शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

लास पाल्मास कॅनरी बेट : एल कॉंफिताल चा खडकाळ बीच आणि सूर्यस्नान

 दिवस तिसरा : २७ सप्टेंबर २०२१


सोमवार असल्याने पात्रीसिया ला ऑफिस होते. मी आणि कुबा काही स्थानिक शिफारशी बरोबर घेऊन घर सोडले. जवळच्या एका कॉफी शॉप मधे जाऊन कॉफी आणि कोल्ड चॉकलेट पिऊन आम्ही दिवसाची सुरवात केली. सुपर डायनो मधून दिवसभरासाठी शिदोरी घेतली.
लास पाल्मास च्या बीच पासून एक बाजू धरुन आम्ही दूर दिसणाऱ्या टेकडी पर्यंत चालायचे ठरवले. वाटेत लास पाल्मास मधील दैनंदिन जगण्याचे दर्शन घडत होते. सर्फिंग, इतर वॉटर स्पोर्ट्स आणि पर्यटनाशी निगडीत अनेक व्यवसाय जोमाने सुरु असलेले दिसत होते. क्वचित एखादा योग स्टुडिओसुद्धा दिसला. जसजसे शहरापासून दूर जाऊ लागलो तसतशी वसती विरळ होत गेली. काही रस्त्याची कामे करणारे मजूर आणि एखादी चुकार मांजर अधेमधे दिसत होते. बीचलगत चालत असलो तरीही आता उंची गाठत असल्याने समुद्रातून डोकावू पाहणारे खडक आमचे लक्ष आणि कॅमेऱ्याचे शटर वेधून घेत होते.

लास पाल्मास च्या बीच लगत  असलेला एक सुळका 



फोटो काढत काढत गप्पा मारत मारत आम्ही टेकडीच्या पायथ्याशी पोचलो
तेथे असलेल्या खडकाळ बीच ला एल कॉंफिताल म्हणतातअसे कळले. तेथे फक्त दोन कोस्ट गार्ड्स (सुरक्षा रक्षक) आणि कुबा आणि मी इतकेच लोक होतो.

एल कॉंफिताल बीच ला जाण्याचा रस्ता



चांगलीशी जागा बघून आम्ही आमचे टॉवेल्स पसरले आणि सूर्यस्नानास प्रारंभ केला. काही वेळाने " अपेक्षित" गर्दी बीच वर होऊ लागली. बीच वर योगा करुन पाण्यात पाय धुवून आम्ही परत निघालो. रेतीच्या पर्यटनसुलभ बीचवर गेलो. तेथे बीच पॅडेल खेळणारे बीच मॉडेल्स शोभतील असे मुलामुलींचे गट होते. त्यांचा खेळ बघता येईल अशी माडाच्या सावलीतील जागा आम्ही हेरली.

माडाच्या सावलीत 



बीच पॅडेल चा खेळ बघत बघत आमची बीच पिकनिक मस्त पार पडली.
माडाखाली छान विश्रांती घेऊन समुद्रात पोहण्यासाठी काही आलटून पालटून फेऱ्या झाल्या. फोटोसाठी मी एका खडकापर्यंत पोहत गेलो मात्र कुबाने नीट फोकस न केल्याने जितका विशेष फोटो येईलअसे वाटले होते तितका विशेष आला नाही. त्याबद्दल चेष्टामस्करी करुन बीचिंग सुरु ठेवले.
संध्याकाळी पाचच्या सुमारास पात्रीसिया फोन करुन तिच्या घरी जायची वेळ ठरवली. त्याप्रमाणे घरी जाऊन थोडा वेळ आमच्या खोलीत विश्रांती घेतली. सांदोश, आलेक्स आणि पात्रीसिया यांच्याबरोबर डिनर साठी प्रोमेनाडा वरील एक हॉटेलमधे गेलो.

आमची सहल यशस्वी करणारी टीम 



येथील सर्वच पदार्थ उच्च दर्जाचे होते तसेच वाईन सुद्धा अन्नासोबत अनुकूल अशी होती. त्या हॉटेलला लास पाल्मास मधील सर्वोत्तम असा पुरस्कार मनोमन देऊन आम्ही जड अंगाने हॉटेलचा निरोप घेतला. प्रोमेनाडा वर लांबलचक फेरफटका मारुन घरी परतलो. आलेक्स ची दुसऱ्यादिवशी सकाळी लवकर फ्लाइट असल्याने त्याला रात्रीच निरोप दिला. गप्पागोष्टी करत झोपी गेलो.


(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा