गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

लास पाल्मास कॅनरी बेट : नैसर्गिक खाऱ्या पाण्याचे तलाव आणि कॅनरीचा सह्याद्री



पात्रपरिचय:

कुबा हा करोनाच्या साथीच्या काळातील एक सच्चा साथीदार. योगा, क्रॉसफिट आणि बोल्डरिंग या आमच्या काही समान आवडी. त्याचा नोकरीतील बदल साजरा करण्यासाठी आणि ॲम्स्टरडॅम मधील फॉल ची सुरुवात होण्या आधी जरा ड जीवनसत्व घ्यावे म्हणून एका सहलीचा बेत आखायचा होता.

पात्रिसिया ही २०१३ साली युनिव्हर्सिटी डॉर्म मधे राहत असल्यापासूनची मैत्रीण. ती गेली दोन वर्षे तिच्या बॉयफ्रेंड सोबत लास पाल्मास या बेटावर राहत होती आणि सहलीसाठी सतत बोलावत होती.
मग ५ दिवसांचा प्लॅन करुन फ्लाईट्स बुक केल्या.

शुक्रवारी दुपारी ॲम्स्टरडॅम हून निघालो. कुबाच्या आयुष्यातील ही सर्वांत मोठी फ्लाईट होती (साडेचार तास). तो युरोपच्या बाहेर कधीच गेला नसल्याने ते समजण्यासारखे होते.

लास पाल्मास च्या विमानतळाहून पात्रिसिया च्या घरी जाणे हे एक दिव्य ठरले. दोन वेळ बस बदलावी लागली. बस मधे डेबिट कार्ड ने पैसे भरुन तिकीट घेता आले नाही. इतके कमी म्हणून की काय तिच्या घराचा पत्ता चुकीचा दिल्याने आम्ही शेजाऱ्यांची बेल वाजवून त्यांना भंडावून सोडले.
अखेर तिच्या घरी पोचलो तेव्हा करोना नसल्याप्रमाणे आलिंगने देऊन स्वागत झाले. दोनेक वर्षांनी आम्ही भेटत होतो. तिचा बॉयफ्रेंड सांदोश (भारतीय नाव संतोष चे केलेले फ्रेंचकरण) आणि त्याचा मित्र आलेक्स यांच्याशी ओळख करुन घेतली.
ॲलेक्स आणि सांदोश फ्रान्समधील Lyon येथे एकत्र शिकत असल्याने एकमेकांना ओळखत होते.


सूर्यास्त होत आलेला असल्याने आम्ही घाईघाईने बीच वर गेलो. तिचे घर अक्षरशः बीच पासून पन्नास कदमांवर होते.
सूर्यास्त बघून आम्ही जेवणासाठी एका गजबजलेल्या चौकातील प्रसिद्ध हॉटेल निवडले. खास कॅनेरिअन वाईन, मोखो सॉस मधे घोळवलेले बटाटे, आणि अशाच टिपिकल पदार्थांचा फडशा पाडून गोफ्यो (मक्याच्या भाजलेल्या पीठाचे) आईस्क्रीम खाल्ले. काहीसे कणीदार असे हे आईस्क्रीम इथली खासियत आहे.

दुसऱ्या दिवशीचे प्लॅनिंग करुन झोपी गेलो.


दिवस पहिला : २५ सप्टेंबर २०२१

नैसर्गिक खाऱ्या पाण्याचे तलाव आणि कॅनरीचा सह्याद्री



सकाळी सकाळीच एक नवीन शब्द समजला . प्रोमेनाडा (Promenada) : म्हणजे समुद्र किनाऱ्यालगत चालण्या फिरण्याकरता बांधलेला फुटपाथ. तर अशा प्रोमेनाडा वरील एका टेरेस रेस्टॉरंट मध्ये नाश्ता केला : "अव्होकॅडो आणि हुमूस ची टोस्टी". सांदोश आणि आलेक्स भराभरा खाऊन भाड्याची कार घ्यायला गेले. पात्रीसिया , कुबा आणि मी त्यांना निवांत नाश्ता झाल्यावर शहरात भेटलो.
सांदोश ने चालकाची जबाबदारी घेतली. निघायच्या आधी तेथील "सुपर डायनो (Super Dino)" नावाच्या सुपर मार्केट मध्ये खाऊ खरेदी केली.

