गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

लास पाल्मास कॅनरी बेट : तुफिया तील स्नॉर्केलिंग आणि मासपालोमास च्या वालुकामय टेकड्या

 दिवस दुसरा : २६ सप्टेंबर २०२१


आज निवांत उठता आले कारण सहलीपुरती घेतलेली भाड्याची गाडी कालच ताब्यात घेतली होती.
नाश्त्यासाठी तिथल्या कॉफी साठी प्रसिद्ध अशा एका प्रोमेनाडा लगत च्या हॉटेलमधे गेलो. तेथे स्पॅनिश ऑमलेट खाल्ले (ज्यात बटाटा उकडून तळून त्याचे सारण अंड्याच्या धिरड्यात भरले जाते)



कालच्या सारखे सुपर डायनो मधे खरेदी करुन आजच्या सहलीला सुरुवात केली.

तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही तुफिया ला पोचलो. हे एक छोटेसे खेडेगाव आहे जे स्नोर्केलिंग साठी प्रसिद्ध आहे. तेथील घरे शुभ्र पांढरी अथवा आकाशी निळ्या रंगात रंगवलेली असल्याने ग्रीस मधील iconic सांतोरिनी बेटावरील घरांची आठवण करुन देत होती. सूर्य आकाशात तळपत होता. आम्ही स्नोर्केलिंग मास्क आणि स्विमिंग कॉश्च्युम घालून तयार झालो. तेथे स्कूबा डायव्हिंग साठी सुद्धा अनेक गट आले होते. तुफिया तील खडकाळ समुद्र किनाऱ्याच्या आसपासची खुफिया जलसृष्टी फारच विलोभनीय होती. रंगीबेरंगी मासे , सागरी वनस्पती, प्रवाळ, हे सर्व नुसते पाण्यात डोके बुडवले तरी दिसत होते. आळीपाळीने स्नोर्केलिंग करुन , पोहून आम्ही तेथील खडकांवरच विश्रांती घेतली.

तुफिया , लास पाल्मास 



तुफिया नंतर आम्ही लास पाल्मास बेटाच्या दक्षिणेस असलेल्या मासपालोमास या बीच कडे निघालो. हा बीच जवळपास दक्षिण टोकावरच आहे. मस्त लांब अशा या किनाऱ्यावर चालण्याआधी ऊर्जा म्हणून एका बीच हॉटेलमधे गेलो. तेथे संग्रिया चा आस्वाद घेत मश्रूम आणि मक्याच्या काही पदार्थांचा फडशा पाडला.
बीच वरील काही दुकानांतून नेहमीप्रमाणे स्मरणिका खरेदी झाली.

त्यानंतर बीच वॉक ला सुरुवात केली. अंदाजे ५ किलोमीटर अंतर कापून दीपगृहापर्यंत जावे असा बेत आखला. आम्ही मजल दरमजल करत चालू लागलो. वाटेत येणाऱ्या वाळूच्या टेकड्या हे आमच्या दृष्टीने मुख्य आकर्षण होते.
मास पालोमास च्या सागर किनाऱ्यावर जायची वाळूची वाट  



जरासे बीच पासून दूर जाताच या वाळूच्या टेकड्या एखाद्याला वेगळ्याच जगात आणून सोडतात. वाळवंट असल्यासारखे वाटावे इतक्या या टेकड्या मासपालोमास च्या किनाऱ्यावर पसरल्या आहेत. आम्ही लहान मुलाप्रमाणे त्या वाळूत खेळलो, उड्या मारल्या , शर्यती लावल्या.






मास पालोमास च्या वालुकामय टेकड्या 



वालुकामय टेकड्यांवर पुरेसे दमल्यावर पुन्हा किनाऱ्यावर आलो. बीच योगा आणि मुख्यत्वे फोटो शूट झाले. लाटांवर स्वार होत समुद्रात डुंबलो. आणि दीपगृहाकडे वाटचाल सुरु केली. पात्रीसिया बरोबर खूप महिन्यांनी मोकळेपणाने बोलता आले.
दीपगृहापाशी पोचलो तेव्हा सूर्य अस्ताला जातच होता. अशी मस्त वेळ साधल्याबद्दल आमची आम्हीच पाठ थोपटली.
रेतीतून जिवंत देखावे उभे करणाऱ्या एका शिल्पकाराची कारागिरी बघितली.

रेतीतून साकारलेला देखावा 



जवळच असलेल्या हिरवळीवर पिकनिक थाटली. बरोबर आणलेले ऑलिव्ह्स , ब्रेड , चीज , हुमूस आणि आलेक्सने समयसूचकता दाखवून आणलेली बिअर ! अंधार पडत असल्याने डास सुद्धा आमच्या पिकनिक मधे सामील होऊ पाहत होते. त्यांना सामाईक नकार देऊन आम्ही मासपालोमास चा निरोप घेतला.

पिकनिक 


गाडीने परत लास पाल्मास च्या मध्यवर्ती भागात जाऊन गाडी परत केली. हे गाडीचे पार्किंग आठव्या मजल्यावर होते , तेव्हा प्रत्येक वळणावर आपण जणू काही रोलर कोस्टर मधे आहोत की काय असे वाटत होते. त्यामुळे आम्ही उगाच आरडाओरडा करत होतो . ड्रायव्हरला त्यामुळे उगाच चेव येत होता. असे बालिश प्रकार करुन झाल्यावर गाडी परत केली.

प्रोमेनाडा वर फेरफटका मारत मारत एका हॉटेल मधे संग्रिया पिण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. तेथेच मिष्टान्न म्हणून अनेक केक चे पर्याय होते त्यातील चीज केक फारच चविष्ट होता. पुन्हा इथे यायचे असे ठरवून आम्ही पात्रीसिया च्या घरी परतलो.

(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा