐकून घ्यावी लागतील अशी ताकीदही दिली. मी आणि नाथनने त्याची चेष्टा केली जाईल असा त्याला इशारा दिला ;) 

विमानात स्टीफन फ्राय या लेखकाने लिहिलेले "Heros" नावाचे ग्रीक पौराणिक कथांचे पुस्तक वाचायला सुरवात केली होती.  त्यातील ज्ञान पाजळावे म्हणून वासिलीस ला काही प्रश्न विचारावे तर त्याने "मला ग्रीक पुराणकथा काही माहीत नाहीत" असे स्पष्ट सांगून माझीच विकेट काढली. 

वासिलीसच्या बहिणीच्या फ्लॅट वर उतरलो. फ्लॅटची इमारत मुंबई च्या मरीन ड्राइव्ह ची आठवण करून देणाऱ्या रस्त्यावर आहे. 

तेथे पोचताच वासिलीसने ग्रीक सॅलड बनवले. या सॅलड मध्ये काही खास पदार्थ असतात:  ग्रीक टोमॅटो (हे चवीला खरंच वेगळे आणि अधिक रसाळ लागतात), फेटा चीज (ज्याचा फेटे बांधणे या गोष्टीशी काहीही संबंध नसतो किंवा फेटा बांधल्यावर खावी लागते ती  चीज असेही नसते) आणि ऑलिव्ह. "fetta" या मूळ इटालियन शब्दावरून फेटा चीज चे नाव पडले आहे.  "fetta" म्हणजे तुकडा. चीज नीट खाता यावे किंवा भरून ठेवता यावे म्हणून त्याचे घनाकृती तुकडे केले जातात त्यावरून तसे नाव पडले असावे [१] . असे हे सॅलड खाऊन , आवरून आम्ही फेरफटका मारण्यासाठी साठी बाहेर पडलो. 

अथेन्स मधील अफ्रोडाइटीस भागातील समुद्र किनारा 


समुद्रालगत खारे वारे खात , मस्त गप्पा मारत मारत एका पार्क वजा टेकडी पाशी आलो. तेथे कसलासा कार्यक्रम चालू होता. लाईव्ह म्युझिक आणि कसले कसले विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम दाखवणारे  छोटे मंच : एखाद्या आवडणाऱ्या कार्यक्रमापाशी घुटमळत आणि नावडणाऱ्या कार्यक्रमांवर टिकाटिप्पणी करत टेकडीवर फिरलो. 

विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम 


 माथ्यावर एका उपहारगृहात पेयपान करत अगदी दाण्याच्या  चिक्की सारखा दिसणारा कुठलासा ग्रीक पदार्थ खात गप्पा मारल्या. वासिलीसचे मित्र म्हणे आम्हाला भेटायला येणार होते मात्र त्यांनी कल्टी दिली. जवळपास गेले तीन महिने ग्रीस मधेच असल्याने वासिलीसला काही ग्रीक शब्दांना इंग्रजी प्रतिशब्द आठवत नव्हते. मग तो शब्दाचे वर्णन करत असे. नाथन आणि  माझ्यात त्याला नेमका इंग्रजी  शब्द सुचविण्याची अहमहमिका सुरु झाली. उरलेल्या सहलीसाठी ही चुरस पुरणार होती.    

फ्लॅट जवळील एका हॉटेल मध्ये पारंपारिक ग्रीक फलाफल रॅप खाल्ले. त्यानंतर आईस्क्रीम शॉप मध्ये जाऊन चॉकलेट सूप आणि चॉकलेट ब्राउनी-युक्त  चॉकलेट आईस्क्रीम खाऊन पूर्ण आठवड्याभराचे चॉकलेट एका रात्री खाऊन घेतले. 

चॉकलेट सूप आणि पिस्ता आईस्क्रीम 

आणि "Saturday night" असूनही दिवसभर खूप ऊन खाऊन दमल्यामुळे लवकर झोपलो.  

(क्रमशः)

[१]https://en.wikipedia.org/wiki/Feta  

1 टिप्पणी:

  1. वा उन्मेषा! अति आनंद मिळाला तुझा प्रवासवर्णन वाचून. असाच आनंदी रहा, जगाचा आस्वाद घे.

    उत्तर द्याहटवा