हायवे वर आजूबाजूला फक्त ओकेबोके डोंगर दिसत होते. अपवाद होता तो फक्त तुरळक दिसणाऱ्या केळीच्या बागा. पात्रीसिया प्रत्येक वेळी अशा केळीच्या बागा काहीतरी भन्नाट असल्यासारखे दाखवत होती. पण सहलीत असा उत्साह असणे सर्वांनाच ऊर्जा देणारे होते.
सांदोश आणि पात्रीसिया यांना माहीत असलेली एक विशेष जागा त्या हायवे-लगत होती. एक आडवळण घेऊन आम्ही त्या जागी पोचलो. एका छोटेखानी खाणी सारखी दिसणारी ती जागा म्हणजे एक जुने मिठागर होते. समुद्रालगत असलेल्या त्या मिठागराला रौद्रसुंदर कड्यांची पार्श्वभूमी लाभली होती.
समुद्र तेथे जरा खवळल्यासारखा भासत होता. खडकांच्या आत तयार झालेल्या गुहा, मिठागरे, निळेशार पाणी ... एकंदर माहोल होता.

मिठागरा-लगतचा समुद्र  

समुद्रालगत तयार झालेले खाऱ्या पाण्याचे नैसर्गिक पोहण्याचे तलाव हे पुढील आकर्षण होते. तेथे जाण्यासाठी घाटांतून गाडी चालवणे ही सांदोश च्या चालकपणाची कसोटी होती. तलाव मात्र फारच सुंदर होते. सिडनी मधील Bondi बीच ची आठवण करुन देणारे मात्र त्याहून अधिक raw. म्हणजे चकचकाट कमी , प्रवेश शुल्क नाही , गर्दी कमी आणि बहुतांश स्थानिक लोक.
तेथे पोहत सूर्यस्नान करत ब्रेड, चीज , द्राक्षे , चिप्स आदिंचा फडशा पाडला. समुद्राचे पाणी बिनदिक्कत पणे तलावात ये-जा करत असल्याने त्याबरोबर मासे आणि इतर जलचर सुद्धा तलावात ये-जा करत आहेत असे स्नोर्केल करणाऱ्या काही पाणबुड्यांनी सांगितले.

खाऱ्या पाण्याचे नैसर्गिक तलाव , लास पाल्मास 



तलावांपासून जवळच रेतीचा बीच होता. कॉफी आणि पेयपान करुन त्या बीच कडे मोर्चा वळवला. पुन्हा पोहणे, सूर्यस्नान सगळे साग्रसंगीत झाल्यावरच पुढे निघालो.
आतापर्यंतच्या रस्त्यात हिरवाई म्हणावी ती फक्त केळीच्या बागांच्या रुपातच दिसली होती. जसजसे आम्ही लास पाल्मास बेटाच्या मध्यभागी जाऊ लागलो, तशी हिरवाई गर्द होऊ लागली.

मोया नावाचे एक सुंदर खेडेगाव डोंगरांच्या कुशीत वसले आहे. त्या गावात एका छोट्या hike साठी थांबलो. गावातील चर्च च्या आवारातून दरीचे सुंदर दृश्य दिसते.

मोया गावातील चर्चच्या आवारातून दिसणारे दृश्य  

तेथेच एक वर्तुळाकार पदभ्रमण करण्याची वाट आहे. या hike साठी जाण्याआधी मोयाची खासियत असलेले बालुशाही सारखे लागणारे गोडमिट्ट असे Bizcocho de moya (बिझकोचो दे मोया) खाऊन बघितले. आणि पदभ्रमण सुरु केले. हिरव्या गर्द झाडीतून जाणारी ही वाट सुखद होती. वाटेत हिरव्या झाडांबरोबर(च ) वाढलेली अनेक मोठ्ठी निवडुंगाचीही झाडे होती. त्यांवर बुरशी सारखे पांढरे काहीतरी दिसत होते.

हाईक च्या "वाटेला जाताना" (डावीकडून - कुबा , सांदोष, पात्रीसिया, आलेक्स) 



पात्रीसियाला विचारले असता तिने फक्त माहिती न देता प्रात्यक्षिक देखील करुन दाखवले. जी आम्हाला बुरशी वाटत होती, ती निवडुंगावर वाढणाऱ्या किड्यांची घरटी होती. त्यांच्या अंगातून येणारा स्त्राव लिपस्टीक करण्यासाठी वापरला जातो. पात्रीसिया ने एक पांढरे घर उद्ध्वस्त करुन आपल्या अंगातील किडे दाखवत आणि किड्यांच्या अंगातील लाल स्त्राव काढून हाताला फासून दाखवला.


निवडुंगावर असलेली लिपस्टिक किड्यांची घरटी 

वीसेक मिनिटांनी आम्ही आमच्या गाडीपाशी परतलो.

पुढील आकर्षण होते Roque Nublo नावाचा सुळका. तेथे जाण्यासाठी डोंगराळ अवघड घाटरस्ता होता. आलेक्स ने आता गाडीचा ताबा घेतला होता. जसजसे उंच जाऊ लागलो तसतसे धुके आमच्याशी स्पर्धा करत होते. त्याच्या जोडीला ढगही येत होते. "Mystic" हे विशेषण भलतेच वापरले गेले. Roque Nublo ला जाणारा रस्ता कसल्याशा रॅली साठी बंद होता. दोन तरणे-ताठे वाहतूक नियंत्रक पात्रीसियाच्या आर्जवी बोलण्याला भुलले नाहीत आणि आम्हाला पुढे जायला मज्जाव केला. तरी आम्हाला Roque Nublo hike ची मज्जा घ्यायचीच होती त्यामुळे आम्ही जरा मागे फिरुन एका recreational area मधे थांबा घेतला. तेथे मस्तपैकी दगडी बाकांभोवती बसून सॅण्डविचेस चा फराळ झाला. एका अंजिराच्या झाडाला लटकून वगैरे डझनभर अंजिरे काढली.

कॅनरीचा सह्याद्री 



Roque Nublo हा सुळका बेटाच्या बरोब्बर मध्यभागी असून त्याच्या शेजारी बेडकासारखा एक डोंगर व त्याच्या शेजारी ध्यानस्थ मुनीसारखा दिसणारा एक डोंगर आहे. डोंगराळ रस्त्यातून जाताना हे आकार आम्हाला दिवसभर भुलवत बोलावत होते. आत्ता आम्ही त्यांच्या पायथ्याशी पोचलो होतो. पायथ्यापासूनमाथ्यापर्यंत जाण्यासाठी अंदाजे चाळीस मिनिटे लागतात. बऱ्यापैकी दमवणारी चढण असणाऱ्या या वाटेवर चालतानाअ नेत्रसुख मात्र पुरेपूर लुटता येते. ध्यानस्थ मुनीच्या आकाराचा जो डोंगर आहे , त्याच्या पोटात एक छोटी गुहा आहे. तेथे अनेक कबूतरांनी घरे केली होती.




पात्रीसिया खूपदा ये ट्रेक साठी येऊन गेली असल्यामुळे ती गुहेत आली नाही. आम्ही कबूतरांची विष्ठा चुकवत ट्रेक वरील निष्ठा ध्यानस्थ मुनीप्रमाणे अढळ ठेवून पुढे जात राहिलो.
सूर्यास्त व्हायच्या चांगले तास भर आधी Roque Nublo च्या सर्वोच्च पठारावर पोचलो. सुळका चढण्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागले असते ज्याची शारिरीक अथवा मानसिक तयारी आमच्यापैकी कुणाचीच नव्हती.

"रोके नुबला" डोंगरावरील एक फोटोजेनिक खडक 


असे असले तरीही फोटो काढण्यासाठी कड्यांजवळ किंवा कड्यांच्या कडेकडेला जाऊन आम्ही धाडसी असल्याचे अवधान आणत होतो.
सूर्यास्त पाहण्यासाठी मात्र आम्ही तुलनेने सुरक्षित जागा निवडली.

"रोके नुबलो" वरून दिसलेला सूर्यास्त 



कॉलेजच्या दिवसांत केलेल्या सह्याद्रीतील अनेक ट्रेक्स ची आठवण झाल्यावाचून राहिली नाही. डोळे भरुन सूर्यास्त बघून ते नारिंगी बिंब नजरेआड होताच परतीची वाट धरली. पायथ्याशी येईपर्यंत चांगलाच अंधार पडला होता. सर्वांना भुका लागल्या होत्या. आलेक्स ने मग गाडी जोरात हाणली , आणि जेवायच्या वेळेत लास पाल्मास च्या मध्यवर्ती भागात आणली. पारंपारिक कॅनेरियन खाना असणाऱ्या हॉटेलमध्ये जाऊन पोटपूजा केली. भरल्या पोटाने आणि भरल्या मनाने झोपी गेलो.

(क्रमशः)






1 टिप्पणी:

  1. मिठागर येथील निळा समुद्र हा winner आहे. बाकी सगळे bonus आहे. अप्रतिम दिसतोय समुद्र. तुम्ही snorkeling करायला पाहिजे होत. किड्यांच लिपस्टिक आवरा 😀 खडकावर चा फोटो विशेष 😎😎

    उत्तर द्याहटवा