शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

लास पाल्मास कॅनरी बेट : बेटाच्या अस्तंगत युगातील वाडे (ओल्ड टाऊन)

 दिवस चौथा : २८ सप्टेंबर २०२१


सकाळी लवकर उठून बीचवर जॉगिंग केले. सूर्यप्रकाश अंगावर झेलत सूर्यनमस्कार घातले. कालच्याच कॉफी शॉप मधे जाऊन पेयांची पुनरावृत्ती केली.
ओल्ड टाऊन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेटाच्या सर्वात जुन्या भागाकडे कूच केले. चालत जायला हा बराच मोठा पल्ला होता. पण आम्हाला बोलायला विषय खूप होते आणि फोटो काढायला फोटोजेनिक दृश्ये पण ! त्यामुळे रमत गमत जाता आले.

लास पाल्मास चा मरीन ड्राईव्ह (ओल्ड टाऊन कडे जाण्याचा रस्ता)



कुबाने सर्व शिफारसी गूगल मॅप मधे जतन केल्या होत्या त्यामुळे कुठे काय खायचे आणि कुठे काय प्यायचे याचे पर्याय आधीच ठाऊक होते. तद्नुसार आम्ही स्पॅनिश ऑमलेट खासियत असलेल्या ठिकाणाकडे मोर्चा वळवला. त्या हॉटेलने आजिबात निराशा केली नाही.
पोटपूजा झाल्यावर ओल्ड टाऊन च्या मॉडर्न भागात फिरलो. डेकाथ्लॉन मधून खडक- प्रूफ बुटांची खरेदी केली. ती चालू असताना कुबाला एका स्पॅनिश तरुणीने कसलीशी प्रोटीन पावडर विकण्याचा निष्फळ प्रयत्न केला. कुबाने तिच्या हातावर तुरी दिलीच शिवाय हातासरशी तिचा फोन नंबरही मिळवला! मैत्रसुलभ चिडवाचिडवी झाली.

त्यानंतर ओल्ड टाऊन च्या खरोखर जुन्या भागात गेलो जेथे शेकडो वर्षे जुने वाडे , जुनी घरे , त्यांची रंगीत दारे आणि रंगीत सज्जा पर्यटकांना भुरळ घालत आहेत. गल्लोगल्ली फोटो सेशन झाले हे सांगणे न लगे.

ओल्ड टाऊन मधील काही देखणे चौक आणि रस्ते 




शक्यतो एकाच गल्लीत दोनदा न जाता आम्ही ओल्ड टाऊन ला जवळजवळ पूर्ण प्रदक्षिणा घातली. चीज आणि वाईन साठी एक स्ट्रीट कॅफे निवडले. त्यांनी वाईन आणि संग्रिया चे ग्लासेस उदारपणे भरले आणि दिवसाढवळ्या स्वर्गात नेऊन सोडले. थोडी खाद्यंती होताच जमिनीवर आलो.

संग्रिया आणि वाईन 



परत पात्रीसिया च्या घरी जाण्यासाठी बस घेतली. बीच वर थोडा वेळ घालवला. जेवायला एकत्र बाहेर गेलो. रात्री पुन्हा बीच वार लांबपर्यंत फेरफटका मारला आणि त्या खास चीजकेक मिळणाऱ्या ठिकाणी जाऊन तो केक पुन्हा खाण्याची इच्छा पूर्ण केली.
असा सहलीचा गोड शेवट झाल्यावर चार दिवसांचे मनन करीत बॅग भरली. लास पाल्मास बेटाच्या सगळ्या बाजू आणि सगळी भौगोलिक रुपे पात्रीसिया ने लीलया दाखवली होती. तिचे मनापासून केलेले आतिथ्य कुबाला सुद्धा भावले होते. मुळात कुबा आणि पात्रीसिया दोघेही मनमिळाऊ असल्याने आणि सांदोश-आलेक्स ही जोडगोळी एकदम जॉली असल्याने सहलीच्या गृपची भट्टी चांगलीच जमून आली होती. एक सुंदर आठवणीतली उन्हाळी सहल म्हणून लास पाल्मास बेट कायम लक्षात राहील.

(समाप्त)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा